Skip to main content

(चतुर) भ्रमणध्वनीच्या गमतीजमती…

लेखक भाते यांनी मंगळवार, 26/08/2014 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
टृ कॉलर पध्दल सर्वांना माहित असेलचं. आपल्यापैकी बहुतेकांच्या (चतुर) भ्रमणध्वनीवर ते विराजमान असेलही. त्याचीच गंमत सांगतो आहे, प्रत्यक्ष घडलेली. माझा एक मित्र, राजेश राजे, वय अंदाजे पन्नाशीच्या आसपास, साडेसहा फुट ऊंच. मी त्यांना फक्त राजे काका या नावाने ओळखतो. शनिवारी रात्री सव्वा दहा - साडे दहा च्या आसपास या काकांना (सहजच) माझी आठवण झाली. लगेच या महाशयांनी मला माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. त्यांच्या दुर्दैवाने माझ्या भ्रमणध्वनीवर (टृ कॉलर असल्याने) चिंटुमामा असे नाव दिसले. शनिवारी रात्री हा कोण चिंटुमामा माझी आठवण काढतोय म्हणुन (मनातल्या मनात) शिव्या देत तिकडे दुर्लक्ष केले. पुन्हा पंधरा मिनिटांनी या महाशयांनी माझ्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री या 'चिंटुमामा' ला माझी अशी काय गरज लागली कि त्याने मला पुन्हा संपर्क केला या विचारात मी (अर्थातच चडफडत) माझा भ्रमणध्वनी ऊचलला. तिकडून हे महाशय बोलले, "मी राजेश बोलतोय. कसा आहेस?" राजेश नावाच्या कोणत्याही माणसाला मी ओळखत नाही हे माझ्या लक्षात आले. माझ्याकडुन काही ऊत्तर आले नाही हे बघुन हे महाशय पुन्हा म्हणाले, "मी राजेश राजे बोलतोय. विसरलास का मला?" तेव्हा माझी टयुब पेटली. अरे बापरे, राजे काका! साडेसहा फुट ऊंच माणुस चिंटु कसा असु शकतो? मी पटकन म्हणालो, "राजे काका, कसे आहात?" राजे काका हसुन म्हणाले, "ऊद्या भेटायला जमेल का तुला?" जास्त आढेवेढे न घेता मी त्यांना ऊद्या भेटायचे कबुल केले. दुसऱ्या दिवशी त्यांना भेटल्यावर त्यांनी (अर्थातच) मी काल रात्री त्यांचा पहिला कॉल का ऊचलला नाही हे पहिले विचारले. मी त्यांना चिंटुमामा आणि माझ्या भ्रमणध्वनीवरच्या टृ कॉलर पद्धल सांगितले. माझ्याकडे पहात ते हसत म्हणाले, "मला लहानपणी सगळे चिंटु या नावाने हाक मारायचे. कदाचित माझ्या भाच्याने माझ्या भ्रमणध्वनी क्रमांकाची चिंटुमामा म्हणुन नोंद केली असेल." माझ्या संपर्क यादी मध्ये मी एखाद्या क्रमांकाची नोंद छोटु काका म्हणुन केली असेल तर टृ कॉलर तेच नाव ऊचलुन घेतो. मग त्याने (टृ कॉलर असलेल्या) कोणालाही संपर्क केला तर त्याचे नाव छोटु काका म्हणुन दाखवतो. असा किंवा यासारखा किस्सा तुमच्या बाबतीत घडला असेल तर अवश्य सांगा!

वाचने 13431
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

हा टृ कॉलर प्रकार ठाऊक नव्हता. आपल्या जोडीदाराचे क्रमांक लाडीक नावाने सेव्ह करणारे जरा अडचणीत येऊ शकतात. बादवे चतुरभ्रमणध्वनी हा मी तयार केलेला शब्द प्रथमच इतर कुणी वापरलेला पाहून खूप बरे वाटले. तरी तुम्ही कंसाचा आधार घेतला आहेच म्हणा. गेल्या वर्षी एका सार्वजनिक उपक्रमाबद्दल इमेल वर संभाषण सुरू असताना एका इमेलवर मी चिडून
'This is so unprofessional, we need to be careful from next year'
असे उत्तर पाठवले होते. ज्या व्यक्तिने इमेलमध्ये माहिती पाठवली केवळ तिलाच उत्तर देतोय या भ्रमात मी होतो. त्या व्यक्तीचा लगेच फोन आला अन मला कळले की मी reply ऐवजी reply to all केले होते (प्रत्यक्षात माझ्या चतुरभ्रमणध्वनीचे तसे सेटींग होते). माझ्या दुर्दैवाने माझे वाक्य ज्या लोकांसाठी होते त्याच मंडळींना मी इमेल पाठवून चुकलो होतो. पुढची काही मिनिटे गेल्यावर एक उपाय सुचला अन त्या पाठवलेल्या इमेलला पुन्हा reply to all केले अन लिहिलि.
Oops, my bad. Sent reply to wrong email chain. This was not intended to you. Kindly ignore.
कुणाचेही त्यावर उत्तर आले नसले तरी त्यांच्या वागण्यावर माझे काय मत होते ते त्यांना नक्कीच कळले होते ;-). नेमका असाच किस्सा अनेक वर्षांपूर्वी पहिल्या नोकरीमध्ये झाला होता. माझ्या एका हिंदी भाषिक सहकार्‍याने अनेकदा वाचलेले ढकलपत्र किमान तीस चाळीस जणांना पाठवले होते. त्यात एक लहान मुलगा बचतीच्या पैशातुन कामामध्ये नेहमीच व्यस्त असणार्‍या त्याच्या वडिलांचा वेळ विकत घेऊ पाहत असतो. नेमका मी माझ्या कामाच्या ओझाखाली दबलो असल्याने चिडून मी उत्तर पाठवले,
मेरे तो कोई बच्चे नहीं हैं, तेरे होंगे तो उन्हे मेरा प्यार देना.
अन चुकून reply ऐवजी reply to all बटन दाबले गेले. त्या कंपनीमध्ये इमेल साठी लोटस नोट्स वापरले जायचे. त्यामध्ये आउटलुकसारखा मेसेज रिकॉलचा पर्याय नसतो ;-).

In reply to by खटपट्या

ओके, लोटस नोट्स वाली कंपनी हा.हा.हा... {कधी काळी लोट्स नोट्सचा Domino सर्व्हर रीबुट मारणारा} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by धर्मराजमुटके

प्रगती आहे. मी त्यांच्याकडे असताना साडेचार वर्ष कमलनोंद वापरला होता.

In reply to by धन्या

अरेच्या बरीच मंडळी दिसताहेत मिपावर माझ्या पहिल्या कंपनीमध्ये काम केलेली / करणारी :) .

In reply to by श्रीरंग_जोशी

@धन्या अरे क्लायंट कमलनोंद वापरायचा त्यांचा डोमिनो लटकला की मग डोमिनोवर लॉगइन करुन सर्व्हीस रिस्टार्ट करावी लागायची ! त्यानेही काम भागले नाही की मग सरळ सर्व्हर रिबुट मारायचा ! ;) एकदा एका युरोपियन बाईचा मला फोन आला... म्हणाली काही तरी करा ! मी म्हंटल काही तरी म्हणजे नक्की काय करु ;) तर म्हणला की तिच्या कमलनोंद मधे तिच्या बॉसची मेल दिसत आहेत ! म्हणजे बॉसचे कमलनोंद तिच्या कमलनोंद मधे प्रकट झाले होते. ;) अश्या आणि अनेक गमती ! ;) शेवटी क्लायंटही बाहेरबघावर शिफ्ट झाला. @श्रीरंगराव... बरीच मंडळी आहेत इकडे ! अगदी बरीच. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by श्रीरंग_जोशी

आम्ही आमची आयटीची मुळाक्षरे ल आणी ट मधेच शिकलो. त्यामुळे कधीच त्यांना विसरु शकणार नाही. ल आणि ट ची बरीचशी युनिट परवापरवापर्यंत नॉवेल ग्रुपवाईज वापरत होती.

In reply to by धर्मराजमुटके

ल आणि ट ची बरीचशी युनिट परवापरवापर्यंत नॉवेल ग्रुपवाईज वापरत होती. हो खरयं ! कोअरवाली मंडळी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by बॅटमॅन

कमलनोंदी, त्याचवेळी निरोपक आणि कमलनोंदीतली विदागारे हे बनविणार्‍याला फक्त नरकातच जागा मिळू शकते...

मला आलेल्या एका caller चे नाव तर True Caller 'हलकट' म्हणून दाखवित होता. आता बोला !! (आणि तो call माझ्या मैत्रिणीने तीच्या वडिलांच्या चतुर भ्रमणध्वनीवरून केला होता). :D

चतुरचा अनुभव घेण्यासाठी मित्राचा फोन घेऊन रात्री आलो .म्हटलं बघू उद्या .पहाटे पाचला कोंबडा आरवायला लागला .जागा होऊन लक्षात येण्यास थोडा वेळ गेला ।हा कोँबडा नसून कालच्या फोनमध्ये कायमच लावलेला गजर होता ।कुठेतरी टचला हात लागला आणि बंद करायचे बटण गायब झाले ,सापडेचना .सर्व बाजूने फोनला गुदगुल्या केल्या तरी कोंबडा कोकलतच होता .मग फोन उशीखाली दाबून ठेवला आणि आवाज बंद केला .

TrueCaller वापरत असाल तर सावधान ! TrueCaller चा डेटाबेस जानेवारी महिन्यात हॅक झाला होता. संदर्भ :- TrueCaller hacked, 1 million Indians’ data at risk बाकी फालतुचे मिसकॉन देउन पैसे कमावणार्‍यांमुळे हल्ली जाम वैताग आला आहे, काल तर एका नंबर वरुन अनेकदा मिसकॉल आले, शेवटी ShaPlus Caller Info (India) वरुन कळले की नंबर उत्तर प्रदेशचा आहे. मग शेवटी हा त्रास टाळण्यासाठी शेवटी Mr. Number इनस्टॉल केले आणि तो नंबर ब्लॉक करुन ब्लॅकलिस्ट केला.लक्षात असुद्या की मिसकॉल हा एका मोठ्या फ्रॉडचा प्रकार आहे, जालावर या संदर्भात भरपुर माहिती उपलब्ध आहे, ती वाचण्याचे कष्ट घ्या. एक दुवा :- http://en.wikipedia.org/wiki/Phone_fraud

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

होय... ह्याच कारणासाठी मी ते वापरणे बंद केलंय... हल्ली तर परदेशी नंबर हून मिस कॉल येण्याचे प्रमाण वाढलेय... त्यांचे मिस कॉल रात्री उशिरा ११-१२ च्या सुमारास येतात. व्होडाफोनने आधीच माहिती दिल्यानुसार कोणाला फोन केला नाही, पण हे खूळ खूप वाढलंय आजकाल....

माझ्या मित्राला आलेल्या एका caller चे नाव तर True Caller 'बॅण्डबॅण्ड xyz' म्हणून दाखवित होता. आणि तो call माझ्या मैत्रिणीने तीच्या भ्रमणध्वनीवरून केला होता, (ती अत्यंत बडबडी होती)

अँड्रॉईडचा एक बग ज्यामुळे मी दोनदा दुसर्‍याला फोन लावले. काही कारणाने मी कॉल हीस्टरी बघत होतो. स्क्रोल करत बराच खाली गेलो होतो. नंतर मोबाईल तसाच बाजुला ठेऊन दिला. स्क्रीन लॉक झाली. थोड्या वेळाने मोबाईल पाहिला तर एक मिस्ड कॉल दिसत होता. कोणाचा आहे बघायला स्लाईड केले जे नाव आले त्या मित्राला कॉल लावला, तो म्हणाला मी कॉल नव्हता. कॉल कट केला आणि परत कॉल हीस्टरीत गेलो आधी ज्या ठिकाणी स्क्रोलबार होता (बर्‍याच खाली) तिकडेच तो अजुनही होता म्हणुन हा प्रकार घडला. माझी अपेक्षा अशी होती की मिस्ड कॉल वर स्लाईड केल्या केल्या मला तोच नंबर दिसावा.

अजून तरी अगदी असाच किस्सा माझ्याबाबतीत घडलेला नाहीये पण तसाही मला टच स्क्रीन या प्रकारचा भयंकर राग आहे. अरे! जरा धक्का लागायचा अवकाश, गेलाच फोन दुसर्‍याला! काल रात्री साडेदहाला ल्यांडलाईनीवर रिंग आली. आता इतक्या अवेळी कोण? तर माझेच नाव! भुताटकी झाली काय असे वाटले. नंतर नवर्‍याला लक्षात आले की माझा सेलफोन स्वयंपाकघरात र्‍हायलाय म्हणून रात्री तो आणायला गेला आणि चतुर फोनाला हात लावताच लँडलाईनवर फोन गेला. आता एक अत्यंत जुन्या पद्धतीचा फोन घेणार आहे. नुसता हात लागल्यावरच काय पण त्यावर उभी राहिले तरी डायल झाला नाही तरी चालेल. लोकांचे लई भारी फोन्स पाहिले की मला आजकाल दया येते. तसेच ते व्हॉट्स अ‍ॅप! हा धागा त्याचा नसला तरी राग येतो त्या प्रकरणाचा म्हणून बोलू द्या मला! जरा कुठं भावाशी वहिनीशी समोरासमोर बोलायला तोंड उघडावं तर टींग टींग वाज्तं आणि काहीतरी निरोप येतो. लगेच ते बघतात व कधी हसतात, कधीतरी "काय फालतूपणा लावला रे!" असे म्हणतात. मग बोलायचे कधी बुवा? आतेभावाला कित्ती कित्ती वर्षांनी भेटलास एवढच म्हणाले. त्याने बोलायला तोंड उघडले आणि ते व्हॉट्स अ‍ॅप वाजले. मग गडी पुन्हा भेटलाच नै! माझा प्रतिसाद विषयाला धरून नाहीये पण टंकल्यावर बरं वाटलं.

In reply to by रेवती

१} आज्जेला टचस्क्रीनचा भयंकर राग आहे. २} आज्जेला फोन स्वयंपाकघरात विसरायची सवय आहे. ३} लयभारी फोन पाहिले की आज्जेला दया येते. ४} आज्जेला हॉट्स अ‍ॅप चा सुद्धा राग येतो ! ;) ५} हा राग लिहुन काढल्यावर आज्जेला बरं वाटत ! {आज्जे व्हॅट्स अ‍ॅपवर असशील तर मला अ‍ॅड कर हो...} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

In reply to by रेवती

नाक्को गं आज्जे आताशा भारतात हाईक वापरतात लोक. तेव्हा तु पण ते http://get.hike.in/ इथुन डाऊनलोड कर हो.

In reply to by रेवती

आज्जे, अग्दी आसंच बघ... साला मला सगळे लोक म्हणतात, घे म्हणुन... पण मी लय सुखी आहे बघ...

In reply to by वपाडाव

हां, मग ठीक आहे, नायतर मला असं वाटायचं की जगात मी एकटीच त्या व्हॉटस अ‍ॅप वर नाहीये.

In reply to by रेवती

तुम्ही एकट्याच त्या व्हॉटस अ‍ॅप वर नाहीये अस्ं काही नाही. मीही नाहीये. सुरवातीला मी डेस्क्स्टॉपवरुन व्हॉटस अ‍ॅप लोड केले होते. पण ते वापरायच्या अगोदर पीसी खराब झाला मग मी त्या भानगडीत पडलोच नाही.

एका नवपरिणित भारतीय तरुण मित्राने पत्नीच्या नंबरावर identifier म्हणून तिच्या गोड आवाजात "हलो डार्लिंग, हाय डार्लिंग" असं रेकॉर्डिंग लावलं होतं. भारतातून प्रथमच आणि नुकतीच आल्याने एकटेपणा जाणवायला लागला की ती कन्यका दिवसातून बरेचदा नवर्‍याला फोन लावायची. एकदा हे साहेब महत्वाच्या मीटींगला जातांना फोन silent वर टाकायला विसरले, आणि २०-एक लोकांसमोर त्याचं presentation सुरू झाल्यावर फुल्ल व्हॉल्यूमने "हलो डार्लिंग, हाय डार्लिंग" सुरू झालं, खिशातून फोन काढून त्याचा गळा दाबेपर्यंत अर्ध्या मिनिटभराचा वेळ गेला, तोपर्यंत त्याचा चेहेरा पहाण्यासारखा झाला होता! असाच किस्सा एका मेडिकल स्कूलच्या डीनचा: त्यांचीही महत्वाची मीटींग चालू असतांना त्यांचा फोन जागा झाला, साहेब मीटींगमध्ये असतांना हा फोन घेऊन त्यांची सेक्रेटरी मागच्या रांगेत बसायची. रिंगटोन सुरू झाला तो कुत्र्याच्या आवाजात 'भू, भू, भू!' घाईघाईने फोन बंद करीत सेक्रेटरी बाहेर पडली, पण तिला हसू आवरत नव्हते. डीनच्या चेहेर्‍याकडे बघून सर्वजण लगेचच कामाकडे लक्ष देत असल्यासारखे दाखवू लागले. मीटिंग संपल्यावर कळलं, तो फोन डीनच्या बायकोचा होता....

आम्ही "चौकटराजा" असल्याने या आय टी वाल्यांची बडबड पार डोक्यावरून ( आम्हाला नसलेल्या ) गेली. ल आणि ट म्हण्जे लार्सन टुब्रो असावे बहुदा. बाकी काय बी कळ्ळे नाय ! आमचा सामसुम अगदी मंदातला असल्याने काय बी तरास नाय आसलां !

In reply to by चौकटराजा

आपला ल आणि ट बाबतचा अंदाज अचुक आहे. मी ल आणि ट समुहाच्या मा.तं. कंपनीमध्ये होतो. बाकी चतुरभ्रमणध्वनीवरील नोटीफिकेशन्सबाबतच्या तक्रारी बघुन आश्चर्य वाटले. मी तर इनकमिंग कॉल्सखेरीज सगळे नोटिफिकेशन्स बंद ठेवले आहेत. ब्लॅकबेरी वापरत असल्याने लांबून बघूनसुद्धा नवा संदेश आल्याचे कळते.

In reply to by श्रीरंग_जोशी

मायला या मातं कम्पन्यानी आमच्या इथे मातम केलाय. लई म्हागाई केली. या धन्या वल्ली सारख्या मंडळीमुळे मेथीची गड्डी महाग झाली. बटाटे ५ पट महाग झाले. असे ऐकून आहे की हिंजवडीला कोग्नीझंट च्या जागी बटाट्याचे शेत होते.

In reply to by चौकटराजा

मातं कंपन्या नसत्या तरी इतर कुणामुळे असे झाले असते. दोन दशकांपूर्वीपर्यंत बँकांमध्ये काम करणार्‍यांबाबत इतर लोक असेच बोलत असत. प्राध्यापकांबाबतसुद्धा मराठी आंतरजालावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. बाहेरून कळणार नाही परंतु मा तं मध्ये काम करणारेसुद्धा फार वेगळ्या विश्वात राहत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा बँका व बिल्डर्सच्या खिशात जातो. ज्यांनी पुणे व आजुबाजुच्या परिसरात दशकापूर्वी घरे घेतली त्यांचे एकवेळ बरे आहे परंतु त्यानंतर ज्यांची नोकरी सुरू झाली आहे त्यापैकी बहुतेकांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

परंतु मा तं मध्ये काम करणारेसुद्धा फार वेगळ्या विश्वात राहत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा बँका व बिल्डर्सच्या खिशात जातो.
त्याचे कारण त्यांनी घेतलेली महागडी घरे नाहीत का? जरा उलट विचार करून बघा. मातं कंपन्यांमधील कामगारांना तेवढा पैसा तरी मिळतो जेणेकरून ते ही घरे घेऊ शकतात. इतरांचे काय?

In reply to by लंबूटांग

भावना पोचल्या. एवढी महागडी घरे घेणे तेही नागरी व्यवस्थांचा व पायाभूत सुविधांचा दर्जा यथातथाच असताना कुणालाच आवडत नाही. असे करणे जवळजवळ अपरिहार्यता असते. मी स्वतः भारतात काम करत असेपर्यंत भाड्याच्या घरात राहिलोय. (तेव्हाच्या उत्पन्नात कदाचित झोपडी विकत घेणेसुद्धा परवडले नसते) माझ्या नशिबाने मी एक एजंटच्या साहाय्याशिवाय भाड्याचे मिळवू शकलो पण अनेक घरमालक एजंटच्या मध्यस्थीशिवाय घर देत नाहीत अन मोठी रक्कम नाईलाजाने एजंटला द्यावी लागते. अविवाहित असल्यास तुमचे आचरण कितीही आदर्श असो काही शेजारी तुम्ही २४ x ७ पश्चिमी सभ्यतेचे प्रसारक असाल अश्या नजरेने तुमच्याकडे बघतात. भाड्याच्या घरासंबंधी कायद्यांत असणार्‍या पळवाटांमुळे अनेकदा घरमालकांना संशय असतो की भाडेकरू आपले घर बळकावणार. त्यामुळे ११ महिन्यांच्या कराराचे दोन तीनदा नूतनीकरण झाल्यावर तुम्हाला घर सोडावेच लागते अन पुन्हा त्याच चक्रात अडकावे लागते. इतर जगात काहीही होवो, आपल्याकडे घरांच्या किमती फारशा कधीच घसरत नाहीत किंबहुना वरच जात राहतात. त्यामुळे जितक्या लौकर जमेल तितक्या लौकर पहिले घर घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो. ज्यांना ठरवून विवाह करायचा असतो त्यांचे स्वतःचे घर नसल्यास हवी तशी स्थळे मिळण्यास (अन मिळाल्यास लग्न जुळण्यास) अडचणी येतात. अमेरिकेसारखी भाड्याच्या घरांची व्यवस्था असल्यास अनेक लोक भारतातही मोठ्या शहरात नोकरी सुरू असेपर्यंत भाड्याच्या घरात राहणे पसंत करतील असा अंदाज आहे. पण अशा सुधारणा होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाहीये.

In reply to by श्रीरंग_जोशी

धाग्यावर अवांतर नको. हा शेवटचा प्रतिसाद येथे. भाड्याने घर न मिळणे वगैरे सर्व प्रॉब्लेम्स मातं वाल्यांनाच येत असतील असे वाटत नाही. मला अनुभव नाही. माझा सांगायचा मुद्दा असा की मातंवाल्यांना जे प्रॉब्लेम्स असतात त्यापैकी बरेचसे त्यांनी जी लाइफस्टाईल निवडली आहे त्यामुळे निर्माण होतात. मातं वाल्यांच्या सर्वसाधारणपणे अधिक असलेल्या उत्पन्नांमुळे त्यांची buying power जास्ती असते आणि त्याची परिणती महागाई वाढण्यात होते आणि त्यामुळे इतरांनाही त्याची झळ बसते. त्यावर मातं वाल्यांनी आम्हाला आमचेही प्रॉब्लेम्स असतात हे सांगणे जरा चूक वाटते इतकेच. गूगलच्या विरोधात झालेले अमेरिकेतील उदाहरण फारसे जुने नाही. असो अवांतराबद्दल क्षमस्व.