Skip to main content

झीचा तद्दन टुकार आचरटपणा…….

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 18/08/2014 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपलं टोकीज म्हणून मिरवणाऱ्या झीनं आता अक्षरशः डोक्याची मंडई करायला सुरुवात केलेली आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन हे चायनल सुरु करण्यात आले ते खूप छान वाटले होते. सुरुवातीला बरे वाटलेले सिनेमे दाखवून "ह्यांनी मराठीच्या पुनरुत्थानासाठी फार चांगली सुरुवात केली " असे म्हणणार होतोच पण तेवढ्यातच "प्रेक्षकांनी चायनलबद्दल असा काही विचार देखील मनात आणणे पाप आहे" असा ग्रह करून घेतलेल्या झीने स्वताच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करायला सुरुवात केली आहे. काही ठराविक सिनेमे पुन्हा पुन्हा झळकू लागले पण एकदा चुकला तर परत लागतो म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारले. त्यानंतर झीनं आपल्याच झालेल्या गतवर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे पुनःप्रक्षेपण सुरु केले . पुनःप्रत्ययाचा आनंद म्हणून आम्ही सुरुवातीला ते पहिलेही पण त्याच त्याच कार्यक्रमाच्या विनोदांवर हसू ही येईना हो …मग हळूहळू ह्याच आणि अश्याच कार्यक्रमांचे रेलचेल सुरु झाली. दिवसाच्या वेळापत्रकात एक तरी पुरस्कार सोहळा नित्यनेमाने दिसू लागला. दिवसाच्या वेळापत्रकाप्रमाणे झीनं ५ मराठी सिनेमे दाखवणे अपेक्षित होते. मराठी सिनेमा हे कुबेराच्या खजिन्यासारखे आहेत. रोज कितीही पाहिले तरी संपणार नाहीत एवढे विषय आणि कलाकृती आहेत त्यात…पुरस्कार सोहळा घुसवल्यामुळे आपसूकच काही सिनेमे बाद करण्यात आले. कवटी तेव्हाच सरकली होती पण म्हटले जाऊ दे … नंतर त्यांना त्यांची चूक उमजेल. पण झाले उलटेच…. दिवसेंदिवस झीनं मनमानी सुरूच ठेवली. काही ठराविक, रटाळ आणि साचेबद्ध सिनेमे परत परत दाखवायला लागले जणू काही प्रेक्षकांनीच त्यांना तशी गळ घातली असावी. हे चित्रपट असे आहेत कि त्यांचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यात काम करणारे कलाकार हे सुद्धा परत तो चित्रपट पाहण्याचे धाडस करणार नाहीत (सूज्ञ वाचकांच्या मनात एव्हाना त्या चित्रपटांची यादी केव्हाच घोळायला लागली असेल तेव्हा नमनाला घडाभर तेल नकोच !!) तर असे हे सिनेमे पाहून पाहून मेंदूची कल्हई निघायला लागली. रात्रंदिवस घातलेला हा रतीब पाहून मन पार विटून गेलं होतं…. तशातच सध्याचे जिथे तिथे घुसणारे आणि अभिनय करणारे "दाक्षिणात्य" नटसम्राट यांच्या नवीन कार्यक्रमाच्या प्रोमोमुळे वठलेल्या मनाला नवीन पालवी फुटली. आशेचा एक धूसर किरण दिसू लागला. वाटलं की आपली मागणी देवामार्फत झीच्या अधिकाऱ्यांच्या मेंदूपर्यंत पोचली असावी पण कसचे काय…. ह्यावेळी काय घेऊन आले तर "सौधींडीयन" भाषेतले डब म्हणजेच भाषांतरित केलेले मराठी सिनेमे जे इतर टुकार चायनल आधीच भरमसाट वेळा दाखवत आहेत तेच मराठी माणसांच्या गळ्यात मारणे सुरु झाले आहे. आता मी शब्दबंबाळ न होता एकच थेट प्रश्न विचारू इच्छितो…. इतके चांगले आणि वैविध्यपूर्ण मराठी सिनेमे जे तुम्ही अजून ही दाखवायची तसदी घेतली नाहीत ते मेले होते का जे आम्ही आता "रुद्रादेवी", "आर्य एक प्रेमवीर" असले टुकार सिनेमे पहायचे? त्यातले काही चांगले असतीलही पण आता तो विषयच नाही.विषय असा आहे की झीने ते आमच्या माथी आम्हाला न विचारता का मारावेत ? इथे राग प्रेक्षकांना गृहीत धरण्याचा आहे. मराठी चित्रपटांना कल्पनादारिद्र्य आलंय का? आजही असे कितीतरी छान मराठी चित्रपट आहेत ज्यांना पुरस्कार मिळालेला आम्ही सोहळ्यात पाहतो पण ते आमच्यापर्यंत कधी पोचतच नाहीत. झीला जर मराठीचा खरच कैवार घ्यायचा असेल तर त्यांनी असे चित्रपट मराठी माणसांपर्यंत पोचवावेत आणि आपल्या मराठीपणाचा दाखला द्यावा आणि सौधींडीयन तमाशे ताबडतोब बंद करावेत !! असले टुकार उद्योग करायला इतर चायनल आहेत…झीने तो कित्ता गिरवण्याची गरजच काय ? तेव्हा झी …. वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब नाही.

वाचने 30631
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

कुठल्याही वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा/मालिकेचा अधिकृत वेळ ३० मिनिटे असतो. कार्यक्रम/मालिका नंतर/काही वेळाने तुनळी वर २०/२२ मिनिटांत बघायला मिळते. (पुढली २ मिनिटे शिर्षक गीत, कालच्या भागात, पुढे काय यांसाठी) म्हणजे २० मिनिटांसाठी १० मिनिटे जाहिराती असतात. (५०%). शिवाय कार्यक्रम/मालिका चालु असताना अक्षरश: कुठेही (वरती, खालती, सगळे कोपरे इ.) झळकणाऱ्या जाहिराती छळवाद करायला असतातचं. जाहिरातीमधुन इतका बक्कळ पैसा कमवुनदेखिल पुन्हा त्या केबल वाल्याला दर महिना काहीशे रुपये द्यायचे! जाहिराती पध्दल तर न बोललेलेच बरे! मुळ हिंदी जाहिरातीमध्ये अर्धे इंग्रजी अर्धे हिंदी शब्द असतात. भाषांतर (?) करणारे फक्त हिंदी शब्दांचे भाषांतर करतात. त्यामुळे अर्धी मराठी अर्धी इंग्रजी जाहिरात ऐकावी लागते.

सिंपल लॉजिक आहे त्यांनी चोवीस तास वेगवेगळे कार्यक्रम दाखवले तरी तुम्ही २४ तास त्यांचाच चॅनेल लाऊन बसणार नाही. मग ते नवनवीन कार्यक्रम दाखवून एक्स्ट्राचे पैसे का गुंतवतील. सिनेमांचे हक्क फुकट तर मिळत नाही किंवा कार्यक्रम फुकट तर बनत नाहीत. त्यामुळे मग प्रत्येक चॅनेल असे धंदे करतेच. सोनीवर बघावे तेव्हा (मी नाही बघत) सीआयडी आणि त्यांचाच छोटा भाऊ सेटमॅक्स वर बघावे तेव्हा (हे देखील मी नाही बघत) सुर्यवंशम चालू असतेच ना .. आता वर्षभर आयपील खेळता येत नसल्याने त्यांना मग उर्वरीत वेळेत अशी वेळ मारून न्यावीच लागते.

या बदलामागे पण काही ठोस कारणे असतील हे नक्की, याआधी झीने बरीच चांगले मराठी कार्यक्रम दिलेत. गंगाधर टिपरे, एका लग्नाची दुसरी गोष्ट इत्यादी. मी माझा अंदाज बांधतोय 1. हल्ली आवड बदललीय आणि लोकांना हेच आवडते ही मानसिकता. सध्या हिंदीत चालणारे चित्रपट, किंवा हिंदीतल्या मालिका बघितल्या तर झीचे काही चुकतेय असे वाटत नाही. आपण प्रेक्षकच असा आभास निर्माण करतोय. 2. विशिष्ट प्रकारचा शहरी मघ्यमवर्गीय सोडला तर साऱ्यांनाच लाउड इमोशन आवडतात हा ग्रह. माझ्या प्रेक्षकांना जर मी हे दिले नाही तर ते हिंदीकडे वळतील ही भिती. जमानाच झगमगतेचा आहे. त्याता संवेदनशील भावनांना विचारतो कोण. 3. लोकांना कंटाळा येत नाही, आला तरी ते एकदा सवय लागली कि ते बघतच राहतात. ज्यांना बघायचे नसते ते तसेही बघत नाही. त्यामुळे ताेचतोचपणा आला, रिपिट केले तरी चालते ही भावना. तेंव्हा कमी खर्चात हे करता येते. 4. कदाचित झीमराठीमधे काही आंतरीक बदल झाले असतील किंवा होत असतील. झीचे सर्वेसर्वा आधीही तेच होते आताही तेच आहेत. 5. झीचा चित्रपट थेटरात चालू असताना झीने चांगला चित्रपट जर टिव्हीवर दाखविला तर त्या थेटरातल्या चित्रपटाचे मार्केट जाते. 6. दहा वाइट गोष्टी दाखवून एक चांगला शो केला कि त्याला मिळनारा प्रतिसाद हा कल्पनेपलीकडला असतो. उदा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. -मित्रहो

अहो लोकांना आताशा कुठल्याही नातेवाईकांकडे जायला होत नाही. ७ ते १० हा मालिकंचा वेळ. त्या हिंदी असोत कि मराठी असोत सगळे जण मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्या इडियटबॉक्सच्या समोर बसतात. अशा वेळी आपल्याकडेही कोणी कडमडयला नको असे वाटते. पुर्वी मोठी माणसे पत्ते, कॅरम खेळायचे तर बायका शेजारणीशी गप्पा मारत मारत रात्रीचा स्वयंपाक करायच्या. आताशा चित्रच पालटले आहे. आणि पेठकरकाका आता त्या टी.व्ही वरिल मालिकातल्या बायड्यांबरोबर घरोघरातल्या बायकांची पण हालत कशी झाली आहे त्या करिता सध्या चे.पु. वर प्रसिध्द असलेले एक चित्र इकडे डकवतो. टॉ.व्ही. स्लिम झाले तर बायड्या प्यारे१ ने म्हंटल्या प्रमाणे भरताच्या वांग्याएवढ्या झाल्यात... 1

In reply to by प्रमोद देर्देकर

>>बायड्यांबरोबर घरोघरातल्या बायकांची पण हालत कशी झाली आहे हे लिहीताना पुरषांनी स्वतःच्या पोटाचे घेरही बघावेत एकदा. ;)

In reply to by धन्या

>>बीयरची बी तरी खाल्लीय का तुम्ही कधी? आता तुम्ही बोललातच म्हणून स्पष्ट बोलतोय हो, आम्ही आमच्या सपाट पोटाबद्दल लिहीलंय का असं म्हणायचं होतं!! आता झायरात झायरात म्हणणार्‍यांना योग्य तेथे मारण्यात येईल. ;)

In reply to by सूड

मॉनिटरची साइज कमी होत गेली आणि पुरुषांचे घेर वाढत गेले. जॉब्स तू चुकला रे तू मिनी आणला, पॅड आणला आणि आमची वाट लावून गेला.

आत्ताशी जरा मिपावर आल्यासारखं वाटलं!