✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक शाम ऋजुता के नाम

अ
अमित खोजे यांनी
Wed, 09/24/2014 - 02:49  ·  लेख
लेख
२१ सप्टेंबर २०१४: प्रसिद्ध आहारतज्ञ 'ऋजुता दिवेकर' यांचे न्यूयॉर्कमध्ये सेन्ट्रल पार्क मध्ये एक छोटेसे सत्र होते. सेन्ट्रल पार्क हे सुद्धा न्यूयॉर्क मधील आश्चर्यच म्हणायला हवे. जगातल्या सर्वात महाग शहरांपैकी एक अशा या न्यूयॉर्कमध्ये ७०० एकर एवढा मोठा भूभाग बागेसाठी राखवून ठेवला आहे याचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे. Central Park 1 Central Park 2 (छायाचित्र जालावरून साभार) बायकोने आठवडाभर अगोदरच इमेल वगैरे पाठवून नोंदणी करून ठेवलेली असल्यामुळे अस्मादिकांना जाण्याशिवाय पर्याय नव्हता. नाहीतर पुढचा एक आठवडा तरी 'तुमचे वाढलेले पोट' यावरती बोलणी खाणे निश्चित होते. त्यामुळे चुपचाप रविवार दुपार टी व्ही समोर तंगड्या पसरून एखादा मस्त इंग्लिश पिक्चर पाहण्याऐवजी भरभर आवरून घरातून निघून सेन्ट्रल पार्क ला पोहोचण्यात घालवली. खुद्द न्यूयॉर्क आमच्या घरापासून तसे दूर असल्याने ट्रेनने प्रवास करणे आले. साधारणपणे एक तासाभरात ३:१५ ला आम्ही पार्क मध्ये पोहोचलो. सत्र ४ ला सुरु होणार असल्याने बागेमध्येच हिंडण्याचे ठरवले. Building Tale बागेतल्या तळ्यामध्ये 'छान' जोडपी नौकानयनाचा आनंद लुटत होती. ते पाहून बायकोकडून लगेच फर्माईश झालीच. 'आम्हालापण बोटिंग करायचे!' पण थोड्याच वेळात सत्र सुरु होणार असल्याने वेळेचे कारण सांगून बोटिंगची इच्छा आम्ही आईस्क्रीम वर भागवण्यात आम्हाला यश आले आणि आम्ही आईस्क्रीम खात खात रस्त्यावरची 'प्रेक्षणीय' स्थळे पहात सत्राच्या जागेवर जाऊ लागलो. इमेलमध्ये स्ट्रौबेरी फिल्ड अशी जागा सांगितली होती परंतु ते फिल्ड फारच मोठे होते. आणि आजूबाजूला कुठे कोणी कार्यकारी किंवा एखादे पोस्टर पण दिसत नव्हते. मनात म्हटले एवढ्या लांब आलोय तर आता लेक्चर मिस नको करायला. त्यामुळे ती येई पर्यंत तिथल्याच एका बाकावर बसकण मारली. पार्श्वभाग टेकवतो न टेकवतो तोच आजूबाजूची सगळी मंडळी गडबडीने उठायला लागली. मला कळेना नक्की काय झाले ते आणि बेंचवरचे किडे पँट मध्ये जाऊ नये म्हणून जेवढ्या झटकन उठता येईल तेवढा उठलो. दोन्ही हात अर्थातच पार्श्वभाग झटकण्यात व्यस्त होते अन तेवढ्यात माझे समोर लक्ष गेले आणि सगळेजण का उठले त्याचे कारण कळाले. ऋजुता तिकडून येतच होती. तिला येताना पाहून मनात म्हटले बरे झाले! कार्यक्रम कुठे आहे ते शोधण्याचे कष्ट वाचले. मीच समोर असल्याने पार्श्वभागावरून हात सरळ हस्तांदोलनासाठी पुढे केला. "I am Amit , Welcome To New York" असे म्हणून स्वागत केले. त्यावर "Nice to meet you Amit!" असे हसून म्हणत फिल्डकडे चालायला सुरुवात केली. आम्हीही हात चोळत तीच्या मागे चालायला सुरुवात केली. सर्वांनी लगेच तिच्याभोवती घोळका घातला आणि आम्ही सर्व बागेतल्याच एका झाडाखाली जाऊन बसलो. सर्वांची ओळख करून घेऊन मग तीने सत्राला सुरुवात केली. बहुदा सर्व जन न्यूयॉर्क न्यूजर्सीचेच होते. पण एक उत्साही महिला तर बाल्टिमोरवरून ४ तास गाडी चालवत आली होती. सर्वांनी तिचे कौतुक केले. Group1 आम्ही पुढची शिट पकडली. RD2 =================================================================================== संपूर्ण सत्र काही मला इथे सांगणे शक्य होणार नाही. त्याऐवजी तिचे 'don't lose your mind lose your weight' हे पुस्तक वाचणे फायदेशीर ठरेल. तिने तिचे बोलणे मुख्यतः उत्तर अमेरिकेतील लोकांना भेडसावणारे प्रश्न यावर केंद्रित केले होते आणि त्यापासून बरीच माहिती मिळाली. पहिला एक तास तिने तिचे विचार मांडले आणि नंतर प्रश्नांसाठी मंच खुला केला. तेव्हा लोकांनी जे प्रश्न विचारले ते ऐकून लेक्चर पेक्षा हि प्रश्नावलीच मला जास्त महत्वाची वाटली. इथे परत एकदा मला नमूद करावेसे वाटते कि भारतात राहणार्यांपेक्षा येथील अमेरिकेतील भारतीयांचे प्रश्न वेगळे असल्याने प्रश्नोत्तराचा रोख त्या अनुषंगानेच होता. नक्कीच हे सर्व भारतातील मित्रांना देखील वापरता येऊ शकते. सत्राचे सार मी काहीश्या मुद्द्यांच्या आणि काही प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असे दोन्ही मध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेतील मिपा मित्रांना त्याचा उपयोग होईल अशी आशा. मिपावरील आहारतज्ञ, डॉक्टर आणि जाणकारांच्या प्रतिक्रिया अपेक्षित! अमेरिकेतील लोकांच्या शरीरावर (आता यात भारतीयसुद्धा आले. आपणही काही मागे नाही!) सुखवस्तू जीवनशैलीमुळे बरेच नको ते परिणाम होतात आणि त्याचे पर्यवसान सुरुवातीला शरीराचा आकार आणि वजन वाढण्यात तर नंतर जीवावर बळावणारे आजार होण्यात होतो. त्यात तिने वापरलेली एक संज्ञा म्हणजे Metabolic Syndrome. हि संज्ञा म्हणजे सगळे जोखीम घटक जे तुमच्या हृदयाच्या आणि एकूणच शरीराच्या आजारांचे निमंत्रक असतात. उदाहरणार्थ पोटावरील साचलेला मेद, ट्रायग्लीसराइड ची पातळी, low HDL (good cholesterol), जास्त रक्त दाब, इत्यादी. पोटावरील आणि नितंबावर साचलेला मेद (Apple Shape) हे सर्वात सोपे डोळ्यांना दिसणारे परिमाण. यावरून आपला आपणच अंदाज लावू शकतो कि आपण किती सुदृढ शरीराचे आहोत. हा मेद हृदयरोगांचा बोलविता धनी. याच्या जोडीला low HDL (High-density lipoprotein) ज्याला चांगले कॉलेस्टरॉल सुद्धा म्हणतात. हे तुमच्या धमन्यांमधून वाईट कॉलेस्टरॉल घालवतात आणि तेथे साचू देत नाहीत. ह्या मुलभुत माहितीवरून ऋजुताने पुढे वरील रोग हे आहाराने कसे नियंत्रणात आणता येतात आणि लोकांच्या अति माहितीमुळे कशा समजुती गैरसमजुती तयार झाल्या आहेत त्यावर भर दिला. त्यातील एक मुद्दा मला मनापासून पटला. Food Science हे फार फार तर गेल्या ५० वर्षात विकसित झाले आहे. आणि त्याचा उपयोग लोकांना जास्त होण्यापेक्षा Food Industry ला जास्त होतोय किंवा ते व्यावसायिक लोक जास्त करून घेत आहेत. पहिले Cannola Oil, नंतर Soya चा मारा, नंतर Olive Oil आणि आता Coconut Oil हे तुमच्या तब्येतीला कसे चांगले आहे हे जाहिरातबाजी करून लोकांच्या मनावर बिंबवले जात आहे. आता यातील नारळाचे तेल दक्षिण भारतामध्ये आणि आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये पुरातन काळापासून वापरतात. पण सध्या अमेरिकेत या नारळाच्या तेलाची चलती आहे. असो. खाली ऋजुताने काही सांगितलेले मुद्दे माहिती आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मांडले आहेत. दूध: अमेरिकेत आल्यानंतर सर्वात पहिले प्रश्न भेडसावतो तो दूधाचा. इथे पाश्चराइज्ड दूध कॅनमध्ये मिळते. त्यातही दोन तीन प्रकारचे. १%, २%, fat वाले आणि Full Fat, Fat Free वाले. Milk (छायाचित्र जालावरून साभार) ते घरी आणून तापवायची गरज नाही. एक कॅन साधारण आठवडाभर किंवा ४-५ दिवस जातो. ऋजुताच्या म्हणण्याप्रमाणे वरील प्रकारामधील Full Fat वाले दूध घेणे चांगले. बाकीचे नुसते पांढरे पाणी. एकजण म्हणाले कि ते तर कच्चे दूध (RAW MILK) घेतात आणि त्यापासून दही तूप वगैरे सर्व घरी बनवतात. सर्वांनी आश्चर्याने त्यांना विचारले कि तुम्हाला कच्चे दूध कोठे मिळते? तर 'Whole Foods' मध्ये बाटलीमध्ये RAW MILK मिळू शकते. शिवाय अजून एक माहिती कळली कि http://www.realmilk.com/ वर तुमच्या राज्याचे नाव टाकून कच्चे दूध विकणाऱ्या गवळ्यांची माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही अगदी आपल्या भारतासारखे घारोष्ण दूध रोज घरी नेऊ शकता. ताजे: दुसरा महत्वाचा मुद्दा ऋजुताने सांगितला कि जेवढे ताजे आणि स्थानिक तुम्हाला शक्य आहे तेवढे ताजे फक्त विकत घ्यायचे नाही तर खायचेसुद्धा. मग तो भाजीपाला असो किंवा फळे. ताजी फळे विकत घेऊन फ्रीजमध्ये ठेऊन १० दिवसांनी खाण्यात काही अर्थ नसतो. ताजी फळे/भाजी जास्तीत जास्त ३ दिवसांमध्ये संपवावी. स्वयंपाक रोजच्या रोज घरी करायचा. अवांतर: आठवड्याभराची भाजी रविवारी करून ठेऊन आठवडाभर ती डब्याला नेण्याचा शहाणपणा करणारे मला (लेखकाला) स्वतःला माहित आहेत. जरी भारतामध्ये हा किळसवाणा प्रकार असला तरीही इथे आल्यानंतर वेळेच्या अभावाखाली अनेक भारतीय असे करताना दिसतात. आठवड्यातून दोनदा तुमचा फ्रीज साफ करा. फ्रीजमध्ये कित्येक अशा गोष्टी असतात कि त्या तिथे आहेत हे आपल्याला माहीतच नसते. ऑर् गॅनिक कि नॉन ऑर् गॅनिक याविषयी बोलताना ऋजुता म्हणते कि ऑर् गॅनिक जरी नाव लिहिले असेल तरी त्यामध्ये बरेच अमेरिकन कायदे असल्याने त्यांना गुंडाळून किंवा फसवून एखादा पदार्थ ऑर् गॅनिक लेबलचा बनवता येतो. आणि असे लेबल मिळवणे बर्याच शेतकर्यांना शक्य होत नाही. त्यामुळे लेबल नसले तरीही 'farmers market' मधील बर्याच भाज्या ह्या ऑर् गॅनिक असतात. त्यामुळे असा भेद करण्यापेक्षा ताजे खा तेवढे पुरेसे आहे. पॅकेज केलेले अन्न नेहमी टाळा. 'जितने पॅकेज खोलोगे उतना फुलोगे' असा मूलमंत्रच तिने पंजाबमधील एका शाळेत दिला होता. स्थानिक अन्न: तुमच्या जेवणाच्या ताटामधील अन्न हे किती मैलाचा प्रवास करून आले आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? उदाहरणार्थ Subway. बाहेर सहलीला गेले कि शाकाहारी असल्याने मी पहिले subway शोधतो. (Chipotle सर्व राज्यात नसते पण subway सर्व ठिकाणी असते म्हणून). तर तुमच्या 'सब' मधील सॅलड हे मध्यअमेरिकेतून आलेले असते. ते स्थानिक नसते. फूड मैल (Food Mile) हि संज्ञा इथे परिमाण म्हणून आपण वापरू शकतो कि फळाचे अथवा भाजीचे बी ते तुमचे ताट यातील अंतर हे कमीत कमी असावे. (म्हणूनच अगदी देवगडचा हापूस आंबा जरी इथे मागवला तरीही तो इथे येईपर्यंत त्याची चव हरवून बसतो.) प्रश्न: गोठवलेले फळ - अमेरिकेत बरीच ऋतुतली नसलेली फळे हि गोठवलेल्या स्वरुपात मिळतात. ती खावी का? उत्तर: हि ताज्या फळांच्या अर्धीसुद्धा पोषक नसतात. फळे विकत घेताना ती जेवढी ताजी तेवढी घ्यावी आणि घेतल्यानंतर ३ दिवसाच्या आत संपवावीत. Frozen Fruits (छायाचित्र जालावरून साभार) तूप: ऋजुताने तुपाच्या वापरावर बराच भर दिला. अगदी तेलापेक्षा तुपामध्ये भाज्या बनवणे कसे चांगले आहे येथून ते तूप खाऊन वजन कसे कमी करायचे यापर्यंत सर्व मार्ग सांगितले. प्रश्न: भात खावा कि नाही? भात खाल्ल्याने जाड होते असा समज आहे तो बरोबर कि चूक? ब्राऊन राइस कि व्हाईट राइस? उत्तर: भात, पोळी हे सर्व कर्बोदकांचे (carbohydrates) स्त्रोत आहेत. आता दक्षिणात्य भारतीयांचे जेवणंच भातावर सुरु होऊन भातावरच संपते मग त्यांनी भात खाऊच नये का? तर याला उत्तर आहे 'genetic medicine'. आपले शरीर, आपले जीनस यांना ज्या अन्नाची सवय आहे किंवा जे प्रादेशिक अन्न आहे ते आपण खावे. तुम्ही जर पश्चिम भारतातून असाल तर पोळी हा आपला एक मुख्य घटक आहे. त्यामुळे आपल्याला वरण भात भाजी पोळी सर्व काही प्रमाणामध्ये खाणे जरुरी आहे. भले तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा. कारण आपल्या शरीराला त्याच अन्नाची सवय आहे. नक्कीच प्रादेशिक अन्नाचा ताटामध्ये समावेश करणे आवश्यक आहेच परंतु आपला मुख्य आहार अगदीच फाट्यावर मारणे बरोबर नाही. हातसडीच्या भातामध्ये (ब्राऊन राइस) तंतू (Fibre) असतात. जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. तेच पण जरा कमी फायबर सफेद भातामध्ये पण असतात. ब्राउन राइस खाउन फायबरचे शरीरातील प्रमाण फार जर वाढले तर zinc (जस्त) याचे शरीरामध्ये शोषण कमी होते आणि त्याऐवजी aluminium जास्त शोषला जाउन अल्झायमर (Alzheimer)चा धोका वाढतो. त्यामुळे ब्राउन राइस अधून मधून खायला हरकत नाही परंतु रोज खाणे हा कदाचित चांगला सल्ला नसेल. मायक्रोवेव्हचा वापर: मायक्रोवेव्हचा वापर रेसिपी बनवण्यापेक्षा मुख्यतः फ्रीज मधले अन्न गरम करण्यासाठी केला जातो. या प्रकारात 'दीप'/'स्वाद' चे रेडी टू इट बॉक्सेस फ्रीजरमधून काढून सुरीने वरच्या प्लास्टिकवर दोन चार छेद मारून मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिट गरम करण्यास ठेवले जातात. दोन मिनिटामध्ये फक्त वरचा थर खूप गरम होतो आणि खालचा थर तसाच बर्फाचा राहतो. मग आपण तो बॉक्स बाहेर काढून चमच्याने ढवळून त्याचे तापमान एक समान करतो. Swad (छायाचित्र जालावरून साभार) अन्नावरील अत्याचाराचे हे उत्तम उदाहरण. अशा अन्नापासून किती पोषण मुल्य मिळते ते बिचार्या पोटुरावांनाच ठाऊक. मुळात ताजे अन्न या संकल्पनेलाच फाट्यावर मारले जाते. अन्न हे नेहमी सगळीकडून एकसमान आणि सावकाश गरम करावे. स्वयंपाकाचा गॅस हा उत्तम. सावकाश ढवळत आपली भाजी गरम करावी. मायक्रोवेव्हमुळे ते एकसमान गरम होत नाही. त्यातील पोषणमुल्य कमी होते ते वेगळेच. त्यामुळे मायक्रोवेव्हचा वापर शक्य तेवढा टाळलेला बरा. जर करायचाच असेल तर भाजी काचेच्या भांड्यात प्रथम काढून मग मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. मायक्रोवेव्हसेफ प्लास्टिक वगैरे असे काहीही नसते. जे काही मायक्रोवेव्हमध्ये जाते त्याची अणू रेणू च्या लेव्हलला जर प्रक्रिया होणार असेल तर कसले आले आहे मायक्रोवेव्हसेफ प्लास्टिक? ते सुद्धा भांड्यातल्या अन्नामध्ये त्याची रसायने सोडणारच. प्लास्टिक: पाणी आणि अन्न हे सर्व आजकाल प्लास्टिकच्या माध्यमातूनच आपल्या समोर येते. पिण्याचे पाणी कुठेही पहिले तर तुम्हाला प्लास्टिक मध्येच दिसेल. अन्न भले ताजेही विकत घेतले तरीही ते प्लास्टिक मधूनच घरी येते. नव्या माहितीनुसार सगळे प्लास्टिक इस्ट्रोजेन (estrogen - similar to female sex hormone) नावाचे संप्रेरक संपर्कात येणाऱ्या अन्नपदार्थात सोडतात. त्याचा शरीरावर होणारा परिणाम अजून माहिती नसला तरीही हे संप्रेरक अन्नामध्ये सोडले जाते हि बातमी संशोधकांना पुढचे संशोधन करायला पुरेशी आहे. (लिंक खाली दिलेली आहे.) तसेच कलिंगड, टरबूज, पपई आणि तत्सम फळे अर्धी खायची आणि त्यावर प्लास्टिकची बारीक फिल्म झाकून फ्रीज मध्ये ठेवायचे. हि पण एक वाईट सवय. संपवून टाका लगेच ते फळ. नसेल संपत लगेच तर स्टीलची ताटली झाका पण प्लास्टिक वापरू नका. झिप लॉक वगैरे प्रकार तर सरळ फाट्यावरच. शौचास बसण्याची पद्धत: अमेरिकेतील बर्याच प्रौढांना गुदद्वाराचे बरेच आजार होतात. कॅन्सरहि होतात. ५० वर्षांनतर कॉलोनोस्कॉपी करून घ्यावी असे डॉक्टर्स सांगतात. बाळाचे दुधाचे दात पडणे जसे नॉर्मल तशी इथे कॉलोनोस्कॉपी आता नॉर्मल झाली आहे. बर्याच संशोधनाअंती शास्त्रज्ञांच्या लक्षात आले कि याचे मूळ शौचास बसण्याच्या "मॉडर्न" आधुनिक पद्धतीमध्ये आहे. इथे शौचास कमोड वापरतात. आतिशय आरामात खुर्चीवर बसल्यासारखे शी करायला बसायचे. परंतु त्यामुळे शरीरातील आतल्या भागावर काय परिणाम होतात त्याचा अभ्यास कमोड बनवणार्या कंपन्यांनी केला नाही. याचे परिणाम अमेरिकेतील आजची म्हातारी पिढी भोगती आहे. आणि आता आपण ती पद्धती अवलंबली आहे. वर्षानुवर्षे शौचास खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसल्याने त्यांना आता कॅन्सरसारख्या रोगाला तोंड द्यावे लागते आहे. मग त्यांनी रिसर्च केला आणि काय शोधून काढले ते पहा. squattypotty ऋजुतानेही तिच्या सत्रात शौचास बसण्याची आपली भारतीय बैठक कशी बरोबर आहे हे न लाजता सर्वांसमोर बसून दाखवले. मी देखील न लाजता इथे नमूद करू इच्छितो कि (अमेरिकेत सगळीकडेच कमोड असल्याने दुसरा मार्ग नसल्याने शेवटी कमोडवर चढून बसून) भारतीय बैठकीप्रमाणे शौचास बसतो. त्याशिवाय होतच नाही राव आपला कोठा खाली. त्याचबरोबर ऋजुताने सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे कसे चांगले हे सांगितले. गार पाणी पिले जात नसेल तर थोडेसे कोमट करून प्या पण कमीत कमी एक ग्लास पाणी प्या. माझे ७० वर्षांचे बाबा अजूनही नित्यनियमाने पितात. त्यांचे बघून मी हि पिऊ लागलो. सगळ्यांचे आजी आजोबा बाबा पीत असतील. पण आजचे किती पालक स्वतः सकाळी पाणी पितात आणि आपल्या मुलांना सकाळी पाणी पिण्याची सवय लावतात? झोप: (लेखकाचा आवडता प्रकार) झोपेची वेळ हि रोज ठरलेली असली पाहिजे. आज ११, उद्या १२, किंवा १ असे जर केले तरी तुमचे शारीरिक घड्याळाची घडी (body clock) व्यवस्थित बसत नाही. रोज एका ठराविक वेळेला झोपणे आणि सकाळी बिनागजराचे उठणे हे तुमचे साध्य असले पाहिजे. २५ ते ३५ वयोगटाला साधारण ८ तास झोप आवश्यक आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर कमीत कमी २ तास झोपू नये. झोपताना सर्व इलेक्ट्रोनिक वस्तू बाहेरच्या खोलीत ठेवा. बेडरूममधून टी व्ही, फोन, आय पॅड, आय फोन यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. हालचाल आणि व्यायाम (Activity and Exercise): या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हालचाल म्हणजे आपण दिवसभर वेगवेगळ्या कामांसाठी जी हालचाल करतो ती आणि व्यायाम म्हणजे सलग एकसाथ तीव्र गतीने केलेली हालचाल थोडक्यात जिम. दोन्ही वाढले पाहिजे. मग तुम्ही कार्यालयात पाण्याची बाटली मेजावर (जास्त मराठी झाले का? टेबल म्हणतो हवं तर!) आणून ठेवण्यापेक्षा नळावर जाउन पाणी प्यायला जागेवरून वारंवार उठा. सलग एका जागी ४-५ तास बसण्यापेक्षा दर एक-दीड तासाने एक चक्कर मारून या. बसल्या बसल्या खाली वाका. काही पण हालचाल करा पण करा. संध्याकाळी जिम मध्ये गेलात तर अति उत्तम. ऋजुता म्हणते साधारण १५० मिनिटे (२ ते अडीच तास) कमीतकमी एका आठवड्यात तुम्ही व्यायाम केला पाहिजे. माझे लक्ष्य आहे आठवड्यातून फक्त ३ वेळा जिमला जाणे. बघुयात केवढे साध्य होते ते. =================================================================================== हे सर्व झाल्यावर मग नेहमीसारखे फोटो वगैरे घेणे सुरु झाले. RD1 सगळ्या घोळक्यामध्ये मग आमचा फोटू. सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देणे आणि फोटो काढणे यामध्ये ऋजुताची कसरत होत होती. मग त्यामध्ये काही फोटोंमध्ये तोंड वेडेवाकडे येणे झाले. कोणाचा xxx हात मध्ये आला. मग त्याच पोज मध्ये ४-४ फोटो काढून झाले. आणि मग मनासारखा फोटो मिळाल्यावर आमचे कुटुंब आणि आम्ही रविवार संध्याकाळ चांगली गेली या आनंदात घरी यायला निघालो. Photo2 संदर्भ: १) ऋजुता दिवेकर न्यूयॉर्क सत्र - २१ सप्टेंबर २०१४ २) प्लास्टिक लिंक : http://www.npr.org/2011/03/02/134196209/study-most-plastics-leach-hormone-like-chemicals
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
संदर्भ

प्रतिक्रिया द्या
23623 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

धन्यवाद

अमित खोजे
Wed, 09/24/2014 - 22:14 नवीन
डॉक्टरसाहेब, ज्या प्रतिक्रियेची मी आवर्जून वाट पाहत होतो ती टाकल्या बद्दल खरंच मनापासून धन्यवाद. या निमित्ताने आपल्याशी चर्चा करावयास मिळेल असे वाटते. बाकी आपल्या सर्व लेखांचा आणि इतरांच्या लेखांवरील प्रतिक्रियांचा आपण तर बाबा पंखा आहोत. कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणेच असावी. ह्या वाक्याला कोणी आक्षेप घेईल असे मला वाटत नाही. प्रतिक्रियांमध्ये पोस्ट केलेल्या त्या व्हिडीओ मध्ये मी ऋजुताला साबुदाण्याबद्दल प्रश्न विचारला होता. कि साबुदाणा खाल्लेलं चांगलं का? साबुदाण्याची खिचडी खाल्ली कि मला पोटात जड झाल्यासारखे वाटते. त्यावर तिने सांगितलेच कि साबुदाणा खिचडी खाऊ शकता परंतु प्रमाणात खा. जास्त खाल्लं कि त्रास हा होणारच. तसेच तिने तुपाबद्दल पण सांगितले. तुपाचा वापर मर्यादितच करावा. भाजीत तळण्यासाठी रोज नाही पण करू शकता असा मानस होता. आजकालच्या शाळेतील मुली 'फिगर सांभाळायची म्हणून' अजिबात तूप खायचे नाही, अजिबात तेलकट खायचे नाही असे करतात. त्यामुळे त्या स्निग्ध पदार्थांपासून मिळणारे पोषणतत्वे त्यांना मिळत नाही. त्या विषयावर बोलताना (आणि अशा इतर अनेक विषयांवर बोलताना) तिने तुपाचे उदाहरण दिले. तूप खाणे चांगले आणि ते खा असा तिचा मंत्र आहे. बाकी तुमचे दुधाबद्दलचे/ मायक्रोवेव्हबद्दलचे विचार शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असतील हि. परंतु हे सर्व शास्त्र नवीन आहे. गेल्या ५० - ७० वर्षातील प्रगती आहे. ते पूर्णपणे नाकारायची चूक मी करणार नाही. परंतु त्यात नवीन नवीन भर रोज होत असते. व्हिडीओमध्ये तिने सांगितल्या प्रमाणे अन्नाला आणि त्यातील पोषण मूल्याला या Food Science आणि Food Industry ने जे ठराविक भागांमध्ये (प्रोटीन, कर्बोदके, मेद, इत्यादी) विभागले आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक अन्नाच्या पोषणमूल्याबद्दल समजणे अजून बाकी आहे जे शास्त्राला आणि पर्यायाने आपल्याला अजूनही माहित नाही. रोज नवीन नवीन माहिती समोर येत असल्याने अगोदरच्या अर्धवट माहिती मध्ये भर पडली जाते आणि काही अंशी ती चुकीचीहि ठरवली जाते. (कृपया विदा मागू नये) आपल्या ज्ञानाच्या विस्तारासाठी आपण विदा वगैरे शोधतो. हार्वर्डने ते संशोधन केले आहे म्हणून ते परिपूर्ण समजायचे का? तुम्ही दिलेल्या विदामध्येसुद्धा स्पेन मधील ज्या शास्त्रज्ञांनी २००३ मध्ये प्रयोग केला होता त्यातील चुका दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माओ कसा चांगला हे दाखवून दिले आहे. कशावरून असे रिसर्च हे माओ कंपनी पुरस्कृत नसतात? मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार. मला एवढेच म्हणायचे कि शास्त्राने जी काही प्रगती केलेली असते ती कालसापेक्ष असते किंवा ती त्या काळापर्यंत मिळालेल्या ज्ञानानुसार बरोबर असते असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आपल्या सुदैवाने आपल्याला आयुर्वेदाची देणगी आहे. हा अन्नावरील रिसर्च अगोदरच आपल्या पूर्वजांनी करून ठेवला आहे. नक्कीच तो आंधळेपणाने जरी स्वीकारायचा नाही म्हटला तरीही आजचे शास्त्र वापरून आपण तो कन्फर्म करून वापरू शकतो. मग शास्त्राचे तात्कालिक शोध - तेच सत्य म्हणून स्वीकारून, आपली आपण आपली जीवन पद्धती लाक्षणिकरित्या बदलून भविष्यामध्ये येणाऱ्या परिणामांना सामोरे जायचे का? उदाहरण एक खाली देतो. नक्कीच डॉक्टर असल्याने हे तुम्हाला माहिती असेल. बाकी वाचकांसाठी हि माहिती. हा मुद्दा खरंतर संपादकांना विनंती करून मूळ लेखात टाकण्याचा विचार होता परंतु आता इथेच लिहितो. शौचास बसण्याची पद्धत: अमेरिकेतील बर्याच प्रौढांना गुदद्वाराचे बरेच आजार होतात. कॅन्सरहि होतात. ५० वर्षांनतर कॉलोनोस्कॉपी करून घ्यावी असे डॉक्टर्स सांगतात. बाळाचे दुधाचे दात पडणे जसे नॉर्मल तशी इथे कॉलोनोस्कॉपी आता नॉर्मल झाली आहे. बर्याच संशोधनाअंती शास्त्रज्ञांच्या लक्षात आले कि याचे मूळ शौचास बसण्याच्या "मॉडर्न" आधुनिक पद्धतीमध्ये आहे. इथे शौचास कमोड वापरतात. आतिशय आरामात खुर्चीवर बसल्यासारखे शी करायला बसायचे. परंतु त्यामुळे शरीरातील आतल्या भागावर काय परिणाम होतात त्याचा अभ्यास कमोड बनवणार्या कंपन्यांनी केला नाही. याचे परिणाम अमेरिकेतील आजची म्हातारी पिढी भोगती आहे. आणि आता आपण ती पद्धती अवलंबली आहे. वर्षानुवर्षे शौचास खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसल्याने त्यांना आता कॅन्सरसारख्या रोगाला तोंड द्यावे लागते आहे. मग त्यांनी रिसर्च केला आणि काय शोधून काढले ते पहा. squattypotty ऋजुतानेही तिच्या सत्रात शौचास बसण्याची आपली भारतीय बैठक कशी बरोबर आहे हे न लाजता सर्वांसमोर बसून दाखवले. मी देखील न लाजता इथे नमूद करू इच्छितो कि (अमेरिकेत सगळीकडेच कमोड असल्याने दुसरा मार्ग नसल्याने शेवटी कमोडवर चढून बसून) भारतीय बैठकीप्रमाणे शौचास बसतो. त्याशिवाय होतच नाही राव आपला कोठा खाली. त्याचबरोबर ऋजुताने सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे कसे चांगले हे सांगितले. गार पाणी पिले जात नसेल तर थोडेसे कोमट करून प्या पण कमीत कमी एक ग्लास पाणी प्या. माझे ७० वर्षांचे बाबा अजूनही नित्यनियमाने पितात. त्यांचे बघून मी हि पिऊ लागलो. सगळ्यांचे आजी आजोबा बाबा पीत असतील. पण आजचे किती पालक स्वतः सकाळी पाणी पितात आणि आपल्या मुलांना सकाळी पाणी पिण्याची सवय लावतात?
  • Log in or register to post comments

शौचाचे आजार

आजानुकर्ण
Wed, 09/24/2014 - 22:36 नवीन
अमेरिकेतील शौचाचे आजार हे कमोडमुळे नसून, मैद्याचे (कमी फायबरवाले) पदार्थ खाल्याने झाले असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित खोजे

मांसाहाराचा जास्तीत जास्त

रामपुरी
Wed, 09/24/2014 - 22:58 नवीन
मांसाहाराचा जास्तीत जास्त समावेश, कमीत कमी भाज्या फळे, कमी शारिरीक श्रम/चालणे (जर शक्य झालं तर हे लोक शौचकूपात सुद्धा गाडीतून जातील) ही प्रमुख कारणे असावीत असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

मी मूळ लेखात दिलेला

मदनबाण
गुरुवार, 09/25/2014 - 10:35 नवीन
मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार. च्यामारी या मायक्रोवेव्हमुळे मी अजुन कणफ्युज झालो आहे... खरचं त्रास होउ शकतो की नाही ? जालावर अनेक दावे प्रतिदावे वाचावयास मिळत आहेत ! पण त्यामुळे अजुन गोंधळ उडतो आहे. असाच एक अजुन दुवा उघडुन वाचला :- http://www.health101.org/art_microwaving.htm अजुनही कळत नाही की मायक्रोवेव्ह सेफ आहे की नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

बाण साहेब

सुबोध खरे
गुरुवार, 09/25/2014 - 13:01 नवीन
बाण साहेब जोपर्यंत संशय आहे तोवर मायक्रो वेव्ह मध्ये किंवा साठवणी साठी काचेच्या बाटल्याच वापराव्या. एक टप्पर वेअर नावाचे फॅड बायकांमध्ये फार आहे. ते सुद्धा एक प्लास्टीकच आहे आणि भरपूर महागही आहे. तेंव्हा ते वापरण्यापेक्षा चांगल्या कंपनीची ( बोरोसील/ कॉर्निंग) काचेची भांडी साठवणीसाठी वापरावीत असे मला वाटते. ( बर्याच अनाहिता माझ्या अंगावर धावून येण्याची शक्यता आहे). पण मायक्रो वेव्ह मध्ये पदार्थात विषे मिसळली जातात म्हणून ते वापरायचे नाही आणि विविध प्रकारची शीतपेये (कोक इ ) किंवा मदिरेचे प्रकार प्यायचे यात काय साध्य होणार आहे. निखार्यावर शिजवलेले मांस यामुळे पण कर्करोग होतो असे आता दिसून आले आहे http://www.slate.com/articles/health_and_science/medical_examiner/2014/01/cancer_risk_from_grilled_meat_is_it_time_to_give_up_smoked_and_fried_foods.html मग आता खावे काय आणि कसे ? अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक

मदनबाण
गुरुवार, 09/25/2014 - 13:55 नवीन
अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा. ओक्के. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

टपरवेअरबाबत अगदी सहमत. वापरूच

रेवती
गुरुवार, 09/25/2014 - 16:15 नवीन
टपरवेअरबाबत अगदी सहमत. वापरूच नये असे नाही पण प्रमाणात! तसेही काचेचे कंटेनर वापरणे जास्त योग्य! अ‍ॅल्युमिनिअम फॉईममध्ये पदार्थ गुंडाळून नेणे, पदार्थांवर झाकण म्हणून फॉईलचा उपयोगही टाळायला सांगितले आहे. या सगळ्याचा अर्थ कोणताच अतिरेक नको इतपत घेतला की बरेचसे नियम ताण न येता पाळले जातील असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जीवनशैली बदला....

प्रभाकर पेठकर
Sun, 10/12/2014 - 03:10 नवीन
सर्वसाधारण तापमानाला फूड सेफ प्लॅस्टीक कंटेनर्सचा अन्नावर विपरीत परिणाम होत नाही. पण अतिउष्ण आणि अतिशीत तापमानाला प्लॅस्टीक मधील धोकादायक रसायनं अन्नात मिसळतात. त्यामुळे पाण्याच्या बाटल्याही डिपफ्रिज मध्ये ठेवू नये. (पाणी लवकर थंड करण्यासाठी) आणि पाण्याची बाटली चुकून गाडीत राहिली असेल आणि बाहेरील तापमान ३५-४० सेंटी असेल तर ते पाणी पिऊ नये. हल्ली वॉट्स अप, फेसबुक आणि आंतरजालावरील इतर संस्थळावरून एव्हढी परस्पर विरोधी माहिती वाचनात येते की मन गोंधळून जाते. ताजे अन्न खा, प्रोसेस्ड आणि कॅन्ड फुट टाळा. मैदा टाळा, पॉलीश्ड बासमती भात टाळा, फळे धुवून घ्या, रोज कमीत कमी २० मिनिटे जलद चालण्याचा व्यायाम करा, कमीत कमी ७ तास झोप घ्या. सुट्टीच्या दिवशी दुपारी एक तासाहून जास्त झोपू नका. सॉफ्ट ड्रिंक्स, केक्स, आइस्क्रिम, बर्गर, हॉट डॉग, अंड्यातील पिवळे टाळा, पांढरा बलक कितीही खा. सकाळी मोठा नाश्ता करा, दुपारी मध्यम जेवण घ्या, रात्री अत्यल्प जेवण घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मालती कारवारकर ..

पहाटवारा
गुरुवार, 09/25/2014 - 02:03 नवीन
डॉ.मालती कारवारकर बाईंची पण या विषयावर अनेक ऊत्तम पुस्तके आहेत. -पहाटवारा
  • Log in or register to post comments

आहारतज्ञ बर्याच वेळेस सल्ला

सुबोध खरे
गुरुवार, 09/25/2014 - 10:32 नवीन
आहारतज्ञ बर्याच वेळेस सल्ला तांत्रिकदृष्ट्या बरोबर देतात परंतु तो व्यवहार्य असतोच असे नाही. एखाद्या नोकरी करणाऱ्या स्त्रीला तुम्ही संपूर्णपणे पोळी वर्ज्य करा सांगणे कितपत व्यवहार्य आहे?
  • Log in or register to post comments

आँ? असं ती कुठं म्हणातीये?

रेवती
गुरुवार, 09/25/2014 - 16:10 नवीन
आँ? असं ती कुठं म्हणातीये? साऊथींडयनांना जर सवय नसेल तर ते खात नाहीत. प्रत्येकाने ज्या त्या प्रदेशात पिकणारे मुख्य अन्न खावे. एखाद्या गोष्टीचा खाल्ल्याने त्रास होत असेल तर टाळावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ब्रोकोली, झुकीनी वगैरे

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 09/25/2014 - 11:18 नवीन
खरे तर ते जेनेटिक सवयी .. आहार वगैरे पटते ...पण हल्ली वेगवेगळे रस ब्रोकोली, झुकीनी, दुधी भोपळा आणि आणखीन काय काय...कसे काय करायचे ? २ पिढ्यांपासून ज्या खाण्याच्या सवयी लागल्यात त्यात फार बदल करू नये आणि तसे ते फार जमतही नाही ... कुठीलीही गोष्ट वर्ज्य नको आणि अति तर नकोच नको... शरीराच्या बारीक सारीक सिग्नल्स कडे अजिबात दुर्लक्ष नको आणि ४८ तासांपेक्षा जास्त काही त्रास झाला तर तडक डॉक्टर गाठणे ह्ये आपले सध्या चालू आहे ...
  • Log in or register to post comments

सौजन्यः म.टा.

शिद
Sun, 10/12/2014 - 01:56 नवीन
ऋजुताने दिला रोमिओला 'डाएट' Image removed. Hats off!
  • Log in or register to post comments

फारच उत्तम माहिती सोपी करून

पाषाणभेद
Sun, 10/12/2014 - 05:32 नवीन
फारच उत्तम माहिती सोपी करून सांगितली आपण. कालपरवाच ऋजुताने एकाला डाएट दिला असल्याची बातमी: http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Rujuta-Romio/articleshow/44779364.cms
  • Log in or register to post comments

अमित जी

मारवा
Sun, 10/12/2014 - 15:07 नवीन
लेख माहीतीपुर्ण आहे फार आवडला. रुजुता चे फोटो पहील्यांदा च बघितले देहस्वीनी ची देहयष्टी आवडली चेहरा सुंदर असता तर ? असो आणि ते टॉयलेट च्या फोटु ने फार च रसभंग केला हो आणि काय ते सारख सारख बाकी लेख आवडला
  • Log in or register to post comments

देहयष्टी वगैरे ठीक आहे

रेवती
Sun, 10/12/2014 - 17:54 नवीन
देहयष्टी वगैरे ठीक आहे मारावाजी, पण चेहऱ्याबद्दल, दिसण्याबद्दल कोणीही बोलूच नये. दिसणे आपल्या हातात नसते, असणे मात्र असते. तुमचे असणे प्रतीसादातून कळतेच आहे. नसेल बघवत चेहरा तर नका बघू! कोणीही आमंत्रण दिलेले नाही. तिने केल्या कामाच्या १ टक्का तरी करता आलेय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

परत एकदा स्त्रीविषयक

अजया
Sun, 10/12/2014 - 18:08 नवीन
परत एकदा स्त्रीविषयक,सौंदर्यविषयक, सडका दृष्टिकोन दाखवुन दिल्याबद्दल अाभार.गेट वेल सुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

दिसण्यावर कॉमेट करुन अत्यंत हीन दर्जाची मनोवृत्ती

चतुरंग
Sun, 10/12/2014 - 18:16 नवीन
दाखवल्याबद्दल तीव्र निषेध!! (खरंतर मनात असं येतंय की असल्या मनोवृत्तीच्या लोकांना चाबकाने फोडून काढायला हवे!!) (संतप्त) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

>>चेहरा सुंदर असता तर ?

सूड
Tue, 10/14/2014 - 19:08 नवीन
>>चेहरा सुंदर असता तर ? या ओळीनं माती केलीत!! अशाच लोकांच्या दिसण्यावर (कुणी शष्प विचारत नसतानाही) मिपावर आणि बाहेरही कमेंटी मारणार्‍या एक स्वघोषित समीक्षिका आठवल्या. त्यांच्या प्रतिक्रियांना आताशा कोणी हिंग लावूनही विचारत नाही, तुमची तशी गत होऊ देऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

+११११११११११११११११११११११११११११११११११११

बॅटमॅन
Fri, 10/24/2014 - 15:30 नवीन
अगदी असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काय हो? दिसणं आपल्या हातात

स्पंदना
गुरुवार, 10/16/2014 - 06:51 नवीन
काय हो? दिसणं आपल्या हातात असत का? पण असणं आपल्याला हवं तस असू शकत. दिसण हातात असत तर सगळेच बागडू बच्चन अन सगऴ्याच रुपसुंदर्‍या झाल्या असत्या. अन तसेही नुसत दिसण्यावर नशिब ठरल असत तर लेडी डायना सारखी परी आयुष्यात इतकी सफर झाली नसती. दुसरं म्हणजे टॉयलेटचा फोटो पाहुन तुमचा रसभंग झाला म्हणे. अस करा त्या निषेधार्थ दोन दिवस जाउ नका तिकडे. पाहू कसा रसभंग होतोय तो. काय माणस तरी असतात एकेक. जाइल तिकडे दिसणं, शरीर या पलिकडे नजर पोहोचतच नाही यांची. इतकी सगळी माणस जमुन काही ऐकतात, विचार करतात ते राहिलं बाजुला. देहयष्टी आवडली म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अब बस्स भी करो, रुलायेगी क्या

प्यारे१
Fri, 10/17/2014 - 03:22 नवीन
अब बस्स भी करो, रुलायेगी क्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

काय कटकटे, देहयष्टी आवडली

बॅटमॅन
Fri, 10/24/2014 - 15:32 नवीन
काय कटकटे, देहयष्टी आवडली म्हटले तर लगेच शेरेमार केलाच पाहिजे का? असो, असते हौस एकेकाची/एकेकीची. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

तुमच्या नेहमीच्या लेखनाकडे

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/16/2014 - 23:20 नवीन
तुमच्या नेहमीच्या लेखनाकडे पाहता इतका खालच्या स्तराचा शेरा माराल असे वाटले नव्हते. पण असो. इतकेच पुरे आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

शास्वत सौंदर्य.

प्रभाकर पेठकर
Sun, 10/12/2014 - 20:19 नवीन
'बाह्य सौंदर्य' ज्याला शारीरिक सौंदर्य म्हणता येईल आणि 'आंतरीक सौंदर्य' ज्यात ज्ञान, स्वभाव, वृत्ती थोडक्यात 'व्यक्तीमत्व' हे सुद्धा सौंदर्यच आहे. पहिले अशास्वत आणि वयोमानानुसार र्‍हास पावणारे तर दुसरे शास्वत आणि वयोमानानुसार वृद्धींगत होणारे आहे. आता प्रत्येकाने ठरवायचे आहे की अशास्वताला महत्त्व द्यायचे की शास्वताला. शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

चुकीची दुरुस्ती.

प्रभाकर पेठकर
Mon, 10/13/2014 - 12:46 नवीन
वरील शब्द 'अशाश्वत' आणि 'शाश्वत' असे वाचावेत. चुकी बद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अरे फारच सिरीयस झालय वातावरण मी अस काय बोलुन गेलो ?

मारवा
Mon, 10/13/2014 - 11:52 नवीन
अहो जरा सबुरीन घ्या मी त्यांच्या लेखनाचा चाहता आहे. मी पहील्यांदा च त्यांचे फोटो बघितले मला कुतुहुल होत की करीना ला झिरो फिगर देणारयांची स्वतःची फिगर त्या कशी मेंटेन ठेवत असेल कशी असेल. फोटो बघितल्यावर मला त्यांचे प्रमाणबद्ध शरीरयष्टी आवडली. त्यांचा विषय च फिटनेस आहे शरीरासंदर्भात आरोग्या संदर्भात आहे चांगली फिगर मेंटेन करण्यासाठी शिस्त संयम अनेक गुण लागतात. ते त्यांच्यात आहेत व आरोग्याचा त्या अतिशय सकारात्मक असा प्रचार प्रसार करतात. व विषय च शरीर संदर्भात असल्याने कौतुकाने मी तसे बोललो आता त्यानंतर चेहरा सुंदर असता तर असे जे म्हणालो त्यात अधिक सुंदर असता तर छान योग जुळुन आला असता इतकेच सुचवायचे होते. ते नसल्याने काहीही फरक पडत नसतो हे मला समजते हो लगेच आंतरीक बाह्य सौंदर्य काय सडकी मनोवृत्ती काय कमाल आहे ? सहज लाइटली तुम्ही कधी म्हणत नाही का नविन कोणी हिरो हिरोइन आली तर तिच्या सौंदर्यावर एकुण टीप्पणी तुम्ही कधीच करत नाही का ? असो
  • Log in or register to post comments

ऋतुजा दिवेकर

निनाद मुक्काम …
गुरुवार, 10/16/2014 - 01:06 नवीन
ऋतुजा दिवेकर तिच्याशी मराठीतून स्व ताशी ओळख करून दिली असती तर , आपण आपल्या लोकांशी आपल्या भाषेत सुरवातीला संवाद साधायला संकोचतो किंवा राणीच्या भाषेचा आपल्यावर पगडा असतो , कुणास ठाऊक लेखातील माहिती रंजक करून सांगितली त्या बद्दल धन्यवाद ऋजुता व तिचे घरचे एकदम मराठमोळे आहेत. आयुर्वेद योग ह्यांना आधुनिक काळात वेगळे परिमाण तिने दिले आहे करीना च्या शून्यकटी मागे हि हिरकणी आहे त्यामुळे तिचा पंचतारांकित दुनियेत खूपच बोलबाला झाला आहे, तूप भरपूर खा असे ती जेव्हा तार्किक दृष्ट्या पटवून देते तेव्हा वर्षोवर्ष आहारातील अश्या किती अंध श्रद्धा बालपणापासून जोपासत आलो आहे प्रश्न पडतो.
  • Log in or register to post comments

ती एक व्यावसायिक आहे. विविध

रेवती
गुरुवार, 10/16/2014 - 02:10 नवीन
ती एक व्यावसायिक आहे. विविध भाषिक तेथे होते त्यामुळे सगळ्यांना समजेल अशी भाषा वापरण्याचा संकेत तिने पाळला. सगळे मिळून दीड तासात काय नि किती करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

@रेवती ताई

निनाद मुक्काम …
Wed, 10/22/2014 - 02:53 नवीन
@रेवती ताई माझा प्रतिसाद धागाकर्त्यास उद्देशून होता. त्याने स्वतःहून ओळख मराठीतून केली असती तर तिने मराठीतून उत्तर दिले असते हे स्वानुभवाने सांगू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कशाला महत्त्व द्यावे?

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/16/2014 - 14:09 नवीन
ऋजुता दिवेकर ह्या दिसतात कशा आणि त्यांची देहयष्टी कशी आहे, त्या मराठी असून कुठल्या भाषेत बोलतात ह्या पेक्षा त्यांच्या भाषणात 'आशय' काय आहे आणि किती महत्त्वाचा आहे ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments

बाईंचा व्यवसाय बघता देहयष्टि

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 10/17/2014 - 02:46 नवीन
बाईंचा व्यवसाय बघता देहयष्टि बद्दल चा शेरा समजू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सहमत!

बॅटमॅन
Fri, 10/24/2014 - 15:30 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

सहमत

आजानुकर्ण
Fri, 10/24/2014 - 22:56 नवीन
लोकांच्या देहयष्टीवर कमेंटा करतच ऋजुता बाईंनी पैशे कमावलेयंत. मारवा यांनी त्यांच्याच औषधाचा ढोस त्यांना दिला असे वाटले. (बाकी प्रतिक्रिया वाचून माफक मनोरंजन झाले.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मी येथे सोप्या मराठीत लिहिले

निनाद मुक्काम …
Sat, 10/25/2014 - 00:40 नवीन
मी येथे सोप्या मराठीत लिहिले, तिच्याशी मराठी भाषेत स्वतःची ओळख ... येथे दिवे कर ह्यांना उद्देशून अजिबात लिहिले नाही आहे. आमच्या पंचतारांकित विश्वात ते एक मानाचे नाव आहे. त्यांचे सल्ले अनेक कुबेरपती मुंबईत घेतात ह्याचा मला अभिमान वाटतो, चाकोरीबद्ध पांढरपेशा समाजात असे वेगळे शेत्र निवडून त्यात अव्वल होणे आणि औद्योगिक शेत्रात ट्रेंड सेटर बनणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

माहितीपूर्ण धागा

पैसा
Fri, 10/17/2014 - 14:07 नवीन
माहितीपूर्ण धागा.
  • Log in or register to post comments

आज झी २४ तास

कपिलमुनी
Wed, 10/22/2014 - 17:22 नवीन
वर मुलाखत पाहिली . छान मराठी मधून बोलत सर्व प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. "तुमच्या शरीररचनेला समजून घ्या " .. सरसकट पुस्तक / डायट फॉलो करू नका हे वाक्य खूप महत्वाच वाटला
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा