Skip to main content

संस्कृत सुभाषिते

लेखक शरद यांनी शनिवार, 21/03/2015 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून काही संस्कृत सुभाषितांचा परिचय करून देण्याचा विचार आहे. घाबरू नका. ही शाळेत शिकलात तशी "नीतीशतका"तील उपदेशात्मक नसतील. आपले मनोरंजन नक्कीच करतील याचा भरोसा देतो. मागे आपण आदीमाता व शिवशंभू यातील संवाद पाहिला होता (आठवत नाही ? ह्ररकत नाही. ही लिन्क http://www.misalpav.com/node/24338) त्यांच्याच संसारातील एक पर्व. शंकराने हालाहल कां प्राशन केले ? एक शक्यता अत्तुं वाञ्छति वाहनं गणपतेराखुं क्षुधार्त: फणी तं च् क्रौञ्चपते:शिखौ; स गिरिजासिंहोऽपि नागाननम् !! गौरी जन्हुसुतामसूयति कलानाथं कपालानलो निर्विण्ण:स पपौ कुटुम्बकलहादीशोऽपि हालाहलम् !! शंकराच्या गळ्यातला भुकेला नाग गणपतीचे वाहन असलेल्या उंदराला खाऊं इच्छित आहे. पण नागाचेही काय खरे नाही. कार्तीकेयाचे वाहन जो मोर तो नागाला गिळंकृत करावयास टपलेला आहेच. पार्वतीचे वाहन सिंह, त्याचे लक्ष गणपतीचे डोके असलेल्या हत्तीकडेच लागलेले. पार्वती गंगेचा मत्सर करत आहे तर कपाळावरचा अग्नी चंद्राचा ! बोला. असल्या गृहकलहाला वैतागलेला "महादेव" हालाहल पिणार नाही तर काय करणार ? कवींनी आदीमातेला काशीपुराधिश्वरी का केले ? तिची प्रार्थना करतांना "भिक्षां देही कृपावलंबन करि माताअन्नपूर्णेश्वरी" असे कां म्हटले ? अगदी साधे कारण. त्यांनी शंकराच्या घरांत डोकावून पाहिले, काय दिसले तेथे ? स्वयं पंञ्चमुख: पुत्रौ गजाननषडाननौ दिगंबर: कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे ? !! घरांत खाणारी तोंडेच जास्त हो. स्वत: घरधनी पंचमुखी, दोन मुले; त्यातील एकाला तोंड हत्तीचे तर दुसर्‍याला सहा तोंडे आणि त्यात भर घालावयाला हा गृहस्थ दिगंबर ! आता घरात "अन्नपूर्णा" आहे म्हणूनच संसार चालला आहे नां !! शंकराचा निवास पृथ्वीवर. तेव्हा कवींनी त्याच्या घरांत जास्त वेळा डोकवावे हे उचितच पण म्हणून क्षीरसागरातील विष्णूची सुटका झाली असे समजू नका. जगन्नाथपुरीच्या देवळातील विष्णूची मूर्ति लाकडाची आहे. का बरे ? उत्तर कवींकडेच मिळणार एका भार्या प्रकृतिमुखरा चञ्चला च द्वितीया पुत्रस्त्वेको भुवनविजयी मन्मथो दुर्निवार: !! शेष: शय्या शयनमुदधौ वाहन: पन्नगारि: स्मारं स्मारं स्वगृहचरितं दारूभुतो मुरारि: !! या "वैभवभूषित वैकुंठेश्वर" गृहस्थांचेही हाल काही कमी दिसत नाहीत. एक बायको, सरस्वती, ती बडबडी, दुसरी लक्ष्मी, ती चंचल. एक मुलगा, मदन, तो सर्व जगाला जिंकण्याचा उपद्व्याप करीत बसलेला, झोपायाला शय्या कसली ? ती शेष नागाची, शयनमंदिर म्हणजे समुद्र व वाहन नागांचा शत्रु गरुड ! हे ग्रुहसौख्य आठवून आठवून विष्णूने "काष्टवत" होणेच पत्करले. त्रिखंडात कोठेही जा (बिचार्‍या) नवर्‍याचे नशिव साले फुटकेच. असो या घ्ररच्या कटकटींना जरा बाजूला ठेवून जरा हलकेफुलके बघु या. मराठीत छेकापन्हुतीवरच्या लेखावरील (http://www.misalpav.com/node/15896 ) प्रतिसादात श्री बॅटमन यांनी संस्कृतमधील उदाहरणाबद्दल विचारले होते. आज एक उदाहरण देतो. बदल म्हणून कै.ल.गो.विंझे यांनी केलेला काव्यानुवाद देत आहे. या पाणिग्रहलालिता, सुसरला, तन्वी, सुवंशोद्भवा गौरी, स्पर्शसुखावहा, गुणवती, नित्यं मनोहारिणी !! सा केनापि हता; तया विरहितो गन्तुं न शक्तोऽस्म्यहं रे भिक्षो ! तव कामिनी ? न हि न हि ! प्राणप्रिया यष्टिका! !! "जी हस्ते कुरवाळिली,सरल जी तन्वी सुवंशातली गौरी, अन् गुणवान्, मनोहर सुखस्पर्शा सदा लाभली नेली ती कुणिशी ! तिच्याविण न मी जाऊं शके सत्वर !" "कां भिक्षो ! तव कामिनी ?" " नच तसें, काठी प्रिया सुंदर !" ( या वेळी संस्कृत शब्दांचे अर्थ दिलेले नाहीत. गरज आहे कां?) आज इथेच थांबू. शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32432
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

अशाच अर्थाचं एक सुभाषित होतं त्याची फक्त आता एकच ओळ आठवतेय. राक्षसेभ्यः सुतां हृत्वा जनकस्य पुरीं गत:। आता वरवर वाचता राक्षसांकडून(?) कन्या आणण्यासाठी जनकाच्या नगरीस गेला (?). पण राक्षसेभ्य: हा शब्द राक्षसानाम् इभ्य: (राक्षसांचा राजा (इभ्यः)) आहे हे लक्षात आल्यावर खरा अर्थ उघड होतो.

लेख आणि प्रतिसाद , दोन्ही उत्तम... वाखूसा

तारतारतरैरेतैरुत्तरोत्तरतो रुतै: रतार्ता तित्तिरी रौति तीरेतीरे तरौतरौ॥ : रतार्त तित्तिरी (टिटवी) उत्तरोत्तर वाढत जाणार्‍या स्वरात या तीरावरुन त्या तीरावर, या तरुवरुन त्या तरुवर रडत/ओरडत (फिरते) आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकदम तारारिरी आहे. मस्तं!

In reply to by साती

:))

In reply to by साती

:))

यथा काष्ठम च काष्ठम च, समेयाताम महोदधौ समेत्य च व्यपेयाताम, तद्वत़ भूत समागमः मला सुभाषित पाठ होतं पण लिहीताना बरोबर आहे की नाही ते कळेना. म्हणून मग आंजावर उचकापाचक करून नीट शुद्धलेखनात लिहीलंय, तरी चूक असेल तर सांगा :) गदीमांनी फार् सूंदर भाषांतर केलंय याचं गीत रामायणात: दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

:) माझा जरा उलटा प्रवास झाला या सुभाषिताचा. गीतरामायणाने झपाटून टाकलं होतं तेंव्हा एकदा हे सुभाषित वाचलं त्या संदर्भात आणि इतकं अप्रतिम भाषांतर त्याचं की ते कडवं आणि सुभाषित आता एकत्रच ल़क्षात आहेत.

लेख आणि प्रतिसाद वाचून भाषांसु मुख्या मधुरा - दिव्या गिर्वाणभारती तस्मात् ही काव्यम् मधुरम् - तस्मादपि सुभाषितम् हे मनापासून पटले आहे .

नववी दहावीत पूर्ण संस्कृत घेऊनही फारसं न झेपल्यानं थेट संस्कृत कळलं नाही पण मराठी भाषांतरं वाचून मनोरंजन झालं ठंठठंठठंठंठठठंठठंठः - दहावीत शिकलेल्या एका श्लोकाचा हा शेवट मात्र चांगला लक्षात आहे :-) .

आमचे आवडते सुभाषित अजरामरवत्प्राज्ञो विद्यामर्थं च चिन्तयेत् । गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ॥ हे शाळेचे घ्होष वाक्य होते ! तेव्ह्हा काही शष्प कळाला नाही अर्थ .... आता जेव्हा विद्या अर्थार्जन चालु आहे आणि धर्माचा अभ्यास आचरण चालु आहे तेव्हा कोठे अर्थ गवसायला लागलाय :)

कस्तुरी जायते कस्मात् ? को हन्ति करिणाम् शतम्? भीरु: करोति किं युद्धे? मृगात् सिंहः पलायते॥ 'मृगात् सिंहः पलायते॥' हे वाचून अर्थ लागतो की हरिण सिंहाला पळवून लावते (हरणापासून सिंह (दूर)पळतो). पण समस्यापूर्तीच्या या सुभाषिताचे पहिले तीन चरण कवीने असे काही रचलेत की त्या तीन प्रश्नाची उत्तरं शेवटच्या चरणात मिळतात. कस्तुरी जायते कस्मात् ? : मृगात् (कस्तुरी कशापासून मिळते? : हरणापासून) को हन्ति करिणाम् शतम्? : सिंहः (शंभर हत्तींना कोण मारतो? : सिंह) भीरु: करोति किं युद्धे? : पलायते (भित्रा माणूस युद्धात काय करतो? : पळतो)

इतक्या अवघड सांकेतिक भाषेत लिहिलेल्या आणि शेवटची ओळ वास्तवाला धरून नसलेल्या रचनेला सुभाषित का म्हणावे असा प्रश्न पडला आहे.

In reply to by रमेश आठवले

मराठीत आपण ज्याला "धक्कागीत्त" म्हणू अशा प्रकारच्या अनेक गीत प्रकारांना चिर, विचित्र, शब्दवैचित्र, समस्या, अपन्हुति, प्रहेलिका (उखाणे) इत्यादी संस्कृत भाषेत पहिल्यापासून स्थान आहे. हे फार वरच्या दर्जाचे काव्य नाही. पण आपण तरी मराठीत ज्ञानेश्वरी, किंवा एकनाथी भागवत एवढेच वाचतो की "चारोळ्या"चाही आनंद घेतो ? या प्रकारात एखादे विसंगत वाटणारे विधान तिसरी ओळ म्हणून दिल्यावर तुमची काव्यप्रतिभा, शब्द सामर्थ्य पणाला लावून तुम्ही पहिल्या सुसंगत अशा ओळी रचता हरिणापासून सिंह पळतो या हास्यास्पद वाटणार्‍या ओळीचे त्याने तीन प्रष्नांची उत्तरे म्हणून चौथी ओळ दिली. गंमत ! आणखी एक उदा."तक्रं शक्रस्य दुर्लभं " इंद्राला ताक दुर्लभ ? कसे शक्य आहे ? याचे उत्तर कोण देतो/ते बघू. एक मान्य यांना सुभाषित म्हणणे जरा ओढाताणच. शरद’

In reply to by शरद

आपला लेख आवडला. शाळेत संस्कृत होते. ही भाषाआजी आवडे. पण व्याकरणाच्यामुळे दुरावा आला. खूप जमलं नाही आमचं. मराठी मायभाषेतील अनुवादित संस्कृत हा संस्कृतशी जोडणारा सेतु माझ्यासारख्यांसाठी अतिउपयोगी आहे. आता हे वरील प्रश्नाचे उत्तर खाली देते आहे. तेव्हा शाळकरी वयात फार फार मजेशीर वाटले होते हे तीन प्रश्नांचे उत्तर. भोजनान्ते च किं पेयं (?) जयन्तः कस्य वै सुतः (?) । कथं विष्णुपदं प्रोक्तं (?) तक्रं शक्रस्य दुर्लभं ॥