Skip to main content

दुकानदाराकडून अपमान..

लेखक योगी९०० यांनी मंगळवार, 09/12/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले.. प्रसंग एक : हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्‍या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले. खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही. प्रसंग दोन: वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्‍यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्‍या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्‍यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्‍या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्‍या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्‍यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला). वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्‍यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्‍यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय? तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल. यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.

वाचने 102617
प्रतिक्रिया 313

प्रतिक्रिया

पुरूषांनी बायकांबरोबर दुकानात गेल्यास सर्व सुत्रे आपल्या हातात ठेवावीत म्हणजे मनस्ताप होत नाही. आपल्या चपला /पादत्राणे बघून दुकानदारास खरेदीशक्तीचा अंदाज आलेला असतो. मुख्यगोष्ट सर्व साड्या सूरतहून येतात. तिथे मिळणारी पाचशेची (लेबल किंमत)साडी येथे घासाघीस करून १९००ची पंधराशेला मिळते वर नवऱ्याला एसीची हवा फुकट. आणखी माहिती हवी आहे का ?

In reply to by सूड

बांद्रा-सूरत इंटरसिटी १२९३५ साडेसात बोरिवलीहून आहे. सवा अकरा सूरतला जाते. परत चारला निघते(तिकीट सेकंड सीटिंग रु १२०.) मधल्या चार तासात खरेदी जमवायची. येताना सुतरफेणी, घारी आणि अडदियोपाक वगैरे मिठाई आणता येते.(हीच मिठाई दादरच्या अग्रवाल क्लास जवळच्या मधुर ड़्रायफ्रुटसमध्येही मिळते.) ऑटोने पाचसात मिनीटांत 'बॉम्बे मार्केट'(शंभरेक दुकाने आहेत, रविवारी बंद असते.) गाठायचे. फैन्सी साड्या असतात. आजूबाजूला अशीच मोठी मार्केटस आहेत. सुती साड्या आता महागच असतात.मदुराई, कोचि, कन्याकुमारीला, तिरुपतीला इथूनच माल जातो. वर्षातून एखादी ट्रीप नोव्हेँबर डिसेंबरला करता येईल. संक्रांतीच्या काळात नको.

In reply to by कंजूस

बांद्रा-सूरत इंटरसिटी १२९३५ साडेसात बोरिवलीहून आहे. सवा अकरा सूरतला जाते. परत चारला निघते
रीझर्वेशन करुन गेल्यास उत्तम ,बांदा टर्मिनस हुन सुटणारी ईंटरसिटी बोरीवली, बोईसर, वापी, वलसाड, नवसारी नंतर सुरत ला जाउन थांबते. सुरतहुन उतरल्यावर स्टेशनबाहेर रिक्षा मिळतात , शेअरींग ने १० रु. पर्यंत जाता येते पण रीक्षाचालक नवीन लोकांना लगेचच ओळखतात, मग ३०-४० रु. भाडे आकारतात. दोन बॉम्बे मार्केट आहेत, एक जुने आणि दुसरे नविन. आधी जुने बॉम्बे मार्केट लागते नंतर नवीन , दोघांमधे १ की.मी. चे ही अंतर नसेल, नवीन बॉम्बे मार्केट समोर गार्डन सिल्क मिल चे ऑफीस आहे. बाकी सुरत ला अगदी एकाबाजुला एक असे हजारो मार्केट्स आहेत. सुरत टेक्स्टाईल मार्केट ही चांगले आहे, सुरत ला खुप मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे एकाच रंगाच्या एकाच डीझाईनच्या ७-८ वेगवेगळ्या वरायटी पाहायला मिळतात, डुप्लिकेसी पण असते. आम्हाला एका दुकानदाराने डुप्लिकेट साडी कशी ओळखावी हे सांगितले होते. एक साडी होती तिच्यावर जो स्टँप लावला होता त्यावर साधारण कंपनीचे नाव , पत्ता, साडीचे मटेरीयल, लांबी, आणि नकल से सावधान अशी चेतावनी होती तश्याच कलर मधे सेम डीझाईन मधे एक साडी होती त्यावर फक्त कंपनीचे नाव आणि नकल से सावधान इतकंच छापलं होतं. येताना प्लॅटफॉर्म न. ४ वरुन ४ वाजुन १० मिनिटांनी ईंटरसिटी सुटते.

तुम्ही दुकानदाराशी वाद घातला नाही हे योग्यच केले . कारण त्या तसल्या फालतू दुकानदारांची तितकीही लायकी नसते . त्यांना चपलेने मारले तर आपलीच चप्पल खराब होते . त्यापेक्षा अशा दुकानदारांची दखल न घेणे , त्यांना वाद घालण्याइतपतही जास्त भाव न देणे हेच तुम्ही योग्य केले . असे मॉल , दुकाने यापुढे टाळनेच उत्तम . यांवरुन प्रेटी वुमन मधला जुलिया रोबेर्ट्सचा ड्रेस खरेदीचा प्रसंग आठवला . इतर दुकानात भरपुर ड्रेस खरेदी करुन जिथे अपमान झाला त्या दुकानात जाउन खिजवायचे - वेरी बिग मिस्टेक ...

मुळात बायकोबरोबर खरेदीला गेलातच कशाला? मी माझ्या लग्नाआधी एकदा गेलो होतो त्यानंतर आजतागायत गेलेलो नाही त्यामुळे हे असे प्रसंगच येत नाहीत!

In reply to by बोका-ए-आझम

मुळात बायकोबरोबर खरेदीला गेलातच कशाला? लोकांचे नवरे बघा कसे बायकांना घेऊन जातात खरेदीला तुम्हाला सोबत यायला काय होतं ? तुम्ही नका निवड करु कपड्यांची पण सोबत यायला काय हरकत असते असं टोमणे नै आले का वाटेला. वहिनीला नमस्कार सांगा. (ह.घ्या) मी माझ्या लग्नाआधी एकदा गेलो होतो त्यानंतर आजतागायत गेलेलो नाही त्यामुळे हे असे प्रसंगच येत नाहीत! पहिल्या प्रसंगाला असं काय घडलं की ज्यामुळे आजतागायत त्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं नाही. प्लीज वृत्तांत (व्य.नि.नेही चालेल) :) -दिलीप बिरुटे

माज आला आहे का हे विअरायच ना. सोलापुर मधल्या पवार साडी चा फार छान अनुभव आहे. ५ मजली दुकान अणी खुप मोठे. (पुण्यात पण नाही ह इत्के ) विक्रेते खुप मनपासुन माल दा़खवतात. आइ ला वाढदिवसाच साडी आणायला बहीण व मी गेलो होतो. १०० साद्या दाखायल्या न कन्टाळता.

In reply to by मनिमौ

१०० साड्या पाहून एकही न घेता निघालो असं असतं तर दूकानदार आणि आपलं दोघांचं मन:पूर्वक अभिनंदन केलं असतं :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=D =) =D

हा प्रकार अजब असतो. पण अपमान होतो कधीतरी. मनाला लाऊन घेऊ नका. चांगल्या सूचना मिळाल्यात.

अश्या प्रसंगात माझी जाम गोची होते. काहीही केले तरी मनस्ताप ठरलेलाच आहे म्हणजे अपमान सहन केला तर का सहन केला ह्या विचाराने त्याचा वचपा काढला तर पुन्हा असे का रिअ‍ॅक्ट झालो म्हणुन. एकदा मंडईत टोमॅटो घेत होतो. अर्धा किलोचे टोमॅटो घेतले व दुकानदाराने एका पोलिथिन मध्ये ते दिले. मला ते कमी वाटले म्हणुन पुन्हा अर्धा किलो घेतले.दुकानदार आधीच्याच पिशवीत ते टाकणार होता पण ती तशी जड झाल्यने मी त्याला म्हटले कि बाबा दुसर्या पिशवीत दे ते. तसे करायला त्याने नकार दिला. मी त्याला सांगितले कि तू असे समज कि मी तुझ्याकडुन आधी टोमॅटो घेतलेच नाहीत तर तुला नव्याच पिशवीत द्यावे लागतील. हे तर्कट ही वाया गेले व शेवटी त्याला पिशवीचे एक का दोन रुपये देताना ही घे भीक देतोय असे म्हणालो तेव्हा तो इतका हिस्टेरिक झाला कि त्याने माझ्या हातातुन पिशवी घेऊन ती फाडुन (त्यातले टोमॅटो परत ढिगार्यावर ओतत) पैसे परत केले. बिचार्याला असे काही बोलायची खरेच गरज होती का हा विचार नंतर माझ्या मनात सतत येत राहीला. दुसर्या एका प्रसंगात एका मारवाड्याच्या दुकानात कागदाच्या प्लेट्स घेताना मी त्या निवडुन घेत होतो (मला त्या डेकोरेशन साठी हव्या होत्या) तर दुकानदाराने "ऐसे मत करो" असे उर्म्टपणे म्हणत हातातुन घेतल्या होत्या तेव्हा मी त्याला एक कचकचीत हिंदी शिवी हासडुन तिथुन सटकलो होतो पण नंतर लक्षात आले कि तिथे एक छोटा मुलगा ही होता दुकानदारासोबत. बहुदा त्याचाच मुलगा असावा. मुलासमोर बापाला अशी वागणुक दिल्याने मला ह्या गोष्टीचा फार मनस्ताप झाला. त्यामुळे नंतर मी कधेही असे रिअ‍ॅक्ट न होण्याचे ठरवले. अपमान (?)झटकणे तुलनेने कमी मनस्ताप देणारे असावे असे माझे मत बनले आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

प्रतिसाद आवडला, हेही खरं आहे. विशेषत: पहिल्या प्रसंगात त्या माणसाला दारिद्र्याचे चटके बसले असतील, हे त्यानिमित्ताने आठवले Don't judge people, you never know what kind of battle they are fighting. अर्थात त्याचा अर्थ असा नाही की कोणीही यावे आणि आपला अपमान करावा तेव्हा उत्तर दिलेच पाहीजे, सर्वांच्या बाबतीत ते एकसारखे होणार नाही हा कळीचा मुद्दा.

शॉपिंगची फारशी आवड नसल्याने माझ्यावर ती वेळ आली नाही. साधारण दहाव्या मिनिटाला खरेदी झालेली असते. याचा अर्थ हे फार कौतुकास्पद आहे असे नाही. आपल्या आवडीची वस्तू मिळेपर्यंत ज्यांना फ़िरण्याचा उत्साह असतो अशा उत्साही लोकांचे हे एक मला आवडते.. बरे, ती वस्तू फुकट घेणार नसतो आपण! कपडे, दागिने यासारख्या आवडी निवडीवर अवलंबून असलेल्या गोष्टी तर पेशन्स नसेल तर विकूच नयेत. सरळ धान्याचे दुकान काढावे व त्यातील त्रास सहन करावेत. एकतर आजकाल कपडा कैच्याकै महाग झालेला मी ऐकतीये. ते खरे असेल तर दुकानदाराचा शब्द ऐकून घेऊ नये. पैसे देऊन अपमान कुणाच्या काकानं करून घ्यायला सांगितलाय. माझ्या नवर्याला दुकानदार काही बोलला तर त्याची परतफेड मी केलीच समजा! शिवाय पुन्हा तिथे कधी जाणार नाही आणि हे त्याला मी साम्गीन. माझा अपमान नाही फसवणूक मात्र झालीये. त्याला मी त्याची जाणीव करून दिली व ती फसवणूक जमेल त्यावेळी लोकांना सांगता असते. नौवारी साडी शिवून घेणे याची काही वर्षांपूर्वी बरीच फ्याशन होती . मलाही तशी साडी शिवून घ्यायची होती . आता माझी उंची त्या मनुष्याच्यामते जास्त आहे. त्याला काय करायचे? बाबारे, तू मापे घे आणि पावती फाड! यापेक्षा जास्त काम नाही बोलायचे! शेवटी साडी कमी उंचीची शिवली गेली . दुरुस्त करून द्यायला तयार नाही . मग आमचे वाद झाले. नंतर दुसर्या दुकानात साडी शिवण्याबद्दल विचारले असता त्याने उंचीचे कारण काढले व दोन साड्या आणा म्हणून सांगितले. भारतात काय पाच फूट आणि साडेचार इंच उंचीच्या बायका नाहीच्चेत की काय? बरे एवढे करून मी काही जाड नाही . मग उरलेली साडी परत करणार नाही म्हणाला. शेवटी नाहीच घेतली . जी चुकीची शिवली गेलीये ती मात्र पडून आहे.

पुण्यात दवाखान्यात चप्पल गेली होती चोरीला मग १ साधी चप्पल घेनेस गेलो चप्पल काय आवडणा दुकानदार लागला लायकी काढायला मग दाखवला पुणेरी बाणा फेकले क्रेडीट कार्ड,ATM कार्ड बोल दुकानाची किमत ? चेहरा पाहण्यासारखा झाला होता त्याचा

एका टीव्हीच्या मॉल मध्ये एका दिडशहाण्या अटेंडटने असच काहीतरी बडबडला होता,आमच्या पाटलीणबाईनी दुसर्‍याच क्षणाला कार्यकर्त्याच्या १८० च्या कोनात कानफाटीत मारली होती,मॅनेजरने येवुन पाय धरले,पाटील चुक झाली माफ करा,बात खतम.नाहीतर तासाभरात मॉलचा कार्यक्रम होता.

In reply to by काळा पहाड

१८० च्या कोनात कानफाटीत हा प्रकार असतो,मार खाणार्‍याला कमीत कमी ५ मिनिटेतरी काही कळत नाही.

चला, एक कट्टा त्याच मॉल मध्ये करुया. प्रत्येकाने वेगवेगळे जाउन 10-15 मिनिटे खायची. शेवटी ग्रुप ने जाउन चिडवून दाखवायचे. एक ग्रुप फ़ोटो काढायचा वर तिथे. एसी फार छान हो तुमचा असे प्रत्येकाने म्हणायचे. कसा आहे प्लान ??

In reply to by सस्नेह

पण त्या आधि दोन महिने रोज त्या मॉल मधे वातावरण निर्मिती करण्यासाठी मला जावे लागेल. तरच कट्ट्याच्या दिवशी आतिशबाजीचा कार्यक्रम करता येईल. त्या मुळे दोन महिन्यांनंतरची तारिख ठरवा. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

=))

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

त्याआधी सगळ्या अनाहितांना साड्या बघायला पाठवा...अट एकच...एकही साडी घ्यायची नाही मग आपल्याला जायची गरजच उरणार नाही ;)

In reply to by टवाळ कार्टा

टका, ही आयडिया इंप्लिमेंट करण्या आधि एक प्रयोग करा. मांजरी समोर दुधाने भरलेले पातेले ठेवायचे आणि तिला सांगायचे दुध प्यायचे नाही. मांजरीने दुध प्यायले नाही तरच आपण तुमच्या आयडियेवर विचार करु. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अग्गागा =))

खरेदी हा प्रसंग माझ्या बाबतीत अक्षरशः साडेतीन अक्षरीच आहे. मी फसते कधीकधी, पण मला आवडणार्‍या साडीची किंमत ही माझ्या मते नगण्य असते. परवा दुकानात शिरल्या शिरल्या एक पांढरी साडी दिसली. सेल्समनच अहो आणि जरा साड्या बघा म्हणुन मागे लागली, पण नाही, "ती साडी पॅक कर" येव्हढच सांगीतलं. अन कॅशीयरकडे गेले. कधी कधी काहीच आवडत नाही. मग मी दाखवणार्‍याला तस सांगते. बर्‍याचदा, घ्यायलाच हवेत कपडे म्हणुन घेतले जातात, अश्यावेळी हा प्रकार नाहीये, तो प्रकार नाहीये अस म्हणुन वेगवेगळे चार प्रकार निवडते अन बाहेर पडते. दुकानदार मात्र सौजन्यशील असावा लागतो. जर्र्राआआआअ आवाज वाढला तर मात्र खैर नाही हे नक्की.

In reply to by स्पंदना

बरय ब्वॉ तुमचं! साडी घ्यायला गेलं की मी आजूबाजूच्या लोकांकडे बघत बसते. मी सगळ्यांचे सगळे कपडे हे घ्यायलाच हवेत म्हणून घेते. तरी सध्या बरीच सुधारणा आहे. पूर्वी मैत्रिणी सांगायच्या की आता नवे कपडे घ्या, परवडत नसेल तर आम्ही वर्गणी काढतो. आता तशी वेळ येऊ देत नाही. तुम्ही आमच्या शेजारी र्‍हायला या की तै!

येथे काही लोकांनी सूचवल्याप्रमाणे आपण फेसबुकवर त्याच्या अपमानाचा बदला जरुर घ्या ! आणि तुम्ही या लेखात त्या दुकानाचे नांव पत्ता पण टाकायला हवा होता. मला खात्री आहे की असे अनुभव इतरांणापण आले असतेल. तेही नक्कीच प्रतिसाद देतील. अजिबात सोडु नका त्यांना.

कमाल आहे. पुण्यातले दुकानदार असे कधीच करायचे नाहित. लक्ष्मी रोडवरच्या दुकानातले साड्या दाखवणारे कमालीच्या सहनशीलतेने साड्या दाखवतात. बोलणे रोखठोक असु शकते पण माल घेतला नाही म्हणुन गिर्‍हाईकाचा अपमान करायचे नाहित. मला जर खरेदी करता आली नाही तर मी दुकानदाराला स्प्ष्ट सांगतो कारण काय आहे ते. साडी चांगली आहे पण त्यासाठी मला १२००० घालवायचे नाहित हे देखील एकदा स्प्ष्टपणे सांगितले. त्याच्या चेहर्‍यात नाराजी दिसली पण मी खुप उघडपणे कारण सांगितलेले असल्याने तो अपमान करु धजावला नाही. उपरोक्त प्रसंगातील दुकानदाराला मी नक्की काहितरी सुनावले असते हे खरे.

In reply to by मृत्युन्जय

कमाल आहे. पुण्यातले दुकानदार असे कधीच करायचे नाहित. लक्ष्मी रोडवरच्या दुकानातले साड्या दाखवणारे कमालीच्या सहनशीलतेने साड्या दाखवतात. बोलणे रोखठोक असु शकते पण माल घेतला नाही म्हणुन गिर्‍हाईकाचा अपमान करायचे नाहित.
पुण्यातले दुकानदार सुद्धा असे आहेत .... एकदा एक ड्रेस मटेरियल घेण्यासाठी म्हणून दुकानात गेले ते ही लक्ष्मी रोडच बारका .. तर चार पाच ड्रेस दाखवून म्हणे यातला आवडला असेल तर घ्या. नाही आवडला म्हणाले तर म्हणे मग काय टाइम पास करत होता काय... मी शांत नाही बसले चांगले सुनावले

या प्रसंगांमध्ये तुम्ही अनेक गोष्टी करू शकत होतात; अनेक अजूनही करु शकाल. १) तिथल्या तिथ्थे उत्तर (करु शकत होतात) २) आवाज अप, भाषेची लेव्हल डाउन. अर्थात, सिच्युएशन बघून व तत्वात बसत असल्यास (करु शकत होतात) ३) मालकाशी बोलणे. हा तसा सभ्य उपाय. यात तुमची बाजू स्ट्राँग राहते, तुम्ही लेव्हल न सोडल्याने. (करू शकत होतात) ४) वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे बाकी गि-हाईकं जातील अशी वक्तव्य करणे उदा. तसंही तुझ्या दुकानात आवडण्यसारखं काय आहे? जुनाट आहेत सगळे कपडे, मूर्ख म्हणून इथे आलो. इत्यादी. (करू शकत होतात) ५) कन्झ्यूमर फोरम मधे तक्रार (करू शकता) जरीही तुम्ही तिथून काहीही खरेदी केली नसली तरीही ग्राहक संघाकडे ही बाब नोंदवता येते माझ्या फुटकळ माहितीप्रमाणे. ६) पेपरात हा अनुभव देणे (करू शकता) ७) जिथे तिथे उगाच विषय काढून त्या दुकानाबद्दल वाईट सांगणे. अर्थात हेही तत्वात बसत असल्यास. याने मानसिक समाधान मिळू शकेल. मिळेलच असं नाही. (करू शकता) ८) विसरून जा. पुढच्या वेळी मात्र तलवार काढा. मुंबई आहे साहेब. दबला तो संपला. (करू शकता. मी म्हणतो कराच.)

आपला हेतू जर शुद्ध असेल (म्हणजे खरेदी) तर दुकानदारानं अपमान करणं म्हणजे, त्यानं स्वतःचं फ्रस्ट्रेशन कस्टमरवर काढणं आहे. तस्मात, त्याचा आपल्यावर परिणाम करुन घेण्यात हाशिल नाही. आता राहिला मुद्दा प्रत्युत्तराचा. एकदा पोझिशन क्लिअर झाली की दुकानदाराला दोन वेळा संधी देता येते. ती अशी : आपण : तुमचा गैरसमज होतोयं. आम्ही खरेदीसाठीच आलो होतो, टाईमपाससाठी नाही. दुकानदार : (समजूतदार असेल तर) : सॉरी ! (समजूतदार नसेल तर) : `.........' (पुन्हा अपमान) आपण : येणारा प्रत्येक जण दरवेळी खरेदी करेलच असं नाही मालक दुकानदार : (समजूतदार असेल तर) : सॉरी ! (समजूतदार नसेल तर) : `.........' (पुन्हा अपमान) आपण : तुम्ही जर तुमचं फ्रस्ट्रेशन कस्टमरवर काढणार असाल तर तुमची मर्जी, पण अशानं पुन्हा कधीही तुमच्या दुकानात येणार नाही! (विषय संपला !!)

In reply to by संजय क्षीरसागर

काय छान संवाद आहे. हा वाचून मला पाचवीत असताना ईंग्रजीच्या पुस्त्कातला खालील संवाद आठवला.. A: Good morning B B: Good morning A, How are you? A: I am fine thank you & how are you? आमच्या बाई याची घोकंपट्टि का करुन घ्यायच्या कोण जाणे :(

In reply to by मी-सौरभ

एकदा दुकानदार आपला अपमान करु शकतो ह्याची बेशर्त स्वीक्रुति केली की विषयच संपला. नाही का?

सोलापुरजवळ , कर्नाटक हद्दीमध्ये चडचण गाव आहे . तिथेही खुप मोठे कापड मार्केट आहे . कापड , कपडे एकदम रिसनेबल किमतींमध्ये मिळतात . महाराष्ट्र , कर्नाटक दोन्हिकडुन तिथे गर्दी इतकी असते की कुणाला भांडायलाही वेळ नसतो .

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार...!! सर्वांनाच उत्तर देणे शक्य नाही पण सर्व प्रतिसाद वाचून मला काय वाटले ते थोडक्यात मांडतो.. बर्‍याच जणांनी तुम्ही गप्प का बसला असे विचारले. काही जणांनी गप्प राहिल्याबद्दल कौतूकसुद्धा केले. माझा मुळचाच स्वभाव "ऐकून घेणार्‍यांपैकी" आणि थोडाफार भिडस्त असल्याने बर्‍याच वेळेला कोणी तोंडावर अचानक काय बोलले तर मला अजिबात उत्तर देता येत नाही. बर्‍याच वेळेला असे झाले की नातेवाईकांनी उगाचच मारलेल्या टोमण्यांवर किंवा कोणी काही अचानक तिरसट बोलले असता मी अजिबात उत्तर देऊ शकलो नव्हतो. कारण अशा वेळी मला काय बोलावे हे सुचतच नाही. नंतर बरेच काही सुचते आणि मी तावातावाने बोलतो सुद्धा (पण मनातल्या मनात....अशी उलट उत्तरे दिल्याची दिवास्वप्ने खुप पहातो). आता या बोरीवलीच्या दुकानात दोन्ही वेळेस तसा मी खरेदीसाठी निरूत्साहीच होतो. दुसर्‍यावेळी उसना का होईना पण उत्साह दाखवत होतो. दुकानदाराने "एसी, टाईमपास" असले बोलणे मात्र बरोबर वाटले नाही. पण मी निरूत्साही असल्याने ५०% दोष मलाच घेतो आणि दुकानदारास माफी देऊन टाकतो. (त्याने जरी मागितली नसली तरी...). राहीली गोष्ट ते फेसबूक, वॅट्सअ‍ॅप या माध्यमातून दुकानाची माहिती देण्याची किंवा इथे त्यांची नावे देण्याची.. अशामुळे काय होणार आहे? त्या दोन्ही दुकानांत इतकी गर्दी असते की आमच्यासारख्या शंभर लोक गेली नाही तरी त्यांना काहीच फरक पडणार नाही. कदाचित यामुळेच त्यांना एकप्रकारचा माज आला असावा. फेसबुक/वॅट्सअ‍ॅप मुळे उलट निगेटीव्ह पब्लिसिटी मिळून कदाचित त्यांचा धंदा अधिक चालेल. पण या धाग्यामुळे आणि मिपाकरांच्या प्रतिसादांमुळे काही गोष्टी शिकल्यासारखे वाटते. आता तशी वेळ दुकानात परत जर आली तर मी भांडण करेन की नाही ते माहीत नाही पण गप्प मात्र नक्कीच नाही बसणार. (पण मुळ म्हणजे तशी वेळ न आणण्याचा प्रयत्न करीन.) तेव्हा सर्वांचे परत एकदा आभार...!! बाकी (आपल्याच) बायकोबरोबर खरेदीला जाताना उत्साह कसा दाखवावा यावरील मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत....

In reply to by योगी९००

राहीली गोष्ट ते फेसबूक, वॅट्सअ‍ॅप या माध्यमातून दुकानाची माहिती देण्याची किंवा इथे त्यांची नावे देण्याची.. अशामुळे काय होणार आहे? बरेच काही होते. आणि काही झाले नाही तरी "ग्राहक असे असे वागू शकतो" हे त्या दुकानाच्या (आणि जर फ्रँचाईसी असेल तर मुख्य कंपनीच्या) लक्षात आले तरी बस्स आहे. अवांतर - एकदा एअरटेलचे त्यांच्याच वेबसाईटवरून ऑनलाईन रिचार्ज केले. साधारण २०० रूपयांचे. मला हवा असलेला आणि वेबसाईटवर नोंदवलेला प्लॅन मिळण्याऐवजी भलताच (आणि नको असलेला) प्लॅन मिळाला. कस्टमर केअर सोबत बोलून वाद न घालता त्यांच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट, ट्रँन्झॅक्शन आयडी आणि माझे डिटेल्स इ-मेलने कस्टमर केअरला पाठवले. मी लिहिलेला मेल आणि त्यांचा आलेला रिप्लाय याचा दूर दूर तक संबंध नव्हता. त्यांच्या दुसर्‍या तिसर्‍या मेल रिप्लायला "मी लिहिले आहे ते तुम्हाला समजले असेल तर तुमच्या भाषेत तेच मला लिहून पाठवा" असाही एक खवचट प्रतिसाद दिला. या सगळ्यामध्ये दोन दिवस गेले. कस्टमर केअरकडून हे असेच लांबत जाणार अशी खात्री पटल्यावर शांतपणे हे सगळे उचलून फेसबुकवर टाकले - अर्थात मेल जसाच्या तसा कॉपी पेस्ट केला नाही पण कुणाशी काय बोलणे झाले आहे ही साधारण माहिती टाकली. पुढच्या अर्ध्या तासात "इश्यू एस्कलेट" झाला. कस्टमर केअर आणि फेसबुकवरच्या त्यांच्या अकाऊंटचा माणूस फोन कर करून सगळे समजावून घेवू लागले. आणखी १५ मिनीटांनी मला हवा तो प्लॅन मिळणार नाही पण मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळाला. यामध्ये एक अनपेक्षीत गोष्ट झाली - कस्टमर केअर आणि फेसबुक वाले वेगवेगळ्या पातळ्यांवरून माझ्याशी बोलत होते आणि मला वाटत होते ते एकाच टीममधून आहेत. कारण दोघांनीही "मला हवा तो प्लॅन मिळणार नाही" आणि "मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळेल" हेच सांगीतले होते. मला एकूण ४०० रूपयांचा टॉकटाईम मिळाला. फेसबुकवाल्याला हे सांगीतले व २०० रू रिव्हर्स करून घे म्हणून सांगीतल्यावर त्याने त्या गोष्टीला नकार दिला (कारण माहिती नाही) व तुम्हाला आमच्यातर्फे कॉम्प्लीमेंट समजा असे सांगीतले. :)

In reply to by मोदक

या इथे तुम्ही हवा तो प्लॅन घेण्यासाठी पैसे गुंतवले होते आणि सर्व गोष्टींचा तुमच्याकडे पुरावा होता. माझ्या केस मध्ये कोठलाच आर्थिक व्यवहार झाला नव्हता. तसेच ती दुकाने airtel सारखी ब्रॅडेड सुद्धा नव्हती. सुरत, गुजरात किंवा राजस्थान येथून चांगल्या प्रकारच्या माल आणून इकडे विकणारी तशी हजारो दुकाने मुंबईत आहेत. बोरीवलीतील त्या मॉल मध्ये तशी २५-३० दुकाने असतील. या कारणांंमुळे फेस्बूकवरील बदनामीचा त्यांना काही फरक पडेल असे वाटत नाही.

In reply to by योगी९००

कृपया त्या दुकानाचे नाव आणि पत्ता व्यनि करावे. कधी बोरिवलीस गेलोच तर त्या दुकानात जाउन तासभर बसुन खरेदी न करता परत येइन. काही बोललाच गडी तर माझी आणि इतर गिर्‍हाइकांची किमान तासभर करमणूक तरी होइल.

बाकी (आपल्याच) बायकोबरोबर खरेदीला जाताना उत्साह कसा दाखवावा यावरील मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.... यातला (आपल्याच) हा शब्द काढता आला तर उत्तर देणे सोपे होईल. नायतर आमचा पास. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मिपा सोबत ५ वर्ष्यापेक्षा जास्त काळ झाला. त्यामुळे मिपाकर कोठे पकडतील त्याचा नेम नाही म्ह्णून शक्य तेथे काळजी घेतो. म्हणून (आपल्याच) हा शब्द टाकला. नाहीतर कोणाच्या म्हणून प्रश्न आला असता.... पण हा प्रश्न असाही मला विचारता आला असता..(generic question) बायकांबरोबर खरेदीला जाताना उत्साह कसा दाखवावा यावरील मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत....

In reply to by योगी९००

बायकोबरोबर खरेदीला जाताना उत्साह दाखवणे फार कमी जणांना जमते. तुम्हाला उत्तर मिळेलच असे नाही. मिळाल्यास तुम्ही नशीबवान आहात. वर इतके चर्चा झाली पण या प्रश्नाची तड लागली का? क्वचितच कोणी याबद्दल बोलले.

In reply to by दिपक.कुवेत

तो आपला आपणच कमवावा लागतो....कुणाच्या मार्गदर्शनाने नाहि. तेव्हा ऑल दि बेस्ट. मी उत्साह कमवायण्यासाठी नाही विचारत आहे. तो मला कमवता येणारच नाही. (वय झालं आता..). कसा दाखवावा असे म्हणतो (जरी नसला तरी..)

In reply to by योगी९००

ह्याचे उत्तर फार पुर्वीच पुलंनी दिले आहे की... कुठल्याही दुकानात गेलो की अंग बघायचे.अंग जितके गोरे, तितके उत्तम.त्या अंगाकडे टक लावून बघत बसले (टायमिंग साधारण १ सेकंद) की बायकोचे अंग फुरफुरते आणि तुम्हाला खरेदीतला लिंबू-टिंबू समजून घरात बसवण्यात येते. समजा हा पण उपाय वाया गेला तरी, मुकाट जायचे, बायकोला कुकर हवा असेल तर आपण भांडी बघायला सुरुवात करायची.बायकोने कुकर पसंत केला, तर आपण लगेच चेहर्‍यावर आनंद दाखवायचा आणि म्हणायचे," मी पण हाच घे.म्हणणार होतो.माझ्या मैत्रीणीकडे पण हाच कूकर आहे." ह्या २ उपायात काम भागेल.... नाहीच भागले तर या आमच्या डोंबोलीला, बाबांची आणि तुमची गाठ-भेट घालून देतो. आज-काल आमचे बाबा खरेदी-शास्त्रातील सप्त-पदी लिहायचा विचार करत आहेत. (मित्रा, वरील उपाय अजिबात करू नकोस.मी असाच टाइमपास म्हणून प्रतिसाद लिहीला आहे.)