✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चपला आणि सत्कार - भाग १३ - अंतिम.

५
५० फक्त यांनी
गुरुवार, 12/15/2011 - 08:33  ·  लेख
लेख
नाथा अन बाकीचे चार जण केगांव पासुन निघाले, तिथुन बार्शी रोडला येउन ते मधल्या रस्त्यानं तामलवाडीला आले, तिथं बाउंड्रीच्या हॉटेलजवळ गाडीत अजुन थोडी भाजी भरुन घेतली, पुढं जाउन एकाआडवाटेला अंधारात थांबुन दोघांनी गाडीच्या नंबरप्लेट बदलल्या, समोरचे शो चे लाईट काढुन टाकले, आणि लटकणारा हनुमान, डॅशबोर्डावरचा गणपती काढुन ठेवला. त्या दोघांपैकी एकजण अंधारातच चालत पुन्हा सोलापुरच्या दिशेनं यायला निघाला. मध्ये एका बाजुच्या शेतात जाउन त्यानं दोन्ही नंबर प्लेटवर बरोबरच्या बाटलीतलं थिनर टाकलं अन दोन्ही प्लेट जमेल तेवढ्या स्वच्छ केल्या, द्गडानं वेड्यावाकड्या केल्या, एक तिथंच मातीत पुरली अन दुसरी पुढं चालत येउन एका वाहणा-या नाल्यात भिरकावुन दिली. टेम्पो सुसाट पुढं निघाला,पहाटे पर्यंत लातुर - औसा रोडवर असलेल्या एका मठात पोहोचायचं होतं, पण त्याआधी बरोबर घेतलेली भाजी उस्मानाबाद मार्केटला टाकुन तिथं पोहोचायचं होतं. आता हा मठ या चार जणांचा पुढचा दोन महिने सांभाळ करणार होता. रात्री तुळजापुरनंतर एका ठिकाणी जेवायला थांबले होते तिथं फार कुणीच बोललं नाही, एखाद्याचा जीव घेउन नुसतं वावरणंच खरंतर अवघड असतं आणि इथंतर चार तासातच सगळे एकत्र बसुन जेवण करत होते, किंवा जेवण्याचा प्रयत्न करत होते, समोर आलेल्या तंदुरी चिकनच्या जागी वेगळंच काही दिसत होतं. नाथा ओरडला ' अबे बारक्या, हिरवी भाजी नाय का काय, त्ये घेउन ये काय वातड झालंय हे चिकन ' खरंतर हे बोलताना त्याच्या डोक्यात काल पोत्यात बांधताना आनंदच्या पायाला आलेला वातडपणा होता. आनंदला पाणी पाजुन निघतानाच त्याच्या लक्षात आलं होतं की हा टिकणार नाही, प्रशाच्या गोठ्यातच त्याच्या पँटवर मुंग्या चढताना त्यानं पाहिल्या होत्या. तेवढ्यात वेटरनं पालक पनीर आणुन दिलं, त्याला गार झालेल्या रोट्या बदलुन द्यायला सांगितल्या. अजुन दोन तासाचा प्रवास बाकी होता. अप्पा बराच वेळ फोन लावत होते, पण तो स्विअ ऑफ येत होता. मग कंटाळुन ते घरी आले. घरी बाकी सगळ्यांनी जेवुन घेतलेलं होतं. सुनेनं आणुन दिलेलं दुध पिताना अप्पा गप्पच होते. सुनेनं त्यांच्या उशा आणि पांघरुणं आणुन दिली तसे अप्पा झोपायच्या तयारीला लागले. झोपेचं सोंग घेतलं अन पडुन राहिले. यावेळी जाधव घराच्या गच्चीवर बसुन दोन घोट व्हिस्की आणि तांब्याभर पाणी घेउन बसले होते. त्यांना घरुन पाणी हवं तेवढं मिळायचं पण व्हिस्की मात्र दररोज दोन घोटच आणि बरोबर मोजुन पाच काजु आणि अर्धी वाटी शेंगा टरफलासहित. आज त्यांचं जिगसॉ पुर्ण होत आलं होतं. फक्त एकच तुकडा बसत नव्हता, म्हणजे त्याचा आकारच होता गोल, त्या जिगसॉतली जागा पण होती गोलच पण तो तुकडा कसा ही फिरवुन बसवला तरी चित्र पुर्ण होत नव्हतं, प्रत्येक वेळी एक वेगळाच अर्थ दाखवत होतं. दोन घोट व्हिस्किनं रोज किमान लांबच्या चांदण्या जवळ दिसायच्या पण आज ही समोरची डिझाइन लांब चालली होती. कंटाळुन जाधव उठले, व्हिस्की संपलेलीच होती. घरात झोपायला आले, गुपचुप बेडरुममध्ये येउन बेडवर अंग टाकुन दिलं. पहाटेला स्वामी श्री अवतारी बाबा आश्रमाच्या कुष्ठरोग विभागार तीन जण सेवेकरी म्हणुन भरती झाले, कुणी फारसं बोललं नाहीच. तिघांनी आंघोळी आटोपल्या आणि आश्रमातले कपडे घालुन कामाला लागले. झाडलोट आणि तिथल्या रुग्णांचे कपडे धुणं ही कामं त्यांच्याकडं होती. सगळा प्रकार मुक्यानंच चालायचा, सुपरवायझर तसा पोरगेलासा तो यांना पाहुनच घाबरला. एका रजिस्टर मध्ये त्यानं यांची नावं लिहुन घेतली. जेंव्हा ते कपडे धूण्याच्या जागेकडं निघाले तसं सुपरवायझरनं त्यांना गमबुट घालायला सांगितले, तिघांनी नकार दिला अन कामाला लागले. इकडं सोलापुरात दोन मोठ्या व्यक्ती सिव्हिल मध्ये अ‍ॅडमिट झाल्या एक अप्पा अन दुसरे माननीय. अप्पा सकाळी नेहमीप्रमाणे उठले नाहीत म्हणुन त्यांना दबाखान्यात आणलं गेलं रात्री कधीतरी एक माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक येउन गेला होता असं अनुमान काढला गेला, तालमी घुमलेलं शरीर म्हणुन वाचले होते. तिकडं माननीय अ‍ॅडमिट झाले ते कायदा अन राजकीय आजारापोटी, त्यांच्या वकिलानं अटकपुर्व जामीनाची तयारी सुरु केली होती. पोलिसांनी तालीम, मंडळ कार्यालय पुन्हा पिंजुन काढलं, काहीच मिळालं नाही. दोन दिवसांनी अनपेक्षितपणे जाधवांच्या हाती एक धागा आला, आनंद बरोबर रात्री तिथं गेलेला त्याचा एक चेला, जखमी झाल्यावर तो गावाकडं जाउन राहिला होता एवढे दिवस आणि आता सगळं शांत झालं असेल असा विचार करुन तो परत आला होता. त्याला बोलता करायला दुपारचे चार वाजले, पुन्हा एकदा पोलिसांनी तालीम, मंडळ कार्यालय पुन्हा पिंजुन काढलं, काहीच मिळालं नाही. दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत जाधवांचा रिपोर्ट कमिशनर साहेबांच्या समोर होता. एकुण अठरा जण सोलापुरातुन गायब होते, प्रत्येकजण संशय घेण्यासारखा होता पण सगळ्यांची नावं कधी कुठं आलेली नव्हती, काही नावं मात्र या असल्य भानगडीत नेहमीच असायची. आता या सगळ्यांना हुडकणं अन चौकशी करणं बरंच वेळ खाणारं काम होतं. जाधवांनी त्याची परवानगी मागितली पण कमिशनर साहेबांनी दोन चार दिवस थांबायला सांगितलं. मनात थोडं निराश होउन जाधव बाहेर आले, ऑफिस समोरच्या बागेत थोडा वेळ उभारले आणि मग घरी गेले. केगांव रोडवरच्या खड्ड्यात पडलेली बॉडी ही दै.संचार,केसरी अन तरुण भारत ची हेडलाईन झाली ती बरोबर तीन दिवसांनी.पोलिस प्रेस फोटोग्राफरना जागेवर घेउन गेले तेंव्हा तिथं मुंग्या लागलेल्या होत्या, बाजुला उभं राहवत नव्हता. बॉडी कुणाची हे न माहित नसल्यानं गर्दीत फारशी रडारडी नव्हती, दोन ठिकाणी दगडानं ठेचुन मारण्या मागच्या उद्देश नक्की समजत नव्हता, तरीसुद्धा धार्मिक तणाव होउ नये म्हणुन पोलिसांनी बॉडी लगेच हलवली. पुढचा तपास चालु झाला, वायरलेस वरुन ह्या सगळ्याबद्दल जाधवांना समजलं होतं, पण त्यांच्या समोर आनंदच्या माणसानं दिलेला जबाब असल्यानं यावर आता जास्त विचार केला नाही, पण आपल्या जिगसॉ मध्ये ह्या तुकड्याला सुद्धा एखादी जागा द्यावी लागेल याचा अंदाज त्यांना आला होता. उद्यापासुन जाधव रजेवर जाणार होते, त्यांना नागपुरला जाउन नविन नोकरीच्या काही प्रोसेस पुर्ण करायच्या होत्या. मग आज यात जास्त अडकायचं नाही असा सोयिस्कर विचार करुन ते नेहमीप्रमाणे राउंडला निघुन गेले. आठ दिवसांनी जाधव नागपुरला जाउन परत येईपर्यंत प्रत्यक्ष केसमध्ये काही विशेष घडलेलं नसलं तरी बॅकग्राउंडला बरंच काही झालं होतं, त्यांच्या जिगसॉचं चित्रच बदलायची वेळ आली होती, अप्पांना हॉस्पिटलमधुन डिसचार्ज मिळाला होता,माननियांनी अटकपुर्व जामीन मिळवला होता, कमिशनरनी सगळी फाईल होम सेक्रेटरींकडे पोहोचवली होती, तिथुन त्याची एक कॉपी पक्ष प्रदेशाध्यक्षांकडे गेली होती. तालीम, मंडळाचं कार्यालय पुन्हा कार्यकर्त्यांनी भरुन गेलं होतं, तरीही त्या अठरापैकी कुणीच परत आलेलं नव्हतं.नवरात्र शांततेत पार पडलं होतं. जनसामान्य आपापल्या रोजच्या जगण्यात गढुन गेले होते, मदनचा भाउ आणि वहिनी पुन्हा आपल्या गावाला निघुन गेले, जाताना मदनच्या आईला बरोबर घेउन गेले. त्याच्या बापानं आपलं दुकान पुन्हा सुरु केलं, दुकानात एक फुटभर फोटो लावला होता मदनचा, त्याला रोज हार गंध करायचा, आणि बास. एका दोघांच्या जाण्यानं जगरहाटी थांबत नाही. बांगरे घरी आले होते पण आल्यापासुन आजारीच होते. काडादी चाळीतला डॉक्टर दररोज येउन औषध देउन जायचा पण त्यामागं माणुसकी कमी अन त्यांच्या मुलीचं हातात हात देउन थँक्यु म्हणणं जास्त होतं असं तिच्या आईला वाटायचं. मोठा फरक पडला होता तो आनंदच्या घरी, घरचा कमावता असा गेला होता की त्याची बायको एकदमच विनाधार झाली, आणि मरणाच्या बरोबर पोलिस केस असल्यानं नातेवाईक पण दिवसपाण्यापर्यंतच घरी येत होते, नंतर कुणी फिरकलंच नाही ना सासरचं ना माहेरचं. कॅरम क्लब चालवणं तिला शक्य नव्हतं, दहावी पास या कुवतीवर कुठं नोकरी लागायची शक्यता नव्हती, घरची गाडी विकावी म्हणलं तर ती पोलिसांनी जप्त करुन ठेवलेली, ती सोडवायलाच जमादारानं चाळीस हजार मागितले होते. ज्या वस्तीत ' वहिनि' म्हणुन मिरवली होती, तिथंच चार घरी धुणी भांडी करुन जगायची वेळ आली होती, माननीयांच्या घरी दोन तीन वेळा जाउन आली, त्यांच्या आईनं अन बायकोनं दोन्ही वेळ पाच दहा हजार दिले पण, ते संपायला फार वेळ लागला नाही, पण ज्या दिवशी अप्पांना डिसचार्ज मिळाला त्या दिवशी अनपेक्षितपणे एकजण घरी येउन दोन लाख देउन गेला होता, तो नाथाचा माणुस होता. अप्पांनी हे करायला त्याला मुश्ताकला मारलं त्याच दिवशीच सांगितलं होतं. या पैशातुनच शेवटी तिनं आपल्याला जे जमेल ते करायचं ठरवलं, कॅरम क्लबच्या जागेत एक टपरी काढायची चहा भजीची. कोजागिरी पौर्णिमेदिवशी अवतारी बाबा आश्रमात बरीच गडबड होती, उत्सव होता, जेवणं होती. सगळे जण गडबडीत कामाला लागले होते, पार संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळे कार्यक्रम संपले. संध्याकाळची आरती झाल्यावर महाप्रसादाची गडबड बाहेर चालु झाली तेंव्हाच मठाच्या प्रमुखांच्या खोलीत आठ जण जमले , त्यात नाथा, हणमंता आणि त्याच्याबरोबरचं दोघं जण होते. मठप्रमुखांनी समोर ठेवलेल्या ताटातुन अरगजा मुठीनंच उचलला अन या चौघांच्या कपाळाला मळवटासारखा लावला, 'आई भवानीचा उदो उदो' असा गजर झाला, चौघांनी सगळ्यांकडं आनंदानं पाहिलं, मठप्रमुखांनी इशारा केल्यावर त्यांच्या बाजुला बसलेले अप्पा उठले, खुर्च्यांमागं ठेवलेल्या पोत्यातनं चार खोकी काढ्ली, त्यावर थोडा अरगजा लावला अन प्रत्येकाच्या हातात एकेक खोकं दिलं. चौघांनी खोकं घेउन अप्पांच्या पायावर डोकं ठेवुन नमस्कार केला, अप्पांनी नाथा अन हणमंताला जवळ घेतलं, दोघांच्या डोक्यावरुन हात फिरवला ' बाबांनो, आता सहा महिने तरी दिसु नका इकडं, निघा लगेच, आणि चपला घाल की बे आता, मानाच्या आहेत म्हणजे काय कोनाड्यात ठेवणार का काय घरी निउन.' चौघांनी खोकी उघडली अन त्या नव्या को-या चपला कपाळी लावुन पायावर चढवल्या. मठातला पुजारी शोभावा असा एक इसम तिथं होता त्यानं एक तांव्या बरोबर दिला आणि सांगितलं इथुन थेट अहमदपुरवरुन नांडेड्ला जा गोदावरी माईत यांचं विसर्जन करा आणि मगच पुढं जा' त्या तांव्यात मदनच्या भावाकडुन घेतलेल्या राख अन अस्थि होत्या. मठाच्या बाहेर एक अवतारी बाबांच्या पोस्टरनी सजवलेली ट्रॅक्स उभीच होती,विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी ती संपुर्ण भारतात यात्रा करणार होती.सगळेजण ट्रॅक्सजवळ आले, मठप्रमुखांनी नारळ फोडला, चारी चाकांखाली लिंबं ठेवली होती ती फोडुन हणमंतानं गाडी पुढं घेतली, गाडी कचकचतच चालवतोय हे बघुन नाथा त्याला म्हणाला,'अबे पहिल्यांचा चालवतोय का भाड्या,नीट चालव की'यावर हणमंता बोलला'पैलवान, महिना झाला असंल ना बिनचपलेचं फिरतोय, आज एकदम चपला घालुन जमेना बगा, हुईल एक दोन दिवसात सवय, जरा दम धरा' समाप्त -- चपला आणि सत्कार बद्दल -- सत्कार हा एक मान असतो, सन्मान असतो, एखाद्यानं केलेल्या चांगल्या मोठ्या कामाची दिलेली पावती असते. हार, पुष्पगुच्छ एखादं मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं याचं सर्वमान्य स्वरुप असतं. पण ब-याच ठिकाणच्या गँगवॉर मध्ये अशा ब-याच या परंपरा असतात . त्यापैकीच ही एक, एका गँगवाल्यांनी दुस-या गँगमधल्या एखाद्याला उडवलं की, याचा बदला घेण्यासाठी त्या गँगमधल्या दोन चार जण पुढं येतात अन हा बदला पुर्ण होईपर्यंत ते पायात चपला घालत नाहीत,अनवाणी राहतात. ब-याचदा याची सुरुवात जवळपासच्या एखाद्या देवळात देव देव करुन होते, म्हणजे कुणी विचारलंच तर 'देवाचं' असं सांगता येतं. आणि हो भले हा बदला महिन्यात घेतला जाउदे नाहीतर त्याला वर्षे लागुदे,अगदी स्वताचे लग्नकार्य मध्ये येउदे नाहीतर उन्हाळ्यात रस्त्यावरचं डांबर वितळायला सुरु होउ दे पण पायावर चप्प्ल चढत नाही यांच्या. जेंव्हा हा बद्ला घेउन होईल, तेंव्हा त्या सर्वांचा गँगकडुन नव्या को-या चपला देउन सत्कार केला जातो. याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारलेली ही संपुर्णपणे काल्पनिक कथा आहे, यातील व्यक्ती, स्थळ, घटना, संवाद यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, घटना वगैरेशी कोणताही संबंध नाही, आणि तसे झाल्यास तो केवळ योगायोग आहे. चपला आणि सत्कार - भाग १ - http://misalpav.com/node/19342 चपला आणि सत्कार - भाग २ - http://misalpav.com/node/19352 चपला आणि सत्कार - भाग ३ - http://misalpav.com/node/19614 चपला आणि सत्कार - भाग ४ - http://misalpav.com/node/19642 चपला आणि सत्कार - भाग ५ - http://misalpav.com/node/19672 चपला आणि सत्कार - भाग ६ - http://misalpav.com/node/19700 चपला आणि सत्कार - भाग ७ - http://misalpav.com/node/19723 चपला आणि सत्कार - भाग ८ - http://misalpav.com/node/19751 चपला आणि सत्कार - भाग ९- http://misalpav.com/node/19815 चपला आणि सत्कार - भाग १० - http://misalpav.com/node/19875 चपला आणि सत्कार - भाग ११ - http://misalpav.com/node/19911 चपला आणि सत्कार - भाग १२ - http://misalpav.com/node/20000
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहती जागा
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
13607 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

भन्नाट कथा मालक. प्रचंड

प्रचेतस
गुरुवार, 12/15/2011 - 08:52 नवीन
भन्नाट कथा मालक. प्रचंड वेगवान, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी. कथानक गुंतागुंतीचे असूनही खूपच छान खुलवलंय.
  • Log in or register to post comments

+१

स्पा
गुरुवार, 12/15/2011 - 10:06 नवीन
खतरनाक जमलीये कथा, त्याला सोलापुरी वातावरणाचा तडका आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जबरा!

क्रान्ति
गुरुवार, 12/15/2011 - 09:08 नवीन
कमालीची वातावरणनिर्मिती केलीस हर्षद! झटक्यात सगळं सोलापूर फिरवून आणलंस, तेही त्या टोळीयुद्धाच्या दहशतीसह! आवडली ही कथा.
  • Log in or register to post comments

हुश्श्श्य...... घातल्या ब्वा

प्यारे१
गुरुवार, 12/15/2011 - 09:52 नवीन
हुश्श्श्य...... घातल्या ब्वा चपल्या लोकांनी एकदाच्या. सोलापूरातली काहीच माहिती नसली तरी सगळीच्या सगळी चित्रं डोळ्यापुढं उभी राहिली. एवढ्या डिटेलींग वर एक आक्खा चित्रपट विना दिग्दर्शक काढता येईल. रामगोपाल वर्माचा (जुन्या. फॅक्टरीवाल्या नाही ;) ) चित्रपट पाहतोय असं वाटलं. (कम्पनी, सत्या, सरकार पैकी एखादा)
  • Log in or register to post comments

+१

अन्या दातार
गुरुवार, 12/15/2011 - 10:04 नवीन
अगदी असेच म्हणतो. ५०राव, तुम्ही पटकथा वगैरे लिहायला घ्याच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

खुपच भारी

साबु
गुरुवार, 12/15/2011 - 10:48 नवीन
एकदम मस्त झाली कथा... शेवट पण छान ..व्यवस्थित सम्पवलीत. - ५०राव, तुम्ही पटकथा वगैरे लिहायला घ्याच. असेच म्हणतो... पण दिग्दर्शक त्या ताकदीचा पाहिजे... कथा वाचताना मी पण त्यन्च्याबरोबर गाडीतुन फिरतोय... असे वाटत होते. नाथाचा तर चेहरा दिसत होता मला... _/\_
  • Log in or register to post comments

पन्नास राव,

प्रास
गुरुवार, 12/15/2011 - 11:09 नवीन
तुमचं व्यक्तिचित्र म्हणून शक्य झाल्यास तुमच्याच पदकमलांचा फोटू ठेवा बरं! रोज दण्डवत् घालीन म्हणतो. 'चपला आणि सत्कार' ही अख्खी लेखमालाच भन्नाट आहे. टोळीयुद्धातल्या सगळ्याच प्रथा काही माहिती होण्यासारख्या नसतात पण एक नवी प्रथा आज कळली. पहिल्या भागातले संदर्भ शेवटल्या भागात झक्कपैकी जुळतात की ज्याचं नाव ते! मग हर्षदच्या सुरूवातीला नाथाच्या अनवाणी पायाकडे पाहिल्यानंतरच्या प्रतिक्रियेचा इथे झालेला उलगडा आम्हालाही नवं ज्ञान देतो. आता हे नक्की की तुम्ही तुमच्या लेखनाच्या गुणवत्तेचा बार एकदम उंचावर नेऊन ठेवला आहे. यापुढेही अशाच लिखाणाची प्रतिक्षा राहिल. पुलेशु. तुमच्या लिखाणाचे आता आम्ही ऑफिशिअली फ्यान.... :-)
  • Log in or register to post comments

अतिशय भन्नाट... एक विनंती

गवि
गुरुवार, 12/15/2011 - 12:18 नवीन
अतिशय भन्नाट... एक विनंती आहे. हे भाग एकत्र करुन पुन्हा एकदा सलग वाचनासाठी प्रकाशित करावेत, किंवा पीडीएफ, ई-बुक स्वरुपात एकत्रित उपलब्ध करावेत. लिंकांच्या मार्गे एकेक करुन भाग वाचताना बराच ब्रेक / रसभंग होतो. त्यापेक्षा यापुढील नवीन वाचकांना एका दमात वाचायला आता तरी हरकत नसावी.. कारण फार थोड्या कथा एका बैठकीत संपवण्यासारख्या असतात. त्यातली ही एक आहे.
  • Log in or register to post comments

अतिशय भन्नाट... एक विनंती

सुहास..
Mon, 12/19/2011 - 16:06 नवीन
अतिशय भन्नाट... एक विनंती आहे. हे भाग एकत्र करुन पुन्हा एकदा सलग वाचनासाठी प्रकाशित करावेत, किंवा पीडीएफ, ई-बुक स्वरुपात एकत्रित उपलब्ध करावेत. +१ टु गवि !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+२

मी-सौरभ
Mon, 12/19/2011 - 18:48 नवीन
रच्याकने... तुमच्या ब्लॉगवर तरी हे भाग सलग उपलब्ध आहेत का???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मस्त....

मन१
गुरुवार, 12/15/2011 - 14:38 नवीन
सर्वच भाग वाचून प्रतिसाद द्यायला म्हणून थांबलो.(माझा वेग कमी असल्यानं पुन्हा एकदा निवांत वाचायचं आहे अजून) वरती प्रासनं म्हटल्याप्रमाणं आता हे नक्की की तुम्ही तुमच्या लेखनाच्या गुणवत्तेचा बार एकदम उंचावर नेऊन ठेवला आहे. +१
  • Log in or register to post comments

लै भारी!

तत्सत
गुरुवार, 12/15/2011 - 15:32 नवीन
लै भारी! हान तिच्या! दनका!
  • Log in or register to post comments

हाही भाग आवडला. प्रत्येक

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 12/15/2011 - 16:05 नवीन
हाही भाग आवडला. प्रत्येक ओळीतुन लेखाकाच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा प्रत्यय येतो आहे.
  • Log in or register to post comments

भाग १३ - अंतिम संपला, अनं मिपाला

आत्मशून्य
गुरुवार, 12/15/2011 - 16:55 नवीन
भाग १३ - अंतिम संपला अनं मिपाला मारिओ पूझोचा मराठी अवतार गवसला.... एकदम आवडॅश. ओमेर्ता सारख्या संकल्पनांवरही आपल्याकडून दर्जेदार लेखनाची अपेक्षा निर्माण झालि नाही तरच नवल.
  • Log in or register to post comments

ज ह ब ह र ह द ह स्त !!!!!

सोत्रि
गुरुवार, 12/15/2011 - 16:59 नवीन
५०फक्त, इतके दिवस क्रमश: भाग येत होते पण एकही भाग वाचला नव्हता. आज सगळे भाग एकत्र एका दमात वाचून काढले. सोलापुरी तडका एकदम मस्त! _/!\__/!\__/!\_ बास आत्ता फक्त एवढेच येते आहे मनात वाचून. बाकी प्रत्यक्ष भेटीत बोलू शकेन. एक मस्त कादंबरी होउ शकेल, प्रकाशित करायचा विचार नक्की करा! - (सोलापुरी) सोकाजी
  • Log in or register to post comments

आला का अंतिम भाग, याचीच वाट

किसन शिंदे
गुरुवार, 12/15/2011 - 17:28 नवीन
आला का अंतिम भाग, याचीच वाट बघत होतो.! आता सगळे भाग एकत्र करून वाचतो.
  • Log in or register to post comments

सगळी पात्र एकदम जिवंत

किचेन
गुरुवार, 12/15/2011 - 17:43 नवीन
सगळी पात्र एकदम जिवंत झालीयेत.मी सगळे भाग एकदम वाचल्यामुळे मला प्रत्येक पात्रात कोणाचा तरी चेहरा दिसत होता.नाथा मध्ये पिंजारामाध्ला विष्णू दिसत होता. पहिल्या भागात हर्षद होता ,त्याच पुढ काय झाल?
  • Log in or register to post comments

महोदय, शेवट्चा भाग

देविदस्खोत
गुरुवार, 12/15/2011 - 19:31 नवीन
महोदय, शेवट्चा भाग " १३ " वाचायला मिळाला. सोलापुरातील समाजजीवनाशी परिचित असल्यामुळे शेवट अपेक्षेप्रमाणेच झाला. पण काहि म्हणा आपल्या ह्या कथेने वाचकांना जबरदस्त खिळवून ठेवले होते हे मात्र खरे !!!!!! पुढील अशाच एखाद्या जबरदस्त कथेच्या प्रतिक्षेत !!!!!! धन्यवाद !!!!
  • Log in or register to post comments

भन्नाट

आदिजोशी
Fri, 12/16/2011 - 13:14 नवीन
संपूर्ण लेखमालेला +१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
  • Log in or register to post comments

पहिला भाग जेव्हा आला होता

गणपा
Fri, 12/16/2011 - 13:51 नवीन
पहिला भाग जेव्हा आला होता तेव्हा नावं वाचुन मिपावर कुणाचा 'सत्कार' होऊन त्यांना 'चपला' मिळाल्या की काय अशी शंका आली होती. आणि घाई घाईनं धागा उघडला. नंतर कळल की हे प्रकरण काही वेगळंच आहे. आजवर एकही प्रतिसाद दिला नव्हता. कारण बरेच क्रमशः लेखक वाचकांना टांगणीला लावून लेखन अर्धवट टाकतात. (इतरांच्या विनवण्यांतून त्यांना काय असुरी आनंद मिळतो ते तेच जाणोत.) म्हणुन पहिल्या भागातच ठरवलं की लेखाच्या नावात अंतिम वा खाली समाप्त दिसल्या खेरीज प्रतिसाद द्यायचा नाही. सर्वप्रथम तुम्ही हे लेखन पुर्ण केल्या बद्दल आभार. कथानकची जी पार्श्वभुमी होती ती माझ्यासाठी नवीनच होती. कथेचा वेग भन्नाट आणि खिळवून ठेवनारा आहे. आपल्याला ही कथा आवडली. :)
  • Log in or register to post comments

बांगरेचं काय झालं?

अमित
Sun, 12/18/2011 - 16:21 नवीन
बांगरेचं काय झालं? लै झ्याक.. पण मालक, बांगरेचं काय झालं ते न्हाई समजलं
  • Log in or register to post comments

मालक नीट वाचा की >>बांगरे घरी

अन्या दातार
Mon, 12/19/2011 - 14:03 नवीन
मालक नीट वाचा की >>बांगरे घरी आले होते पण आल्यापासुन आजारीच होते. काडादी चाळीतला डॉक्टर दररोज येउन औषध देउन जायचा पण त्यामागं माणुसकी कमी अन त्यांच्या मुलीचं हातात हात देउन थँक्यु म्हणणं जास्त होतं असं तिच्या आईला वाटायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित

अन्या राव, ठांकु

अमित
Mon, 12/19/2011 - 15:25 नवीन
अन्या राव, ठांकु
  • Log in or register to post comments

खुलासा...

साबु
Mon, 12/19/2011 - 15:39 नवीन
५० फक्त राव अजुन एक सान्गा.. मदन चा चुकुन गेम होतो.. पण दुसरी पार्टीने कुणाला मारायची सुपारी दिलेली असते? नाथाला?
  • Log in or register to post comments

एका दमात १३ भाग वाचुन काढले.

मृत्युन्जय
Mon, 12/19/2011 - 19:03 नवीन
एका दमात १३ भाग वाचुन काढले. बास्किन रॉबिन्स मध्ये टुथपिकवर आइसक्रीम देतात तसा किरकोळ पहिला भाग बघुन परत वाचावे की नाही अशी शंका आली होती. त्यामुळे पुढचे भाग वाचले नव्हते. सगळे भाग वाचल्यावर जाणवले की त्या छत्रपतींच्या तलवारीत जोर होता आणि या छत्रपतींच्या लेखणीत. आधीची ------------ सुद्धा अशीच उत्कंठा वर्धक होती. ही कथादेखील खासच जमली आहे. अंगावर वाचताना काटा आला. छत्रपती अगदी हाडाचे क्रिमिनल असल्याचा अनुभव गाठीशी असल्यासारखे लिहितात :) छत्रपती तुम्हाला मानाचा मुजरा :)
  • Log in or register to post comments

व्वा

मी-सौरभ
गुरुवार, 12/22/2011 - 09:47 नवीन
मस्त प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

वा!

पैसा
Mon, 12/19/2011 - 19:29 नवीन
सगळ प्लॉट मस्त शेवटाला नेऊन पोचवलास! सगळं सलग वाचून बघेन परत एकदा, जास्त परिणामकारक वाटेल.
  • Log in or register to post comments

जबरी डिटेलींग आणि लोकल तडका

झकासराव
Tue, 12/20/2011 - 13:41 नवीन
जबरी डिटेलींग आणि लोकल तडका भारीच. :)
  • Log in or register to post comments

भन्नाट!

साती
गुरुवार, 12/22/2011 - 14:47 नवीन
भन्नाट कादंबरी. एका दमात वाचून काढली. जबरदस्त. आणि जबरदस्त डिटेलिंग.
  • Log in or register to post comments

एक शंका !!

अर्धवटराव
गुरुवार, 01/12/2012 - 22:48 नवीन
सलग वाचली संपूर्ण कथा. कसली कसदार झालीय... सुपर्ब. पाचव्या भागात एक वाक्य आलय... >>नाथाला परेशच्या घरात यायला कुणाला विचारावं लागायचं नाही, दुकानाच्या बाजुच्या जिन्यानं तो सरळ वर आला, चपला काढुन 'नाजुक ब्राम्हणा आहेस का घरात ?' असं मुद्दाम बायकी आवाजात हेल काढत विचारलं. -- इथे "चपला काढुन" म्हणजे काय? नाथा तर "व्रतस्थ" होता ना?? अर्धवटराव
  • Log in or register to post comments

चुक झालीय खरी, आणि माझ्या

५० फक्त
Fri, 01/13/2012 - 09:53 नवीन
चुक झालीय खरी, आणि माझ्या लक्षात पण आली नव्हती, लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

पुर्ण मालीका वाचली,आवडली.

जेपी
Tue, 12/16/2014 - 17:37 नवीन
पुर्ण मालीका वाचली,आवडली. बालपणीच्या सोलापुर तुळजापुर आठवणी मुळे जास्तच...
  • Log in or register to post comments

मस्त!

एस
Tue, 12/16/2014 - 19:04 नवीन
सगळे भाग वाचून काढले, एक-दोन ढोबळ चुका सोडल्या तर मस्त झालीये (उदा., स्मशानात मदनऐवजी मदनचा भाऊ राख नेणार्‍यांना विचारतो असं हवं होतं). थरारक आणि उत्कंठावर्धक.
  • Log in or register to post comments

हर्षदच्या लेखणीतून

किसन शिंदे
Tue, 12/16/2014 - 20:04 नवीन
हर्षदच्या लेखणीतून साकारलेल्या अनेक झक्कास आणि अप्रतिम मालिकांपैकी एक! :)
  • Log in or register to post comments

सुपर्ब!!!!!!

अविनाश पांढरकर
Wed, 12/17/2014 - 14:44 नवीन
सलग वाचली संपूर्ण कथा. कसली कसदार झालीय...
  • Log in or register to post comments

खरंच काल्पनिक आहे?

गामा पैलवान
Tue, 05/17/2016 - 18:45 नवीन
पन्नासराव, कथा खरंच काल्पनिक आहे? अगदी खरी वाटते. विशेषत: आज ही बातमी वाचल्यावर या कथेचीच आठवण झाली : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=B662HU आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

गा. पै. जितक्या वेळा तुमचे

अभ्या..
Tue, 05/17/2016 - 18:59 नवीन
गा. पै. जितक्या वेळा तुमचे नाव दिसते तितक्यावेळा सोलापुरातील अशाच अनेक कथा अन अर्थात पन्नासरावांच्या चपलाच आठवतात. . ह्याच्या खुलाशासाठी ५० रावानाच विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

गा.पै. पुन्हा कथा बोर्डावर

५० फक्त
Fri, 05/20/2016 - 05:45 नवीन
गा.पै. पुन्हा कथा बोर्डावर आणल्याबद्दल धन्यवाद.. कथेतली स्त्री पात्रं आणि त्यांच्याबद्दलचे उल्लेआहेत,१०० % काल्पनिक आहेत, इतर भागांत १०% कल्पनाविस्तार आहे, हे जगणं अगदी जवळुन नाही पण यात अडकणार नाही अशा अंतरावरुन अनुभवलेले आहे १०-१२ वर्षे. पुन्हा एकदा धन्यवाद..
  • Log in or register to post comments

नजरेतून सुटली कशी

अत्रन्गि पाउस
Fri, 05/20/2016 - 08:28 नवीन
हे लेखमाला नजरेतून सुटलीच....अर्थात आज शुक्रवार त्यामुळे ताबडतोब भरपाई होईलच ...
  • Log in or register to post comments

वेगवान कथानक

diggi12
गुरुवार, 11/03/2022 - 20:59 नवीन
वेगवान कथानक
  • Log in or register to post comments

वेगवान कथानक

diggi12
गुरुवार, 11/03/2022 - 20:59 नवीन
वेगवान कथानक
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा