Skip to main content

मराठी माध्यम की इंग्लिश मिडीयम

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 26/04/2013 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील सगळ्या घरात सध्या एक अगदी चर्चेचा मुद्दा असतो. तो म्हणजे मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे की इंग्लिश मिडीयमच्या शाळेत. याचे नेमके उत्तर कुणाकडेच नसते. इंग्लिश माध्यमामधे मुलाला घालणारे पालक काही स्वतः फाडफाड इंग्लिश बोलत नसतात. त्यांना मराठीचे प्रेम नसते असेही नाही पण यामुळे मुलाचे भले होइल असा एक विचार मात्र असतो. मराठी काय मुद्दाम शिकायला लागत नाही. ती आसमंतात असतेच पण व्यवहारामधे, नोकरीसाठी इंग्लिश आवश्यक आहे असा एक समज या पालकांचा असतो. इंग्लिशचा पोटापाण्याशी फार पूर्वीपासून संबंध जोडण्यात आला आहे. आता राज्यकर्त्यांमुळे अनेक गोष्टी बदलतात. हेही खरे. आज शाळेत अरबी फारसी किंवा तुर्की कंपलसरी केले तर ? पण एके काळी अरबी फारसी आणि काही प्रमाणात तुर्की या भाषा गरजेच्या होत्या. इंग्रजी अंमलानंतर अनेक गोष्टी बदलल्या. इंग्रजीचे आगमन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध लढणार्‍या अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांना इंग्रजीचे उत्तम ज्ञान असे. खरी पंचाइत स्वातंत्र्यानंतर झाली. इंग्रज गेल्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांपैकी काही हटवाद्यांनी इंग्रजांच्या अनेक गोष्टींबरोबरच इंग्रजीही हटविली. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीला अनेक शैक्षणिक प्रयोग अनुभवायला लागले. परिणाम त्यांच्या इंग्रजीवर झाला. तोपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शासकीय कार्यालयांचेही बर्‍यापैकी मराठीकरण झाले होते. याला कोणतेच शासकीय खाते अपवाद नाही. त्यामुळे किमान शासकीय सेवेत नोकरी मिळायला अडचण येत नसे. पण इंग्रजीचा न्यूनगंड निर्माण झालाच. मग आपल्याला नाही तर मुलांना तरी हे हाल भोगायला लागू नयेत. या विचाराने इंग्रजीकडे वळणारेही काही पालक आहेत. या सगळ्यातून असे दिसते की पाल्याला इंग्रजी / मराठी माध्यमाच्या शाळेत घालताना आपली संस्कृती टिकवायची किंवा बुडवायची यापेक्षा उद्याच्या जगात पाल्य नीटपणे आपल्या पायावर उभा रहावा एवढाच विचार असतो. काही जणांना वाटते मराठीमुळे भले होइल, काहींना वाटते इंग्रजीमुळे भले होइल. अनेकजण जे दहावीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतात ते पुढे अकरावी सायन्सला विनातक्रार इंग्लिशमधून अभ्यास करतात. गुजरातमधे गुजरातीतून इंजिनयरींग करण्याची सोय आहे. तसे महाराष्ट्रात नाही. आजूबाजूला नजर टाकली तर आयुष्यात यश मिळवलेल्या अनेक यशवंतांपैकी अनेकजण मराठीमधे शिकलेले आढळतात तर अनेकजण इंग्रजीमधे शिकलेले. म्हणजे मराठी कि इंग्रजी या निश्कर्षापर्यंत येणेही अवघड होऊन बसते. बरं सामान्य माणसाला दोन्ही माध्यमांचे समर्थन खरे वाटते आणि कन्फ्युजन आणखी वाढते. इंग्रजीमधे शिकलेल्या अनेक लोकांना मराठी साहित्य वाचताना अडचणी येतात. मराठी मधले बारकावे, अलंकार समजत नाहीत. पण रोजीरोटी मराठीवर अवलंबून नसल्याने त्यांचे काही अडत नाही भले त्यांचे सगळे आयुष्य इंग्लंडमधे नव्हे तर महाराष्ट्रातच जाते. आता पुण्यामंबईत पूर्वीसारख्या दर्जेदार मराठी शाळा राहील्या आहेत कुठे ? असा प्रश्नही कानी पडतो. यातही महाराष्ट्र सरकारचे धोरणही मराठी शाळांबाबत दुजाभावाचे आहे. नव्या मराठी शाळांना परवानगी मिळत नाही. मिळाल्यास अनुदानापाशी अडते. त्यामुळे लोकांनाच मराठी नको आहे यापेक्षा शासनालाच मराठी शाळा नकोशा झाल्या आहेत. अजून एक गोष्ट. आमच्या परिचयातील एक मुलगी. तिला कंपनी फ्रान्सला पाठवणार होती. याकरीता जुजबी फ्रेंच ती शिकत होती. तिचे एकच म्हणणे असे, इंग्लिशशी झगडण्यात इतकी वर्षे गेली. ते पुरेसे नाही म्हणून आता फ्रेंच शिकावे लागते आहे. त्यामुळे पडलेला प्रश्न हा आहे की संस्कृती कशी टिकेल यासाठी नव्हे मुलांच्या रोजीरोटीसाठी कोणते माध्यम योग्य ? इंग्रजी माध्यमात शिकले तरी पुढच्या पंधरा वीस वर्षांनंतर इंग्रजीचे तितके महत्त्व शिल्लक राहील का ? की उद्या जर्मन, फ्रेंच, जपानी, चीनी इ. भाषा शिकाव्या लागणार आहेत! तेव्हा नेमके कोणते माध्यम निवडावे ? हा मोठा प्रश्न आहे.

वाचने 55365
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

आता तुम्ही पुन्हा स्पेसिफिकली उल्लेख केलात म्हणून... एक सांगू का? 'पेन भेटलं' ही बोली भाषा म्हणून समर्थली जात असेल तर म्हणजे.... प्लीजच! व्याकरण दृष्ट्या बघा. शब्दकोषात 'भेटणे' या क्रीयापदाचा अर्थ बघा. आणि मग ठरवा. आणि हिणवण्याचा तुम्ही पुनरुच्चार का करत आहात तुम्हालाच माहीत.
केळी म्हणो वा केळं वा क्याळं, हे शुद्ध ते अशुद्ध अशी लेबलं लावू नये.
मग प्रमाण कसं ठरवायचं? आवडतं/नावडतं अशी लेबलं लावून? का काय, म्हणजे व्याकरण दृष्ट्या बघायचं नसेल प्रमाणाकडे तर कसं? असो. यापुढे माझा पास.

In reply to by वेल्लाभट

शब्दकोषात 'भेटणे' या क्रीयापदाचा अर्थ बघा. आणि मग ठरवा.
शब्दकोषात 'क्रीयापद' हा शब्द क्रियापद असा लिहिला जातो.

In reply to by वेल्लाभट

प्रत्येक बोलीभाषेवर आजूबाजूच्या प्रांतीय भाषेचा प्रभाव आहे. 'भेटलं' हे क्रियापद वर्‍हाडी भाषेत 'मिळणे' याअर्थी वापरलं जातं. त्यावर हिंदीच्या "मिलना" या शब्दाचा उलटसुलट काहीतरी प्रभाव आहे कारण हिंदीत सगळ्या भेटण्या-मिळण्याला एकच 'मिलना' हा शब्द आहे. तसाच वर्‍हाडीत सगळ्या भेटण्या-मिळण्याला एकच 'भेटणे' हा शब्द आहे. जुन्या ऐतिहासिक मराठीतही 'भेटणे' या शब्दास 'मिळणे' हा शब्द वापरलेला आठवतो. जसे अमक्या फौजेने तमक्या फौजेस जाऊन मिळणे. यात मिळणे म्हणजे एकत्र होणे असा आहे. वस्तू मिळणे याअर्थी नाही. जाणकार अधिक योग्यपद्धतीने सांगतील. बोलीभाषा म्हणून काय समर्थलं जावं याचे कायदे 'प्रमाणभाषा आणि तीचा शब्दकोष' बघून ठरवायचे हेही जरा अतिच. हे म्हणजे म्हशीच्या दुधाला गायीच्या दुधाची परिमाणं लावून त्याची पौष्टीकता ठरवण्यासारखं आहे. बोलीभाषा हा एक वाहता प्रवाह आहे. त्याचे आपले सौंदर्य आहे. त्यालाही प्रमाणात बसवायचं तर मग कुठलीच बोलीभाषा नको फक्त प्रमाणभाषाच असावी. स्पेसिफिकली व परत परत उल्लेख करण्याचे कारण हेच आहे की बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या दोघींचे स्वतंत्र अस्तित्व एकत्रितपणे अजुनही बर्‍याच लोकांना मान्य नाही. त्यातूनच सामान्य जीवनात अनेकांना डीवचणे, अपमान करणे असा अनुभव येतो. म्हणून ही कळकळ. बाकी काही नाही. असो. यावरच एक घरगुती किस्सा: माझी बायको अस्सल मुंबईकर. मी वर्‍हाडी. कधी कधी किचनमधे भांड्यांच्या नावांवरून जाम घोळ होतात. बरेचदा तीला चटकन समजावे म्हणून मुंबईकर-मराठीतला शब्द आठवता आठवता मी ब्लँक होऊन जातो. कारण जन्मापासून ऐकलेला शब्द सुटत नाही, नवीन लवकर आठवत नाही. अचानक कधी 'गळवाभर पाणी दे पटकन' म्हटले की तीची दांडी गुल होते. तीने 'लोटीत आहे ते पाणी घे' म्हटले की माझी दांडी गुल. एकदा तर 'ते' घड्याळ का 'ती' घड्याळ यावरून जबरा खडाजंगी झाली होती. थोडक्यात काय तर आपले भाषेचे संस्कार फार रुतलेले असतात. वेगळं काही आलं की धडपडायला होतं.

In reply to by आयुर्हित

मराठीच्या भविष्याविषयी आत्यंतिक काळजी व्यक्त करणार्‍या सर्वांना एकदा विचारले पाहिजे की तुम्ही मराठी आंतरजाल पाहिले आहे का? माझा असा अंदाज आहे की मराठी आंतरजालाची वाचकसंख्या किमान अर्धा कोटी तरी असावी. यात मराठी संस्थळे, वृत्तपत्रांच्या जालिय आवृत्त्या, ब्लॉग्ज व समाजमाध्यमांतून उपलब्ध असणारे मराठी लेखन इत्यादी. त्यावर लेखन करणार्‍यांची संख्या किमान पंधरा वीस हजार तरी असावी. अन दिवसेंदिवस हे आकडे वाढतच आहेत असे निरिक्षण आहे. हे सर्व जाणून घेऊनही कुणाला मराठीच्या भविष्याची आत्यंतिक काळजी वाटत असेल तर ती गंभीर बाब असेल.

मराठीच्या भविष्याची आत्यंतिक काळजी
ज्यावेळी एखाद्या भाषिक व्यक्तीसमुहातील बहुसंख्य व्यक्तींचे असे मत होउ लागते की दुसर्‍या एखाद्या भाषेचा वापर केल्याने आपल्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रगतीची शक्यता जास्त आहे, तेव्हा त्या व्यक्तीसमुहातील मुळ भाषेचा अंत समीप आला आहे असे समजतात- अशा अर्थाचं मी काहीतरी कुठेतरी वाचलंय. मला ते पटलं. आजकाल अगदी अल्प उत्पन्न गटातील व्यक्तीही इंग्रजी शाळेत आपल्या पाल्याला घालायला धडपडत असतात. आमच्या सोसायटीत देखरेखीसाठी असलेली बाई आम्हाला विचारून गेली की तुमची मुलगी ज्या शाळेत जाते तिथे जागा शिल्लक आहेत का? आहेत म्हणून सांगितल्यावर पुढे म्हणाली की शाळा इंग्रजीच आहे ना!! बायकोने सांगितले की इंग्रजी वर्ग पण आहेत, तेव्हा चेहरा विचित्र करून म्हणाली की मग तुमची मुलगी इंग्रजी माध्यमाच्या वर्गात जात नाही का!! ( तिला इंग्रजी माध्यम हवे असावेच, कारण ती काय मराठी नव्हती. पण त्यात आमचा कशाला उद्धार!!) माझा एक क्लायंट तर माझी मुलगी मराठी माध्यमात जाणार म्हणल्यावर कळवळला होता की अहो काळजी करू नका, माझ्या सगळीकडे ओळखी आहेत, म्हणताल त्या शाळेत अ‍ॅडमिशन होइल!! जसं की आम्च्या लेकीला इंग्रजीवाले नाकारतच होते आणि अत्यंत नाइलाजाने मी तिला मराठी शाळेत घालत होतो... माझ्या ओळखीच्या आणि नात्यातल्या फारच थोड्यांची मुलं मराठी शाळेत जातायत (स्व-संपादित). हे किती दिवस चालु शकेल? आमच्या वेळच्या पैकी फक्त १० टक्के मुलांची मुलं मराठी माध्यमात जातायत. समजा हे प्रमाण इथे स्थिर राहिले तरी लवकरच अशी वेळ येइल की मराठी माध्यमाच्या शाळाच बंद पडतील...कितीही इच्छा असली तरी शाळा चालु तर हवी तिथे कुणी जायला... तेव्हा मराठीच्या भविष्याची काळजी अगदीच अनाठायी नाही. आंतरजालावर मराठीत गप्पा मारता येणे ही एक नक्कीच आशादायी घटना असेल. पण पुरेशी आहे असे वाटत नाही.

In reply to by असंका

जेव्हा मी मुलाला मराठी शाळेत घातलंय असं कुणाला सांगतो तेव्हा ऐकणार्‍याच्या चेहर्‍यावरचे भाव असे असतात की जणू, 'अरेरे, काय अधोगती करून घेतली आहे बिचार्‍याने, कसे कळत नाही यांना?' वैगेरे वैगेरे. इतक्या काळजीने ही लोकं बोलतात की जणू आता इंग्रजीत न शिकणार्‍यांना जगण्याचा हक्क मिळणार नाही. आणि मी, परवडत नाही तरी इंग्रजीच्या अट्टाहासाने घराचे बजेट बिघडवून घेणार्‍यांना हसतो. याच अट्टाहासावर आधारीत क्राईम पेट्रोलमधे एक एपिसोड पाहिला होता.

In reply to by असंका

श्रीमंत घरची मुले श्रीमंत इंग्रजी शाळेत जातात म्हणून माझीही मुले तीथेच शिकतील असा एक गरीब घरातली बाई निर्णय घेते. नवर्‍याची कमाई इतकी नसल्याने त्यावर प्रचंड दबाव आणते. घरातले सगळे वातावरण बिघडते. पण पैसे जमू शकत नसल्याने प्रवेश हुकतो आणि ती आत्महत्या करते असा काहीसा शेवट आहे. नेमकं आठवत नाही आता. पण पिळवटून टाकणारा प्रसंग होता. अशी मरमर करणारी कुटूंबं प्रत्यक्ष बघितली आहेत. त्यांच्यावर हसावे का रडावे तेच कळत नाही.

नैसर्गिक बाबाींमध्ये लुडबुड करण्याची मानवाची खोड जुनिच, मुल ज्या घरी जन्मले, ज्या राज्य /देश (परिसरात) आनंदाने वाढते तिच मुलाची भाषा ठरते. मुख्य म्हणजे लहान बालकांचा मेंदू आजूबाजुचे आवाज टिपून त्यातुन स्वयं स्वर/नाद ऊच्चार करते, म्हणजे शिकणे हि बाळाची नैसर्गिक प्रक्रिया आहे, आणि बाळ ते लक्षपूर्वक आत्मसात करते. जन्म ते शाळा प्रवेश ४ वर्ष मुल जे काही त्याच्या मातृभाषेत अथवा परिसर भाषेत शिकते तिच जर शालेय शिक्षणाची भाषा उपलब्ध असल्यास परमभाग्य, अन्यथा कोमल बाल मन नवीन अनोळखी भाषा ज्यातुन त्याला शिकवणार आहेत (फरक लक्षात घ्या शिकणे नाहीं) दडपणाखाली येते. मराठी शाळा अस्तित्वात असतांना आपली मुले आपण जन्माला घातली (मुद्दाम घातलीत, आपोआप झालेली नाहीं)तर ते आपलेहीं परमभाग्यच, नाहीं तर बसावे लागले असते पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ऊर्दु, फारसी भाषा शिकत, तर असे जे अनायास मिळते त्याची किंमत नसते हा मूळ मानवी स्वभाव. पुढे पर्यावरण बदल घडले ते मानवाचे निसर्गावर आक्रमण झाले, ज्याला आपण प्रगती म्हणतो तिच्या व्यक्ति सापेक्षता सहित विभिन्न रूपांत उपयोगी वाटुन होणारे परिणाम नजरेआड करतो तेव्हा खरंच प्रश्न पडतो की सर्वसमावेशक विकास घडविताना अभिप्रेत असलेल्या परिणामाहून भयंकर, निरंतर टिकणारे दुष्परिणाम जाणिव करुन देतात की मानवा तुझे काहितरी चुक्याच. यालाच अनुसरुण असे म्णावे वाटते की सध्या उपलब्ध मराठी माध्यमात आपण जाणुनबुजुन जन्माला घातलेल्या मुलांना त्यांच्या कलाने ऊमलु देणे, व आपल्या उच्च भाषिक संस्करांने बहरु द्यावे, त्यातच बालकांचा आनंद आहे. आपल्या सुप्त, अतृप्त, अवाजवी, ईर्ष्यालु मागण्या पूर्ण करने हा हेतु ठेवून आपण संतति निर्माण केली का? याचा एकदा मनाशी पडताळा केला, आपल्या आकांक्षी मनाचा धांडोळा घेतला व तरीही असे प्रश्न उपस्थित झालेच तर नैसर्गिक तत्व पालन करावे. राग, लोभ, काम, क्रोध, मत्सर,ईर्ष्या या षड़रिपूंना आपल्या निर्णय प्रक्रियेत प्रभाव पाडू देऊ नये. माध्यम कुठलेही असले तरी काही फरक पडत नाहीं असा युक्तीवाद ऐकला की मला त्या इवल्या जीवाला दावणीला बांधल्याचे चित्र दिसते, मुलांना लहान वयातंच सवय लागली तर पुढे त्रास होत नाहीं, लहान वयात मुले सर्व शिकतात मग जुंपा त्याला- खोंडाला पण शेतकरी वयात आल्यावरंच जुंपतो पण आजचे आधुनिक सर्वज्ञानी पालक हे आपला मालकी हक्क गाजवताना मूलभूत मानवाधिकार मात्र पायदळी तुडवतायत. मुख्य भूमिका एकच मुले शिकतात ती मनस्वी असतात पण आपल्याला ती यशस्वी हवी असतात. असंख्य प्रतिक्रिया असे व्यक्त करतात की मुले शाळेत (इंग्लिश) गेली (शिकली नव्हे) की भावी आयुष्यात हमखास यशाची किल्ली त्याला आपण देतोय व फार मोठे उपकार करतोय (ऐपत असता/नसता दर्जेदार? शिक्षणाची सोय केली व आता उच्च पगाराची नौकरीपेशा जागा पटकावुन पालकांच्या दूरदर्शी पणाची फलश्रुती. याच कारणासाठी जन्मदाता झालो का? आता जुने ते सारे सोने होते आणि आजचे सारे पितळे बंधु. सरकारी ते भिकारी अन् खाजगी ते ताजगी. ज्याची किंमत फार ते भारी, ठरवुन शिक्षक होणारे किती अन् ठरवुन आपल्या पाल्याचे शैक्षणिक ध्येय शिक्षकी पेशा ठेवणारे किती? आॅ!! हे व काय? एकूण काय तर पैसा फेका जबाबदारी शून्य, जर जबाबदारी आहे/असेल तर मग आपले २५-३० वयोमान ज्ञान (फक्त इंग्लिश भाषा बोलणे इतपत) स्वतः निभावू की साशंकता तर मग कशाला हवे इतर माध्यम? उत्तर आहे- सगळे तेच करतायत, सामाजिक दबाव, घरुन भूणभूण, नातेवाईकांची टोचणी, सामाजिक स्तर/प्रतिष्ठा इ. इ. मग या सर्वापासून सुटकेचा सोपा मार्ग - घाला महागड्या /विदेशी छापाच्या शाळेत आपल्या अजाण, कोवळ्या पाडसांना, निसर्ग मानवाला लाखो वर्षों पासून जे संचित पुरवतोय ते सर्व सोडुन आजचा मुर्ख मानव लागलाय कचकड्या च्या मागे.

१) इकडे कोणाची मुले इंग्लिश माध्यमात आहेत ? ( माझी आहे ) २) स्वत: इंग्लिश माध्यमात नसल्याने कोणाला नुकसान झाल्यासारखे वाटते ( मला वाटते) या प्रश्नाची उत्तरे मिळतील का?