✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शी!!!! तुम्ही नियम पाळता?

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Sun, 05/17/2015 - 23:31  ·  लेख
लेख
रविवार सकाळची गोष्ट आहे. पहाटे पहाटे १०.३० वाजता माझे एक जवळचे मित्रवर्य घरी आले. उजवा हाताचा पंजा आणि कोपराची मागची बाजु बँडेजमधे गुंडाळलेली, चेहेर्याची उजवी बाजु थोडीशी घसपटलेली आणि जराश्या "तैमुरलंग" अवस्थेमधे त्याला पाहुन मी खरं तर दचकायला हवं होतं. त्याऐवजी मला भयानक हसायला आलं. नाही नाही तुम्हाला वाटतयं तश्या माझ्या संवेदना वगैरे मेलेल्या नाहीत पण त्याची ही अवस्था व्हायला तो स्वतःचं जबाबदार आहे. त्याचं म्हणजे "आधीचं उल्हास, त्यातुन फाल्गुनमास" असा प्रकार आहे. गाडी गर्दीच्या रस्त्यांवरुन कट मारत चालवणं, दारु वगैरे प्यायल्यावरचं आपल्याला गाडी कशी जास्तं चांगली चालवता येते ह्याच्या फुशारक्या मारणं, रस्त्याकडे लक्ष नं देता रस्त्याकडेनी चाललेल्या प्रेक्षणिय स्थळांकडे बघणं आणि हेल्मेट घालणं म्हणजे नामर्दपणाचं लक्षणं वाटणं इत्यादी अनेक सद्गुणांनी महाशय नटलेले असल्यानी हे सौख्यं त्याला कधी सामावुन घेतयं ह्याचीचं मी वाट पहात होतो. आत्ता अगदी सहा महिन्यांमधली गोष्ट आहे, मी शक्यतो हेल्मेटशिवाय गाडी चालवतं नाही ह्यावरुन चार मित्रांमधे माझी अक्कल काढत होता. आणि तेही भो...असो..तेही त्याच्याएवढेचं सद्गुणी असल्याने त्याची अगदी बाजु घेउन घेउन मला खोटा पाडतं होते. काय करणार? सुरक्षित गाडी चालवणं हा म्हणे मिडलाईफ क्रायसिस आहे असं वरुन ऐकुन झालं. बहुमत हेचं अंतिम सत्य असं दुर्दैवानी आपल्या समाजात मानलं जात असल्यानी नियम पाळणं हा दुर्गुण आहे हे त्यांनी अगदी सहज सिद्ध करुन दाखवलं. असेचं नियमपळवादी सदगुणी लोकं जगात वाढत राहिले तर माझ्यासारख्या दुर्गुणी नियमपाळवादी लोकांना रोजचं ह्या एका लाजिरवाण्या प्रश्णाला सामोरं जायला लागणार. एखाद्या त्रैलोक्यसुंदरीनी के.आर.के. कडे तुच्छपणे बघावं किंवा एखाद्या मर्सिडिझ वाल्यानी स्कुटरवाल्याकडे ज्या तुच्छतेने बघावं अश्या नजरेनी पाहता पाहता "श्शी. तु रहदारीचे नियम पाळतोस? तुझ्यात कै दमचं नै बाबा!!!" वगैरे ऐकायची वेळ लवकरचं येणार असं दिसतय. चुक ह्या नियमपळवादी लोकांची नाहिये. सरकारची आहे. त्या आर.टी.ओ. मधे आणि ड्रायव्हिंग स्कुलमधे सपशेल खोटं शिकवतात त्याला सामान्य जनता काय करणार? एखादं दुसरी चुक असती तर मानलं असतं बॉ, पण सगळेचं नियम चुकीचे बनवलेत म्हणजे हैट झाली. म्हणे लाल सिग्नलला गाडी थांबवा, अंबर दिव्याला सावधपणे जा आणि हिरवा सिग्नल लागला की काळजीपुर्वक जा. लाल सिग्नल लागला की हिरव्या झालेल्या बाजुच्या लोकांना शिव्या हासडत जायची मजा त्या सरकारी बाबाजींना काय कळायची? सिग्नल हे रहदारीचे नियंत्रण करायला लावलेत अशी लोकांची गैरसमजुन करुन देण्यातही ह्याचं नीचं सरकारचा वाटा आहे. ते टपरीआड उभे राहिलेले पोलिस, त्यांना दिवसभर काय विरंगुळा? बघSssSSत बसतात रंग बदलणार्‍या सिग्नलकडे. त्यातुन अधुन मधुन विरंगुळा म्हणुन एखाद्या गाडीवाल्याला पकडायचा, त्याच्या कागदपत्रांचं वाचन करायचं आणि करमणुक साधायची असला निरुपद्रवी विरंगुळा दुसर्‍या कुठल्या क्षेत्रात सापडायचा हो? त्यातुन परत काही मामांना आकड्यांची कोडी घालायची भारी हौस. "पावतीपुस्तकामधे २०० रुपये घालता का १०० रुपयात बिनपावतीचं सोडु" वगैरे सुप्रसिद्ध कोड्यांचे जनक हेच्चं हो. त्यांची काय चुक? शिवाय गाडीची किल्ली लपवुन ठेवणं आणि मग समोरच्याला ठेंगा दाखवणं वगैरे मैदानी खेळ तर अगदी आवडीचे त्यांच्या. टार्गेट पुर्ण करायचा टारगटपणाही अधुनमधुन करावा लागत असल्यानी नियम पाळणार्‍यांनाही अर्थदानाचं पुण्य मिळवुन देण्यामधे ह्यांचा महत्त्वाचा "वाटा" असतो. त्यातुन हल्ली मायबाप सरकारच्या हेल्मेटमधे नवी आयडियेची कल्पना आलीये म्हणे. डो़कं वापरायचं म्हणे हेल्मेट सुरक्षित रहावं म्हणुन. आयला, टिळक पाहिजे होते राव. नक्की सरकारचं हेल्मेट ठाण्यावर आहे का असा अग्रलेख पाडला असता त्यांनी. हेल्मेट ही काय वापरायची गोष्ट आहे का? मस्तं डो़कं उघडं ठेवायचं, दोन-चार पेग कड्डक दारु लावायची आणि विमानाच्या सफाईनी दुसर्‍या गाड्यांना आडवे-उभे कट मारत चालवायची गाडी. एखाद्याला ढगात पाठवायचा. एखाद्या वेळेला आपण पडायचं. म्हणजे हॉस्पिटलमधल्या सुंदर नर्सेस पहाता वगैरे येतात. पण नाSssSSही बंदी म्हणजे बंदी. आपलं सरकार थेट अश्या गंमतीवरचं बंदी आणायला बघतं. सामान्य लोकांना सुखानी जगुन देण्यात सरकारला आनंद वाटत नाही हेचं खरं. सरकारनी खरं तर साहसी क्रिडाप्रकारांना चालना दिली पाहिजे. फुटपाथवरुन गाडी चालवणं, विरुद्ध बाजुनी येणार्‍या गाडीच्या उजवीकडुन गाडी काढणं, एका चाकावर गाडी चालवणं वगैरे प्रकारांना राष्ट्रीय खेळ म्हणुन मान्यता मिळाली पाहिजे. पुण्यातले ऑलिंपिक साहेब ह्यात लक्ष घालतील तर बरं होईल. हॉर्न वाजवण्यावर बरेचं लोकं उगीचं आक्षेप घेतं असतात. रस्त्यावर उतरलेल्या सुस्त जनतेमधे जागृती निर्माण करणार्‍या ह्या अस्त्राला सरकार दाबुन टाकायचा प्रयत्न करतयं. काय फालतुपणा आहे हा? म्हणे शाळांजवळ- हॉस्पिटलजवळ हॉर्न वाजवायचा नाही. अरे आतमधल्या पेशंटचा काही विचार? बिचारे कंटाळतात हॉस्पिटलातल्या चार भिंतीमधे राहुन राहुन. हॉर्नमधुन गाणी वाजवायची, वेगवेगळ्या प्राण्यांचे, रडणार्‍या बाळाचे आवाज काढायचे ही ६५ वी विद्या (का कला रे?? आँ). आयसीयु मधल्या पेशंटला धक्का देउन त्याचं बंद पडायला आलेलं हृदय चालु करायचं परत. ते नाही. डॉक्टरांचा धंदा बुडेल ना अश्यानी. रस्त्यावर नुकतीचं गाडी शिकलेल्या नव्या घाबरट भिडुला तयार करायची जबाबदारीही हे समाजसेवक अगदी निरिच्छ वृत्तीनी स्वीकारतात. त्यांच्या गाड्यांना कट मारुन त्यांच्या अंगात धैर्य निर्माण करणं ही जबाबदारी अजुन कोण समर्थपणे पेलु शकेल? हे झालं दुचाकीवाल्या समाजसेवकांचं. तीनचाकीवाले समाजसेवक तर अगदी देवाघरचे सेवक हो. नो एंट्रिमधुन गाड्या घालणं, रस्त्यावर गाड्यांशी खो-खो खेळणं आणि प्रवाशांना भांडणकला शिकवणं हे ह्यांचे आवडते छंद असतात. त्यातल्या त्यात जर का रसिक रि़क्षावाला असेल तर कलकत्ता ५०५ वगैरे खाउन रस्त्यावर आणि लोकांच्या कपड्यांवर रंगकला करणं असाही छंद ह्या धंद्यामधल्या बर्‍याचं जणांमधे असतो असं निरि़क्षण आहे. पण आमच्या नष्टोळ्या लोकांना कलेला दाद देता येणं हा प्रकार माहिती नाही. केलेल्या कामाला मोजपट्टी लावु नये, त्यानी कामाचं महत्त्वं आणि दर्जा कमी होतो अशी एक समजुन आपल्या समाजात आहे. (म्हणजे एवढं काम केलं तेवढं काम केलं असं म्हणण्यापेक्षा जेवढं जास्तं जमेल तेवढं जास्त काम दर्जेदारपणे करावं अश्या अर्थानी). आमचे प्राधिकरण, पिंपरी-चिंचवडवाले रिक्षावाले ह्या नियमाला अगदी झोपेतही पाळतात. जSSsssSSर्रा काय मीटर टाकतील. असो. सद्गुणी रि़क्षावाले हा एका स्वतंत्र ब्लॉगचा विषय होउ शकेल, त्याविषयी परत कधीतरी सवडीने लिहिनचं. बहुतांश चारचाकीवाले नमोंनी रस्ता आपल्या नावावर करुन दिल्यासारखं वागतात. ओव्हरटेक करणार्‍या गाडीला ओव्हरटेक करुन पुढे जाणं हा ह्यांचा आवडता छंद. ह्या जोडीलाचं हॉर्नवर एक हात आणि अ‍ॅक्सलरेटरवर एक पाय दाबलेला असेल तर दुधात साखरचं ह्यांच्यासाठी. समोरच्या दुचाकीवाल्यानी दचकुन हडबडुन गाडी साईड पट्टीवर उतरवलीचं पाहिजे. बाकी ह्या चारचाकीवाल्यांमधे पण बर्‍याचं पोटजाती आहेत. त्यातली सगळ्यात भारी जमात म्हणजे गुंठामंत्री. बापोपार्जित (होय. कारण वडिलोपार्जित म्हणण्याएवढं सौजन्य ह्यांच्याकडे नसतं) जमिनीला चुना लाउन कॉर्पियो, येंडेवर, फार्चुनर वगैरे गाड्या उडवत फिरणं हा ह्यांचा दिवसभराचा खेळं. ह्या खेळात ते बर्‍याचं रस्त्यावरच्या दुसर्‍या गाड्यांनाही "उधार" मनानी सामील करुन घेतात. ह्यांच्या गाड्यांवर जनरली कुठल्यातरी पक्षाचा वरद हस्त असतो त्यामुळे ह्यांच्या नशिबाच्या घड्याळात शक्यतो बारा वाजत नाहित असं ऐकिवात आहे. असो. मुद्दा हा आहे की नियम पाळण्यासारखा भेकडपणा, मुर्खपणा माझ्यासारखे लोकं कसा करु शकतात? ह्या आमच्या सारख्या नियमपाळ जमातीमुळे देशाच्या प्रगतीला खिळं बसतो म्हणे. ह्याबद्दल आम्हाला मनापासुन खेद वाटतो. ह्या देशविघातक कृत्याबद्दल सा़क्षात ब्रम्हदेवही मला माफ करु शकणार नाही ह्याची मला खात्री आहे. माझ्या अनुभवातुन तुम्ही शिका काहितरी. उद्या लाल सिग्नलला हेल्मेट घालुन थांबलात तर तुम्ही माझ्या भेकड जमातीत सामील व्हालं. तुमचं स्वागतं करायला मी तरी तयार आहे. जान है तो जहान है बॉस. Be safe, Drive safe it's hell set free on roads. We don't need casualties. Thank you.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
27679 वाचन

💬 प्रतिसाद (109)

प्रतिक्रिया

आँ!

पैसा
Mon, 05/18/2015 - 19:48 नवीन
>>> हे असले नियम पाळणारे सुटुन जातात. कुठे हो! गाडी शिस्तीत डाव्या कडेने चालवल्याबद्दल आमच्या गाडीला २/३ ओरखडे पडेल. आम्हाला मार खायची वेळ आली होती आणि डाव्या बाजूने ओव्हरटेक करणारा वर दमदाटी करतो. काय अवस्था आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

+१

कपिलमुनी
Tue, 05/19/2015 - 15:17 नवीन
तुझा बरोबर असे म्हणून पुढे चालणे श्रेयस्कर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कणकवलीबाबत हे खरय पैतै

यशोधरा
Mon, 05/18/2015 - 19:52 नवीन
कणकवलीबाबत हे खरय पैतै दुर्दैवाने पण पुन्हा काही तिथे त्रास झाला तर आवर्जून कळवणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो, नक्की ग!

पैसा
Mon, 05/18/2015 - 20:24 नवीन
नक्की कळवेन! 'अशा' ठिकाणी कोणीतरी ओळखीचे हवेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

"नारबाची वाडी", जरा अंमळ उशीर

बॅटमॅन
Mon, 05/18/2015 - 20:13 नवीन
"नारबाची वाडी", जरा अंमळ उशीर लागला कळायला. पण प्रकरण अवघड आहे खरे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आता पर्यंत तिन वेळा गाडी ठोकली गेलीय.

बाबा पाटील
Mon, 05/18/2015 - 21:30 नवीन
आणी तिही बरोबर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात.सर्वात गमतीचा भाग तिनही वेळा मी सिग्नला उभा होतो.मागच्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणी साहेब गाडीवर येवुन आदळले. १)पुण्यात कलेक्टर ऑफिसमधुन बाहेर आलो.सन अ‍ॅण्ड सनच्या अगोदरच्या चौकात सिग्नला थांबलो,मागुन एका सन्मानिय खासदार साहेबांच्या बंधुंची गाडीने जोरदार धडक दिली, नशिब सिट बेल्ट लावला होता नाहीतर स्टेरिंगवर आपटलो असतो.शांतपणे खाली उतरलो, मागे जावुन म्हटले काका गाडी बाजुला घ्या.काकांनी गाडी बाजुला घेतली व सांगितले आमक्या आमक्याचा बंधु आहे.म्हटल ठिक आहे.आमच्या बारक्याला एक फोन केला म्हटल ये बाबा इथे तुझी गरज आहे.गडी त्याचे १०-१२ कार्यकर्ते घेवुनच आला.तोपर्यंत मीही आपल सभ्य डॉक्टर सारख कार्ड देवुन काकांना आश्वस्थ केल होत.त्यामुळे आता काही भरपाई द्यावी लागत नाही म्हणुन काका जरा आवाज चढवुनच बोलत होते.तेव्हड्यात आमचे धाकट्या बंधुवर्यांच आणी मेव्हण्यांच आगमण झाल आणी काका बिथरले.त्यांनी डायरेक्ट खासदार साहेबांनाच फोन केला आणी सांगितल की त्यांना मारयला मुल आली आहेत.नशिब आमच, खासदार साहेब खरच समजुतदार होते.त्यांनी स्वतःच्या भावाला मला फोन द्यायला सांगितला व काय झाल ते विचारले.त्यांना सर्व परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी एकच वाक्य विचारल, डॉक्टर' तुमच्या पोरांनी माझ्या भावाला धक्का तर लावला नाही ना ? म्हटल, सरजी अजिबात नाही. त्यावर सरजी म्हटले त्यांना जावु द्या मी पाहतो काय करायचे ते. आणी खरच त्यानंतर १५ मिनिटात त्यांचा मॅनेजर माझ्या गाडीच्या शोरुमच्या माणसाला घेवुन आला. गाडीचे २ तासात इन्सपेक्शन झाले,मॅनेजरने सगळी अमांउट भरली,८ दिवस मला बदली गाडी दिली.आणी ८ दिवसाने गाडी तशीच्या तशी मिळाली(वि.सु.खासदार साहेब,शिवसेनेचे होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे असते तर....) २)परत पुढच्या वर्षी जानेवारीचा शेवटचा आठवडा,रात्री १० वाजता माझी ओपिडी बंद करुन बायकोला घ्यायला तिच्या ओपिडीकडे निघालो होतो.तिच्या क्लिनकच्या जवळच्याच सिग्नला थांबलो,माझ्यामागे एक मारुती व्हॅन थांबली.आणी अचानक खराडी आयटी पार्क मधली एक २५-३० वर्षाची कन्यका काय विचारात होती माहित नाही,पण जबरदस्त वेगाने येवुन तिच्या झेन एस्टीलो ने माझ्या मागची व्हॅन उडवली ती व्हॅन उडुन माझ्या गाडीवर.झाला सत्यानाश.खाली उतरलो तर बघतोय,तर मधल्या व्हॅनमधला ड्रायव्हर घाबरुन गुरासारखा ओरडत होता,त्याला जरा शांत करुन त्याच्या गाडीत पाहिले तर आतमध्ये त्याची ९ महिने गर्भार बायको,घाबरुन मागच्या मधल्या सिटवर दातखिळी येवुन पडलेली.तिच्या तोंडावर पाणी मारल्,लगेचच बाई जागेवर आली.त्याला शांत केला.मागच्या गाडीकडे वळलो तोपर्यंत रस्त्यावरच्या पब्लिकने ती गाडी घेरली होती व ड्रायव्हरला बाहेर खेचन्याचा प्रयत्न चालु होता. डोकावुन पाहिले तर आतमध्ये थरथर कापणारी आयटीवाली तरुणी. जमाव नियंत्रणाबाहेर हे लक्षात आल आणी पहिला फोन पोलिसांना लावला. आणी दुसरा परत एकदा बारक्याला म्हटल ये बाबा लवकर.पोलिस एतायेत हे एकल्याबरोबर पुढचे जरा शांत झाले,तेव्ह्ड्यात एक झोपडपट्टी दादा टाइप टग्या हातात लोखंडीबार घेवुन त्या पोरीच्या गाडीसमोर आला आणी त्याक्षणी मी नाविलाजास्तव कंबरेला खोचलेले रिव्हाल्वर बाहेर काढले. नशिब त्याच वेळी घटनास्थळी पोहचलेल्या माझ्या छोट्या बंधुनी व मित्रांनी जमावाला पांगवायला सुरुवात केली.हा सगळा प्रकार मोजुन १० ते १५ मिनिटात घडला होता.त्यानंतर ५-१० मिनिटात पिक्चर प्रमाणे २ पोलिसमामा तेथे आले.त्या कन्येला गाडीतुन बाहेर काढले,या सर्व घटनेत कुनालाही साधे खरचटले सुद्धा नव्हते फक्त तिनही गाड्यांचे प्रत्येकी ३०-४० हजारांचे नुकसान झाले होते. त्यानंतर त्या मुलीचा भाउ आला,त्याने सगळ्या गाड्यांची नुकसान भरपाई कबुल केली आणी दिली देखिल.त्याच्या बहिनीला जमावाच्या तावडीतुन वाचवल्या बद्दल व पोलिसकेस न केल्याबद्दल मात्र तो वारंवार आभार मानत राहिला. ३)ही घटना याच वर्षी घडली पण माझ्या चांगुलपणाबद्दल मलाच जास्त त्रास झाला. परत जानेवारीचाच शेवटचा आठवडा.शिवाजीनगरच्या गाडीच्या शोरुम आणी सर्विसिंग सेंटर मधुन चार दिवस सर्विसिंगला सोडलेली गाडी घेवुन बाहेर पडलो, शिमला चौकात नगररोडला वळण्यासाठी तेथेच पोलिसचौकीसमोरच्या सिग्नला थांबलो आणी एक टुरिस्ट क्रमांक असलेल्या महिंद्रा झायलोने गाडी मागुन येवुन उडवली.पोलिसासमोरच गाडीला डॅश बसला त्यामुळे मीही जरा हादरलोच होतो.साइड पॉकेटमध्ये असलेल्या गनला हात घालुन बाहेर उतरणार तर आरश्यात पोलिसमामाने मागच्या ड्रायव्हरच्या कॉलरला धरुन गाडीतुन बाहेर खेचताना दिसला.मग म्हटल चला हा नक्की अपघातच त्यानतंर १०-१५ मिनिटांचा सावळा गोंधळ. मग पोलिसांनी झायलो वाल्यावर केस दाखल करायची तयारी सुरु केली आणी अचानक बाबाने समजुतीने घेण्याचे ठरवले,व तुमचे बिल मी भरतो केस करु नका गंमत पुढेच होती त्या गाडीत एक महिला होती.त्या बाई पोलिस केस होत आहे हे पाहुन एकदम शांत होत्या. जेंव्हा मी केस मागे घेण्यास कबुल झालो व आम्ही परत फिरुन मागे शोरुमला आलो.शोरुमवाल्याने दुरुस्तीचे ४५ हजाराचे बिल लावले.आणी बाईसाहेबांचे कंट्रोल सुटले.तोपर्यंतच्या बोलण्यातुन अस्मादिक डॉक्टर आहे हे त्यांना कळले होते,व काही मिपाकरांच्या म्हणन्याप्रमाणेच सर्व डॉक्टर हरामखोर असतात आणी लोकांना लुबाडणे हाच त्यांचा एकमेव धंदा असतो,आणी आम्ही आता पैसे भरणार नाही.असे सांगुन बाईने सर्विसिंग सेंटर मध्ये भयानक शिविगाळ सुरु केली.अर्धा तास तो प्रकार सहन करत होतो. सर्विसिंग सेंटरचा फ्लोअर मॅनेजर , रिलेशनशिप मॅनेजर इतर सर्व स्टाफ डो़क्याला हात लावुन सगळ पहात होते.बाईमाणुस समोर , साला शिव्यापण देता येइनात,तेव्हड्यात तिचा नवरा कम ड्रायव्हरने एक चुक केलीच बाबा अंगावर धावुन आला.सर्विसिंग सेंटरला सिसि टिव्ही होते. म्हटल बर झाल सगळा प्रकार ऐता रेकॉर्ड होतोय. जसा समोर आला तशी भाउच्या १८० च्या कोनात एकच कानफाटातीत ठेवुन दिली आणी तिथल्या मॅनेजरला सांगितले कॉल द पुलिस.बस मात्रा लागु पडली. पोलिस डिपार्टमेंट मध्येच वरिष्ठ अधिकारी असलेल्या मित्राला अपघाताच्या ठिकाण सांगुन तेथे ड्युटीवर असणार्‍या पोलिसमामाला पाठवुन द्यायला सांगितले,मग मात्र माझ्या प्रोफेशनच्या नैतिकतेची गळ घालुन निम्मे पैसे भरुन त्या दांपत्याने तेथुन पोबरा केला. हा सगळा प्रकार खरच सहनशक्तीच्या पलिकडचा होता.चुक त्याची,ती बाई मलाच शिव्या घालतीये,बर वर नुकसान भरपाईची वेळ आल्यावर माझ्या व्यवसायाला शिव्या घालुन त्याच व्यवसायाच्या नैतिकतेचे धडे देतिय. माणस एव्हडा नालायकपणा कसा करु शकतात.त्यात सगळ्यात चिड आली त्या बाईच्या नवर्‍याची हरामखोर स्वतःत काही हिंमत नव्हती बायकोला पुढे करुन ह्या गोष्टी करत होता.आज पर्यंत एव्हडा मनःस्ताप कधीच झाला नव्हता.
  • Log in or register to post comments

तुमचं नशिब चांगलं म्हणुन फक्त

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 05/18/2015 - 22:11 नवीन
तुमचं नशिब चांगलं म्हणुन फक्त गाडीच्या नुकसानीवर निभावलं. शारिरिक इजा अतिशय बेक्कार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

कॅप्टन शी सहमत.

नाखु
Tue, 05/19/2015 - 08:48 नवीन
रस्त्यावरच्या किरकोळ अपघातातही स्वघोषीत गल्ली दादा आणि चिर्कुट (फ्लेक्ष फेम) चिंधीचोरांचा जास्त त्रास होतो हे अनुभवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

+११११११११११११११११११११११११११११

बॅटमॅन
Tue, 05/19/2015 - 12:46 नवीन
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

बाप रे

श्रीरंग_जोशी
Tue, 05/19/2015 - 20:01 नवीन
बाप रे, एकाहून एक डेंजर अनुभव आहेत... या उदाहरणाच्या विरुद्ध उदाहरणाचे कथन चेतन गुगळे यांनी लिहिले आहे. हकीगत एका अपघाताची - १, २, ३, ४.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

!

मिहिर
गुरुवार, 05/21/2015 - 11:21 नवीन
आमच्या बारक्याला एक फोन केला म्हटल ये बाबा इथे तुझी गरज आहे.गडी त्याचे १०-१२ कार्यकर्ते घेवुनच आला
साइड पॉकेटमध्ये असलेल्या गनला हात घालुन बाहेर उतरणार
डॉक्टर आहे की गुंड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

संपूर्ण वाचा

नाखु
गुरुवार, 05/21/2015 - 11:46 नवीन
आणि मग ठरवा नक्की गुंडगिरी होती का प्रसंगावधान!
स्वगत :
निवडक पिवळी पत्रकारीता
मिपावर पण आली आहे काय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

अगदी अगदी. मनातलं बोल्लात...!

संदीप डांगे
गुरुवार, 05/21/2015 - 12:54 नवीन
अगदी अगदी. मनातलं बोल्लात...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मिहिरबाबा, मग तुम्हाला काय अपेक्षित आहे ?

बाबा पाटील
गुरुवार, 05/21/2015 - 18:51 नवीन
डॉक्टरने त्याच्या पांढरपेशानुसार स्वतःची चुक नसताना रस्त्यावर मार खायचा की स्वतःचा पानसरे अथवा दाबोळकर करुन घ्यायचा. शिक्षक अथवा डॉक्टर यांनी फक्त अन्यायाविरुद्ध लिहावे अथवा बोलावे प्रत्यक्ष प्रतिकार करु नये असा काही अलिखित कायदा आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

प्रतिकार करू नये असे नव्हे,

मिहिर
गुरुवार, 05/21/2015 - 20:23 नवीन
प्रतिकार करू नये असे नव्हे, पण प्रतिकाराची सुरुवात खिशातल्या गनला हात घालून करणे हे जास्त वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

अश्या घटनेत ...

बाबा पाटील
गुरुवार, 05/21/2015 - 21:08 नवीन
किती वेळ मिळत असेल अस तुम्हाला वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

जौ द्या हो डॉक.. :)

हाडक्या
गुरुवार, 05/21/2015 - 21:38 नवीन
जौ द्या हो डॉक.. :) (मिहिरबाबा दंबूक असलेला प्रत्येकजण गुंड नसतो हो.. सर्वसाधारणपणे आपल्या आपल्या समाजात या संकल्पना बर्‍यापैकी बाळबोध आहेत असे नमूद करतो. आणि गुंडगिरी दंबूकीशिवाय पण करता येतेच की )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

आपले रस्ते म्हणजे मूर्खपणाची

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 05/19/2015 - 01:01 नवीन
आपले रस्ते म्हणजे मूर्खपणाची हद्द होत चालले आहेत हे मात्र खरे आहे !
  • Log in or register to post comments

सकाळी सकाळी एक बाई डोक्यात

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/20/2015 - 08:12 नवीन
सकाळी सकाळी एक बाई डोक्यात गेली आज. लहान मुलाला अतिशय बेजबाबदारपणे हँडल आणि स्कुटीच्या सीटच्यामधल्या पाय ठेवायच्या जागेत उभं केलेलं आणि अचानक ब्रेक लावायला लागल्यावर त्या मुलाचं तोंड आपटलं समोर. नाकाला चांगलाचं मार लागला असणार.
  • Log in or register to post comments

भावना समजू शकतो

श्रीरंग_जोशी
Wed, 05/20/2015 - 08:35 नवीन
भावना समजू शकतो कॅप्टन पण आपल्या देशात मुलभूत जाणिवेचीच कमतरता असल्याने आपण कितीही संवेदनशील असलं तरी उपयोग नाही. (जाने २००५) मी पुण्यात नवा असताना आयुष्यात कुणाला प्रथमच अपघातात मरताना पाहिलं होतं. वाकडेवाडीच्या माझ्या हापिसच्या गच्चीत आम्ही ५ वाजता कॉफी पित उभे होतो. तेव्हा जुन्या हायवेवर डीव्हायडर्स पूर्ण लागले नव्हते. सिओइपी जवळचा सिगनल सुटला असावा. लांबून वेगात गाड्या येत होत्या एवढ्यात एका मेटॅडॉरच्या ड्रायव्हरला फटकन यु टर्न मारायची दुर्बुद्धी झाली. सिग्नलवरून येणार्‍या गाड्यांमध्ये एक पल्सर रेसच्या आवेशात कदाचित ७० किंवा ८० च्या वेगाने येत असताना तिच्या चालकाला बहुधा ब्रेक दाबायचीही संधी मिळाली नाही. पल्सर रस्त्यावर त्या क्षणी आडवा असणार्‍या मेटॅडॉरच्या खाली गेली असावी. तो चालक अक्षरशः सिनेमातील स्पेशल इफेक्ट्समध्ये दिसतं तसा रस्त्यावरून आडवा घासत गेला. पण तेवढ्यातही त्याने कौशल्याने डोके रस्त्यावर आपटू किंवा घासू दिले नव्हते. त्याच्या गाडीवर मागच्या सीटवर बसलेली त्याची बायको एवढी सुदैवी नव्हती. तिच्या अंगावरून मेटॅडॉरचे मागचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. नंतर काही दिवसांनी तिथल्या ऑटोवाल्याकडून कळले की पल्सरचालक व्यवसायाने पायलट होता. नंतर बरेच आठवडे संचेतीमध्ये अ‍ॅडमीट होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एकाचं गाडीवाल्यानं किती नियम

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/07/2016 - 19:11 नवीन
एकाचं गाडीवाल्यानं किती नियम मोडावेत ह्याचं हैट्टं उदाहरण आत्ता हापिसामधुन येताना पाहिलं. प्राधिकरणातल्या म्हाळसाकांत चौकामधे मी आकुर्डी कडुन संभाजी चौकाकडे घरी चाललेलो. आधीचं तो रस्ता अरुंद, त्यामधे भाजीवाल्यांसमोर भाजी घेणारे लोक्स रस्ता आपल्याचं जन्मदात्याने आपल्याला भेट दिलाय अश्या रितीने गाड्या लावतात. जेमतेम एक लेन कशीबशी चालु असते. रस्त्याच्या मधल्या भागामधुन मी चाललेलो. एक स्कुटी/ प्लेजर छाप गाडीवाला दिवा नं लावता उलट्या बाजुनी थेट समोर आला. नशिबानी मी हळु होतो त्यामुळे धडकला नाही. त्याला सुनावायसाठी गाडी साईडला घेतली आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याच्यावर चिडचिड झालेलीचं होती पण आता ह्या बाबाजीला शिव्या घालाव्यात, त्याच्याकडे बघुन हसावं का तिथल्याचं रस्त्याच्या डिव्हायडरवर डोकं आपटुन जीव द्यावा अशी अवस्था झाली एवढे नियम बाब्यानी मोडले एका फटक्यात. R.T.O. ऑफिसर असतो तर "आनंदी आनंद गडे" वगैरे गाणीसुद्धा म्हणली असती पावत्यांचा हिशोब मनातल्या मनात करुन. १. गाडी चालवणारा बाब्या हा बाब्या नसुन किरकोळ १३-१५ वर्षाचं कार्टं होतं. २. बाब्याचा काडीपैलवान बाप्या बापुडवाणा चेहेरा करुन मधे बसलेला. बाप्याची बायको अर्थात कथानायकाची आईस कथानायकाच्या बाळबंधु किंवा भगिनीस कडेवर घेउन रडं थांबवायसाठी जोरजोरात धोपटतं होती. ३. गाडीच्या पुढच्या भागामधे जिथं साधी सरळ सज्जन माणसं आपल्या तंगड्या ठेवतात तिथे मोठी गाठोडी/ गाठोडं ठेवलेलं ४. गाडीचा दिवा गाडीवाल्या दिवट्यानी बंद का ठेवला असावा? कारण गाडीचा दिवा स्वतःची खोबण सोडुन खाली लोंबत होता. ५. कारटं हेल्मेट नं घालता गाडी रेमटवतं होतं. ६. गाडीला नंबरप्लेट नावाची एक क्षुल्लक गोष्ट आवश्यक असते हे गाडी चालवणार्‍या बालकपालकाच्या गुढग्यामधे आलं नसावं. ७. गाडीनी अजुन थोडा जास्तं धुर सोडला असता तर भोपाळ दुर्घटनेला लाजवेल अशी गॅस दुर्घटना घडायचा चान्स होता. ८. रस्ता आपल्या बा...वडीलांचा असल्यासारखा चुकीच्या बाजुने चालवत होता. बहुतेक आर.टी.ओ. चे सगळे नियम मोडायचा चंग बाळराजेंनी बांधला असावा. बाकी गाडीची कागदपत्रे, पी.यु.सी. नसणारचं ह्याची खात्री आहे. आता गाडी चोरीची नसली म्हणजे मिळवलं. कोपरापासुन नमस्कार हाणला आणि मुकाट घरी आलोय.
  • Log in or register to post comments

नुस्ती गडबड

नुस्त्या उचापती
Fri, 01/08/2016 - 01:50 नवीन
आपल्या देशात सर्वांना पुढे जाण्याची घाई असते , पण वेळेवर मात्र कुणीच जात नाही . असो ...... लोकशाही आहे तेव्हा चालायचेच .
  • Log in or register to post comments

मी रोज कोथरूड ते मगरपट्टा आणी

अभिजीत अवलिया
Fri, 01/08/2016 - 20:00 नवीन
मी रोज कोथरूड ते मगरपट्टा आणी परत कोथरूड असा प्रवास करतो. अतिशय भयानक अनुभव असतो रोजचा. कट मारत जाणे, सायकल घेऊन फास्ट लेन मधून जाणे, झेब्रा क्रोस्सिंगच्या पुढे जाऊन उभे राहणे, उलट्या दिशेने गाडी चालवणे किती ते नानविध प्रकार. काही महाभाग तर लाल सिग्नल लागला की विरुद्ध दिशेच्या लेन मध्ये येउन थांबतात. नंतर पटकन जायला मिळावे म्हणून. पण ह्याने बाकी सर्वाना किती त्रास होतो ह्याची जराही तमा नाही. लोक एवढे जीवावर उदार होऊन गाडी कशी चालवू शकतात हेच समजत नाही. आता सगळ्या चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आहेत. तरी देखील लोक जुमानत नाहीत हे पाहून खूप चिडचिड होते. कुणीही कितीही वल्गना केल्या तरी आपला देश सुधारेल असे वाटत नाही. .
  • Log in or register to post comments

मानसिकता

सूड
Fri, 01/08/2016 - 20:09 नवीन
कुणीही कितीही वल्गना केल्या तरी आपला देश सुधारेल असे वाटत नाही. .
रविवारी दीर्घवीकांतानंतर घरी चाललो होतो. स्वारगेटला लाल सिग्नल पडला. एका स्कूटीवाल्याने एमेच १२ वाला असूनही शिस्तीत गाडी थांबवली. बाकीच्या गाड्या एकदोन एकदोन करुन जातच होत्या. मी ज्यात बसलो होतो ती रिक्षा नेमकी ह्या थांबलेल्या स्कूटीवाल्याच्या मागे होती. त्याने हॉर्न देऊन देऊन त्याला गाडी बाजूला घ्यायला लावली आणि 'एवढे नियम पाळत बसलं तर कसं व्हायचं' असं स्वत:शीच म्हणत गाडी रेमटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

नुकतंच मागच्या दोन आठवड्यात

संदीप डांगे
Sun, 01/10/2016 - 23:42 नवीन
नुकतंच मागच्या दोन आठवड्यात ओळखतल्या लोकांचे तीन अपघात समजले. १. केस वनः एका क्लायंटच्या ऑफिसमधील नवविवाहित अकाउंटंट, नवर्‍यासोबत मागे बसलेली, सिग्नलला सगळे बाइक्स निघाले. कुणाचा तरी धक्का लागला, कसा माहित नाही. त्यांची स्कूटी हिंदकळली. ही जरा वजनदार. तोल जाऊन डिवायडरवर आदळली. समोरचे चार-सहा दात अर्धवट कापले गेले, भुवईला एक खोक पडली. पायाला चांगलंच लागलं. आता अजून एखादा महिना लिक्विड डायटवर असणार. रुट्कॅनालचा खर्च काहीतरी चाळीस-पन्नास हजार सांगितला आहे. मी म्हटले, "हेल्मेट नव्हतं म्हणून बघ तुला महागात पडलं. अपघात होतातच, पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे ना?" तीने होकारार्थी मान डोलावली. परत त्याच संध्याकाळी परत त्याच स्कूटीवर विना-हेल्मेट, (त्याच*) पतीच्या मागे बसून गेली. २. केस दोनः ह्याच देवीचा कोणी नातेवाईक. हेल्मेट नसल्याने बाइकवरून पडून मरण पावला. हा किस्सा तीनेच सांगितला, तरी संध्याकाळी बघितले तेव्हा तिच्या स्वतःच्या नवर्‍याकडेही हेल्मेट नव्हते. ३. केस तीनः ह्याच ऑफीसमधला ऑफिसबॉयच्या काकांची. डोकं दुखतंय म्हणून बायकोला फोन केला की मी मेडिकलमधून गोळ्या घेऊन घरीच येतोय, आराम करायचाय, खूप डोकेदुखी आहे. रस्त्यात बाईक चालवता चालवता चक्कर येऊन बाइकसह पडला, पडला तो थेट दगडावर, जागीच गतप्राण. वय ३२-३४, मागे एक वर्षाचं मूल सोडून गेलाय. ऑफिसबॉयला म्हटलं, काय रे हेल्मेट का नाही वापरलं त्यांनी, तर म्हणे, अहो सर, खेड्यात कुठे हेल्मेट-वैगेरे... मी म्हटलं, तुम्ही लोक हेल्मेट पोलिसांसाठी घालायचं असतं हा विचार केव्हा सोडणार? साहेबांनी मान डोलावली आणि आपल्या बाइकला किक मारून निघून गेला. अर्थात हेल्मेट न घालता. हजार रुपयाचं हेल्मेट न घालून स्वतःचा जीव धोक्यात घालवतोय हे ह्या मूर्खांना केव्हा कळणार? नियम केला की तो मोडलाच पाहिजे हे आपल्या भारतीयांच्या जणू रक्तात भिनलंय, भले तो स्वतःच्या जीवावर, दुसर्‍याच्या जीवावर, देशाच्या सुरक्षेवर बेतला तरी चालेल. त्या तिघांनाही हेल्मेट गिफ्ट करावं का असा विचार करतोय... (त्याच पतीच्या: ज्या पतीला एवढा जीवघेणा प्रसंग आपल्या पत्नीवर ओढवूनही तीच्या-आपल्या सुरक्षेबाबत अक्कल आली नसेल त्या पतीला घटस्फोट का देऊ नये असा उद्विग्न विचार मनात आला, इथे कुठलाही पीजेसदृश्य विनोद अपेक्षित नाही.) अजूनही सीटबेल्ट न वापरणार्‍यांना एक अनुभवाचा सल्ला: गाडी जेव्हा वळणे घेत असते तेव्हा शरिराचा तोल जाऊन आपल्याला बराच त्रास होतो, सारखे कुठेतरी धरून राहावे लागते, ताण येतो. सीटबेल्ट लावल्यास, अचानक वळणांच्या धक्क्यानी, गचक्यांनी सीटबेल्ट अ‍ॅक्टीवेट होऊन शरीर सीटलाच बांधले जाते, हे फार नकळत होते व शरीरावरचा ताण ६०-७०% टक्क्यांनी कमी होतो. किमान ह्यायोगे तरी आपण सीटबेल्ट वापरायला सुरुवात कराल अशी अपेक्षा आहे. पोलिसमामाला चिरिमिरी द्यावी लागनार नाही हा अ‍ॅडेड अ‍ॅड्व्हांटेज आहे. जीव वैगेरे वाचणे ही फारफेच्ड अपॉर्चुनिटी किंवा फ्रिंज बेनेफिट आहे, त्याचा विचार नकोच, नाही का?
  • Log in or register to post comments

सीटबेल्ट लावल्यास, अचानक

असंका
Mon, 01/11/2016 - 16:58 नवीन
सीटबेल्ट लावल्यास, अचानक वळणांच्या धक्क्यानी, गचक्यांनी सीटबेल्ट अ‍ॅक्टीवेट होऊन शरीर सीटलाच बांधले जाते, हे फार नकळत होते व शरीरावरचा ताण ६०-७०% टक्क्यांनी कमी होतो.
+१ एस टी ला असे सीटबेल्ट्स का नसतात!!! :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सुरुवात हेल्मेटसक्ती पासून होवू दया

सामान्यनागरिक
Mon, 01/11/2016 - 00:58 नवीन
हेल्मेटसक्ती सर्वप्रथम पोलिसापासून होऊ द्या. त्यानंतर सर्व सरकारी नोकरांना सक्ती करा. त्यानंतर सगळ्यांवर करा. आपोआप नागरिकही हेल्मेट वापरू लागतील. हेल्मेटविना अपघात झाल्यास विम्याची रक्कम मिळणार नाही असा नियम करा.
  • Log in or register to post comments

हेल्मेटची सक्ती नसावी. ज्याला

श्रीगुरुजी
Mon, 01/11/2016 - 14:06 नवीन
हेल्मेटची सक्ती नसावी. ज्याला/जिला वापरायचे त्यांना वापरू देत. ज्यांना वापरायचे नाही त्यांच्यावर सक्ती नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

का?

असंका
Mon, 01/11/2016 - 17:00 नवीन
का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सक्ती का नको? कही विशेष कारण?

जिन्क्स
Mon, 01/11/2016 - 17:05 नवीन
सक्ती का नको? कही विशेष कारण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मला हेल्मेटचा त्रास होतो.

श्रीगुरुजी
Mon, 01/11/2016 - 20:22 नवीन
मला हेल्मेटचा त्रास होतो. आधीच मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली आहे. हेल्मेटमुळे मणक्यावर भार येतो. हेल्मेटमुळे विशेषतः उन्हाळ्यात चेहरा व केस घामाघूम होतात व त्याचा भरपूर त्रास होतो. हेल्मेट लावल्यावर कमी ऐकायला येते हा अजून एक त्रास. आता वरील त्रास म्हणजे खोटी कारणे व मूर्खपणा आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांच्याशी वाद घालायची अजिबात इच्छा नाही. अपघातांच्या मूळ कारणांचा अजिबात बंदोबस्त न करता हेल्मेटची सक्ती करणे म्हणजे घराभोवती साठलेल्या सांडपाण्यामुळे डास होत असतील तर सांडपाणी साठून न देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मच्छरदाणी वापरण्याची सक्ती करण्यासारखे आहे. असो. ही माझी वैयक्तिक मते आहेत. कोणाला पटोत वा न पटोत. मी हेल्मेट वापरणार नाही हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

बर्‍याचं जणांना ह्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/12/2016 - 08:55 नवीन
बर्‍याचं जणांना ह्या त्रासांमुळे हेल्मेट चा त्रास होतो हे मान्यं. पण त्यावर उपाय म्हणुन जेमतेम २०० ग्रॅम वजनाची केव्हेलार हेल्मेट्सही उपलब्ध आहेत. थोडी महाग असतात आणि स्टायलिंग नसतं पण सुरक्षितता साध्या हेल्मेटपेक्षा जास्तं असते. बाकी ऐकु नं येणं हे हेल्मेटच्या सवय होईपर्यंतची बाब आहे. नंतर आपोआप अ‍ॅडजस्ट होतो आपण येणार्‍या आवाजाशी. केसांचं काही करु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>>असो. ही माझी वैयक्तिक मते

मोदक
Tue, 01/12/2016 - 10:11 नवीन
>>>असो. ही माझी वैयक्तिक मते आहेत. कोणाला पटोत वा न पटोत. मी हेल्मेट वापरणार नाही हे मात्र नक्की नरेन्द्र मोदींची इच्छा आहे असे समजा आणि हेल्मेट वापरायला सुरू करा. पण हेल्मेट वापराच!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सल्ला वाचून हसायला आलं.

श्रीगुरुजी
Tue, 01/12/2016 - 12:41 नवीन
सल्ला वाचून हसायला आलं. अजूनतरी हेल्मेट वापरायची इच्छा नाही. भविष्यात वापरावेसे वाटले तर वापरीन बापडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

:)

मोदक
Tue, 01/12/2016 - 12:44 नवीन
:) तुम्हाला लवकरात लवकर हेल्मेट वापरण्याची इच्छा होवो ही सदिच्छा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हेल्मेट ही इच्छेची गोष्ट नाही

काळा पहाड
Tue, 01/12/2016 - 16:52 नवीन
हेल्मेट ही इच्छेची गोष्ट नाही. ते वापराच. आग्रहाचं सांगणं समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१ ताबडतोब हेल्मेट

चतुरंग
Tue, 01/12/2016 - 19:52 नवीन
वापरायला सुरुवात करावीत असा आग्रहाचा आणि कळकळीचा सल्ला! मानेला कॉलर लावा, हलके हेल्मेट घ्या काहीही करा पण घ्याच... माझ्या अगदी जवळच्या ऐकण्यात दोन अ‍ॅक्सिडेंट्स असे झालेत की ते लोक केवळ आणि केवळ हेल्मेटमुळेच आज जिवंत आहेत! तुमचं आयुष्य सुरक्षित असावं की नाही हा ऑप्शन असूच शकत नाही! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हेल्मेट चे दुहेरी फायदे

अद्द्या
Mon, 01/11/2016 - 13:08 नवीन
हेल्मेट चे दुहेरी फायदे सकाळचाच अनुभव. ऑफिस ला जाणारा रस्ता एका इंजिनियरिंग कोलेज समोरून जातो . आडवे तिडवे गाडी मारणारे हिरो बरेच आहेत . तसाच एक मनुष्य समोरून येत होता . आणि अगदी शेवटच्या क्षणी त्याला आठवला कि नाश्ता करायचा आहे . त्यामुळे त्याने इंडिकेटर होर्न इत्यादी फालतू गोष्टी न वापरता त्याची KTM Duke उजव्या बाजूला वळवली . आणि अक्षरशः १-२ इंचाच्या अंतराने कट मारून माझ्या समोरून आडवी गाडी घालून हॉटेल समोर थांबवली . ४-५ वर्षात फक्त दुसरेंदा पडलो आज तोल जाऊन . हेल्मेट होतं, त्यामुळे डोक्याला काही झालं नाही . आता हा माणूस मला उठवायला आला . आणि आधार देत हसत म्हणाला . "क्या भैय्या . गाडी कंट्रोल नाही कर सकते क्या इतनी भी " हातातलं हेल्मेट असेल नसेल तेवढी सगळी ताकत लाऊन फिरवलं. बहुदा त्याचा डावा कान फुटला होता .
  • Log in or register to post comments

मस्त हो रावसाहेब!!

तुषार काळभोर
Mon, 01/11/2016 - 16:23 नवीन
(भारती का डीवाय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

अद्द्या - तुमचा सन्ताप समजु शकतो. पण शक्यतोवर

gogglya
Mon, 01/11/2016 - 17:26 नवीन
मारहाण करताना कानाखाली वाजवणे टाळा. जर कर्णबधिरता आली / ईतर इजा झाली तर थेट खुनाच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

हिंदी बोलणार्‍यांना मारलं तर

काळा पहाड
Tue, 01/12/2016 - 01:19 नवीन
हिंदी बोलणार्‍यांना मारलं तर तो गुन्हा होत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

आणि त्याने जर मला गाडी ठोकली

अद्द्या
Tue, 01/12/2016 - 11:33 नवीन
आणि त्याने जर मला गाडी ठोकली असती आणि मी मेलो असतो तर? "अपघात" समजून सोडून देतात का अश्या वेळी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

हातातलं हेल्मेट असेल नसेल

होबासराव
Mon, 01/11/2016 - 16:19 नवीन
हातातलं हेल्मेट असेल नसेल तेवढी सगळी ताकत लाऊन फिरवलं. बहुदा त्याचा डावा कान फुटला होता . हाण तेज्यायला...एकदम बरोबर केलेस.
  • Log in or register to post comments

हेल्मेट न वापरण्याची कारणे

तुषार काळभोर
Mon, 01/11/2016 - 16:46 नवीन
जे देतात, ते मूर्ख असतात. वडीलांनी १८व्या वाढदिवसाला १००० रुपये हातात ठेवले व म्हणाले एक हेल्मेट घ्यायचं, लायसन्स काढायचं आणि गाडी फिरवायची. (ज्यांना आपल्या १६ वर्षांचा कुलदीपकाच्या हातात पल्सर/करीझ्मा द्यावीशी वाटते, त्यांना आकाशातला बाप आमच्या बापासारखी बुद्धी देवो). त्यामुळे वैयक्तिक अनुभव आहे. हेल्मेट घातल्यावर डोकं दुखणं, मान दुखणं, आजूबाजूचं न दिसणं, कमी ऐकू येणं, हे गैरसमज आहेत. मी बर्‍याच मित्रांबरोबर डब्बलशीट फिरतो, दोघांनी हेल्मेट घालून... बायकोसुद्धा हेल्मेट घालून मागे बसते. निवांत गप्पा मारता येतात. * "मी चांगली गाडी चालवतो, मला काही होणार नाही. मग हेल्मेट का घालू?" :- अरे, पण मागून येणार्या रिक्षा/ टवेरा/१६१२/इनोवावाल्याला नाय ना येत नीट चालवता! तो धडकल्यावर डोकं तुझं फुटणार आहे!! * " पोलीस व हेल्मेट कंपन्यांचं कारस्थान आहे" :- असू दे की!! त्यानिमित्ताने तुझं डो़कं जर वाचलं, तर काय त्रास आहे? * "हेल्मेटसक्ती नसावी, ऐच्छिक असावे" :- एव्ह्ढे आपले सामान्यनागरिक अक्कलवंत असते, तर सक्तीची गरजच नाही पडणार. (मैदानात प्रेक्षकांनी काही फेकू नये, म्हणून प्रेक्षक व मैदानामध्ये जाळी बसवण्याची गरज वानखेडेवर असते, लॉर्ड्स वर नाही) * "हेल्मेट परवडत नाही" :- अरे कर्मदरिद्र्या, साडेतीन हजाराच्या स्मार्टफोनला महिन्याला १००-२०० चा नेटपॅक टाकता येतो ना? त्याच मोबाईलच्या स्क्रीनसाठी ५०-१०० चं स्क्रॅचगार्ड लावतोस ना? मग लाखमोलाचा जीव, तुझ्या आई-बापाचा आधार, बायकापोरांचा आधार, वाचवण्यासाठी घे की ८००-९०० चं हेल्मेट. नको टाकू ४ महिने नेटपॅक. *
  • Log in or register to post comments

गैरसमज>> अगदी बरोबर

चैतन्य ईन्या
Mon, 01/11/2016 - 17:12 नवीन
हेल्मेट घातल्यावर डोकं दुखणं, मान दुखणं, आजूबाजूचं न दिसणं, कमी ऐकू येणं, हे गैरसमज आहेत.>> हे वाक्य म्हणजे एकदम बरोबर. ज्यांना हेल्मेट घालायचेच नाही त्यांची हि लटकी आणि अत्यंत खोटी करणे आहे. मुळात त्रास होईल असा एकदा ग्रह झाला कि मग नुसते हेल्मेट पाहूनच ह्यातले बरेच त्रास होतात. पण सगळ्यात म्हणजे ह्यापेक्षा जास्त गरज आहे सडकून शिक्षा करण्याची. वाटेल तसे लोक चालवतात आणि निर्लज्जपणे आह्मी नियम पळत नाही असे आईकावातात. सगळ्यात आधी सगळ्या गाड्यांचे होर्न काढून टाकले पाहिजेल. मुर्खासारखे होर्न वाजवत राहायचे. त्याला काहीही अर्थ नाही. कोणी लक्ष पण देत नाही पण उगाचच जोरजोरात होर्न वाजवून काय मिळते काय माहिती. पोलीस काहीच करत नाही. सरळ सरळ १०००० चा दंड करून लायसन्स बंद केले पाहिजेल. असे झाले तर चट सरळ येतील पण मुळातच आपल्याला नियम पालायाचेच नसल्याने असे काही होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

कोणी लक्ष पण देत नाही पण

असंका
Mon, 01/11/2016 - 17:34 नवीन
कोणी लक्ष पण देत नाही पण उगाचच जोरजोरात होर्न वाजवून काय मिळते काय माहिती.
अगदी माझ्या मनातला प्रश्न!! कोणीच तुमच्या हॉर्नकडे तसं लक्ष देत नसताना कशाला हॉर्न वाजवत रहातात? एक रीक्षात एवढा भयानक मोठा हॉर्न होता की मी रीक्षात बसलेलो दचकलो! त्याला विचारलं की एवढा मोठा हॉर्न कशासाठी? तर म्हणला की "तरीही लोक साइड देत नाहीत!" माझ्या मनात आलं, हॉर्नपेक्षा ते एक्स्कॅवेटर सारखे यंत्र जास्ती फायदेशीर ठरेल या उद्देशासाठी... व्हा साइडला..किंवा मीच करतो तुम्हाला साइडला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या

अगदी अगदी

चैतन्य ईन्या
Mon, 01/11/2016 - 18:04 नवीन
दुर्दैवाने ह्याचा कोणालाच विचार करावासा वाटत नाही. सिग्नलला थांबणे म्हणजे पाप केल्यासारखे आहे. उगाचच आपले होर्न बडवत राहायचे. ह्यातून नक्की काय साधतोये ह्याचा पण विचार नाही. फार फार तर १ मिनिट वाचवणार त्यापेक्षण शांत राहिलो तर लवकर पोचू हेच कळत नाही. पण विचारच करायचा नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

हेल्मेट न वापरण्याची कारणे जे

अद्द्या
Mon, 01/11/2016 - 17:40 नवीन
हेल्मेट न वापरण्याची कारणे जे देतात, ते मूर्ख असतात. >> हाहा . . परफेक्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हेल्मेट

श्रीरंग_जोशी
Tue, 01/12/2016 - 10:38 नवीन
माझी पहिली दुचाकी हाती येण्याच्या अगोदर मी हेल्मेट खरेदी करून ठेवले होते अन जवळच्याही ठिकाणी जायचे असले तरी कुठलाही अपवाद न करता हेल्मेट वापरलेच. चेपूवर हा एक हेल्मेटच्या आगामी मॉडेलचा व्हिडिओ मिळाला आहे. (function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));

Meet The World's Smartest Motorcycle Helmet

Posted by Discovery News on Wednesday, December 23, 2015
  • Log in or register to post comments

भयंकर

होबासराव
Tue, 01/12/2016 - 12:53 नवीन
२० मिनिटां पहिले वाईट अपघात बघितला, KPIT च्या गेट समोर रस्त्यावर एक मुलगी पल्सर वरुन मागच्या मागे डोक्यावर पडलि आणि बेशुध्द झाली. हाकेच्या अंतरावर Mindtree च्या गेट जवळ वाहतुक पोलिस पावती फाडण्यात मश्गुल होते, शेवटी तिला एका आय टि वाल्याच्याच गाडीत रुग्णालयात नेण्यात आले. हेल्मेट घालारे, पिलियन रायडर ने सुद्धा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा