Skip to main content

One Night Stand आणि आपण सगळे

लेखक पिंपातला उंदीर यांनी शनिवार, 16/08/2014 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला . मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?" तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ." परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध . आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला धक्के बसतात का ? माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते . बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत . सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own . आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल . भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते . इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो . आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो . इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे . पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत . हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे . भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की . कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो . लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34410
प्रतिक्रिया 134

प्रतिक्रिया

In reply to by सूड

प्रश्न गळे काढण्याचा नाही, स्वातंत्र्याचा पुरस्कार करतांना ज्या सामाजिक संस्थाना धक्का लागणार आहे, त्या योग्य अयोग्यतेचा आहे आणि येत्या काळात वर प्रतिसादात कोणी तरी म्हटल्या प्रमाणे समाज पुन्हा यु टर्न घेईल. राहिला प्रश्न वन नाईट.....चा याला एक वर्ग जे काही लपून छपून चालत आहे त्याला स्वातंत्र्याची गळचेपी नावाखाली अधिकृत मान्यता मिळवू पाहात आहे, माझं मत हे वन नाईट...चुक आहे कुटुंब संस्था उध्वस्त करण्याचा प्रकार आहे, स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार माजणार असेल तर मी तरी त्याचं समर्थन करणार नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>राहिला प्रश्न वन नाईट.....चा याला एक वर्ग जे काही लपून छपून चालत आहे त्याला स्वातंत्र्याची गळचेपी नावाखाली अधिकृत मान्यता मिळवू पाहात आहे, माझं मत हे वन नाईट...चुक आहे कुटुंब संस्था उध्वस्त करण्याचा प्रकार आहे, ओके, म्हणजे लग्न करुन मुलंबाळं असताना एखादी व्यक्ती (स्त्री/पुरुष कोणीही) बाहेरख्यालीपणा (ONS to be sugar coated) करत असेल तर आपलं काय म्हणणं आहे? दोघातल्या एकानं सावरुन धरलं म्हणून चारचौघात बरं दिसत असेल ते, पण असं कुटुंब असून नसून काय फरक पडतो? माझ्या प्रतिसादापुरतं लिहायचं झालं तर स्वातंत्र्याची गळचेपी वैगरे अशा अर्थानं मी लिहीलं नाहीये. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की ज्याला/जिला जे करायचं ते ती व्यक्ती करणारच, आपण इथं काथ्याकूट करुन शष्प फरक पडणार नाही. उद्या माझ्या घरात, मित्र-मैत्रिणीत अशी गोष्ट निदर्शनास आली तर मी मित्र/ नातेवाईक म्हणून 'फक्त एकदा' सल्ला देईन. पुढे आयुष्य त्या-त्या व्यक्तीचं आहे. >>स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार माजणार असेल तर मी तरी त्याचं समर्थन करणार नाही. ज्या व्यक्तीला हे करायचंच आहे त्याला समर्थन मिळो न मिळो, त्यातून काही फरक पडतो असं तुम्हाला वाटतं ? बर्‍याचदा घरातल्या घरात माझ्याच मताला महत्त्व मिळायला हवं असा अट्टाहास चाललेला असताना ज्यावर चर्चा चालू आहे त्या व्यक्ती आपल्या ओळखीपाळखीच्याही नाहीत, असं असताना आपल्या समर्थन देण्याचा न देण्याचा काय फरक पडतो? माझं म्हणणं असं आहे की आपल्याला काय करायचंय हे आपण आपल्या बाबतीत ठरवू शकतं, दुसर्‍याने काय करावं हे आपण कसं ठरवायचं? आणि ठरवलं तरी ती व्यक्ती तोंडदाखलं एक आणि माघारी एक असं वागणार नाही कशावरुन? ह्यापेक्षा तोंडावर सांगून असं करणार्‍या व्यक्ती अधिक योग्य, आपण जे करतोय ते कबूल करण्याचे गट्स त्यांच्यात असतात असंच मी म्हणेन.

In reply to by सूड

एखादी व्यक्ती (स्त्री/पुरुष कोणीही) बाहेरख्यालीपणा (ONS to be sugar coated) करत असेल तर आपलं काय म्हणणं आहे? दोघातल्या एकानं सावरुन धरलं म्हणून चारचौघात बरं दिसत असेल ते, पण असं कुटुंब असून नसून काय फरक पडतो? फरक पडतो. चारित्र्यावबद्दल अविश्वास निर्माण झाला की पती पत्नीमधे बेबनाव वाढू लागतात. संसाराचा सूर बदसूर होऊ लागतो. आणि परस्परापासून वेगळे होण्याची भावना बळावू लागते त्याचा परिणाम घटस्फोटापर्यंत पोहचतो आणि कुटुंबावर परिणाम होतो. मुलं, शिक्षण, घर खर्च आणि इतर प्रश्न निर्माण होतात. तेव्हा कोणाचाही बाहेरख्यालीपणा कुटुंबासाठी घातकच असतो. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की ज्याला/जिला जे करायचं ते ती व्यक्ती करणारच, आपण इथं काथ्याकूट करुन शष्प फरक पडणार नाही. आपणच म्हणता माझ्या ''मित्र-मैत्रिणीत अशी गोष्ट निदर्शनास आली तर मी मित्र/ नातेवाईक म्हणून 'फक्त एकदा' सल्ला देईन'' हा सल्ला तरी कशाला द्यायचा.ज्यांना कोणाला या विषयावर गळे काढणार्‍यांना काढू दिले पाहिजेत. कारण कोणाच्या प्रतिसाद अथवा चर्चेने जर कोणाला फरक पडत असेल आणि आपल्याला वाटत असेल की कोणाला शष्प फरक पडणार नसेल तर उगाच कशाला आपण कोणाकडून अपेक्षा करता की कोणी काय पावलं उचलली पाहिजेत. अपेक्षा करणंही , सोडून दिलं पाहिजे नाही का ? पण, तसं होतं नसतं आपणही या समुहाचे एक घटक असतो. पारंपरिक आणि नव्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडतच असतो. आपल्या ओळखीपाळखीच्याही नाहीत, असं असताना आपल्या समर्थन देण्याचा न देण्याचा काय फरक पडतो? आपल्या कोणी ओळखीचे असो की नसो उद्या जालावर वाचणारा वाचक जर अशा वन नाईट मधून जाणार असेल तर त्याला संबंधित गोष्टीत योग्य अयोग्य हे कळलचं पाहिजे, आपल्या समर्थन अथवा विरोधानाचे त्याला नक्की फरक पडतोच,पडतो. माझं म्हणणं असं आहे की आपल्याला काय करायचंय हे आपण आपल्या बाबतीत ठरवू शकतं, दुसर्‍याने काय करावं हे आपण कसं ठरवायचं? आपल्या आजुबाजुच्यांवर आपले आणि आपल्यांवर इतरांचा प्रभाव हा पडतच असतो. दुसरा काय करतो आणि दुसर्‍याने काय करु नये याबाबतीत एक प्रेशर या समाजाचं असतंच असतं तेव्हा दुसर्‍यानं काय केलं पाहिजे हे नक्कीच सांगता येतं. सारांश असा की गळे काढणा-यांना गळे काढू दिले पाहिजे, गळे काढू म्हणुन उगंच हिनवू नये असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>फरक पडतो. चारित्र्यावबद्दल अविश्वास निर्माण झाला की पती पत्नीमधे बेबनाव वाढू लागतात. संसाराचा सूर बदसूर होऊ लागतो. आणि परस्परापासून वेगळे होण्याची भावना बळावू लागते त्याचा परिणाम घटस्फोटापर्यंत पोहचतो आणि कुटुंबावर परिणाम होतो. मुलं, शिक्षण, घर खर्च आणि इतर प्रश्न निर्माण होतात. तेव्हा कोणाचाही बाहेरख्यालीपणा कुटुंबासाठी घातकच असतो. मी असून नसून काय फरक पडतो त्याचा अर्थ असं कुटुंब असून नसल्यासारखं आहे हेच म्हणायचंय. बाकी जे काही लिहीलंयत त्याबद्दल आपल्या मताचा नक्कीच आदर आहे. आपण म्हणताय तसं नुसतं वाचून लोकांना उपरती होणार असेल तर नक्कीच आनंद आहे. ॥इति लेखनसीमा॥ __/\__

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

दुसरे म्हणजे वन नाईट स्टॅन्डमधून गर्भधारणा झाली तर त्याचा त्रास बाईलाच होणार आणि पुरूष पळून जाऊन शकतो आणि नामानिराळा राहू शकतो.ज्या गोष्टीचा शेवटी स्त्रियांनाच त्रास होणार त्याच गोष्टीत अन्यथा स्त्रीमुक्तीचा उदोउदो करणार्‍यांना काहीच गैर वाटत नसेल तर याची विसंगती कशी सोडवावी?
अहो, कॉन्ट्रॅसेप्टीव्स असतात, कंडोम असतात, गोळ्या असतात.. ज्यांना "वन नाईट स्टॅन्ड" करायचाय ते घेतील की काळजी.. संभोग-स्वातंत्र्यावर माझे मत फक्त एवढेच आहे की त्याचा पुरस्कार करणार्‍यांनी डबल स्टँडर्ड्स ठेवू नयेत. "मी कॅसानोवा आणि बायकोनी मात्र पतिव्रता असावं" कींवा ह्याच्या उलट स्टॅन्डर्ड्स नसावेत. बाकी, नवरा किंवा बायकोपेक्षा वन नाईट स्टॅन्डवाला/ली "सरस" वाटला/ली आणि त्यातून मग गुंतागुंत वाढली तर काय ह्याचा एक तर विचार करुन ठेवावा किंवा त्या परिस्थितीला तोंड द्यायला खंबीर असावे..

In reply to by चिगो

अहो, कॉन्ट्रॅसेप्टीव्स असतात, कंडोम असतात, गोळ्या असतात.. ज्यांना "वन नाईट स्टॅन्ड" करायचाय ते घेतील की काळजी..
अहो लग्नाचे ’आमिष’ दाखवून बलात्कार केल्याची एकही बातमी ऐकली नाहीत का आतापर्यंत?काही स्त्रिया अशा भाबड्या जालामध्ये अडकतात आणि पुरूष त्याचा फायदा घेतात.आणि मुळात तसा फायदा घ्यायची पुरूषांची इच्छा नसेल तरी प्रत्यक्ष गर्भधारणा झाल्यानंतर मात्र टोपी फिरविणारे पुरूष तुम्ही कधीच कुठेच (निदान बातम्यांमध्ये तरी) बघितले नाहीत? कुसुम मनोहर लेले हे नाटक प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आहे हे तुम्हाला माहित आहे ना?तेव्हा या गोष्टीत जो काही त्रास होईल तो स्त्रियांनाच होईल आणि त्याचे कारण निसर्गाने गर्भाधारणा व्हायची सोय केवळ स्त्रियांमध्ये केली आहे. तेव्हा आपला कार्यभाग साधून नामानिराळे होणारे पुरूष जोपर्यंत आहेत तोपर्यंत या वन नाईट स्टॅन्डला समाजमान्यता नक्कीच मिळायला नको.आणि अशी तत्वे समाजात आहेत तोपर्यंत तो 'इतरांचा प्रश्न' म्हणून सोडून देणेही बरोबर नाही.कारण इतरांचा प्रश्न आपल्या जवळच्यांचा प्रश्न कधी होईल हे आपल्याला कळणारही नाही. उगीच आपण किती लिबरल आहोत हे दाखवायला असा विचार करणारे लोक बघितले की खरोखरच आश्चर्य वाटते.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

>>तोपर्यंत या वन नाईट स्टॅन्डला समाजमान्यता नक्कीच मिळायला नको. ओके ठिकाय, मान्यता मिळू नये म्हणून तुम्ही स्वतः काय पावलं उचलणार ते वाचायला आवडेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रियांनाही एका रात्रीपुरत्या शारीरिक संबंधांसाठी भावनिक गुंतवणुकीची आवश्यकता नसते. याचे बरेच पुरावे आहेत. आमच्या प्रतिसादातील सर्वसाधारण पणे हा शब्द तुम्ही वाचलेला दिसत नाही. म्हणूनच आम्ही म्ह्टले आहे की एखादी स्त्री नैतिकतेच्या पथावर नक्की कोठे उभी आहे हे महत्वाचे. पहिले वाक्य जर सोडले तर बाकी प्रतिसादातील सर्व वाक्य आमची आहेत. त्याब्द्द्ल बदनामीचा खटला भरायचा असेल तर आमच्यावर भरा ! बाकी सर्व मुल्ये व्यक्तिसापेक्ष, देश सापेक्ष, काल सापेक्ष असतात हे सांगायला जॉन्सन मास्टर कशाला हवेत ... ?

In reply to by चौकटराजा

चौरा, त्याला `विदाबाधा' म्हणतात. एकदा ती झाली की विद्याशिवाय बुंधाच हालत नाही! _____________________ आमचे एक विदाप्रेमी स्नेही आहेत, त्यांना खाजगीत `सदाविदा' म्हणतात, त्यांचा हा विनोद वाचा (आणि `वन नाइट स्टँडच्या' संदर्भात बघा!) म्हणजे तुम्हाला कल्पना येईल: __________________________ माणूस मोठा झाला तरी बालपणीच्या सवयी सुटत नाहीत हेच खरं. सदाविदाचं लग्न ठरलं. भावी पत्नीविषयी सामान्य पतीला असते तशी त्याला पण उत्सुकता होती. शेवटी न रहावून, एका निवांत क्षणी, त्यानं तिला विचारलंच, ‘लग्न होण्यापूर्वी आपण एकमेकांशी ओपन व्ह्यायला हवं, खरं की नाही? आता मला सांग, तुझा कुणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का?’ ती पण साधीच, सरळपणे म्हणाली, ‘छे, काही तरीच काय!’ ‘ओके, ओके, पण मला एक सांग, याचा तुझ्याकडे काही विदा आहे का?’ न रहावून सदाविदा बोललाच! ती बघतच राहिली! खरं तर `अल्विदा'च म्हणणार होती, पण तिच्या लक्षात आलं, याचं नांवच सदाविदा आहे! विदा मिळाल्याशिवाय याची गाडी पुढेच सरकत नाही. काय करणार बिचारी? आता पत्करलंय म्हटल्यावर म्हणाली, ‘सध्या तरी माझ्याकडे विदा नाही, जमला की तुला देईन हं नक्की.’ हा बागडू, पुढे का होईना `विदा ' मिळणार यावरच खुष! आणि त्या आशेवर लग्न करून मोकळा.... तर अशी सगळी परिस्थिती.

In reply to by संजय क्षीरसागर

चौरा, त्याला `विदाबाधा' म्हणतात. एकदा ती झाली की विद्याशिवाय बुंधाच हालत नाही! १++

In reply to by संजय क्षीरसागर

चौरा, त्याला `विदाबाधा' म्हणतात. एकदा ती झाली की विद्याशिवाय बुंधाच हालत नाही!
अरे मी चक्क संक्षींशी सहमत आहे :) अशा लोकांना व.पुंचे स्टॅटिस्टिक मराठे ऐकायला दिले पाहिजे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सिमोन द बुव्हाच्या सेकंड सेक्स चा कुठेच उल्लेख केला नाही त्याबद्दल मी आपला निषेध व्यक्त करतो. ;) मला इथे संदर्भासहीत प्रतिसाद लिहायचा आहे, ट्याम्प्लिज थोड्या वेळात हजर होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सिमोन द बुव्हाच्या सेकंड सेक्स चा कुठेच उल्लेख केला नाही त्याबद्दल मी आपला निषेध व्यक्त करतो.
=)) =)) =)) + १ अगदी हेच्च ,!!

आदिती ताई, दोन तर्हेचे शुक्राणू मानवी शरीरात असल्याचे वाचल्याचे आठवत नाही. याचा संदर्भ काही असेल तर माझे ज्ञान अद्ययावत करायला आवडेल. कारण कृत्रिम गर्भधारणा केंद्रात काम करीत असताना असे शुक्राणू वेगळे करता येतात असे वाचल्याचे आठवत नाही. मानव हा उत्क्रांतीमध्ये खूप पुढे पोहोचलेला आहे. या गोष्टी अपृष्ठ वंशीय( INVERTEBRATES) मध्ये असल्याचे आठवते. उदा. कोळी जेथे मादी दोन किंवा तीन नरांशी संग करते आणी त्यातील कोणत्या नराचे शुक्राणू "वापरायचे" ते ठरवते. कोळी नर सुद्धा दुसर्या नराचे शुक्राणू मादीच्या जननेद्रीयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व शक्य असण्याचे कारण त्या प्राण्यात योनी शौचालय आणी मूत्राशय एकाच असते( CLOACA). (उदा पक्षी गणात मुत्र आणी विष्ठा एकच असते)

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, बरे केलेत हा प्रतिसाद लिहीलात ते. नाहीतर माझ्यासारखी माणसे अश्या "रेटुन" सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवुन राहीली असती. आदिती ताईंच्या बाकीच्या पोष्टी पण नीट "लक्ष" देउन वाचल्या पाहीजेत.

In reply to by प्रसाद१९७१

त्यातला एक दणदणीत पुरावा म्हणजे स्पर्म्समध्ये दोन प्रकार असतात, एक मावळे आणि दुसरे फलन घडवू शकणारे. मावळ्यांचं कामच असं की इतर पुरुषांच्या फलन करणाऱ्या स्पर्म्सवर हल्ला करून त्यांना मारून टाकायचं. हे काम अर्थातच स्त्रीच्या योनीमार्गात करावं लागतं.
च्यायला, आता हा `दणदणीत पुरावा' कशाला पायजेल? आणि योनिमनीच्या गोष्टी कशापायी? लेखकानं साधी गोष्ट विचारली आहे,
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित .

In reply to by सुबोध खरे

संदर्भ - मी ज्या पुस्तकात हे वाचलं ते Evolutionary Psychology नावाचं पुस्तक डेव्हीड बस नामक संशोधकाने लिहीलेलं आहे. त्या पुस्तकात याचा संदर्भ असणाऱ्या रीसर्च पेपर्सची यादीही दिलेली आहे. पुस्तक माझ्याकडे आत्ता नाही म्हणून ती यादी देऊ शकत नाही. पण गूगलवर kamikaze sperms किंवा Sperm competition म्हणून शोधलंत तरी चिकार मिळतील. -----
अतिप्राचीन काळी चालणार्‍या अनेक गोष्टी होत्या ज्या आज चालू ठेवणे योग्य नाही
ज्या गोष्टी चालू होत्या त्या माणसाने जाणूनबुजून सुरू केल्या का 'स्वार्थी जनुकां'मुळे मनुष्यांच्या नकळत सुरू झाल्या. (उद्या म्हणाल, "अतिप्राचीन काळापासून हातातून काचेचा पेला निसटला तर खाली पडून फुटतो, आज हे चालू ठेवणे योग्य नाही." विनोदाचा भाग वगळता) ही जन्मजात, जनुकांमधून आलेली (खरंतर मीम, meme मुळे आलेली) मानवी वृत्ती आहे. ती आपल्या नैतिकतेच्या चौकटीत बसते का नाही याचा काहीही संबंध नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती ताई कामिकाझे शुक्राणूचे गृहीतक बर्याच वर्षापूर्वी नाकारले गेलेले आहे कारण पुढे केलेल्या संशोधनात असे आढळले कि दोन किंवा अधिक पुरुषांचे शुक्राणू एकत्र केले तरी त्यातील "इतर" शुक्राणू दुसर्या पुरुषाच्या शुक्राणुना मारू शकत नाहीत. याच गृहितकावर तर शुक्राणू पेढी अस्तित्वात आहेत आणी चालू आहेत. मानस शास्त्रज्ञ आणी त्यांच्या बर्याचशा उपपत्ती किंवा कारण मीमांसा अजून गूढच आहेत. असो या पलीकडे विषयांतर नको

In reply to by सुबोध खरे

कामिकाझे शुक्राणूचे गृहीतक बर्याच वर्षापूर्वी नाकारले गेलेले आहे कारण पुढे केलेल्या संशोधनात असे आढळले कि दोन किंवा अधिक पुरुषांचे शुक्राणू एकत्र केले तरी त्यातील "इतर" शुक्राणू दुसर्या पुरुषाच्या शुक्राणुना मारू शकत नाहीत.
संदर्भ? सध्या, किंवा गेल्या हजार-दोन हजार वर्षांत मावळे शुक्राणू कसे वागतात यातून उत्क्रांतीजन्य कारणांचा अभ्यास करता येईलच असं नाही. दोन प्रकारचे शुक्राणू हा उत्पन्न झाले असतील याची कारणमीमांसा शोधण्याचा हा प्रयत्न आहे; त्याचं इतर कोणतं चांगलं उत्तर, कारण मिळेपर्यंत हे उत्तर नाकारण्याचं काहीही कारण दिसत नाही. त्याशिवाय त्याला अन्य कारणांची जोड आहेच. पाच-पन्नास वर्षांमध्ये माणूस काय करतो, शरीरात काय होतं याचा उत्क्रांतीजन्य कारणांशी थेट संबंध असेलच असं नाही.
मानस शास्त्रज्ञ आणी त्यांच्या बर्याचशा उपपत्ती किंवा कारण मीमांसा अजून गूढच आहेत.
इतपत भोंगळ* विधान विज्ञान शिकलेल्या, आणि रोजच्या आयुष्यात वापरणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षित नव्हतं. *भोंगळ हे विधानाचं विशेषण आहे. कारण त्याला काहीही आगापीछा नाही. उत्क्रांतीजन्य मानसशास्त्र, खरंतर उत्क्रांती झाली हेच नाकारणारे अमेरिकन, कट्टर धार्मिक ख्रिश्चन असली भंपक विधानं करतात. पण ते त्यांच्या प्रकृतीशी मिळतंजुळतं असल्यामुळे अजिबात आश्चर्य वाटत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही म्हणजे आम्ही थेट भोंगळ वगैरे आहोत ते मान्य आहे , पण 'वन नाईट' स्टॅण्ड घ्यायचा असल्यास माणसाच्या 'पाचपन्नास वर्षाच्या' लाईफशी कदाचित थोडाफार संबंध येईल पण हजार दोन हजार वर्षांत मावळे शुक्राणू आणि उत्क्रांतीचा अभ्यास वगैरे जरा अवघडच प्रकार आहे ना? निसर्गत: काय होतं त्यापेक्षा असलेल्या मेंदूच्या साहाय्यानं केलेल्या विचारावर 'वन नाईट स्टॅण्ड/ कॅरीअर' काय ते अवलंबून जास्त असेल ना? असलेली अथवा नसलेली किंवा कशीही नैतिकता मेंदूच्या साहाय्यानं बुद्धीच्या जोरावर आज, आत्ता काय करायचं ते ठरवायला मदत करेल ना?

In reply to by प्रमोद देर्देकर

--ज्या धाग्यात गांधी सावरकर ब्राह्मण वेद बुप्रा गांधीवध गोडसे ५५ कोटी आसिँधुसिंधु संस्कृतभाषा आर्य अनार्य द्रविड हिरवे भगवे लाल निळ्या क्रांत्या इत्यादी शब्द/विषय येत नाहीत तो धागा पंचशतकी होत नाही-- , ..नानामृतातून साभार!

In reply to by नानासाहेब नेफळे

..नाना तुझे या चर्चेत स्वागत असो....... आता तु तुझे अमृत इथे सांडलेच आहेस तर मी खात्रीने सांगतो हा धागा नक्कीच पंचशतकी होइल, यात काय शंका ..?? कारण फक्त तुझीच उणीव या चर्चेत भासत होती, आता तु इथे उगवला आहेस तर हे तमाम 'मिपामंडळ' तुझ्या दिव्य ज्ञानप्रकाशात न्हाउन निघो व उत्तरोउत्तर वर्धिष्णु होवो.......!!!!!! अशी आशा करतो. (नान्या नेफळाप्रेमी) विनोद१८

http://www.psychologytoday.com/blog/how-we-do-it/201310/kamikaze-sperms… अदिती ताई एक विदा देत आहे. बर्याच आहेत. मुळात कामिकाझे शुक्राणू असते तर शुक्राणू पेढीत मिश्रण केलेले शुक्राणू(POOLED) वापरता आलेच नसते. पहा पटले तर नाही तर सोडून द्या मानस शास्त्रज्ञ हा शब्द चुकून वापरला त्याऐवजी मानस शास्त्र असे वाचावे. आणी मी लिहिले आहे याचे महत्त्वाचे कारण मानवी मनावर अभ्यास करता येईल असा कोणताही प्राण्याचाआदर्श किंवा नमुना( ANIMAL MODEL) मानवी मेंदूच्या जवळपासही येत नाही. यामुळेच फ्रोईड पासून अनेक शास्त्रज्ञानी आपल्या अनुभवातून मांडलेल्या उपपत्त्ती नन्तर त्याज्य ठरवल्या गेल्या. यात मानस शास्त्र किंवा मानस शास्त्रज्ञ यांची चूक नाही. मोठे मोठे शब्द मला वापरता येत नाहीत पण मानस शास्त्राचा आपला अभ्यास असावा असा कयास आहे. अजाणतेपणे आपल्या वर्मावर बोट ठेवले गेले असेल तर क्षमस्व.

कल्पना विलास. ही कल्पना कोण ते मला आइशप्प्थ माहीती नाही ओ. `वन नाइट स्टँड' पेक्षा मला "७० डे नाईट स्टँड्" भावले. मी आधी कुठलाही धागा न काढ्ता जाउन आलो. आन मग स्वतःच गावभर बोंब ठोकली. पहा आमची पहीली परदेशवारी!!! नशीबाने कोणीतरी भक्ताने ती अलीकडेच वरती आणलीय, फक्त वाचल्यावर कोणताही स्टँड घ्या किंवा घेउ नका. आपल्या जबाबदारीवर करा म्हणजे झालं. लोक काहीबी बोलत्यात पण मी सांगतो आपला या कल्पनाशी काहीही संबंध नाही हो. पण कुरुक्षेत्र ब्राझील असल्याने आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल . असं काही मनाला शिवलेसुद्धा नाही बॉ.

In reply to by विलासराव

हा प्रश्न मुख्यत्वे विवाहितांना अ‍ॅप्लिकेबल आहे. अविवाहितांना एक्स्प्लोरेशनच्या सबबीवर बर्‍यापैकी मोकळीक आहे. म्हणजे लफडेबाज आहे इतपत बदनामी होऊ शकते, पण संसाराचा राडा होण्याची शक्यता नाही. तस्मात, तुमचं "असं काही मनाला शिवलेसुद्धा नाही बॉ" म्हणणं सहाजिक आहे. सामान्यतः तुमच्या जागी कुणीही असता तरी नैतिकचा किंवा संस्कृतीचा प्रश्न उद्भवला नसता.

In reply to by संजय क्षीरसागर

>>>>>हा प्रश्न मुख्यत्वे विवाहितांना अ‍ॅप्लिकेबल आहे. अविवाहितांना एक्स्प्लोरेशनच्या सबबीवर बर्‍यापैकी मोकळीक आहे. म्हणजे लफडेबाज आहे इतपत बदनामी होऊ शकते, पण संसाराचा राडा होण्याची शक्यता नाही. तस्मात, तुमचं "असं काही मनाला शिवलेसुद्धा नाही बॉ" म्हणणं सहाजिक आहे. सामान्यतः तुमच्या जागी कुणीही असता तरी नैतिकचा किंवा संस्कृतीचा प्रश्न उद्भवला नसता म्हण्जे नैतीकता आणी संस्कृती या विवाहोत्तर गोष्टी आहेत काय? विहाहपुर्व नाहीत बरोबर का? की काही प्रमाण कमी जास्त अस्ते दोन्हीत विवाहोत्तर किंवा विहाहपुर्व. उत्तर द्या किंवा देउ नका. माझा पास.

In reply to by विलासराव

म्हण्जे नैतीकता आणी संस्कृती या विवाहोत्तर गोष्टी आहेत काय? विहाहपुर्व नाहीत बरोबर का? की काही प्रमाण कमी जास्त अस्ते दोन्हीत विवाहोत्तर किंवा विहाहपुर्व.
विवाहपूर्वकालात, जिथे विवाहाचा शब्द दिलेला नाही किंवा ते प्रयोजनच नाही तिथे नैतिकता कुठे येते? दोघांना मजा करायचीये, दोघंही राजी आहेत, समाज गेला फाट्यावर. पण विवाहितांना असं करता येणं शक्य नाही. मग संस्कृती पौर्वात्य असो की पाश्चिमात्य, माणूस इथून तिथून सारखाच आहे. एकदा लपवाछपवी सुरु झाली की नात्याची वाट लागलीच म्हणून समजा!

In reply to by विलासराव

विलासराव ज्या मुलीचे सत्तर डे स्टेन्ड आहेत अशी मुलगी आपल्याला किंवा आपल्या भावाला सांगून आली तर आपण तिच्याशी लग्न कराल काय? हा प्रश्न एक प्रातिनिधिक आहे विलासराव या व्यक्तीला नाही. यावरून समाजमनाची काय स्थिती आहे ते कळेल. हाच प्रश्न एखाद्या मुलीच्या बापाला विचारता येईल कि ज्या इसमाचे ७० डे स्टेन्ड आहेत अशा माणसाशी आपण आपल्या मुलीचे लग्न करून द्याल का ? शेवटी ज्या गोष्टीत आपल्याला लपवाछपवी करावी लागते अशी गोष्ट आपण करावी का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संस्कृती पावित्र्य इ इ मोठे मोठे शब्द आहेत.( मला न समजणारे).

In reply to by सुबोध खरे

तर स्वतःला एक प्रश्न विचारुन पाहा, असे स्टँडींग अनुभव गाठीशी असलेली पत्नी (किंवा पती) पत्करायला किती जण राजी होतील? शक्यतो स्टँडींगवालेच राजी होतील. कारण संभाव्य धोके कुणालाही सहज दिसतील. आणि समजा राजी झालेच, तर हा आऊटस्टँडींग सिलसिला विवाहोत्तर थांबण्याची शक्यताच नाही. मग लग्न कशाला करायचं?
अर्थात, तुम्ही हे माझ्या पेक्षाही सोपं आणि सरळ केलंय :
शेवटी ज्या गोष्टीत आपल्याला लपवाछपवी करावी लागते अशी गोष्ट आपण करावी का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
सलाम!

In reply to by सुबोध खरे

>>>विलासराव ज्या मुलीचे सत्तर डे स्टेन्ड आहेत अशी मुलगी आपल्याला किंवा आपल्या भावाला सांगून आली तर आपण तिच्याशी लग्न कराल काय? हा प्रश्न एक प्रातिनिधिक आहे विलासराव या व्यक्तीला नाही. यावरून समाजमनाची काय स्थिती आहे ते कळेल. भावाला सांगुन आली तर त्याने निर्ण्य घ्यायचाय मी नाही. हा प्रश्न एक प्रातिनिधिक आहे विलासराव या व्यक्तीला नाही. त्यामुळे पास. यावरून समाजमनाची काय स्थिती आहे ते कळेल. हा विचार मी माझ्या स्वार्थातुन करतो. फार नूकसान तेही मानसीक/शारिरिक /आर्थीक मला झेपणार असेल तर करतो. नसेल तर नाही करत.कारण हेच शेवटी ज्या गोष्टीत संस्कृती पावित्र्य इ इ मोठे मोठे शब्द आहेत.( मला न समजणारे). त्या मी सोडुन देतो.

ऐसी अक्षरे या संकेत स्थळावर धाग्याच्या अनुषंगाने एक पोल सुरु झाला आहे . लोकांनी तिथे जाऊन मत नोंदवले तर आंतरजालावरील लोकांच्या मनाचा कल काय आहे याचा अंदाज येईल . धाग्याची लिंक देत आहे - http://www.aisiakshare.com/node/3170 असा पोल इथे सुरु करता येऊ शकतो का ?

In reply to by पिंपातला उंदीर

पोल घेवून काय घंटा साध्य होतं? नुसता (बदाबदा) विदा जमतो. असला फालतू विदा, तोही आयडेंटिटी दडवून जमा केलेला काय कामाचा? असले पोल बघून निर्णय घेणारे आणि स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवणारे शुद्ध बावळट असतात. कारण त्यांना स्वतःचं मतच नसतं! काही झालं की बघा डेटा, म्हणजे पब्लिक काय करतंय यावर यांचा निर्णय! आणि समजा आला पोल वन नाईट स्टँडच्या फेवरमधे, तर हे काय गळ्यात पाटी अडकवून फिरणार का, `आय एम रेडी फॉर वन नाईट स्टँड' (आणि का तर म्हणे `आय हॅव अ फेवरेबल डेटा!)

In reply to by संजय क्षीरसागर

जोरदार टाळ्या. जाम हसतोय हो संक्षी. हे लोक हनीमुनलाही विदा घेउन बसतील्/मागतील. तहान लागलीय तर सरळ पानी नाही पिणार त्या पाण्याचं विश्लेषन करणार. विदा मागणे काही ठीकाणी बरोबर असेल कदाचीत पण प्रत्येक गोष्टीत नसावे. कुठल्याशा सिनेमामधे: जॉनी लीव्हर नाव कसे कमवावे हे कोणाला तरी विचारतो. तो मनुष्य सांगतो गावात एक वृद्ध महीला मरन पावली. मी तिथे जाउन असे बोललो की ही फक्त या व्यक्तीची आई नव्ह्ती तर माझी आई होती, सोम्याची आई होती, गोम्याची आई होती सगळ्या गावाची आई होती. हा ते लक्षात ठेवतो आनी संधीच्या शोधात असतो. लवकरच ती संधी त्याला मीळतेही, गावातील कोणाचीतरी तरुण बायको मरण पावते हा तिथे जाउन भाषण ठोकतो की ही फक्त या व्यक्तीची बायको नव्ह्ती तर माझी बायको होती, सोम्याची बायको होती, गोम्याची बायको होती सगळ्या गावाची बायको होती. आनी भरपुर नाव कमावतो. आता यानंतर काय झाले याचा विदा मागु नका म्हणजे मिळवली. तरीही माझ्याकडे काहीही विदा नाही हे मी सांगुन ठेवतो.

In reply to by विलासराव

कुठल्याशा का हो? चांगला हिट पिक्चर होता "अनाडी"! मद्राशी हिरो "व्यंकटेश"चा.

In reply to by असंका

काय आठवण काढलीत! अनाडी पिक्चर बकवास होता. पण वेंकटेश आमचा आवडता. त्याचा भानुप्रियाबरोबरचा स्वर्णकमलम कोण विसरेल?

In reply to by पिंपातला उंदीर

पोलचे पर्याय फारच कन्फ्युजिंग आहेत उदा. 'निश्चित नाही' म्हणजे - 'वन नाईट स्टँड निश्चितच घेणार नाही' आणि 'वन नाईट स्टँड घेणार की नाही हे अजुन निश्चित नाही' कसाही अर्थ निघु शकतो.. नक्की काय समजायच?? त्यावर अभिप्रेत प्रश्न आणि आणखी पर्याय देउन संभ्रम खूपच वाढवलाय असं वाटतं.

In reply to by बाळ सप्रे

पोल थोडा गोंधळाच वाटतोय. आणि तिथे एकापेक्षा जास्त पर्याय निवडाय्चे असतील तर गोन्धळ अजून वाढेल.

जगात फार कॉन्झर्व्हेटिव्ह लोक असतात (उदाहरणार्थ मुलामुलींनी बोलले तरी संस्कृती बुडते अशी ओरड करणारे) आणि दुसर्‍या टोकाला अती लिबरल लोक असतात (उदाहरणार्थ या लेखावर प्रतिक्रिया देणारे काही). माझा या दोघांनाही अगदी टोकाचा विरोध आहे. तरीही त्यातल्यात्यात हे अती लिबरल लोक जास्त डेंजरस असतात. असले लिबरल लोक म्हणजे दुसर्‍या टोकाची खाप पंचायतच आहे. (संपादित)

वैयक्तिक जीवनात ज्या मुलीवर प्रेम केले तिच्याशीच विवाह केला. ७८ ते ८१ ह्या विवाहपूर्व काळात संधी असूनही दोघांनीही कधी मर्यादा ओलांडली नाही. विवाहोत्तर अशी संधी (लेखात अपेक्षित असलेली) कधी आली नाही. आली असती तरी पत्नीचा आणि मुलाचा विचार करून असा प्रसंग टाळलाच असता. लहानपणापासून आई-वडीलांचे, शिक्षकांचे, वाचलेल्या साहित्याचे आणि संगतीचे संस्कार चांगलेच होते त्यामुळे मनाची कधी द्विधा अवस्था झाली नाही. मला वाटतं, आपल्या समाजात, माझ्यासारखे बहुसंख्य आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

जिच्यावर प्रेम केले तिचाशीच लग्न केले हे वाक्य टाकून पेठकर काका काय साधलंत ? अहो अनेक दु: खी जिवांच्या भूतकाळातील जखमेची खपली.......वगैरे वगैरे..... बाकी ७८ ते ८१ पुण्यात होतात की ममईत...? कारण ममईत " संधी" मुंबईचा जावई चा काळात देखील नव्हती मग ७८ ला कुठून ???

In reply to by चौकटराजा

>>>>जिच्यावर प्रेम केले तिचाशीच लग्न केले हे वाक्य टाकून पेठकर काका काय साधलंत ? मिपावर वैयक्तिक जीवन जास्त उघड करू नये एव्हढेच.

One Night Stand >>> हायला ह्या असल्या सगळ्या गोष्टी आम्हाला कशा पहायला मिळत नाहीत देव जाणे ... आमचे मित्र तर भरभरुन चर्चा करत असतात अन एन्जोयही !! बहुतेक आम्हीच लई शामळु असल्याने किंव्वा खयाली पुलाव करत बसतो !!

In reply to by प्रसाद गोडबोले

>>आमचे मित्र तर भरभरुन चर्चा करत असतात अन एन्जोयही !! लेखकानं काय वेगळं केलंय!! केलं कोणी, त्याची चर्चा इथे!! आपल्याला काय करायचंय हे ज्याचं त्याने आपापल्या जबाबदारीवर ठरवावं. अमक्या तमक्याने काय केलं त्याचा इथे काथ्याकूट करत बसण्यात काय हशील आहे.

In reply to by सूड

अमक्या तमक्याने काय केलं त्याचा इथे काथ्याकूट करत बसण्यात काय हशील आहे. >>> शतप्रतिशत सहमत !

In reply to by प्रसाद गोडबोले

जाता जाता -- एक पन्नाशीचा जाट डॉक्टरकडे आला आणि म्हणाला "डॉक्टर आजकाल कमजोरी लगती है". डॉक्टर --"ताऊ, हट्टा कट्टा तो लग रहा है" जाट --"नही, रात मे कमजोरी है. आजकाल हप्ते मे तीन बार हि सेक्स हो पाता है" डॉक्टर "फिर क्या तकलीफ है" जाट-- " मेरा पडोसी तो हप्ते मी ७ बार करता है ऐसे बोला " डॉक्टर--" ताऊ, तुने देखा क्या? जाट -- "नही, देखेगा कैसे" डॉक्टर --"फिर तुभी बोल, मै हफ्ते मे १० बार करता हुं. तात्पर्य ओ एन एस बद्दल जितकी शेखी मिरवली जाते तितकी वस्तुस्थिती असत नाही. दुसरी गोष्ट -- वैवाहिक संबंधात शरीर संबंधांचे प्रमाण हे नुसत्या/लीव्ह इन नात्यांच्या पेक्षा किती तरी जास्त असते. (sex is available on tap). सलमान खान ( इथे कोणताही नट किंवा कासानोव्हा घ्या) च्या १५ मैत्रिणी झाल्या असतील पण प्रत्यक्ष संबंध १०-१५% च्या वर जात नाही. हि माहिती CARC ( center for AIDS Research and Control) के इ एम रुग्णालय बरोबर काम करताना मिळाली होती. (साल १९९४). आजही यात फार बदल झाला असेल असे वाटत नाही. बाकी काथ्याकुट चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

IIPS (इन्डियन इन्स्टित्युट ऑफ पॉप्युलेशन सायन्स) मध्ये काम करणार्‍या काहीजणांकडूनही अशीच 'आश्चर्यकारक' टक्केवारी ऐकायला मिळाली आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉ. साहेब, शरीरसंबंध येणं हे 'पुढचं पाऊल' नसतं काय? त्यातसुद्धा 'एक विशिष्ट क्रिया' झाली तरच संबंध आला अन्यथा नाही असं जे दुटप्पी धोरण आहे त्याला फारसा अर्थ उरु नये. माझ्या मते बर्‍याचदा वैचारिक/ मानसिक पातळीवर झालेली गुंतवणूक जास्त 'व्यभिचारी' (धोकादायक)असते. शारीर पातळीवर त्याची फक्त अभिव्यक्ती होते. बर्‍याचदा वैचारिक उलाढालींनंतरच शारीर पातळीवर काही गोष्टी घडून येतात. स्वतःशी प्रामाणिकपणा ठेवून विचार केला तर संबंधांशिवाय देखील तितकाच इंद्रियानंद हल्ली विविध माध्यमातून मिळवत आहेत लोक आणि त्याला खरंतर नाही ना काही केलं असं पांघरुण घालत आहेत. (हे वन नाईट स्टॅण्डचं समर्थन नाही)

समूहावर कोणी वन नाईट स्टँडचा स्वानुभव असलेला असेल तर त्याचे मत वाचायला आवडेल ! जर तो पुरुष असेल तर एकदा हा अनुभव घेतल्यावर त्याची प्रत्येक स्त्रीकडे बघण्याची नजर बदलली आहे का?

In reply to by टवाळ कार्टा

माझा अनुभव असता तर केला असता शेअर, पण साले आपल्या मराठी मिडलक्लास लोकांचे गटस इथेही कमी पडतात .. आपली धाव फ्लर्टींग पर्यंतच .. कुठलाही स्टँड घ्यायचा म्हटले की आपण मागे हटतो.

डोळे लाजभरे,सलज्ज नेत्रपल्लवि विसरु लागले डोळे का आता सावजे, हेरु लागले तुझे धिट डोळे अंगभर पदर,किति गोड विनयी होति देहबोली ढाळुन पदर,दाखवित उरोज,खुणवु लागले डोळे तो भाव प्रेम समर्पणाचा,विसरले तुझे डोळे सार शरीर आता ,ओरबाडु लागले तुझे डोळे सात जन्माची सोबत कशी विसरले .तुझे डोळे रात्र भर पुरे सोबत ,का म्हणु लागले तुझे डोळे avinash

नारायण ! नारायण ! घोर कलियुग आलयं हो ! असं म्हणुन मी माझे १८ शब्द संपवतो ! ;) बाकी चालु ध्या.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

In reply to by मदनबाण

नारायण ! नारायण ! घोर कलियुग आलयं हो !
यावरून दैत्य जालंदर, त्याची पत्नी वृंदा, भगवान विष्णूंची "युक्ती", तुलसी विवाह असं बरंच काही वाचलेलं आठवलं.

हुच्चभ्रू लोकांमधे हॉटेल्समधे एस्कॉर्ट्स, कॉल गर्ल्स यांना बोलावले जाते. त्याला बहुधा वन नाईट स्टँड म्हणतात. तसेच ट्रक ड्रायव्हर वेश्येकडे जातात, बलात्कारी लोक सावज हेरून बलात्कार करतात. हा पण वन नाईट स्टँड म्हणायचा का? त्यांच्यासाठी ती शारीरिक गरज असते. भावनिक गुंतवणूक शून्य. यातला एकजण पैसे देतो, दुसरा देत नाही. एवढाच फरक. कॉल गर्ल्स आणि रस्त्यावरच्या वेश्या यांच्यात तात्त्विकदृष्ट्या काय फरक आहे?

In reply to by पैसा

वेश्या आणि कॉलगर्ल्स या पैशाच्या बदल्यात तुम्हाला शरीरसुख देतात. त्यांना संभोगाची इच्छा नसली तरीही. त्यांच्यासाठी तो केवळ एक व्यवसायाचा भाग असतो. त्यातून त्यांना सुख मिळत नसावे. (मी कधी गेलेलो नाही पण काही डॉक्युमेन्ट्रीज आणि वाचनातून असे वाटते) One night stand मधे दोघांनाही शरीरसुख हवे आहे आणि ते राजीखुशीने एकमेकांना देतात. बळजबरी नसते. पैसा नसला आणि कोणी राजी होत नसताना केलेला संभोग म्हणजे बलात्कार. या न्यायाने बर्‍याचदा लग्न झालेल्या जोडप्यांमधेही बलात्कार होतच असतात.

ज्या व्यक्तीला (स्त्री अथवा पुरूष) हे प्रकरण जमतं, झेपतं वा निस्तरता येतं त्यानं ते करावं. बाकीच्यांनी ह्या फंदात पडू नये. सोप्पयं.

धाग्याची वास्तुशांत झालेली दिसतेयं. सं.मं.चे तहे-दिलसे आभार!

भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की....... भारतीय समाजव्यवस्थेत अनेक गोष्टी आल्या आणि गेल्या ज्या उत्तम होत्या त्या टीकल्या आणि काही काळानंतर काही नवीन बदल झाले असतील जे टीकणारे नव्हते ते सर्व कालौघात विरुनही गेले. समाजात स्त्री-पुरुषाचे संबंध स्वेच्छाचाराचे आणि अनिर्बंध अशा स्वरुपाचे होते असे म्हणतात. वैदिक वाड्मयात असे उल्लेख नाही म्हणतात परंतु त्या पूर्वी असा समाज होता. अदिपर्वात ''पंडु राजा कुंतीला म्हणतो की पूर्वयुगात स्त्रीया कोणाच्या बंधनात नसत, त्या इच्छेला येईल त्याप्रमाणे वर्तन करत करीत, एका पुरुषाचा त्याग करुन दुसर्‍याच्या मागे जात आणि अशी स्थिती पंडूच्या वेळेला सुद्धा उत्तर कुरुक्षेत्रात होती'' म्हणजे असा समाज कधीतरी इथे होता. अशा समाजाला नियमने करण्याची कोणाला तरी गरज पडली त्यांनी कारण सांगतांना मनुष्याला 'देवप्रित्यर्थ यज्ञ' करता यावा आणि 'संतती उत्पत्तीसाठी' विवाह केला पाहिजे असे एक निमित्त केले आणि पुधे विवाह सुरु झाले. विवाहाचा हेतु सांगतांना धार्मिक कृत्य दोघांनी मिळुन केली पाहिजेत, असे नियम घातले हेतु एकच होता की पतीपत्नी यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांची सोबत करावी. पुढे विवाहाचे प्रकार सांगितले तो आपला विषय नाही. पण स्वैराचाराला नियमन आवश्यक म्हणुन समाजाने विवाह ही संस्था निर्माण केली. वन नाइट स्टँडच्या बाबतीत फ्रॉइडच्या मनाच्या विश्लेषणाच्या विचार केला पाहिजे तो म्हणतो की 'मानवाच्या अतृप्त आशा आकांशा , वासना या अचेतन मनात सुस्थितीत असतात आणि संधी मिळताच त्या प्रकट होत असतात'' वन नाईट वाला मग 'तो' असो की 'ती' असो संधी मिळाली की ती प्रत्यक्ष येणारच. माणसाला संगीत आवडतं, चित्रपट पाहावे वाटतात प्रत्येकाची अभिरुची वेगवेगळी असते तेव्हा प्रत्येकच वन नाईट...ला जाणार नाही. पण समाजशास्त्राचा अभ्यासक स्ट्राँग असे म्हणतो की ''आवडी मधे सुखाची भावना असते व ती प्राप्त करण्यासाठी काहीतरी करण्याची गतिशील प्रवृत्ती असते'' अशी ही माणसं आपलं क्षणिक आवड जोपासण्यासाठी वन नाईटला सामोरं जातात. काही प्रतिसादात उल्लेख आला तसं म्हणता येईल की आज वन नाईट स्टँडला विरोध करण्याचं कारण नाही असे म्हणु पण सुरक्षितता पाळुनही काही जोखीम उचलायची ठरली तर त्याचे परिणाम उचलण्याची क्षमता 'त्या' किंवा 'ती'मधे असते का, तर नसते असं मला वाटतं. आज लेखातली दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करुन राहिले आहेत पण चटक लागली तर आयुष्यात त्याचे परिणाम सध्याच्या समाजहिताच्या दृष्टीने व्यभिचाराचे असे ठरेल असे वाटते. आणि एकदा की एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयाची चटक लागली की मग त्यातुन सुटका नाही. उदा. म्हणुन ज्याने अगदी मद्याचा छोटा पहिला पेग रिचवला असेल आणि आज तो नियमित एक क्वॉर्टरवर आला असेल त्याला आज पिणं सोडायचं असेल तर तो ते सोडु शकत नाही. कमी करतो म्हणेल प्रमाण पण सोडतो असे होणार नाही, अर्थात अपवाद आहेतच. खुप घेत होता पण आज एक थेंब घेत नाही, ही उदाहरणे आपल्या आजुबाजुला असतात. वन नाईट वाल्यांनी भरपूर मजा करुन घेतल्यानंतर आयुष्यभर आपल्या सहकार्‍याशी ते एकनिष्ठ राहात असतील तर चांगलीच गोष्ट. पण सवयीला माणसाचा दुय्यम स्वभाव असे समजल्या जाते. ही सवय केव्हा वर उफाळुन येईल याची काही शाश्वती नसते. सवय माणसाच्या भल्याबुर्‍या वर्तनाला वळन देत असते आणि एकदा जडलेली सवय लवकर नष्ट होत नसते. माणुस सवयीचा गुलाम होऊन बसतो. समाजशास्त्रात सामाजिक संस्थांच्या जवाबदारीत विवाहाबद्द्ल बरेच लिहिल्या गेले आहे. कोणत्याही समाजात स्त्री पुरुषांनी अविवाहित राहणे कमीपणाचे लक्षण मानले गेले आहे. आता त्या विषयात फारसा दम उरलेला नसला तरी विवाहबाह्य संबंधाने जन्माला आलेल्या संततीबाबत प्रत्येक समाज हा नाखूश दिसतो. आपल्याच समाजव्यवस्थेत समुह संबंध, समुह विवाह संबंध, नावाचा प्रकार पूर्वी होता. समूह विवाह प्रकारात स्त्रीयांचा एक समूह पुरुषांच्या दुसर्‍या समुहाशी विवाह करतो. या विवाह प्रकारात स्त्री-पुरुषात समूहातील कोणत्याही स्त्री पुरुषाबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याची अनुमती असते. स्त्री समूहातील प्रत्येक स्त्री-पुरुष हे सर्वांचेच समाईक पती-पत्नी असतात. समाजशास्त्राचे अभ्यासक असे म्हणतात की या प्रकारात पालनपोषणाची जवाबदारी नव्हती आणि म्हणुनच एक एकविवाह पद्धतीत पुढे पत्नीबरोबरच्या संबंधात नुसते लैंगिक संबंध नव्हे तर तिच्यापासून होणा-या संततीची जवाबदारी स्वखुशीने व जाणीवपूर्वक स्वीकारली गेली. वन नाईट स्टँडनमधे अपघाताने निर्माण झालेली संततीची जवाबदारी कोणीच घेणार नाही. शब्दप्रयोगाबद्द्ल मला क्षमा करा पण अशा स्त्रीयांना वेश्या का म्हणु नये. म्हणजे उच्चभ्रू वर्गातील असतील म्हणुन त्यांना काही म्हणायचे नाही. आणि इतर स्त्रीया लैंगिक संबंधाच्या बदल्यात मोबदला मिळवितात म्हणुन त्यांना तसा शब्द वापरला पाहिजे, असं काही असतं का..! म्हणजे पुरुष असे करत असतील तर त्यांनाही काही एक शब्द असायलाच हवा होता ज्यामुळे पुरुष नावाच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असता, परंतु पुरुषसत्ताक पद्धतीने पुरुषांच्या प्रतिष्ठेला धक्का बसणारं काही आलं नाही. स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू म्हणुन तिच्याकडे पाहिलं गेलं तिला दुय्यम स्थान दिलं म्हणुन पुरुषांनी काही केलं तरी चालतं स्त्रीयांनी मात्र नियमने पाळली पाहिजेत असं ते झालं. पारंपरिक समाजजीवनात विवाहाकडे बघण्याचा दृष्टीकोन पवित्र असा होता. अपरिचित दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र येतात म्हणजे परमेश्वराचा आशिर्वाद समजल्या जायचा. विवाह एक धार्मिक बंधन होते, असे हे धार्मिक बंधने तोडणे पाप होते. अर्थात आता पाप पुण्य, धार्मिक बंधन,परमेश्वराचा आशिर्वाद नसला तरी विवाहाच्या निमित्ताने एक सुरक्षितता स्त्रीला लाभत होती, समजल्या जात होती. अर्थात अशा विवाह झालेल्या स्त्री पुरुषांचे विवाह होऊनही सर्वच बाबतीत समाधान झाले असे म्हणता येणार नाही, ती काहींच्या बाबतीत अ‍ॅडजेसमेंट होती आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसेल म्हणुन अनेकांनी अनेक गोष्टी केवळ समाजातील नियमने म्हणुन सहन केल्या यात पुरुषाची आणि स्त्रीचीही ससेहोलपट झालीच झाली. आधुनिक जीवनात स्त्री-पुरुष समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे आणि विविध सुख सवलतींमुळे स्त्री पुरुषांच्या बरोबरीने घराबाहेर पडली. शिक्षण,राजकारण,मनोरंजन, नोकरी, कार्यालये इथे काम करता करता कामाच्या ठिकाणी आणि इतरत्र सहकार्‍याबरोबर भेटण्याच्या प्रमाण वाढले. शब्दातून प्रेम व्यक्त होऊ लागले. चित्रपट, भेटीगाठी, पार्ट्या, सहली यामुळे स्त्री पुरुष जवळ येऊ लागल्याने त्यांच्यातला संकोच कमी झाला आणि आपला प्रवास वन नाईट स्टँडकडे सुरु झाला. विवाह बाह्य किंवा विवाह्पूर्व लैंगिक संबंध बरे किंवा वाईट याचा विचार करण्याची परिस्थिती संपल्यात जमा आहे. पुरुषाला जसे अनेक स्त्रीयांबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याची अनुमती होती तशी स्त्रीलाही आता प्राप्त झाली आहे, नितीमत्ता, चारित्र्य, पाप-पुण्य चांगले वाईट ही सर्व मुल्य कोणी कोणाला सांगायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरुषांचा अहंभाव व वर्चस्व स्त्रीला असह्य झालं आणि ती मो़कळी झाली. पण परपुरुषाच्या संबंधाने निर्माण होणारी चिंता भिती ही आयुष्याच्या कोणत्याही क्षणी संघर्षाला कारणीभूत ठरणार आहे, याचाही विसर पडत चाललेला आहे. व्यक्तीगत जीवनावर होणारा परिणाम, कुटुंब विघटन, समाजात होणारी बदनामी. समाजाची अशा स्त्री-पुरुषांकडे पाहण्याची दृष्टी (आज पुरुषाला कोणी काही म्हणनार नाही) पण त्या स्त्रीकडे अनेकांच्या वळलेल्या नजरा, यामुळे ना ती कुटुंबात सुखी राहील ना वन नाईट मुळे सुखी राहील. समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या मतानुसार 'कुटुंबाचे अस्तित्व लवकरच संपुष्टात येईल तर काहींना वाटते की अपत्यप्रेमाची भावना स्त्री पुरुषात राहील तो पर्यंत कुटुंब नावाच्या व्यवस्थेला कोणताच धोका राहणार नाही. अर्थात आज ज्याची कुटुंबव्यवस्था स्थिर आहे त्यांच्या कुटुंबात अशी मुलं मुली असण्याची शक्यता कमीच, जिथे कोणाचं नियंत्रण नाही तिथे अशी शक्यता बळावेल असे वाटते. अर्थात जे येईल ते कसं असेल याची कल्पना आज तरी नाही, पण योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणीव त्याही पिढीला असावी, अशा अपेक्षेशिवाय आपण दुसरं तरी काय करु शकतो. अधिक वाचनासाठी : १) सामाजिक संस्था- डॉ.दा.धो.काचोळे. कैलाश पब्लिकेशन, औरंगपुरा औरंगाबाद. २) सामाजिक समस्या आणि सामाजिक मानसशास्त्र -डॉ.दा.धो.काचोळे. कैलाश पब्लिकेशन, औरंगपुरा औरंगाबाद. ३) सामाजिक व्यवस्था व सामाजिक परिवर्तने- प्रा.जे.पी करवा. विद्या बुक्स पब्लिशर्स. औरंगाबाद. -दिलीप बिरुटे