मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ती....

सविता००१ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ही कथा यापूर्वी अनाहिता मध्ये प्रकाशित झाली आहे. तिथल्या मैत्रिणींच्या आग्रहाखातर इथे टाकत आहे. पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्यावे.' ती.. एका वेगळ्या व्यथितांची प्रतिनिधी. सगळ्या जगाने सहज धुडकावली तिला ! काय दोष तिचा ? सगळ्यांसाठी खपली फक्त. अपेक्षा ठेवल्या नाहीत. तिच्या नशिबी असं का? मलाच का माया लावली इतकी तिने? असा काय ऋणानुबंध होता या मावशीचा अन माझा? हे उत्तर तर आजही मिळत नाही मला. काही काही कळत नाही मला......... **--** "सविता, चला आता घरी, शुभंकरोती म्हणायचय ना? आजोबा बोलावतायत" मी अगदी तीन वर्षांची असल्यापासून आजीचा हाच उद्योग. सोसायटीत जवळच रहाणार्याो मावशी च्या घरून मला घेउन येणे. ही जी मावशी मी म्हणतेय ती आमच्या सोसायटीत रहाणारी. मी अगदी लहान होते तेव्हा मला हौसेने कडेवर घेउन फिरवणारी. सुरेख हेअर पिन्स, हेअर बॅन्ड्स, रिबिनी, डूल, गोळ्या, कॅडबरी असा काय काय खजिना घेउन देणारी. आणि त्यामुळेच त्या वयात अत्यंत लाडकी. आई तर म्हणायची मालती (मावशीचं नाव) म्हणजे सविताचा जकात नाका आहे अगदी. हक्काने वसूल करते सगळ! हो! पण मी करायचेच तशी. माझी लाडाची मावशी ना ती. शिवाय दिसायला अतिशय सुंदर. कमावती, झुळझुळीत साड्या, मॅचिंग घालणारी! ..त्याचप्रमाणे वडील गेल्यावर सगळं घर खंबीरपणाने सावरणारी, लहान भावंडांचं शिक्षण करणारी. सकाळी ७ वाजता फिलिप्सच्या बसमध्ये बसून मला टाटा करून जाणारी. माझे फार फार लाड करणारी... मग? असणारच ना मी तिथे? शिवाय सगळ्या दिवसभरातल्या गमतीजमती तिला सांगितल्याशिवाय चैन कुठे पडायचं मला? पण एके दिवशी या मावशीचं लग्न झालं. मी चार वर्षांची असेन फार तर. जाम मिरवलं मी करवली म्हणून. दुसऱ्या दिवशी निघाले परत मावशीच्या घरी. .. सगळे हसले, म्हणाले अगं आता गेली ती त्या काकाच्या घरी रहायला. आता अधेमधे येइल तुला भेटायला मावशी. अरे..??? याचा काय अर्थ ? झालं ना माझ्या सुंदर मावशीचं लग्न? काल.. मग आता काय त्याचं? मला जायचंय मावशीच्या घरी. हे लग्न प्रकरण भारीच दिसतंय एकूण. असं मला तेव्हा वाटलेलं आजपण आठवतंय! शप्पत! त्या काकाचा काय भयानक राग आला होता... हा कोण शहाणा माझ्या मावशीला नेणारा????? रुसून, गाल फुगवून मावशीची वाट पहात कधी झोपले कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले. वयानुसार काही कळलं नाही पण मावशीकडे काहीतरी झालं एवढंच कळलं. मी आजीचा हात सोडून तिच्या घराकडे धावणार तेवढ्यात कधी नाही ते आजीने माझ्यावर आवाज चढवला- मनू, नाही, नाही जायचं हं कुठे आत्ता. मावशीकडे तर नाहीच. हे तर अजूनच बेक्कार. चार वर्षांच्या मेंदूत शिरेचना. मी.. माझ्या मावशीकडे जायचं नाही ? का ??? आई-आजी तर कुजबुजतायत, मालती आली, मालती आली. मग? बाहेर गोंधळ कसला ऐकू येतोय मग? आई-आजी घरीच का थांबल्यात? नेहमी त्यांच्याकडे काहीही असलं की लग्गेच जातात ना या? मग? स्वतःही जात नाहीत आणि मलाही जाउ देत नाहीत..लहान् मुलीला जेवढा संताप यायला हवा त्याची परमावधी झालेली माझ्या डोक्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी प्रचंड लाड करणारी आजी आणि आई यांचा टोन असा कसा? तू इथेच थांब. हलायचं नाही अजिबात? हे मी कधीच नाही ऐकलं. मग झालंय काय??? मालती मावशी कुठय? मला आत्ताच्या आत्ता जायचय तिच्याकडे. अजून सुध्दा हा गुंता मला पूर्ण आठवतोय. **--** काय? अहो, काय सांगताय काय? अक्षरश: माझी आई किंचाळलीच आजीकडे बघून. आणि माझ्याकडे लक्ष जाताच एकदमच गप्प झाली. ...नंतरचा दिवस अगदीच असा तसा गेला. मला कळण्याचं वयही नव्हतं. फक्त मालू मावशी घरी परत आली एवढच कळलं. भले आज नाही पण उद्या तरी जाऊच अशी आशा होतीच मला. पण नंतर सारंच बदललं. मालू मावशी अगदीच हिरमुसलेली दिसायला लागली. हळूहळू काळ पुढे सरकत होता. माझी शाळा सुरु झाली. पण नाही म्हटलं तरी तिच्याकडे जाऊन तास दोन तास खेळण्याचा माझा नियम काही चुकला नाही. ती ऑफिसमधून आली की जरा चहा पाणी होतंय तोवर तीच हाक मारायची मला. सव्या, चल भाजी आणूया, दळण आणूया. एक नाही दोन. घराचा मक्ता घेतला होता ना तिनं? त्यामुळे मर मर करायची. त्यात आज मला वाटतं की मी एक तिला छान विरंगुळा होते. आमच्या दोघींचं एक सुरेख जग होतं ज्यात ती आपल्या विवंचना विसरे. त्यात माझा काहीही वेडपट पणा आनंदाने झिरपत होता. खपून जात होता. माझे लाड होत होते आणि मावशी थोडावेळ अगदी रिलॅक्स होत असे. ..अर्थात हे सगळं नंतरचं शहाणपण. मी मालू मावशीकडे जाऊन शाळेतल्या कविता, गाणी, गोष्टी, तक्रारी सारं सारं सांगे. तीही ते इतक्या मनापासून ऐके की मला ती माझ्याबरोबर शाळेत असल्यासारखीच वाटे. आजी आईला सांगताना बर्याच वेळेला ऐकायचे ... बिचारी मालू. इतकी सुरेख पण कसलं ग उफराटं नशीब घेऊन आलीये.. काय बिचारीचे भोग आहेत कोण जाणे. हे आपलं पिल्लू नसत तर जीव दिला असता पोरीने. मला अजून आठवतंय आयुष्यातला पहिला अन शेवटचा धपाटा मी मालू मावशीच नशीब उफराटं आहे म्हणजे काय हे विचारून खाल्ला होता !! तिच्या आधीच्या नोकरीत माझ्या बाबांच्या हाताखाली ती काम करत होती. पुढे बाबांनी सोडली ती नोकरी आणि दुसरीकडे लागले. पण ती बाबांना कायम सर असेच म्हणे. आणि माझ्या आईला ए वहिनी. एका संध्याकाळी मला घरी सोडायला म्हणून आली आणि आईला म्हणाली ‘ वहिनी, बघ ना ग सरांना सांगून.. तुम्ही माझ्या सासरी जाल का ग मध्यस्थी करायला? मला खूप करायचाय ग संसार. मी किती सांगितल लग्नाच्या दिवशी की माझ्या पोटरी वरचा डाग मला लहानपणापासून आहे. कोड नाही ते. पण कुण्णी कुण्णी ऐकलं नाही. आणि माझा नवरा फार चांगला आहे ग. मी डोळ्यात पाहिलय त्याच्या. त्याला पण मी हवीये. पण तो बोलू नाही शकला. जा ना ग तुम्ही दोघे. माझ्या माहेरचे जाणारे असे तुम्हीच तर आहात. जा ना. जाच...’ आई-आजी विचारात पडल्या. पण त्यांनी ठरवलं, हिच्यासाठी आवश्यक ते सारं करायचं. तिच्या आई-मामा ना सांगितलं, त्यांना बरोबर घेतल आणि आई-बाबा, तिचे आई-मामा असे लोक मावशीच्या सासरी गेले. त्या लोकांनी या-बसा तर सोडाच, शिव्या शापानी यांचा सत्कार केला. जो मुलगा अतिशय चांगला असा मावशीला वाटत होत त्याने बोलणं ऐकून घ्यायलाही नकार दिला. हे लोक परोपरीने बोलून परत आहे. हताश होऊन. घरी आले तर ही दारातच. "वहिनी- हो म्हणाला ना ग माझा नवरा? मला माहीत होत तो होच म्हणणार आणि सर गेले की काम होणारच याची खात्रीच आहे मला!" तिच्या आईने हे ऐकून तिथेच बसकण मारली. माझी आजीच पुढे गेली. म्हणाली, "मालू, आत्ताच आलेत ना लोक? चहापाणी झालं की बोलू हं!" ती कशीबशी थांबली. तोवर माझ्या आईने आजीला सारी कर्मकहाणी सांगितली. नंतर दोन दिवसांनी आजी ने मालू मावशीला कस समजावलं ते मला आजतागायत माहित नाहीये. ती शांतच झाली याबाबत. आता हळूहळू ती सावरायला लागली होती. तिनेही आपल्या एका बहिणीचं, दोन भावांच लग्न लावून दिलं. एक भाऊ चांगल्या नोकरीत आणि दुसरा काहीतरी व्यवसाय करायचा. बहीणही चांगल्या घरी पडली. एकत्र कुटुंबात मालू मावशी सगळ्यांशीच मिळून मिसळून होती. तिनं कधीच कुठलाच हक्क कशावर सांगितला नाही. मस्त कमवायची, आई, भाचरं, भावजया यांच्यावर खर्च करायची. सगळेजण वाहवा करायचे. त्यात खूष आहे अस दाखवायची ! ...दाखवायचीच अन काय ! ( क्रमश: )

वाचने 3650 वाचनखूण प्रतिक्रिया 8