Skip to main content

सत्याचा जय...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 04/09/2014 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपिठिका: नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले... शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच. पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद ! ============================================ "नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो."; "गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते."; "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी."; "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे... अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्‍या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते. सर्वात वाईट गोष्ट ही की बर्‍याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते). जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे." म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल: १. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा. याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे. सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता. २. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो. सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते. पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील. ३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही. सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत. वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही. ४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे. जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्‍याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते. वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील. या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्‍याचा डबा दाखवणे आवश्यक आहे... कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 55899
प्रतिक्रिया 218

प्रतिक्रिया

लेखातील वाक्या- वाक्याशी तीव्र असहमत ! तूर्तास इतकेच ! मी पैला हे लिहायचे राहीलेच !

In reply to by विटेकर

हजारो वर्षांची गुलामगिरीची प्रथा आणि शेकडो वर्षांचा वसाहतवाद या दोन गोष्टी "सत्याचा असत्यावर विजय" होता काय हे सांगा, मग पुढे बोलू... अन्यथा डोळे गच्च मिटून राहणे हा लोकशाही हक्क तुम्हाला आहे, हे आम्हाला मान्य आहे :)

लेख खुप आवडला. वाक्यावाक्याशी सहमत. बाकी माझे अत्यंत नावडता quote देतो. "There is crime,behind every fortune" साला मेहनत करुन आणी व्यवहारी राहुन ही मोठ्ठ होता येते.

In reply to by संजय क्षीरसागर

लेख विटेकरांचा नाही हे कळतेय हो...मलाही मिपावर ५ पेक्षा जास्त वर्षे झालीत.. या लेखाच्या विटेकरांच्या वाक्या- वाक्याशी तीव्र असहमतीच्या जेपी यांच्या असहमतीशी माझी सहमती...असे म्हणायचे आहे मला.

'ठेविले अनंते तैसेची रहावे...चित्ती असो द्यावे समाधान' एकदा ही हतबलता स्विकारली की मग 'भला उसका यश/पैसा/किर्ती मेरे यश/पैसा/किर्ती से ज्यादा कैसे' याचे स्वतःला कुरवाळणारे भंपक कारण शोधावेच लागते..त्यातूनच जन्मतो हा 'लुळी पांगळी.. आणि 'लबाडी केल्याशिवाय.. ई.ई. भोंदूपणा.

+ असंख्य असत्याला confront केल्याशिवाय त्याच्याशी संघर्ष केल्याशिवाय सत्याला यश मिळू शकत नाही..

एकूण लेखाशी अतिशय अतिशय सहमत.... विटेकरांशी असहमत. हे असेच चालायचे, सबब स्वतः घट्ट असणे हीच प्राथमिकता असावी.

ह्या वाक्यांमधले तुलनात्मक अनावश्यक भाग काढून टाकल्यास स्वयंसूचना वाली छान वाक्यं बनतील. अमुक शिवाय तमुक नाही वगैरे का असतं? मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन पुरेसं नाही?

अजुन काही लबाड वाक्ये. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. हिंदु धर्म हा त्यागवादी आह्हे व इतर सर्व भोगवादी आहेत. बुडाला औरंग्या पापी.

In reply to by पोटे

काय पोटेसाहेब, प्रत्येक ठिकाणी सिग्रेडीपणा दाखवायलाच हवा असे काही की काय आँ???

अमुक शिवाय तमुक नाही वगैरे का असतं? मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन पुरेसं नाही? याची उत्तरे "आस्तिक-नास्तिक..." लेखाच्या पुढच्या भागात येतील, (जर्रा वेळ मिळू द्या). आतासाठी फक्त दोनच विधाने: १. माणूस समाजातले "बेट" (मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन) म्हणण्याइतका वेगळा राहू शकणार नाही... संन्यास घेऊन जंगलात गेला तरी आजच्या काळात ते शक्य नाही. व्यक्ती व समाज यांची क्रिया-प्रतिक्रिया अनिवार्य आहे. २. एडवर्ड मरो म्हणून गेलाय : "क्लिष्ट गोष्टींची समज आपल्याला काही काळाने येईलच. पण समोर असलेल्या उघडउघड गोष्टीच्या उकलीला त्यापेक्षा जास्त वेळ लागतो असेच दिसते (The obscure we see eventually. The completely obvious, it seems, takes longer)."

लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही. यासाठी +१ पण, "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" याचा शिंपल अर्थ असा घेतला तर? की, श्रीमंतीमागे धावताना लुळेपांगळे व्हायची वेळ येणार असेल तर त्यापेक्षा धडधाकट गरिबी परवडली.

In reply to by यसवायजी

"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" याचा अन्वयार्थ असा आहे की श्रीमंत होण्याच्या नादात आपले मूल्यसंस्कार विसरू नयेत. एवढंच. शब्दशः अर्थ घेण्याची गरज नाही. तसेच श्रीमंत होणे वाईट असते, पाप असते असेही मानू नये.

In reply to by यसवायजी

त्या वाक्प्रचाराचा अर्थ सर्वसाधारणपणे तुम्ही म्हणता तसा घेतला जात नाही. असा ओढून ताणून अर्थ काढण्यापेक्षा "श्रीमंती वाईट नाही, पण तिच्या मागे धावताना सारासारविवेक बाळगा." असे म्हणायला हरकत नाही... आणि या सारासारविवेकात स्वतःची पात्रता आणि अपेक्षा यांचे प्रामाणिक गुणोत्तर ठेवले तर मग भ्रमनिरास आणि त्यावरची भ्रामक मलमपट्टी करायची गरज नाही. मुख्य म्हणजे श्रीमंती लुळीपांगळी असते किंवा तिच्याकरता कष्ट करण्याने माणूस लुळापांगळा होतो, या स्वतेजभंग करणार्‍या आणि गरिबीला भ्रामक उच्चासनावर बसवण्याच्या आत्मघातकी प्रवृत्तीला माझा विरोध आहे. ज्या समाजाच्या मनात उच्च स्वप्ने नाहीत आणि त्यासाठी कष्ट करायची तयारी नाही त्या समाजाचे केवळ वर्तमानच नव्हे तर भविष्य सुमार राहिले तर आश्चर्य कसले ? मुख्य म्हणजे हा उतारावरचा प्रवास इथेच थांबत नाही... स्वतःबद्दल असा कमीपणा (low self-esteem) वाटणारे समाज दुसर्‍या वरचढ समाजांचे गुलाम होतात हा इतिहास आहे... कारण सत्याचा/चांगल्याचा आपोआप विजय होण्याची कमीतकमी नगण्य शक्यता तरी असते पण तेजोहीन समाज मात्र हमखास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुलाम बनतो. याला इतिहास आणि वर्तमान साक्षी आहेत, फक्त डोळे उघडून पहायची गरज आहे.

In reply to by यसवायजी

यसवायजी. खरेतर मराठी तील हे सर्वाक भयानक आणि सर्वांगाने विकासाला मारक वाक्य आहे. या वाक्यावर पुलं नी एकदा लिहुन ठेवलय की श्रीमंती इताके धट्टकट्टे जगात काही नाही हे समजेपर्यन्त लोक गरीबीने लुळेपांगळे होऊन गेलेले असतात.

In reply to by विजुभाऊ

हो. पैशाचं महत्व मी तरी नाकारत नाहीच. पण मला वाटतं की, कुठल्याही म्हणी,वाक्प्रचाराचा अर्थ ती/तो वापरल्या जाण्याच्या 'टाइमिंग'वर ठरवावा. जसे की 'आराम हराम है' याचा अर्थ शब्दशः "आजारी असताना देखील आराम करु नये" असा नाही. सर सलामत तो पगडी पचास, Health is wealth, यातून सुद्धा एवढंच अपेक्षीत आहे की, एखाद्या गोष्टीमागे धावताना आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर त्यापेक्षा ती तसली श्रीमंतीच नको. पैशामागे जिव तोडून धावताना धाप लागली तरी थांबायला वेळ नाही, आणी एक दिवस कोसळलो तर पाणी पाजायला आपली माणसं नाहीत अशी वेळ न येवो. बस्स.. बाकी सगळ्या शिर्‍या-उपमा हो.

क्लास !!! पैशाच्या संदर्भातीलः
तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही.
यचा दाहक अनुभव घेतला आहे, घेतोय. अजून एक असंच टुकार वाक्यः जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.

>>>>"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" ह्यात पैशापेक्षा आरोग्य महत्त्वाचे हा संदेश दिला आहे. गरीबच राहा किंवा श्रीमंत होऊ नका असा संदेश नाहिये. आरोग्याला योग्य तितके महत्व देऊन श्रीमंती आली तर त्याला आक्षेप नाही. पण, श्रीमंतीच्या मागे धावताना, शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल आणि कांही व्याधी कायमस्वरूपी मागे लागल्या तर आलेल्या श्रीमंतीचा उपयोग काय? असा साधा सरळ अर्थ आहे. गरीबी म्हण़जेच 'धडधाकटपणा' आणि श्रीमंती म्हणजे 'लुळेपांगळेपणा' असा शब्दशः अर्थ घेऊ नये. लहानपणी शाळेत शिकताना "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" ह्या संदेशातून आयुष्यातील मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे महत्व अधोरेखित केले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

याबद्दल माझे मत मी वरच्या एका प्रतिसादात जरा विस्ताराने दिले आहे, त्यात मला काय म्हणायचे आहे ते जास्त स्पष्ट होत आहे.

थिअरेटिकली हे पटतय की, अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला हवा.... पण त्यावरचं एक आर्ग्युमेन्ट असंही असतं, की एकाचवेळेस "सगळेच" यशस्वी कसे होतील? काहीजण अपयशी होणारच. मग त्यांनी मनाची समजूत कशी घालायाची?

In reply to by कवितानागेश

खरंतर यात काहीच थिअरेटिकल नाही. सगळंच प्रॅक्टीकल आहे. वस्तूस्थिती साधारण अशी असते: * सगळेच जण एकाच वेळी एकाच स्पर्धेत नसतात * एक संधी एका वेळी अनेकांना (उदा. नोकरी, व्यवसाय, इ) उपलब्ध असते आणि त्यांत अनेक जण यशस्वी होउ शकतात. * सगळे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतील असे नाही, पण भविष्यात त्याच / इतर प्रकारच्या अनेक प्रकारच्या संधींच्या अनेक फेर्‍या उपलब्ध असतात * महत्वाकांक्षी व्यक्ती स्वतःच्या संधी स्वतः निर्माण करतात... अश्या प्रकारचा (आउट ऑफ बॉक्स) विचार करणार्‍या माणसांची परंपरा असलेले देश इतर देशांना कोसांनी मागे टाकतात. अश्या देशांचे आपण कौतूक करतो, त्याबरोबरच त्यांचे अनुकरण करणे जास्त फायद्याचे आहे, नाही का? * आणि शेवटी अजून एक निर्दयी सत्य, ज्याला सर्वांनाच सामोरे जावे लागते... जीवनाच्या शर्यतीत काही मोहरे अयशस्वी होणारच... असे कोण म्हणाले की जगातले सर्वच "गुडिगुडी" आहे ? जग त्याच्या नियमाप्रमाणॅच चालणार, प्रत्येकाला आपल्या प्रयत्नाने आपले जगातले स्थान बनवायचे असले. अगदी प्रामाणिक आस्तिकही मान्य करतात की, "स्वतःला मदत करणार्‍यालाच देव मदत करतो (God help them who help themselves) ! ... इ. इ. इ. सतत प्रयत्नांच्या अभावामुळे अयशस्वी होणे हे नाकर्तेपणाचे आणि अक्षम्य आहे असे मला वाटते. जरा टोकाची पण सर्वमान्य उदाहरणेच द्यायची तर असा इतिहास सांगता येईल की "मायक्रोसॉफ्ट" हा बिल गेटचा पहिला प्रयत्न नव्हता... ना "रिलायन्स" धिरुभाई अंबानीचा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अपयशाचे कारन प्रत्येकवेळेस प्रयत्न कमी पडणं हेच नसतं. म्हणजे प्रयत्न करु नयेत, असं मला म्हणायचं नाहीये. (खरं तर मला काहीच म्हणाय्चं नाहीये! :) ) पण प्रत्येकानी महत्त्वाकांक्षीच असायला हवं असं मात्र मला वाटत नाही.

In reply to by कवितानागेश

महत्वाकांक्षी असावे की नसावे हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे... अगदी हक्क आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे येथे तो मुद्दाच नाही. "मला फारशी महत्वाकांक्षा नाही, मला फार मोठे काही करण्यात रस नाही" असे म्हणणार्‍या आणि कमी / नसलेल्या यशाला झाकण्यासाठी भ्रामक वचनांचा आधार न घेणार्‍या प्रामाणिक लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्याविरुद्ध, अपयश अथवा अपेक्षेपेक्षा कमी यशाला झाकण्यासाठी भ्रामक कारणसंहिता वापरणे म्हणजे केवळ दुसर्‍यांचीच नाही तर स्वतःची दिशाभूल करणारा खोटेपणा आहे... आणि तो त्या व्यक्तीकरता आणि समाजाकरता घातक ठरतो. हा मुद्दा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सहसा 'यश' ही गोष्ट भौतिक परिमाणांमध्ये मोजली जाते आणि त्यासाठी 'महत्त्वाकाम्क्षा' असणं आवश्यक आहे असंही बिम्बवलं जातं. त्यात बरेच लोक विनाकारण स्पर्धा निर्माण होउन भरडले जातात. जर का 'यश', हे स्वतःचीच 'संपूर्ण' कौशल्य वापरण्यावर मोजलं गेलं, आणि त्यातून मिळणार्‍या आनंदाप्रमाणे मोजलं गेलं, तर तुम्ही लिहिताय ते सगळं पटतंय.. :)

In reply to by कवितानागेश

केवळ सहमतच नाही तर हा मुद्दा फार मह्त्वाचा आहे आणि म्हणूनच तो लेखातील विधान ४ च्या विश्लेष्णात खालीलप्रमाणे आला आहे... मात्र आपण दुसर्‍याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते.

@मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते>>>> __/\__

मला ते फळ्यावर लिहिलेले सुविचार घंटा कधी आवडलेले नाही .... एक मात्र होत ...if it is very clean, means it was dirty somewhere ! असो .... अजुन एक ... ते काही चांगदेव पाटील टाईप लोक्स, जी टॉक ला स्टेटस टाकायचे , " दुचाकीची मळवटलेली मागची सीट म्हणजे स्वच्छ चारित्र्याच लक्षण " ...आम्ही च्यायला पुसुन ठेवायचो ;)

मस्त लेख. अनेक प्रस्थापित सत्यं म्हणून वावरणारी विधानं गैरसमजातून आलेली असतात. अगदी मोजक्या, विशिष्ट परिस्थितीत ती लागू होतात. मात्र त्यांना मान सर्वसाधारण सत्याचा मिळतो. 'धट्टीकट्टी गरीबी' इतका गैरसमज तर दुसरा कुठचाच नाही. गरीब देशांत बालमृत्यूंचा दर श्रीमंत देशांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतो. हे धट्टेकट्टेपणाचं नाही, तर हलाखीचं लक्षण आहे. 'मागच्या जन्मीचं फळ म्हणायचं झालं...' हे असंच हतबलता व्यक्त करणारं वाक्य.

माझी हि एक वीट शेवटी न्याय नीती वगैरे हा आपल्या कल्पनेचा आणि संस्काराचा भाग असतो. पण प्रयत्नवादाला उत्तेजन देणे आवश्यक आहे दैववादाला नव्हे. एडिसन चे उदाहरण का देतात? १००० पेक्षा जास्त वेळा अपयशी ठरूनही शेवटी बनवण्यात तो यशस्वी झालाच ना? माझ्याकडे आलेले एक दैववादी रुग्ण मला म्हणाले. डॉक्टर जे माझ्या नशिबात असेल तेच होइल. नशिबात मृत्युयोग नसेल तर काहीही होणार नाही. मी त्यांना शांतपणे म्हणालो साहेब तुमच्या नशिबात मृत्यू योग नाही हे तुम्हाला माहित असेल तरीही हि समोर रेल्वे लाईन आहे हि आपण डोळे मिटून पार कराल काय? शेवटी दैववाद नव्हे तर दुर्दम्य आशावादच राष्ट्राला पुढे नेत असतो. याची उत्तम उदाहरणे जर्मनी किंवा जपान हि आहेत. दुसर्या महायुद्धात राख रांगोळी झालेले हे देश केवळ प्रयत्नवादाने केवढ्या उंचीवर पोहोचले आहेत. 'ठेविले अनंते तैसेची रहावे...चित्ती असो द्यावे समाधान' असे राहिले असते तर त्यांची गणना इथिओपिया पाकिस्तान सारख्या देशांबरोबर झाली असती.

In reply to by सुबोध खरे

+१ सर!!! आणखिन एक डोक्यात जाणारं वाक्य म्हणजे 'आजच्या धकाधकीच्या जिवनात उर फुटेस्तोवर धावतांना..ई.ई."

आणि एक लबाड वाक्य ! कर्मविपाकाचे फळ मिळते

एकूण काय, बरीचशी चमकदार वाक्ये ही अर्धसत्ये असतात. आणि आपला मेंदू शाबूत ठेवून सदैव प्रयत्न करत राहिले पाहिजे! श्री पोटे, एका चांगल्या धाग्यावर पुन्हा एकदा हिंदू, औरंगझेब इ. विषय काढून धाग्याचा खरडफळा केल्याबद्दल धन्यवाद आणि पोटे यांच्या काड्यांना इंधन पुरवल्याबद्दल इतर मिपाकराचे झाईर कौतुक.

"hope is a good thing, maybe the best of things, and no good thing ever dies." याच्या विरुद्धअर्थी आपले तत्त्वज्ञान असते हा माझा अनुभव आहे.

In reply to by दशानन

माझा अर्धाच मुद्दा तुमच्यापर्यंत पोचला आहे असे दिसते आहे. माझे म्हणणे... "hope is a good thing, maybe the best of things, and no good thing ever dies." इथे थांबत नाही. ते तेथेच थांबले तर, "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" इथेच त्याचा अर्थ संपेल. माझे म्हणणे जास्त चांगल्या प्रकारे असे सांगता येईल... "Dream hard; and work harder and smarter to make it a reality."

भारताच्या स्वातंत्र्यानंतर समाजवादी विचारसरणीचा चांगलाच जोर होता. तेव्हाचे जुने चित्रपट पाहतानासुद्धा ही बाब वारंवार जाणवते (आठवा: श्री चारसोबीस .. मुनाफाखोर वगैरे शिव्या). त्यामुळे एकूणच श्रीमंत म्हणजे वाईट आणि गरीबच चांगले असा संदेश जनतेच्या गळी उतरवला जात होता. अगदी अमिताभच्या सिनेमापर्यंत ही परंपरा अखंडीत होती. त्याच विचारसरणीतून असली वाक्य मागच्या पिढीतील माणसं वापरत असावीत.

अजुन एक लबाड वाक्य ! जींकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. मेलास तर स्वर्गात जाशील.

In reply to by पोटे

ट्रोलिंग म्हणजे काय हो पोटेसाहेब? ते विषयाला धरून असतं की नसतं? जरा विवेचन केलंत तर लाभ होईल. ज्ञानात भर पडेल.

सत्य असत्याशी मन केले ग्वाही | मानियले नाही बहुमता || मला अगदी प्रामाणिकपणाने असे वाटते की,चारित्र्याचे स्थान आयुष्यात नेहमीच अत्यंत वरचे आहे. त्याशिवाय असणारे यश अंतोगतत्वः अपयशाच्या आणि दु:खाच्या खाईतच नेते ! असे नसेल तर कर्माचा सिद्धान्त खोटा आहे असे म्हणावे लागेल.न्यूटन ही खोटा ठरतो. वरील लेखात आणि सार्‍या प्रतिसादात अनेक शब्दांची आणि त्यातील अर्थछ्टांची बेमालूम सरमिसळ झाली आहे असे मला वाटले म्हणून काही विधाने टंकीत आहे, आपल्याला मान्य व्हावीत असा मुळीच आग्रह नाही. ( हल्ली मी असले आग्रह सोडून दिले आहेत , जेव्हा पटेल तेव्हा पटेल , आणि नाही पटले म्हणून तरी बिघडले कुठे ? सार्वत्रिक / त्रिकालाबाधित सत्य नाकारल्याने सत्याला कमीपणी येत नाही , लोक संपून जातात. Principles are like Lighthouse . If you don't listen to them , "you" break down and not the principle. सत्य परास्त नही होता|) # यश आणि सुखी असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत , परस्पर संबंध असला तरीही ! यशस्वी मनुष्य सुखी असेलच असे नाही. # प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगेवेगेळी आहे. ढोबळमानाने पैसा,प्रतिष्ठा आणि अधिकार ( सत्ता) ही यशाची त्रिसूत्री मानली तरीही यश नेमके कशाला म्हणावे याचा गोंधळ आहेच ! कारण त्याचे परिमाण ( युनीट) व्यक्तिगणिक बदलत जाते. #मी कोठेही दैववाद / प्रयत्नवाद या वादात विधान केले नाही ! प्रयत्नवाद हा श्रेष्ठ्च आहे हे नि:संशय ! ज्याला बुद्धिनुसार कर्म आणि कर्मानुसार बुद्धी तसेच चार पुरुषार्थ या संकल्पना समजल्या आहेत, त्याचा दैववाद / प्रयत्नवाद असा गोंधळ होत नाही. # वैभव मिळवणे / श्रीमंत होणे यात काहीही गैर नाही अशीच माझी धारणा आहे . धर्म आणि मोक्षाच्या चाकोरीत संयत असलेला काम आणि अर्थ मला मान्यच आहे .. पण धर्माच्या कक्षेत राहूनच ! अधर्माने केलेली कोणतीही गोष्ट दु:खात नेणारच ! किंबहुना या चाकोरीत राहून काम - उपभोग आणि उदंड अर्थार्जन करावे म्हनून तर त्याला " पुरुषार्थ" ही संज्ञा दिली आहे ! महत्वकांक्षेशिवाय पुरुषार्थ शक्य आहे का ? पण ती राक्षसी असू नये म्हणून तर त्याला धर्माचे बंधन आहे. अर्थाच्या अभावाने गुन्हे तर प्रभावाने पापे घड्तात म्ह्णून त्यालाही धर्माचे बंधन घातले आहे. वैभवाचे वावडे नाही, अधर्माचे वावडे आहे. # ठेविले अनंते तैसेची रहावे...चित्ती असो द्यावे समाधान | हे अत्यंत उच्चकोटीची पारमार्थिक अवस्था आहे. ( च्यायला वादविवादाच्या नादात आपण पींडीला पाय लावतो आहे याहे ही भान रहात नाही लोकांना ! ) समजून घेण्याचा भाग आहे .. उदंड कर्तृत्व गाजविल्यावरही हे माझे नाही .. हे "त्याचे" आहे हा तो भाव आहे . राम कर्ता हा भाव आहे , अवघे करणे जगदिशाचे हा भाव आहे , आहे तितुके देवाचे हा तो भाव आहे .. इदं न ममं हा भाव आहे ! हे भगवंता , जे उत्तम / उदात्त / उन्नत घड्ते आहे त्यात माझे काहीही नाही ..हे सारे तुझेच आहे , तू दिलेल्या अवस्थेत मी सुखीच आहे. या यशाचे श्रेय माझे नाहीच ! सुखदु:ख समकृत्वा ..चित्ताचे समत्व / स्थितप्रज्ञता असा तो भाव आहे. जगातील सुखाची ती परमोच्च अवस्था आहे.. त्याच्या इतके सघन,अखंड,अविनाशी,पूर्ण सुख दुसरे नाही, हाच तो शेवटचा पुरुषार्थ - मोक्ष ! हे अनंत जन्माच्या प्रयत्नाने साध्य होते ते समाधान माणसाला निष़्क्रीय बनवील ? # बाकी औरंग्या भक्तांबद्दल काय बोलावे ? हाकलून दिले पाहिजे.. फक्त संस्थळावरुनच नव्हे तर महाराष्ट्रातून आणि भारतातून ! बाकी संमं सर्वधर्मसमभाव मानत असल्याने आमचाच प्रतिसाद उडवला जाईल. जयचंदाना अभयच मिळेल. अगर शिवा न होता तो सुन्न्त सबकी होती.. हे भीषण सत्य ज्यांना उमगले नाही त्यांना माझ्या कंठरवाने काय फरक पडणार आहे ? अस्तु ! माझे मुद्दे माझ्याजवळ , आपण जरुर आपलेही मत मांडावे, मी प्रतिवाद करीनच असे नाही, कारण This is something like sacred cow for me !

In reply to by विटेकर

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! पण मला वाटते की तुम्ही विचारांची प्रचंड गल्लत करत आहात. मला अभिप्रेत नसलेल्या अनेक गोष्टी तुमच्या प्रतिसादात आहेत. त्यामुळे मी सद्या त्यावर टीप्पणी करत नाही. पण माझ्या लेखाचा आणि त्यावरच्या माझ्या प्रतिसादांचा सारांश सांगतो: प्रत्येकाला आपले ध्येय काय आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे. ध्येय गाठण्यात अपयश आल्यास पुन्हा प्रयत्न न करता (किंवा अगदी पुन्हा प्रयत्न करतानाही) वरवर गोड वाटणार्‍या भ्रामक वचनांचा / कल्पनांचा आधार घेऊन सारवासारव करण्यात ती व्यक्ती स्वतःचे आणि पर्यायाने समाजाची दिशाभूल व नुकसान करत असते. शिवाय हा शुद्ध अप्रामाणिकपणा होतो. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर ध्येय भौतीक असो अथवा अधिभौतीक असो, त्याला प्रामाणिकपणाचा पाया आवश्यक असतो... याला बहुतेक तुमची ना नसावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अरे हो. आणि एक महत्वाचा प्रश्न मी तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिसादाच्या माझ्या प्रतिसादात विचारला होता, तो अजून अनुत्तरीतच आहे. मीच तो जरा अजून विशद करून सांगतो... माझ्या मते "सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल. सत्याला असत्याशी झगडल्याशिवाय विजय मिळत नाही." हे मत मान्य असले तर मग माझ्या प्रश्नातल्या उदाहराणांमध्ये दिलेल्या घटनांची नीट संगती लागेल व जुन्या चुका सुधारून योग्य कृती करता येईल. नाहितर मग भ्रामक वचनांचा आधार घेऊन व्यक्ती/समाज स्वतःला परत (नविन परिस्थितीमुळे वेगळ्या दिसणार्‍या पण तरीही) गुलामगिरीच्याच रस्त्यावर वाटचाल सुरू करेल.

विचार पटले. लेख छानच आहे.

प्रत्येक कोट हा स्थल-काल-व्यक्ती व मुख्यतः प्रसंग सापेक्ष असतो इतके लक्षात घेऊन हे कोट्स एक ललित म्हणून ऐकावे नी सोडून द्यावे. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या भुमिकांत व प्रसंगात वेगवेगळा वागतो व त्याने तसेच वागावे. कोणताही सार्वकालीन नियम व/वा तत्त्वे (व/वा कोट्स) प्रत्येक माणूस प्रत्येक प्रसंगी पाळत नाही. विचार-आचारातील विरोधाभास असणे नी त्याची जाणीव झाल्यावर त्यात (दोन्हीत) बदल करत जाणे हीच तर जगण्यातील मजाय. तेव्हा व्यक्तीला कप्प्यात टाकणे टाळावे हेच योग्य. (छ्या प्रतिसाद काहीसा वाहवत गेलाय. पण जौदे टंकलाय तर टाकतोच. एक डाव मापी असावी) लेख आवडला व सहमती आहे हे वे सां न

In reply to by ऋषिकेश

प्रत्येक कोट हा स्थल-काल-व्यक्ती व मुख्यतः प्रसंग सापेक्ष असतो इतके लक्षात घेऊन हे कोट्स एक ललित म्हणून ऐकावे नी सोडून द्यावे. मुख्य मुद्दा हा आहे की "सोडून द्यावे" हेच होत नाही. आळसाने अथवा लाजेकाजेने अयशस्वी लोक अश्या वचनांच्या मागे लपतात व स्वतःचे समाधान करून घेतात आणि चलाख लोक त्या वचनांचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात. आणि मुख्य मुद्दा हा की या सगळ्यात "कृतीची जबाबदारी घेणे (accountability)" ह्या तत्वाला हरताळ फासला जातो. त्यामुळे ही प्रवृत्ती वरवर वाटते त्यापेक्षा अनेक पटींनी धोकादायक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे मान्य आहेच. वरचा प्रतिसाद थेट लेखाला दिलेला नव्हता. लेख वाचुन मनात आलं ते उतरवलं इतकंच

>>> accountability सध्या हे चांगलंच अनुभवतोय. वरचा म्हणतो टीमवर्क आहे. मी म्हणतो वरच्यानं सांगितलं म्हणून केलं (२-३ महिने सहन करुन नंतर वरच्याच्या वरच्याला सांगून मोकळा झालो (मी पण त्यातच), सध्या पोस्टमार्टेम सुरु आहे) ज्यानं कामाला उशीर लावला तो पेपर टाकून बसलाय माझ्याकडून होत नाही म्हणून. वरचा एकाला बोलला म्हणून एकानं सगळ्यात वरच्याला मेल करुन सांगितलं की मला इथं नको दुसरीकडं बदली द्यावी. एकाला नेमकं काय चाललंय तेच कळत नाहीये. मज्जा!

In reply to by प्यारे१

तुमचे उदाहरण "अकाउंटेबिलिटी" आणि "टीम वर्क" या फार महत्वाच्या पण समजायला पाहिजे त्यांना (प्रबंधकांना) बर्‍याचदा नीट न समजलेल्या आणि म्हणून धोपट वापराने जबरदस्तीने दुरुपयोग केल्या जाणार्‍या संज्ञा / शब्द आहेत. व्यक्तीगत अकाउंटेबिलीटी नसली की काय गोंधळ होतो, त्याचा चलाख लोक कसा दुरुपयोग करू शकतात आणि शेवटी कामाचा कसा खेळखंडोबा होतो त्याचे उत्तम वर्णन खालील प्रसिद्ध गोष्टीत केलेले आहे (माझी फार आवडती गोष्ट) : There was an important job to be done and Everybody was sure that Somebody would do it. Anybody could have done it, but Nobody did it. Somebody got angry about that, because it was Everybody’s job. Everybody thought Anybody could do it, but Nobody realized that Everybody wouldn’t do it. It ended up that Everybody blamed Somebody when Nobody did what Anybody could have. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

There was an important job to be done and Everybody was sure that Somebody would do it. Anybody could have done it, but Nobody did it. Somebody got angry about that, because it was Everybody’s job. Everybody thought Anybody could do it, but Nobody realized that Everybody wouldn’t do it. It ended up that Everybody blamed Somebody when Nobody did what Anybody could have.
लय भारी :)

फक्त एका वाक्यात संपूर्ण लेख आणि सगळे प्रतिसाद निरुत्तर केलेत :
मला अगदी प्रामाणिकपणाने असे वाटते की,चारित्र्याचे स्थान आयुष्यात नेहमीच अत्यंत वरचे आहे. त्याशिवाय असणारे यश अंतोगतत्वः अपयशाच्या आणि दु:खाच्या खाईतच नेते
________________________ इक्कांनी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे लेखाची प्रेरणा, `प्रमोशन' या कथेवरचं डॉक्टर खर्‍यांच हे वाक्य आहे :
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही.
____________________________ आता कथेचाच संदर्भ घेऊन सगळी उकल कशी होते ते पाहाण्यासारखं आहे : १) मुळात प्रामाणिक माणसाला आपण अयशस्वी झालो असं कधीही वाटतं नाही. स्वतःला अपयशी समजणं हा इन्फिरिऑरिटी कॉप्लेक्स आहे आणि कंपॅरिजन हे त्याचं एकमेव कारण आहे. स्वतःशी प्रामाणिक असलेला, दुसर्‍याशी तुलना करुन स्वतःच्या यशाचं मोजमाप कधीही करत नाही. तो महत्वाकांक्षेला प्रामाणिकपणाशी तडजोडच करु देत नाही, त्यामुळे त्याची महत्वाकांक्षा सदैव त्याच्या काह्यात असते. ती त्याला कधीही ओवरपॉवर करु शकत नाही. आणि परिणामी, त्याला पश्चात्तापाची वेळ कधीही येत नाही. तो स्वतःच्या महत्वाकांक्षेपायी बायकोला पणाला लावायची बातच सोडा, कुणालाही कधीही वापरत नाही. नित्शेनं म्हटलंय : To use the other is the highest immorality. ___________________________ २) त्याचा शुद्ध हेतूच त्याला साथ देतो त्यामुळे परिणामांची तमा बाळगण्याचं कारणंच राहात नाही. जसा हेतू तशी कृती या न्यायनं त्यानं प्रत्येक प्रसंगात जवाबदारी सहज पेललेलीच असते. त्यामुळे कर्मविपाक, दैव वगैरे दिलासे त्याला लागत नाही. कामात अपयश येणं म्हणजे स्वतः अपयशी होणं अशी निर्बुद्ध कल्पनाच त्यानं केली नसल्यानं, तो परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेतो. स्वतःच चुकलं असेल तर दुरुस्त करतो, दुसरा आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर त्याच्या यशाचं कौतुक करतो. आणि दुसरा गैरमार्गानं यशस्वी झाला तर त्याला वैषम्य वाटण्याचा संबंधच येत नाही. तस्मात, त्याच्या लेखी, श्रीमंती किंवा गरीबी दैहिक किंवा मानसिक स्वास्थ्याशी रिलेट करुन, स्वतःच्या प्रामाणिकपणाला उजळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. _____________________ ३) सरते शेवटी, प्रत्येक घटनेला अनंत फॅक्टर्स कारणीभूत आहेत ही उघड गोष्ट प्रामाणिक व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते. त्यामुळे त्याला एखाद्या कृत्यातल्या अपयशाचा जसा विषाद नसतो तशी यशाची धुंदीही चढत नाही. त्याला फक्त एकच खात्री असते की आपल्या प्रामाणिकपणाचं स्वास्थ्य हे कोणत्याही लौकिक यशापयाशापेक्षा सदैव श्रेष्ठ आहे. आणि त्यासाठी त्याला कोणत्याही क्वोटची किंवा दिलासा देणार्‍या समर्थनाची यत्किंचितही गरज नसते. ______________________________ सरते शेवटी, `नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो'; याचा अर्थ लेखक समजतो तसा नाही. सत्य म्हणजे प्रामाणिकपणा. तो सदैव विजयी होतो कारण त्याचा विजय लौकिक यशावर अवलंबूनच नसतो. त्यामुळे लेखकानं निर्माण केलेली ही दुही : "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल. निरर्थक आहे. मानसिक खरेपणा हेच प्रामाणिकपणाचं दुसरं नांव आहे, त्याला पुन्हा नैतिकतेशी सांगड वगैरे घालावी लागत नाही आणि ऐहिक यशापयाशी त्याची तडजोडच होऊ शकत नाही. एका प्रामाणिकपणा पुढे बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत आणि हे समजलेला स्वतःला कधीही अपयशी मानत नाही. तस्मात, सत्याला जयापरायची क्षिती नसते. ते कायम विजयीच असतं

In reply to by संजय क्षीरसागर

वा, वा ! सर्जी, आपले धाग्यावर स्वागत आहे ! :) १) मुळात प्रामाणिक माणसाला आपण अयशस्वी झालो असं कधीही वाटतं नाही. २) त्याचा शुद्ध हेतूच त्याला साथ देतो त्यामुळे परिणामांची तमा बाळगण्याचं कारणंच राहात नाही. ३) सरते शेवटी, प्रत्येक घटनेला अनंत फॅक्टर्स कारणीभूत आहेत ही उघड गोष्ट प्रामाणिक व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते... त्यामुळे त्याला एखाद्या कृत्यातल्या अपयशाचा जसा विषाद नसतो तशी यशाची धुंदीही चढत नाही. वरच्या विधानांत तुम्ही "प्रामाणिक माणूस" आणि "स्थितप्रज्ञ माणूस" या दोघांत प्रचंड गल्लत करत आहात. त्यातच वर हायलाईट केलेल्या भागात तुम्ही प्रामाणिक माणूस परिणामांबद्दल निष्काळजी (ज्याला कधी कधी आपण बेजबाबदार असेही म्हणू शकतो) असतो असाही दावा तुम्ही करताय, त्यात भर म्हणून... ३) सरते शेवटी, प्रत्येक घटनेला अनंत फॅक्टर्स कारणीभूत आहेत ही उघड गोष्ट प्रामाणिक व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते... त्यामुळे त्याला एखाद्या कृत्यातल्या अपयशाचा जसा विषाद नसतो तशी यशाची धुंदीही चढत नाही. यातल्या हायलाईट केलेल्या भागामुळे "प्रामाणिक माणूस" आणि "सर्वज्ञानी माणूस" या दोघांत प्रचंड गल्लत करत आहात तुमचा प्रतिसाद वाचून एकच सांगावेसे वाटते : माझ्या अल्पमतीने लिहीलेल्या या लेखाचा मतितार्थ थोडक्यात आणि सहज समजेल अश्या सोप्या शब्दात याच लेखावरील या प्रतिसादात सांगितला आहे. तो तुम्ही वाचायची आवश्यकता आहे असे वाटते. लेख आणि प्रतिसादातले सर्व शब्द त्यांचे सर्वमान्य (शब्दकोषातले) अर्थ लक्षात ठेवून वापरले आहेत. नो प्रायव्हेट मिनिंग्ज अँड नो प्रायव्हेट लॉजिक, यु नो ! (तुम्हाला मधून मधून इंग्लिश लिहीणे आवडते, म्हणून हे शेवटचे वाक्य खास तुमच्यासाठी ! आप भी क्या याद करोंगे, सर्जी !) *** बाकी तुमचे नेहमीचे "प्रायव्हेट लॉजिक" आणि "दुसर्‍याने न सांगितलेले विचार स्वतः कल्पून त्याच्यावर थोपायची पद्धत" हे दोन्हीही आतापर्यंंत चागले माहित झाल्यामुळे तुमच्या इतर "इमॅजिन्ड/काँकॉक्टेड अ‍ॅलिगेशन्स" कडे दुर्लक्ष करत आहे... आण्भवाचं श्यान्पन, दुसरं काय ? :) . *** (मात्र, हा माझ्या धाग्याचा टीआरपी वाढविण्याचा तुमचा छुपा प्रयत्न आहे की काय ? आणि तसे असल्यास त्याबद्दल धन्यवाद द्यावे काय ? असे विचार मात्र जरूर मनात येउन गेले आहेत, हे नम्रपणे नमूद करत आहे :) =)) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ध्येय भौतीक असो अथवा अधिभौतीक असो, त्याला प्रामाणिकपणाचा पाया आवश्यक असतो.
यावर दुमत कुठेयं? मतभेद इथे आहे :
"सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल. सत्याला असत्याशी झगडल्याशिवाय विजय मिळत नाही."
तुमच्या लेखी सत्याला (म्हणजे प्रामाणिकापणाला) असत्याशी (अप्रामाणिकपणाशी) झगडा करुन `विजय' मिळवावा लागतो. आणि मी म्हणतो, प्रामाणिक माणसाला अप्रमाणिकतेशी झगडा करण्याची आवश्यकताच नाही. अप्राणिक माणूस स्वतःच्या मनातल्या अंतर्द्वंदामुळे (सुरुवातीपासून आणि) नेहमी, पराभूतच असतो. मग लौकीकार्थानं तो कितीही यशस्वी असो आणि दुनियेला वरुन काहीही दाखवो. आणि प्रामाणिकपणा इतका सर्वोच्च आहे की त्याला अप्रामाणिकतेचा पराभव करण्याची गरजच नसते, मग लौकिकार्थानं तो कितीही अपयशी असो. _________________________________ "सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल...." सत्य (म्हणजे प्रामाणिकपणा) `योगायोगानं विजयी' होत नाही. प्रामाणिक असणं हाच विजय आहे. तो स्वत्वाचा इतका मोठा गौरव आहे की अशी व्यक्ती अंगचोरपणा किंवा लौकिक यशापयश इतक्या शुल्लक गोष्टींचा कधीही विचार करत नाही. __________________________ लौकिकात काहीही करुन यशस्वी झालं पाहिजे या महत्वाकांक्षेपायी (जी निवाळ इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा, पाश्चिमात्यांशी तुलना केल्याचा परिणाम आहे), भारताची मानसिकताच भ्रष्ट झालीये. भारतीय मानसिकतेनं स्वतःचा प्रामाणिकपणा गमावलायं. प्रामाणिकपणा, आपल्याच मौलिक विचारधारेशी फारकत घेऊन येत नाही तर, प्रामाणिकपणा हा सदैव विजयी आहे या नि:संशय विश्वासातून येतो. सत्याचा विजय योगायोगानं कधीही होत नाही, असत्य कायम पराभूत आहे आणि असत्याच्या पराभूत असण्यातच सत्याचा विजय आहे. त्यासाठी सत्याला, असत्याशी झगडण्याची आवश्यकताच नाही! (संपादित)