मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काळसारं (लघूकथा)

दशानन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तिने आपले हात धुतले न्हाणीमध्ये, चुलीवर आमटी गरम करायला ठेऊन, बाजूला ठेवलेली भाकरी ताटात घेतली, जरा वेळाने गरम आमटी वाटीत ओतली आणि भाकरीचा एक तुकडा मोडून त्यात बुडवला. बाजूची चिमणी रॉकेल संपल्यामुळे मंद मंद होत वीजू लागली होती, एकदाची ती विजली, तिने खस करून चुलीतले जळते लाकूड बाहेर काढले, झोपडी अगदी लाल रंगात उजळुन गेली.. तिने आपले हात ताटात धुतले व धडपडत बाहेर आली. बाहेर गच्च अंधार पसरला होता, दूरवर कोठेतरी एखादा फड जळत होता! तिने आपले त्याच्याकडे पाहिले न पाहिले आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटली.. "शेण पडो, त्याच्या तोंडात!" आपली वळकट सरळ करून ती झोपी गेली. "अंग, रुक्मीअक्का.. रुक्मीअक्का!!" बाहेर कोणीतरी तिच्या नावाने आवाज देत होते, तिने डोळे हळुहळु उघडले.बाहेर चांगलेच उजाडले होते. कशीबशी धडपडत ती कंबरेला आधार देत, झोपडी बाहेर आली तर वाडीतली मोठी माणसं तिच्या झोपडीसमोर उभी होती, बायका बाजुला जागा मिळेल तेथे तोंडाला साडी लावून बसल्या होत्या. समोर खोत येत म्हणाला "आज्जे, ये, इकडे बस! जावा रे, कोणीतरी पाणी, बसायला चादर घेऊन या!" तिने डोळ्यावर हात ठेवत त्याच्याकडे पाहिले व म्हणाली "अरे, तू तर रामा खोतचा पोर! किती मोठा झालास...आणि सकाळच्या पारी कामं सोडून तुम्ही सगळी इकंडे?" "रुक्मीअक्का, धीर धर, बसं जरा, अरे गप्पा, कल्ला नको! मी काय सांगतो जरा धिराने ऐक" बाजुच्या भिमाने तीला खाली बसवले, समोर पाणि धरले.. "अक्का, काल तुझ्या फडावर.. आग लागली आणि धर्मूअज्जा... आगीत जळला.. पहाटं त्या गोराक्काला कळलं.. पडसाला गेली हुती तेव्हा.." रुक्मीअक्काने त्यांच्याकडे पाहिले... आणि एक जोरदार टाहो फोडला.... "देवा रं!!!" सारं गाव दु:खात होते, जो तो जे घडलं ते घडायला नको होते असे म्हणून डोळ्याला धोतरं लावत होता. रुक्मीअक्का झोपडीत बसून होती. तिच्या डोळ्यासमोर ४० वर्षाचा संसार फिरत होता, संसार कसला, गुलामगिरी! तीने बसल्याच जागेवरुन समोर लटकत असलेल्या धर्माच्या फोटोकडे पाहिले. तोंड कडूसं झाले. ती बाजूला बसलेल्या गोराक्काला बघत म्हणाली "गोराक्का, तोंड कडू झालं, जरा वाईच साखर घे, आत चुलीवर पितळी डब्बात आहे बघ" गोराक्का आत गेली आणि जोरात किंचाळली. सात दिवसात, गावात दोन जीव गेले होते, धर्मा जळुन, आणि गोरक्का साप चावून. देवळात आज कौल लावला होता पंचानी 'देव गावावर रुसला का??' रुक्मीअक्का, राखुंडी घासत, झोपडीबाहेर बसली होती आणि तोंडातल्या तोंडात बडबड करत होती "मला, मुलं नाही झाले, पण तीलातरी कुठं झालं. तरी तिच्याच मागे..." असे म्हणून ती पच्चकन. काळसारं थुकली...

वाचने 3329 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by दशानन

सोत्रि गुरुवार, 09/04/2014 - 00:37
तंबाखु जाळून राखुंडी तयार करतात, त्यामुळे ती काळी असते.
तंबाखू जाळून मशेरी होते. शेणाची गोवरी जाळल्यावर होते ती राखुंडी, ती पण काळी असू शकते. - (मशेरी ट्राय करून बघितलेला) सोकाजी