लोपून तेज जाता हलकेच पश्चिमेला
बघ चोरपावलांनी चालून रात्र येई
निजले नभात तारे ,निजली उभी धरा ही
परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही?
इवली पहा झळाळे नाजूक सोनकाया
इवलाच देह भासे इवला हिरण्यगोल
तेजाळल्या कळ्यांची कानात कुंडले ही
तेजावली झळाळे डोळ्यातुनी अबोल
तू तेजगोल बाळा, मी गालबोट काळे
रे सोनुल्या तुला मी सोडून दूर जाते
घोंगावुनी कधीचा अंधार वाहणार्या
मी सावळ्या नदीला हा तेजपुत्र देते
तव दिव्य स्पर्श होता उजळेल विश्व सारे
मागे उरेल वेडी असहाय्य माउली ही
निजली अबोल माया ह्या बंद पेटिकेत
परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही ?
© अदिती जोशी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2210
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुंती
आवडली अंगाई
छान आहे
पण अंगाई गीत इतकं अवघड असू नये असं वाटतं.
नाही ...
ही फक्त अंगाई नाहीये.. अर्थात वाचकांना ती अवघड वाटणं हे माझंच अपयश म्हणायचं!! :( :'(
.........................................
सुंदर.
सुंदर.
छान आहे
हे अंगाई गीतच आहे. आणि फार अवघड वाटले नाही.
शब्दरचनाही ठीक आहेत.