✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऐका सत्य नारायणाssssची कथा!

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Fri, 11/14/2014 - 14:57  ·  लेख
लेख
थोडी पार्श्वभूमी.... मी १९९७ पासून हे पौरोहित्याचं काम करायला लागलो..पहिली ४/५ वर्ष ही इतरांच्या हाताखाली तयार होण्यात गेली.पुढे जसजसा या सर्व कर्मकांड आणि धर्माबाबतचा विरोधी मतांचा अभ्यास वाढत गेला..तसतसा मी स्वतः या निष्कर्षाप्रत आलो,की आपल्या जवळ असलेलं हे साधन जनकल्याणाच्या हेतूनी वगैरे जन्माला आलेलं आहे.हा एक लोकप्रीय गैरसमज आहे. महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब अंबेडकरांसारख्यांनी वैदिक धर्मावर/कर्मकांडांवर केलेले आरोप हे आकसापोटी नाहीत..तसेच त्यात परकीय शक्तिंचा हात इत्यादी काहिही नाही. मग त्यांचं(फुले/अंबेडकर..) लेखन कानांना आणि मनाला ऐकायला कितीही वाइट लागो. सावरकरांनी हिंदूधर्मावर केलेल्या शस्त्र-क्रीया तर अत्यावश्यकच होत्या. त्यांनी आमच्या सत्यनारायणाच्या भाकडकथेवरुन सत्यनारायणाला असत्याची पूजा असा समर्पक शब्द वापरलेला आहे. पुढे अं.नि.स.चं डॉ.नरेंद्र दाभोलकर लिहित सर्व साहित्य..आणि अंनिस..च्या इतर कार्यकर्त्यांनी लिहिलेले लेख पुस्तकं वाचून झाली..शाम मानव यांचीही पुस्तकं भाषणं इत्यादी ऐकून झाली.. नरहर कुरुंदकर* तर माझं जिवनमूल्यच आहे..त्यामुळे त्याविषयी वेगळे सांगायला नको. (*हा माणुस पुस्तकातून माझ्या हाती लागला नसता..तर मी या व्यवसायात ऑन ड्युटी असताना..धर्मनिरपेक्ष वागायचं म्हणजे...नक्की वागायचं काय? हे मला अधिक चांगल्या रितीनी कधिच कळू शकलं नसतं. :) ) या सर्व गोष्टींनंतर मी स्वतः असा निर्णय घेतला की हे भिक्षुकिचे काम करत असताना..मी स्वतः...माझ्यासमोर येणार्‍या कोणत्याही यजमानाच्या कुठल्याच प्रकारच्या श्रद्धेला खतपाणी घालणार नाही..ती श्रद्धा कमी किंवा जास्त-करवायच्या प्रयत्नात पडणार नाही. एखादा धर्मभोळा आयुष्यात न भरून येणारी हानी श्रद्धेच्या नादी लागून करताना दिसला,तर त्याला नीट समजावून सांगुन अथवा त्याच्याच हितासाठी खोट्या गोष्टी सांगुनंही त्याचा श्रद्धामार्ग बदलवायला किंवा मऊ करायला भाग पाडिन.याउप्पर मी कुणाच्याही धर्मश्रद्धेत तो पर्यंत हस्तक्षेप करणार नाही..जोपर्यंत ती इतरांना त्रासदायक ठरणार नाही.

तुंम्ही म्हणाल...

अहो ..हे सर्व तुंम्ही आंम्हाला कशाला सांगत आहात??? तर..त्याचं कारण असं की आता पुढे तुंम्ही सत्यनारायणाच्या कथेचे २ प्रकार ऐकणार आहात.ते नेमके कशामुळे तयार झाले..याची पूर्वपीठिका माहित असावी. हे सर्व बदल (गेल्या दहा वर्षात..) करत असताना माझ्या(मना)समोर एकच उद्दिष्ट आहे. ते म्हणजे माझ्यासमोर येणार्‍या धर्म:श्रद्ध माणसाला धर्माच्या नावाखाली मिळणारी पारंपारिक मूल्य मी शक्यतोवर मला टाळता यावी..आणि त्याच्या जागी आधुनिक्/पुरोगामी असं काहि देता आलं नाही..तरी किमान नितीची उपासना घडायला काहितरी कारणीभूत होइल असं काहि देता यावं..आता यातंही एक अडचण नेहमीचीच असते/असणार आहे. ती म्हणजे एखाद्या यजमानानी ही कथा किंवा असा बदल त्याला नको असला,(जसे की कन्या-दानाच्या जागी ..मी आणलेला वधू/वर स्विकाराचा विधी!..होमाशिवाय'ची वास्तुशांत! इत्यादी..) तर मी काय करतो? त्याला हवं ते (पारंपारिक ) काम देऊन मोकळा होतो. असं का बरं मग? कारण तो मला त्याला हवं ते करवून घेण्याचेच पैसे देत असतो. आणि मी ही कुणी समाजसुधारक नव्हे तर एक भटजी आहे. (फारतर..धर्मसुधारणेची इच्छा असलेला भटजी आहे ..असे म्हणता येइल.) त्यामुळे ही मर्यादा मला केवळ पैश्यालाच नव्हे,तर यजमानाला भारतीय घटनेनी दिलेल्या धर्मोपासनेच्या स्वातंत्र्याचा मान राखून पाळावीच लागणार. अर्थात..मी जे जे बदल करतो..ते ही केवळ मला हवे असतात म्हणून नव्हे..तर त्यालाही चालणारे असतात..म्हणूनच! असो..बरच पुराण लावलं. आता मूळ विषयाकडे वळू. सत्यनारायणाच्या कथेत..मी केलेले बदल म्हणजे,नक्की आहे तरी काय??? अध्याय पहिला :- यात सुरवातीच्या काहि वाक्यांनंतर येणारं कर्मविपाकाचं मुल्य मी सरळ उडवुन लावलेलं आहे. आणि पुढे इहलैकिक दु:खांचा पूर्वजन्मात झालेल्या पापांशी असलेला समंधही ...मी रद्दबातल केला आहे. तसेच नारद आणि विष्णुच्या संवादात..ही पूजा पौर्णिमेला केली असता मिळणारं..अधिक फळ! हे टाळून कोणताही शुभकारक दिवस आणि आपलं मन प्रसन्न असेल अशी वेळ..म्हणजेच चांगला मुहुर्त असा फेरबदल केलेला आहे. बाकि पुजेमुळे होणारे फायदे/तोटे तर संपूर्ण कथेत कुठेच शिल्लक ठेवलेले नाहीत. अध्याय दुसरा:- या अध्यायापसून सत्य-देव किंवा सत्य-नावाचा-नारायण असे सूचक उल्लेख पुढे सर्वत्र मी केले आहेत. आणि शतानंद ब्राम्हणाला देव त्याची गरिबी जाऊन श्रीमंती यावी..म्हणून हा उपाय सांगतो..असं जे प्र-लोभन दाखवलय..ते सोडून मी त्याला "हे पूजन केल्यानी तुझी दु:ख दूर होऊन..तुला सन्मार्गाचं दर्शन घडेल(आणि त्या योगेच तू सुखी होशिल!) असं वाक्य टाकलय. पुढे हा शतानंद (लॉट्री लागल्या सारखा) पूजेवर पूजा(स्वतःच्या घरी!) करुन सुखी होत नाही..तर स्वतःजवळ असलेली विद्या इतरांना प्रसादासारखी वाटतो,आणि त्यायोगे लोकप्रतिष्ठा/राजप्रतिष्ठा मिळवुन सुखी होतो..(आणि याची जाणिव) म्हणून त्याला वाटेल तेंव्हा पूजा करतो ..असं दाखवलय. त्यापुढचा त्याला मोळिविक्या भेटण्याचा प्रसंगही बदलवून त्यात पूजेऐवजी नामस्मरण ही पण (वेळप्रसंगी..) पूजा होऊ शकते असं मांडलय. शिवाय या गरीब मोळिविक्याला प्राचिन कथेत कचकाऊन प्रलोभनं/अमिषं दाखवली आहेत..त्यांनाही मी टाळलेलं आहे. थोडक्यात..परमेश्वरी आशिर्वादाच्या योगे माणसाच्या जीवनात मुळातच असलेला प्रयत्नवाद..सदाचरण हेच फळ-मिळायला कारणीभूत असतं...हे मी या दुसर्‍या अध्यायाचं बीज बनवलं आहे. अध्यात तिसरा:- हा फेमस साधुवाणी एपिसोड आहे.. भरपूर चमत्कार..लबाड्या केल्या तरी फळणारा देव..तसेच निष्कारण त्रासात टाकणारा आणि पूजा केल्यावर-सोडणारा असा-देव..मी उडवून लावलेला आहे. किंबहुना पहिल्यांदाच राजा उल्कामुख हा..हे पूजन पुत्रप्राप्तीसाठी करतो..असं दाखवलय तिथुनच बदल सुरु केलाय.. राजा हे पुजन कशासाठी करतो..? तर राज्य चालविण्यासाठी जी बुद्धी इच्छा शक्ति लागते..ती देणारा(अश्या मनोकामना)पूर्ण करणारा हा देव आहे म्हणून!.. नंतर साधुवाणी हेच पूजन का करतो? तर.. मूळ कथेत अपत्यप्राप्तीसाठी पूजा हा हेतू दर्शविलाय..मी तो बदलून..आयुष्यात जे न्यून आहे..ते(योग्य मार्गानी.) पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना साधुवाण्याकडून करविली आहे.पुढे मग साधुवाण्याची बायको(मुलं झाल्यावर..साधुवाण्याला देवाचे ऋण मानावे म्हणून पूजा करायला लावते..तो ती टाळतो..आणि नंतर पुढे बोलल्याप्रमाणे मुलिच्या विवाहावेळी करत नाही..वचनभंग करतो..त्यामुळे त्याला चोरिचा आळ येऊन तुरुंगात पडावं लागतं.. हा भाग साधारण तसाच ठेवलाय.(कारण आरपार बदलेली कथा कुणालाच अवडत नाही..हा अनुभव आहेच!) तरिही पुन्हा तुरुंगातून सुटायला पुन्हा पूजेचा प्रकार मी ठेवलेला नाहीच.. शिवाय इकडे साधुवाण्याच्या घरच्यांनी पुजा प्रार्थना केली..आणि लगेच तो (त्या योगे) तिकडे सुटला ..हा चमत्कारिक पणा बदलून..मी त्या चंद्रकेतू राजाला..नीट तपास पूर्ण झाल्यावर हे कळलं..की हे दोघं चोर नसून व्यापारीच आहेत..आणि मग त्यांनी यांना सोडलं..असं सांगुन या अध्यायाला शेवटाला आणलय..मूळ कथेत हे सर्व राजाला सत्यनारायणानी स्वप्नात येऊन ..कुठलिहि कारणमिमांसा न देता "हे चोर नाहीत..यांना सोडून दे " असं सांगितलेलं आहे. (पुढे हिच गोष्ट्/कथा चवथ्या आध्यायात पूर्ण होते..) अध्याय चवथा:- या अध्यायात साधुवाण्याने घरीजाताना मार्गात विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राम्हणांना दक्षिणा देऊन प्रवास सुरु केला असा मुद्दा आहे.. हा मी सुरवातीपासूनच कधिही सांगितलेला नाही. पुढे सत्यनारायण संन्यासी वेष धारण करुन येतो..नौकेत काय आहे? विचारतो..साधुवाणी खोटं बोलतो..त्याची परिणिती नौकेतल्या द्रव्यनाशात होते..मग पुन्हा संन्याशाचे पाय धरणे..संन्याश्याने त्याला पूजेविषयी सुनावणे..साधुवाण्याने त्याला हो'कार देणे..नौकेतील धनंद्रव्य पुन्हा मिळविणे..यात मी.. प्रसंग तोच ठेऊन मूल्यबदल केलाय..आधिच्या कथेत सांगितल्या प्रमाणे साधुवाण्याला दामदुप्पट धन विनासायास मिळतं..मग फुकट मिळालेल्या धनानी माणूस असत्य बेताल वर्तन करतो..त्याला यामुळेच जवळ असलेलं धन..द्र्व्य सुख देत नाही..(नष्ट होतं..पालापाचोळ्यासमान होतं) हा मानवी जिवनातला धागा पकडून नंतर..हे साधुवाण्याच्या लक्षात येतं..पैश्याची आसक्ती संपते..देवाला केवळ मूर्तीतच नाही तर दिन दु:खितांमधेही पहावं.. सदाचरणी राहुन परमेश्वराचं नाव घेण्याचा मार्ग अवलंबावा .. हे सर्व कळतं... असा बदल मी त्यात केला आहे.. पुढे साधुवाण्याचं घरी जाणे..त्याच्या बायकोने(लीलावतीने) मुलिला(कलावतीला) "सत्यनारायण पूजा करुनच यांना भेटायला नदिवर ये" असं सांगणे..तिने पूजा करुन,परंतू प्रसाद न घेता येणे..मग नौका बुडणे..कलावतीने "पति पुन्हा प्राप्त झाला नाही,तर त्याच्या पादुका घेऊन सती जाइन" असं बोलणे..मग साधुवाण्याने पूजा केल्यावर नौका जावयासह परत वरती येणे.. हा सर्व चमत्कारीक आणि अनैतिक कथा भाग..वगळून..मी त्या जागी- साधुवाणी घरी येतो..संन्याश्याच्या दर्शनानी/उपदेशानी आपलं जीवन कसं सन्मार्गी झालं..हे कुटुंबियांना सांगतो..पुढचं सगळं आयुष्य हा साधुवाणी त्याला वाटेल तेंव्हा* (कृतज्ञता म्हणून..) सत्यदेवाचं नामस्मरण/पूजन करुन सदाचारी जीवन जगण्यात घालवतो..आणि या पद्धतीनी जगल्यावर त्याला शेवटी फळं काय मिळतं बरं??? तर वृद्धापकाळी मृत्यु जवळ आल्यानंतर/येइपर्यंत, त्याची इहलोकावरची आस(स्वार्थपूर्णआशा)..पूर्ण संपलेली असते..सुखी अंतःकरणानी तो भगवंताच्या भेटीला जाऊ शकतो.. असं दाखवून..मी या प्रकारच्या प्राप्त होणार्‍या अवस्थेला..इहलौकिक मोक्ष अश्या नव्या संकल्पनेत सादर केलेलं आहे. ..याच मुद्द्यावर हा अध्याय संपवलेला आहे. (* :- मूळ कथेत साधुवाणी पुढे आयुष्यभर दर पौर्णिमेला ही पूजा करतो..असं सांगुन हा जो..प्रॉडक्ट गिर्‍हाइकाला अ‍ॅटेज करण्याचा प्रयत्न सर्व कथेत झालेला आहे..तो मी उडवला आहे.) अध्याय पाचवा:- ही अंगध्वज राजाची गोष्ट..हा राजा जंगलात जातो..शिकार खेळतो..तिथे गोपालकांनी केलेल्या पूजेला नमस्कार करत नाही..त्यांनी दिलेला प्रसादंही जमिनीवर टाकतो..याची परिणीती म्हणून देवाचा कोप होऊन..त्याचं राज्य जातं..शंभर मुलांचा मृत्यू होतो..सत्यनारायण परत केल्यानी हे सगळं परत मिळतं..असा हा कथाभाग आहे..आणि शेवटी या पाच अध्यायातल्या गोष्टींना आधाराला धरून..लोकांना ही पूजा करण्याचं महत्व..काहि प्रमाणात भीती आणि मोह घालून सांगत हे सर्व संपवलेलं आहे. मी यात राजाला शिकार खेळण्याचं व्यसन आहे असं दाखवून..गोपालकांनी दिलेल्या प्रसादाचा त्याग इथपर्यंत सर्व तसच ठेऊन..त्याची परिणीती त्याचं राज्य शत्रुनी बळकावण्यात दाखवली आहे..पुढे हा राजा दु:ख्खी अंतःकरणानी,राज्य गेलं..म्हणून जंगलात इतस्ततः भटकत असताना याच गोपालकांच्या दृष्टीला पडतो..असं दाखवून्,गोपालकां कडून राजाला एक उपदेश करवलाय..त्यात ते राजाला असं सांगतात..की -
हे राजन.. तू प्रसाद टाकलास तेंव्हाच तुला ..हे असं काहितरी फळ मिळणार हे आंम्ही ओळखलं होतं..अभक्त सुद्धा(जे अधार्मिक असतात असे लोक...) ते ही प्रसाद अन्न समजुन खातात.(फेकून देत नाहीत..) याच वर्तनाला प्रथमधर्म..म्हणजे मनुष्यधर्म म्हणतात.. तुझ्याकडे हा मनुष्यधर्म नव्हता..म्हणूनच राजधर्म(हा त्यानंतरच येणारा..) दुसरा धर्मही नव्हता/राहिला नाही ..म्हणून तुझ्याकडे राज्यपालनाची बुद्धी राहिली नाही(शिकारी खेळत बसलास) आणि राज्य शत्रूनी नेलं..."
या स्पष्टी-करणानंतर..राजा देवासमोर पश्चाताप बुद्धिनी अशी शपथ घेतो..की- "मी तुझ्या आशिर्वादानी आणि माझ्या बळावर राज्य तर परत मिळविनच..परंतू तू मला तिथे राजधर्म पाळता यावा यासाठी मनुष्यधर्म पालन करण्याची बुद्धी दे".. मग..पुढे हा राजा,राज्य परत मिळवतो..बोलल्यासारखं वागून दाखवतो.. सुखी होतो..मोक्षाचा अधिकारी होतो..इथे हे सर्व संपवून.. शेवटी ही (म्हणजे अशी सांगितली गेलेली..) कथा ही बोधकथे सारखी असते..असं सांगून या शेवटच्या अध्यायाचा आणि एकंदर कथेचा समारोप मी केलेला आहे... आता..वरती या पाच अध्यायांचं जे काही विवेचन मी केलेलं आहे ते खाली दिलेल्या या दोन रेकॉर्डिंग वर आपल्याला ऐकायला मिळणार आहे..या पैकी एक प्रकार मराठी कथेचा..तर दुसरा हिंदी कथेचा आहे.. दोन्ही रेकॉर्डिंग..ही मी गेल्या सिझनमधे केलेल्या पूजांमधे केलेली आहेत (live आहेत..) त्यामुळे वर केलेल्या विवेचना प्रमाणे ती अगदी शंभर टक्के असतीलच असे नाही..(८० टक्के नक्की आहेत..) परंतू कथाभागातले बदल जसेच्या तसे (ठेवलेले)आहेत.. सर्व कथा बोली भाषेत आहेत.. मूळ कथेतले चमत्कार नाहीत..तसेच फापटपसाराही त्यात नाही..जे नको ,ते उडवलं किंवा बदललं आहे.आणि हवं किंवा असावं..ते घातलेलं आहे..याखेरीजंही जे बदल तुंम्ही सुचवाल सांगाल..ते यथामती यथायोग्य (यापुढे..) स्विकारले जातीलच.. तेंव्हा ..मि.पा.करांन्नो.. चला आता (या आत्मू भटाची.. ;) )

ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!

१) मराठी कथा:- ही कथा सांगताना मोबल्या थोडा लांब होता..त्यामुळे शब्दश्रुती साठी जरा लक्षपूर्वक ऐकावी लागेल..क्षमस्व! http://mfi.re/listen/ibszayaiki3vm2d/satya_narayan_katha2.mp3 २) हिंदी कथा:- ही कथा एका बँकेत झालेल्या पूजेच्या वेळेची आहे..बँक नॉनमहाराष्ट्रीयन असल्यानी तिकडून आलेले त्यांचे हिंदी भाषिक साहेब्/उपसाहेब..यांच्या आग्रहानी मी ही हिंदित सांगितली आहे..(या रेकॉर्डिंगमधे..सुरवातीला थोडा प्रार्थनेचा भाग आलाय..नंतर लगेच कथा सुरु झालीये..ही कथा जास्त प्रासादिक आणि ठणठणीत शब्दात बद्ध झालेली आहे..मराठी पेक्षा ऐकाला सुरसही वाटेल..) http://mfi.re/listen/edbym84erbqw3po/hindi_satya_katha.ogg (कथा ऐकल्यानंतर साहेब असा आनंदून गेला..की त्यानी ती रेकॉर्ड केलेली कथा नंतर दिवसभर बँकेत अखंड लावली होती..माझ्या हिशोबी "हे" जरा जास्तच लाइव्ह झालं! :) ..असो.) ==================================================== https://lh3.googleusercontent.com/-4Vf1W471Fmg/VGWv1ppHVAI/AAAAAAAAGmw/e3DrKorvhsQ/w800-h450-no/my%2Bfone%2B223.jpg दोन्ही कथाप्रकार ऐकून/ आस्वादून आपला अभिप्रायंही जरूर द्या . :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
धर्म
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
41113 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

व्वा (१स्त)

टवाळ कार्टा
Fri, 11/14/2014 - 15:05 नवीन
व्वा :) (१स्त)
  • Log in or register to post comments

अ.आ.' जी... सत्यनारायणकथेचा

मृगनयनी
Tue, 11/18/2014 - 19:02 नवीन
अ.आ.' जी... सत्यनारायणकथेचा हा मॉडर्न अभिनिवेश खरंच खूप कौतुकास्पद आहे. सत्यनारायणाच्या पूजेचे मूळ वर्म हे "मानसिक शान्ती लाभणे" हे आहे. आपण पौरोहित्य करता.. तेव्हा आपणासही माहित असेल, की अश्या पूजा किंवा कर्मकांडांनी उचित पवित्र वातावरण निर्मिती होऊन पूजेचा यजमान व त्याचे कुटुम्बीय.. हे- पूजेच्या निमित्ताने का होईना.. पण कम्पलसरी एका ठिकाणी बसून काही काळासाठी मन ईश्वरचरणी लावू शकतात. जे की रोजच्या धकाधकीच्या जीवनात सहजासहजी शक्य नसते. त्याचप्रमाणे सत्यनारायणाचा केळे, वेलची इ. घालून केलेला साजूक तुपातला प्रसाद ... म्हणजे.. अहाहा..!!! (काही जण हा प्रसाद खाण्यासाठी निमित्त पाहिजे म्हणून सत्यनारायण घालतात.. ;) ) आपण या पूजेतील अनावश्यक पार्ट गाळून पूजा सांगता.. हेही अत्यंत स्तुत्य आहे. कारण जेव्हा ही स्टोरी "बनवली" गेली.. तेव्हाचा काळ, लोकांची मेंटॅलिटी, त्यांची श्रद्धा / अंधश्रद्धा आणि आत्ताचे लोक, आताचा काळ यांत बराच फरक आहे. त्यामुळे आत्ताच्या काळानुसार चालणे किम्बहुना लोकांना जुन्या भ्रामक कल्पनांतून बाहेर काढून त्यांच्या मनात असलेल्या अंधश्रद्धांच्या जागी देवाविषयीची नॉर्मल श्रद्धा जागृत करणे.. हे जनजागृतीचे काम केवळ आपल्यासारख्या तज्ज्ञ पुरोहितांनाच शक्य आहे.. कारण ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे.. तेच लोक आपणास मान देऊन पौरोहित्यासाठी बोलावतात. :) बाकी आपल्या पुष्प-रांगोळ्यांची तारीफ आम्ही फेसबुकवर आणि इथेही नेहमीच करत आलेलो आहोत... आपण केलेली पुष्परचना ही सत्यनारायणाच्या मांगल्यात अधिकच भर टाकते... :) आपणास आपल्या या जनजागृतीच्या कार्यासाठी अनेक शुभेच्छा!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वा रे बुव्या ,

स्पा
Fri, 11/14/2014 - 15:07 नवीन
वा रे बुव्या , नुसतच पूजेवर वांझोटी चर्चा ण करता, त्यात काळानुसार योग्य तो बदल करून लोकांपर्यंत पोचवण्याच कार्य तू करत आहेस,त्याबद्दल __/\__ लोकही हा बदल नक्कीच स्वीकारतील रेकोर्डिंग घरी जाऊन ऐकतो
  • Log in or register to post comments

सुरेख हो आत्मुबुवा.

प्रचेतस
Fri, 11/14/2014 - 15:09 नवीन
सुरेख हो आत्मुबुवा. तुम्ही आमचे मित्र आहात याचा आम्हाला अभिमान आहे.
  • Log in or register to post comments

+१

बॅटमॅन
Fri, 11/14/2014 - 15:22 नवीन
अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+५

नाखु
Fri, 11/14/2014 - 16:31 नवीन
मी काय करू एकटा! याला हे निरूपण "सणसणीत" उत्तर.मला बुवा माझे स्नेही असल्याचा सार्थ अभिमान आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१००

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/14/2014 - 20:35 नवीन
+१०० बुवा, द ग्रेट ! बोलणारे अनेक असतात, पण "क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे"... हे तुम्ही सिद्ध करून दाखले आहे हे जाहीर करत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

+१

प्रसाद गोडबोले
Fri, 11/14/2014 - 16:33 नवीन
गर्व से कहो हम बुवा के मित्र हय |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एक नंबर !!!

सतिश गावडे
Fri, 11/14/2014 - 15:15 नवीन
एक नंबर !!!
  • Log in or register to post comments

झ्याक . आवडल

पिंपातला उंदीर
Fri, 11/14/2014 - 15:22 नवीन
झ्याक . आवडल
  • Log in or register to post comments

लेख फार आवडला

मधुरा देशपांडे
Fri, 11/14/2014 - 15:24 नवीन
लेख फार आवडला. विचार मनापासुन पटले. आणि फोटोतली रांगोळी पण सुरेख. :)
  • Log in or register to post comments

हेच

स्वाती दिनेश
Fri, 11/14/2014 - 19:20 नवीन
मधुरासारखेच म्हणते.. आणि एक .. जेव्हा केव्हा सत्यनारायणाची पूजा घालेन तेव्हा तुम्हालाच बोलवेन हो आत्मुगुरुजी.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

स्तुत्य

राही
Fri, 11/14/2014 - 15:26 नवीन
उपक्रन स्तुत्य आहे याबद्दल वादच नाही. पण हे बदल इतर गुरुजींनी सुद्धा स्वीकारले आहेत का? की ही तुमची एकट्याचीच लढाई आहे? विरोधही झाला असेल. त्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

@पण हे बदल इतर गुरुजींनी

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/14/2014 - 15:56 नवीन
@पण हे बदल इतर गुरुजींनी सुद्धा स्वीकारले आहेत का? >>> अजुन तरी नाही..अनेकांना इच्छा आहे/असते..पण त्यांना लोकमानसाचा अंदाज आला,तरी स्वतःच्या श्रद्धा अडव्या येतात. काहि जणांना आपण हे असलं (तथाकथित)धर्मविरोधी आचरण केलं तर समाजापासून लांब जाऊ..असं भय वाटतं @की ही तुमची एकट्याचीच लढाई आहे? >>> अजुन तरी एकट्याचीच आहे.. :) याचा प्रसार व्हावा म्हणून मी माझ्या परिनी धडपडत असतोच..काहि जणं थोडं फार अजुकरण करतात..पण..असो! या निमित्तानी येथील लोकांना १ आवाहन करावसं वाटतं
आपण जेंव्हा ही पूजा आपल्या गुरुजिंकडून कराल,तेंव्हा ही कथा तिथे लाऊन ऐका..तुमच्या गुरुजिंना मूळ कथा न सांगण्याबद्दल आनंदानी विनंती करा
माझ काम थोडं पुढं सरकल्यासारखं होइल. :) @विरोधही झाला असेल. त्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक. >>> विरोध म्हणजे..सुरवातीच्या काळात झाला..पण त्याला माझी अविवेकी बोलण्याची पद्धत कारणीभूत होती.. (ते विरोधी मताचा मनावर पगडा पडलेले सुरवातीचे दिवस होते) पण नंतर आणि अगदी आजंही माझ्या लोकांमधे मी या वर्तवणूकीमुळे थोडा फेमस..पण बराचसा बदनाम आहे..मला अंनिसचा गुर्जी .. ब्रिगेडी हस्तक .. कट्टर सावरकरवादी(म्हणजे वेड लागलेला..) अशी टोपणनावं आहेत. (आमच्यातली..) माझ्यावर राग असलेली काही खास लोकं मला वावदूक आणि चार्वाक असेही म्हणतात. मी या सगळ्याकडे पूर्वी दुर्लक्ष करत होतो..ते आजही करतोच..पण नुकत्याच (गेल्या ५ वर्षातल्या..)व्यवसायात आलेल्या मुलांना हे सर्व नक्की काय आहे..हे पण सांगतो. आमच्यातले अनेकजण माझ्या विचारांचा धसका घेऊन त्यांची मत माझ्यासमोर मांडतच नाहीत.. ही मात्र वाइट गोष्ट आहे.. :( मी हे सर्व जास्तीत जास्त सकारात्मक करण्याच्या प्रयत्नात आजंही आहे..यापुढेही रहाणार.. बघू काय काय होतं ते! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

+१ गुर्जी, आपल्याबद्दल आदर

हाडक्या
Fri, 11/14/2014 - 17:18 नवीन
+१ गुर्जी, आपल्याबद्दल आदर होताच.. तो आता दुणावला असे म्हणावेसे वाटते. आपल्या या कार्यास शुभेच्छा ..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१११११

टवाळ कार्टा
Fri, 11/14/2014 - 18:06 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

हा खरा सत्यनारायण !

माम्लेदारचा पन्खा
Fri, 11/14/2014 - 19:25 नवीन
चांगले समजावलेन् हो गुरजींनी.... हे बरिक छान जमते तूस.... पण सांभाळून हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कथेतलं सत्य कधीच हरवलंय,प्रत्येकजण त्याला हवा तसा अर्थ लावतोय..

माम्लेदारचा पन्खा
Fri, 11/14/2014 - 15:29 नवीन
म्ह्णून तो नारायणसुध्दा व्यथित झाला असणार... म्ह्णून त्याने तुम्हाला सत्य प्रकाशात आणायची बुध्दी दिली...... जय हो !!
  • Log in or register to post comments

असा बदल असेल तर

भिंगरी
Fri, 11/14/2014 - 15:33 नवीन
मी सत्यनारायणाची पूजा नक्कीच घालेन, या आधी मला त्यात रस नव्हता.
  • Log in or register to post comments

मस्त.

जेपी
Fri, 11/14/2014 - 16:22 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

मस्त हो बुवा!

पैसा
Fri, 11/14/2014 - 16:49 नवीन
छान वाटलं बदललेली कथा वाचून. रेकॉर्डिंग सवडीने ऐकेनच. समाज बदलणे हे एकट्यादुकट्याचं काम नाही, मात्र सावरकर, दाभोलकर आणि कुरुंदकरांची पुस्तकं मुलांना संस्कारक्षम वयात हातात ठेवली तर बराच सकारात्मक बदल घडून येऊ शकेल.
  • Log in or register to post comments

गुरुजी,पोटापाण्याच्या

अजया
Fri, 11/14/2014 - 16:58 नवीन
गुरुजी,पोटापाण्याच्या व्यवसायात इतकं खरं बोलायला धाडस लागतं.स्वतःच्या मूल्यांशी, तत्वांशी जराही तडजोड न करता व्यवसाय करणे,तो लोकांच्या डोक्यात घुसवण्यासाठी प्रयत्न करणे तरीही सह व्यवसायिकांकडुन अव्यवसायिक,अव्यवहारी अाहेस असे स्वतःवर शिक्के मारुन घेणे हे व्यवसाय भिन्न असले तरी मीही अनुभवले आहे.त्यामुळेच तुमच्या या प्रयत्नाला सलाम __/\__
  • Log in or register to post comments

मस्तच बुवा! लोकांचा काय

बोका-ए-आझम
Fri, 11/14/2014 - 17:19 नवीन
मस्तच बुवा! लोकांचा काय प्रतिसाद आहे याच्यावर?
  • Log in or register to post comments

@लोकांचा काय प्रतिसाद आहे

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/14/2014 - 17:32 नवीन
@लोकांचा काय प्रतिसाद आहे याच्यावर? >>> आपल्या हिंदू समाजाचा स्वभाव साधारणपणे झटकन आणि आरपार बदलाला अनुकुल रहात आलेला नाही.. (माझ्या बाबतीत तर हे सगळ्यात आधी खरं आहे! ;) ) पण धर्मावर वारंवार उठणारी टीकेची झोड, सहृदयी आणि सत्प्रवृत्त माणसांना हळूहळू का होइ ना...,बदलाला भाग पाडते..(आणि हे खास करुन हिंदु समाजाचं वैशिष्ठ्य आहे..) माझा कन्यादानाच्या जागी आलेला वधु/वर स्विकाराचा विधी हे तर याचेच फलित आहे. पण सस्केस रेट्च्या बाबतीत म्हणाल..तर तो अतीशय मंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सस्केस रेट्च्या बाबतीत म्हणाल..तर तो अतीशय मंद आहे.....

मुक्त विहारि
Fri, 11/14/2014 - 23:34 नवीन
मंद असला तरी असू दे... सती बंदी, विधवा विवाहाला मान्यता, कुटुंब नियोजन करणार्‍या साधनांचा वापर, आपल्या समाजाने कगेच नाही स्वीकारला.थोडा वेळ लागलाच ना? हे पण बंद होईल. निदान आमच्या घरात तरी हे काल-बाह्य प्रकार होणार नाहीत, ह्याची मी काळजी घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@निदान आमच्या घरात तरी हे काल

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/14/2014 - 23:42 नवीन
@निदान आमच्या घरात तरी हे काल-बाह्य प्रकार होणार नाहीत, ह्याची मी काळजी घेतो. >>> वा..फारच छान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आता खूद्द गुरुजींकडूनच हिरवा झेंडा मिळाला....

मुक्त विहारि
Sat, 11/15/2014 - 23:34 नवीन
अजून काय हवे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@अजून काय हवे? >>> या

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/16/2014 - 00:03 नवीन
@अजून काय हवे? >>> या मार्गावर चालताना झेंडाही आपलाच आपल्याला दाखवायला हवा! ;-) . . . . हे हवे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वाअलेकुम अस्सलाम गुरुजी..

विजुभाऊ
Fri, 11/14/2014 - 17:25 नवीन
वाअलेकुम अस्सलाम गुरुजी..
  • Log in or register to post comments

ये ब्बात आत्मूदा.

आदूबाळ
Fri, 11/14/2014 - 19:07 नवीन
ये ब्बात आत्मूदा. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

निमिष ध.
Fri, 11/14/2014 - 19:51 नवीन
या सत्यनारायणा वरुन - खास करुन त्या कहाणी वरुन आमचा नेहमी वाद व्हायचा. आता घरच्याना वाचायला देतो आणि कहाणी ऐकतो. देशात येउन सत्यनारायण घालायचे ठरले तर आमचे बुकिंग आत्ताच घेउन ठेवा!!
  • Log in or register to post comments

गुर्जी

दिपक.कुवेत
Fri, 11/14/2014 - 20:31 नवीन
फारच रसाळ लिहिलत हो. कथा सावकाश एकतो आता. हे एकुन एक आयडिया सुचली आहे. तुम्हि जशी आता ईथे कथा रेकॉर्ड करुन दिली आहेत तसच एकदा संपुर्ण सत्यनारायण पूजा, त्यासाठि लागणारी सामग्री असं रेकॉर्ड करुन त्याची लींक ईथे द्याल का? किमान गेला बाजार साधं गणेश पुजन किंवा गणपती दिवसात गणपतीची प्रतिस्थापना तरी? म्हणजे जे भारताबाहेर आहेत त्यांना तुमचं एकुन पुजा केल्याचं समाधान भेटेल (जीथे भटजी उपलब्ध नसेल तीथे).
  • Log in or register to post comments

गुर्जींच्या पोटावर पाय आणताय

हाडक्या
Fri, 11/14/2014 - 20:46 नवीन
गुर्जींच्या पोटावर पाय आणताय व्हय हो ? फार तर गुर्जींना ऑन-साईट ऑफर करा की, येतील गुर्जी बिजिनेस ट्रीपवर.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

हो नाहीतर स्काईप आहेच.

खटपट्या
Fri, 11/14/2014 - 22:56 नवीन
हो नाहीतर स्काईप आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

आणी RTGS/NEFT सुद्धा आहेच.

यसवायजी
Sat, 11/15/2014 - 18:58 नवीन
आणी RTGS/NEFT सुद्धा आहेच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

गुर्जी ऑनलाईन सर्विसेस सुरु

हाडक्या
Sat, 11/15/2014 - 22:31 नवीन
गुर्जी ऑनलाईन सर्विसेस सुरु करा ब्वा.. लई मागणी दिसतेय. टेक्निकल मदत मिपावरून मिळेलच तशी. हाकानाका.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

@टेक्निकल मदत मिपावरून मिळेलच

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/15/2014 - 23:14 नवीन
@टेक्निकल मदत मिपावरून मिळेलच तशी.>>>> तीच सांगा... मला आय्च्यान त्यातलं कई कळत नै! :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

वा!

स्वामी संकेतानंद
Fri, 11/14/2014 - 20:56 नवीन
बुवेश अभिनंदन हो !!! फार स्तुत्य उपक्रम आहे .. अधिकाधिक भटजींना हा बदल स्वीकारायला पाहिजे..
  • Log in or register to post comments

खूप छान. अशा गुरुजींची

खटपट्या
Fri, 11/14/2014 - 22:59 नवीन
खूप छान. अशा गुरुजींची आंतरजालावर का होईना माझी ओळ्ख आहे याचा मला अभिमान आहे. तुमचे कोणी व्यावसायिक मित्र मुंबई ठाण्यात असतील तर त्यानाही अशा रीतीने तयार करा..
  • Log in or register to post comments

@ तुमचे कोणी व्यावसायिक मित्र

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/15/2014 - 18:05 नवीन
@ तुमचे कोणी व्यावसायिक मित्र मुंबई ठाण्यात असतील तर त्यानाही अशा रीतीने तयार करा.. >> इच्छा तर भरपूर आहे..पण आमची लोकं अनेक कारणांनी अश्या बदलांना अजुनही भितात.. :( त्यांना सारखा शास्त्राधार लागतो सगळीकडे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ज्जे बात गुर्जी...

अर्धवटराव
Fri, 11/14/2014 - 23:32 नवीन
आपल्या उणिवा कळायला शहाणपण लागतं, ते स्विकारायला प्रामाणिकपणा लागतो, त्यात सुधारणा करायला धैर्य आणि चिकाटी लागते, व त्याचा प्रचार-प्रसार करायला समाजाप्रती करुणा देखील लागते. तुम्हाला हा प्रसाद आजवर केलेल्या सत्यनारायण पूजनामुळे मिळाला काय ? ;)
  • Log in or register to post comments

@तुम्हाला हा प्रसाद आजवर

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/14/2014 - 23:39 नवीन
@तुम्हाला हा प्रसाद आजवर केलेल्या सत्यनारायण पूजनामुळे मिळाला काय?>>> :D न्हाई..बरं का! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

कथा तर मस्त आहेच. अनुचित बदल

पाषाणभेद
Sat, 11/15/2014 - 12:32 नवीन
कथा तर मस्त आहेच. अनुचित बदल आहेत.
  • Log in or register to post comments

मानलं तुम्हाला.मलाही अशाच

भाग्यश्री कुलकर्णी
Sat, 11/15/2014 - 16:21 नवीन
मानलं तुम्हाला.मलाही अशाच पद्धतीने पुजाविधी शिकायचे आहेत.घरची जबाबदारी थोडी कमी झाली कि शिकण्याचा विचार आहे.एक शंका आहे.तुम्हाला व्य.नी.केला तर चालेल का?
  • Log in or register to post comments

@तुम्हाला व्य.नी.केला तर

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/15/2014 - 18:01 नवीन
@तुम्हाला व्य.नी.केला तर चालेल का? >> व्य.नि.पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी

लेखनावरून हा माणूस एवढा हुशार

पाषाणभेद
Sat, 11/15/2014 - 20:07 नवीन
लेखनावरून हा माणूस एवढा हुशार असेल असे वाटले नव्हते ते आवाज ऐकून समजले. :-)
  • Log in or register to post comments

कैच्या कै प्रतिसाद.

प्यारे१
Sat, 11/15/2014 - 22:44 नवीन
कैच्या कै प्रतिसाद. ह्या प्रतिसादाचा मी तीव्र आणि जाहीर निषेध करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

निषेध करण्यासारखे काय आहे ते

पाषाणभेद
Sun, 11/16/2014 - 08:18 नवीन
निषेध करण्यासारखे काय आहे ते समजेल काय? कौतूकाचे बोल आहेत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

“हर युग में बदलते धर्मों को” आदर्श बनवण्याची आपली करामत आवडली!

नरेंद्र गोळे
Sun, 11/16/2014 - 09:19 नवीन
हिंदू धर्म परिवर्तनशील नाही म्हणणार्‍यांनी, प्रत्यक्ष पौरोहित्य करणार्‍याची ही कथा ऐकण्यासारखीच आहे. अतृप्त आत्मा साहेब, आपल्या ह्या पुरोगामित्वाचे मला अपरूप वाटते. सारेच लोक आपल्यासारखा पुरोगामी विचार करू लागतील तो सुदिन. चित्रलेखा सिनेमात विख्यात शायर, साहिर लुधियानवी म्हणतातः संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे इस लोग को भी, अपना ना सके, उस लोग में भी, पछताओगे ये पाप हैं क्या, ये पुण्य हैं क्या, रीतों पर धर्म की मोहोरे हैं हर युग में बदलते धर्मों को, कैसे आदर्श बनाओगे ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारें क्या जानो अपमान रचेता का होगा, रचना को अगर ठुकराओगे हम कहते है, ये जग अपना है, तुम कहते हो झूठा सपना है हम जनम बिताकर जाएंगे, तुम जनम गवाँकर जाओगे “हर युग में बदलते धर्मों को” आदर्श बनवण्याची आपली करामत मला आवडली!
  • Log in or register to post comments

@ये भोग भी एक तपस्या है, तुम

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/16/2014 - 10:25 नवीन
@ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारें क्या जानो अपमान रचेता का होगा, रचना को अगर ठुकराओगे>>> वाह! *HAPPY* ही कविता हताशी ठेवालीच पाहिजे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा