ती...भाग १
आता मी पण मोठी होत होते. आमचे बोलायचे विषय बदलले. आता सतत तिच्या बोलण्यात येऊ लागलं...
‘ मलाही माझा आयुष्य जगण्याचा हक्क आहे हो ना सवी?’
मी ठासून हो म्हणायची. तिसरीत काय कळतंय? पण जेव्हा हे मी आईला सांगितला तेव्हा ती गंभीर झाली. बाबा-आजी-आजोबांशी बोलून तिने मावशीच्या आईला बोलावून घेतलं. मालू मावशीच दुसरं लग्न करून देण्याबद्दल विषय काढला आणि तिच्या आईचं बोलणं ऐकून आमच्या घरातल्या सगळ्यांच्या डोक्यात धोंडा पडला. काय म्हणावं तिच्या आईने?
‘हे बघ पद्मजा,’ – म्हणजे माझी आई, ‘तिच्या नशिबात नाही हे सुख. पाहिलं ना आपण? आणि मी म्हणते हवंय तरी कशाला आता हिला हे लग्न फिग्न? मस्त माझी सेवा करावी तिने- आताशा माझ्याकडून काही होत नाही. माझ्या सुनांना तिने हातभार लावावा. कसही जाईल तीचं आयुष्य. नुसत्या सौंदर्याला काय चाटायचंय? देवानेच तिच्या पायावर तो डाग दिलाय हे सांगायला की तू एकटीच चांगली. आणि एकटी काय?मी आहे तोवर काय प्रॉब्लेम्स नाहीत तिला. महेश, मनोज आहेतच तिच्या सोबत. काही नको! हा विषय संपलाय आता.’
अरे बापरे! माझी आई इतकी चिडली होती की बास. तिने परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला पण ही बाई ढिम्म! शेवटी आईलाच गप्प बसायला लागले.
आजी म्हणाली ‘कसली आई ही? कुमाता नसते म्हणतात ना? पहा हिला!’
दुसऱ्याच्या घरात किती लक्ष घालणार आपण? शेवटी आमच्या घरच्यांनी त्यांना या बाबत बोलणे सोडून दिले.
....पण मावशी? आता ती मनातल्या मनात कुढायला लागली. वरवर सगळं सुरेख दिसे. पण मला माहित होतं. तसं काहीच नाही. एवढ सगळं करतानाही फिलिप्स च उत्तम असेम्ब्लर चा बक्षिस तिलाच असे. दरवर्षी. आणि बक्षिस पण भक्कम असायचं. सोन्याची जाडजूड चेन, ब्रेसलेट असं. ते घ्यायला तिच्या भावजयीच काय, बहीण आणि आईपण धावायच्या. हिने ते बक्षिस तिच्या अंगावर कधीच मिरवलं नाही. आमच्या घरी दाखवलं की ती सोडून कुणालाही ते मिळणार. हे जणू ठरलेलं.
मी सातवीत गेले आणि तेव्हा मावशी हळूहळू एकटी पडू लागली. घरातही, घराबाहेरही. सगळे आपापल्या जगात. माझंही जाणं दररोज या प्रकारातलं नाही राहिलं पण तरीही आम्ही भेटायचोच. भेटलो की वेळेची पर्वा न करता गप्पांचा फड मांडायचो. दोघीच.
आता मला हळूहळू सोसायटीतील लोकांकडून फुकटचे सल्ले मिळू लागले.
‘काय बोलत असतेस तिच्याशी?’
‘आम्हा कुणाशीही बोलत नाही ती. तुम्ही बोलता तरी काय?’
‘ तू तिच्या एवढी आहेस का? आपला अभ्यास करावा. घुमी आहे ती. शिष्ट मेली..!’
मला कायम प्रश्न पडायचा – मला जशी ही मावशी दिसते – प्रेमळ, चांगली, सोशिक, एकाकी तशी ती यांना दिसत नाही का? मी बोलले तर यांना काय पंचाइत? मग तर मी अजूनच तिच्याशी बोलायचे. याबाबतच क्रेडीट फक्त माझ्या घरच्यांना.. आमच्याकडेही ती यायची पण मैत्री म्हणाल तर माझ्याशीच.
हळूहळू तिच्या घरच्यांनी – म्हणजे तिच्या आईसकट तिच्याशी फक्त आर्थिक संबंध ठेवायला सुरुवात केली. म्हणजे फक्त पैसे घेण्यापुरते. आता पगार भावाकडे जाऊ लागला आणि ती अगदीच बिचारी होऊन गेली. तिच्या आवाज चढवण्याला भांडण असा नाव देऊन भावजया कांगावखोर पणा करू लागल्या. भरीत भर म्हणून तिच्या कंपनीत काही अडचणी निर्माण झाल्या आणे तिची एकुलती एक भरवशाची नोकरीच गेली !
.. आता मात्र ती साफच कोलमडली. हे भलतच झाल होत. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून ती मनोरुग्ण बनण्याच्या वाटेवरून चालू लागली. यातून तिला बाहेर काढायला होते आमच्या घरासारखे अजून चार पाच सुहृद. पण काही उपयोग होईना.
..आता मारहाण पण होऊ लागली घरातून तिला. तोवर मी दहावीत वगैरे गेले होते. पण असलं काही कधी तिने मला सांगितलं नाही. मीच आता मी फार मोठी झालेय या अविर्भावात विचारलं तर म्हणायची-
‘बच्चू, चालतच गं काहीतरी सगळ्यांच्या घरी! चल, आपण काहीतरी मस्त बोलू. लांब फिरायला जाऊ.तू लहान आहेस की नाही ? आणि मी नेहमीसारखीच दिसतेय ना तुला ? छान आहे मी.’
..डोळे मात्र पाणावलेले ! अतिशय सुंदर, अथांग डोहासारखे. निवळ्शंख असे डोळे. मग हे सगळं ती कुठे बोलायची? तर माझ्या आईजवळ. तिनेच नंतर हे सगळ मला सांगितलं. आणि मला कधी नव्हे तो धक्का बसला. हे एवढ झालय सगळ माझ्या मावशीच्या बाबतीत? आई ग! मला काहीच माहित नव्हतं.
**--**
आता मी कॉलेज मध्ये जायला लागले. आणि माझ्या मावशीचा मनोरुग्ण बनण्याच्या मार्गावरचा प्रवास चालू झाला. घरच्यांनी जणू तिच नाव टाकल होत. आता ती माझ्याशी काहीही बोलू लागली.
‘सवी, लग्न कर ग! शिक्षण –फ़िक्षण होत राहील. पण लग्न? ते वेळेवर कर ग! योगेश (माझा भाऊ) च लग्न वगैरे विसर ह! आधी तू.’
मी म्हणायचे- मावशी- अग अजून बारावी आहे माझी. कित्ती लांब आहे लग्न!
..तर म्हणायची ‘हो ग. पण माझा ऐक हं!.’
मी हसून सोडून द्यायचे. आता तर माझ्याएवढ्याच माझ्या मैत्रिणी पण म्हणायला लागल्या-‘त्या वेडी शी काय बोलतेस गं तू ? बावळट वाटायला लागलीये अगदीच. आणि तुझ्याशी तिचं चालतं तरी काय?’
मी सांगायचे ‘अगं, फक्त माणसांची भुकेली आहे ती. दोन शब्द बोलायचे, काय होतंय? आणि मी लहानपणापासून तिच्याशी बोलतेय. मग? ती काही वेडी नाहीये.’
माझी एक अतिशहाणी मैत्रीण म्हणायची, तिचे घरचे तिला नाही विचारत. आपल्याला काय? पण मला हा गुन्हा वाटायचा. मी तिच्याशी बोलणं कधीच सोडलं नाही. त्यासाठी सगळ्या मैत्रिणींच्या शिव्या खाल्ल्या. इतक्या छान मुलीचं कोसळण मला कुठेतरी आत चिरुन जायचं. धड कळत नव्हतं. काय केल की ही चांगली होईल कळत नव्हत. ती सुखी व्हावी अस फार वाटे पण कशी होईल आणि मी काय करावं ते कळायचं नाही. मग मला जेवढे तिला आनंदी ठेवता येईल तेवढं ठेवायचा प्रयत्न करायचे मी.
साधा एक गजरा आणला तरी इतक्या आनंदाने माळायची की वाटे मी असा काय दिलं तिला? पण सगळ्यांना दाखवायची.
‘बघा, एवढस लेकरू पण माझ्यासाठी आठवणीने गजरा घेऊन आलं !’
... मी तुफान रडायचे आणि बाकीचे मी कशी मूर्ख आहे हे चवीचवीने एकमेकांबरोबर दळत राहायचे. आई-बाबा मात्र माझ्या बाजूला. कायम. ते म्हणायचे तू लक्ष देऊ नकोस. तुला हवं ते कर.
..हळूहळू मावशीचं वागणं बदलत गेलं. अपवाद आमच्या घराचा. आमच्याकडे आली की कुणाला खरं वाटणार नाही इतकी शहाण्यासारखी वागायची. पण तिच्या घरी तिचे अति हाल. म्हणजे अगदी खायला मोताद झाली. दरवेळी हे आम्हा सोसायटीतील लोकांना कळायचंच असंही नाही. त्यामुळे फारच हाल.
माझ अन माझ्या भावाच फार गुळपीठ. याबाबत ती कायम म्हणायची.
‘छान आहे हं सारं. पण मला नाही मिळाल हे सुख. महेश, मनोज बघ. मी कॉलेजमध्ये असताना माझ्याकडून पैसे मिळावेत, विविध वस्तू मिळाव्यात, त्यांच सगळ चांगल व्हावं म्हणून मी आल्याशिवाय जेवायचे नाहीत हे दोघं. आणि आता? ‘
अस म्हणून हवेत हात उडवायची आणि म्हणायची ‘असो. पण ते चांगले आहेत हं. त्यांनाही त्यांचा संसार आहे. नसेल जमत !’
मला ते ऐकूनच त्या दोघांना जबरदस्त बडवून काढायला पाहिजे असा वाटायचं. बरं तिच्या आईसकट कुणीही भेटले तर इतके चांगले वागत की हे सगळ चक्क खोटं वाटेल. आम्ही सगळे तिच्याशी किती चांगले वागतो, पण ती कशी बेक्कार आहे हे सांगण्यात सगळे मग्न. आणि बाकी दुनिया तिच्यावर हसण्यात !
आमच्या सोसायटीत एक म्हातार्या माणसांचा ग्रूप होता फिरायला जाणार्यांचा. ते हिला पाहून बीभत्स हावभाव करायचे. तिचं मानसिक संतुलन बिघडायला लागलं. .. ती काय इतकी स्वस्त झाली का की कुणीही कसाही वागावं? हे पण तिने मला सांगितल. मग मात्र मी आणि माझा एक मित्र, गेलो पोलीस स्टेशन मध्ये आणि सांगितलं सगळं. ते इन्स्पेक्टर हैराण. आम्हाला त्यांनी विचारलं, ‘आई बाबांना माहित आहे का तुमचे हे उद्योग? ‘
मी म्हणाले ‘ उद्योग ते म्हातारे लोक करतायत. आम्ही नाही. आमच्या मावशीची अवस्था फार चांगली नाही. तिला काही झालं तर आम्हाला चालणार नाही म्हणून आलोय. नाहीतर आम्ही ग्रुपमधली मुल मुलीच त्या म्हाताऱ्यांना दगड मारू !’
ते हसले. म्हणाले ‘मी करतो बंदोबस्त. पळा घरी.’
आमचे नाव पत्ते, फोन नं. लिहून घेतले आणि पाठवलं. नंतर रीतसर ते सोसायटीत आले. कमिटी मेम्बर्स ची मीटिंग घेऊन त्यांना दम भरला. तिच्या घरच्यांना तर फैलावरच घेतलं. सगळ्यांना सांगीतलं त्यांनी की या मुलांइतक सेन्सिबल वागलात तरी पुरे. मग आम्ही दोघे सोसायटीत थोडा काळ का होईना व्हिलन झालो.
घरी पण आईबाबा म्हणाले, ‘असलं काही परस्पर करायचं नाही. आधी आम्हाला सांगायचं. तुम्ही बरोबर वागलात. पण हे आम्हाला दुसरीकडून नको कळायला. आपण घरी बोलतो ना? मग ही हुशारी कुणी सांगितली?’
( क्रमश: )
वाचने
2848
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका सुंदर आयुष्याची अशी
अरेरे नाही वाचवत.
सुन्न करणारी कथा आहे.