Skip to main content

बंदुकीची गोळी आणि ती

शनिवार, 27/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक जागा मिळाली. समोरच्या सीट वर एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते. अर्थात केरळ प्रदेशातला. तो एका अर्धसैनिक दलात मध्यम श्रेणीचा अधिकारी होता. मी ही त्याला आपला परिचय दिला. बोलता-बोलता सहजच नक्षलवादचा विषय निघाला. मी ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे निसंकोच मेथ्यु यांनी स्वत: बाबत माहिती सांगितली. गेली पाच-सहा वर्षांपासून नक्षल प्रभावित भागात त्यांची पोस्टिंग होती. कित्येक चकमकीत ही भाग घेतला होता. मी म्हणालो, अर्ध सैनिकादलांमुळे आज नक्षलवाद काबूत आहे. तुम्ही ही बर्याच नक्सलवाद्याना तुम्ही कंठ स्नान घातले असतील. त्यावर मेथ्यु म्हणाला, कुणाचे ही प्राण घेण्यात बहादुरी नाही, लोकांचे प्राण घेऊन आनंद मिळत नाही. मग तो शत्रू का असेना. 'बंदुकीची गोळी फक्त प्राण घेते आणि लोकांचे आयुष्य उध्वस्त करते'. बंदुकीची गोळी कुठल्या ही समस्येचे समाधान नाही. एका अर्धसैनिक दलाच्या अधिकारीच्या तोंडून हे ऐकून मला काहीसे आश्चर्य वाटले. चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उमटले. माझा मनात चाललेला गोंधळ मेथ्युचा ध्यानी आला. तो म्हणाला साहेब, तीन एक वर्षांपूर्वीची घटना आहे. १५ शिपायांना तुकडी घेऊन गस्त घालायला निघालो. जंगलातून पायवाटेवर चालताना बलवान सिंग आणि मोहन हे दोघे सिपाही पुढे होते. मी, होशियार सिंग थोड्या अंतरावर त्यांच्या मागे. एका वळणावर अनेपक्षित पणे बंदुका घेतलेले सैनिकी वेशात तीन लोक बलवान सिंहला दिसले. तो थोडा गोंधळला, पण ते तिघे नक्षली होते. आपल्या समोर अर्धसैनिक दलाची तुकडी आहे, त्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यांना एक धक्का देऊन इथून पलायन करणे उचित, त्यांच्या म्होरक्याने निमिषातच निर्णय घेतला. त्यांनी समोर दिसणाऱ्या दोन्ही शिपायांवर आपल्या एके ४७ ने ब्लास्ट (सर्व गोळ्या एकाच वेळी) केला. काही समजण्या आधीच बलवान आणि मोहन जमिनीवर पडले. मी लगेच एका झाडाची आड घेतली आणि आम्ही नक्षलींच्या दिशेने गोळीबार सुरु केला. होशियार सिंगने याने थोड रांगत पुढे जाऊन एक हेंड ग्रेनेड त्यांच्या दिशेने फेकला. तो ग्रेनेड बरोबर त्यांच्या मध्ये जाऊन पडला. काही क्षणांकर्ता नक्षली गोंधळले. त्यांनी आपली पोजिशन सोडली आणि त्याच क्षणी ग्रेनेडचा ही ब्लास्ट झाला. सर्वकाही शांत झालं. माझे दोन शिपाई शहीद झाले होते. बाकी इतर कुणाला ही कुठलीच इजा झाली नव्हती. होशियार सिंहला नक्षली जिवंत आहे कि मेलेले याची खात्री करायला सांगितले. काही वेळाने तो परत आला आणि म्हणाला साहिब एक जिंदा है, क्या करें उसका. मी जवळ गेलो, बघितले जेमतेम १७-१८ मुलगी असेल. दोन्ही पाय ब्लास्ट मुळे जखमी झाले होते. पाठीला गोळी ही लागलेली होती. शरीरातून रक्त वाहत होते. एक शिपाई म्हणाला, साहब इसे तो उठाकर ले जाना पड़ेगा. मी विचार केला. जंगल नक्सलीनी भरलेले आहे. कदाचित या चकमकी बाबत त्यांना कळले ही असेल. आधीच दोन शहीद शिपाई, त्यांची आणि नक्षली त्यांचे शस्त्र. ६-७ शिपाई तर या साठीच लागतील. उरलेल्या ५-६ शिपायांवर सर्वांच्या संरक्षणाची जवाबदारी. निर्णय घेतला. आपल्या जवळ लोक नाही. हिला इथेच सोडावे लागेल, उद्या परत येऊन बघू, काय करायचे ते. साहेब अश्यानी ही इथेच तडफडून मरेल, एक शिपाई म्हणाला. मी म्हणालो, ठीक आहे, मी तिला मुक्त करतो. मी तिच्या जवळ गेलो.एक पाय तिच्या छातीवर ठेवला आणि तिच्या कपाळावर नेम धरला. त्या वेळी तिच्या चेहर्याकडे लक्ष गेल. मोठ्या डोळ्यांनी ती माझ्याकडे पाहत काहीतरी बोलण्याच्या प्रयत्न करत होती. मन घट्ट करून मी गोळी झाडली. त्या क्षणी माझ्या कानात आवाज घुमला 'साहेब मला का मारले, मला जगायंच होत.' मेथ्यु काही क्षणासाठी थांबला. तो पुढे म्हणाला, बलवान सिंहच्या बायकोचे वय फक्त तीस वर्ष होते त्यात तीन मुली. तिला पुढील सर्व आयुष्य तीन मुलीना वाढवत वैधव्यात काढावे लागणार. मोहन तर फक्त २२ वर्षांचा होता. आपल्या आई-बापांचा एकुलता एक. ती मुलगी, दोन वर्षांपूर्वी तिने दहावीचा पेपर दिला होता. तिला डॉक्टर बनायचे होते. तिचा मोठा भाऊ कालेजात शिकत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आला होता. त्याच वेळी जवळच्या गावात पोलीस पोस्टवर नक्षली हमला झाला. जवळपासच्या गावातल्या तरुणांना पोलिसांनी उचलले. त्यात तिचा भाऊ ही होता. असे गावकर्यांचे म्हणणे. नंतर कळले पोलीस एन्काऊंटर मध्ये काही नक्षली मारल्या गेले त्यात तिचा भाऊ होता. भावाचा बदला घेण्यासाठी तिने जंगलाचा रस्ता धरला आणि चकमकीत मी तिला मारले. तिच्या वडिलांनाही या घटने नंतर पोलीस उचलून घेऊन गेले. कदाचित अद्यापही ते जेल मध्ये असतील. काही क्षणांच्या चकमकीत अनेकांचे स्वप्न भंगले, काही परिवार उध्वस्त झाले. बाकी माझे म्हणाल, तर मी झोपेच्या गोळ्या घेतो तरी ही मला झोप लागत नाही. जरा डोळे मिटले कि तिचा चेहरा समोर येतो, एकच आवाज कानात घुमत राहतो. 'साहेब मला का मारले, मला जगायचं होत.' काय उत्तर देणार मी तिला. मला नेहमीच वाटते, ती सतत माझ्या अवती-भोवती असते, कदाचित या क्षणी ही इथेच असेल. जो पर्यंत तिला तिच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही ती जाणार नाही. जन्म भर ती मला अशीच छळत राहणार. मेथ्युची कथा ऐकून मी सुन्न झालो. काहीच बोलू शकलो नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4432
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

शस्त्रं लोकांना मारत नाहीत, लोक लोकांना मारतात आणि विचारधारा (ideology) या नावाखाली त्याचं समर्थनही करतात.फार थोडे असतील अशांना या गोष्टींची टोचणी लागत असेल.

In reply to by बोका-ए-आझम

खरंय. कसलीही विचारधारा वगैरे काही नाही. मूठभरांच्या नफ्यासाठी आणि बहुसंख्यांच्या कन्झ्युमरिझमपोटी हे बळी जातात.

In reply to by नगरीनिरंजन

१००% सहमत ! खर्‍या सुजाण विचारधारेसाठी काम करणार्‍या लोकांना मानवी जीवनाचे मोल व लोकांच्या सुखदु:खांची जाणिव असते. त्यामुळे त्यांच्या संघर्षाला नेहमीच एक सीमा असते आणि ती त्यांना अतिरेकी कृती करण्यापासून थांबवते. जेव्हा स्वार्थी अर्थकारण, सत्ताकारण, राजकारण किंवा केवळ व्यक्तिगत अहंकार मुख्य उद्द्येश होतो / होतात, तेव्हा इतर सर्व माणसे त्या खेळात खर्च होऊ शकणारी (एक्स्पेंडेबल) प्यादी बनतात आणि अतिरेकी कारवायांना आवश्यक कृती समजायला सुरुवात होते.

In reply to by बोका-ए-आझम

लोक लोकांना मारतात आणि विचारधारा (ideology) या नावाखाली त्याचं समर्थनही करतात.
गांधीहत्येचही समर्थन करणारे लोक आहेत.

नक्षलवाद आणि त्यातून उद्ध्वस्त होणारी दोन्ही बाजूंची आयुष्ये, शेवटी सर्वात जास्त हानी होते ती निरपराधांचीच. ह्या विषयावर कधीतरी विस्तृत लिहिण्याचा मानस आहे.

In reply to by एस

नक्षलवाद या विषयाला अन्यायापासून ते ठेकेदारीपर्यंत अनेक पैलू आहेत. मिपावर एकदा हेल्दी चर्चा केली पाहिजे . तुमह्च्या लेखाच्या प्रतीक्षेत

सैन्याने केलेली असो वा अजून कोणी, हिंसा ही दु:खदायकच असते. परंतु नक्षलवादी किंवा अतिरेकी करीत असलेली हिंसा थांबविण्यासाठी त्यांना संपविण्याखेरीज दुसरा कोणता उपाय आहे का?

सैनिकाला कच्चे अन कोमल काळीज असणे वाईटच.

In reply to by सस्नेह

उलट आहे स्नेहांकिता. सैनिक बर्‍याचदा निराशेच्या गर्तेत जातात. व्हिएतनाम नंतर एक आख्खी पिढी नासली अमेरिकेची. आजही अफगाणीस्तान अन इराक मधले सैनिक सायकॉलॉजीस्टकडे रेफर होतात. आयुष्यात काहीच अर्थ नसल्याची भावना निर्माण होते सैनिकात. त्या मानाने भारतिय सैनिक बरेच नशिबवान म्हणायचे. ते फक्त देशासाठी लढतात, आंतरराष्ट्रीय राजकारण्यांसाठी नाही.

In reply to by सस्नेह

वाईट काही नाही. तेही माणूसच आहेत तेव्हा भावभावना असणारच. त्याने आपली ड्यूटी केली ते बघितलं जावं, त्याला काय वाटतं यावरून त्याला जज करू नये.

प्रतिसादाबाबत धन्यवाद. या घटनेशी मिळती जुळती घटना एका अधिकाऱ्यानेच गाडीत मला सांगितली होती. जवान ही आपल्यासारखेच असतात, त्यांचे काळीज ही आपल्या सारखेच असते. प्राण घेताना गोळ्या विचारधारा पाहत नाही. जीव कुठल्या ही कारणाने गेला तरी त्या लोकांच्या परिवारांचे हाल होतातच. मग नक्षली असो व जवान. गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली. तो फासावर चढला. पण त्याच्या परिवाराचे ही हाल हाल त्या वेळी झाले असतीलच. नक्कीच उपासमारीची पाळी आली असेल. ती मुलगी नक्सली होती, तिच्या जवळ शस्त्र होते, तिने गोळ्या ही झाडल्या होत्या, चकमकीत ती घायाळ झाली होती. तिला मारण्यात काहीच गैर नव्हते. तरी ही तडफडणाऱ्या मुलीला मारून आपण योग्य केले नाही 'तिचा जीव वाचविता आला असता', अशी जाणीव त्या अधिकार्याचा मनात होती. आणि तेच शल्य त्याला आयुष्य भर बोचत राहिले.

अशा भावनाशील लोकांनी आर्मीत न जाणेच उत्तम

लष्करातील लोकांचे पहिल्या दिवसापासूनच बौद्धिक घेतले जाते कि हा अमुक ( पाकिस्तानी) आपला शत्रू आहे. त्यामुळे तुमच्या बंदुकीची निशाणी हि पाकिस्तानी सैनिक हि असली पाहिजे. माझा एक मल्याळी मित्र जेंव्हा एका तोफखाना दलाच्या बटालियन मध्ये नौशेरा जवळ पाकिस्तान च्या सरहद्दीजवळ डॉक्टर म्हणून रुजू झाला आणि तो सैनिक चौकीच्या तपासणी साठी गेला असता त्याला दाखवण्यासाठी त्यांनी त्यांच्या उत्तम नेमबाजाला बोलावले. याचे नाव पिल्ले होते. त्याला स्फुरण देण्यासाठी त्याच्या मित्रांनी सांगितले पिल्ले डॉक्टर साहब तुम्हारे गावके ही उनके अपना निशाना दिखाओ. पिल्ले ने आपली रायफल उचलली आणि साधारण एक किमी अंतरावर एक पाकिस्तानी सैनिक अंधुकपणे दिसत होता त्यला नेम धरून गोळी घातली. मित्राच्या समोर तो उभ्याचा आडवा झाला. सर्वांनी जल्लोष केला. माझा मित्र मला म्हणाला कि केवळ तो पाकिस्तानी होता म्हणून त्याच्या मृत्यूचा जल्लोष केला गेला पण हीच रायफल पिल्ले ने ९० अंशाच्या कोनात फिरवून एखाद्या भारतीय माणसाचा बळी घेतला असता तर त्याच्यावर भर दिवस चीथावणी विना खून केल्याच्या(COLD BLOODED MURDER) आरोपाखाली फाशी झाली असती. मी पण पिल्लेचे कौतुक केले.पण हि गोष्ट मला मनापासून पटत नव्हती काही दिवसांनी त्यांनी केलेल्या तोफेच्या सरबत्तीत आपला एक सैनिक गंभीर जखमी झाला होता. आणी माझ्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे जर तो तेथे हजार नसता तर रक्तस्त्रावाने त्याचे प्राण गेले असते. असा आपलाच रक्तबंबाळ सैनिक पाहिल्यावर त्याच्या मनाची टोचणी बरीच कमी झाली. युद्ध हि फार क्लेशदायक गोष्ट असते आणी त्यातून आमच्या सारख्या डॉक्टराना फार मानसिक द्वंद्व होते. एकीकडे त्याला शत्रू म्हणून गोळी घालायची आणी त्याल पकडले कि त्याचा जीव वाचविण्यासाठी उपचार करायचे. परंतु लढाई लढताना सारासार विचार सैनिकाला बाजूला ठेवायला सांगितला जातो आणी हुकुम पाळायचा एवढेच शिकवले जाते. आपल्या मनाला बोथट करण्यासाठी दारू पाजली जाते आणी ती स्वस्त पणे उपलब्धही केली जाते परंतु जेंव्हा आपल्या सैनिकांना श्रीलंकेत पाठविले होते तेंव्हा त्यांना फार मोठ्या मानसिक द्वंद्वाला सामोरे जावे लागले होते कारण त्यांना श्रीलंका सरकारच्या मदती साठी भारतीय वंशाच्या तामिळ लोकांना मारावे लागत होते. माझ्या मित्र्राला त्याचे सैनिक विचारत, "सर, ये लोग तो हमारे दुश्मन नही है इनको क्युं मारना है? तो म्हणाला त्यांना समजावणे फार कठीण होते. याच कारणासाठी लष्कराने नक्षल्वादाविरुद्ध च्या युद्धात भाग घेण्यास कडक विरोध केला.कारण लोकांच्या मेंदूची धुलाई करून झाल्यावर परत त्यांची मनोवृत्ती खच्ची करणे लष्कराला परवडणारे नव्हते. @ सिरुसेरी साहेब तुम्ही लष्करात भरती होता तेंव्हा आपण काहीतरी देशभक्तीपर काम करत आहोत. तुमचे नातेवाईक मित्र ई. तुमचे कौतुक करतात तुमची छाती ५६ इंचाची होते. तेंव्हा हे कळत नाही कि आपण संवेदनशील आहोत कि नाही. पहिल्यांदा आम्हाला डॉक्टर म्हणून प्रत्येक जीव वाचविणे हे तुमचे कर्तव्य आहे हे शिकवले जाते त्यानंतर तुम्हाला लष्करी प्रशिक्षण दिले जाते तेंव्हा शत्रूचा निपात करायचा ते शिकवले जाते. आमच्या रायफल रेंजच्या मागच्या भिंतीवर "एक गोली एक दुश्मन" अशी ५ फुटी बोधवाक्ये रंगवलेली होती.( जमले तर त्याचे फोटो टाकेन). हे म्हणजे एका पायाने ब्रेक दाबायचा आणी दुसर्या पायाने अक्सिलरेटर म्हणूनच मी म्हणतो I AM NEITHER FORWARD NOR BACKWARD I AM JUST AWKWARD. असो या विषयावर जितके लिहावे तितके थोडे.

माणसाच्या लिखित इतिहासातल्या ३०००+ वर्षांमधली फक्त २०० वर्षे अशी असतील जी संघर्षरहित असतील. विसाव्या शतकातच जेवढे लोक मारले गेले त्यावरुन हेच सिद्ध होतं की माणूस इतर प्राण्यांपेक्षाही भयंकर आणि हिंसक होऊ शकतो. पु.ल.देशपांड्यांचं एक सुंदर वाक्य आहे - पराक्रमाला करुणेची साथ नसली की त्याचं रूपांतर क्रौर्यात होतं. दुर्दैवाने हे अजूनही खरं आहे.

या विषयावर थंड डोक्याने बोलणे, लिहिणे फारच अवघड आहे. चित्रापेक्षा लेखणी फारच प्रभावकारक ठरते. मारिओ पुजोचा गॉडफादर वाचणं सिनेमापेक्षा क्लेशदायक आहे.(' जेव्हा कुणाला मारायचं असेल तेव्हा त्याच्याशी बोलणे त्रासदायक असतं') शरीराच्या चिंधड्या एका झटक्यात होतात, काळजाच्या सालट्या प्राण जाईपर्यँत निघत राहतात. .उन्माद होऊ नये म्हणून दारू पिऊन मेंदूला बथ्थड करावं लागतं. अथवा गीताछाप गिळता न येणारं तत्वज्ञान अर्जुनछाप लोकांना सांगून त्यांच्या हातापायाचा कंप थांबवण्यासाठी या तुझ्या गोतांना थंड डोक्याने मारलंस की तू स्वर्गात(!)जाशील हे पटवावं लागतं.

निरपराधांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे बळी घेणार्‍याला क्षमा नाही मग तो हिंसक नक्षलवादी असो किंवा कृरकर्म्यांना अहिंसेनी उत्तर देण्याचा प्रयत्न करणारे थोर थोर नेते असोत......त्यांनी नक्षलवाद्याला गोळी घालुन अप्रत्यक्षपणे तिच्या हातुन घडणार्‍या हत्त्या आणि गुन्हे थांबवले.