✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका अडनिड गावाची गोष्ट........२

द
दशानन यांनी
Wed, 11/19/2014 - 23:46  ·  लेख
लेख
एका अडनिड गावाची गोष्ट........१ * हणम्या आणि रम्याची चिता धडाडत पेटली होती, अगतिकतेने सारं गाव त्या चितेकडे डोळे सताड उघडे टाकून पाहत होते. बळीवर बळी ते घेत होते, पण आधी गावाच्या वेशीभायेर असलेलं भय आता गावाच्या जागृत बिरोबाच्या मंदिरापर्यंत पोचलं होते, म्हणजे आता त्यांचा वावर गावभर होता? असला प्रश्न चेहरयावर घेऊन प्रत्येकाचे डोळे त्या दोन चिता पहात होत्या. पाटलाच्या मनात वादळ उठलं होते, तो समोर जळत असलेली चिता पाहून सैरभैर झाला होता व पुजारयाचा हात हातात धरून तो जोरात ओरडला “असा देवानं कौल का दिला?????” धडधड जळत असलेली चिता बघायचे सोडून पूर्ण गाव आता पाटील व पुजारीकडे पाहू लागले व प्रत्येकाच्या नजरा हाच प्रश्न पुजाऱ्याला विचारात होत्या. पुजाऱ्याने लोकांच्या नजरा ताडल्या व पटकन तो पाटलाला म्हणाला “वेळ नका दडवू, तुम्ही निघा. पोचा तालुक्याला, आणि बोलावून घेऊन या धर्माबाबाला, आता तोच यातून मार्ग काढेल. जावा तुम्ही. निघाच.” जमावातून पण काही अस्पष्ट पण अगतिक असे आवाज आले की “पाटील, जावा लवकर. नाहीतर उद्या कोणाची चिता येथे.....” पाटील खांदे पाडून मागे वळला व पाय ओढत ओढत तो तालुक्याच्या दिशेला निघाला. चार तास चालून पाटील तालुक्याला पोचला होता, धर्माबाबाची झोपडी शोधायला त्याला जास्त त्रास नाही झाला पण धर्माबाबा झोपडीत नव्हता. काय करायचे हा विचार करत पाटलानं गंजीफ्रोकात हात घालून विडीचे बंडल काढलं आणि एक विडी पेटवली. तासाभरानं धर्माबाबा त्याला येताना दिसला व रिकामं झालेले बिडीचे बंडल त्याने दूरवर फेकत दोन्ही हात जोडून उभा राहिला व धर्माबाबा समोर येतं त्याच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला “पापी!” तसा पाटील चमकला व त्याने धर्माबाबासमोर लोटांगण घातले व म्हणाला “बाबा, वाचावा!” धर्माबाबाने त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि आधी आपल्या धुनीत तूप ओतलं! जसं तूप आगीवर पडलं तसं जोरात भडका उडाला व त्या तांबडया भडक उजेडात धर्माबाबाचा चेहरा अजूनच भयंकारी दिसू लागला. पाटील कसाबसा स्वत:ला सावरत धर्माबाबाच्या झोपडीत शिरला व धर्माबाबासमोर हात झोडून, मान खाली घालून बसला. तोच धर्माबाबा कडाडला “तुम्ही, निष्पाप लोकांचा जीव घेतला, अघोरी, अघोरी पद्धतीने. बोल खरं आहे की नाही?” पाटलानं फक्त मान डोलावली ती होकारार्थी कि नकारार्थी हे पण त्याच्या ध्यानात आले नाही, पण पाटलाच्या घश्यातून विरळ असा आवाज आला व तो म्हणाला “बाबा, वाचवा. चूक झाली.” धर्माबाबाने नकारार्थी जोरजोरात मान हलवली व तो म्हणाला “तुझ्या मागोमाग ते पण येथे पोचले आहेत, ते बघ तुझ्या मागेच ते उभे आहेत... मला दिसत आहेत. त्यांना न्याय पाहिजे व तुला बचाव. सांग कोणाच्या मागे मी जाऊ सांग...” असे म्हणत धर्माबाबाने आगीत काहीतरी टाकले व पुन्हा समोरील धुनीतून जोरदार ज्वाळा उफाळून वर आल्या. पाटील दिसत नसलेल्या त्यांना व बाबाला उद्देशून एकत्रच म्हणाला “आम्ही चुकलो, आमची चूक झाली, गैरसमज होता हो.. आम्हाला माफ करा पण या चक्रातून आम्हाला काढा. मी, माझं गाव गुन्हेगार आहे, पण त्याची एवढी मोठी शिक्षा? सात तरणी पोरं, आणि दोन गर्भार स्त्रियांचा जीव गेला आहे, अजून किती बळी??? “ आणि पाटील घाय मोकलून रडू लागला, तोच धर्माबाबा त्याला दरडावत म्हणाला “ते म्हणत आहेत, त्यावेळी तुझी का वाचा बसली होती, पाटील? तू का आम्हाला वाचवले नाहीस? आता आम्ही आमची शपथ पूर्ण करणारच. उद्याच तुझ्या पोरांची बारी हाय, लई जीव हाय नव्हं तुझा पोरावर?” आपल्या पोराचं नाव आल्या आल्या पाटील जमिनीवर कोसळला व ओरडला “धर्माबाबा, वाचवा माझ्या पोराला...” धर्माबाबाने समोरच्या धुनीत पुन्हा काही तरी टाकले व उफाळलेली ज्वाळा शांत शांत होत, धुनीवर पसरली व धर्माबाबाचा हलकासा आवाज आला, “पाटील, हे सगळं हाताबाहेर गेलं आहे. मी येतो तुमच्यासोबत गावात. पण माझी व्यवस्था मी सांगतो तशीच झाली पाहिजे, मी यातून तोडगा काढेनच असे नाही, या प्रयत्नात माझापण जीव जाईल कदाचित. पण मी जो मार्ग सांगेन तो तुम्ही कराच. महत्त्वाची गोष्ट, सर्वात प्रथम गावच्या वेशीच्या अलीकडेच मला पूर्ण सत्य माहिती हवे आहे, नेमकं काय घडलं, गावासोबत आणि त्यांच्या सोबत!” धर्माबाबाने धुनीवर हात फिरवत इकडे तिकडे बघत एक वाक्य उच्चारले “हे, बघा मी चाललो आहे त्या गावात. मला नेमकं कळू द्या. काय झालं. तो वर तुम्ही शांत रहा. तुम्हाला काय बळी हवा तो तुम्ही घेतला आहेच.. अगदी ताजा ताजा तुम्ही घेतला आहे, दोन दोन बळी. आता काही दिवस शांत बसा. मला माझे काम करू द्या, किमान काही नाहीतर मी तुम्हाला तरी मुक्त करेन, याचे वचन देतो.” त्या छोट्याश्या झोपडीत हलकंसे जोरात वारं वाहिले व एक अस्पष्ट असा आवाज धर्माबाबाच्या कानावर आला “आम्हाला, मुक्ती नको आहे, आम्हाला बळी हवा आहे.... ज्यांनी आम्हाला येथे पोचवले त्यांना सोबत घेऊन जाणार आहोत आम्ही.. पण तुम्ही प्रयत्न करणार तर करा आम्ही मध्ये नाही येणार, पण आमचे लक्ष वेशीवर आहे” धर्माबाबा पण क्षणभर थरारला पण, अगतिक पडलेल्या पाटीलाच्या कपाळावर हात फिरवत म्हणाला “पाटील, अजून खूप भोगायचे आहे. थार्‍यावर या. मन निष्टुर करा. आता आपण निघू. जाताना मला सर्व काही सांगा अगदी एक एक गोष्ट! नेमकं काय घडले?” धर्माबाबानं गरजेचे सामान बांधले व तो पाटलाच्या मागे मागे चालू लागला व पाटील त्याला काय घडलं हे सांगू लागला. “धर्माबाबा, मागच्या दिवाळीची गोष्ट आहे, थंडी हळूहळू पसरत होती, पिकपाण्यानं सगळं गाव आनंदात होते, पण जे आज पर्यंत गावात कधी घडलं नव्हतं असे काहीसं घडलं. आधी आम्ही किरकोळ गोष्ट म्हणून दुर्लक्ष केलं पण, सुताराच्या घरी एका रात्री चोरी झाली होती. चोरट्यांनी सुताराची सगळी हत्यारं पळवली, नंतर चोरी देसाईवाण्याच्या घरात झाली, नंतर परत चोरी चंद्रा सोनारयाच्या घरात झाली, झाडून घरात होतं नव्हतं ते, चोरून नेलं. गावाचचं गहाण असलेलं सोनं पण चोरीला गेलं तरी गाव शांत होतं, पण एक दिवशी चोरांनी बिरोबाच्या मंदिरावर डल्ला मारला. त्या दिवशी पोर्णिमा होती, गाव शांत झोपलं असताना अचानक खन्न करून घंटीचा आवाज झाला तो आज बिरोबाच्या मंदिरातील घंटीचा होता, एक एक करत आसपासची लोकं जागी झाली, आणि वेशीबाहेर पाठीवर ओझं घेऊन पळत असलेली काही आकृत्या दिसल्यावर गावभर कल्ला झाला, अनेक मशाली पेटल्या... आणि एक मोठा आवाज सगळा परिसरभर पसरला “अरं चोरांनी बिरोबांला पण लुटला!” छोट्या-मोठ्या चोऱ्यांनी त्रस्त असलेल्या गावाच्या मनावर यापेक्षा मोठा घाव दुसरा कुठला असणार? जो बिरोबा गावाचे रक्षण करतो त्याच बिरोबाला लुटला होता त्या चोरांनी.” पाटील क्षणभर थबकला व समोर दूरवर बोट दाखवत म्हणाला “ते बघा धर्माबाबा, बिरोबाचे पठार आणि ते ते.. चिंचेचे झाड... “ धर्माबाबाने तिकडे पाहिले व तो थबकलाच व म्हणाला “पाटील गाव राहू दे, आधी आपण त्या चिंचेच्या झाडाकडे जाऊ या.” पाटलाच्या अंगाचा थरकाप उडाला व तो घाबरत म्हणाला “तिकडे? नको, धर्माबाबा, आधी आपण गावात जाऊ या.... तिकडे ते असतील.” धर्माबाबा गावाच्या वेशीवर पोचला व एकदम बसकण मारून तो म्हणाला “आधी गावं बांधावं लागेल मला, आधी वेश बांधावी लागेल मला. पाटील, तुम्ही येथेच थांबा व गावातला कोणीतरी बोलवा व येताना त्याला सांगा बिरोबाचा अंगारा अगदी मिळेल तेवढा घेऊन ये!” पाटलाने जीवाच्या आकांताने आवाज दिला “रम्या...........” तोच जीभ चावत पाटीलाने परत आवाज दिला “चिंट्या, लवकर इकडे ये, येतानं बिरोबाचा अंगारा भेटेल तेवढा गोळा करून ये, चिंट्याsssssssssss! मंदिराच्या शेजारी असलेल्या झोपडीतून चिंट्या कसाबसा धावत निघाला व मंदिरातून अंगारा गोळा करून तो पाटलाकडे धावत पोचला व समोर अगतिक पाटील व जमिनीवर बसलेला धर्माबाबा पाहून त्याचा उरला-सुरला धीर देखील सुटला व तो पाटलाच्या मागे थरथरत उभा राहिला व पाटलाने कशीबशी त्याच्या हातातून बिरोबाच्या धुनीतील राख काढून धर्माबाबाच्या समोर ठेवली. ती राख आपल्या हातात धरून धर्माबाबा बोलला, “पाटील, पुढे काय झालं?” असं म्हणत त्यांने हातावरील अंगारावर फुंकर मारली व परत बोलला, पाटील जास्त वेळ नाही, आपल्याकडे आता, ते आत गावात आहे..” पाटलानं आवंढळ गिळला व पूर्ण जोर लावत तो पुन्हा बोलू लागला. “त्यांनी आमचे दैवत बिरोबाचे मंदिर लुटले होते, अंधारात कोण कोठे पळालं याचा सुगाव लागला नाही, पण तिकडे दूरवर बिरोबाच्या पठारावर कोणीतरी आहे असा भास झाला व सगळे गाव धावत तिकडे पळाले. पठारावर चिंचेच्या झाडाजवळ ती तीन लोक वस्तीला आलेली दिसली. त्यांच्याकडे चूल होती, दोनचार भांडी होती, त्यांना आम्ही इचारले ‘कोण तुम्ही’, तर म्हणाले आम्ही प्रवासी आहोत, तालुक्याला निघालो होतो, रात्र झाली म्हणून इथं डेरा टाकला, सकाळी निघू... असे ते म्हणाले, पण हणम्याला जोर चढला होता, तो बोंबलला, आधी त्यांचा तपास करा, साले कुतरडे, रांडेचे चोरासारखे दिसतात, आधीच गाव पिसाळलेले होते, आणि तपासात त्यांच्याकडे मुठभर सोनं सापडलं. ते सांगत होते, तालुक्याला चाललो आहोत. देवाची मूर्ती करायला.. त्यांच्या गावाच्या देवाची मूर्ती. पण तोच काशीची बायको ओरडली, अगं बाई... हे तर अगदी आमच्या सासूबाईच्या गंठणासारखं दिसतं आहे, आणि क्षणात उद्रेक झाला!” पाटील क्षणभर थबकला व पुन्हा मागे वळून चिंचेच्या झाडाकडे पहात म्हणाला “हे सर्व तेथे, त्या झाडाखाली घडलं होतं. गावातील प्रत्येक आणि प्रत्येकजण चिडलेला होता. त्यांनी त्या पोरांना चिंचेच्या झाडाभोवती बांधले, त्यात हणम्या, रम्यासारखी बाकीची अनेकजण होती, ज्यांनी आधी शिव्याचा भडीमार केला, पण ती पोरं तेच सांगत होती, जे त्यांनी आधी सांगितले, पण गावावर जसं गारुड झालं होते, सगळेच पिसाळले होते, तोच हणम्या पेटती बिडी घेऊन त्यांच्या जवळ गेला व म्हणाला, अरे, रांडेच्यानो, बिरोबाला लुटता.. असे म्हणत त्याने पहिला चटका एकाला दिला तो कळवळला व जोरात ओरडला, सोडा आम्हाला, आम्ही नाही केली चोरी कुठे, आमच्या गावात माणूस पाठवा. आमच्या गावात विचारा सोनं कोणाचं आहे आमच्याकडे. पण त्यांच्याकडे बोलण्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते, हणम्याच्या पेटलेल्या बिडीला वातीसारखा वापर होऊन अनेक बिड्या पेटल्या होत्या, त्या पोरांच्या अंगावर नको तेथे, बिड्याचे डाग दिले जात होते, बिडीच्या चटक्याचे एक वैशिष्ठ असते, त्वचेवर बिडी वीजवली तर ती अंगार आताच सोडते, आणि तीळतीळ मरणासारखा एक एक तुकडा ज्याच्या शरीरात ती बिडी घुसली आहे, त्याला क्षणाक्षणाला शेकडो मृत्यू सारखा असह्य त्रास देत असते. हे घडत असतानाचं सुतारानं जळतं लाकूड आणलं आणि त्या मुलांच्या मांडीवर चटके द्यायला सुरवात केली, ती पोरं किंचाळत होती, ओरडत होती, पण तो उन्माद गावाचा टोकाला पोचला होता, खोताच्या म्हातार्‍याने त्या पोरांच्या अंगावरील कपडे फाडले व थरथरत्या आवाजात तो म्हणाला, प्रत्येक घरातून एक जळतं लाकूड आलंच पाहिजे..., एक एक करत अनेक घरातून जळतं असलेल्या लाकडांचे ढीग जमा होतं गेले, ती पोरं जीवाच्या आकांताने ओरडत होती, बिरोबाची शपथ, आम्ही नाही केली चोरी..... पण कोणापर्यत तो आवाज पोचलाच नाही...” धर्माबाबाने रागाने पाहिले, आणि पाटील घाबरत म्हणाला “शेवटचं काम माझा मुलानं केलं त्याने घरातील, ताज्या तुपाची बरणी त्यांच्यावर फोडली!” धर्माबाबानं डोळे मिटले व एवढेच म्हणाला “पुढे” पाटलाने कसाबसा श्वास घेतला व म्हणाला “त्यातील एक जळताना, रागाने म्हणाला ‘मी चोर नाय, पण बिरोबाची शपथ, मी गावाचं वाटोळं करेन, इथं मशान असेलं मशान, घरटी एक माणूस मारेन मी!’ धर्माबाबा हेच घडलं” असं म्हणून पाटील जमिनीत नजर गाडून दगडासारखा निशब्द झाला. धर्माबाबानं बिरोबाचा मुठभर अंगारा एक मोठ्या घाघरभर पाण्यात टाकला व आपल्याकडील कसलीशी राख पण त्याने त्या घाघरीत टाकली व चिंट्याच्या हातात देत म्हणाला, “जा! गावाच्या चारीबाजुला हे पाणी शिंपडून ये, जा लवकर.” चिंट्या घागर घेऊन पटापट पाणी शिंपडत गेला. धर्माबाबा पाटीलाला म्हणाला “पाटील, धीर धरा. आज रातच्याला पूजा करेन मी, महारुद्राची..” धर्माबाबानं आपलं साहित्य बिरोबाच्या पठारावर त्याच चिंचेच्या झाडाखाली मांडले, तात्पुरता निर्माण केलेला अग्नीकुंड धगधगत होता, धर्माबाबा जोर जोरात महारुद्राला आव्हान करत होता, तोच विकटहास्य धर्माबाबाच्या कानावर आपले तसे धर्माबाबानं आपलं डोळे उघडले.. समोर ती तीन पोरांची भूतं बसली होती व ती धर्माबाबाकडे बघून हसत होती. त्यातील एक म्हणाला “धर्माबाबा, तू काय बी कर, घेतलेली माझी शपथ मी पूर्ण करणारच. गावातील घरटी एक माणूस मरणारच.” असं म्हणून तो धर्माबाबाकडे रागानं बघू लागला, तोच दुसरा म्हणाला “धर्माबाबा, जिवंत असताना बिडीचे चटके, ते पण थोबाडापासून पायाच्या बोटापर्यंत सगळीकडे कधी खल्ले हायत का? जिवंत जळताना होणारी तडफड कधी अनुभवली हाय तुम्ही? आमचा बदला आम्हाला घेऊ द्या, आम्ही तुम्हाला काय बी करणार नाही..” धर्माबाबा शहारला होता, पण कसंबसं धीर गोळा करून धर्माबाबा बोलला “पोरांनो, तुमच्यासोबत लई वंगाळ घडलं, तुमचा हक्कपण हाय बदला घेण्याचा. पण ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला जिवंत जाळले, त्यांना तुम्ही धडा शिकवला आहेच कि, बाकीच्यांना जीवदान द्या एवढंच माझं मागणे. तुम्हाला कैद करून बाटलीत ठेवण्यापेक्षा तुम्हाला मुक्ती मिळावी म्हणून मी पूजा करेन, बिरोबाची शपथ!” तिसरा जोरात ओरडला “नाय, कधीच नाय!” धर्माबाबा हताश पहात बसला, समोरून ते कधी व कुठे गेले याचा पत्ताच धर्माबाबाला लागला नाही. संध्याकाळ सरून केव्हाच रात्र झाली होती. त्या निरव पठारावर, शांत असलेल्या चिंचेच्या झाडाखाली विजत आलेल्या अग्नीकुंडासमोर धर्माबाबा समाधी लावून बसला होता व ती तीन भूतं, चिंचेच्या झाडाच्या एक भल्या मोठ्या फांदीवर बसून टक लावून धर्माबाबा काय करतो हे पाहत होते. एकाचे डोळे चकाकले, तो सरळ धर्माबाबासमोर गेला.... सकाळच्या पारी पाटील, लगबगीने धर्माबाबाकडे आला व धर्माबाबासमोर हात जोडून बसला. धर्माबाबानं डोळे उघडले व पाटीलांकडे डोळे रोखत धर्माबाबा एका बाटलीकडे बोट दाखवत म्हणाला “त्यांना बाधून टाकलं हाय, आणि त्यांनी गावाला अभयदान द्यायचं मान्य केलं हाय. त्यांच्यासाठी गावात बिरोबा मंदिरात एक पूजा घालायची येत्या अमावश्येला. म्हणजे परवा रातच्याला. गावातील झाडून सगळी माणसं हजर हवीत. आजच गावात बातमी द्या, सगळ्यांना. पूजा झाल्यावर यांना मुक्ती मिळेल, सगळ्यांनी प्रार्थना करायची हाय.” पाटील भलताच आनंदाला, त्यानं जमिनीवर लोटांगण घातलं व धर्माबाबाचे पाय धरून म्हणाला “तुम्ही मला, माझ्या गावाला वाचवलं, आम्ही जन्मभर तुमचं हे उपकार नाई विसरणार.” असं म्हणून पाटील धावतच गावाकडे निघाला, त्याच्या पाटमोऱ्या आकृत्तीकडे पहात धर्माबाबा तेथेच बसून राहिला, व चिंचेच्या झाडाच्या त्या भल्यामोठ्या फांदीवर आपली नजर टेकवून, एवढंच म्हणाला “बिरोबा, जशी तुझी इच्छा!” बिरोबाच्या मंदिराजवळ संध्याकाळ होताच गाव जमू लागले, आज आमावस, धर्माबाबा पूजेच्या लगबगीत होता व गावाचा पुजारी त्याला मदत करत होता. पुरती रात्र पडताच, धर्माबाबानं पूजेला सुरवात केली. पारावर पाटील आणि त्याच्या शेजारी त्याचं भेदरलेलं पोरगं बसलं होते, २४-२५ वर्षाचा गडी, भिजल्या मांजरासारखा अंग चोरून बसला होता, हळूच जमेल तसं इकडे तिकडे पाहत होता, जरा जरी पानांची सळसळ कानावर आली की दचकून उठायचा आणि परत बापाचा हात घट धरून बसायचा. इकडे धर्माबाबाची पूजा शिगेला पोचली तशी धर्माबाबानं, पाटलाला आणि त्याच्या पोराला पूजेजवळ बोलावलं. ते जवळ येऊन बसताच धर्माबाबा जोरात गावाला उद्देशून म्हणाला “हे बघा, गावच्या हातून लै मोठं पाप घडलं, आणि अनर्थ झाला, निषाप पोरांचा हकनाक जीव तुम्ही घेतला, त्यांनी त्याचा बदला पण घेतला, आज त्यांनी तुम्हाला क्षमा केली, आता तुम्ही सर्वांनी मोकळ्या मनानं त्यांच्याकडे क्षमा मागा व क्षमा दिल्याबद्दल त्यांचे आणि बिरोबाचे आभार माना.” असं म्हणताच सारं गाव उभं राहिलं आणि त्यांनी डोळे मिटले व हात जोडले! कोणाच्यातरी किंचाळन्यानं सर्वांचे डोळे खाडकन उघडले तर.. पाटील, पूजेच्या अग्नीकुंडावर उलटा लटकत होता, आणि जीवाच्या आकांतानं ओरडत होता “सोडा मला, सोडा मला, मी चुकलो..” धर्माबाबा कडाडला “पाटला, आता तरी काय ते खरं बोल, नाही तर ही पोरं सोडतील तुला आगीत. ती सुटतील, पण तू मुंजा होऊन कायमचा त्या चिंचेच्या झाडाला लटकशील..” पाटील जीवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न करत होता पण, आता ते त्याला शक्य नव्हते. शेवटी रडत रडत पाटील म्हणाला “धर्माबाबा वाचवा मला, मी सांगतो सगळं खरं. गावात चोऱ्या आणि बिरोबाचं मंदिर आम्हीच लुटलं होतं, मी रम्या आणि हणम्याची मदत घेऊन. सगळं सोनं माझ्या शेतातील विहिरीत दडवून ठेवलं आहे.” सगळं गाव आधी हवेत उलटा लटकलेला पाटील बघून दंग होते, पण त्याचा कबुलीजबाब आला तसा, गावाचा राग उफाळून आला व एक सुरात अनेक आवाज आले “पाटलानं बिरोबाला लुटला??? मारा त्याला.. जाळा त्याला!!!!” आणि जमाव पाटलाकडे धावून येऊ लागला तोच... धर्माबाबाने आवाज दिला “थांबा, त्यांचा सूड त्यांना घेऊ द्या. मी त्यांना तसे वचन दिले हाय, आणि त्या बदलात मी गावासाठी अभयदान घेतलं हाय.” धर्माबाबानं लटकलेल्या पाटलाकडे पाहिले व म्हणाला “पाटील, आता जाब बिरोबाला द्या.” लटकलेला पाटील धाडकन अग्नीकुंडात पडला.. * (क्रमशः) *

Book traversal links for एका अडनिड गावाची गोष्ट........२

  • ‹ एक अडनिड गावाची गोष्ट... १
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4698 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

झक्क्कास वाचतो आहे. पु.भा.प्र

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 11/20/2014 - 00:05 नवीन
झक्क्कास वाचतो आहे. पु.भा.प्र. आणि मी पहिला :)
  • Log in or register to post comments

अरे ?

अमित खोजे
गुरुवार, 11/20/2014 - 01:18 नवीन
अरे ? अजून क्रमशः आहे होय! जॅक स्पॅरोने पयला म्हटल्यावर मग लक्ष गेले. पाटील गेल्यावर आता अजून काय नवीन बुवा?
  • Log in or register to post comments

मस्त कथा...

मुक्त विहारि
गुरुवार, 11/20/2014 - 01:50 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments

दुसर्‍या भागापर्यंत आधीचे सहा

स्पंदना
गुरुवार, 11/20/2014 - 03:49 नवीन
दुसर्‍या भागापर्यंत आधीचे सहा आणि दोन आणि आता हा पाटिल असे मुडदे पडले आहेत. एकदम ढिंच्याक दे मार धाड दिसतय प्रकरण!!
  • Log in or register to post comments

वा!

एस
गुरुवार, 11/20/2014 - 09:40 नवीन
हा भाग परत टाकलाय का? आधी वाचल्याचं आठवतंय. असो. चित्तथरारक झालाय.
  • Log in or register to post comments

आधी प्रकाशित केलेला भाग खूप

दशानन
गुरुवार, 11/20/2014 - 21:53 नवीन
आधी प्रकाशित केलेला भाग खूप मोठा झाला होता व अनेकांना मोबाईल व इतर जागी वाचताना त्रास होत होता म्हणून त्यातून हा भाग काढून भाग -२ केला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आय सी!

एस
गुरुवार, 11/20/2014 - 23:44 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मस्त शैली जमलीय रे भौ

विजुभाऊ
गुरुवार, 11/20/2014 - 13:53 नवीन
मस्त शैली जमलीय रे भौ
  • Log in or register to post comments

भारीच

स्पा
Fri, 11/21/2014 - 10:26 नवीन
भारीच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा