लेखनप्रकार (Writing Type)
गेल्या दीड-दोन महिन्यात जरा चंगळच केली. तशी नाटक-सिनेमाच्या बाबतीत आम्ही ती नेहमीच करत असतो पण गेल्या दीड-दोन महिन्यात जरा जास्तच केली. सिनेमा-नाटक माझं पहिलं प्रेम! कुठल्याही वेळेला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे किंवा नाट्यगृहात जाऊन नाटक बघणे हा माझा सगळ्यात आवडता छंद. प्रत्येक चित्रपट किंवा नाटकाच्या बाबतीत लेख लिहिणे शक्य नाही म्हणून काही नाटक-चित्रपटांविषयी थोडं लिहिण्याचा हा एक प्रयत्न.
कॉफी आणि बरंच काही...
एक छान, गोड प्रेमकथा. हळूवार फुलत जाणारी. आजच्या काळाला अनुसरून असणारी गोष्ट. वैभव आणि प्रार्थना हे एकाच पुणे-स्थित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत असतात. पर्सिस्टंट सिस्टिम्स या कंपनीमधले बहुतांश चित्रीकरण आहे. वैभव हा प्रार्थनाचा मॅनेजर असतो. प्रार्थना त्याला आवडायला लागते. आणि प्रार्थनाच्याही मनात तो हळूहळू घर करायला लागतो. पण प्रार्थना प्रेमाच्या बाबतीत खूप फिल्मी असते. वैभवने खाली लवून गुलाबपुष्पाचा वर्षाव करून प्रपोज करावे अशी तिची अपेक्षा असते. वैभवला आपण नेमके प्रेमात पडलो आहोत का हे उमजत नाही. दरम्यान प्रार्थनाला भेटायला एक लग्नाळू तरुण त्याच्या कुटुंबासोबत येतो. प्रार्थना खिन्न होते. वैभव अजून प्रपोज करत नाही म्हणजे त्याचे आपल्यावर प्रेम नाही असा तिचा समज होतो. प्रार्थनाची बहीण तिला आपल्याला कुणीतरी प्रपोज केले आहे असं खोटंच वैभवला सांगण्याचा सल्ला देते. प्रार्थना एका कॅफेमध्ये भेटून तसं वैभवला सांगते जेणेकरून त्याने अधीर होऊन तिला चटकन प्रपोज करावं. पण घडतं उलटंच. प्रार्थनाला तो मुलगा आवडला आहे असा वैभवचा समज होतो आणि तो प्रार्थनापासून दूर जाण्याचा विचार करतो. शेवटी दोघांनाही आपले प्रेम व्यक्त करण्याची गरज वाटते आणि मग पुण्यातल्या झेड ब्रिजवर दोघे एकमेकांना प्रपोज करतात.
चित्रपट खूप साधा असला तरी फ्रेश वाटतो. वैभव आणि प्रार्थना या दोघांनी सुरेख अभिनय केला आहे. प्रार्थनाची धाकटी बहीण नेहा महाजन सुरेख दिसते, हसते, आणि अभिनय करते. छोट्या छोट्या प्रसंगांमधून नायक-नायिकेमधले प्रेम फुलवण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेला आहे. गाणी फारशी लक्षात राहण्याजोगी नाहीत.
चित्रपट यशस्वी झाला आणि मला वाटते अजून चित्रपटगृहात सुरू आहे. चित्रपट पाहून झाल्यावर मन प्रसन्न झाले. अधून-मधून विनोदाचा शिडकावा चित्रपटाचा मूड कायम फ्रेश ठेवतो.
समुद्र
नुकतेच भरत नाट्य मंदिरला 'समुद्र' हे नाटक पाहिले. मिलिंद बोकीलांच्या कादंबरीवर आधारित हे नाटक आहे. चिन्मय आणि स्पृहा हे एक सुखी जोडपं आहे. लग्नाला बरीच वर्षे झालेली आहेत. त्यांचा राजू नावाचा मुलगा बोर्डिंगमध्ये राहतो. हे दोघे फिरायला म्हणून समुद्रावरील एका रिसॉर्टवर येतात. गप्पा मारता मारता चिन्मयच्या मनात असलेले काही अनुत्तरीत प्रश्न चर्चेला येतात. स्पृहा गंभीर होते. शेवटी मनाचा हिय्या करून ती चिन्मयला खरं सांगते. गणेश राजोपाध्ये नावाच्या एका परपुरुषाशी तिची मैत्री होती असं ती त्याला सांगते. नंतर अपराधभावनेतून ती गणेशशी आपले शरीरसंबंध आल्याचे देखील कबूल करते. चिन्मय भडकतो. आपल्यात असं काय कमी होतं असं तो तिला विचारत राहतो. लग्नाच्या आणि नवरा-बायकोच्या भूमिकेपलिकडे आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि आपण ते जपायला हवं असं स्पृहाचं म्हणणं असतं. या शरीरसंबंधांकडे चिन्मयने केवळ तिचा एक वेगळा अनुभव म्हणून बघावं असा तिचा आग्रह असतो. या मैत्रीमुळे आणि शरीरसंबंधांमुळे आपल्या लग्नात काहीही बाधा पडलेली नाही असं तिचं म्हणणं असतं. लग्नाचा आणि तिच्या त्या मैत्रीचा काहीही संबंध नाही असं ती वारंवार समजावून सांगते आणि चिन्मयला ते अजिबात पटत नाही. स्पृहा एकदाही चिन्मयला सॉरी म्हणत नाही कारण तिच्या मते तिने काही चूक केलेली नसते. आपल्याला समजून घेणारा एक मित्र आपल्याला भेटला आणि आपण त्याच्याशी मैत्री केली आणि शरीरसंबंध हा त्या मैत्रीचाच एक भाग होता अशी तिची ठाम समजूत असते. त्यामुळे ती कधीच चिन्मयला सॉरी म्हणत नाही. शेवटी चिन्मय तिचे स्पष्टीकरण स्वीकारतो आणि दोघे पुन्हा एकत्र येतात.
बरेच प्रश्न उभे करणारे हे नाटक आहे. स्पृहा वागली ते चूक की बरोबर? लग्नाबाहेर अशी मैत्री असणं योग्य आहे का? लग्न म्हणजे नवरा-बायको एवढ्याच भूमिका एका पुरुषाने आणि स्त्रीने पार पाडणं अपेक्षित आहे का? या परीघाबाहेर दोघांचं स्वतंत्र असं अस्तित्व असू शकतं का? आणि अशा स्वतंत्र अस्तित्वामध्ये विवाहबाह्य शरीरसंबंध असणं चूक की बरोबर? अशाने स्वैराचार वाढणार नाही का? मनाला भावणार्या प्रत्येक व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवणे नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे? अशा कित्येक प्रश्नांची जंत्री निर्माण करणारे हे नाटक आहे. एका अतिनाजूक प्रश्नावर चर्चा करणारं नाटक म्हणून 'समुद्र'कडे बघता येईल.
चिन्मय मांडलेकरने नाट्यरुपांतर सहज आणि नेटके केले आहे. चिन्मय आणि स्पृहा जोशी या दोघांनी दमदार अभिनय केला आहे. राजन भिसेंचे नेपथ्य सुरेख आहे. समुद्राचा आभास निर्माण करण्यात ध्वनिसंयोजन यशस्वी झालेले आहे. नाटक बघतांना एक क्षणदेखील कंटाळा येत नाही.
कोर्ट
वीरा साथीदार या अभिनेत्याने पहिल्याच चित्रपटात इतका जबरदस्त अभिनय केला आहे की 'कोर्ट' बघतांना त्यांनी अभिनय केला आहे असे वाटतच नाही. एक लोकजागृती करणारा शाहिर गाण्यांचे कार्यक्रम करून लोकांचं प्रबोधन करत असतो. एका गटार सफाई कामगाराच्या आत्महत्येसाठी या शाहिराला जबाबदार ठरवून पोलीस अटक करून घेऊन जातात. केस उभी राहते. एक गुजराती वकील शाहिराची केस लढतो. सरकारी वकीलाची भूमिका गीतांजली कुळकर्णीने साकारली आहे. दीडशे वर्षापूर्वीचे कायदे आणि कलमं लावून शाहिराला २० वर्षे डांबून ठेवण्याचा खटाटोप सरकारी वकील करत असतात. शाहिराचे वकील कोर्टाला शाहिराचे निर्दोषत्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. अतिशय साधी कथा. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेंनी एक अतिशय वेगळा विषय निवडला आहे.
कोर्टाच्या कामकाजात काय काय गमती-जमती घडतात, सरकारी वकील कुठली कुठली विनोदी कलमे लावून एका निर्दोष शाहिराला शिक्षा ठोठावण्याची पराकाष्ठा करतात, कोर्टाचं कामकाज किती संथ पद्धतीनं चालतं, कोर्ट कसं निर्गुण निराकार असतं, इत्यादी पैलूंना अर्थपूर्ण स्पर्श करत कोर्ट पुढे सरकतो.
चित्रपट कुठेही टिप्पणी करत नाही. कुठलेच पात्र कोर्टाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत नाही; उद्विग्न होत नाही. कामकाज संथपणे चालत राहते. न्यायाधीश हे बुद्धीची आणि न्यायदानाच्या कर्तव्याची चाड ठेवून न्याय करणारे पद असते. चित्रपटातला न्यायाधीश मात्र अंधश्रद्धाळू दाखवला आहे.
गुजराथी वकील उच्चभ्रू वर्तुळातला असतो. सरकारी वकील मध्यमवर्गीय असते. त्यांचं नेहमीच अलिप्त आयुष्य एकंदरीत सिस्टीममधले विरोधाभास अधोरेखित करतं. कोर्ट हे असंच अलिप्त असतं. कुठल्याच भाव-भावना न जाणणारं, कुणाच्याच हालअपेष्टांना न जुमानणारं, पाषाणहृदयी असं हे 'कोर्ट' दिग्दर्शकाने अतिशय खुबीने रंगवलं आहे. व्यावसायिक करमणूक नसलेला हा चित्रपट एक वेगळ्या प्रकारची करमणूक करतो. चित्रपट कुठेच कंटाळवाणा होत नाही. अर्थातच पिटातल्या प्रेक्षकांना न पचणारा हा चित्रपट आहे हे खरे. चित्रपट संथ असल्याने बहुतेक प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटण्याची शक्यता आहे; पण थोडे अधिक लक्ष देऊन पाहिले असता हा चित्रपट हळूवार चिमटा काढत निखळ मनोरंजन करतो.
गीतांजली कुळकर्णींना याआधी आपण 'अगं बाई अरेच्चा' मध्ये पाहिलं आहे. स्वतःच्या विश्वात मग्न राहून कविता करणार्या एका युवतीची भूमिका त्यांनी 'अगं बाई अरेच्चा' मध्ये वठवली होती. कोर्टमधल्या सरकारी वकीलाची भूमिका गीतांजलींनी सुरेख वठवलेली आहे. प्रदीप जोशींनी न्यायाधिशाची भूमिका चोख केली आहे. असं वाटतं की खरंच कुठले निवृत्त न्यायाधीश या भूमिकेसाठी निवडले असावेत.
एकदा निवांत बसून बघण्यासारखा हा चित्रपट आहे हे नक्की.
रानभूल
प्र ल मयेकर लिखित 'रानभूल' हे नाटक नवीन संचात आलेलं आहे. संजय नार्वेकर, भाऊ कदम, विजय पटवर्धन यांचा दमदार अभिनय आणि देखणं दिग्दर्शन हे या नाटकाचे मुख्य आधारस्तंभ! फिरत्या रंगमंचाची किमया भुरळ पाडते. नेपथ्य अतिशय सुरेख.
लुबाडणूक करू पाहणार्या नाट्यलेखक, अभिनेता, आणि अभिनेत्री या त्रिकुटाच्या कचाट्यात सापडलेली एक निष्पाप तरुणी आणि तिला सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा संजय असे या नाटकाचे कथानक होते.
संजय नार्वेकर, भाऊ कदम, आणि विजय पटवर्धन यांनी अफलातून अभिनय केला आहे. नाटक बघतांना मजा आली आणि थरार अनुभवता आला.
कहानी में ट्विस्ट
राकेश सारंग (निर्माता) यांनी 'रोमांचालाही रोमांच आणणारे नाटक' असे या नाटकाचे वर्णन केले होते. मोठ्या अपेक्षेने मी हे नाटक बघायला गेलो. गिरीश ओक, सौरभ गोखले, आणि प्राची दातार यांच्या भूमिका असणारे हे रहस्यमय नाटक सुरू होतं तेव्हा अपेक्षा उंचावतात. गिरीश ओकांचा अभिनय जबरदस्त असल्याने काहीतरी जबरदस्त बघायला मिळणार असं वाटायला लागतं. बराच वेळ निघून गेल्यानंतर मात्र नाटकाची पकड ढिली होत जाते. केवळ तीन पात्रांमध्ये खूप जबरदस्त रहस्य निर्माण करणे अवघड होतेच. शेवटी फारसे न पटणारे रहस्योद्घाटन करून नाटक संपते.
गिरीश ओकांचा अभिनय वगळता नाटक फारसे परिणामकारक वाटले नाही. कथा तितकीशी प्रभावी वाटली नाही. नाटक बर्याचदा कंटाळवाणे होते.
डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी
दिबाकर बॅनर्जी हा माझा आवडता दिग्दर्शक आहे. 'खोसला का घोसला' या माझा ऑल टाईम फेवरेट चित्रपट आहे. त्यामुळे 'ब्योमकेश बक्षी' बघायचाच होता. आणि चित्रपट मला खूप आवडला.
दुसर्या महायुद्धाच्या दरम्यानचे धुमसते कलकत्ता शहर. एक कारखान्यात नोकरी करणारा माणूस अचानक गायब होतो. ब्योमकेश बक्षी या केसवर काम सुरू करतो. मोठ्या गुंतागुंतीचे रहस्य उलगडण्यात ब्योमकेश यशस्वी होतो.
चाळीसच्या दशकातले कलकत्ता सुंदर उभे केले आहे. कथा-पटकथा निव्वळ लाजवाब! रहस्याचा गुंता असा बेमालूम विणला होता की बुद्धीला चालना दिल्याशिवाय आणि बारीक लक्ष देऊन चित्रपट पाहिल्याशिवाय चित्रपट कळणे अशक्यच! असे चित्रपट मला भयंकर आवडतात. म्हणूनच की काय 'जॉनी गद्दार', 'तलाश' वगैरे चित्रपट माझ्या खास आवडीचे आहेत.
सुशांत राजपूतने ब्योमकेश बक्षी साक्षात उभा केलेला आहे. बाकी सगळ्या अभिनेत्यांनी बावनकशी अभिनय केला आहे. अगदी चुकवू नये असा चित्रपट! अर्थात असे दिमागला कामाला लावणारे चित्रपट आवडत असतील तरच!
बदलापूर
अतिशय डेंजरस चित्रपट! वरूण धवन आणि नवाजुद्दीन सिद्दिक्की यांच्या अभिनयाला तोड नाही. हुमा कुरेशी, राधिका आपटे, दिव्या दत्ता यांचा अभिनयदेखील नेटका. मानवी स्वभावाची काळीकुट्ट बाजू अतिशय प्रभावीपणे माडणारा चित्रपट! सूडबुद्धी कुठल्या थराला जाऊ शकते हे पहायचे असेल तर 'बदलापूर' अवश्य बघा. हा 'जॉनी गद्दार'च्या दिग्दर्शकाचा चित्रपट आहे (श्रीधर राघवन). फक्त आणि फक्त प्रौढांसाठी! सहकुटुंब अजिबात बघू नका. पण चित्रपट बघण्यासारखा आहे हे नक्की.
लेख तसा त्रोटक झालेला आहे पण प्रत्येक चित्रपटावर किंवा नाटकावर डिट्टेलवार लेख लिहिणे अवघड आहे म्हणून एक संक्षिप्त ओळख देण्याचा हा प्रयत्न आहे. जसे जमेल तसे अजून लिहित राहीनच...
प्रतिक्रिया
ये बात! झकास लिहिलंय.
गेल्या दीड-दोन महिन्यात जरा
मला वाटलं हा बदलापूर म्हणजे
बदलापूरवर एक ओताविचा प्रयत्न
ब्योमकेश बक्षी
बरोबर
ब्योमकेश मात्र आवडला
बदलापूर (न्याशनल हायवे १०),
छान परिचय.. विशेषतः नातक हा
लेखनाचा हा प्रकार आवडला. पैकी
छान ओळख!
ओळख आवडली
खरंच चंगळ केली आहे की तुम्ही
बदलापूर
मस्त परिक्षण.कॉफी सुरेख आहे
बदलापूर बद्दल इतक्यात बर्याच
बदलापूर - थोडा हिंसक आहे तरी
आज गेलो होतो कोर्टात!
सेवक एकेक लाइट बंद करुन
हाइल्ला! सच क्या?
न्यायाधीश
अरे हो..हो! रैट्ट. तो
घाऊक
छान लेख खु(समीर)सूराण्णा. ;)
हंटर नाही का हो पाहिला
कॉफी आणि बरंच काही... पाहिला.
तूर्तास
हो .. मी पण दर शनिवारी पेपर
आता रानभूल बघितलेच पाहिजे असे