Skip to main content

अहो गोविंदशास्त्री!

लेखक Maheshswami यांनी शुक्रवार, 19/12/2014 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
अहो गोविंदशास्त्री! रविवारची अशीच एक सुस्तावलेली दुपार. पोटास तड लागेपर्यंत जेवण झालेलं. एक छानशी वामकुक्षी झालेली . फावल्या वेळात काय करावं असा विचार करताना सुचले कि चला, आज सतीश मामाला फोन करावा. सातिशमामा माझा सख्खा मामा. एका खेडेगावी शिक्षकाची नौकरी करतो. बऱ्याच गमती-जमती सांगत असतो तिकडच्या . फोनवर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मामा म्हणाला "अरे एक सांगायचं विसरलो. तुझा एक बालमित्र भेटला मला २ दिवसांपूर्वी. कोण असेल सांग पाहू?". आता हे गेसिंग चे गेम मला फार बोर होतात , उगीच त्याचे मन राखण्यासाठी मी २ मिनिटांचा पॉज घेतला, आणि म्हणालो " नाही बाबा ओळखता येत, सांग तूच !". मामा म्हणाला "अरे , तो गोविंद!". माझी सुस्ती एकदम उडाली, उत्सुकता , कुतुहूल अनेक प्रश्नांनी मन भरून गेलं ग़ोविन्द्ला भेटून , त्याच्याबद्दल काही ऐकून जवळपास वीस वर्षं उलटली होती . टिपिकल हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात तसं मी काही वेळासाठी flashback मध्ये गेलो. माझे शालेय शिक्षण झाले एका अगदी छोट्या खेडेगावामध्ये . आई आणि वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे घरात थोडं शिक्षणाला पूरक वातावरण होतं . लहानपणापासूनच लिहिण्याची, वाचण्याची , अभ्यासाची गोडी होती . शाळेत एक बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो. पण एक प्रॉब्लेम होता , मी कितीही घासून अभ्यास केला तरी नेहमी दुसरा नंबर यायचा वर्गात. कारण माझा मित्र गोविंद म्हणजे पहिला नंबर असं समिकरण होतं . अत्यंत कुशाग्र , तल्लख बुद्धीचा हा पोरगा. गणित म्हणजे तर त्याचा जीव कि प्राण . जणू आईच्या पोटातून शिकून आलाय. मोठी अवघड गणितं चुटकीसरशी सोडावयाचा . माझी एक मावशी गोविंद घरी आला कि त्याला मजेत "अहो गोविंदशास्त्री!" अशी हाक मारायची . तो बिचारा कावराबावरा होऊन जायचा . मला जाम हसू फुटायचं . गोविंद माझा अत्यंत चांगला मित्र. आमच्यात कधी कोम्पीटिशन नसायची . ( एक कारण हे हि होते कि तो फारच हुशार होता). पण तरीही त्या वयात जसा वाटतो तसा त्याचा हेवा वाटायचा कधीकधी . वाटायचं ह्याच्यामुळेच आपला कधी पहिला नंबर येत नाही. ह्याचा वडिलांची कुठेतरी बदली झाली पाहिजे, ह्याने शाळा बदलली पाहिजे असे एक नाही हजार विचार यायचे . आता विचार करून हसू येते. आमची मैत्री बाकी एकदम गाढ . दिवसभर त्याच्या घरीच पडीक असायचो . अस्सा मोठ्ठा वाडा . शेणाने सारवलेली जमीन. गोठ्यात दोन काळ्या कुळकुळीत दुभत्या म्हशी . ढणढणत्या चुलीवर भाकऱ्या थापणारी त्याची आई . त्याचे पहिलवान आजोबा . अगदी छान वातावरण होतं ते. खूप खेळायचो . एकत्र अभ्यास करायचो. भांडायचो हि भरपूर , आणि दुसऱ्या दिवशी परत खास मित्र होवून जायचो. नववीला असताना मी ते गाव सोडलं आणि जिल्ह्याचा ठिकाणी शिकायला गेलो . गोविंद तेथेच राहिला . हळूहळू नवीन मित्र झाले . गोविंद ला विसरायला होवू लागले . दहावीचा निकाल लागला , मला बऱ्या पैकी मार्क्स पडले , अपेक्षेप्रमाणे गोविंद ला खूपच चांगले मार्क्स पडले . योगायोगाने आमचे एडमिशन एकाच कॉलेजमध्ये झाले . एडमिशन चे सोपस्कार पार पडल्यावर त्याचे वडील त्याला घेऊन माझ्या घरी आले. माझ्या वडिलांनी विचारले "कुठले विषय घेतले तू गोविंद ?". यावर त्याच्या डोळ्यात पाणी तरळले . काहीच नाही बोलला तो. त्याचे वडील म्हणाले "Crop Science ! डॉक्टर बनवायचेय ह्याला . म्हणून गणित वगैरे नाही घेतले विषय . " माझे वडील म्हणाले " अहो , पण त्याला गणित एवढे आवडते ना ?, त्याला विचारले का तुम्ही ?" ते म्हणाले "त्याला काय विचारायचे , अहो ते देशपांडे डॉक्टर बघा , एका पेशंट चे २० रुपये घेतात तपासायला . दिवसभर पेशंट ची रीघ असते त्यांच्याकडे . काय मान आहे गावात त्यांना . पैशांच झाड आहे झाड त्यांच्याकडे ". माझे वडील निरुत्तर झाले . अधून मधून कधीतरी कॉलेज मध्ये भेटायचा गोविंद . उदास असायचा . गप्प गप्प राहायचा, फारसं बोलायचा नाही . माझ्या आई ला हे सांगितल्यावर म्हणाली " अरे , पहिल्यांदाच घराच्या बाहेर राहिलंय तो. नवीन शहर , नवीन कॉलेज . घराची आठवण येत असेल तत्याला . असं कर तू त्याला घरी घेऊन ये रविवारी . राहू दे इथेच दिवसभर . मन रमेल त्याचे ". त्या रविवारी घरी आला तो, पण शून्यात नजर लावून बसला . फार बोलला नाही . लगेच निघून गेला जेवण करून . हळू हळू मी माझ्या जीवनात गुंतून गेलो. भेटी गाठी कमी झाल्या आमच्या . अकरावीचा निकाल लागला , गोविन्द्ची आठवण आली . निकालाच्या यादीत मात्र त्याचे नाव कुठेच नव्हतं . तोही कॉलेज मध्ये दिसेनासा झाला होता . काही दिवसांनी त्याचे वडील भेटले आम्हाला . गोविंद ची विचारपूस केल्यावर त्यांचा चेहरा खर्रकन उतरला . म्हणाले "वाया गेला पोरगा .वाट्टोळ करून घेतलं ! अभ्यास, कॉलेज सगळं सोडून दिवसभर देव्हारया समोर बसून असतो. कोणाशी बोलत नाही, काही नाही ". गोविंद वर कसला तरी अनामिक ताण, दडपण आलं होतं . मानसिक रित्या अस्वस्थ झाला होता तो. स्वतःभोवती एक कोश विणून घेतला होता त्याने. ४-४ तास देवाची पूजा करायचा . शिक्षण तेथेच सोडले त्याने ! काळाच्या ओघात मीही विसरून गेलो त्याला, आणि आज अचानक त्याची आठवण ताजी झाली .मामाला विचारले "कुठे भेटला तुला तो ? काय करतो सध्या ? कसा दिसतोय? " त्यांनी सांगितले कि मामाला शाळेच्या कामानिमित्त एक पार्सल पोष्टात द्यायचे होते. पोष्टात चिटपाखरू नव्हते. एक मळक्या युनिफॉर्म मधला पोष्टमन जमिनीवर पेपर अंथरून झोपला होता . (आजकाल खेडेगावी पण पोष्ट रिकामं असतं . मोबाईल फोन ची क्रांती! ). मामानी त्याला उठवलं आणि पार्सल दिले . पोष्टमन ने तंबाखू वगैरे मळली आणि गप्पा सुरु केल्या . बोलण्याबोलण्यात समजले कि तोच गोविंद होता . माझा बालमित्र . अगदी आपुलकीनं माझी विचारपूस केली त्याने . लग्न झालेले त्याचे, २-३ मुलं पण आहेत . कसाबसा संसाराचा गाडा ढकलतोय . अजूनही तास न तास देवाची पूजा करतो . बोलण्यातून हे पण समजले, कि त्याच्या मनावर परिणाम झाला असं समजून घरच्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. मानसिक आजार बळावत गेला . कसेबसे लग्न उरकून टाकले, ह्या भ्रमात कि जबाबदारी पडल्यावर तर नीट वागेल. पण त्यात काही फारसा फरक नाही पडला .शेवटी कशीबशी , ओळखीने, त्याला एक पोष्टमन ची नौकरी लावली त्याच्या वडिलांनी . आणि संसार चा गाडा ढकलायला मदत केली . त्याचा फोन नंबर घेतला मामाकडून आणि लगेच त्याला फोन केला . बायकोनी उचलला असावा . म्हणाली पूजा करत आहेत. नंतर करा २ तासांनी . परत फोन केला . अगदी उत्साहात बोलला तो . शेवटी म्हणाला "फार पुढे गेलास महेश, तू मला मागे टाकून . मी बसलोय बघ इथे पत्रं वाटत, शिक्के मारत . " काय बोलावे समजेनासे झाले मला . उगीच त्याला चांगले वाटावे म्हणून म्हणालो "काही म्हण यार, तुझ्यासारखा गणित तज्ञ नाही भेटला गोविंद". एकदम उदासीन स्वरात तो उत्तरला "कशाचं काय राव, आयुष्याचं गणित चुकलं सगळं ". गलबलून आलं आणि पुढे काही बोलावलं नाही . फोन ठेवून टाकला निरोप घेवुन. उगाच अस्वस्थ वाटायला लागले. विचार केला ह्या गोष्टीत चूक कोणाची? त्याच्या पालकांची, त्याच्या मनाविरुद्ध स्वप्नं पहिली त्यांनी म्हणून ? त्याला कधी समजून नाही घेतलं म्हणून . कि गोविंदची चूक आहे, परिस्थिती समोर कमकुवत झाला म्हणून? कि त्या देव्हाऱ्यातल्या दगडाच्या देवाची, जो ढिम्म बसून सगळं पाहत बसला? गोविंद तासंतास हेच प्रश्न तर नसेल न विचारात त्या देवाला? वाटले कि या वेळी भारतात गेलो कि वेळ काढून गोविंद ला नक्की भेटू . थोडा वेळ विचार केला आणि मग मात्र ठरवले कि नकोच. कधीच नको भेटायला त्याला. माझ्या आठवणींमध्ये असणारा गोविंदच बरा आहे. तो तसाच ठेवायचाय . मामाला केलेला फोन विसरून जायचा आहे . घराच्या छतावर हुंदडणारा , घातांक , अपूर्णांक , व्यास, क्षेत्रफळ यात रमणारा, (७५३ X ५६४ / ३६३) चे उत्तर क्षणात सांगणारा, तेजपुंज डोळ्याचा, "अहो गोविंदशास्त्री " म्हटलं कि लाजणारा गोविंद… तो तसाच आठवणीत ठेवायचा आहे मला . तो पहिला नंबर अजूनही त्याच्याचसाठी राखून ठेवायचाय मला…!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6548
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

हे गोविन्दशास्त्री गणिताचे खाजगी क्लासेस का सुरु करत नाहीत ? लाखो रुपये कमावतील . मुख्य म्हणजे त्यांचे मन त्यांच्या आवडीच्या विषयात गुंतून राहील . अजुनही वेळ गेलेली नाही.

अशा जीवनकथा वाचल्या की सुन्न होऊन जातं क्षणभर सगळं.. शेवटच्या परिच्छेदातली भावना, विशेषतः शेवटचं वाक्य पोचलं आणि टोचलंही ..अगदी तुम्हाला काय वाटतं ते समजलं थेट.. मनापासून लिहिलं आहे, त्यामुळे उत्तम उतरलंय.

वाचून माझ्या एका हुशार मित्राची आठवण झाली. दहावीत बोर्डात येणारा मुलगा बारावीला नापास झाला. सुदैवाने त्याचं आयुष्य अगदीच वाया गेलं नाही,पण त्याच्या क्षमतेच्या मानाने अतिसाधारण प्रतीची नोकरी करतोय. भारतात गेल्यावर त्याला भेटलो, त्याने बायकोशी आणि मुलीशी ओळख करून दिली. आनंदात होता. बघून थोडं बरं वाटलं. नशीब कुठे कसं वळण घेईल सांगणं अवघड आहे.

जबर्दस्त लिहिता हो तुम्हि. बाकि काहि अपवाद वगळता तुम्हि आम्हि पण थोड्या अधिक प्रमाणात गोविन्द शास्त्रि.

आवडलं. मस्त लिहिलंय. @ नकोच. कधीच नको भेटायला त्याला >> अगदी.. इव्हन फोन झाल्यावर सुद्धा असेच वाटले असेल नाही?

अगदीच मनाला लागून गेला तुमचा लेख. मनापासून लिहिला आहे ते शब्दा शब्दातून जाणवतंय. परंतु त्याला न भेटण्याचा निर्णय मात्र आवडला नाही बाबा. (माफ करा पण थोडा स्वार्थी पण वाटला. तुमचा मित्र तिकडे आयुष्याची लढाई हरवून बसलाय आणि तुम्ही त्याला फक्त तुमच्या लहानपणच्या चांगल्या आठवणीत बंदिस्त करू इच्छिताय?) तुम्हाला हि दिसतंय कि तुमच्या लहानपणाच्या जिवलग मित्राची परिस्थिती तशी बरी नाहीये. मग मला वाटते कि तुम्ही त्याच्या मदतीला धावून जायला हवे. येथे त्याला पैशाची मदत नको आहे हे दिसतच आहे. त्याला गरज आहे नव्या उमेदीची. एका नव्या प्रकाशाची. जो कदाचित त्याच्या लहानपणीच त्याच्याकडून हिरावून घेतला गेलाय. देव मित्राच्या रूपाने त्याला तो प्रकाश देईल .. कदाचित! Remember, there are no coincidences! जे काही होतं त्याला काहीतरी कारण असतं. भले ते आपल्याला समजो न समजो. तुमचा सतीशमामाला झालेला फोन, सर्व गप्पा झाल्यानंतर मामाने केलेला गोविंदचा उल्लेख, तुमच्या मनात आलेला flash back, तुम्ही मिपावर लिहिलेला हा लेख, आणि मिपाकरांनी दिलेले प्रतिसाद हे सर्व व्यर्थ किंवा फक्त coincidence नाही आहे. (असे मला तरी वाटते.) तुम्हाला पटले नसेल तर विसरून जा. पण चांगल्या हुशार विद्यार्थ्यांची फक्त परिस्थितीमुळे झालेली पुढच्या आयुष्यातील वाताहात बघवत नाही.

>>>> माझ्या वडिलांनी विचारले "कुठले विषय घेतले तू गोविंद ?". यावर त्याच्या डोळ्यात पाणी तरळले . काहीच नाही बोलला तो. त्याचे वडील म्हणाले "Crop Science ! डॉक्टर बनवायचेय ह्याला . म्हणून गणित वगैरे नाही घेतले विषय . " माझे वडील म्हणाले " अहो , पण त्याला गणित एवढे आवडते ना ?, त्याला विचारले का तुम्ही ?" ते म्हणाले "त्याला काय विचारायचे , अहो ते देशपांडे डॉक्टर बघा , एका पेशंट चे २० रुपये घेतात तपासायला . दिवसभर पेशंट ची रीघ असते त्यांच्याकडे . काय मान आहे गावात त्यांना . पैशांच झाड आहे झाड त्यांच्याकडे ". माझे वडील निरुत्तर झाले . वडलांची महत्त्वाकांक्षा मुलाच्या भवितव्याचा घात करुन जाण्याचं कारण बनली. वाईट वाटलं. :( अनुभव लिहीलं आहे म्हणून, वर कुणीतरी क्लासेस बद्दल सुचवलं आहे त्याबद्दल विचार व्हावा.

मीही असाच उत्साहाने शेजारी रहाणार्या ७ वीतल्या मित्राला भेटायला गेलो होतो जवळपास २५ वर्षांनी. त्याला तर असे वाटले कुठुन आली ही ब्याद. आता आलाच आहे म्हनुन त्याने चहा पाजला. १० मिनीटात काम आहे म्हणुन कलटी मारली त्याने. आज शाळेतले जे जवळचे मित्र होते ते तेवढे जवळ नाहि राहिले, काही तेंव्हा जवळचे नव्ह्ते ते आता जवळचे झालेत. म्हणजे सगळेच असं नाही.

एकदम भावनेला हात घालता तुम्ही राव. आधी ते लाल रंग आणि आता हे गोविंदपंत.... मीही माझ्या बर्‍याच शाळकरी मित्रांचा शोध घेतोय. या शोधामध्ये एक शाळेतला जिवलग मित्र देवाघरी गेल्याचं कळालं आणि मग तुमच्यासारखंच वाटलं - नसता शोध घेतला तर बरं झालं असतं....

In reply to by खटपट्या

हां यार, शाळेतल्या मित्रांबरोबर जी निरागस मैत्री होते ना, तशी नंतर कधीच होत नाही...

हे आपल्या सद्यस्थितीचे दर्शन आहे. आईवडील ठरवतात मुलाने काय करावे ते. मुलाला काय आवडते ते विचारणे आवश्यक समजले जात नाही. मग एक काळ मेकॅनिकल इंजिनियरिंगची चलती असते, नंतर मेडिकलची, तर नंतर आयटीची... पेरेंट प्रेशर नाही तर पियर प्रेशर मुलाने काय करायचे ते ठरवते ! :( सुंदर लिहीले आहे.

थोडक्यात इतकेच समजले की, आपल्या मुलांचा "गोविंदशास्त्री" होवू देवू नका....

"तुम्ही आम्ही थोडेफार गोविंदशास्त्रीच"+100हा नवीन लेखाचा धागा आहे @पिंपातला उंदिर अगदी बरोबर लिहिलंत एप्रिलमध्ये आमच्या ७१च्या अकरावीच्या वर्गमित्रांचे सम्मेलन झाले. काही टाटा बिरलांच्या दृष्टीने आम्ही गोविंदशास्त्रीच ठरलो .

एका मोठ्या मानसिक धक्क्यातून कसाबसा सावरला आहे तो. नाहीतर अशीच हुशार पण ह्यापेक्षाही वाया गेलेली व्यक्ती बघण्यात आहे. पण अजूनही मानसिक आधार देवून काही करता आले तर बघा, नक्कीच फायदा होईल त्याला.

In reply to by सस्नेह

१९९३ साली , मेडिकल साईडला ज्यांना जायचे असायचे , ते जनरली crop science किंवा फिशरी निवडायचे १२ विला म्हणजे mathematics ड्रोप करता यायचे. इंजिनियर ज्यांना व्हायचे ते electronics किंवा computer scienece हे विषय निवडायचे त्यांना botany/zoology ड्रोप करता यायचे.

In reply to by Maheshswami

सीईटी येण्यापूर्वी बहुदा लातूर साईडला हे खूळ फार होते. मेडीकलला जायचे तर क्रॉप सायन्स घ्यायचे. त्याची परीक्षा शाळा लेव्हलला असायची १००/१०० मार्क्स अ‍ॅड्जस्ट करता यायचे. तसेच दुसरी लँग्वेज मराठी न घेता पाली/संस्कृत घ्यायची . त्यात कमीतकमी ९५ पर्यंत मार्क्स घेता येत. क्रॉप सायन्सची तुकडी सगळ्या ९६ अँड अबोव्ह मार्कस वाल्यांची असायची. अत्यंत अत्याचार झाले या मधल्या पिढीवर. सध्याच्या पिढीचे नशीब थोर म्हणून आय टी, हॉस्पिटॅलिटी, एम बी ए असे पैसे मिळवायचे विविध मार्गं उपलब्ध झालेत.

.अगदी परिणामकारक लिहिलय. गोविंदाबद्दल वाईट वाटले, त्याच्यासारख्या हुशार मुलाच्याबाबतीत असे व्हायला नको होते पण झाले, बिचारा प्रत्येक क्षण आतुन रडत असेल. वर सुचविल्याप्रमाणे जर त्याने त्याचा हातखंडा असलेल्या गणिताच्या शिकवण्या घेतल्या तर त्याची परीस्थिती सुधारु शकते, चांगले पैसे मिळू शकतील शिवाय केल्या कामाचे समाधानही मिळेल. एका चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद.

काही असो. चांगलं लिहिलंय. असे दुर्दैवी जीव अजूनही आजूबाजूला बघते. माझ्या मुलाच्या मित्रांनी काय करायचं याचे निर्णय त्यांचे वडीलच सहसा घेतात. आयांना काय वाटतं हे कधी समजलं नाहीच फारसं. "हे बघतायत काय ते" असंच उत्तर बहुधा. पण त्या मुलाला काय हवंय हे तर कोणीच विचारत नाही कधी.

गणिताबद्दल का आकस होता वडिलांना ते समजल नाही, पण डॉक्टर का बनायचे होते ते समजले. अतिशय सुरेख लिखाणशैली!!

In reply to by स्पंदना

आकस नाही. त्यावेळी बारावीला पीसीबी मध्ये ९९-१०० परसेंट असले तर मेडिकलला अ‍ॅडमिशन असायची. त्यामुळे फक्तं या विषयाचा अभ्यास करता यावा म्हणून इतर 'अनावश्यक' विषय म्हणजे सेकंड लँग्वेज आणि मॅथ्स सोडायचे. त्याऐवजी क्रॉप सायन्स घेऊन दोनशे मार्क्स मिळवायचे म्हणजे एकंदर टक्केवारीही वाढते हे गणित सोडण्यामागचे गणित आहे.

कथा आवडली. माझ्या वर्गातल्या एका मित्राला ११वीत सर्व विषयांत ३३% मार्क्स मिळाले होते. अर्थात अस्मादिकांनी ही काही दिवे नव्हते लावले. (शिवाय विज्ञान या शाखे कडे ढुंकून ही पहिले नव्हते) २० एक वर्षानंतर संध्याकाळी चार्टर बसची वाट पाहत कृषी भवन वर उभा होतो. एक मोठी गाडी जवळ येऊन थांबली. तो दिसला. जवळच्या एका हॉटेल मध्ये गप्पा मारल्या. ११ वी नंतर वडलांनी मायापुरीत एका हौजरी कंपनीत विक्रय प्रतिनिधी (कमी पगाराची नौकरी)म्हणून कामावर लावले. आणि काही वर्षानंतर स्वत:चे काम सुरु केले. आज कोठी,बंगला गाडी सर्व आहे.

:( पण गणित हेच एकमेव कारण होतं का? च्यायला त्याकाळी समुपदेशन वगैरे प्रकार नव्हताच म्हणायचा. बापाला कन्व्हिन्स करणं अगदीच अवघड असेल तर मेडीकल शिकता शिकता पॅरलली गणिताचा व्यासंग करायचा सल्ला दिला असता कुणितरी... किंवा आरोग्यशास्त्रातच गणित शोधायला जमलं असतं तर सगळाच आनंदीआनंद झाला असता. सगळाच घोळ झाला राव :(

लेखन आवडले... गोविंद बद्धल वाईट वाटले. :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

माझा एक सुपरजीनीअस गणितज्ञ वर्गमित्र आज भूलतज्ञ आहे (भूलतज्ञ वाईट करीअर आहे असे नाही, त्याच्या पिंडाशी कुठे जुळत नाही). शाळेनंतर जेव्हा त्याची बातमी आली सात-आठ वर्षांनी की तो भूलतज्ञ झाला म्हणून. त्याला आणि मला खगोलशास्त्राचे भयंकर वेड होते. तासंतास आम्ही दोघे त्याच्या वडीलांनी कुठूनतरी आणलेली खगोलशास्त्रावरची मोठी मोठी रंगीत पुस्तकं वाचत असायचो. माझ्या घरात तर कुणी नव्हते असा मुलांचा कल ओळखणारे पण त्याचे सगळे कुटूंबिय चांगले उच्चशिक्षीत असून त्याला वेगवेगळ्या परिक्षा द्यायला लावायचे. (मी स्वतः विज्ञान, कला असा प्रवास करत शेवटी कलाशाखेची एक पदवी झाल्यावर घरच्यांशी भांडून जेजेत दाखल झालो.) तो कुठेतरी इस्रो किंवा नासामधेच जायला हवा होता. पण त्याला डॉक्टरीकीची कसली भूल पडली ते आजतागायत समजले नाही. लेखकानी मांडलेली भावनाच मनात आहे, मनात अजून तोच भावी खगोलशास्त्रज्ञ उमटतो त्याचे नाव आले की. त्याला आता भेटायची इच्छा होत नाही, भीती वाटते, त्यालाही जुने दिवस आठवून उगाच त्रास होईल. बायको म्हणते भूलशास्त्रातही गणिताचा भक्कम वापर होतो, त्यामुळे त्याचे नुकसान झाले आहे असे आपण नाही म्हणू शकत. मला ते पटत नाही.