Skip to main content

दावणगिरी लोणी स्पंज डोसा

लेखक बाळ सप्रे यांनी गुरुवार, 20/06/2013 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल पुण्यात बर्‍याच ठिकाणी "दावणगिरी लोणी स्पंज डोसा" असे बोर्ड पहायला मिळतात. पण गंमत अशी की हे सर्व टपरी/गाडीवालेच असतात. एखाद्या चांगल्या होटेलमध्ये अजुनही हा प्रकार मेनुमध्ये मला दिसला नाहीये. पण डोसा मात्र असतो अफलातून. आणि टपरी/गाडीवर खाणे मला फारसं आवडत नाही, म्हणून घरी करुन बघायचा ठरला. आंतरजालावरून ३-४ ठिकाणी मिळालेल्या पाककृतींच्या आधारावर घरी करुन बघायचा घाट घातला. आणि आश्चर्य म्हणजे कुठेतरी वाचून केलेला हा प्रकार कधी नव्हे तो खूपच यशस्वी ठरला. इतका की मिपावर शेअर केल्याशिवाय राहवेना.. साहित्य- १/२ वाटी साबुदाणे १/२ वाटी उडिद डाळ १ वाटी जाडे पोहे ४ वाट्या तांदूळ १५-२० मेथीचे दाणे हे प्रमाण साधारण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरते. कृती- हे सर्व कमित कमी ५ तास भिजत ठेवणे. नंतर मिक्सरमध्ये एकदम बाsssरीक वाटून घेणे. जराही रवाळ रहाता नये. त्यात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा व मीठ घालून ढवळून उबदार जागेत रात्रभर ठेवणे. Batter डोसा करण्यापूर्वी यात थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे. Batter 2 इतके पातळ की तव्यावर ओतल्यावर २-३mm जाड आपोआत पसरले जाईल. वरुन वाटीने पसरावे लागता नये. नाहीतर टेक्श्चर नीट येत नाही. डोसा तव्यावर घालताना तवा खूप तापलेला असु नये. अन्यथा डोसा नीट पसरत नाही. डोसा घातल्यावर लगेच गॅस मोठा करावा. Dosa1 डोसा सुकत आल्यावर वरुन लोणी घालावे. शक्यतो पांढरे लोणी वापरावे. Dosa2 वरील बाजू पूर्ण सुकल्यावर एकदाच डोसा उलटावा. मागील बाजूला असा रंग व टेक्श्चर दिसेल. Dosa3 लगेचच डोसा काढुन चटणी/सांबार याबरोबर सर्व्ह करावा. Dosa4 Dosa5

वाचने 95116
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

मी ही घातलं भिजत धान्य! त्रास आहे हा!!!

आज पुन्हा हा दोसा केला. पद्माकर टिल्लू यांनी सुचवल्याप्रमाणे पिठात सोडा न घालता तांदूळ वाटतानाच शिजलेला भात पाव वाटी घातला आणि पीठ मस्त फुलून आले. श्री. टिल्लू यांचे आभार.

कालच केला द्रोणागिरी डोसा .पिठात संजिवनी टाकल्यागत फुगले म्हणून सौ०कंजूसकडून "झाला हं तुमचा द्रोणागिरी "असं नामकरण झाले .आमच्या घरातले सर्वजण खुश आहेत .पीठ आंबून त्याचा राजाबाई टॉवर झाला पण अगोदरच खाली परात ठेवलेली होती .पुढचा त्रास वाचला . टिव्हीवरच्या कार्यक्रमातल्या पाकृ बऱ्याच वेळा खोट्या असतात . वरच्या सर्व फोटोंसारखेच डोसे झाले .

पण शेवटचा फाडलेला डोश्याचा फोटो पाहिला आणि कळले वेगळे प्रकरण आहे. मग रेसिपीत पीठही वेगळ निघाले, कधी ऐकले पाहिले नव्हते हे, स्साला मी तर करून बघतो असेही बोलू शकत नाही, अरे मुंबईत हे कुठे मिळतील कोणी सांगेल का? दक्षिण मुंबई वा नवी मुंबई वाशीजवळ कुठे असतील तर आणखी सोयीचे पडेल.

मी रेवाक्का बरोबरच बनवला होता हा डोसा. घरात कोणालाच माहीत नाही. त्यामुळे मी एकदम फुल्ल शायनिंग मारत केला. मस्त झाला अन सगळ्यांना आवडला. फोटो टाकू शकत नाही कारण मी रात्री बाहेरुन येउन करेपर्यंत फार वेळ झाला होता.

मातब्बर लोकांनी बनवल्यावर आता मला पण बनवुन बघीतलाच रादर खाल्लाच पाहिजे.

मी एकदा करुन झाला आहे इथले वाचुन.. पण घरात कोणी फोटो काढेपर्यंत दम धरत नाहीत. अक्षरशः तुटुन पडलेत या डोशांवर. आभार.. इतर कोणाची मदत न घेता मी केलेली आयुष्यातली पहिली रेसेपी. अज्जीबात फसली नाही. आज पुन्हा ऑन डिमांड पीठ आंबवायला टाकले आहे. आज शक्य झाले तर फोटो नक्की टाकेल. त.टि.: मला सोडा वापरायचा नव्हता म्हणुन मी वर कोणीतरी सांगितल्याप्रमाणे २ वाटी उडीद डाळ घेऊन केलेले. सेम झाले.

पाकृबरहुकूम डोसा बनवून पाहिला आणि अप्रतिम झाला! अगदी सप्रे यांनी दिलेल्या फोटोतल्यासारखा ;) नवरेबुवा अगदी फिदा झाले... डोश्यांवर!

बायको न पिडल rao reciepe हीच पाहिजे म्हणून.... उद्या आमच्या कडे आहेत... कोण येणार का खराडी ला?

डोसा स्पाँजी व्हायसाठीची एक ट्रीक सांगतो. पीठामधे थोडं लोणी घालायचं. तव्यावर तेल पसरुन झाल्यावर वाटीनी जवळुन पीठ ओतायच्या ऐवजी दोन एक फुटावरुन ओतायचं आणि लगेचं पसरायचं. साध्या पद्धतीपेक्षा बरीचं जास्तं जाळी पडते डोश्यामधे. (हौशी शेफ) अनिरुद्ध दातार

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लगेचं पसरायचं.
या डोशासाठी पसरायचं नाही, फोटोत दाखवल्यासारखा स्पॉन्जी होत नाही तो.ओततानाच पीठ गोलाकार पसरत जाईल असं ओतायचं, वाटी पेल्याने पसरवलास हा डोसा की संपलं!!

हा धागा वर आला म्हणजे दुसर्‍या दिवशी हा डोसा झालाच पाहिजे. आताच साहित्य भिजत घालते.