कथा वडगावच्या लढाईची...
लेखनविषय:
ॐ नमो जी गणपतये
वरदमूर्ती प्रमथपतये
आरंभी नमून तुम्हाला
उभा शाहीर कवन गाण्याला
नमन तुज मयुरवाहिनी
वीणाधारी बुद्धीदायीनी
शाहिरावर कृपा करुनी
वाणी वरदान दे त्याला
नमन असो कुलदैवताला
म्हाळसाकांताला, बानू भरताराला
जेजुरी गडी जो बैसला
मर्दुनी मणीमल्लाला
नमन पुढे आराध्य देवाना
संत माउलीना आणि सत्पुरुषांना
विठोबा, ज्ञानबा, तुकारामाला
चोखोबा, सावता, नामदेवाला
नमन माझे भवानी मातेला
अंबाबाई, यमाई, रेणुकेला
आदिशक्ती जगदंबेला
वरदायिनी मातृदेवतेला
नमन माझे शिवबाला
संभाजी, बाजी, शाहूला
देशाचा मान ज्यांनी राखला
स्वरुज्या स्थापुनी धर्म राखला
नमन माझे गुरुमाउलीला
मातापिता, बंधू भगिनींना
वाढवूनी ज्यांनी पोसला
शिकवूनी दिले समजाला
नमन असो मराठी मातीला
रियासतीला आणि स्वराज्याला
स्वातंत्र्याचा झेंडा उभारला
तोंड देऊन फिरंगी, यवनाला
गद्य :
ही पेशवाईच्या उत्तर भागातली कथा आहे. पानिपतावर लाख चुडा फुटला आणि महाराष्ट्र देश बुडाला, मराठेशाही फुटली अशी कुजबुज सर्वत्र सुरु झाली. पेशवे हे छत्रपतींचे प्रधान. नानासाहेबांनी स्वतःच हाय खाली आणि मरण जवळ केले. राघोबादादाचा दरारा मोठा. पण सत्तेची हाव त्यांनी धरली आणि मसलत बिघडू लागली. अशा वेळी माधवराव पेशव्याने घनघोर प्रयत्न केले. आप्तांचा, मातब्बर घराण्यांचा विरोध मोडून काढत निझाम, हैदराला नमवले. पण दुर्दैवाने ते अल्पायु ठरले. थेऊर मुक्कामी त्यांनी देह ठेवला. रमाबाईंनी सहगमन केले. राघोबाला मनात नसताना सुद्धा नारायणरावाला गादीवर बसवावे लागले पण सत्तेचा मोह काही सुटला नाही…
पद्य :
राघोबा पुरुष जरी भारी
अटकेपार गेलेला जरी
मोहाने मती सारी
गेली हो लयाला
लागी दुर्जन संगतीला…
गद्य :
भोजनावळी उठवाव्या, नाटकशाळा सांभाळाव्या, लाळघोट्या लोकांना जवळ करून कपट कारस्थाने करावीत, कारभार अस्थिर कसा करता येईल याचीच उठाठेव करावी, पेशव्याला पाण्यात पहावे, त्याला परागंदा करून गादीवर स्वतः बसण्याचे बेत आखावेत यातच त्याचे दिवस जाऊ लागले.
पद्य :
सत्तेची हाव मनी पुरती बसली
गारद्यांशी दोस्ती केली
तीन लाखाची सुपारी दिली
धरायाची चिठ्ठी बदलली
नारायण मारला कपटाने….
गद्य :
नारायणराव पेशवा मेला, त्याचा खून झाला, शनिवारवाड्यात ब्रह्महत्या, स्त्री हत्या, गो हत्या झाली अशी बातमी आली आणि पुण्याचा थरकाप उडाला…
पद्य :
पुण्यनगरीचे पुण्य आटले
घडू नये ते सारे घडले
लोक सारे हळहळले
परी दाबावे कुणी कुणाला….
गद्य:
मातब्बर सरदारांनी मध्यस्थी केली. कशीबशी नारायणरावाची क्रिया झाली. नगरी शोकात बुडाली पण राघोबासारख्या निर्लज्जाला त्याचे काय?
पद्य :
राघोबा बसला गादीवरी
आनंदीस घेऊन बरोबरी
गारदी भोवती जशा घारी
गणिका भोवती नाच करती…
गद्य:
पुण्यातील अवस्था बाहेरच्या शत्रुना कळली तशी त्यांनी उचल खाल्ली. निझाम, हैदर नायकाने स्वराज्याचे लचके तोडणे सुरु केले. त्यामुळे राघोबाला त्यांच्यावर चालून जाणे भाग पडले…
पद्य :
यवने उत्पात मांडीला
दक्षिणेला मुलुख लुटला
राघोबाला चेव आला
सत्वर निघाला स्वारीला…
गद्य :
तेवढ्यात वाड्यात कुजबुज सुरु झाली. नारायणरावाची विधवा गंगुबाईला दिवस गेले. जो तो एकमेकाला विचारे, “कळले का, गंगुबाईला म्हणे डोहाळे लागले.” आणि आपण काय बोललो म्हणून चपापून गप्प होई. कारभाऱ्याना राघोबा नकोच होता. आता राज्याला वारस येणार म्हणाल्यावर त्यांनी उचल खाल्ली…
पद्य :
अंतपुरातून वार्ता पसरली
गंगुबाईची कूस उजवली
फडावर कारभारी मंडळी
खलबते करू लागली…
कारभारी करती धीर
नाना आणि बापू मुत्सद्दी थोर
संगे घेतले सरदार
बंड करून उठण्याला…
गद्य :
राघोबादादा पुण्याबाहेर असल्याने मंडळींचे फावले. त्यांनी हिकमतीने गंगुबाईला शनिवार\वाड्यातून सोडवले. रातोरात पालखी पळवली आणि गंगुबाई पुरंदर गडावर दाखल झाली…
पद्य :
राघोबा बेसावध सापडला
कारभाऱ्यानी जोर केला
वाड्यातून काढुनी गंगुबाईला
पळवले पुरंदर गडाला…
गद्य :
त्यानंतर वेळ न घालवता कारभाऱ्यानी गंगुबाईला दिवस गेल्याचे जाहीर केले आणि तिच्या पोटात वाढत असलेल्या गर्भाच्या नावे कारभार सुरु केला…
पद्य :
भावी वारसाचा डांगोरा पिटला
त्याच्या नावे कारभार केला
यथावकाश जन्म झाला
माधवराव नारायणाचा…
गद्य :
जन्माच्या चाळीसाव्या दिवशी त्या बालकालाच छत्रपतींनी पेशव्याची वस्त्रे दिली. सवाई माधवराव बाळाच्या नावे कारभारी कारभार करू लागले…
पद्य :
छत्रपतींशी संधान बांधले
बालकाला पेशवे केले
बारभाई पुढे ठाकले
कारभार करण्याला…
राघोबा मनी चरफडला
शेवटी तो एकटा पडला
घातले बहुत थैमानाला
तरी कोणी न जुमाने त्याला…
गद्य :
संतापलेल्या राघोबाने नागपूरकर भोसले, शिंदे, होळकरांना बरोबर घेऊन पुण्यावर स्वारी करायचे ठरवले. त्याने उत्तरेकडे परस्पर कूच केले…
पद्य :
कावेबाज राघोबा पलटला
उत्तरेला जाऊ लागला
सांगावा भोसले, शिंदे, होळकराला
पण कुठेच थारा नाही मिळाला…
लोभापायी मती गेली
इंग्रजांची संगत धरली
गर्भार आनंदी धारला टाकली
धाव घेई सुरतेला…
बहुत कपट आरंभले
दुष्मनाला सत्व विकले
राज्याला विकून खाल्ले
दास होई ताम्रांचा…
गद्य :
त्यावेळी कलकत्याला हेस्टीन्ग गव्हर्नर होता. त्याने कंपनीची सत्ता वाढवायची संधी हेरली आणि दुटप्पी चाल खेळली…
पद्य :
हेस्टिंग ताम्र बंगालात
बहुत करी हिकमत
पुरंदरी करी तह
राघोबा ठेवला मुंबईला…
गद्य :
फाटलेले दिसले की लोक बोटे घालतात. वाघ पिंजऱ्यात सापडला की सगळे त्याला खडे मारतात. तशीच अवघड अवस्था राघोबाच्या या गद्दारीमुळे पेशवाईची झाली…
पद्य :
इंग्रजांनी डाव साधला
राघोबा बरोबर घेतला
ताम्र जाळिती कोकणाला
बोरघाट ओलांडून आला…
गद्य :
इंग्रजांनी घाट मोठा घातला. उत्तरेकडून कर्नल लेस्ली पुढे सरसावला. त्याला शिंदे, होळकर, बाळाजी गोविंद यांनी तिकडेच अडवून ठेवला. काल्पीच्या लढाईत इंग्रज पाण्याला मोताद झाले. कर्नल पार्कर, मेजर फुलटर्न, कॅप्टन अॅश, कॅप्टन मार्क्स, कॅप्टन क्रॉफर्ड तडफडून मेले. इकडे राघोबादादा आणि त्याचा दत्तक मुलगा अमृतराव ५०० इंग्रज आणि दोन हजार शिपाई घेऊन बोरघाट चढून आले. त्या सेनेमध्ये कर्नल इर्गर्टन, कार्नक, मॉस्टीन हे सेनापती होते. रस्त्यात मॉस्टीन आजारी पडला म्हणून मुंबईला परतला तो तिकडेच मेला. इकडे पेशव्यांच्या बाजूने राघोबाचा सामना करायला सेना गेली. तिच्यामध्ये महादजी शिंदे, तुकोजी होळकर, सरदार पानसे असे मातब्बर खासे होते. सरदार पानसेंच्या तोफखान्यात मस्यु नोंरेन्हा नावाचा नामांकित फिरंगी गोलंदाज पण होता. कार्ला इथे लढाई झाली तेव्हा तिच्यात कॅप्टन स्टुअर्ट आणि कॅप्टन के तोफगोळ्याने मारले गेले…
पद्य :
पानसे, शिंदे, होळकर सरदार
स्वराज्याच्या रक्षणा तत्पर
कूच करिती सत्वर
धावले खंडाळ्याला…
बहुत भारी मराठा जुझला
पानशांनी गोळा फेकला
भाजून काढिती ताम्राला
जागीच मारून लोळवला…
मराठ्यांचा पाहून जोर
इंग्रजांचा सुटला धीर
मनी ज्याच्या असे चोर
कसा होई तो बळजोर…
पांढरे निशाण दाखवले
वडगावी तहाला बसले
राघोबाला पकडून दिले
पळत सुटले मुंबईला…
गद्य :
असा पुण्यप्रताप मराठी माणसांनी केला. त्यांची कवने गाण्यास शाहिराचा डफ कडाडला…
पद्य :
मराठी माणूस बहु थोर
सहसा त्याचा सुटे ना धीर
समोर येता शिरजोर
क्षणभर न सोडे त्याला…
कोरस :
स्वातंत्र्याच्या रक्षणाला सारे येत पुढती
जात धर्म विसरून होई एक मराठी माती ||
वाचने
4237
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
वाह.. जियो दादा जियो ! दंडवत
वाहवा!
वा!
खुपच छान!
मस्त पोवाडा, आवडला.
In reply to मस्त पोवाडा, आवडला. by विवेकपटाईत
विवेकसाहेब बरोबर बोलत आहात.
मस्त लिहिलय...पोवाडा आवडला
टाळ्या............
भारी म्हणजे भारीच
पोवाड़े ऐकून छाताड़ी भट्टी पेटत
वा ये बात!
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by प्रसन्न केसकर
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by प्रसन्न केसकर
पोवाड्याइतकाच माहितीपुर्ण
सुंदर पोवाडा !
मस्त!
शाहीर जबरदस्त पवाडा हाणलाय
मस्त!!जमलं तर ऑडियो
आन सांगायचं र्हायलंच बगा.
In reply to आन सांगायचं र्हायलंच बगा. by पाषाणभेद
कचकुन+++++१११११ टू भेदकपाषाण!
In reply to कचकुन+++++१११११ टू भेदकपाषाण! by अत्रुप्त आत्मा
दणकून +++++++++++११११११११
खणखणीत पहाडी आवाजात पोवाडा
ख़ास अनुभव
वाह बरेच दिवसानी प्रसन्नदा
पोवाडा आणि तुमचा प्रतिसाद...