Skip to main content

भक्तीमार्गातील अडथळे.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 01/09/2014 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी जन्माष्टमी झाली. जन्माष्टमीच्या आधी झी-२४ तास वर अत्यंत उद्बोधक चर्चा (रोखठोक) ऐकायला मिळाली. गेल्या जन्माष्टमीला मानवी मनोरा कोसळून, खालच्याच थरावर असलेला, एकजण जबर जखमी झाला होता. मानेला दुखापत झाल्याने कमरेखाली लुळा पडला होता. ६ महिन्यांच्या उपचारांनंतर कुबड्याघेऊन चालण्याइतपत परिस्थिती सुधारली तरीपण कोणाच्या आधाराविना जगू शकत नाही. २० वर्षाचा मुलगा त्याच्या पुढे डोंगराएव्हढे आयुष्य आहे. चर्चेत तो आणि त्याची आई आले होते. त्याच्या आईला एकंदर प्रकाराबद्दल मत विचारले असता ती म्हणाली, 'ह्याच्या आयुष्याची वाट लागली आहे. मी जिवंत असे पर्यंत करीन ह्याचे सर्व काही पण माझ्या पश्चात काय? आम्हाला सरकारने मदत करावी.' म्हणजे त्या बाईलाही घटनेचे भांडवल करून सरकारकडून आर्थिक मदत हवी होती. पण 'हा प्रकार अयोग्य आहे. एखाद्या तरुणाच्या जीवाशी खेळ होतो आहे, तेंव्हा हे ताबडतोब थांबवा' अशी आर्त हाक तिच्या शब्दांमध्ये कुठेही नव्हती. कदाचित ती अशिक्षित असेल आणि एव्हढा व्यापक दृष्टीकोन तिच्याजवळ नसेल तरीही, प्रसंगाचे गांभिर्य कुठेही कमी होत नाही. दरवर्षी जन्माष्टमी येते, वाहिन्या तथाकथित 'सकारात्मक' चर्चा घडवून आणतात. पुन्हा जन्माष्टमीच्या दिवशी आख्ख्या दिवसाचे चित्रिकरण आणि सादरी करण आपल्या वाहिनीवर दाखवून 'गोविंदांचा जल्लोष' मोठ्या कौतुकाने दाखवितात, सेलीब्रेटीज हजेरी लावून, राजकारण्यांच्या खांद्याला खांदा लावून (की राजकारणी ह्या सेलीब्रेटीज च्या खांद्याला खांदा लावायला उत्सुक असतात कोण जाणे...) प्रसिद्धी वलयात राहण्याचा, वलय वाढविण्याचा प्रयत्न करतात, गोविंदांच्या दिशेने चुंबने फेकतात, तमाशा नृत्य, अंगविक्षेप करून गोविंदांना आणि उपस्थित जनसागराला चेकाळवतात. सेलीब्रेटीज आणि राजकारणी, 'स्वतःच्या जीवाला सांभाळून खेळा' असा, सिगरेटच्या पाकिटांवर असलेल्या 'तंबाखू सेवनाने कॅन्सरसारखे प्राणघातक रोग होऊ शकतात' ह्या कुणावरही सकारात्मक परिणाम होणार नाही पण आपल्याला मात्र एक नैतिक कार्य 'उरकल्याचे' श्रेय मिळेल अशा वाक्यासारखे वाक्य फेकून स्वतःची एक 'खेळी' खेळतात. पण सिगरेटवर जशी कायमस्वरूपी बंदीची मागणी कोणी करीत नाही तशीच गोविंदा ह्या खेळात शिरलेल्या प्राणघातक प्रथांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. ह्या वर्षी १ मृत्यू आणि ५७ जखमी (त्यातले कांही गंभीर) अशी मी ऐकलेली शेवटची बातमी. होऊदे मृत्यू आणि जखमी. त्याहून जास्त तर रस्त्यावरच्या अपघातातही होतात. त्याचं काय एव्हढं? त्या विषयावर किती चर्चा करणार? आता पुढच्या वर्षी पुन्हा जन्माष्टमी येईल तेंव्हा बघू. सेलीब्रेटीज, राजकारणी आणि वाहिन्यांनी जे कांही कमवायचे ते कमवून घेतले आहे. आता गणेशोत्सव. मागे वळून पाहू नका. लालबागचा गणपती मोठा की जीएसबी गणपती मोठा, गेल्यावर्षी दानपेटीत किती रक्कम जमा झाली, किती सोने-नाणे आले त्यापेक्षा जास्त ह्या वर्षी यायला हवे. मग काय? जाहिरात करा, दूरदर्शनवर चर्चा घडवा, लालबागचाच राजा(?) कोणाला कसा पावला ह्याच्या बातम्या पसरवा, गेल्या २५-३० वर्षात किंवा 'वयाच्या तिसर्‍या वर्षापासून आज ६५ वर्षांचा होई पर्यंत लालबागच्या गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या दर्शनात कधी एकदाही खंड पडू दिला नाही' वगैरे शेखी मिरविणार्‍यांना शोधून काढा, त्यांच्या मुलाखती घ्या, ज्यांना अनेक वर्षे (प्रयत्न करूनही) मूल होत नव्हतं त्यांना 'बाप्पाच्या' नुसत्या दर्शनानेही कसे विनासायास मूल झाले अशांना पुढे आणा. त्यांच्या भक्तीचे गोडवे गा. एखाद्याला कांही नको असेल, पण राजाच्या नुसत्या दर्शनानेही विचलीत मन शांत होऊन अगम्य आनंद प्राप्त होत असेल त्यांनाही येऊ द्या. काहीही करा पण लालबागच्या, जीएसबीच्या, कोळीवाड्याच्या गणेशोत्सवाला विराट स्वरूप प्राप्त झालं पाहिजे. आमदनी वाढली पाहिजे. महिलांना धक्काबुक्की झाली तरी चालेल (त्याच महिला पुन्हा पुढच्या वर्षी येतीलच), गर्दीत चेंगराचेंगरी झाली तरी चालेल. सेलीब्रेटीज आणि राजकारण्यांना मात्र वेगळी वागणूक द्या. देवाच्या चरणी सगळे सारखे असतात हा जुना बुरसटलेला विचार झाला. आता तसे करून नाही चालत. राजकारण्यांना, सेलिब्रेटीजनां जर 'खास', इतरेजनांपेक्षा वेगळी, प्राधान्यक्रमाची वागणूक मिळाली तरच ते दरवर्षी हजेरी लावतील आणि त्यावरच आपल्या मंडळाची, आपल्या गणपतीची प्रसिद्धी अवलंबून असते. आणि प्रसिद्धीवरच पैसा अवलंबून असतो. व्यापार.. व्यापार वाढवलाच पाहिजे. भक्तीमार्गात मोक्ष असेल नसेल पण पैसा मात्र भरघोस आहे. गणपती सरता सरता नव्या तयारीला लागा.. नवरात्र येते आहे. गरबा देवीचा उत्सव. जोरजोरात बँड-डिजे, पुन्हा सेलीब्रेटीज, पुन्हा तरूणाईचा जल्लोष, तोच उन्माद, स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील धूसर सीमारेखा. गर्भनिरोधक गोळ्यांची आकाशाला भिडणारी विक्री, मुलींवरून, अगदी चाकू-सुरे आणि लाठ्या काठ्या घेऊन, होणार्‍या मारामार्‍या, एकमेकांची डो़की फोडणं..... भक्तगणाची भक्ती कुठे गेली?........अंबे माता की जय. ह्या काळात नवजात अर्भकं, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती आणि अभ्यास करू इच्छिणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी ह्यांना त्रास झाला म्हणून काय झालं? त्यांनी थोडं सहन केलं तर काय हरकत आहे? समाजाच्या भक्तीमार्गाआड, धर्माआड कसे येऊ शकतात कोणी? आमचे उत्सव साजरे करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. धर्मावर होणारे अत्याचार आम्ही सहन करणार नाही. कांही अस्मिता वगैरे आहे की नाही? हे सणवार संपले तर पदयात्रा आहेत. १२-१२, १५-१५ हजारांच्या संख्येने सहभागी होऊन दोनअडिचशे किलोमिटर्सच्या पदयात्रा करायच्या. रस्त्यावरच्या वाहनचालकांना त्रास, जिथे जिथे म्हणून विश्रांतीचे पडाव असतील तिथे तिथे खाण्यापिण्याच्या वस्तूंचा, प्लॅस्टिकच्या पेल्यांचा कचरा, त्या त्या गावच्या नदी काठी एव्हढ्या मोठ्या संख्येने आघोळी, मल-मूत्र विसर्जन करून तिथली स्वच्छ नदी प्रदुषित करायची. त्या गावात कोणी त्या नदीचे पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी वापरत असेल. तान्ह्या बाळांना पाजत असेल. असेना का. मला पदयात्रेचे पुण्य मिळतय नं, मग झालं तर. मी तर दरवर्षी जातो. भरपूर पुण्य, मनःशांती, आत्मबळ वगैरे वगैरे कमवितो. पाप म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? हे प्रश्न आपण स्वतःच स्वतःला विचारले पाहिजेत. त्याचे उत्तर शोधले पाहिजे. 'वैष्णव जन तो तेणें कहिए जे पीर पराई जाणे रे' हे आपण का स्विकारू इच्छित नाही? त्यात कसली पिडा? माझी देवावर श्रद्धा आहे आणि जोपासण्याचा मला हक्क आहे. हा 'मी आणि माझ्या' पलीकडे न जाणारा विचारच समाजात दुभंग निर्माण करतो आहे. देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी ह्या विचारांमधील गोडवा, सहजता आणि सत्यता का आपल्याला भावत नाही? आपण तसे आचरण का करीत नाही ह्यावर आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे. 'देव भावाचा भुकेला' असे आपण म्हणतो पण तो 'भाव'च हरवून बसलो आहोत हे भीषण सत्य आपण केव्हा स्विकारणार? आपल्यातली ही कमतरता दूर करून, कर्मकांडांपेक्षा मनाने इश्वरचरणी केंव्हा रुजू होणार? फकीराचे जीवन जगलेल्या, लोकांना ज्ञानाचा प्रकाश देणार्‍या साईबाबांना आपण चांदीच्या सिंहासनावर बसवून आणि सोन्याचा मुकुट घालून सामान्य माणसाप्रमाणे ऐहिक सुखाच्या कल्पनांच्या जोखडात अडकवतो आहोत हे आपल्या लक्षातच येत नाही. बुद्धीची देवता गणपती तिलाही आपण सोन्या-रुप्यात तोलतो. सिद्धीविनायकाला सोन्याचा मुलामा दिलेल्या कळसात आपण 'देवालय' शोधतो. देवाचे देवत्व विसरून, विश्वाचे निर्माण करणार्‍या त्या परमात्म्याला, पैसाअडका, सोनं-नाणं देऊन आपापल्या इच्छापूर्तीसाठी माणूस साकडे घालू लागला. ऐहिक उपभोगाची ही साधनं देवाला नको असतात. श्रीमंत देवालयं(?) त्यांच्या कडे जमा होणार्‍या पुंजीतून समाजकार्य करतात ह्यावरही माझा विश्वास नाही. आणि तो नसण्याचं कारण कानावर येणार्‍या देवालयातील भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या. अनेक देवालयांच्या बेहिशोबाच्या कथा पेपरमधून येत असतात. विश्वस्तपदावर वर्णी लागावी म्हणून अनेक राजकारणी धडपडत असतात. हे देवालय तुमचं तर ते देवालय आमचं अशी वाटणी असल्याचेही ऐकले आहे. ते कांही भक्तीभावने भारलेले नसतात. तुम्हाला समाजकार्यच करायचं असेल तर थेट करा नं. देवालयाच्या मार्फत कशाकरता? हे म्हणजे, एखाद्या भिकार्‍याला थेट पैसे देण्याऐवजी रस्त्याने जाणार्‍या कुणा अनोळखी माणसाला पैसे देऊन सांगायचं, 'तुम्हाला जमेल तेंव्हा एखाद्या भिकार्‍याला हे पैसे द्या.' अशा, समाजकार्याच्या, बेगडी समाधानामागे आपण धावतो आहोत. त्यापेक्षा बाबा आमटेंच्या आश्रमाला पैसे पाठवा, वनवासी फंडात पैसे पाठवा, भाऊबिज फंडात पैसे पाठवा, एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा भार उचला, कुणा गरीब वृद्धाच्या आजारपणात औषधे पुरवा. भरपूर मार्ग आहेत. तुम्ही स्वतः हे करू शकता. पुस्तकं दान करू शकता, तुमचे वापरलेले कपडे, तुम्हाला नको असलेल्या वस्तू गरीबांना दान करू शकता. श्रीमंत देवालयांना आणि त्यांच्या विश्वस्तांना अधिकाधिक श्रीमंत करण्यापलीकडे तुमची मदत पोहोचत नाही. सत्ता आणि त्या पाठोपाठ येणार्‍या पैशाच्या माजातून काळ्या मिळकतीचे असे अनेक मार्ग त्यांनी शोधून काढले आहेत आणि आपण त्यांच्या ह्या कृष्णकृत्याला हातभार लावत आहोत. त्यापेक्षा जो गरजवंत आहे अशाला थेट मदत करा. कपडा, अन्न, धन कसलंही दान करा पण थेट करा. नाहितर तेच होत राहणार भक्तीमार्गातले दलाल श्रीमंत होत राहणार आणि गरजू कायम वंचित राहणार.... जिस दर्गाह की मजार पर सेंकडो चादरे चढती रही है। उसी दर्गाह का दरबान, सुना है, कल ठंड से मर गया। हे जीवघेणं सत्यच आपल्या मनाला डाचत नाही तो पर्यंत आपल्यात बदल अशक्य आहे. मी माझ्या पत्नीसह अनेकदा पुण्यातल्या दशभुजा गणपतीला, भवानी माता मंदिरात जातो. तिचाही कर्मकांडावर जास्त भर असतो. तिलाही मी अनेकदा सांगत असतो पण अजून कांही परिणाम झालेला मला दिसत नाही. दशभुजा गणपती मंदीरात अनेक भक्तगण येत असतात. बाहेरच्या विकलांग, वृद्ध भिकार्‍यांना शिताफीने टाळून मंदिरात जातात. दहा रुपयाचा नारळ, हार फुलं, उदबत्या वगैरे वगैरे तिथल्या पाषाणाच्या मूर्ती समोर ठेवतात. पण बाहेरच्या भिकार्‍यांना दहातले दोनच भक्त चार-आठ आणे देताना दिसतात. बाकीचे सर्व तोंडाने कांही स्तोत्र पुटपुटत भिकार्‍यांना टाळून निघून जातात. धडधाकट भिकार्‍यांना तर मीही मदत करीत नाही. पण जे वृद्ध, विकलांग आहेत त्यांना आवर्जून मदत करतो. त्यांना कांही पैसे, खाणे मिळाले नाही तर ते लवकरच मरून जातील. अर्थात भीक मागणे हा ही एक 'व्यवसाय' होतो आहे. तो विषय वेगळा आहे. राजस्थानातील कांही देवळांमध्ये देवाच्या माथी दूध ओतले जाते. दिवसभरात हजारो लिटर्स दूध वाया जात असते. आणि हे अनेक वर्षे चालू आहे. मला दूरचित्रवाणीवर दिसणारी कुपोषीत बालकांची, छातीच्या पिंजर्‍यावर नुसतेच कातडे ओढून बसविल्यासारखी चित्र डोळ्यासमोर येतात. वाईट वाटतं. चांगली साक्षर माणसं (त्यांना सुशिक्षित म्हणवत नाही) श्रद्धेच्या नांवाखाली अंधश्रद्धा जोपासताना दिसतात. आपल्या समाजाचं हे अंधश्रद्ध चित्र मला फार विचलीत करतं. खरंच, आपण कधीच बदलणार नाही का? आपल्या अंधश्रद्धेवरंच राजकारण्यांचं, व्यापार्‍यांचं, दलालांचं दुकान चालतं आहे. आपल्या अंधश्रद्धेलाच 'श्रद्धे' चं 'भक्तीमार्गाचं' लेबल लावून आपल्या भावना कुरुवाळणं हा त्यांच्या 'दुकानदारी'चाच भाग आहे. आपण सुशिक्षितांनी त्यांच्या ह्या चालीला, खेळीला बळी न पडता वाटचाल करावी, अशिक्षितांना ह्या चक्रव्युहातून ओढून बाहेर काढावं हे आपलं प्रत्येकाचेच राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हंटल्यास गैर होणार नाही. मी नास्तिक आहे का? मी अश्रद्ध आहे का? ह्या प्रश्नांचे उत्तर मी ठामपणे 'नाही' असे देऊ शकतो. श्रद्धा असावी. इश्वराचे अस्तित्व स्विकारणे किंवा नाकारणे हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. मी त्याचा नक्कीच आदर करतो. पण कर्मकांडांचा अतिरेक नसावा. प्रत्येक कृती ही मनःचक्षु उघडे ठेवून करावी. प्रत्येक गोष्ट तार्किक कसोटीवर पडताळून पाहावी. आपली ईश्वरसेवा आपल्या घरापुरतीच बंदिस्त असावी. बाकी जमेल तशी समाजसेवा करावी. मुंबईत साजर्‍या होणार्‍या आंबेडकर जयंतीला आपण, 'आंबेडकरी' जनता शहरात घाण कचरा पसरवते म्हणून नांवे ठेवतो आणि आषाढीला वारीला मात्र न चुकता हजेरी लावतो. मुसलमानांच्या रस्त्यावरच्या नमाजाला, ध्वनीक्षेपकांना विरोध करतो पण गणेशोत्सव, नवरात्र, जन्माष्टमी आदी मोठ्या हिरीरीने उत्सवात साजरे करतो. आपल्या पदयात्रांप्रमाणे इतर सर्व धर्मियांनी, जाती-जमातींनी त्यांच्या त्यांच्या चालीरिती पाळायच्या ठरवल्या तर आपल्या देशात एव्हढे विविध धर्म, जाती, जमाती आहेत की वर्षभर रस्त्यांवर फक्त पदयात्रा करणारेच दिसतील. रस्ते, महामार्ग वाहनांसाठी बंद करावे लागतील. की इतरांनी त्यांच्या धर्माचे, चालीरितींचे पालन करू नये? ही मुभा फक्त माझ्याच धर्माला असावी का? शिर्डीच्या वाटेवर कफनी, चिमटा, चिलिम बाळगणारे सर्वच साईबाबा असतात का? उत्तरेत तर अनेक साधूंच्या जथ्थ्यात कित्येक गुन्हेगार, गांजेकस, भोंदू माणसांचा भरणा असतो. कोणावर विश्वास ठेवावा? मला वाटतं फक्त स्वतःवर ठेवावा, स्वतःच्या विचारशक्तीवर ठेवावा. माझं एव्हढंच म्हणणं आहे श्रद्धा जरूर बाळगा, भक्तीमार्गावर वाटचाल करा पण कर्मकांडांचा अतिरेक करू नका. तुमच्या भक्तीभावनेचा कोणी गैरफायदा घेईल, इतरांना थेट किंवा अप्रत्यक्ष त्रास होईल असे वागू नका. भक्तीमार्गावरील हे सर्व काटेकुटे टाळून मार्गक्रमणा करा. देवाला कुठे बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात त्याची स्थापना करा. चराचरात ईश्वर आहे. त्याचा सन्मान करा. तुम्ही उपासतापास, साधना, नैवेद्य, देवालयांना दान नाही केले तरी तुम्हाला देवाच्या मनांत स्थान प्राप्त होईल. देव भावाचा भुकेला आहे. पैशांचा नाही. -oOo-

वाचने 76388
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

काहीसा असहमत. कर्मकाडांत एखाद्याला आनंद मिळतोच. जसे आमचे काही मित्र मोप दारू पितात, मी जराही पीत नाही परंतु बसणे या कर्मकांडात जो काही आनंद असतो तो घ्यावासा वाटतो. बाकी राहीला प्रश्न दशभुजा गणपती बाहेरच्या भिकार्‍यांचा, तर इतकेच म्हणतो ते भिकारी गरीब नाहीत. त्यांच्या देखील पाळ्या ठरलेल्या असतात. आणि तेही बख्खळ पैसा बाळगून असतात. आणि माझे स्पष्ट मत असे आहे की जर कष्ट करायची तयारी असेल तर कोणावरही भिक मागायची वेळ येत नाही. एक मुलांनी टाकून दिलेला वेड लागलेला म्हातारा आमच्या गल्लीत राहतो. लोक विषेशतः दुकानदार, छोटे हॉटेलवाले त्याला काहीतरी काम सांगतात तो ते करतो (म्हणजे कचरा टाकणे वगैरे ). त्याबद्दल ते त्याला रोज जेऊखाऊ घालतात. म्हणजे कोण ना कोणतरी. त्याला आजवर मी बडबड करताना, शिवीगाळ करताना पाहीले आहे पण भिक मागताना नाही पाहीले. बस्स इतकेच.

सल्लारुपी सुंदर लेख पटला . काही मुद्दे .. १ ) अश्या समारंभ ( इव्हेन्ट ) ला वाढत असलेली गर्दी आणि लोकप्रियता ही, विषेशतः तरुणाईची ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. २ ) स्टार माझा सारखं चॅनेल " बाप्पा माझा " हा विषेश कार्यक्रम लावते दरवर्षी , मी एकदा मेघराज पाटील ( कन्टेट एडिटर ) यांच्याशी बोलताना सहज या प्रकारावर भाष्य केले होते. त्या वेळी त्यांनी वापरलेले वाक्य " अश्या ठेवणीतल्या (आजचा सवाल सकट) टिआरपीजन्य कार्यक्रमांना मी एकटा वा चॅनेल जबाबदार नाही, आकडे बघतो आम्ही टिआरपीचे , महाभयानक वाढ झालेली असते, ते किळसवाणे आणि हिडीस असले तरी लोकं रिपीट देखील बघतात, तोच एखादा कृषी - विषयक, जन जागृती विषयक मात्र कोणी बघत नाही, दाभोळकारांविषयी एकुण ११ एपिसोड तयार केले होते, दुसर्‍या भागातच गच्छंती लागली टिआरपी ला !! " ..आपल तर तोंड बंद ...... ३ ) खरच समाजमन बदललयं की सेलीब्रेशन ची पध्दत हेच मुळात कळत नाही, याच मिपावर " प्या बिनधास्त मुंजीला " पासुन ते " साकी शराब पिने दे मस्जिद मैं बैठकर " इथवर झालयं, हे तर केवळ आभासी आंतरजालीय जग, प्रॅक्टीकली मात्र " विचार करा, पुण्याच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये एका माडंवात एक गणपती ठेवला आहे, संगीत नाही की आरास नाही, चार टवाळके दिसणारे नाहीत, आजुबाजुला गर्दी नाही.काय म्हणाल ? अरे इथे मंडळाच कोणीतरी गेलेले दिसतय, गर्दीत अश्या ठिकाणी पाय धजत नाहीत, वाटत काही तरी मिसींग आहे " हे वाक्य माझ्या हाफिसात बसलेल्या शेजारणीचे आहे. सवय झाली असावी. मुंबईत साजर्‍या होणार्‍या आंबेडकर जयंतीला आपण, 'आंबेडकरी' जनता शहरात घाण कचरा पसरवते म्हणून नांवे ठेवतो आणि आषाढीला वारीला मात्र न चुकता हजेरी लावतो. मुसलमानांच्या रस्त्यावरच्या नमाजाला, ध्वनीक्षेपकांना विरोध करतो पण गणेशोत्सव, नवरात्र, जन्माष्टमी आदी मोठ्या हिरीरीने उत्सवात साजरे करतो. आपल्या पदयात्रांप्रमाणे इतर सर्व धर्मियांनी, जाती-जमातींनी त्यांच्या त्यांच्या चालीरिती पाळायच्या ठरवल्या तर आपल्या देशात एव्हढे विविध धर्म, जाती, जमाती आहेत की वर्षभर रस्त्यांवर फक्त पदयात्रा करणारेच दिसतील. रस्ते, महामार्ग वाहनांसाठी बंद करावे लागतील. की इतरांनी त्यांच्या धर्माचे, चालीरितींचे पालन करू नये? ही मुभा फक्त माझ्याच धर्माला असावी का? शिर्डीच्या वाटेवर कफनी, चिमटा, चिलिम बाळगणारे सर्वच साईबाबा असतात का? उत्तरेत तर अनेक साधूंच्या जथ्थ्यात कित्येक गुन्हेगार, गांजेकस, भोंदू माणसांचा भरणा असतो. कोणावर विश्वास ठेवावा? मला वाटतं फक्त स्वतःवर ठेवावा, स्वतःच्या विचारशक्तीवर ठेवावा. >>> या वाक्यासाठी टाळ्या !!

ह्या उत्सवाच्या निमित्ताने हे दिसुन येत की समाज पूर्ण पणे दोन गटात विभागला गेला आहे. हे जास्त धोकादायक आहे. अतिशय अल्पसंख्य असलेले ( कदाचित ५% ) लोक, ज्यांना हे जे काही उत्सवाच्या निमित्ताने चालू आहे त्याची शिसारी आली आहे. आणि दुसरा ९५% समाज हेच उत्सव Enjoy करतो आहे. हा जो ५% वाला गट आहे तो उरलेल्या ९५% टक्क्यांकडे तुछ्छतेने बघतो आहे आणि ९५% वाला समाज कसा तुम्हा ५% वाल्यांना त्रास दिला असा असुरी आनंद उपभोगतो आहे. गम्मत अशी आहे की हे ५% जे हिंदू उत्सवांना नावे ठेवत आहेत, त्या पैकी ८०-९० टक्के बीजेपी चे मतदार आहेत. माझ्या लहानपणी हे दोन समाजाचे तट बर्‍यापैकी एकत्र होते. तत्वविहीन राजकारण जे ८० सालापासुन आणि काही लोकांपासुन सुरु झाले तेंव्हा पासुन हे दोन समाज दुर होत गेले.

कोणावर विश्वास ठेवावा? मला वाटतं फक्त स्वतःवर ठेवावा, स्वतःच्या विचारशक्तीवर ठेवावा.
अगदी, अगदी!!! मस्त लेख झालाय काका! अगदी मनापासून लिहिलाय हे जाणवतय!

बहुतांश मिपाकर लेखाशी सहमत असल्याचे पाहून छान वाटलं.. आपल्या सारखे समविचारी आपल्या आसपास आहेत हे बघून उभारी येते.. पण आपण एवढे सगळे सहमत असूनही उत्सवांचे बाजारीकरण चालू असतेच आणि ते वाढत जाणारच. हा देव, भक्ती, धर्म, संस्कृती चा व्यापार न व्हावा म्हणून आपण काही करू शकतो का? मी मझ्या परीने जे करू शकतो ते करतो - म्हणजे कुठ्ल्याही 'राजा' च्या दर्शनासाठी जात नाही जेणे करून
देवाच्या 'दलालांना' त्यांच्या दुष्कृत्यात बळ देऊ नका
हे पेठकर काकांचे म्हणणे सार्थ होईल.. पण मुळात या दलालांना दुष्कृत्य करण्याचेच बळ येऊ नये म्हणून काही करता येईल का? मिपाकरांची ताकद एकवटून काही होऊ शकेल काय? या निमित्ताने कुणा थोराचे एक वाक्य आठवले -- The world suffers not because of the violence of bad people, but because of the Silence of good people.. विचार करण्याजोगे..

In reply to by निखळानंद

प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करावी. आपण स्वतः बदलावे. मुलांवर योग्य ते संस्कार करावे. देवाची भिती घालू नये. इश्वरसेवेचा खरा अर्थ समजावून द्यावा. कर्मकांडाचे महत्व बिंबवू नये. सद्वर्तनाचे महत्व वाढीस लागेल असे पाहावे. स्तोत्र, आरत्या ह्यांचे महत्त्व त्यातील उच्चारांना अधोरेखित करून जीभेला वळण लावणे, श्वासावर नियंत्रण आणि स्पष्टोच्चार एवढेच असो द्यावे. देवाचे केल्याने परिक्षेत चांगले मार्क मिळतील, देव पाठीशी आहे तो सर्व संकटातून तारून नेईल वगैरे वगैरे भ्रामक विचारसरणी मुलांच्या गळी उतरवू नये. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या दोन महत्वाच्या बाबींचे महत्त मुलांच्या मनावर बिंबवावे. 'देवाला कांहीतरी 'देऊन' स्वतःसाठी कांही 'मिळवावे'' ह्या विचारांपासून स्वतःला आणि मुलांना अलिप्त ठेवावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यापेक्षा स्वतःपासून करावी! देव पाठीशी आहे तो सर्व संकटातून तारून नेईल वगैरे वगैरे भ्रामक विचारसरणीतून मुक्त व्हावे. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या दोन गोष्टींना पर्याय नाही असा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन राखावा. 'देवाला कांहीतरी 'देऊन' स्वतःसाठी कांही 'मिळवावे'' ह्या विचारांपासून दूर होऊन, देव ही निव्वळ कल्पना आहे ही साधी गोष्ट लक्षात घ्यावी! आयला, पेठकर तुम्ही लिहीलंय म्हणून बरं, माझी पोस्ट असती तर, व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी, जनश्रद्धांना दुखावणे आणि (सरते शेवटी), स्वतःला कोण समजता? या वळवणावर गेली असती. मुद्दा तोच आहे पण सगळं श्रेय तुमच्या मांडणीला आहे. या लेखानं का होईना प्रबोधन झालं तर आनंद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी साहेब दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच पण ज्यांचे प्रबोधन व्हायला पाहिजे ते लोक असे लेख वाचतच नाहीत. आता काय करावे? खर तर असे लेख व्हाटस एप्प किंवा तत्सम सार्वजनिक न्यासावर पाठवले पाहिजेत म्हणजे ते वाचणार्यापैकी १ % लोकांनी बोध घेतला तर बरे. नाहीतर तेथेही रोज सकाळ दुपार संध्याकाळ लालबागचा राजा किंवा साईबाबा यांचे दर्शन होत असतेच.

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब, >>>>>दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच.... मिपा वाचकांना माझे मुद्दे पटले असतील तर ते 'दुर्दैवं' आहे? मी म्हणेन 'सुदैवाने' मुद्दे पटले आहेत. अगदी इथेही १ टक्का वाचकांच्या विचारसरणीत बदल झाला आणि ते खर्‍या अर्थाने भक्तीमार्गावर आले तरी भरून पावलो.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यांना बहुतेक असं म्हणायचं आहे... >>>...दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच पण दुर्दैवाने ज्यांचे प्रबोधन व्हायला पाहिजे ते लोक असे लेख वाचतच नाहीत. आता काय करावे?>>> (असा माझा अंदाज आहे) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पेठकर साहेब क्षमस्व एक्का साहेब धन्यवाद आपल्या खुलाश्याप्रमाणेच मला लिहायचे होते. चुकून एक शब्द इकडचा तिकडे झाला

या सगळ्या तमाशाला एक महत्वाचं कारण म्हणजे माणसाला जीवनाचं सौंदर्य उमगतच नाहि. त्यामुळे आपण त्या सौंदर्याला धक्का लावतोय, ते पायदळी तुडवतोय याची जाणिवच नसते. आणि जिथे सौंदर्यच आकर्षीत करत नाहि तिथे त्या सौंदर्याला अभिव्यक्त करणारी सृष्टीची, समाजाची प्रचंड मशीनरी कशी लक्षात येईल... एव्हढं मस्तं जीवन लाभलय, धडधाकट शरीर आहे, कल्पना करता येणार नाहि इतक्या प्रचंड शक्तीचं भंडार असं मन आहे, आकाशगंगेपासुन ते पार अणुरेणुची चीरफाड करु शकणारी धारदार बुद्धी आहे, दशदिशांना उजळुन टाकणारा विवेकाचा प्रकाश आहे... आणि निव्वळ अत्यर्क अशी कर्मशक्ती-इच्छाशक्ती आहे... हे सगळं दिलं सोडुन, आणि आपल्याला नेमकं काय-कसं-किती हवं याचा काहिही-कसलाही विचार न करता काहितरी 'फिक्स' करुन आपल्या समस्या ( ज्या ९९ टक्के खोट्या असतात )सोडवल्या जाव्यात म्हणुन गोट्या खेळण्याचे हे प्रकार वैचारीक दिवाळखोरी न आणतील तर आणखी काय. लेखातली उदाहरणं निदान दृष्य वैगुण्य तरी दाखवतात. कोरेगावपार्कातल्या हाय-फाय साधुबाबांच्या आणि त्यांच्या प्रवचनाने सिद्धी पावलेल्या मनोरुग्ण महात्म्यांच्या सुरस कथा तर काय वर्णाव्या. असो... तुपाचे दिवे जाळुन सोन्यारुप्याचा लखलखणारा हा प्रकाश मनाच्या अंधारातुन उगम पावतोय. किंबहुना कुठलंतरी बाह्य कृत्रीम झमझ्म लाईटींग लाऊन हा अंधार दूर होईल असाच आक्रोश हि लेखात वर्णन केलेली डोकेदुखी निर्माण करतो आहे. कधि ना कधि त्याचं निराकारण होईल अशी आशा करुया.

In reply to by अर्धवटराव

धाग्याच्या टायटलशी काहिसा असहमत आहे... धाग्यात जे काहि लिहीलय ते भक्तीमार्गातले अडथळे नसुन भक्तीमार्ग उमगण्यातील अडथळे आहेत. किंबहुना भक्तीशी या भानगडींचं काहि घेणं देणं नाहि. जि गोष्ट प्रेमाने सुरु होऊन प्रेमातच विलीन होते तिचा मानव समाज वा एकुणच विश्वाच्या पसार्‍याला उपद्व्याप होईलच कसा.... झाला तर फायदाच होईल.

In reply to by अर्धवटराव

'भक्तीमार्ग' म्हणजे संतांचा मार्ग अशी माझी व्याख्या आहे... बाकी त्यांचं त्यांनी बघावं..

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव, ईश्वरसेवा, ईश्वरभक्ती करताना आपण आणि ईश्वर ह्या मार्गावर, पक्षी: भक्तीमार्गावर, आपले अनेक समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रदा, स्वार्थ, आळस, देवालयांचे व्यापारीकरण, पाप-पुण्याचा विधिनिषेध न बाळगणारे देवालयांचे दलाल, राजकारणी, कर्मकांडांचे अवास्तव महत्त्व वाढविणारी माध्यमे आदी अनेक अडथळे आहेत. ह्या सर्वांना टाळून आपण आपला भक्तीमार्ग निष्कंटक करून थेट देवाची भक्ती करणं ही काळाची गरज आहे असे मला वाटते. जर शीर्षक चुकले असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी. फक्त आशय लक्षात घ्यावा ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

अहो क्षमा असावी वगैरे इतकं फॉर्मल का होताय... लेखातल्या विचारांशी कुणिही असहमत होणार नाहि. मी फक्त हेच म्हटलं कि हा सगळा तमाशा भक्तीमार्गावरचा नसुन भक्तीमार्गावर न पोचलेल्यांचा आहे. असो.

श्रद्धा, भावनेच्या सहाय्याने उत्सवाचे विकृतीकरण थांबवता येत नाही. यात मुख्य दोष पुरोगाम्यांचा नाही की उत्सवांना ताब्यात घेऊन आपल्या ब्रेड-बटर ला वाईन ची जोड देणार्‍या गुंडपुंडांचाही. दोष आहे तो स्वतःला 'खरे सश्रद्ध' म्हणवणार्‍या, हा सगळा बाजार आम्हाला पटत नै बर्का असा बाऽरीक चिरका सूर काढणार्‍या, पण जेव्हा हे थांबवा म्हणत कुणी बोलू लागतो तेव्हा अचानक २८ इंची छाती ५६ इंची असल्यासारखी ताणून 'आमच्या सणांवर बोलणारे तुम्ही कोण? त्यांना सांगा की.' म्हणत धावून येऊन गुंडाचीच बाजू घेणार्‍या षंढांचा. दुर्दैवानी ही 'आम्ही तुमच्या बाजूचे' असे दोन्ही बाजूंना पटवणारी नि गुंडांना शरण जाणारी कातडीबचावू जमातच बहुसंख्य असल्याने पुरोगामी विचाराच्या मंडळींना हताश होऊन पहात राहण्याखेरीज काही करता येत नाही- लेखन श्रेय मन्दार काळे. फेबु वरुन सभार

In reply to by पिंपातला उंदीर

सहमत.. या धाग्यावरपण सहमती आणि तितक्याच उत्साहाने पुण्याची शान असणार्‍या सार्वजनिक गणपतींची भलामण इतर धाग्यांवर !!

माझा असा अनुभव आहे की , ज्या ज्या क्षेत्रात राजकारणी शिरले , तिथे तिथे त्यांनी डाळ नासली. मग ते बान्धकाम क्षेत्र असो की धार्मिक क्षेत्र, शैक्षणिक असो अथवा पर्यटन ! त्यांनी जाईल तिथे घाण करुन ठेवली. उद्योजकाकडे असणारा स्मार्ट्नेस सामान्य माणसांकडे नसतो आणि त्यामुळे सामान्य माणूस या नालायकांना चार हात दूर ठेऊ शकत नाही हे दुर्दैव आहे , उलट त्यांच्या भपक्यांना आणि भूलथापांना सामान्य लोक बळी पडतात , आपसूक त्यांचेच शिकार बनतात. त्यातच राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण ( किंवा उलटे) झाल्याने प्रश्न आता अतिगंभिर झाला आहे. ही घाण हा फक्त भक्तिमार्गातील अडथळा नसून आमच्या जीवनातीलच अडथळा आहे. मतपेटीतून यांना त्यांची जागा दाखवून देणे हाच त्याचा खरा उपाय आहे.

>>>>ही घाण हा फक्त भक्तिमार्गातील अडथळा नसून आमच्या जीवनातीलच अडथळा आहे. मतपेटीतून यांना त्यांची जागा दाखवून देणे हाच त्याचा खरा उपाय आहे. सहमत.

काही प्रतिसादांबद्दल कोणाचे नाव न घेता सांगू इच्छीतो की दोन गोष्टी विसंगत वाटल्या तरी त्यांना एकमेकांसह स्थान नाही असं नाही. समाजात सर्व काही असणारच. गोंदवलेकर महाराजांना एका माणसानं विचारलं ज्ञानी लो़कं सगुण परमात्मा मानत नाहीत पण आपण मात्र सगुणभक्ती आणि नामाचा महिमा सांगता. आंम्ही यातलं खरं काय जाणावं? गोंदवलेकर महाराजांनी एक उदाहरण दिलं: समजा तुम्ही तुमच्या मित्राच्या घराचा पत्ता शोधत आहात. कोणीतरी वाटेत तुंम्हाला सांगतं की इथून सरळ पुढे जा, डावीकडे जा, एक पोस्टाच्या खांब दिसेल, तिकडेच मागे तुमच्या मित्राचं घर आहे. ईश्वराच्या सगुण रुपाचं महत्व या पोस्टाच्या खांबासारखं आहे. जोपर्यंत तुंम्हाला तुमच्या मित्राचं घर कुठे आहे हे माहीत नाही तोपर्यंतच त्या खांबाचं महत्व. तसंच आणि तेवढच प्रतिमेतल्या देवाचं. यापुढे जाऊन एका देवभक्त संताचा अजून असा एक विचार आहे: देव आहे देव आहे जनी बोलावे | देव नाही देव नाही मनी जाणावे || जर कुणी म्हणणार असेल की देव या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे मूर्ख आहेत तर ते त्या म्हणणार्‍या व्यक्तीचं अभिव्यक्तीस्वातंत्र आहे. आणि त्याच न्यायाने जर कोणी अशा मूर्ख म्हणणार्‍याला मूर्ख म्हणणार असेल तर त्यांनाही ते अभिव्यक्तीस्वातंत्र आहेच. आपण असं समजूयात की काही लोकांना देव आहे या संकल्पनेचा आधार वाटतो आणि योग्य ती कॄती करण्याचं मानसिक बळ निर्माण होतं तर त्यात बिघडलं कुठं? त्याच तत्वाने, अजून काही लोकांना देव ही भ्रामक समजूत आहे असं जाणवून योग्य कार्य करण्याची प्रेरणा मिळत असेल तर त्यात बिघडलं कुठं? पण जर यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर निर्बंध आणले जात असतील तर ते व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणं ठरेल. लेख आवडला, पटला.

लेख आवडला, पटला, अस्वस्थही करुन गेला. आपल्या समाजाचं हे अंधश्रद्ध चित्र मला फार विचलीत करतं. खरंच, आपण कधीच बदलणार नाही का? हा कळीचा मुद्दा आहे, टिळक, आगरकर, फुले दांपत्य ही फार मोठी नावं झाली. पण कुठेतरी आरंभ जरी झाला तर आजपासुन ५० वर्षांनी चित्र जरातरी सुधारलं असेल अशी आशा करायला हरकत नाही.

सुंदर उद्बोधक लेख ! ||देव आहे देव आहे जनी बोलावे | देव नाही देव नाही मनी जाणावे || -- हे तर खासच ! "देव" या संकल्पनेचा मर्यादित वापर करून खरोखरची समाज"सेवा" करणारे गाडगेबाबांसारखे मोजके थोर संत विरळाच ! खर्‍या भक्तीमार्गाला डावलून "भक्ती"च्याच नावाने भाबड्या लोकांना वापरून स्वतःचा स्वार्थ साधणे की समाजातल्या काही घटकांची, लोकांची मजबूरी आहे. आपल्या सारख्या "डोळस" लोकांनी वेळीच यापासून बाजूला होणे व आपली मते इतरांना पटवून देत राहणे हाच यावरचा उपाय आहे. या संदर्भात चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी उधृत करतो: इथे सर्वजण समजतात स्वतःला शहाणे, आपल्या हातत एकच शांतपणे पाहणे.