✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घर- घर

च
चिनार यांनी
Mon, 01/05/2015 - 12:14  ·  लेख
लेख
गेल्या काही दिवसांपासून स्वत:साठी घर शोधण्याची मोहीम सुरु आहे. आजकाल घराला 'Flat' असे म्हणतात. पुण्यासारख्या शहरात जर Flat बुक केला असेल तरच त्या माणसाने आयुष्यात काहीतरी मिळवलय असे मानले जाते. कारण भेटणारा प्रत्येक दुसरा माणुस तुम्हाला ' काय, कसे सुरु आहे? ' हे विचारून झाल्यावर 'काय Flat वगैरे बूक केला कि नाही अजुन? 'असा प्रश्न विचारून जातोच.आणि त्याचे उत्तर जर 'हो' असेल तर पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला काहीही अर्थ उरत नाही. Flat घेतल्यावर माणसाचे 'बरं चाललंय ' हे उत्तर खरं असुच शकत नाही. तो बिचारा ईएमआय आणि डाउन पेमेण्ट या 2 शब्दान्नी पुरता मेटाकुटीला आलेला असतो. जवळपास 20 वर्षांच्या कालावधीनंतर भेटलेल्या एका नातेवाईकाने मला वरील प्रश्न विचारला, त्यावर 'नाही' असे उत्तर ऐकल्यावर ते म्हणाले , "अरे काय अजून किती दिवस भाड्याच्या घरात रहाणार? करा काहीतरी ! " त्यांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या डोक्यात आलेला सगळ्यात पहिला विचार म्हणजे," मी म्हशीच्या गोठ्यात जरी राहीलो तरी ह्याच्या बापाचं काय जाते? " ते गृहस्थ अजूनही गावात वडिलोपार्जित वाड्यात रहात असल्याचं मला नंतर कळलं ! असो. तर लोकाग्रहास्तव म्हणा किंवा स्वत: ची गरज म्हणा पण आम्ही Flat शोधण्याची मोहीम सुरु केली. थोडीबहुत चौकशी केल्यावर कळलं की साधारण चार माणसांचा महिन्याचा किराणा आणि पेट्रोल च्या खर्चात एक स्क़्वेअर फूट जागा मिळते . ती सुद्धा किराणा, पेट्रोल ज्या ठिकाणी मिळते तिथून ८-१० किलोमीटर दूर !! जसं जसं जवळ येऊ तशी तशी किंमत वाढेल. मग हळुहळु आम्ही बिल्डर्सच्या ऑफिसेस मध्ये जाऊ लागलो. सुरुवातीला काही मोठ्या बिल्डर्स चे ऑफिस बाहेरूनच बघून आत जावं की नाही अशी भीती वाटायची. पण नंतर आम्ही सरावलो. आत गेल्यावर एखादी आकर्षक रिसेप्शनिस्ट मुलगी आपलं स्वागत करते. थोडसं 'हाय - हेलो' करून हळुच आपलं बजेट किती वगैरे ही माहिती काढून घेते. आपल्या बजेट चा आकडा जर कमी असेल (बहुधा असतोच!) तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव आपोआप बदलतात (मग आपल्याला बसायला सांगून ती निघून जाते. आणि नेमके त्याच दिवशी तिचे सर इतके बिझी असतात की आपल्याला भेटू शकत नाही. मग ती आपल्याला 'प्रोजेक्ट प्लान ' आणि 'कोस्टिंग शीट' देऊन आपली बोळवण करते.). पण चुकून जर आपल्या बजेटचा आकडा तिच्या अपेक्षेप्रमाणे असेल तर लगेच ती सरांना भेटायला आतल्या केबिन मध्ये घेऊन जाते. मग सर बोलायला सुरु करतात. " सर आमचा हा प्रोजेक्ट इतक्या इतक्या एकरांवर पसरलेला आहे. आसपास असं असं निसर्गसौंदर्य आहे. आम्ही अमुक अमुक फेजेस बांधतो आहे .....वगैरे वगैरे " खरं म्हणजे आपल्याला दोनचं गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. घराचा एरिया किती ? भाव किती? पण या गोष्टी सर आपल्याला सगळ्यात शेवटी सांगतात. आणि दोघांचा गुणाकार ऐकू आपण तिथुन निघून जातो. पण काहीही असो , यांच्या सोसायट्यांचे नाव मात्र ऐकण्यासारखे असतात. 'नेस्टोरीया', ,ओनेलीया', 'ग्रेसिया', 'रोझ व्हिला', 'प्रिस्टिन गार्डन' !! नाव ऐकल्यावरच आपण साहेबाच्या देशात आल्यासारखे वाटते. पण मला सांगा नेस्टोरीया धनकवडी ,ओनेलीया हांडेवाडी , ग्रेसिया तळेगाव ढमढेरे , रोझ व्हिला कोंढवा बुद्रुक असे पत्ते साहेबाच्या देशात असतील का हो ? असो. दुसरी ऐकण्यासारखी गोष्ट म्हणजे साइट लोकेशन . ते लोकेशन शहरापासून कितीही लांब असो तरीसुद्धा ते एकतर 'मोस्ट डेव्ह्लप्ड' तरी असतं किंवा 'नेक्स्ट डेस्टीनेशन' तरी असतं. आसपास सगळीकडे जंगल जरी असलं तरी तिथे लवकरच ‘Shopping Mall” किंवा ‘IT Park’ होणार असतो. शिवाय समोर ओसाड पडलेल्या जागेवर एक साठ मीटर रुंद रस्ता मंजूर झालेला असतो. जो एकीकडे विमानतळ आणि दुसरीकडे डायरेक्ट हिंजेवाडीला जाऊन मिळणार असतो. तो रस्ता कोणी मंजूर केला ? कोण बांधणार आहे? कधी बांधणार आहे ? असले मुर्खासारखे प्रश्न विचारायचे नसतात. एक साइट लोकेशन बघायला गेलो असताना मी तिथल्या माणसाला जास्त किमतीचे कारण विचारले. तो म्हणाला ," साहेब इथून हायवे एकदम जवळ आहे ". आता हायवे आणि ते लोकेशन याच्या मधात साधारण तीन डोंगर होते. आणि कच्च्या रस्त्याने हायवे पर्यन्त जायला वीस मिनिटे लागत होती !! बरं समजा लोकेशन हायवे टच जरी असलं तरी त्याचा दैनंदिन जीवनात काय उपयोग असतो ? आपल्या मुलांना जर क्रिकेट खेळायचं असेल तर ते हायवेवर जातील का ? हायवेवरच्या वाहनांचा आवाज आणि उडणारी धूळ यांचा काय उपयोग ? जास्त पैशे नक्के मोजायचे कशासाठी ? सोसायट्यान्मध्ये मिळणाऱ्या ‘Ammenities’ ही आणखी एक मजेदार बाब आहे. प्रत्येकी बारा मजल्यांच्या बावीस इमारती असलेल्या एका लोकेशनवर मी गेलो होतो. तिथे स्विमिंग पूल, जौग्गिंग रुट, गार्डन, जीम इ. सगळ्या ammenities होत्या. मी नं राहवून एक प्रश्न विचारला ," बावीस इमारती बांधल्यावर सुर्य दिसेल का हो ? की त्यासाठी वेगळा ammenity charge द्यावा लागेल ? याशिवाय आपल्या लोकेशन पासून सगळ्याच गोष्टी किती जवळ आहे याचा हिशोब अंतरात नाही तर मिनिटात दिला जातो. दिलेला वेळ हा बहुतेक विमानप्रवासाचा असावा असं माझा अंदाज आहे. उदा. खराडी बायपास ते पुणे स्टेशन हे साधारण १० किमी अंतर १७ मिनिटे असं दाखवलं असते. दिवसातल्या कोणत्याही वेळी हे अंतर १७ मिनिटात पार करता येत नाही. विमानाने बहुधा शक्य असावं. जागेचे दर वाढवण्याचे कारणं तर अनाकलनीय असतात. अक्षरश: "खूप दिवसात भाव वाढवलाच नव्हता म्हणून वाढवला" अशी कारणं सुद्धा सांगण्यात येतात. प्रस्तावित विमानतळ, मेट्रो, आयटी पार्क ह्याच्या नावाखाली भाव वाढवले जातात. आपल्या नातवाच्या लग्नापर्यन्त ते विमानतळ बांधून होत नाही. आणि बांधून झालंच तर नातू विमानात बसून परदेशात स्थायिक व्हायला जातो. मग आयुष्यभर आपण उडणारी विमानं बघायची ! असो. तर घर शोधण्याचं कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सगळी गणितं जमून आली तर घर नक्के होईल. मग उरलेलं आयुष्य ईएमआयरुपी गणितं सोडवायची आहेतच !!! -- चिनार
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
24986 वाचन

💬 प्रतिसाद (100)

प्रतिक्रिया

एका प्रस्थापित कवीच्या कविता

हाडक्या
Wed, 01/07/2015 - 15:56 नवीन
एका प्रस्थापित कवीच्या कविता चाळा.
यांना "प्रस्थापित" असे कधीपासून म्हणू लागले वो ? नाय म्हन्जे माहीती असलेलं बरं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

फ्लॅट विकत घेणे आवश्यक असते

नगरीनिरंजन
Mon, 01/05/2015 - 16:55 नवीन
फ्लॅट विकत घेणे आवश्यक असते का? बहुतेक एनाराय मंडळींनी गुंतवणूक म्हणून दोन-दोन फ्लॅट घेऊन भाड्याने चढवलेले असतात. शिवाय ज्या देशात राहतात तिथेही घर घेतलेले असते. एवढं करुन बाई आणि बाबा दोघेही दिवसभर घराबाहेर. तीन घरं आणि दोन गाड्या परवडाव्या म्हणून कामात गुंग आणि तिन्ही घरांचा उपभोग भलतेच लोक घेताहेत. बरं, भाव वाढतील म्हणून घेतलेत म्हणावेत तर भाव किती वर्षात किती वाढतील, कधी फ्लॅट विकायचा आणि किती पैसे अपेक्षित आहेत. समजा वीस वर्षांनी विकायचा असेल तर वीस वर्षांनी काय परिस्थिती असेल याचा काहीही विचार नाही. जगात काय चाललंय, पुढे काय वाढून ठेवलंय याचा काहीही अंदाज नाही. फक्त पैसा कमवायचा आणि गुंतवायचा एवढंच या होमो इकॉनॉमिकसना समजतं. इवान इलिच म्हणतो तसं स्वतःचं घर स्वतः बांधण्यातला आनंद जाऊन निव्वळ एक इन्स्टिट्यूशनल गरज उरली आहे फ्लॅट घेण्याची.
  • Log in or register to post comments

वाक्य थोड भंपक वाटू शकत

पिंपातला उंदीर
Mon, 01/05/2015 - 17:02 नवीन
वाक्य थोड भंपक वाटू शकत पण भाड्याच्या २ BHK flat पेक्षा स्वतहाच्या १ HK मध्ये भारी झोप लागते . तस्मात स्वतःचे छप्पर असणे अत्यावश्यक आहे .
  • Log in or register to post comments

मग नक्की काय? थोडा भंपकपणा

असंका
Mon, 01/05/2015 - 17:08 नवीन
मग नक्की काय? थोडा भंपकपणा अत्यावश्यक आहे असं म्हणायचंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

नाय ओ. राहु दे

पिंपातला उंदीर
Mon, 01/05/2015 - 17:12 नवीन
नाय ओ. राहु दे
  • Log in or register to post comments

झकास अन निखळ हलकाफुलका लेख.

गवि
Mon, 01/05/2015 - 17:12 नवीन
झकास अन निखळ हलकाफुलका लेख. बादवे पुणे जवळ येताच हायवेवर जे प्रचन्ड आकाराचे फलक दिसतात ते पाहून पुण्यात घरे सोडून अन्य काहीही जाहिरातयोग्य अथवा विक्रीयोग्य वस्तू पिकत नाही अशी समजूत होते. बाकी ग्रीक लॅटिन नावे आणि स्टाईलिश टॅगलाईन्सचा उल्लेख एकदम चपखल. लैच हुळहुळीत वर्णन असतं.. अन मॉडेल्स सारी विदेशी निळ्या डोळ्यांची कुटुंबे..
  • Log in or register to post comments

लॅटिन नावे आणि स्टाईलिश टॅगलाईन्स

कपिलमुनी
Mon, 01/05/2015 - 18:35 नवीन
या इमारतीमधली लोक्स रोजचे कपडे आणि चादरी कुठे वाळत घालतात *biggrin* असा प्रश्न पडतो .. बाकी वडाची वाडी मध्ये घर घेतला पेक्षा आम्ही banyan tree county असा सांगण्यात आंग्लालळेल्या लोकांना अभिमान वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

असेच!

लई भारी
Tue, 07/07/2015 - 11:02 नवीन
कस्पटे वस्ती ==> कास्प कौंटी (Kaasp County)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

धन्यवाद !!!

चिनार
Wed, 01/07/2015 - 15:24 नवीन
धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

परवडेल तिथे घ्या ना!

पैसा
Mon, 01/05/2015 - 17:17 नवीन
एकदम मेट्रो शहरात घर घेण्यापेक्षा मध्यम शहरात, किंवा तुमचं जे मूळ गाव असेल तिथे घर विकत घ्यायला काय हरकत आहे? तिथल्या किंमती वाढत असतातच. बरे नोकरी करणारे लोक नोकरीबरोबर अनेकदा शहरे बदलत असतात. त्यांनी काय प्रत्येक वेळी घरे विकत घेत रहायचे का? मला जेवढे परवडत होते तेवढ्या पैशात मी आता रहातेय तिथे फ्लॅट विकत घेतला. काही वर्षांनी त्या फ्लॅटची किंमत बर्‍यापैकी वाढली आहे. मात्र तो मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि मुलांनाही त्या घराबद्दल अटॅचमेंट वाटते. त्यामुळे विकायचा नाही असे ठरले. मात्र गेल्या काही वर्षात सिंगल बेडरूमची ती जागा फारच अपुरी वाटायला लागली. मग फ्लॅट विकून दुसरा मोठा विकत घेण्यापेक्षा आम्ही स्वतःचा फ्लॅट भाड्याने दिला आणि थोडेसेच पैसे जास्त भाडे देऊन मोठी जागा भाड्याने घेतली. नगरीनिरंजनची मते मला बर्‍याच बाबतीत बरेचदा पटतात. तेच घराच्या बाबतीतही. बंगले बांधणार्‍या बर्‍याच लोकांना उतारवयात मुले जवळ रहात नाहीत आणि बंगला विकून टाकता येत नही म्हणून हताश झालेले पाहिले आहे. किंवा मग ते मुलांना काहीही करून जवळ रहायला भाग तरी पाडतात. तेही चूकच. माझ्या मते आपला पसारा आपल्याला आवरता येईल एवढाच वाढवावा.
  • Log in or register to post comments

एकदम मेट्रो शहरात घर

गवि
Mon, 01/05/2015 - 17:31 नवीन
एकदम मेट्रो शहरात घर घेण्यापेक्षा मध्यम शहरात,
अगो.. आपण शेवटी कोंकणातच देह सोडणार.. तेव्हा मध्यम शहरात बघू म्हणून रत्नान्ग्री मालवणास पाह्यले तर साडेतीन सहस्र रुपडे झालेत गो तिथेही एका चौरस फुटास.. तुझ्या गोंयमधी आहे का एखादी गुंठाभर जागा ? संध्याकाळी आंचमन करुन समुद्राकडे बघत बसावे निवांत रिटायरमेंटनंतर..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

होय ना!

पैसा
Mon, 01/05/2015 - 17:33 नवीन
मग अजून पुढे जायचं. राजापूर नायतर वेंगुर्ला! आणि रत्नांग्रीतही आता साडेतीनहजार नाय ओ. त्याच्या बरेच पुढे पोचलेत दर! गोंयाचे तर नाव काढू नका. फोंड्यातसुद्धा घरासाठी जागा शिल्लक नाहीत. फ्लेटच मिळतील. दर्याकिनारी सगळ्या जागा राजकारणी आणि नट लोकांनी घेऊन टाकल्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वा!

विटेकर
Mon, 01/05/2015 - 17:27 नवीन
आपला पसारा आपल्याला आवरता येईल एवढाच वाढवावा. हे आयुष्यातील सर्वच बाजूना सदासर्वदा लागू आहे. स्वाक्षरीची पद्धत बंद झाली म्हणून नाहीतर हे वाक्य स्वाक्षरीसाठी क्लेम केले असते. पै ताई , पण बर्‍याच वेळा पीयर/ नेबर/स्पाउस प्रेशर ही भयंकर असते. त्याला तोंड देणे फार अवघड असते. तिथे एकदम ऑट ऑफ क्राउड व्हायला वाघाचेच काळीज पाहीजे. आणखी एक म्हणजे नोकरीतील प्रचंड अनिश्चितता आणि ती वाढत्या वयाबरोबर वाढतच असते ! दैवयोगाने बाका प्रसंग आलाच तर उपयोगी पडावे म्हणून लोक घरे घेऊन आश्वस्त होण्याचा खुळा प्रयत्न करतात. - गरज नसताना तळेगांवात घर घेतलेला विटेकर
  • Log in or register to post comments

विटूकाका

कपिलमुनी
Mon, 01/05/2015 - 18:37 नवीन
तळेगावमध्ये आलात का रहायला? चला , एक फर्मास मिसळ खाउ विकांताला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

स्वतःचं एक घर असताना गुंतवणूक

अनुप ढेरे
Mon, 01/05/2015 - 17:37 नवीन
स्वतःचं एक घर असताना गुंतवणूक म्हणून दुसरं घर घेणार्‍यांना हाणलं पाहिजे. असल्या लोकांमुळे किमती वाढतात.
  • Log in or register to post comments

@ अनुप ढेरे

विटेकर
Mon, 01/05/2015 - 17:48 नवीन
हाणा ... हेल्मेट घालायला परवानगी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

स्वतःचं एक घर असताना गुंतवणूक

मराठी_माणूस
Wed, 01/07/2015 - 14:50 नवीन
स्वतःचं एक घर असताना गुंतवणूक म्हणून दुसरं घर घेण्यामुळे किमती वाढतात. ह्या प्रोसेस मध्ये एका सामन्य माणसा कडुन दुसरा सामान्य माणुस अप्रत्यक्ष्रित्या नाडला जातो आणि बिल्डरचा मात्र अतोनात फायदा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

@ अनुप ढेरे

सुबोध खरे
गुरुवार, 01/08/2015 - 20:58 नवीन
@ अनुप ढेरे ढेरे साहेब मग या नात्याने ज्याच्याकडे चार प्यान्टी असतील आणि तो पाचवी घेत असेल तर त्याला पण हाणायला पाहिजे कारण त्याने घेतल्यामुळे प्यान्टीचे दर वाढतात ना (किंवा चाळीस पन्नास साड्या असताना सुद्धा दर दिवाळी पाड्व्या संक्रांतीला साड्या घेणाऱ्या बायकांना पण काही तरी शिक्षा द्यायला लागेल.) अर्थ शास्त्र इतके साधे सोपे नाही हो. घरांच्या किमती वाढण्याचे कारण इतके सोपे असते तर त्या कमी करणे पण तितके सोपे झाले असते शिवाय सरकारने बांधकाम क्षेत्राला देणाऱ्या सोयी सवलती दिल्या नसत्या. घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोखंड सिमेंट इ लागते त्यामुळे त्या उद्योगांना चालना मिळते. मुळात बांधकाम उद्योगात फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत ते नष्ट झाले तर सरकारची पाचावर धारण बसेल. घरांच्या किमती वाढण्याची काही कारणे -- मोठ्या प्रमाणावर राजकारण्यांचा, सिनेसृष्टी आणि गुंड मवाल्यांचा गुंतलेला काळा पैसा, घर बांधण्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांसाठी सरकार दरबारी खाबू लोकांना भरावा लागणारा पैसा, आणि वाढणारी महागाई (मुंबईत बिगार्याला ५०० रुपये रोज द्यावा लागतो.) यात सिमेंट वाळू लोखंड याला लागणारा वाहतूक खर्च हमाली पासून सर्व येते. शिवाय प्रत्येक बिल्डर हा हरामखोर आहे अशी सरकार दरबारी असणारी धारणा. त्यामुळे एखादा प्रामाणिक व्यवसाय करणार्यालासुद्धा सहज धंदा करणे शक्य नाही. वि. सु.-- माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकात सुद्धा कोणी बिल्डर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

खरे साहेब, तुमचे मत पटले नाही

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/08/2015 - 21:34 नवीन
खरे साहेब, तुमचे मत पटले नाही. घरांसाठी मागणी प्रचंड आहे पण घर घेणे लोकांना परवडत नाहीय, याचे कारण बहुतांश घरे वरचा ग्राहक वर्ग डोळ्यासमोर ठेवून बांधली जातात. २-३बीएचके विथ डबल पार्किंग, टेरेस, गार्डन, पूल अशा स्कीम्स काढून महाग किंमतीला विकण्यासाठी बिल्डर लोकांना पुरेपूर इकॉनॉमिक इन्सेन्टीव्ह आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी कमी पैशात घरे बांधण्याची गरज कोणाला वाटते? वरच्या वर्गातले लोक जोवर गुंतवणूक म्हणून घरं घेताहेत तोवर बिल्डरांना काय पडलंय? घर घेण्याची इच्छा असलेले इतके लोक आहेत की इंडस्ट्री बंद पडणे वा रोजगार कमी होणे शक्य नाही. सरकार मात्र कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी म्हणावे तसे उपाय करत नाहीय. हाय एन्ड फ्लॅट्सवर भरपूर टॅक्स लावणे आणि छोटे फ्लॅट्स बांधणार्‍या बिल्डरांना सवलती देणे अशा गोष्टी करु शकते. पण अशा लोकांची लॉबी नसते ना! मुळात या व्यवसायात इतका काळा पैसा आहे की तो स्वच्छ करण्यातच बराच वेळ जाईल आणि आणखी काळा पैसा येतोच आहे. भ्रष्ट असलेल्या साध्या पोलिस कॉन्स्टेबलचे तीन-चार फ्लॅट्स असतात. बेहिशेबी पैशातून कोणी असे फ्लॅट्स सहज घेऊ शकतो हे आपल्या सरकारचे आणि पर्यायाने एलिट लोकांचे अपयश आहे पण सगळेच स्वतःचं घर भरण्यात मग्न असल्याने "मार्केट आणि इकॉनॉमिच्या" नावाखाली सगळं खपवता येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आणि मुंबई-पुण्यात

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/08/2015 - 21:45 नवीन
आणि मुंबई-पुण्यात गुंडमवाल्यांचा पैसा गुंतला आहे हे समजू शकतो, पण नगरसारख्या ठिकाणी ३-४००० रुपये चौ.फु.ने फ्लॅट्स आणि २००० रु. चौ.फु. ने प्लॉट्स विकले जाण्याचे काय कारण? हाती पैसा असलेले लोक अक्षरशः नुसती घेण्या-विकण्याची उलाढाल करत असतात आणि भाव वाढवून ठेवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+१

अनुप ढेरे
गुरुवार, 01/08/2015 - 22:04 नवीन
कोणी पँट स्वतः न वापरता गुंतवणूक म्हणून घेत असेल असं वाटत नाही. अर्थात माझी माहिती तोकडी असू शकेल. कोणी कोणी घेतही असतील २-४ जीन्स गुंतवणूक म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

न नि साहेब

सुबोध खरे
Fri, 01/09/2015 - 10:26 नवीन
न नि साहेब बांधकामाचा खर्च चौरस फुटाला १५०० रुपये आहे आणि तोच जर उंच इमारत असेल तर २००० रुपये आहे( उद्वाहन आणि त्याच्या सांगाड्या सकट) शिवाय भूखंड जर घ्यायचा असेल तर त्या जमिनीला पंधरा वारस असतात. प्रत्येकाची दाढी धरून त्याची सही मिळवायची हे काम करायचे त्यातून आजकाल भूपुत्र माजलेले आहेत त्यांना वडिलोपार्जित जमीन मिळालेली आहे तेंव्हा तोंडाला येईल ती किंमत ते मागतात.या सर्व गोष्टीनंतर सरकारी लांडगे बसलेले आहेतच. हे सर्व केल्यावर बांधकाम व्यावसायिक काही हरिश्चंद्राचा अवतार नाही त्याला २० टक्के तरी नफा होणार नसेल तर तो कशाला यात हात घालेल? यास्तव नगर सारख्या ठिकाणी जागेचे भाव ३००० पर्यंत झालेले आहेत. मी टिटवाळ्यासारख्या दूरच्या गावात जागेचा भाव विचारला तर ३५०० रुपये सांगितला. मी हादरलोच. दुसरे घर एक शयन्गृहासाहित मुंबईपासून ६५ किमी वर २७ लाख रुपये अधिक मुद्रांकशुल्क आणि पंजीकरण शुल्क म्हणजे ३० लाख रुपये. तेवढे पैसे असते तर तेच पैसे बँकेत ठेवून व्याजावर जगत येईल का याचा हिशेब करतो आहे. एक मूळ कारण स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा आपली लोक संख्या ४० कोटी होती( पाकिस्तान आणि बांगला देश धरून) आणि आता ते देश वजा जाता १२५ कोटी आहे म्हणजे तेवढ्याच जमिनीवर चौपट माणसे. कोण जबाबदार आहे. आपणच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

जाता जाता

सुबोध खरे
Fri, 01/09/2015 - 10:31 नवीन
जाता जाता मुंबईच्या सर्व उपनगरात एक बेड रूमचे भरपूर फ्लेट्स आहेत. ( लहान घरे कोणी बांधत का नाहीत याचे उत्तर). मुलुंड मध्ये एक बेडरूमच्या घराची किंमत(४०० चौरस फुट) ६० लाखाच्या आसपास आहे. याहून लहान घरे सुद्धा आहेत ३०० चौरस फुट (४५ लाखाला) पण ती कोणी घेतनाही कारण लोक त्याच पैश्यात दिवा डोंबिवलीकडे किंवा घोडबंदर रोड ठाणे येथे ४५०/५०० चौरस फुटाचे घर घेणे पसंत करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

यात (बांधकाम व्यवसाय) मुख्यत:

गवि
Fri, 01/09/2015 - 11:07 नवीन
यात (बांधकाम व्यवसाय) मुख्यत: लेबर आणि अन्य कॅश व्यवहार असल्याने बराच बेहिशेबी पैसा त्यात ओतलेला असतो आणि त्यामुळेच बाजाराचा मागणी-पुरवठा आधारित किमतीचा नियम न पाळणारा हा एकच व्यवसाय आहे. कारण गि-हाईक आले नाही तरी बराच काळ घरे / फ्लॅट्स पडीक ठेवू शकण्याची होल्डिंग कपॅसिटी या पैशामुळे आलेली आहे. शिवाय तो पेरिशेबल माल नाही. भाड्यानेही देता येतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

विटेकर आणि पैसा ++

कंजूस
Mon, 01/05/2015 - 17:38 नवीन
विटेकर आणि पैसा ++ घरघर खरी आहे आणि या धाग्यावर काही वात्रट बोलेल तो रौरव नरकात -- अत्यंत गंभीर विषय आहे.
  • Log in or register to post comments

या धाग्यावर काही वात्रट बोलेल

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/07/2015 - 14:44 नवीन
या धाग्यावर काही वात्रट बोलेल तो रौरव नरकात हैला, हे संमंच्या वैधानिक इशार्‍यात टाकण्याइतके वजनी वाक्य आहे. इतकी सोपी आयड्या अगोदर कशी कुणाला सुचली नाय ??? Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

तीव्र सहमती

अजया
Wed, 01/07/2015 - 21:20 नवीन
तीव्र सहमती =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

घरघर खरी आहे आणि या धाग्यावर

घाटावरचे भट
Fri, 01/09/2015 - 13:49 नवीन
घरघर खरी आहे आणि या धाग्यावर काही वात्रट बोलेल तो रौरव नरकात
किंवा गद्धेगाळावर कोरलेले ते नेहेमीचे वाक्य.... या धाग्यावर काही वात्रट बोलेल त्याच्या.... वगैरे वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

२ वर्षांपूर्वी मी

पिंपातला उंदीर
Mon, 01/05/2015 - 21:29 नवीन
२ वर्षांपूर्वी मी पुण्यातल्या एका मोठ्या बांधकाम व्यवसायिक सोबत काम केल होत . त्यानिमित्ताने तिथल्या मार्केटिंग हेड शी बोलण्याचा योग आला . सध्या पुण्यात मोठ्या प्रमाणावर flat खरेदी कोण करत असेल ? त्यांनी सांगितलेलं observation खूप धक्कादायक होत . पुण्यात investment म्हणून flat घेणार्यांमध्ये आघाडीवर आहेत बीड , उस्मानाबाद , नांदेड, सोलापूर अशा छोट्या शहरांमधले वकील - डॉक्टर असे खोऱ्याने पैसे कमावणारे व्यवसायिक तसेच पाचवा वेतन आयोग च्या हिशोबाने पगार घेणारे प्राध्यापक आणि मलैदार पदांवर काम करणारे याच छोट्या शहरांमधले सरकारी नौकारदार . पुण्यात स्थायिक असणारी मंडळी कडून सध्या flats ची फारशी मागणी नाहीच . ते लोक investment म्हणून flat घेतात . उद्या मुल शिक्षणासाठी पुण्यात आली तर हा flat कामाला येईल असा हिशोब असतो . तसेच तिथल्या डॉक्टर -वकील , राजकारणी , सरकारी नौकर लोकांकडे अवैध संपत्ती मुबलक असते . त्याचा उपयोग पण flat घेताना होतो . म्हणून पुण्यात flat ची मागणी कमी होत नाही . आता तर पुण्यातल्या सर्व आघाडीच्या real estate कंपन्या या छोट्या शहरांमध्ये आणि semi urban भागात मोठ मोठी जाहिरात मोहिमा राबवत आहेत . त्यांच्या media budget चा एक मोठा हिस्सा या भागातल्या campaign साठी राखून ठेवलेला असतो .
  • Log in or register to post comments

मलाही असंच वाटत होतं. ते आता

काळा पहाड
Wed, 01/07/2015 - 13:28 नवीन
मलाही असंच वाटत होतं. ते आता कन्फर्म झालं. हीच घाण आता इथे येवून इथल्या लोकांचे शेजारी बनणार आहेत. सरकारी नोकर असलेला माणूस मरत असला तरी त्याला पाणी देवू नये असं पर्सनल मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

दुसर्या घराबद्दल मी बोलत नाही

सुबोध खरे
Wed, 01/07/2015 - 13:29 नवीन
दुसर्या घराबद्दल मी बोलत नाही परंतु आपले राहते घर स्वतःच्या मालकीचे असावे याचे कारण डोक्यावरचे छप्पर स्वतःचे असणे हे एक फार मोठी मानसिक गरज आहे आणि मी वयाच्या ४० व्या वर्षी स्वतःचे घर घेतले तेंव्हा मिळणारी मानसिक शांती याची किंमत पैश्यात होणार नाही. त्या अगोदर लष्करी नोकरीत असताना पुण्यासारख्या शहरात ३५ हजार चौरस फुट जमिनीवर असलेला ५५०० चौरस फुटाचा बंगला सुद्धा तेवढे समाधान देऊ शकत नाही हा अनुभव घेतला आहे. गोव्यात असताना १७०० चौरस फुटाचा फ्लाट पुढे मागे अंगण इ चा चार वर्षे उपभोग घेतला पण ज्या दिवशी खाली करावे लागते तेंव्हा इदं न मम म्हणावेच लागते. गेली १० वर्षे मी आजच्या राहत्या घरात आहे पण इथून फुटा असे कोणी म्हणू शकत नाही. शेवटी मानसिक गरजेची किंमत काय हे कसे ठरवणार? आपण आपल्या बायकोला भाड्याचे दागिने घेण्याची कल्पना सुचवून पहा. उगाच सोन्यात घालवलेला पैसा आणि लोंकरची धन म्हणून पहा दुपारी थंडा फराळ करावा लागतो कि नाही ते. अहो नुसते बेन्टेक्सचे दागिने म्हणून पहा किंवा साड्यांची लायब्ररी.
  • Log in or register to post comments

आपले राहते घर स्वतःच्या

प्रसाद१९७१
Wed, 01/07/2015 - 13:40 नवीन
आपले राहते घर स्वतःच्या मालकीचे असावे याचे कारण डोक्यावरचे छप्पर स्वतःचे असणे हे एक फार मोठी मानसिक गरज आहे
खरे साहेब - तुमचे म्हणणे बरोबर आहे पण तुम्ही १०-१२ वर्षापूर्वी घेतलेत घर. पण गेल्या ७-८ वर्षात प्रचंड फरक पडला आहे. २००५ च्या आधी, इंजिनियरींग केल्यावर जर बरी जरी नोकरी मिळाली तरी पुण्यात १BHK फ्लॅट घेण्याची ऐपत ३ वर्षाच्या नोकरी वर येत होती. आता १० वर्ष नोकरी करुन सुद्धा येणे अवघड आहे.
  • Log in or register to post comments

१००% मान्य

चिनार
Wed, 01/07/2015 - 15:23 नवीन
खरे साहेब - तुमचे म्हणणे बरोबर आहे पण तुम्ही १०-१२ वर्षापूर्वी घेतलेत घर. पण गेल्या ७-८ वर्षात प्रचंड फरक पडला आहे. २००५ च्या आधी, इंजिनियरींग केल्यावर जर बरी जरी नोकरी मिळाली तरी पुण्यात १BHK फ्लॅट घेण्याची ऐपत ३ वर्षाच्या नोकरी वर येत होती. आता १० वर्ष नोकरी करुन सुद्धा येणे अवघड आहे. १००% मान्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

आम्ही तर

मनिमौ
Wed, 01/07/2015 - 14:00 नवीन
डाउन पेमेन्ट ची रक्कम कुठुन आणावी या चिन्तेन्त आहे.७-८ लाख जमा करणे अवघड आहे.
  • Log in or register to post comments

डाउन पेमेन्ट

कपिलमुनी
Wed, 01/07/2015 - 14:53 नवीन
१. (सर्व) सोने विका २. खासगी बँकेमधून ( सहकारी ) ल्लोन घ्या . बाकी बँकेमधून घेतले तर होम लोन कमी मिळेल. ३. मित्रांकडे / नातेवाईकांकडे मागा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ

आमच्या कामवाल्या मावशींना

पिलीयन रायडर
Wed, 01/07/2015 - 15:26 नवीन
आमच्या कामवाल्या मावशींना त्यांचे मेव्हणेच (जे बिल्डर आहेत) धनकवडीमध्ये घर देणारेत.. लाखभर तरी रुपये द्यावे लागतील आधी , मग पतपेढी का कसलेसे कर्ज (मेव्हणेच) मिळवुन देणारेत.. मॅडमनी आधी कुठल्या तरी भिशीत फुकट पैसे गुंतवले होते, त्या आधी pulse नावाची पॉलीसी घेऊन २० हजार तिथे अडकवलेत.. आता १० वेळा सावध केलय पण बहीणीचा नवरा फसवणार नाही अशी त्यांना खात्री आहे.. तर.. एक लाख जमवायला आमच्याकडे ५ हजार मागितले.. दिले.. (समोर आयटी मध्ये खोर्‍यानी ओढणारे, पुण्यात २-२ घरं असणारे जोडपे रहाते, त्यांना मागितले तर पोस्ट डेटेड चेक द्या म्हणाले..!!)... दागिने विकावेत तर ते ही नाहीत.. एका पत्र्याच्या खोलीत रहातात, गावकडचे जमीन आणी घर भाऊबंदकीत अडकले आहे.. असे कसे त्यांचे १ लाख जमा होणार ह्याचीच काळजी वाटते मला.. (काही माहिती असेल कुणाला तर सांगा ह्या निमीत्ताने..)
  • Log in or register to post comments

तुमच्या कामवाली ला सांगा की

प्रसाद१९७१
Wed, 01/07/2015 - 15:29 नवीन
तुमच्या कामवाली ला सांगा की "बिल्डर मेव्हण्याला नोकरी द्यायला सांगा. तिला आणि तिच्या नवर्‍याला" जवळ जवळ नक्की फसवणार मेव्हणा त्या मावशिंचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मावशी स्वतः पोळ्या, धुणी

पिलीयन रायडर
Wed, 01/07/2015 - 15:48 नवीन
मावशी स्वतः पोळ्या, धुणी भांडी वगैरे करुन कमावतात हो.. आणि नवरा इस अ‍ॅज युजवल टु प्राऊड टु आस्क! पण गरीबांना घर घेण्याची काही सोय नाही का मायबाप सरकारकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

मस्त खुसखुशीत !

सस्नेह
Wed, 01/07/2015 - 15:38 नवीन
आणि वास्तववादी लेख. सर्व सोने, सर्व शिल्लक इ. घालून गावाकडे एक प्लॉट घेतलाय. आता डाऊनपेमेंट ला काही शिल्लक नसल्याने बांधकामासाठी सेव्हिंग सुरु आहे !
  • Log in or register to post comments

प्रोपोजड रोड्स

कपिलमुनी
Wed, 01/07/2015 - 18:07 नवीन
पाहिलेल्या सर्व साईटच्या बाजूने ८० फूट प्रोपोजड रोड्स , बीआर्टी , ईई जाणार असता . ह्या प्रोपोजड प्लानची माहिती कूठे मिळते ?
  • Log in or register to post comments

मला पण घरं घ्यायचय एक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/07/2015 - 18:40 नवीन
मला पण घरं घ्यायचय एक वर्षभरात. चायला किंमती ऐकुन कपाळघंटी प्राणायाम होतो पार. इथे आता पिंपरी चिंचवडमधे घर घ्यायचं असेल तर होणारी बायको पण माझ्याएवढी किंवा जास्त कमावती पाहिजे. दुष्टचक्र आहे हे. चायला कधी कधी असं वाटतं ना मेरा भारत महान वगैरे ते सगळं तद्दन खोटं आणि नाटकी आहे. जावं कुठेतरी सौदी नाहितर कॅनडामधे सेटल व्हायला कायमचं. :(
  • Log in or register to post comments

+१

कपिलमुनी
Wed, 01/07/2015 - 18:45 नवीन
४० लाख रू चा घर म्हणजे त्याच्या २० % रक्कम म्हणजे ३६ लाख चा घर आणि ४ लाख टॅक्स असतो . ३६ च्या २०% डाउनपे ६ लाख आणि वरचे ४ लाख टॅक्सचे असे ११ लाख हवे खिशामधे ! ३० लाखाचा १ बीएचके असेल तर ८ लाख हवे ! धूर निघतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो मुनिवर गणित सोप्पं आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/07/2015 - 18:50 नवीन
अहो मुनिवर गणित सोप्पं आहे. एज्युकेशन लोनचे हफ्ते भरतोय. मग व्यवसाय सुरु करायसाठी म्हणुन साईड ला टाकलेले पैसे सरकारी भडव्यांना परवानग्या काढता काढता संपत आले. -_- सगळचं त्रांगडं आहे हे. -_- डाउन पेमेंट एवढे पैसे तर जमायला पाहिजेत ना. बरं आज पैसे जमले आणि उद्या कंपनी बदलली किंवा बदली झाली (व्यवसायचं लांबणीवर पडलं तरं) तर परत डोक्याला शॉट आहेचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कुठेतरी सौदी नाहितर कॅनडामधे सेटल व्हायला कायमचं.

मुक्त विहारि
Wed, 01/07/2015 - 23:03 नवीन
सौदीत सेटल व्हायचे असेल तर जरा कठीण आहे. पण कॅनडात मात्र नक्कीच जमू शकते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सौदी नको

हिरालाल
Fri, 01/09/2015 - 13:17 नवीन
सौदीचा विचार आणू नका मनात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

डोळे पाणावले

आदिजोशी
गुरुवार, 01/08/2015 - 16:56 नवीन
पुण्यातली घरांची स्वस्ताई पाहून डोळे पाणावले
  • Log in or register to post comments

सध्या कोणत्या शहरात कमी

गवि
गुरुवार, 01/08/2015 - 21:13 नवीन
सध्या कोणत्या शहरात कमी किंमतीत घरे उपलब्ध आणि पुढे आप्रिसिएशन अपेक्षित आहे? गोव्यात दर कसे आहेत ? .. ..नागपूर नाशिक औ.बाद इथे?
  • Log in or register to post comments

गोव्यातले फ्लॅट्सचे दर

पैसा
गुरुवार, 01/08/2015 - 23:32 नवीन
फ्लॅट्स पणजीला १ लाख रु. किंवा जास्त स्क्वे. मीटर; म्हापसा परवरी ५० ते ६० हजार स्क्वे. मीटर; फोंडा ४० ते ५० हजार रु. स्क्वे. मी. बाकी सगळीकडे साधारण ४० ते ८० हजार रु. स्क्वे.मी. किनारपट्टीला जास्त. प्लॉट्स त्या प्रमाणात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

:O :O :O :O

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/09/2015 - 09:47 नवीन
:O :O :O :O कोणी घरं देता का घरं!! (सागरकिनार्‍यावर छान घर असावं अशी इच्छा असणारा) अनिरुद्ध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रस्तुत लेख लोकप्रभा मध्ये

चिनार
Mon, 07/06/2015 - 11:23 नवीन
प्रस्तुत लेख लोकप्रभा मध्ये प्रकाशित झाला आहे. http://epaper.lokprabha.com/528943/Lokprabha/03-07-2015#dual/46/1
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा