लोकहो,
आज तुम्हाला येड लावण्याचा विडा उचलून आम्ही लेखन करीत आहोत. आम्ही ठार "येडे" झालोच आहोत, आता तुम्हालाही करतो.
या वेडाचे कारण म्हणजे लवंगलता छंद. हा छंद माणसाला वेड लावणारा आहे. या छंदाचे नोटेशन असे आहे.
प| प| प| -|-| =१४ अक्षरे
येथे प म्हणजे पद्मावर्तनी म्हणजे ४ अक्षरे (जातींमध्ये प च्या ८ मात्रा मोजल्या जातात)
तर या छंदात एका ओळीत १४ अक्षरे असतात. पण लेखनाच्या सोयीसाठी आणि कवितेच्या सौंदर्यासाठी १४ अक्षरांची ओळ दोन भागात विभागून लिहिली जाते.
म्हणजे ८ अक्षरांची पहिली व उर्वरीत ६ अक्षरांची दुसरी. अशा दोन ओळी एकत्र येऊन २ आणि ४ या ओळींचा यमक.
हा एक अत्यंत गोड व मधुर छंद आहे. एकदा हा अवगत झाला की बरेच लेखन या छंदात होते. कारण हा छंद सुलभ आहे. येथे "खेळायला" वाव आहे.
उदाहरणार्थ या छंदातली कविवर्य ग्रेस यांची ही कविता पहा
पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोर्या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार.....
प्राक्तनाच्या घळीमध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्यालाही
ओळखले कोणी?
पुरूषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज
न्हाऊनीया केस ओले
दारामंदी आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली
जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख
पाठीमागे उभा त्याचे
दिसेल का रूप?
आरशाच्या शापानेही
आलिंगन पाप
रानझरा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली
आमची या छंदातली एक कविता अशी
घडणार नाही जे जे
त्याचा नाद सोड
पालवीन फुलते का
वठलेले खोड?
परतुनी येईल का
सुटलेला बाण?
बाहुलीला कधीतरी
येईल का न्हाणं?
घडणार नाही जे जे
त्याचा नाद सोड|
मेघ येता आषाढाचा
नाचे फक्त मोर
अवसेला दिसते का
कधी चंद्रकोर?
घडणार नाही जे जे
त्याचा नाद सोड|
मोठेपणा दावण्याची
ज्याला त्याला हाव
बाभळीला मिळतो का
बकुळीचा भाव?
घडणार नाही जे जे
त्याचा नाद सोड|
नवरीला नवर्याचा
सहवास नाही
पारूबाई तरी तुला
नातवाची घाई
घडणार नाही जे जे
त्याचा नाद सोड
पालवीने फुलते का
वठलेले खोड?
आपला,
(ठार-येडा) धोंडोपंत
विशेष
वाचने
4520
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
धोंडोपंत, ल
छंद आवडला. मात्र
In reply to धोंडोपंत, ल by लिखाळ
काव्य स्पर्धा
वा
हो का?
गंमत