✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जालीय निदान

स
सुबोध खरे यांनी
Sun, 04/19/2015 - 01:32  ·  लेख
लेख
जालीय निदान ( internet diagnosis) काल माझ्याकडे सोनोग्राफीसाठी २५ वर्षांची एक लग्न न झालेली मुलगी आली होती. तिला पाळीच्या दिवसात फारच जास्त त्रास होत असे म्हणून स्त्रीरोग तज्ञाने माझ्याकडे पाठविले होते. माझ्या सोनोग्राफी च्या खोलीत मी रुग्णांच्या नातेवाईकांनासुद्धा येण्याची परवानगी देतो. त्याप्रमाणे तिची आई सुद्धा आली होती. मी तिचे केस पेपर पाहीले त्यात फारसे काही आढळले नाही. तिची सोनोग्राफी सुरु केल्यावर तिने मला बरेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. डॉक्टर endometriosis अजून आहे का/ माझ्या ओव्हरीज कशा आहेत. त्यावर काही डाग आहे का? आतमध्ये सिस्ट (cyst) आहे का? गर्भाशयाला सूज आहे का? सर्व साधारणपणे मी रुग्णाशी सोनोग्राफी करताना संवाद साधतो. त्यामुळे बर्याच गोष्टी ज्या निदानाला आवश्यक असतात त्या लक्षात येऊ शकतात. काही वेळेस त्यांना पाठवणार्या डॉक्टरांच्या लक्षात न आलेल्या गोष्टी पण तुमच्या लक्षात येऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे रुग्णाने कितीही प्रश्न विचारले तरी मी चिडत नाही . मी तिला विचारले कि तुम्हाला endometriosis चा त्रास केंव्हा पासून आहे. त्यावर ती काहीच बोलली नाही. मग मी तिला विचारले कि तुमची laparoscopy झाली आहे का? यावर ती म्हणाली कि नाही. मग मी विचारले कि तुम्हाला endometriosis आहे हे कोणी सांगितले. त्यावर ती म्हणाली कि अगोदरचे स्त्रीरोग तज्ञ पाळीचा इतका त्रास होतो तर असे काहीतरी असण्याची शक्यता आहे असे म्हणाल्याचे आठवते. मी तिला परत विचारले कि हे सिस्ट किंवा ओव्हरीज वर डाग तुम्हाला कोण म्हणाले? त्यावर ती म्हणाली कि ते मी इंटरनेट वर वाचले. हे ती मुलगी बोलत असताना मला थोडेसे हसू आले आणि मी तिला विचारले कि का हो तुमचा टी व्ही बिघडला कि तुम्ही त्याचा आय सी गेला आहे का सर्किट खराब झाले आहे का याचा जीवाला त्रास करून घेता का? किंवा इंटरनेट वर वाचून पाहता का? यावर त्यामुलीची आई सूचक हसली. अर्थात ती मुलगी नाही म्हणाली. मग मी तिला म्हणालो कि केवळ तुमच्या एका डॉक्टर नि हा शब्द उच्चारला म्हणून त्यावर तुम्ही जालावर बरेच वाचन केलेत आणि त्याने आपले डोके पिकवून घेतलेत?. तिला मी व्यवस्थितपणे पाळीचा त्रास का होतो हे समजावून सांगितले. बर्याच मुलींच्या गर्भाशयाचे तोंड लहान असते त्यामुळे पाळीच्या वेळेस झालेल्या रक्ताच्या गाठी बाहेर टाकण्यासाठी गर्भाशय जोरात आकुंचन पावते त्यामुळे ओटीपोटात मुरडा झाल्यासारखे( spasm) प्रचंड दुखते. लग्न झाल्यावर जेंव्हा मुलगी प्रथम गरोदर राहते तेंव्हा तिची पाळी बंद होते आणि नंतर जसा जसा गर्भाशयाचा आकार वाढत जातो तसे त्याचे तोंड मोठे होते आणि शेवटी प्रसुतीनंतर गर्भाशयाचे तोंड मोठे होते आणि हा प्रश्न कायमचा बंद होतो. मी तिला हसत म्हणालो कि याचा अर्थ तुम्ही लगेच लग्न करा असे मला सुचवायचे नाही. तुम्ही लग्न केंव्हा करावे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे होईस्तोवर माझी सोनोग्राफी पूर्ण झाली होती आणि मला असे दिसले कि तिला वजन थोडेसे वाढल्यामुळे PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) हा आजार होता. पण हा काही फार गंभीर आजार नाही. मी तिला पुढे म्हणालो कि जर पाळीचा फारच जास्त त्रास होत असेल तर गर्भाशयाचे तोंड डायलेटर टाकून मोठे करता येते. परंतु लग्न न झालेल्या मुलीची खालून शक्यतो कोणतीही शल्यक्रिया केली जात नाही. हा उपाय अगदी शेवटचा म्हणूनच वापरला जातो. पाळीच्या त्रासावर परिणामकारक वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत ती सहज घेता येतील. नेट वर वाचून कोणतेही निदान करणे हे फारसे चांगले नाही. मी तिचे सर्व जुने कागदपत्र परत पाहायला मागितले.त्यात कुठेही endometriosis असल्याचा उल्लेख दिसला नाही. अगोदर केलेल्या सोनोगाफितही नाही.त्या सोनोग्राफीत तिला mild PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) असल्याचे लिहिले होते. गम्मत म्हणजे तिने जालावर वाचून केलेल्या निदानावर एका आयुर्वेदिक वैद्याने तिला endometriosis चे उपचार चालूही केलेले होते. त्यातून तिला अडीच महिने पाळी पण आली नव्हती.( अर्थात हे कदाचित PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम मुळे पण असू शकेल) तिच्या भावाच्या आग्रहामुळे ती आता स्त्रीरोग तज्ञाकडे गेली होती. मला आश्चर्याचा धक्काच बसला. नक्की निदान नसताना गृहीत गोष्टींवर आजार आहे हे समजणे आणी त्यावर इलाजही करणे. मुळात जालावर वाचून अर्धवट ज्ञान घेऊन लोक येतात हा अनुभव मी गेली बरीच वर्षे घेत आलो आहे. दुर्दैवाने त्या माहितीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे बहुतांश लोकांना कळत नाही आणि त्यामुळे ते भरपूर टेन्शन घेतात हे मी पाहतो आहे. हे सर्व झाल्यावर आम्ही बाहेर आलो. ती मुलगी टॉयलेट मध्ये गेली असताना तिची आई मला म्हणाली डॉक्टर तुम्ही इतके छान समजावून सांगता तर मी तुम्हाला एक विनंती करते कि तिला नीट समजावून सांगा, काही तरी वाचते आणी टेन्शन घेऊन बसते.ती स्वतः इलेक्त्रीकल इंजिनियर आहे. चांगली मोठ्या कंपनीत नोकरी आहे.आपल्याला काहीतरी गंभीर आजार आहे असे काहीतरी डोक्यात घेऊन बसली आहे. तिच्यासाठी चांगले स्थळ आले होते.मुलगा पण मेकानिकल इंजिनियर होता. तिने त्या मुलाला सांगितले कि मला ENDOMETRIOSIS आहे तेंव्हा मला मुल होण्याची शक्यता नाही. झाले ते लोक निघून गेले. असे सांगितल्यावर कोण लग्न करेल हिच्याशी? मला धक्काच बसला तिचा मोठा भाऊ इतका वेळ बाहेर बसला होता तो पण अगदी कळवळून म्हणाला कि डॉक्टर काहीतरी खूळ डोक्यात घेऊन बसते आणी म्हणते मला कुणाला फसवायचे नाही. तुम्ही तिला समजावा हो.मी त्यांना हसून धीर दिला. ती मुलगी तोवर टॉयलेटमधून बाहेर आली. मी तिला स्पष्टपणे सांगितले तुम्हाला कोणताही आजार नाही. तुम्ही नवीन कार विकत घेता तेंव्हा कारची कंपनी तुम्हाला तीन वर्षे किंवा ३०,००० किमी ची WARRANTY का देते तर नवीन गाडीत काही खराबी येण्याची शक्यता नसतेच म्हणून. तसेच आहे. पंचविसाव्या वर्षी कोणता आजार होईल. फार तर प्रेम जमू शकेल अहो पंचवीस वयाला मी आजार किंवा असल्या काही गोष्टी माझ्या स्वप्नात पण नव्हत्या. उद्या कुठे फिरायला जायचे. कुठल्या सिनेमाला जायचे.कुठे मुली पाहायला जायचे. असले विचारच आमच्या डोक्यात असत. पंचविशीला तुम्ही भलत्याच गोष्टी डोक्यात ठेवल्या आहेत. नेटवर वाचले म्हणजे त्यातील सर्वात वाईट आणी गुंतागुंतीचे प्रश्न आपल्याला होतील असे तुम्ही जे गृहीत धरता आहात ते चुकीचे आहे. माझ्या कडे भरपूर गरोदर बायका जालावर काही बाही वाचून डोकं पिकवून घेऊन येतात. मुलाची वाढ व्यवस्थित आहे का? माझा आहार बरोबर आहे ना? ई ई . तुम्ही तर त्याच्या पुढे गेलात. नसलेला आजार गृहीत धरून तुम्ही तुम्हाला मुल होणार नाही हे मनात धरलेत? तुम्हाला अगदी endometriosis असेल तरीही त्यात मुल होत नाही हे कुणी सांगितले? मी गेली कित्येक वर्षे वंध्यत्व या विषयात काम करत आलो आहे आणी शेकड्यांनी बायका endometriosis च्या पाहील्या आहेत ज्या गरोदर होऊन व्यवस्थित मुलांना जन्म देऊन आनंदात आहेत. तुम्ही गाडीच्या ABS मधून आवाज यायला लागला कि नेटवर तपासता कि सर्व्हिस सेंटरला जाता? तुम्हाला पंचविसाव्या वर्षी काय आजार होणार आहे? उगाच स्वतःवर आणी आपल्या कुटुंबावर टेन्शन कशाला आणता आहात? मी तुमची सोनोग्राफी केलेली आहे त्यात endometriosis मुळीच दिसत नाहीये. त्यातून endometriosis अगदी असेल तरी ते सूक्ष्म स्वरुपात असेल आणी इतक्या कमी प्रमाणात असलेल्या endometriosis मुळे मुल होणार नाही हे समजणे साफ चूक आहे. त्यावर ती मुलगी हसली. तिला ते पटले.काहीवेळा सोनारानेच कान टोचावे लागतात तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. भाऊ सुद्धा सद्गदित झाला. मी त्या मुलीला म्हणालो कि मला लग्नाला नाही तरी रिसेप्शनला बोलवा. मला आईस्क्रीम फार आवडते अन फुकट असेल तर अजूनच. ते सर्व जण हसले आणि मला निरोप देउन गेले. जाता जाता --- माहिती आणि शहाणपण यात फरक करायला आपण शिकले पाहिजे. टोमाटो हे फळ आहे हि "माहिती" आहे पण ते फ्रुट सॅलड मध्ये घालू नये हे "शहाणपण" आहे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
38474 वाचन

💬 प्रतिसाद (129)

प्रतिक्रिया

@ टोमाटो हे फळ आहे हि "माहिती

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/19/2015 - 02:19 नवीन
@ टोमाटो हे फळ आहे हि "माहिती" आहे पण ते फ्रुट सॅलड मध्ये घालू नये हे "शहाणपण" आहे>>> ह्हा ह्हा ह्हा! बाकी संपूर्ण लेख पचनी पडला. मी मध्यंतरी मला हार्टेटेक येणार असे जालीय निदान करवून घेऊन असाच गाढवपणा केला होता. मग फेमिली डॉक्टरनि हजामत केल्यावर गप बसलो. :-D
  • Log in or register to post comments

कोणत्या सायटीवर केलंत ते

खटपट्या
Sun, 04/19/2015 - 02:28 नवीन
कोणत्या सायटीवर केलंत ते हार्टेटेक चे निदान? मला पण वाचायचं आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

वा, खूप सुंदर लेख आणि माहीती.

खटपट्या
Sun, 04/19/2015 - 02:26 नवीन
वा, खूप सुंदर लेख आणि माहीती.
  • Log in or register to post comments

लय भारी डॉक्टरसाहेब. तुम्ही

संदीप डांगे
Sun, 04/19/2015 - 02:29 नवीन
लय भारी डॉक्टरसाहेब. तुम्ही अगदी योग्य केलं. मला रोजच्या कामांसाठी, वस्तूंसाठी, सेवांसाठी आंजावर माहिती शोधण्याची भयंकर सवय आहे. पण वैद्यकिय बाबतीत कानाला खडा. अगदी अमुक एखाद्या आजारासाठी कुठलं हॉस्पीटल आहे हे सुद्धा नाही. त्याबाबतीत फक्त जनरल प्रॅक्टीशनर जे सांगणार तेच ऐकायचं असा नियम करून ठेवला आहे. बाकी सद्सद्विवेकबुद्धी असतेच. सुरुवातीच्या दिवसांमधे डोके दुखते तर शोधा आंजावर, पोट गडबडलंय शोधा आंजावर, अंगावर पुरळ आले शोधा आंजावर करायचो. मग तिकडे अशी अशी लक्षणं असतील तर ब्रेन ट्युमर असू शकतो, पोटात कृमी असू शकतात, कँसर असू शकतो वैगेरे 'निदान' कळायला लागली. मग मात्र त्यातला फोलपणा कळला. ही वैद्यकीय माहिती डॉक्टर लोकांसाठी ठिक असते. सामान्य रुग्णाने अजिबात जाउ नये अशा साईट्सवर. माझ्यामते कुणासाठीही असो, पण खरंच (डॉक्टरांनासुद्धा) अशा साईट्सची गरज आहे का? त्या बंदच करायला पाहिजे असं माझं मत आहे. अगदी लहान मुलांच्या छोट्या-मोठ्या आजारांच्या प्राथमिक माहितीसाठी आंजावर शोधायचे म्हटले तर डोकं बधीर होईल असे फोटोज असतात. माहिती तर थेट लास्ट स्टेजची असते. त्यातून काही ज्ञान होणे शक्य तर नाहीच उलट रुग्ण घाबरून काही-बाही करून घेऊ शकतो. माझं असं मत आहे की डॉक्टरलोकांनी पुढाकार घेऊन या नस्त्या गोष्टी थांबवाव्या.
  • Log in or register to post comments

हा हा, भारी किस्सा!

नगरीनिरंजन
Sun, 04/19/2015 - 02:43 नवीन
हा हा, भारी किस्सा! माहितीच्या महामार्गावर अपघातच जास्ती!
  • Log in or register to post comments

महत्वाचा संदेश

श्रीरंग_जोशी
Sun, 04/19/2015 - 03:58 नवीन
या विषयावर अनुभव लिहून फार महत्वाचा संदेश दिला आहे डॉक्टर साहेब. जालावरील वैद्यकीय माहिती केवळ पूरक गोष्ट म्हणून पाहिली गेली पाहीजे. ती वाचून स्वतःच मते बनवणे अतिशय महागात पडू शकते.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख आणि माहीती

टिवटिव
Sun, 04/19/2015 - 04:11 नवीन
मुलाच्या "Terrible Twos" च्या वेळी मीही असाच जालीय निदान करण्याचा मुर्खपणा केला होता. autism च्या धास्तीने १ महिना काढला.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलय

एक एकटा एकटाच
Sun, 04/19/2015 - 05:31 नवीन
फारच चांगला लेख. जस्ट ह्या लेखाच्या अनुषंगाने अजुन एक गोष्ट आठवली. हल्ली लग्न पत्रिका जुळवतानाही लोक जाणकाराकडे कमी आणी इंटरनेटवर जास्त फिरतात.
  • Log in or register to post comments

पत्रिका जुळवणारे जाणकार कुठे

टवाळ कार्टा
Sun, 04/19/2015 - 11:24 नवीन
पत्रिका जुळवणारे जाणकार कुठे सापडतात हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच

Medical students' disease

नंदन
Sun, 04/19/2015 - 06:37 नवीन
लेख आवडला. Medical students' disease ची आठवण झाली - रोगांची लक्षणे, माहिती इत्यादी अभ्यासताना, आपल्यालाही तोच रोग झाला आहे, असं त्यांना वाटू लागतं.
तुम्ही गाडीच्या ABS मधून आवाज यायला लागला कि नेटवर तपासता कि सर्व्हिस सेंटरला जाता? तुम्हाला पंचविसाव्या वर्षी काय आजार होणार आहे? उगाच स्वतःवर आणी आपल्या कुटुंबावर टेन्शन कशाला आणता आहात?
'निदान' डॉक्टरला तरी विचारायचं :)
  • Log in or register to post comments

ही सगळी डॉक्टरवरचा विश्वास उडाल्याची लक्षणे आहेत.

नेत्रेश
Sun, 04/19/2015 - 07:08 नवीन
लोक टिव्ही व कार मॅकॅनिकवर सुध्धा विश्वास ठेवतात, पण डॉक्टरवर विश्वास ठेवायला कचरतात. डॉक्टर लोकांनी आत्मपरीक्षण करायची वेळ आली आहे (की निघुन चालली आहे)!
  • Log in or register to post comments

१००+ प्रतिसाद येतील यावर

टवाळ कार्टा
Sun, 04/19/2015 - 11:23 नवीन
१००+ प्रतिसाद येतील यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

दुर्दैवाने सगळे डॉक्टर चोर

सुबोध खरे
Sun, 04/19/2015 - 12:17 नवीन
दुर्दैवाने सगळे डॉक्टर चोर आहेत असे समजणाऱ्या लोकाना पण कोणत्याना कोणत्या डॉक्टरांकडे जावेच लागते. स्वतःसाठी नाही तरी नातेवाईकांसाठी. कारण कार किंवा टीव्ही बिघडला तर टाकून नवा आणता येतो. पण शरीराचे तसे नाही. आमचा एक चांगला मित्र (इंजिनियर आह), जोशी आडनाव परंतु मराठी नव्हे तर पहाडी आहे) असाच आमच्या समोर ( मी आणि माझा डॉक्टर मित्र) डॉक्टरना शिव्या घालत होता. माझा मित्र त्याला म्हणाला उगाच शिव्या घालू नको कधीतरी तुला डॉक्टरकडे जायची पाळी येईल. मित्राची बत्तीशी वठली आणि पुढच्याच आठवड्यात त्याच्या दुचाकीला अपघात झाला आणि त्याला पुण्याच्या जोशी रुग्णालयात भरती करावे लागले. त्याचा चेहरा वाईट तर्हेने फाटला होता. परंतु तेथील प्लास्टिक सर्जनने इतके सुंदर शिवण काम केले कि अगदी जवळून बघितल्याशिवाय त्याच्या चेहऱ्यावरील व्रण दिसत नसे. यानंतर त्याने आयुष्यात निदान आमच्या समोर तरी डॉक्टरना शिव्या दिल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

सर्वच डॉक्टर्सनां दोष देत नाही आहे

नेत्रेश
Sun, 04/19/2015 - 13:38 नवीन
पण लोकांचा सरसकट सर्व डॉक्टर्स वरील विश्वास इतका कमी व्हावा की लोकांनी स्वतःच्या आजाराच्या निदानासाठी डॉक्टरच्या आधी ईंटरनेटकडे धाव घ्यावी? बहुतेक सर्वांना कधी ना कधी मॅकॅनिक, प्लंबर, सुतार यांचा वाईट अनुभव आलेला असतो. पण हे लोक सामान्यतः कमी शीकलेले, अर्धकुशल, परीस्थीतीने गरीब किंवा सरळ सरळ लबाड असतात. त्यांनी कधी फसवले तर ते पुर्णतः अनपेक्षीत नसते. त्यामुळे लोक चांगल्या कारागिराचा फोन, नाव वगैरे लिहुन ठेवतात. याउलट डॉक्टर हे उच्च शिक्षीत व अतीशय कुशल असतात. ते ज्या प्रमाणात फी आकारतात त्या नंतर पेशंट त्यांच्याकडुन पुर्ण प्रामाणीक सेवेची अपेक्षा ठेवतो. अशावेळी डॉक्टरकडुन आलेला फसवणूकीचा अनुभव हा खुप धक्कादायक व डॉक्टरच नव्हे तर सगळ्या जगाच्याच प्रामणीकपणावरचा विश्वास उडवणारा असतो. अशा अनुभवा नंतर लोक माहीती व पुर्व निदानासाठी इंटरनेट्कडे वळले तर त्यांना फारसा दोष देता येत नाही डॉक्टर्सचा वाईट अनुभव इतक्या लोकांना, जवळ जवळ सर्वांना, यावा की डॉक्टरची विश्वासअर्हता मॅकॅनिक पेक्षाही कमी व्हावी हे खरोखरच दुर्दैवी नाही का? (आपल्या मुळ लेखात आपण आपल्या पेशंटला समजावताना जे मॅकॅनीकचे उदाहरण दीले आहे त्यावरुन लोक डॉक्टरपेक्षा मॅकॅनिकवर जास्त विश्वास ठेवतात असा भाव आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माझा एक मित्र आपल्याला कॅन्सर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/19/2015 - 07:51 नवीन
माझा एक मित्र आपल्याला कॅन्सर झालाय म्हणुन ऐन २२-२३ व्या वर्षी मनाशी धरुन बसला होता. दोन वर्ष अ़क्षरशः किमान ३ डॉक्टरांनी त्याला तुला कॅन्सर नाहीचं निदान करुनसुद्धा बाळ त्या दडपणाखाली होतं. शेवटी त्याला साईकॅट्रिसच्या जवळजवळ ६ महिने ट्रिटमेंट केल्यावर फायदा झाला. आता अगदी मस्तं आयुष्य जगतोय. आणि ह्या काळात त्यानी कॅन्सरवर चक्क इंटरनेट, पुस्तकं अजुन काय काय एवढ्या जास्तं प्रमाणात वाचलेलं की त्याला वैचारिक कॅन्सर नक्की झाला असणार त्यावेळी.
  • Log in or register to post comments

फार छान लेख!

एस
Sun, 04/19/2015 - 08:56 नवीन
एक अवांतर विचारतो : शल्यक्रियागृहात शस्त्रक्रिया करत असताना अगदी निष्णात शल्यचिकित्सकांनाही काही वेळा काही अडू शकते. देव कुणीच नाही, त्यामुळे त्यांना सर्वच माहिती असेल व ऐन वेळी ते आठवेल असे नाही. मग तेव्हा बाहेरून मदत कशी मागितली जाते? उदा. अधिक तज्ञ डॉक्टरांना फोन करून, गूगल करून, इ.?
  • Log in or register to post comments

असे सहसा होत नाही.

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 09:11 नवीन
येत नाही असे होत नाही. पण काहीवेळा डायलेमा असतो. की अमुक करू की तमुक. अ‍ॅनास्थेटिस्ट नामक एक मुनिवर्य तिथे उपस्थित असतात. त्यांनी त्याच प्रकारच्या अनेक केसेस, अनेक प्रकारच्या नव्या/जुन्या/डेरिंगबाज्/सेफ प्लेयर इ. डॉक्ट्रांनी हँडल केलेल्या पाहिलेल्या असतात. तेव्हा, बहुतेकदा, त्या मुनिवर्यांनी सांडलेल्या एक दोन शब्दमौक्तिकांवर डिसिजन कन्फर्म होते. अगदीच क्वचित, मोठी अडचण आली, गंभीर गुंतागुंत उद्भवली, तर इतर डॉक्टराना हाक मारली जाते. तेही धावून येतात, व शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचा संपुर्ण प्रयत्न केला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

असे काही घडलेले माहीत आहे

पैसा
Mon, 04/20/2015 - 10:49 नवीन
रत्नागिरीत एक नामवंत सर्जन एका कॅन्सर पेशंटवर शस्त्रक्रिया करत असताना अचानक त्यांना माईल्ड हार्ट अटॅक आला. त्यांनी स्वतःसाठी औषध उपचार घेऊन दुसर्‍या डॉक्टरंना बोलावून घेतले. दरम्यान अ‍ॅनास्थेटिस्टने नर्सेसच्या मदतीने पेशंटची उघडी जखम शिवून टाके घातले आणि परिस्थिती व्यवस्थित हाताळली. अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून पेशंटला कोल्हापूरला हलवले. सर्जनसाहेबांवरही वेळेत उपचार होऊन काही दिवसांनी ते पुन्हा कामाला लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

मेडीकल स्टुडंट सिंड्रोम किंवा

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 09:12 नवीन
मेडीकल स्टुडंट सिंड्रोम किंवा ज्याला आम्ही सेकंड इयर सिंड्रोम म्हणतो, is very easy to catch. नेटवर वाचलं की हे असं मला झालंच असेल, असे ठरवून घेऊन अनेक पेशंट्स पॅरानॉईड होऊन जिवाला त्रास करून घेत असतात. दुसरा एक प्रकार म्हणजे नेटवर वाचून डॉक्टरला किती 'येतं' याची परिक्षा घेणे. उगंच तिसरीच तक्रार सांगून, मग मला तपासून हा डॉक्टर मला झालेला (इंटरनेटवरून मी डायग्नोज केलेला) आजार बरोबर शोधतोय की तिसरंच काही सांगतोय, असे अनेक उद्योग करणारे बरेच प्राणी असतात. तसे पेशंट्स सगळ्यात वाईट. आजकाल अनुभवाने असे नमुने ओळखून येतात. व्हेग कंप्लेंट्स सांगणारे, काहीतरी लपवून ठेवल्यासारखे 'शिफ्टी आईज' असलेले. अशा नमुन्यांना त्यांनी ठरवलेल्या आजारावर माझ्याकडून प्रिस्क्रिप्शन लिहून घ्यायचे असते. समजावून अशांना समजले नाही, तर मी त्यांना टाटा करतो. अन सांगतो, की मला डॉक्टरकीमधलं काही येत नाही. डायग्नोसिस तुम्ही केलंत, आता ट्रीटमेंटही गूगल पाहूनच करा. पुन्हा माझ्याकडे येऊ नका. तुम्ही अगदी सेकंड ओपिनियनसाठी आला असलात, तरी डॉक्टरला क्लियर तक्रार सांगा. सेकंड ओपिनियनसाठी आला असलात तर कृपया तसे आधीच सांगा. आधीच्या डॉक्टरांनी काय उपचार्/निदान केले, त्याचे कागद दाखवा. तसेच इंटरनेटवर तुम्ही काय शोधले तेही सांगा. तुमचा वेळ, पैसा, अन डॉक्टरांच्या मेंदूचा घसारा वाचेल. *** @ नेत्रेश
लोक टिव्ही व कार मॅकॅनिकवर सुध्धा विश्वास ठेवतात, पण डॉक्टरवर विश्वास ठेवायला कचरतात. डॉक्टर लोकांनी आत्मपरीक्षण करायची वेळ आली आहे (की निघुन चालली आहे)!
एक गम्मत सांगतो. कार मेकॅनिकने उदा. तुम्हाला मूळव्याधीचे औषध सांगितले तर तुमच्यासारखे अनेक लोक त्याच्यावर विसंबून ते औषध घेतात. तसेच, मी पेशंटला आजाराचे सोडून गाडी रिपेयरबद्दल किंवा काँप्युटरचे वगैरे अवांतर सल्ले दिलेत तर त्याच्यावर लोकांचा मेकॅनिकने/काँप्युटरवाल्याने सांगितल्यापेक्षा जास्त विश्वास बसतो. मुळातच आपल्या देशात, समोरचा आपल्याला फसवणारच आहे, प्लस 'त्याला काय कळतं' हा अ‍ॅटिट्यूड प्रचण्ड आहे. मी पेशंटला अमुक कर, किंवा तमुक करू नको, असे सांगितले, तरी शेजारीपाजारी/मित्र/रस्त्यावरचा तिर्‍हाईत त्याबद्दल त्याला सल्ले देतोच, अन त्या सल्ल्याची सुरुवातच 'डॉक्टरला काय कळतं?' अशी असते. हाईट म्हणजे ऑपरेशन करणारा मी, पण रिकामे सल्ले इतरांचे ऐकले जातात. खास करून जेवणं/खाणं, जखमेची स्वच्छता, औषधे दिलेल्या डोसमधे, व दिलेली सर्व घेणे वगैरे. बाकी कार मे़कॅनिकवर जास्त विश्वास ठेवण्याबद्दलच बोलायचं, तर मिपावरच पंक्चरवाले, झेरॉक्सवाले इ. इ. व्यावसायिक आपल्याला कसे फसवतात, त्याचे लय धागे आहेत. थोडक्यात, "लोक टिव्ही व कार मॅकॅनिकवर सुध्धा (आपल्या तब्येतीच्या तक्रारींसाठी) विश्वास ठेवतात, पण डॉक्टरवर विश्वास ठेवायला कचरतात." यात नवे काहीच नाही. तुमच्या आयुष्यात एकदाही तुम्ही डायरेक्ट मेडिकल स्टोअरवरून 'सर्दीची' गोळी, किंवा 'डोकेदुखीची' वा "गाडी लागण्याची' गोळी त्या पोर्‍याच्या अगाध ज्ञानावर विसंबून आणली नाही, असे झाले आहे का? तेव्हा, बघा. येता का आत्मपरिक्षण करायला ? ;)
  • Log in or register to post comments

हा अ‍ॅटिट्यूड प्रचण्ड आहे ...

नेत्रेश
Sun, 04/19/2015 - 14:33 नवीन
> मुळातच आपल्या देशात, समोरचा आपल्याला फसवणारच आहे, प्लस 'त्याला काय कळतं' हा अ‍ॅटिट्यूड प्रचण्ड आहे. गोपाळसाहेब, मुळात प्रश्न हा आहे की असे काय झाले की स्वतःच्या जीवाच्या आजारातही लोक डॉक्टरपेक्षा ईंटरनेट्कडे धाव घेतात, जेव्हा हेच लोक कार बिघडले तेव्हा सरळ मॅकॅनीक कडे घेउन जातात. मला वाटते नक्की काय झाले व डॉक्टर्सची विश्वासार्हता का लयाला गेली हे डॉक्टर्सनां पुर्ण ठाउक असावे. ती परत मीळवण्यासाठी काय करायला हवे ते ही त्यांना बरोबर माहीत असु शकते. पण ते अंमलात आणायची गरज त्यांना खरोखर वाटते का? आत्मपरीक्षण या गोष्टीचे व्हायला हवे. ते फक्त डॉक्टर लोकच करु शकतात - अर्थात ईच्छा असेल तर. मी काही सर्व डॉक्टर चोर आहेत असे म्हणत नाही. कीत्येक चांगले डॉक्टर्स भेटले आहेत. पण त्याच बरोबर भामटे सर्जनही भेटले आहेत - एकाच हाडाचे ३ वेळा ऑपरेशन करुन वर चौथ्या वेळी कमी पैशांत करतो असे सांगणारे. त्याबरोबर चौथ्या ऑपरेशनची गरज नाही हे सप्रमाण सांगणारे प्रामाणीक डॉक्टरही भेटले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

मूळव्याध बरीच जुनाट दिसतेय.

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 14:37 नवीन
जज ज्यूरी अन एक्झिक्युशनर बनून तुम्ही अमुक ट्रीटमेंट चुकीचीच असे डीक्लेअर करून टाकत असाल तर तुम्हाला लवकर गुण येवो अशी शुभेच्छा देतो. खुश रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

आरसा दा़खवल्यावर दुखावले गेलात का?

नेत्रेश
Sun, 04/19/2015 - 14:46 नवीन
आरशात पाहुन वाईट दीसत असेल तर स्वतःला सुधारणे हा उपाय आहे. विषयाला सोडुन खुप कडवट आणी पर्सनल लेवलवर प्रतीसाद देताय म्हणुन विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

महोदय,

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 19:25 नवीन
मी काही सर्व डॉक्टर चोर आहेत असे म्हणत नाही.
हे आपणच म्हणून पुढे
'सर्वच डॉक्टरांनी आत्मपरिक्षण करावे'
हा सल्ला देण्यात काही अर्थ आहे का? तुम्ही डॉक्टरांना उद्देशून जे काही लिहाल, ते मीही पर्सनलीच घेणार. विषय जालिय निदान व स्वतःच स्वतःची तपासणी हा असताना पहिला फाटा आपण फोडायचा, अन उलट उत्तर आले, की 'कडवट अन पर्सनल' अशी हाकाटी करायची याचे काय प्रयोजन आहे? याच उपचर्चेतला माझा पहिला प्रतिसाद वाचून काय उत्तर लिहिलेत आपण? तिथे मी तुमच्यावर कोणते वैयक्तिक आरोप केले होते? शिवाय खाली खरे साहेबांच्या प्रतिसादाखाली जे लिहिलं आहे, त्यातील फूटनोट लिहिली, तरीही एकदोन डॉक्टरांचा तुम्हाला आलेला वैयक्तिक अनुभव तुमच्या दृष्टीने सुखद नव्हता, म्हणून सर्वच डॉक्टर वाईट, असे जाहीर लेबल का लावताहात? गेल्या १५-२० दिवसांत असल्याच मानसिकतेतून डॉक्टर, दवाखान्यांवर हल्ले करण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. समाजाच्या वागणूकीबद्दल काहीच म्हणायचं नाहिये का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

'सर्वच डॉक्टरांनी आत्मपरिक्षण करावे ....

नेत्रेश
Sun, 04/19/2015 - 21:44 नवीन
> 'सर्वच डॉक्टरांनी आत्मपरिक्षण करावे' हा सल्ला देण्यात काही अर्थ आहे का? सर्वच डॉक्टर्सना आत्मपरीक्षणाचा सल्ला देण्याचे कारण म्हणजे: १. आपल्या समाजाचा मोठा हीस्सा हा अर्धशिक्षीत व अडाणी आहे. त्याला आत्मपरीक्षण म्हणजे काय हे सुद्धा माहीत असण्याची शक्यता नाही. तेव्हा सर्व समाजाने आत्मपरीक्षण करावे या वाक्याला फारसा अर्थ नाही. २. या समाजातील सर्व स्थराच्या लोकांमध्ये एकेकाळी डॉक्टर्स पद्दल अतीशय आदराची भावना होती. डॉक्टर्सनां देव मानण्याचा जमाना जाउन फार वर्षे झाली नाहीत. लोकांच्या मनातला हा विस्श्वास आधीच्या पिढीच्या डोक्टर्सनी खुप कष्टाने कमावला होता. पण आता समाज फारसा बदललेला नसताना लोकांच्या मनात एवढा अविश्वास निर्माण व्हावा की अर्धशिक्षीत लोक डॉक्टर्सनां मारझोड करण्यास प्रवृत्त व्हावेत आणी सुशीक्षीत लोकांना ईंटरनेट जास्त विश्वासार्ह वाटावे? हा बदल काही २ - ४ वाईट डॉक्टर्स मुळे नक्कीच झाला नाही. डॉक्टर्सकडुन या पेक्षा खुप जास्त प्रमाणात समाजातील सर्व स्थराच्या लोकांची फसवणुक झाली आहे. आणी अशा वाईट डॉक्टर्सच्या फसवणूकीचे परीणाम सर्वच डॉक्टर्सनां भोगावे लागत आहेत. आता समाजाविरुद्ध लढायचे की आपल्या व्यवसायात शीरलेल्या अपप्रवृत्तींविरुद्ध हे डॉक्टर्सनीच ठरवातचे आहे. आत्मपरीक्षण याच गोष्टीचे करायला हवे. ३. डॉक्टर्समधील वाईट प्रवृत्तीनां प्रतीबंध करायचे अधीकार डॉक्टर्सकडेच आहेत. त्यांना मेडीकल डीग्री व प्रॅक्टीसची परवानगी डॉक्टर्सच देतात. आपल्या व्यवसायाचे पावित्र्य व विश्वासार्हता जपण्याचे काम डॉक्टर्स स्वतः करु शकतात, एवधे अधीकार त्यांच्याकडे नक्कीच आहेत. प्रश्न ईच्छाशक्तीचा आहे. गोपाळसर, या प्रतिसादातले मुद्दे हे फक्त चर्चेसाठी मांडले आहेत. आपल्यावर वैयक्तीक कॉमेंट करायचा अजीबात हेतु नाही. सामान्यतः शाळेतल्या मुलांपेक्षा शिक्षका कडुन, व जसे एखाद्या कारकुनापेक्षा जिल्हाधीकार्‍याकडुन जास्त अपेक्षा असतात, तसेच अर्धशीक्षीत समाजापेक्षा उच्चशीक्षीत डॉक्टर्सकडुन जास्त अपेक्षा ठेवण्यात चुक आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

डॉक्टर्सकडुन या पेक्षा खुप

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 21:25 नवीन
डॉक्टर्सकडुन या पेक्षा खुप जास्त प्रमाणात समाजातील सर्व स्थराच्या लोकांची फसवणुक झाली आहे.
याबद्दल काही पुरावा, विदा, अथवा सत्यपरिस्थितीचे आकलन? की जस्ट उचलली जीभ अन लावली टाळ्याला? अन मारझोडीचा बिनडोकपणा आजकालचा नव्हे. मध्ययुगातही डॉक्टरने केलेले उपचार "चुकले" (म्हणजेच पेशंटला अपेक्षित "गुण" नाही आला) तर हातपाय तोडा वगैरे "शिक्षा" होत्या कायद्यात. जरा अभ्यास अन समाजात काय चाललं आहे त्याचा अभ्यास वाढवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

याबद्दल काही पुरावा, विदा, अथवा सत्यपरिस्थितीचे आकलन?

नेत्रेश
Sun, 04/19/2015 - 21:50 नवीन
डॉक्टर्सकडुन लोकांची फसवणुक आणी लुट होतच नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

ऑफ कोर्स मला तसेच म्हणायचे

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 22:59 नवीन
ऑफ कोर्स मला तसेच म्हणायचे आहे. खर्‍या डॉक्टरांकडून अजिब्बात लूट होत नाही. लूट करणारे क्वॅक्स असतात. उदा. खोट्या उपचारांसाठी बालाजीतांबे भरपूर पैसे मागतात, अन तुमच्यासारखे लोक देतात. डॉक्टर कशाला म्हणतात तेही समजत नाही अन सोशल मिडियावर असले विखारी प्रतिवाद करत बसतात.
३. डॉक्टर्समधील वाईट प्रवृत्तीनां प्रतीबंध करायचे अधीकार डॉक्टर्सकडेच आहेत. त्यांना मेडीकल डीग्री व प्रॅक्टीसची परवानगी डॉक्टर्सच देतात. आपल्या व्यवसायाचे पावित्र्य व विश्वासार्हता जपण्याचे काम डॉक्टर्स स्वतः करु शकतात, एवधे अधीकार त्यांच्याकडे नक्कीच आहेत. प्रश्न ईच्छाशक्तीचा आहे.
अत्यंत चुकीची माहीती. परवानगी, व डिग्री सरकार देते. एमसीआयवर तसेच एमएमसिवर डॉक्टर किती व नॉन डॉक्टर किती, याची माहिती कृपया घेणे. होमिओपथी, युनानी, सिद्ध इ. 'वैद्यकीय' डिग्र्या कोण देते, तेही शोधणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

खर्‍या डॉक्टरांकडून अजिब्बात लूट होत नाही

नेत्रेश
Mon, 04/20/2015 - 02:21 नवीन
> खर्‍या डॉक्टरांकडून अजिब्बात लूट होत नाही मग याच लॉजीकने खर्‍या डॉकटरांचे लोक सर्व काही ऐकतात, त्यांच्या उपचाराविषई कधीही शंका घेतली जात नाही. खर्‍या डॉक्टर्सना कधीही पब्लिक कडुन मार पडत नाही. त्यांना लोक देव मानतात. > लूट करणारे क्वॅक्स असतात मग लोकांकडुन मार खाणारेही क्वॅक्स असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

वेगळ्या मुद्द्यासाठी वेगळा प्रतिसाद.

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 21:28 नवीन
१. आपल्या समाजाचा मोठा हीस्सा हा अर्धशिक्षीत व अडाणी आहे. त्याला आत्मपरीक्षण म्हणजे काय हे सुद्धा माहीत असण्याची शक्यता नाही. तेव्हा सर्व समाजाने आत्मपरीक्षण करावे या वाक्याला फारसा अर्थ नाही.
१. समाज अर्धशिक्षित व अडाणी असणे हा डॉक्टरचा दोष कसा काय? २. आत्मपरिक्षण म्हणजे काय ते शाळेत शिकवतात का? ३. शाळेत गेला नाही म्हणजे बिनडोक असतो का? शाळा गेल्या शेदोनशे वर्षांत आल्या. त्याआधीचे सगळेच लोक अडाणी बिनडोक वगैरे होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

त्याआधीचे सगळेच लोक अडाणी बिनडोक वगैरे होते का?

नेत्रेश
Sun, 04/19/2015 - 21:48 नवीन
ते कसे होते ते मला माहीत नाही. पण वैद्य सेवाभावी नक्कीच असवेत. निदान लोकांना लुटणारे तरी नसावेत. म्हणुनच त्यांना त्या वेळी देवासारखा मान होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अहो विक्रमादित्य,

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 21:53 नवीन
कसला बोडक्याचा देवासारखा मान?
अन मारझोडीचा बिनडोकपणा आजकालचा नव्हे. मध्ययुगातही डॉक्टरने केलेले उपचार "चुकले" (म्हणजेच पेशंटला अपेक्षित "गुण" नाही आला) तर हातपाय तोडा वगैरे "शिक्षा" होत्या कायद्यात
. ज हे वाचलेत का आपण? की विक्रमादित्याने त्याचा हट्ट सोडला नाही. तो पुन्हा स्मशानात गेला अन प्रेत खांद्यावर घेऊन चालू लागला, असा तुमचा बाणा आहे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

मध्ययुगातही डॉक्टरने केलेले उपचार

नेत्रेश
Sun, 04/19/2015 - 22:07 नवीन
> मध्ययुगातही डॉक्टरने केलेले उपचार "चुकले" (म्हणजेच पेशंटला अपेक्षित "गुण" नाही आला) तर हातपाय तोडा वगैरे "शिक्षा" होत्या कायद्यात. मध्ययुगातील कायदा, त्या वेळची परीस्थीती, उपचार चुकले म्हणजे कीती चुकले? सामन्य मानसावरचे उपचार चुकले तर राजा वैद्याचे हात पाय तोडत होता का? की सगळा गावच मिळुन वैद्याचे हात पाय तोडत होत? त्या नंतर ते दुसरा वैद्य कुठुन आणत होते, ईत्यादी विषयी काही माहीती नसल्यामुळे मी उत्तर द्यायला असमर्थ आहे. पण त्या मध्ययुगीन कायद्याचे डॉक्युमेंट कुठे ईंटरनेटवर असेल तर अभ्यास करुन जरुर उत्तर देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

विक्रमादित्य महोदया,

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 22:47 नवीन
देवाने आपल्याला दुसरे काही दिलेले नसले, तरी गूगल आहे. मध्ययुग, डॉक्टर, इ. शब्द वापरा की. की तेही मीच आणून देऊ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

मला तरी हे शब्द शोधुन

नेत्रेश
Mon, 04/20/2015 - 02:45 नवीन
मला तरी हे शब्द शोधुन काही मध्ययुगीन कायद्याचा मसुदा सापडला नाही. आपण मध्ययुगीन डॉक्टर्स विशयी वाचलेली माहीती कीती विश्वासार्ह आहे हा प्रश्नच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

पण वैद्य सेवाभावी नक्कीच

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 21:55 नवीन
पण वैद्य सेवाभावी नक्कीच असवेत.पण वैद्य सेवाभावी नक्कीच असवेत.
सेवाभावी म्हणजे काय? फुकट ट्रीटमेंट देणारे? की तुमचे 'सेवक' असल्यासारखे वागणारे? साहेब, डॉक्टर वैद्यकीय 'सेवा' देतो. तो तुमचा 'सेवक' नाही. जसे, सैनिक, राष्ट्राची 'सेवा' करतो. त्याला सांगा जाऊन सेवकासारखे वागायला? बघू काय होतं ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

सेवाभावी म्हणजे काय?

नेत्रेश
Sun, 04/19/2015 - 22:22 नवीन
सेवाभावी म्हणजे रोग्याच्या पैशांकडे न बघता रोगाकडे बघुन उपचार करणारे असे म्हणायचे आहे. (फुकट उपचार करणारे नव्हे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

म्हणजे नक्की कसं? रोगाकडे न

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 22:46 नवीन
म्हणजे नक्की कसं? रोगाकडे न बघता उपचार कसा काय करता येतो हो विक्रमादित्य साहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

रोगाकडे न बघता उपचार करावे असे कधी/कुठे लिहीले आहे?

नेत्रेश
Mon, 04/20/2015 - 01:02 नवीन
> "म्हणजे नक्की कसं? रोगाकडे न बघता उपचार कसा काय करता येतो हो विक्रमादित्य साहेब?" सेवाभावीची व्याख्या परत एकद वाचावी. उत्तर द्ययची घाई करु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अर्धशिक्षीत लोक??

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 21:35 नवीन
अर्धशिक्षीत लोक डॉक्टर्सनां मारझोड करण्यास प्रवृत्त व्हावेत
<< परवा पनवेलला मारहाण करणारा आयटी इंजिनियर होता बर्का साहेब. इंजिनियर्स अर्धशिक्षीत असतात का? हे टाइम्समधल्या बातमीचे कात्रणः
Hospital authorities said that Thakkur was admitted under the ESI scheme in March. Earlier, she was treated for paralysis and was discharged. Following this, she underwent Ayurvedic treatment for some time that led to complications. She suffered from diabetes and high blood pressure and died due to complications, they added.
ही बातमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

पुर्ण बातमी समजली नाही

नेत्रेश
Sun, 04/19/2015 - 22:24 नवीन
पण आयुर्वेदीक डॉक्टरने चुकीचे उपचार करुन गुंतागुंत वाढवली असे समजले. आता या आयुर्वेदीक डॉक्टरला प्रॅक्टीसची परवानगी देणारेही डॉक्टर्सच होते ना? तसेच या पेशंटला डॉक्टर बदलुन आयुर्वेदीक डॉक्टरकडे जावेसे का वाटले (की भाग पडले) हे सुद्धा समजले नाही. पण आता उच्चशीक्षीत लोकांनाही डॉक्टरवर हात उचलणे हा गुन्हा आहे हे माहीत असुनही तसे करावेसे वाटते हेच डॉक्टर्सनां आत्मपरीक्षणासाठी उद्युक्त होण्यास पुरेसे नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

पण आता उच्चशीक्षीत लोकांनाही

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 23:03 नवीन
पण आता उच्चशीक्षीत लोकांनाही डॉक्टरवर हात उचलणे हा गुन्हा आहे हे माहीत असुनही तसे करावेसे वाटते हेच डॉक्टर्सनां आत्मपरीक्षणासाठी उद्युक्त होण्यास पुरेसे नाही का?
हास्यास्पद प्रतिवाद करू नका. कुणाला डान्सबारमधे जावेसे का वाटते? दारू प्यावीशी का वाटते? किंवा कसाबला बंदूक घेऊन गोळ्या झाडाव्या का वाटतात? याचे उत्तर त्या व्यक्तीचा मानसिक आजार हे नसून डॉक्टरचा दोष आहे, हे कसे काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

अन हो.

आनंदी गोपाळ
Sun, 04/19/2015 - 23:05 नवीन
अन हो. पूर्ण बातमी समजली नाही, हा तुमचा दोष आहे. ती बातमी शोधा, पूर्ण अभ्यास करा, मग नंतर डॉक्टर जमातीला घाऊक लेबले लावत फिरा. मी वरतीच म्हटलंय की जज ज्यूरी अन एक्झिक्युशनर तुम्हीच झाला आहात. अतिअवांतर करूनही तुमचं तेच तुणतुणं सुरू आहे. मी लेखनसीमा म्हणूनही प्रतिवाद सुरूच आहेत. बघू कोण किती उत्तर देऊ शकतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

अर्धवट ज्ञान कधीहि धोकादायकच!

पॉइंट ब्लँक
Sun, 04/19/2015 - 09:47 नवीन
अर्धवट ज्ञान कधीहि धोकादायकच! बाकी मांडणी छान.
  • Log in or register to post comments

आई शप्पथ!!

स्पंदना
Sun, 04/19/2015 - 10:27 नवीन
आई शप्पथ!! नेटवर आजार वाचुन स्वतःला होण्याचाच (म्हणजे आपल्याला ती लक्षणे आहेतच अस समजून घेण्याचा) आजार आहे. ;) डॉक्टर तुम्ही सरळ योग्य शबदात सांगुन शंका निरसन केले ते योग्यच झाले.
  • Log in or register to post comments

सही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/19/2015 - 10:29 नवीन
लै भारी हं डॉक्टर साहेब, अनुभव आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेख आवडला...

मुक्त विहारि
Sun, 04/19/2015 - 10:39 नवीन
"माहिती आणि शहाणपण यात फरक करायला आपण शिकले पाहिजे. टोमाटो हे फळ आहे हि "माहिती" आहे पण ते फ्रुट सॅलड मध्ये घालू नये हे "शहाणपण" आहे." टाळ्या...
  • Log in or register to post comments

मस्त डाॅक

स्पा
Sun, 04/19/2015 - 10:45 नवीन
मस्त डाॅक मी ही या भानगडीत काही काळ अडकलेलो होतो, णेट वरचे वाचून स्वताच डाॅक्टर बनलेलो अर्धा अधिक, मग काही महिन्यांनी उपरती झाली आणि ही फालतुगिरि सोडून दिली :)
  • Log in or register to post comments

अश्या मुलांच्या पालकांचा

टवाळ कार्टा
Sun, 04/19/2015 - 11:22 नवीन
अश्या मुलांच्या पालकांचा सत्कार केला पाहिजे ;)
  • Log in or register to post comments

आधा हकिम खत्रे पचास

मार्मिक गोडसे
Sun, 04/19/2015 - 12:18 नवीन
हे ज्याला समजते तो नुसत्या आंजावरील माहितीवर विसंबून राहू शकत नाही. आंजाप्रमाने टीव्हीवरही अनेक आजारांची वैद्यकीय तज्ञामार्फत माहीती मिळत असते. त्या माहितीचा उपयोग कसा कारावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. 'द लँसेट' सारखे वैद्यकीय संशोधनाची माहीती असलेले मॅगेझिन वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना उपयोगी पडू शकत असेल. मुठ्भर मुर्खांमूळे अशा माहीतीवर बंदी आणने योग्य वाटत नाही. उलट आंजावरील माहितीमुळे आमच्या सारख्या सर्वसामान्यांना मेडिकल टर्मिनॉलॉजी कळण्यास मदत होते, उदा. क्लॉट. हेमोरेज,स्पॅझम ई.
  • Log in or register to post comments

अंतर्जाला वरील माहिती हि

सुबोध खरे
Sun, 04/19/2015 - 12:53 नवीन
अंतर्जाला वरील माहिती हि नक्कीच उपयुक्त आहे परंतु त्या माहितीच्या आधारावर आपण रोगनिदान करायला जाऊ नये. उदा जालावर सर्व कायद्यांची माहिती आहेच परंतु ती माहिती वापरून आपण वकिली करू शकू का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे आवश्यक आहे. पण आपल्याला रोग निदान नक्की झाल्यावर कोणता आजार आहे त्यावर कोणते पथ्य पाळावे काय आहार विहार उपयुक्त ठरेल इ माहितीचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. उदा.आपल्याला सोरीयासीस किंवा दमा हा आजार असेल तर तो आजार कोणत्या गोष्टीने वाढू शकतो किंवा कोणती पथ्ये पाळली असता तो कमी होऊ शकतो. आपण घेत असलेलीं औषधे त्यांचा प्रभाव आणि त्याचा साईड इफेक्ट या सर्व गोष्टींचे ज्ञान आपण मिळवू शकतो. आणि यांनतर येणाऱ्या शंकांचे निरसन आपण आपल्या डॉक्टरांकडून करून घेऊ शकतो. पण मुळात डॉक्टर ना काही कळत नाही पासून प्रत्येक डॉक्टर लुटायलाच बसलेला आहे या मनोवृत्तीने चालणार्या माणसाला जालीय माहिती अजूनच गोंधळात टाकू शकते आणि मग इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीत हि माणसे kwack च्या नादाला लागतात. काल माझ्या भावाचा वर्गमित्र माझ्याकडे आला होता. त्याला पार्किंसोनिझम ( कम्पवायू) हा आजार झाला आहे. त्यावर त्याने प्रथम के इ एम रुग्णालयातील मेंदू विकार तज्ञाचे मत घेतले त्यानंतर मुलुंडच्या मेंदू विकार तज्ञाचे मत घेतले दोघांनी त्याला सिंडोपा हेच औषध लिहून दिलेले आहे. त्यावर त्याने तिसर्या kwack चे मत घेतले. या तिसर्या शहाण्याने तुम्हाला औषध उष्ण पडते आहे हे सांगितले. यावर याने ते औषध अर्धवट तर्हेने घेण्यास सुरुवात केली. यामुळे त्याचा आजार काही आटोक्यात येईना. तीन महिने हा कामावर गेलेला नाही कारण सरकारी आस्थापनात( महापालिकेत) हा विद्युत विभागात कामाला आहे तेथे उजव्या हाताला कम्पवायू असल्याने त्याला काम करता येत नाही. सरकारी नोकरी असल्याने अजून त्याला कामावरून काढून टाकलेले नाही. त्याचे दोन मित्र ( हे पण माझ्या भावाचे वर्ग मित्र असल्याने माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत) त्याला घेऊन काळ माझ्याकडे आले होते. मी त्याला स्व्च्छ आणि परखड शब्दात सांगितले. औषध उष्ण पडले तरी हरकत नाही.साले पाले लावून काहीहि होणार नाही. तुझ्या मेंदूत डोपा (DOPA dihydroxy phenyl alanine) हे द्रव्य तयार होत नाही म्हणून तुला हे बाहेरून द्यावे लागत आहे. जसे मधुमेहात इंस्युलीन तयार होत नसले कि बाहेरून ते वाढवण्याची औषधे द्यावी लागतात किंवा इंस्युलीनचे इंजेक्शन द्यावे लागते तसे हे औषध तुला आयुष्यभर घ्यावे लागेल. चालढकल चालणार नाही. सरकारी नोकरीत आहेस म्हणून अजून नोकरी टिकून आहे अन्यथा केंव्हाच डच्चू मिळाला असता. तेंव्हा हे विंडो शॉपिंग बंद कर आणि औषधे वेळेत घे अन्यथा आजार बरा होणार नाही. हा मित्र मला आम्ही शाळेत असल्यापासून ओळखत असल्यामुळे आणि यात कोणताही आर्थिक व्यवहार नसल्यामुळे तो औषधे व्यवस्थितपणे घेईल असे वाटते. मुळ प्रश्न हाच आहे कि तुमचा कुणावरच विश्वास राहिलेला नाही तर तुम्ही जाणार कुणाकडे? पूर्वी तुमचे फ्यामिली डॉक्टर होते. पण आता सर्व जणांना स्पेशालीस्ट कडे जायचे असते आणि फक्त सर्टीफिकेट साठी फ्यामिली डॉक्टर हवा आहे यामुळेच हि जमात नामशेष झाली आहे. त्यामुळे केवळ डॉक्टरनी नव्हे तर समाजानेच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. we are neither forward nor backward but just awkward
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा