"आजच्या" गणेश मंडळाची सभा....

सुहास झेले's picture
सुहास झेले in विशेष
30 Aug 2014 - 12:19 am
श्रीगणेश लेखमाला २०१४

(स्थळ - हर्क्युलस सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यालय)

"अरे रघ्या.....ए रघ्या.. समोश्याचा अजून एक राउंड होऊन जाऊ दे..."

"सब खतम हो गया साब..."

"खतम? जा त्या मारवाड्याला सांग... सेक्रेटरी साहेबांनी १५-२० प्लेट मागवलेत अजून. मंडळाची महत्वाची मिटिंग सुरु आहे."

(रघ्या समोसे आणायला पळतो)

"चला तोवर आपण सभेला सुरुवात करूया. अरे तो एसी कोणी तरी वाढवा रे...किती उकडतंय इथे.."

(एसीची घरघर वाढते आणि मंडळाच्या सभेला सुरुवात होते)

"तर मंडळी सालाबादप्रमाणे यंदाही आपण आपल्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निम्मित ही सभा आयोजित केलेली आहे. मंडळाचे यंदाचे बारावे वर्ष..आजवरच्या आपल्या लौकिकाला साजेसा भव्यदिव्य गणेशोत्सव आपण ह्यावर्षीही साजरा करणार आहोत हे वेगळे सांगायला नकोच. मी सभेला अनुसरून काही मुद्दे वरिष्ठ कार्यकर्त्यांशी आधीच बोलून घेतले आहेत. त्यावर आपण इथे चर्चा करून गोष्टी लवकर लवकर फायनल करून टाकू. गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपलाय.. "

(समोश्यावरील लक्ष विचलित न होता सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या)

"साहेब, मूर्ती आणि देखावा वगैरे ठरवले आहे का?"

"अरे तू मंडळाच्या व्हॉट्स एॅप ग्रुपमध्ये नाहीस काय? आपल्या मंडळाच्या ग्रुपवर मी पाठवले होते की फोटो गेल्या आठवड्यात...आपण मूर्ती आणणार लालबागच्या राजासारखी. सेम टू सेम एकदम... मी आपल्या मूर्तीकाराला आधीच सांगून ठेवले आहे. मूर्तीचे काम सुरु आहे. ह्यावेळी मूर्तीवर आकषर्क दागिनेही बनवणार आहेत ते."

"व्वा व्वा... सुंदर कल्पना" (काही उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून त्यास अनुमोदन देतात)

"सिंहासनावर बसलेली ती सुंदर मूर्ती... त्या मूर्तीची जगभर झालेली कीर्ती विलक्षण आहे रे सर्वकाही.. गणपती म्हटलं की हीच मूर्ती डोळ्यासमोर येते"

"पण साहेब, तशी राजाची मूर्ती तर आजकाल शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणतात... मोठमोठाले बॅनर्स जागोजागी लावलेले असतात... हा इथला नवसाचा राजा तिथल्या गल्लीचा राजा वगैरे... हल्ली तर घरगुती गणपतीसुद्धा लालबागच्या राजा सारखा असावा अशी मागणी असते... "

"अरे भाड्या माहितेय ते आम्हाला... आपल्या बाजूच्या गल्लीत पण तशीच मूर्ती असते....आपण आणायला सुरुवात केली, मग त्यांनी आपली कॉपी केली..... पण नुसती मूर्ती आणून होत नाही रे.... महाराजाची साजेशी व्यवस्था ही करावी लागते. राजाचा थाट काही औरच असायला हवा. नुसता नजरेत भरायला हवं सर्व काही. ती सर्व व्यवस्था आपण करू. हॉटेलात मिळणारी कॉफी जेव्हा नेसकॉफी होते, तेव्हा तिचा भाव जसा आपोआप वाढतोच.. तसंच होतं आजकाल. त्यामुळे त्याची काळजी नको रे करूस. ह्या मूर्तीच्या निमित्ताने दर्शनासाठी लोकांची गर्दीही होते. सोबत मंडळाला प्रचंड देणगीही मिळेल आणि आपलं नाव पण होईल. तिकडे लालबागला प्रत्यक्ष ५-६ तास दर्शनाच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा, आपल्या एकता नगर लेन क्र.२ चा महाराजा काय कमी आहे. साक्षात प्रती लालबागचा राजा... किंवा त्याहूनही मोठा...इथे आपल्या पश्चिम उपनगरात असेल. तो राजा कोणाला पावतो की नाही कल्पना नाही, पण हा राजा आपल्याला नक्कीच पावेल... मग झाला की नाही आपला महाराजा नवसाचा ;-)

(थोडेसे हास्यतुषार उमलतात आणि लगेच कोमेजतात)

"आणि देखाव्याचे म्हणशील तर, आपण त्या समोरच्या पालिका मैदानात मांडव टाकून प्रशस्त महाल बांधूया. महालाच्या मध्यभागी दिमाखात सिंहासनावर बसलेला महाराजा असेल. सोन्याने मढवलेला. महालाच्या मोठमोठ्या खिडक्या, त्यावर निरनिराळे लाईट इफेक्ट्स, आपल्या गल्लीच्या सुरुवातीला अतिभव्य प्रवेशद्वार, काचांनी मढवलेले मोठमोठाले पिलर्स, त्यावर भरजरी कापडं, मस्त मऊमऊ गालिचे, दोन वेगवेगळ्या दर्शनाच्या रांगा, ऑर्किड फुलं, खास पाहुण्यांना बसायला सोफे, मूर्तीच्या स्टेचच्या समोर अजून एक स्टेज, ज्यावर सांस्कृतिक कार्यक्रम, पाहुण्यांचा सत्कार, मुलांसाठी काही स्पर्धा, बायका-पोरींसाठी काही विशेष कार्यक्रम, जागोजागी एलसीडी स्क्रीन आणि त्यावर श्रींचे लाईव्ह दर्शन, हायटेक सिक्युरिटी वगैरे वगैरे.. लोकांनी कौतुक केलं पाहिजे आपल्या मंडळाचे आणि आपण दिलेल्या सोयीसुविधांचे. एकदा का आपल्या मंडळाचे नाव झालं, की पैश्याची चिंताच नाही. आणि हो...कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला मिळेल हे वेगळे सांगायची गरज नाही.." :)

(त्या काल्पनिक रंगमहालात सगळे हरवून जातात. तितक्यात रघु येतो आणि सर्व आशादायी नजरा समोश्याकडे वळतात)

"साहेब, कल्पना नक्कीच मस्त आहे, पण इतर खर्चांचे काय? मूर्तीची प्रतिष्ठापना, पूजा, आरती, नैवैद्य, मिरवणूक, विज बिल हे सर्व खर्च आणि पालिकेच्या, पोलिसांच्या परवानग्या त्या पण लागणारच की.."

(चटणीने माखलेली बोटे चोखता चोखता सेक्रेटरी जोरजोरात हसू लागले)

"अरे खर्चाची चिंता कसली करतोस. आपल्याला थोडीच आता पावती पुस्तकं फाडत फिरायचंय. ती जुनी पद्धत होती रे, आता जमाना बदललाय. कितीही महागाई वाढली, तरी अश्या कारणांसाठी सर्व खर्च आपसूक समोरून चालत येतो. कुठल्याही परवानग्यांची गरज नाही. हल्ली तर भर रस्त्यात तंबू ठोकलेले असतात गणेश मंडळाचे, आपण तर फक्त महानगरपालिकेचे मैदान विनापरवानगी वापरणार आहोत. कोणी कसलीही कारवाई करणार नाही. फारफार तर दर्शनाला येऊन चहापाणी घेऊन जातील. त्यात आता निवडणुकाही अगदी तोंडावर आल्यात. त्यामुळे सर्व पक्ष समभाव असेल उत्सवांसाठी. पक्षाच्या बड्या नेत्यांचे फोटो, बॅनर्स लागले की बस्स.... मोठे-छोटे बिल्डर्स तर समोरून पैसे घेऊन येतात. आपल्याला त्यांच्याकडे जायची गरज पण नाही. आपल्या एरियातील एक-दोन मोठ्या बिल्डर्सकडे आधीच आपली सेटिंग लावलेली आहे. त्यांच्या प्रोजेक्टची पोस्टर्स पूर्ण गल्लीभर लावून टाकायची. त्या पोस्टर्सचा खर्च पण तोच करेल आणि ती पोस्टर्स लावायची व्यवस्थाही तोच करेल की...आपण फक्त पैसे घ्यायचे. विजेचा खर्च सुद्धा इतका होणार नाय. आपण नावापुरते एक मीटर लावून घेऊ रिलायन्सकडून, पण बाकी सगळी वीज बाहेरच्या बाहेर मिळवायची. मंडपवाला सगळी जोडणी करून देईल, त्यामुळे त्याची चिंता नाही. गणपतीच्या मिरवणुकीला १००-१५० ढोल-ताश्यांचे पथक मागवू पुण्याहून. आजकाल प्रचंड मागणी असते अश्या पथकांना, त्याशिवाय गणेश मिरवणुकीला काही अर्थच उरला नाय. दणाणून सोडू संपूर्ण एकता नगर. भटजी वगैरेची गरज काय...इंटरनेटवर सगळं काही मिळतंय आरामात. मंडपात नवसाची वेगळी रांग करून, त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करता येईल, अशी व्यवस्था करू. दुसरी रांग स्टेजच्या समोरूनच, पण खालून जाईल. नवसाच्या रांगेसाठी मंडळाची देणगी पावती फाडणे कंपल्सरी असेलच. रोजचा प्रसाद, पूजेसाठी लागणारे हार-फुले आणि इतर साहित्य कोणी न कोणी नवस फेडणारा देईलच आणि जागोजागी दान पेट्या असणार हे वेगळे सांगायला नकोच. आपल्याला फक्त महाराजा आणून बसवायचा आहे, बाकी पुढची त्याची काळजी त्यालाच" :D

"व्वा व्वा.." (काही कार्यकर्ते ह्या दूरदृष्टीला दाद देतात)

1

"आपल्याला काही लहानसहान गोष्टी करायच्या आहेत... त्या केलं की सगळं कसं निर्विघ्नपणे पार पडेल. पहिली गोष्ट म्हणजे मंडळाची स्मरणिका बनवून, जास्तीतजास्त लोकांकडे ती पोचवायची व्यवस्था करायला हवी. खर्चाचा हिशोब कसा "मांडायचा" हे आपले खजिनदार बघून घेतीलच. दुसरी गोष्ट म्हणजे मंडळाची सोशल नेटवर्कवर जाहिरात. काही सेवाभावी संस्थांना छोट्या देणग्या देऊन, थोडं पुण्यही पदरात पाडून घेऊया आणि त्याची माहिती तर ठळकपणे दिसायला हवी लोकांना. आपल्या मंडळाचे फेसबुक पेज बनवून सगळ्यांना ते लाईक करायला पाठवा... हवं तर आपण फेसबुकवर पैसे देऊन जाहिराती देऊ, त्यासाठीही कोणी न कोणी मिळेलच की स्पॉन्सर... संपूर्ण गल्लीत दिव्यांची अभूतपूर्व रोषणाई करा, गणेशमूर्तीचे वेगवेगळ्याप्रकारे त्याचे फोटो सतत अपलोड करत रहा सोशल साईट्सवर. व्हॉट्स एॅपवर मेसेजेस पसरवा...हँडबिलं छापून पेपरवाल्यांना वाटायला द्या. पेपरात अर्ध्या पानाच्या जाहिराती देऊया दोन-तीन दिवस आधी. रेल्वेस्टेशन समोर, बस स्टॉप.. नाक्याच्या कोपऱ्या- कोपऱ्यावर जागोजागी मोठमोठाले बॅनर्स लावा. टीव्ही/सिनेमात छोटे-मोठे रोल करणाऱ्या काही अभिनेते-अभिनेत्री बोलावू आरतीसाठी... त्याची प्रचंड जाहिरातबाजी करू. नवसाला पावणारा महाराजा ही गोष्ट हायलाईट व्हायला हवी. जितके आपण जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचू, तितक्याच जास्त देणग्या मंडळाला मिळतील आणि पुढचे काही सण एकदम धुमधडाक्यात साजरे करता येतील..."

(तेव्हढ्यात सेक्रेटरी साहेबांचा फोन वाजतो. २-३ मिनिटाच्या संभाषणानंतर "होऊन जाईल, साहेब.. चिंता नको" इतकेच शब्द सभेत ऐकू येतात)

"बघा...ह्याला म्हणतात शुभ शकून. कोबेरॉय बिल्डरच्या ऑफिसमधून फोन होता. त्यांनी मंडळासाठी भव्य प्रवेशद्वार बांधून देण्याचे कबूल केले आहे, त्या बदल्यात मंडपाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या पूर्ण जागेत त्यांच्या नवीन प्रोजेक्टची जाहिरात लावायला सांगितली आहे आणि सोबत त्यांनी मंडळाला ५ लाखाची देणगीही देण्याचे कबूल केली आहे. चला आपण आटोपती घेऊ ही चर्चा. मी त्यांच्या ऑफिसला जाऊन प्रवेशद्वाराचे डिझाईन फायनल करून येतो आणि येता येता मंडप डेकोरेश करणाऱ्या कारागिरांना महालाच्या बाजूच्या भिंती मोकळ्या ठेवायला सांगेन. बाकी काही प्रायोजक मंडळी येणार आहेतच उद्या, त्यांच्याशी मी सगळी डील करून तुम्हा सर्वांना कळवतो... बाकी काही अर्जंट असेल तर मला व्हॉट्स एॅप करा. प्रत्येकवेळी मला फोन उचलता येईलच असे नाही... खूप मिटींग्स करायच्या आहेत पुढच्या काही दिवसात. चला मग संपवूया इथेच सभा.. धन्यवाद मंडळी. गणपती बाप्पा मोरया !! "

(सगळे घाईघाईने ऑफिसच्या बाहेर पडतात, पण एका कोपऱ्यात खुर्चीवर काळे आजोबा तसेच बसून राहतात.)

"ओ काळे आजोबा, (सेक्रेटरी साहेब त्यांना आवाज देतात) कुठे हरवलात...मिटिंग संपलीसुद्धा. मला ऑफिस बंद करून तडक निघायचे आहे. काय झालं.. कुठे हरवलात?"

(आजोबा दचकून भानावर येत) "ऑ... काही नाही... काही झाले नाही... असाच एक विचार आला"

"कसला विचार आजोबा?"

"टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यानिमित्ताने लोकं मोठ्या प्रमाणावर एकत्र येतील आणि त्यांचे प्रबोधन करता येईल......आजच्या काळात साजरा केला जाणारा गणेश उत्सव बघून त्यांना काय वाटले असते?... असो !!"

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

30 Aug 2014 - 12:27 am | किसन शिंदे

तू लिहिलेल्या प्रसंगात आणि आजकालच्या काही गणेश मंडळात काडीचाही फरक नसावा. काल रात्री साडेबारा वाजता सोसायटी खालून अचानक ढोल-ताशांचे आवाज येऊ लागले आणि अर्धवट झोपेत असणारी अख्खी सोसायटी जागी झाली. काडीचीही अक्कल नसल्यासारखी वागतात ही लोकं. :(

प्रचेतस's picture

30 Aug 2014 - 9:00 am | प्रचेतस

आमच्या सोसायटीच्या जवळपास एकही मंडळ नसल्याने दर गणेशोत्सवात शांतताच असते. :)

इरसाल's picture

30 Aug 2014 - 10:31 am | इरसाल

अति नशीबवान माणुस दुसरे काय ?

प्रचेतस's picture

30 Aug 2014 - 10:47 am | प्रचेतस

अगदी. :)

मधुरा देशपांडे's picture

30 Aug 2014 - 2:14 am | मधुरा देशपांडे

दुर्दैवाने अशीच परिस्थिती आली आहे. लोकांना भक्तीप्रदर्शन करायचे आहे. दिखावा हवा आहे. कधी थांबणार हे सगळे माहित नाही.
अवांतर - देऊळ आठवला.

सस्नेह's picture

30 Aug 2014 - 8:43 am | सस्नेह

आजकाल गणेशोत्सव हा भक्ती न होता एक 'शो'झालाय !

प्रभाकर पेठकर's picture

30 Aug 2014 - 2:45 am | प्रभाकर पेठकर

उत्सवांमध्ये राजकारण्यांनी लक्ष घातलं. गणेश मंडळांबरोबर हातमिळवणी केली. मंडळं आणि राजकारणी गब्बर होत गेले. मंडळामंडळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. तुमचा गणपती श्रीमंत की आमचा. व्यावसायिकता वाढत गेली. भक्तीभाव रसातळाला गेला. हल्ली सजावटींच्या झगमगाटात देवाचे सोज्वळ रुपही हरवले आहे. कांही गोष्टींवर कायद्याने नियंत्रण आणल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही.

मदनबाण's picture

30 Aug 2014 - 7:46 am | मदनबाण

टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यानिमित्ताने लोकं मोठ्या प्रमाणावर एकत्र येतील आणि त्यांचे प्रबोधन करता येईल......आजच्या काळात साजरा केला जाणारा गणेश उत्सव बघून त्यांना काय वाटले असते?.
डोळे आणि कान मिटले असते त्याने हा असा चालणारा धुडगुस पाहुन !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

प्रचेतस's picture

30 Aug 2014 - 9:00 am | प्रचेतस

छान लिहिलंयस रे.

खटपट्या's picture

30 Aug 2014 - 11:43 am | खटपट्या

+१

आतिवास's picture

30 Aug 2014 - 12:56 pm | आतिवास

वास्तवदर्शी चित्रण.
मंडळात काम करण्याचा अनुभव दिसतोय गाठीशी ;-)

लेख आवडला - पण लेखात मांडलेली वस्तुस्थिती आवडत नाही!

अजया's picture

30 Aug 2014 - 8:52 pm | अजया

आवडला लेख.

जोशी 'ले''s picture

30 Aug 2014 - 10:12 pm | जोशी 'ले'

सद्य परिस्थिती वर मार्मिक चिमटे काढनारा लेख आवडला..