ताजमहाल .....!!
ताजमहाल ....!
साल 2000. माझं दहावीचं वर्ष.भरपूर अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे, पुढे सायन्स ला एडमिशन घ्यायचे मग इंजिनीअरिंग करायचे असे आपले बाकीच्या चार चौघिंसारखे माझेही प्लान्स. अर्थात 'चारचौघी ' असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते, हे मान्य असुनही बाकी सगळ्यांकड़े जे आहे ते सगळं माझ्याकडेही असावे अशी अपेक्षा. आणि वयाच्या १५ -१६ व्या वर्शी मित्र मैत्रिणिंचे तर आयुष्यात खुप महत्व. मग काय ते करतील ती पूर्व दिशा !
दहावी ची परीक्षा तोंडावर आली होती आणि रात्रि जागुन जागुन केलेल्या अभ्यासाच्या खुणा पण तोंडावर दिसत होत्या पिम्पल्स च्या स्वरूपात.
अभ्यासात व्यत्यय नको म्हणून आई जेवणाचे ताट सुद्धा हातात आणुन देत होती. घरात अगदी अभ्यासाला पोषक असे वातावरण होते .शाळेत सुद्धा स्कॉलर बैच , ज्यादाचा अभ्यास , विषयां नुसार वेगवेगळ्या दिवसाचे वेळापत्रक, दहावीच्या सुट्टीतल्या शिबिरांचे प्रवेश असे एक ना अनेक बरेचसे उपक्रम चालू होते.
तशातच सुट्टी मधे कोण काय काय करणार आहे अशी चर्चा आम्हा मैत्रिणीं मधे चालू झाली , माझे सुट्टी तले ठोस असे काहीच ठरले नव्हते , बाकी मैत्रिणीं ची चर्चा चालू होती ... कुणी US ला जाणार होते , कुणी London ला, कुणी कश्मीर ला, कुणी मामा कड़े , कुणी आजीकडे ,,,,,,असे काही ना काही ! मी मात्र मग शांतपणे ऐकतच होते.
पण त्याच दिवशी घरी येउन मी बाबांना म्हणाले " बाबा , आपण सुट्टी त काय करायचे, माझ्या सगळ्या मैत्रिणी कुठे न कुठे परदेशी जाणारेत; आपण पण जायचे का ? "
तशी आई स्वयंपाक घरातून बाहेर आली , " अगं , आधी अभ्यास कर, परिक्षेकडे लक्ष दे, ते नंतर चं नंतर बघू ! ",
" आणि तुम्ही पण ओ , काहीतरी आश्वासने देऊ नका , मला न विचारता. मुलांना जरा परीस्थिति ची जाणीव हवी, म्हणे परदेशी जाऊ ! काय झाडाला लागलेत पैसे ??
अभ्यास सोडून हे विषय डोक्यात येतात तरी कसे , इथे परीक्षा आलीये तोंडावर ...." असं म्हणत म्हणत ते एकदम आलेलं वादळ , परत स्वयंपाक घरात निघून गेलं. बाबांनी आणि मी एकमेकांकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि आपापल्या कामाला लागलो.
माझा इतका हिरमुड झाला होता की काय सांगू !
आई बडबड करते म्हणून तिचा राग आला होता आणि बाबा काही बोलतच नाहीत म्हणून त्यांचाही. खरं तर सगळ्या जगाचाच राग आला होता , मग मनातल्या मनात स्वतालाच दोष देउन झाले , नशिबाला पण नावे ठेउन झाली , आणि माझ्याच बाबतीत देव असा का करतो वगैरे वगैरे ......
पुढे परीक्षा पार पडली , पेपर उत्तम गेले . सगळे खुश होते परीक्षेचे ऒझे डोक्यावरून गेले म्हणून , आणि मी मात्र अजुन कसले ओझे वागवत होते कुणास ठाऊक ! पण मैत्रिणिंशी न बोलताच मी निघून आले घरी . त्या वयात वाटणारा तो अपमान होता .......अर्थात मान आणि अपमान या शब्दांचे अर्थ अजुन तरी आपल्याला निट माहित आहेत की नाही कोण जाणे !
पण तात्पुरतं तरी डोक्यात तेच घोळत होतं.
बाबा संध्याकाळी घरी आले, रात्रीची जेवणे झाली मग बाबा माझ्यापाशी येउन म्हणाले " पेपर मस्त गेले ना ! मग झालं तर ! बोर्ड़ात नंबर काढून दाखव ; मग काय वाट्टेल ते मागशील ते देइन !! "
मी आपली रुसुन च होते ... TV चा आवाज मोठा करून , माझं तुमच्या कड़े कसं लक्ष नाहीये हे दर्शवत होते, माझा हट्टी पणा वाढत चालला आहे हे मलाही जाणवत होते, पण काय ना आता चिडायचे सोडणार कसे ! आईशी तर काही बोलायची हिम्मत नव्हती ,मग उरले सुरले बाबा ! त्यांच्या पुढेच काय तो राग व्यक्त करता येत होता.
बाबा मग हळूच आई ला म्हणाले " काय गं ! जगातले एखादे आश्चर्य पहायला आवडेल का तुला ? " आई म्हणाली ," हो , चालेल ना ! एक तर बघत आहेचे आत्ता, तुम्ही कोणत्या आश्चर्याबद्दल बोलत आहात !" माझ्याकडे कटाक्ष टाकत मातोश्री बोलत होत्या. मी आपले मौन व्रत घ्यायचे ठरवले होते.
बाबा म्हणाले, " ताजमहाल ! आपण ताजमहाल पहायला जाऊ या सुट्टीत ! मी उद्याच ऑफिस मधे रजेचा अर्ज देतो . एक दोन ट्रेव्हल कंपनी मधे जाउन येतो , बघू कसे होते ते ! " आता मी कान देउन ऐकत होते , बाबा पुढे म्हणाले," दिल्ली , आग्रा आणि जवळ पासची अजुन काही ठिकाणे पाहून येऊ. आजकाल अशा खुप ट्रिप्स करतात लोकं, 40-45 लोकांची बस असते ओळखी पण होतात नविन आणि मज्जा पण येते ग्रुप मधे सगळ्यांबरोबर !! " बाबांचं वाक्य संपते न संपते तो पर्यन्त माझ्या मनात ताजमहालाचे चित्र उभे राहिले होते, मनामधला राग कधीच उडून गेला होता आणि त्याच्या जागी हजारो कळ्या एकदम उमलल्या होत्या, मनातुन अचानक प्रसन्न वाटत होतं. चेहरा खुलला होता . तेवढ्यात आई ने विचारले ," अहो, पण खर्च ??" माझं हवेत उडणारं मन परत जमिनीवर दण्कन आपट्लं , आईच्या त्या वाक्याने. "अगं , नों प्रोब्लेम! LTA मिळेल ऑफिस मधून, बाकी मी बघतो,तू आता फ़क्त तयारीला लाग " मग आईने हसून मान हलवली आणि मी एकदम ओरडले "हु रेरेर्र्र् रे !".
कसं असतं ना माणसाचं मन, क्षणात या टोकाला तर क्षणात त्या. मन प्रसन्न तर सगळं जग सुंदर! आणि मन निराश तर सुंदर गोष्टही नकोशी . माणसाच्या मनाचा ठाव लागत नाही म्हणतात ते खरे. आणि अल्लड वयात तर हे मनाचे चढ़ उतार फारच असतात . आयुष्यातल्या या छोट्या छोट्या गोष्टी तेव्हा अतिशय महत्वाच्या वाटतात.पटकन निराशही करतात आणि अर्थातच एखादी गोष्ट मिळाल्याचा आनंदही तेवढाच मोठ्ठा देऊन जातात!
आणि शेवटी ......तो 'त्या ' वयातला हट्टपूर्तिचा गगनात न मावणारा आनंद मला मिळाला! गगनाला भिडणारा तो , एका नजरेत न सामावणारा तो , अमर प्रेमाची निशाणी असलेला व जगातली सगळ्यात सुंदर कलाकृति असलेला ,सात आश्चर्यान्मधे गणला जाणारा तो .........one and only ताजमहाल ! मला दिसला !!
खरचं ! जेवढा मनात विचार केला होता त्याहीपेक्षा खुप सुंदर ! फ़क्त डोळ्यात साठवून घ्यावं असं काहीतरी.
मग पूर्ण दिवस गाईड बरोबर ताजमहालाचे विविध पैलू ,त्याची सगळी माहिती ऐकत ताजमहालाचा कानाकोपरा फिरलो. ती मुमताजची कबर शाहजहाने कशी बांधली , किती मजूर तिथे काम करत होते असं सगळं तो गाईड माहिती देत होता आणि मी फ़क्त पाहत होते ......ताजमहाल ! तो पूर्ण ताजमहाल डोळ्यात साठवून आम्ही परतलो.
पुढे सुट्टी संपली ,परीक्षेचा निकाल लागला आणि चक्क माझा बोर्डात २४ वा नंबर आला होता. सगळ्यान्ना खुप आनंद झाला, अर्थात मलाही! मार्क्स छान मिळतिल अशी खात्री होती पण बोर्डात नंबर येणं हे अनपेक्षित यश होतं. जणु मनाचा ताजमहालच झाला होता .मग काय सगळी कडून नुसते कौतुकांचे वर्षाव ,सत्कार समारंभ होउ लागले. वर्षभर केलेल्या कष्टाचे चीज़ झाले होते. आई बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खुप समाधान वाटत होतं. आई बाबांची मान अभिमानाने ताठ झाली होती . स्वर्ग तर चार बोटे शिल्लक राहिला होता मला !
पण एकदा एका प्रसंगी, माझं मन जे नेहमी स्वताच्या विश्वात गिरक्या घेत राहतं, ते कसलातरी जबरदस्त धक्का लागुन झपाट्याने जमिनीवर येउन आदळलं. कुठल्या धुंदीत आपण जगत असतो आणि ती जेव्हा उतरते तेव्हा आजुबाजुला काय चाललंय ते आपल्याला कळतं. तसं झालं होतं माझं. देवाने आपल्याला जे काही दिले आहे त्यामधे समाधानी राहून देवाचे त्याबद्दल लक्ष आभार मानले पाहिजेत एवढंच लक्षात आलं तेव्हा !
अशाच एका सत्कार समारंभात, एका वैशु नावाच्या एका मुलीशी ओळख झाली. तिचा बोर्डात १५ वा नंबर आला होता. ती तिच्या पालक व शिक्षकांबरोबर तिथे आली होती. तिचे विशेष कौतुक होत होते जे सहाजिकच होते. पण तिने मिळवलेले ते यश मात्र तितके सहज नव्हते .आणि आम्हा बाकीच्या "चार चौघीं " प्रमाणे तर मुळिच नव्हते.ती दोन्ही पायांनी अपंग होती. व्हील चेअर तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. अडाणी आई वडीलांनी तिला लहान पणी पोलियो चे डोस दिले नव्हते. यात तिचा काय दोष बिचारीचा ! पण खडतर आयुष्यातल्या प्रत्येक अड़चणीवर मात करून जिद्दीने ती तिथपर्यंत पोचली होती. मिळालेला जन्म आणि मरेपर्यंतचे आयुष्य याचं फ़क्त सोनं करायचं असा निर्धार होता तिच्या डोळ्यात. एक चमक होती तिच्या डोळ्यात, इतरांपेक्षा काही कमी आहे माझ्याकडे असे कुठेही ती जाणवून देत नव्हती. की कसली सहानभूति मिळावी अशी अपेक्षा करत नव्हती.
तिचे आई वडील बांध कामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करत होते. त्यांना मुलीच्या यशाची पुसटशी जाणीव ही नव्हती. मुलगी १० वी पास झाली एवढेच त्यांना माहित होते.अपंग मुलीचे पुढे कसे होणार एवढा एकच विचार ! शिक्षक आणि बाकीचे सगळे जेव्हा तिच्या वडिलांना समजावून सांगत होते की आता पुढे आपण तिला शिकवू , मोठे करू तेव्हा ते मात्र मुलीकडे बघून ढसाढसा रडू लागले . "आपण आपल्या मुलीला न चांगले आयुष्य दिले , ना कसली हौस मौज, ना चांगला कपड़ा लत्ता , दोन वेळच्या जेवणा पलिकडे कधी काही दिले नाही आणि तिनेही कधी काही मागितले नाही." असे म्हणत ते डोळे पुसू लागले. एक शिक्षक पुढे आले आणि म्हणाले " मी घेतो तिची जबाबदारी ! सगळं आर्थिक सहाय्य मी करेन ! खुप मोठी होइल ती ,काय कमी आहे तिच्यात."
आणि तेव्हा तिचे वडिल म्हणाले ," साहेब , वरती ताजमहाल असला तरी खाली कबरीच आहेत शेवटी !".
बस्स त्याप्रसंगी ते शेवटचे वाक्य मी ऐकलेले .मला भरुन आले होते म्हणून मी तिथुन निघाले.
पुढे काय झाले ते मला माहित नाही पण त्यानंतर आयुष्याकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोण पूर्ण बदलला!!
आता ताजमहालाचा कधी कुठे विषय निघाला तर आधी मला तो माझा हट्ट आठवतो , मग ती वैशु आठवते आणि शेवटी कबरीवर उभा असलेला तो ताजमहाल !!
-------------------फिझा .
वाचने
6470
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
आणि तेव्हा तिचे वडिल म्हणाले ," साहेब , वरती ताजमहाल असला तरी खाली कबरीच आहेत शेवटी !".:(
In reply to आणि तेव्हा तिचे वडिल म्हणाले by स्पा
.
बाकी , ताजमहाल हा आमचा वीक पॉइंट आहे.
In reply to वपुंच्या एका कथेत हे वाक्य आहे का ? by hitesh
हो , व पु चं वाक्य आहे
मनाला भिडणारी कथा
पुलेशु
तेथे नुसत्या कबरी नाहीत हो. बरेच काही आहे भूमिती इतकी सुंदर असू शकते हे तेथे गेल्यावरच कळते. शेवटी आपण काय बघायचे ते आपणच ठरवायचे असते.
जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरणारच असतो मग जन्मभर खायचे प्यायचे कशाला ? अभ्यास वगैरे कशाला करायचे? शिकायचे कशाला? कधितरी मरून जाणार एह निश्चित असणार्या देहाला सजवायचे कशाला? अगदी मेल्यानंतर थोड्या वेळाने जळून राख होणार्याला देहाला अंघोळतरी कशाला घालायची मग?
ते सोडा. प्रत्येक देह हा मांस रक्त चरबी हाडे यानी युक्त असतो. अशा हाडे मांस चरबी रक्त आणि श्लेश्मा युक्त चेहेर्याला सुंदर तरी कशाला म्हणायचे. अशाच एखाद्या मांसाच्या गोळ्यावर जिवापाड प्रेम तरी कशाला करायचे. अशाच एखाद्या मांसल गोळ्याला वात्सलयाने जवळ कशाला घ्यायचे?
स्वतःचे नैराष्य लपवण्यासाठी अशी कृतक समर्थने करणारी बरीच जन असतात. ते त्यांचे स्वतःचे लॉजीक आहे असे ते म्हणतात. पण त्या म्हणण्याआड असे लोक स्वतःचे अपयश झाकायचा क्षीण प्रयत्न करत असतात
In reply to तेथे नुसत्या कबरी नाहीत हो. by विजुभाऊ
ही टिपिकल हिंदु प्रवृत्ती आहे.. मेलेलं मढं जरी असलं तरी त्याची किती प्रेमाने जपणुक केलेली आहे.
शाहजहान आणि मुमताजमहाल प्रेमाने गाणे म्हणायचे .... जो वादा किया वो निभाना पडेगा. त्यांच्या त्या असीम प्रेमातून महान नररत्न जन्माला आलं... आलमगीर औरंगजेब !
In reply to तेच तर ! by hitesh
शाहजहान आणि मुमताजमहाल प्रेमाने गाणे म्हणायचे .... जो वादा किया वो निभाना पडेगा. त्यांच्या त्या असीम प्रेमातून महान नररत्न जन्माला आलं... आलमगीर औरंगजेब !तुमच्याकडे सुध्धा १ "ताजमहाल" आहे हे सिध्ध केल्याबद्दल हाबिणंदन \m/
In reply to शाहजहान आणि मुमताजमहाल by टवाळ कार्टा
त्या नराने आपल्या बापाला कैदेत टाकुन अस्सल नॉनहिंदु चौदावे रत्न दाखवले हे लक्षात घेणार आहात कि नाहि...
In reply to उगाच 'टवाळ'कि करु नका. by अर्धवटराव
हायला...हे मला??? माझ्या प्रतिसादात अपेक्षित असलेला ताजमहाल जेपीभौंनी डिट्टेलमधे दिलाय इथे
" साहेब , वरती ताजमहाल असला तरी खाली कबरीच आहेत शेवटी !".
कोणाला अर्धा ग्लास रिकामा दिसतो तर दुसर्याला तोच ग्लास अर्धा भरलेला दिसतो ! ज्याची त्याची नजर, दुसरं काय ?तुम्हि जे काहि लिहिले आहे ते प्रचंड आवडलय.
हा लेख ताजमहालाबद्दल नाहीये हे जरी लोकांना समजले तरी खूप.
असो. लेख आवडला आणि भावलाही.
In reply to हम्म्म् by एस
+१ .. हा हा हा.. पण वरती हितेशभौ नी 'तेजोमहालय' सुरु पण केलाय बघा. ;)
इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर / हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़
मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से!
In reply to कोण रे तो कवि ? by रामदास
साहीर लुधियानवी यांचे गीत आहे ते. पहा
http://myswar.com/song_details/gazal-1964-taj-tere-liye-ek-8
In reply to साहीर लुधियानवी यांचे गीत आहे by सुबोध खरे
एक शहंशाह ने बनाके अँटीलीया हम गरीबोकी मोहब्बत का उडाया था मजाक
फिर उसने हेलिकॉप्टर देके अपनी बेगम को गिफ्ट हम गरीबोकी जखम पे चोळा था नमक
आज आया उंट जमी पे अब लेके थाली हाथ मे दिये लगा रहॉ हे वो गंगा पे
अपने उसी पुरानी बेगम के साथ और धो रहॉ है अपने पाप.
गंगा मैय्या की जय हो.
In reply to कोण रे तो कवि ? by रामदास
आणखी कोण?
(पण, मदन मोहनची चाल काही बरोबर वाटली नाही!)
छान लेख आहे! आवडला. अजून असेच अनुभव लिहा.
खर बोलु,
ताजमहाली लेख.
वरुन लै भारी आतुन फक्त थडग.
जर वास्तविक असेल तर लै गोड,वाचुन मधुमेह व्हायचा बाकी राहिल.जर काल्पनीक असेल तर हॅट्स ऑफ,असल फक्त कल्पनेतच घडु शकत.
In reply to खर बोलु, by जेपी
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की मजुराची मुलगी बोर्डात १५ वी येवु शकत नाही ?
In reply to म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे by खटपट्या
मागच्या वर्षी रिक्षा वाल्याची मुलगी सी ए च्या परीक्षेत पहिली आली होती. बुद्धिमत्ता हि काही मध्यम किंवा उच्च वर्गाची मक्तेदारी नाही.
फ़िश ताई लेख चांगला आहे तुम्ही लिहित्या राहा.
In reply to खर बोलु, by जेपी
कथा खरी आहे
फिझा, लिहीत रहा.
व्यक्त होत रहा.
आवडलं
लेख आवडला.
लिहित रहा...
फिझा लेख सुंदर आहे.
प्रतिसादात गमती जमती होत असतात त्यांना फार सीरीयसली घेउ नका
असचं लिहीत रहा.
In reply to फिझा लेख सुंदर आहे तुमची संवेदन शीलता आवडली. by मारवा
धन्यवाद
छान लिहील आहे.
सुंदर लेख....
"जगाच्या सुंदरते पेक्षा मनाची सुंदरता जगाकडे पहाण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन देवुन जाते"
बोर्डातले नंबर ,हुशारी ,ताजमहाल ,मार्चमध्ये सुटिचा अर्ज करून नंतर रेल्वे रेझ॰ मिळणे कमालीचे योगायोग आणि आठवे आच्श्रर्य आश्चर्य वाटते .लपवूनी ठेवलीसी पंधरा वर्षे ही तू कथा .
चांगलं लिहिलंय. हे वाचून तुम्ही कविता का लिहिता हे लक्षात येतंय. ताजमहाल म्हणजे वरून सुंदर आतून कबरी हे वाचून मिपावर प्रतिसादांतून घडलेला एक खंग्री वादविवाद आठवला.
फिज़ा,
वस्तू वा वास्तू तीच असते त्याचा वापर कसा केला जातो यावर त्याची किंमत वा उपेक्षा अवलंबून असते.
आपल्या शारीरिक आव्हानांना कसे सामोरे जायचे व त्यातून जीवनातील आनंद शोधायचा याची हातोटी शिकणे हे खरे जीवनशिक्षण...
ते पुस्तकी परिपाठातून मिळवता येत नाही....
ताज महालाच्या रुपाने सुंदरतेला पहायची दृष्टी कशी जोपासावी याचा धडा मिळतो. अन्यथा ते दगडा-मातीचे बांधकाम...
आणि तेव्हा तिचे वडिल म्हणाले