✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Wed, 11/26/2014 - 00:22  ·  लेख
लेख
अश्याच एका आळसावलेल्या रविवारी घराच्या गॅलरीत अचानक एका अनाहूताची लगबग चालू आहे असे दिसले...

अनाहूत असला तरी त्याने पटकन भुर्रकन उडून जाऊ नये असे वाटण्याइतका तो आकर्षक होता. तरीसुद्धा या पाहुण्याची इतकी कसली गडबड चालली आहे याबद्दलही कुतूहल होतेच. म्हणून त्याला दिसणार नाही असा दरवाज्याआड उभा राहून त्याला पाहू लागलो आणि ध्यानात आले की गॅलरीतल्या टांगलेल्या एका कुंडीवर त्याने अगोदरच पथारी हक्क प्रस्थापित केला होता. त्या कुंडीतल्या रोपाच्या आधाराने त्याने बरेचसे "बिल्डिंग मटेरियल" साठवायला सुरुवातही केली होती...

.

मग घरातील सगळेच पाहुण्याला त्रास होणार नाही याची न सांगता ठरवता काळजी घेऊ लागले. जसे की, गॅलरीत जाताना दरवाजा हळुवारपणे उघडणे, चोरपावलांनी आणि अचानक हालचाली न करता आपले काम आटपून पटकन परतणे, वगैरे. पण आमचा पाहुणाही एका दिवसभरात इतका निर्ढावला होता की गॅलरीतल्या झाडांना पाणी घालणे, कपडे वाळत घालणे, इत्यादी कामे चालू असतानाही तो आमच्याकडे अजिबात लक्ष न देता आमच्या घरात, आमच्या पूर्वपरवानगीशिवाय बिल्डिंग मटेरियल जमा करणे आणि स्वतःचे बिनभाड्याचे घर बनवणे हे उद्योग चालू ठेवू लागला. तीन-चार दिवसात बहुदा त्याच्या मनासारखे घर बांधून तयार झाले असावे. कारण त्याच्याबरोबर एक जोडीदारीण दिसू लागली. आता तुम्ही म्हणाल की जोडीदारीणच कशावरून ? कारण असे की, ती बांधकामात अजिबात सहभाग घेत नव्हती. उलट मान वाकडी करून करून ती घरट्याचे वेगवेगळ्या कोनातून बराच वेळ निरीक्षण करत असे आणि मग इथली काडी उपस, तिथली काडी उपस आणि बाहेर फेकून दे असे मात्र करत असे. आलं ध्यानात ? :)

असे अजून दोन-तीन दिवस झाल्यावर मात्र बाईसाहेबांच्या मनाप्रमाणे घर बांधून झाल्याचे दिसले...

मग दोघांचे येणे जाणे, गॅलरीचा पूर्ण ताबा आपल्याच मालकीचा आहे असा हक्क बजावणे चार-पाच दिवस चालू होते. आणि अचानक घरट्यात दोन अंडी असल्याची खबर आमच्या घरभर पसरली. कुतूहल न आवरल्याने पाहुणे आजूबाजूला नाहीत असे पाहून आम्ही शिडी लावून त्या नवागत अंड्यांचा फोटोसेशन केला...

अचानक डोक्याभोवती वेगात भिरभिर ऐकू येऊ लागली आणि अणुकुचीदार चोचींचा हल्ला होण्याअगोदर आम्ही काढता पाय घेतला ! दुसर्‍या दिवशी तसाच फोटोसेशनचा प्रयत्न केला आणि दिसले की दोन्ही अंडी गायब !...

पुढचे काही दिवस नुसती चुक् चुक् चालू होती. "नको काढायला हवे होते ते फोटो. गेले ना आता ते अंडी घेऊन." असेच वाटत राहिले. त्याबरोबरच, मनात "इतके दिवस होतो ना आम्ही आजूबाजूला. आताच कशाला इतकं घाबरायला हवं होतं?" असाही जळफळाट चालू होता. :( चारपाच दिवसांनी अचानक कुंडीत हालचाल दिसली आणि ध्यानात आले की घरट्यात मादाम ठिय्या मांडून बसलेल्या आहेत!...

येथून पुढे आई-बाबांपैकी एक आलटून पालटून अंड्यांवर जवळ जवळ सतत बसून राहू लागले. अर्थात मागच्या अनुभवानंतर मीही फोटो काढायला घरट्याच्या जवळ जायची हिंमत करू शकलो नाही... कोण जाणे आमचे पाहुणे परत अंडी उचलून दुसरीकडे गेले तर काय ? त्यापेक्षा जरा अंतर ठेवून फोटो काढणेच बरे ! त्यासाठी मात्र त्यांनी मोठ्या आनंदाने पोझेस दिल्या...

.

असेच दहा-पंधरा दिवस गेले असतील. एकाएकी आमच्या पाहुण्यांची परत धावपळ सुरू झाली. दोघांपैकी एकजण खाणे आणून इवल्याश्या चोचीत भरवू लागले. आता कोणी जवळ आल्यास आमचे पाहुणे जरा जास्तच आक्रमक होत होते. आम्हीही घरट्याच्या फार जवळ न जाणेच पसंत केले. त्यामुळे चिमणे घास भरवण्याचे इथे देण्यासारखे फोटो मिळाले नाहीत. पण ते कौतुक बघण्याचा आनंद मात्र मनात भरून ठेवला आहे. पुढच्या काही दिवसांत पिलांची वाढ आश्चर्यकारकरीत्या वेगात झाली. एकदा आई-वडील दोघेही एकाच वेळेस खाणे आणण्यास गेले असताना काढलेल्या खालील चित्रात ती दिसून येते...

दोन्ही पिलांनी एकमेकाच्या अंगावर अंग टाकून मस्त ताणून दिली होती. या अगोदर फक्त कोंबडीचीच पिले इतक्या जवळून पाहिली होती. पूर्वी कधीच आकाशात भरारी घेणार्‍या पक्षाच्या घरट्यातली इतकी लहान पिले पाहिली नसल्याने इवल्याश्या अंड्यांतून जन्मलेली पिले काही दिवसांतच इतकी मोठी झाल्याचे पाहणे मोठे रोमांचक होते ! दोन एक मिनिटेच हा आनंद टिकला असेल. जवळच्या झाडीतून आई-बाबा दोघेही माझ्या दिशेने झेपावले आणि मला डोक्याचा बचाव करत जलद गतीने यशस्वी माघार घ्यावी लागली. यानंतर मात्र परत असे करून पाहुण्यांना त्रास न देण्याची प्रतिज्ञा केली. परंतु पिलांना भरवण्याचा सोहळा पाहण्याचे रोजचेच व्यसन मात्र लागले होते. अजून काही दिवस गेले असतील, एकाएकी "अरे, पिले घरट्यातून खाली उतरलीत." असा पुकारा झाला. दोन्ही पिले गॅलरीत खाली ठेवलेल्या कुंड्यातील झुडुपावर तोल सांभाळत डुलत होती... एका झुडुपावर बसून एक पिलू डुगडुगतच आपले पंख साफ करत होते. तर आईबाबांपैकी एक गॅलरीच्या कठड्यावर बसून त्याच्यावर पहारा करत होते...

दुसरे पिलूही बाजूला वार्‍याने हलणार्‍या झुडुपावर बसून तोल सांभाळत होते...

आईबाबांपैकी दुसरा त्याच्यावर लक्ष ठेवून होता...

जरा वेळाने आईबाबांनी जवळ जाऊन पोरांना ढुशा देत उडायला भाग पाडायला सुरुवात केली...

अधून मधून मोठ्ठा आ वासून पोरे आईबाबांकडे "भूक लागलीय, खाऊ द्या" अशी मागणी करत होती आणि ती पुरीही केली जात होती...

असे बराच वेळ चालले होते. काही वेळाने जेवणासाठी गेलो आणि नंतर काही कामात गुंतून गेलो. दुपारी उशीरा परत बघायला आलो तेव्हा ते सर्व कुटुंब उडून गेले होते. त्यानंतर ते आजपर्यंत परत दिसले नाही. अश्या तर्‍हेने आमचे हे अनाहूत पाहुणे जसे अचानक आले तसेच अचानकपणे निघून गेले. त्यांचे घरटे मात्र आम्ही तसेच ठेवले आहे... पुढच्या वर्षी आले तर ते अनाहूत नसतील. कारण आमच्या घरातली त्यांनी बांधलेली जागा सर्वानुमते त्यांच्यासाठी राखीव ठेवलेली आहे !

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
40041 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

मस्त लेख...

मुक्त विहारि
Wed, 11/26/2014 - 00:31 नवीन
आवडला... पुढच्यावेळी जमल्यास, वेबकॅम वापरून फोटो काढायचा प्रयत्न करून बघा. (आयडिया गिव्हन बाय "गवि".)
  • Log in or register to post comments

अभिनंदन! छान लाईव वृत्तांत

सखी
Wed, 11/26/2014 - 00:53 नवीन
अभिनंदन! छान लाईव वृत्तांत वाचल्यासारखा वाटला. घरटं तसचं ठेवायचा तुमची इच्छाही चांगली आहे. आमच्या दाराजवळच्या खोबणीत असचं घरटं केलेलं रॉबिन पक्ष्यांनी आणि नंतर ते कुंटुंब उडुन गेल्यावर कबुतरासारख्या पक्ष्यांनी त्यांच बस्तान तिथेच बसविलं होतं खूप दिवस लागले ही पिल्ल जगात यायला, ख-या अर्थाने रिसाकलिंग. पिल्लं खरचं पटकन मोठी होतात आणि त्यांना उडायला शिकताना बघायचा आनंद वेगळाच होता अगदी आपण सायकल शिकतो/शिकवतो तसे आईवडील आजुबाजुला होते :) आणि अवघ्या १-२ दिवसात ती पिल्ल उडुनही गेली :(
  • Log in or register to post comments

मस्त

मधुरा देशपांडे
Wed, 11/26/2014 - 00:56 नवीन
किती गोड आहे त्या पिल्लांचा हा प्रवास. मस्तच.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटोज व वर्णन

श्रीरंग_जोशी
Wed, 11/26/2014 - 01:02 नवीन
पुढील वर्षीच्या पाहुण्यांसाठी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

सुंदर

जुइ
Wed, 11/26/2014 - 01:15 नवीन
वर्णन आणि छायाचित्रे!!
  • Log in or register to post comments

मस्त!

बहुगुणी
Wed, 11/26/2014 - 01:20 नवीन
शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आहा! एकच नंबर. लय आवडले.

बॅटमॅन
Wed, 11/26/2014 - 01:27 नवीन
आहा! एकच नंबर. :) लय आवडले. तिथे कॅम ठेवून पाहिले तर त्यांनाही डिष्टर्ब होणार नाही आणि तुम्हीही बिनदिक्कतपणे पाहू शकाल सर्व काही.
  • Log in or register to post comments

वर्णन आणि फोटू आवडले.

रेवती
Wed, 11/26/2014 - 03:21 नवीन
वर्णन आणि फोटू आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो आणि वर्णन !!

खटपट्या
Wed, 11/26/2014 - 05:23 नवीन
मस्त फोटो आणि वर्णन !! एकंदर तुमची गॅलेरी खूप हिरवीगार दिसतेय !!
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

स्वप्नज
Wed, 11/26/2014 - 07:25 नवीन
लय भारी. पाहुणे, छोटे पाहुणे, फोटु आणि तुमचा वृत्तांत सगळेच फार आवडले आहे. आणि हो, तुमची बाग पण...
  • Log in or register to post comments

सुंदर.......

प्रभाकर पेठकर
Wed, 11/26/2014 - 08:14 नवीन
सुंदर वर्णन आणि अप्रतिम छायाचित्र. वाचता वाचता भावनिक गुंतणूक होऊन गेली. पक्षी उडून गेल्याने मनाला चुटपुट लागून राहिली.
  • Log in or register to post comments

मस्त खुप छान फोटोग्राफी.

प्रमोद देर्देकर
Wed, 11/26/2014 - 08:39 नवीन
मस्त खुप छान फोटोग्राफी. पाहुण्यांची वर्दळ लवकर आटोपली म्हाणायची. पण हा सुंदर पक्षी कोणता होता ते सांगाल काय?
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/26/2014 - 11:55 नवीन
आमच्या पाहुण्यांना बुलबुल या नावाने ओळखतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

लालगाल्या बुलबुल

आतिवास
Wed, 11/26/2014 - 16:38 नवीन
लालगाल्या बुलबुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मस्त. बुलबुल फार आक्रमक असतात

जयंत कुलकर्णी
Wed, 11/26/2014 - 08:49 नवीन
मस्त. बुलबुल फार आक्रमक असतात बर का !
  • Log in or register to post comments

तुमची गॅलरी फारच मस्त

पिलीयन रायडर
Wed, 11/26/2014 - 09:08 नवीन
तुमची गॅलरी फारच मस्त हिरवीगार आहे हो!!! अशा गॅलरीत पक्ष्यांनाही निवांत वाटत असेल...! खुप छान फोटो आलेत...
  • Log in or register to post comments

मस्त

टवाळ कार्टा
Wed, 11/26/2014 - 09:14 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments

मस्त.

नाखु
Wed, 11/26/2014 - 09:28 नवीन
घराच्या अंगणातील झाडावर सुगरणींची वसाहत वसली होती एकदा!
  • Log in or register to post comments

मस्त वर्णन!

अजया
Wed, 11/26/2014 - 09:36 नवीन
मस्त वर्णन! बुलबुल माझ्याही घरचे पाहुणे आहेत.दरवर्षी एक तरी जोडी तेच घरटं वापरते.तुमच्याकडेही आता त्याच घरट्यात यायला लागतील बघा!
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिलंय.

प्रचेतस
Wed, 11/26/2014 - 09:48 नवीन
खूप छान लिहिलंय. फोटोही अगदी सुस्पष्ट.
  • Log in or register to post comments

आम्ही बाळंतपण नाही, पण

स्पंदना
Wed, 11/26/2014 - 09:58 नवीन
आम्ही बाळंतपण नाही, पण पाळणाघर चालवतो मॅगपायच्या पिल्लांसाठी. मस्त लेख, वर्णन अन फोटो.
  • Log in or register to post comments

आवडल..

जेपी
Wed, 11/26/2014 - 09:59 नवीन
आवडल..
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!!

Madhavi_Bhave
Wed, 11/26/2014 - 10:53 नवीन
अप्रतिम!!! अहो संगतीचा परिणाम. तुमच्यामुळे inspire होवून जग प्रदक्षिणेला गेली असणार. बाकी !! तीन-चार दिवसात बहुदा त्याच्या मनासारखे घर बांधून तयार झाले असावे. कारण त्याच्याबरोबर एक जोडीदारीण दिसू लागली. आता तुम्ही म्हणाल की जोडीदारीणच कशावरून ? कारण असे की, ती बांधकामात अजिबात सहभाग घेत नव्हती. उलट मान वाकडी करून करून ती घरट्याचे वेगवेगळ्या कोनातून बराच वेळ निरीक्षण करत असे आणि मग इथली काडी उपस, तिथली काडी उपस आणि बाहेर फेकून दे असे मात्र करत असे. आलं ध्यानात ? - अगदी शालजोडीतली कोपरखळी
  • Log in or register to post comments

+१

रुस्तम
Wed, 11/26/2014 - 11:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Madhavi_Bhave

गोड आहेत पाहुणे !

सस्नेह
Wed, 11/26/2014 - 11:11 नवीन
गोड आहेत पाहुणे ! तुमची गॅलरी म्हणजे छोटंसं रानच दिसतय !
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/26/2014 - 11:38 नवीन
आमच्या आवडत्या पाहुण्यांचे कौतूक केल्याबद्दल सर्व प्रतिसादकर्त्यांसाठी आणि वाचकांसाठी मनापासून धन्यवाद !
  • Log in or register to post comments

सुरेख

समीरसूर
Wed, 11/26/2014 - 11:40 नवीन
खूपच मस्त लिहिले आहे. फोटो तर एकदम झकास!!! "भूक लागलीय, खाऊ द्या" आपुलकीचा जो हळूवार आणि नाजूक स्पर्श आपण या अनुभवकथनाला दिला आहे तो केवळ लाजवाब!
  • Log in or register to post comments

मस्तच

सूड
Wed, 11/26/2014 - 11:52 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

डोळे निवले.

राही
Wed, 11/26/2014 - 12:15 नवीन
हिरव्यागार रंगाने खरंच डोळे निवले. वेगळाच हिरवा आहे हा रंग. वेगळ्या पर्यावरणामुळे तो इतका उठून दिसतोय का?(वायुपटल, धूळ नसणे वगैरे, कारण उदा.लद्दाख, तिबेट वगैरेच्या फोटोतला पिवळेपणा, राखाडीपणा वेगळाच दिसतो तसे. ). शिवाय 'बिल्डिंग मटीरिअल' सुद्धा 'फॉरीन'चं वाटतंय. म्हणजे पालापाचोळा, काड्या-काटक्या ओळखीच्या वाटत नाहीयेत. फोटो जितके आवडले तितकेच वर्णनही.
  • Log in or register to post comments

खुप छान.

जागु
Wed, 11/26/2014 - 12:15 नवीन
खुप छान. आमच्या झुंबरावर वर्षातून २-३ वेळा तरी बुलबुल पिले घालतात. ह्यावर मी मागे लेखही लिहीला होता लोकसत्तामध्ये. इथेही आहे माझ्या लेखनात. बुलबुलचे नर्सिंगहोम आणि माहेरपण म्हणून.
  • Log in or register to post comments

जागु आजी...

रुस्तम
Wed, 11/26/2014 - 12:40 नवीन
जागु आजी... सुन्दर लेख...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

सुंदर ! मस्त वर्णन, फोटो,

वेल्लाभट
Wed, 11/26/2014 - 12:23 नवीन
सुंदर ! मस्त वर्णन, फोटो, दोन्ही. मजा आली वाचायला....
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Wed, 11/26/2014 - 12:58 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

तुम्ही, गवि, जागुताई भाग्यवान आहात बाबा.

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 11/26/2014 - 13:06 नवीन
तुम्ही, गवि, जागुताई भाग्यवान आहात बाबा. माझ्या घरी टेरेस मधे पक्षी यावेत म्हणुन हर तर्‍हेचे उपाय करुन झाले (बुवा, बाबा, जादुटोणा, करणी, भानामती काही म्हणजे काही सोडले नाही. पण एकही पक्षी आमच्या (हिरव्यागार) टेरेस मधे फिरकत नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मस्त

कपिलमुनी
Wed, 11/26/2014 - 13:45 नवीन
पाहुणे आवडले
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

बोका-ए-आझम
Wed, 11/26/2014 - 14:11 नवीन
अगदी शेजारी उभं राहून सगळी स्टोरी ऐकल्यासारखं वाटलं. :)
  • Log in or register to post comments

अनाहूत पाहुण्यांचा

दिपक.कुवेत
Wed, 11/26/2014 - 14:44 नवीन
हा प्रवास आवडला आणि ते उडुन गेल्यामुळे चुट्पुट देखील लावुन गेला
  • Log in or register to post comments

वावा..

स्वाती दिनेश
Wed, 11/26/2014 - 15:21 नवीन
तुमचे पाहुणे आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त!

सुधीर
Wed, 11/26/2014 - 15:34 नवीन
तुमचे पाहुणे आवडले. माझ्या खिडकीत चपातीचे तुकडे खाण्यास चिमणी, खार, बुलबुल आणि आजकाल (अधून मधून) पोपटही येतात. पण घरटं बांधण्याइतपत आडोसा नाही. चिमणीसाठी कृत्रिम घरटं करता येईल का याचा विचार करतोय. कारण काही चिमण्या बिलकूल घाबरत नाहीत. जणू रुळावल्यात आणि हक्काने चिवचिवाट करून खायला तांदूळ नाहीतर चपातीचे तुकडे टाकायला सांगतात.
  • Log in or register to post comments

इक्का, अप्रतिम मागोवा घेतलायं तुम्ही घटनेचा

संजय क्षीरसागर
Wed, 11/26/2014 - 15:35 नवीन
मजा आली!
  • Log in or register to post comments

चांगलंय, पण...

एस
Wed, 11/26/2014 - 15:38 नवीन
आम्ही पक्षीछायाचित्रणात एक बंधन काटेकोरपणे, अगदी निक्षून पाळतो, तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आणि कितीही मोह झाला तरी 'नेस्ट फोटोग्राफी' टाळणे. कितीही मोठी एक्स्ट्रीम टेलिफोटो लेन्स असली, आणि घरट्यापासून आपण कितीही दूर असलो, पक्षी तिथे नाहीयेत असं वाटत असलं, तरी त्यांच्या घरट्यांचे छायाचित्रण करायचे नाही. विणीच्या हंगामात पक्ष्यांवर पिले वाढवण्याचा, जोपासण्याचा आणि त्यांचे रक्षण करण्याचा एवढा ताण असतो की त्यात आपल्या हौशीमुळे भर पडायला नको. त्यामुळेच बहुतांशी वन्यछायाचित्रण फोरम इ. हे बर्ड नेस्ट फोटोग्राफीवर त्यांच्या फोरमवर बंदी घालतात. उदा. 'सॅन्क्च्युअरी एशिया', 'इंडियन बर्ड्स्' इ. यावरील अधिक माहिती आंतरजालावर मिळू शकेल. बर्ड नेस्ट फोटोग्राफी करण्यासाठी एक तर तुम्ही स्वतः त्यातील निष्णात छायाचित्रकार आणि पक्षितज्ञ असले पाहिजेत आणि दुसरे म्हणजे तुमच्या अभ्यासाचा नेस्ट फोटोग्राफी हा एक अत्यावश्यक भाग असायला हवा. या दोन निकषांवर बसत असेल तरच नेस्ट फोटोग्राफी करावी. त्यासाठी सुरक्षिततेचे वगैरे काही एथिक्स आहेत, ते पाळायला हवेत. इए आणि गवि, आपण सर्व काळजी घेऊनच छायाचित्रण केले असणार हा विश्वास आहेच, तरीपण कुणा हौश्यागवश्याकडून अतिउत्साहाच्या भरात पक्ष्यांच्या विणीला अनभिज्ञपणे का होईना, नुकसान पोहोचू नये ही भीती आहे. कृपया व्यक्तिगत घेऊ नये (तुम्ही नाही घेणार, पण इतरांसाठी! ;-) ), आपुलकीने सांगतो आहे.
  • Log in or register to post comments

@पुढच्या वर्षी आले तर ते

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/26/2014 - 15:58 नवीन
@पुढच्या वर्षी आले तर ते अनाहूत नसतील. कारण आमच्या घरातली त्यांनी बांधलेली जागा सर्वानुमते त्यांच्यासाठी राखीव ठेवलेली आहे !>>> Image removed.
  • Log in or register to post comments

अतिसुंदर..

चिगो
Wed, 11/26/2014 - 16:56 नवीन
हे असे अनाहुत पाहुणे घरात येणे, म्हणजे अत्यंत आनंदाची बाब.. खुपच सुंदर वर्णन आणि फोटोग्राफी..
  • Log in or register to post comments

एकदम छान लेख..

मोहनराव
Wed, 11/26/2014 - 19:02 नवीन
एकदम छान लेख..
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रदीप
Wed, 11/26/2014 - 19:31 नवीन
तुमच्या इतर सर्वच लेखनाप्रमाणे हा लेखही अप्रतिम. तो फोटोंसकट अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर धागा.. वाचत

गणेशा
Wed, 11/26/2014 - 19:46 नवीन
अतिशय सुंदर धागा.. वाचत अनुभवत रहावा असा.. आणि खालील वर्णन पण मस्त
जोडीदारीणच कशावरून ? कारण असे की, ती बांधकामात अजिबात सहभाग घेत नव्हती. उलट मान वाकडी करून करून ती घरट्याचे वेगवेगळ्या कोनातून बराच वेळ निरीक्षण करत असे आणि मग इथली काडी उपस, तिथली काडी उपस आणि बाहेर फेकून दे असे मात्र करत असे. आलं ध्यानात ?
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेख. फोटो पाहून

सानझरी
गुरुवार, 08/11/2016 - 14:56 नवीन
अतिशय सुंदर लेख. फोटो पाहून डोळे निवले. बुलबुलला मकोयची फळं फार म्हंजे फार आवडतात. वाट्याण्याएवढी काळ्या द्राक्षा सारखी दिसतात. मकोय कुंडीत लावू शकता. आमच्याकडे गाणं गातगात फळं खातात. किसमीस सुद्धा त्यांचं लैच फेवरेट. हा लेख २०१४चा आहे. अजुनही येतात काहो बुलबुल?
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/11/2016 - 17:41 नवीन
धन्यवाद ! २०१५ साली एक जोडी फेरी मारून गेली, पण अंडी घातली नाही. २०१६ मध्ये तर कोणीच आले नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

ओह :( किसमीस टाकुन ठेवत जा.

सानझरी
गुरुवार, 08/11/2016 - 17:48 नवीन
ओह :( किसमीस टाकुन ठेवत जा. त्यांना पता लागतो बरोबर. येतील परत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सुरेखच

झेन
गुरुवार, 08/11/2016 - 19:56 नवीन
फोटो आणि वर्णन मस्तच. आमच्याकडे बुलबुल आणि सनबर्ड नियमित घरटे करतात पण सर्व बाजूनी झाकले जाईल असे बघतात तस्मात त्यांना त्रास होऊ नये म्हणून नो फोटो सेशन, फक्त अनाहूत मांजरांना सारखे हाकलावे लागते.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा