मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रावण सोमवार विशेष - कर्टोलीची भाजी

सर्वसाक्षी · · पाककृती
कर्टोली ही खास पावसाळ्यात व त्यातही श्रावणात मिळणारी भाजी. श्रावण सोमवारी उपास सोडताना केळीच्या पानावर ही भाजी हवीच. k1 माझ्या पत्निच्या वतीने पाककृती येथे देत आहे. साहित्य कर्टोली २०० ग्रॅम भिजवलेली चणा डाळ एक वाटी हिरव्या मिरच्या ३ फोडणीसाठी तेल २ टेबल स्पून मोहरी पाव टी स्पून हिंग पाव टी स्पून हळद अर्धा टी स्पून सजावटीसाठी खवलेला नारळ आणि बारिक चिरलेली कोथिंबिर k2 k3 कर्टोलीची दोन्ही बाजूची डेखं कापुन बारीक काचर्‍या चिराव्या. कर्टोली कोवळीच घ्यावी, त्यातल्या बिया काढाव्या लागत नाहीत. जून असल्यास डेख कापल्यावर ते कोरुन पोकळ करावे म्हणजे बिया निघुन जातील. मग पातळ चकत्या कराव्या. k4 भिजवलेली डाळ, मिरची थोडं मीठ किंचित पाणी घालुन जाडसर वाटुन घ्यावी कढईत तेल गरम करुन मोहरी, हळद व हिंगाची खमंग फोडणी करावी फोडणीत चिरलेली कर्टोली व वाटलेली डाळ घालावी. व्यवस्थित ढवळुन मंद आचेवर झाकण घालुन शिजवावी. भाजी शिजली व डाळ मोकळी झाली की चवीप्रमाणे मीठ घालुन भाजी ढवळुन घ्यावी. गरम गरम भा़जी वाढपाच्या भांड्यात घेऊन वर खवलेला ओला नारळ व कोथिंबिरीने सजावट करावी. k5

वाचने 12625 वाचनखूण प्रतिक्रिया 29

कर्टोलीची भाजी अतिशय आवडती भाजी पण अनेक वर्ष झाली खाल्ली नाही रॅदर इथे मिळत नसल्यामुळे खाता आली नाही. मस्तं पाकृ :)

अजया Mon, 08/18/2014 - 07:43
कर्टोली आमच्या इथल्या प्रसिध्द पावसाळी भाज्यांपैकी .या दिवसात रस्त्यावर पावलापावलावर कातकरी बाया ही भाजी घेऊन बसलेल्या असतात.पिकतं तिथे विकत नाही न्यायाने अामच्या घरातली नावडती पावसाळी भाजी!पण अाता चण्याच्या डाळीचे वाटण करुन या पाकृृप्रमाणे बनवुन पाहीन.

पिवळा डांबिस Mon, 08/18/2014 - 12:33
सध्या रहातो त्या ठिकाणी करटुली मिळण्याची सुतराम शक्यता नाही... :( पण त्यानिमित्ताने जागवलेली एक आठवण... आयुष्याच्या सुरवातीला, तारूण्यकाळी, पहिलाच नव्यानव्हाळीचा जॉब... ठाणे बेलापूर रोडवरल्या एका कंपनीत, नोसिल होती ना, त्याच लायनीत... पहिला पावसाळा, श्रावण महिन्यात आमचा शिपाई सोनवणे एक हिरव्या, काटेरी वाटणार्‍या फळांनी भरलेली एक पिशवी घेऊन डिपार्टमेंटमध्ये येतांना दिसला.... "कायरे, काय घेउन आलायस?" "काय नाय सायेब, कंटोली" "कंटोली?" "हां, भाजी असते सायेब!" "कुठून पिकवलीस?" "पिकवली नाय सायेब, ते आपल्या कंपनीचं पाठीमागचं कंपाउंड आहे ना सायेब, ते डोंगराला लागुन असलेलं! तिथे खूप वेल आलेले आहेत सायेब या भाजीचे! तुम्हाला हवी काय?" "चल आधी ते वेल दाखव!!" आमच्या डिपार्टमेंटपासून ते कंपाऊंड सुमारे १५-२० मिनिटांवर. जाऊन बघतो तर खरंच सगळं कंपाऊंड या वेलांनी भरलेलं आणि त्यांना अशी शेकडो, छे छे, अगणित फळं लगडलेली!! कुणी लावलेली नाय काय नाय, देवाघरची शेती!!! "ठीक आहे, दे मला दहा-बारा फळं" आमच्या सोनावणेनं एक भली थोरली पिशवी भरून फळं दिली. कदाचित सायबाला फक्त दहा-बारा फळंच कशी द्यायची असं त्याला वाटलं असावं... पिशवी घरी आणुन आईच्या ताब्यात दिली... "अरे हे काय आणलयंस?" "कंटोली म्हणतात म्हणे त्याला, आमच्या सोनावणेनं भाजी म्हणुन दिली" "अरे करटुली ही!! मस्त भाजी होते यांची!!!" आणि आईने खरोखरच त्यांची भिजलेली चण्याची डाळ घालून मस्त भाजी केली, बेहद्द आवडली... तेंव्हापासून दर दसर्‍याला मला कंपनीतून मिळालेली मिठाई सोनावणेच्या हाती. करू दे त्याच्या पोरांना मजा... आणि दर पावसाळ्यात करटुली, शेवग्याची फुलं, कोवळा टाकळा सोनावणेतर्फे माझ्या हाती!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

इरसाल Mon, 08/18/2014 - 16:57
हे पिवळा डांबिस नावाचे काका खरच डांबिस आहेत. कधीतरीच लिहीतात पण असे काही लिहीतात की वाटते यांनी अजुन लिहावे...पण नाय. बाकी कटुरलीची भाजी मस्तच हो.

दिपक.कुवेत Mon, 08/18/2014 - 15:04
पण ह्या पावसाळ्यातल्या भाज्यांची कधी चव घेण्याची वेळच आली नाहि. वरील पाकॄमधे सुद्धा भाजी पेक्षा फोटोच भाव खाउन गेलेत.

स्वाती दिनेश Mon, 08/18/2014 - 15:18
कर्टोली आणि सर्वसाक्षी दोन्ही बर्‍याच दिवसांनी मिसळपावर अवतरले. मजा आली. पेठकरांसारखेच म्हणते, बाकी कर्टोली खूप खूप दिवसात खाल्ली नाहीत.. स्वाती

शिद Mon, 08/18/2014 - 16:07
आम्हीपण कंटोलीच म्हणतो. पावसाळ्यात बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. माझी आई फक्त कांदा टाकून ह्याची भाजी बनवते. मस्तच.

सर्वसाक्षी Mon, 08/18/2014 - 16:27
मोहरी पाव टेबल स्पून हिंग पाव टेबल स्पून हळद अर्धा टेबल स्पून हे लिहिताना अनवधानाने टी स्पून ऐवजी टेबल स्पून असे लिहिले आहे. ते कृपया मोहरी पाव टी स्पून हिंग पाव टी स्पून हळद अर्धा टी स्पून असे वाचावे. गफलत निदर्शनास आणुन दिल्याबद्दल पेठकर साहेबांचे आभार (बायकोने माझी अक्कल काढली हे वेगळे सांगायलाच नको)

भाते Mon, 08/18/2014 - 17:36
फोटो बघुनच भुक चाळवली गेली. आता पाकृ चांगली का फोटो हे ठरवणे अवघड आहे. सर्वसाक्षी काका, वेळ मिळेल तसे किंवा खरंतर, वेळ काढुन मिपावर लिहित जा. फोटोप्रेमी भाते

In reply to by सखी

प्यारे१ Mon, 08/18/2014 - 20:47
इंग्रजी नाव , 'इथं' वगैरे असलं की आपण भारताबाहेर आहोत हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न असं जुने लोक म्हणतात ब्वा. ;)

मार्क ट्वेन Mon, 08/18/2014 - 22:40
'इथे' कर्टोली\कंटोली' मिळत नाही असे एकदोन प्रतिसाद दिसले म्हणून लिहितो. इंग्रोमध्ये फ्रोझन फूड सेक्शनमध्ये kantola या नावाने हमखास मिळते. दिसायला अशी दिसते. जनहितार्थ जारी.

In reply to by मार्क ट्वेन

सखी Mon, 08/18/2014 - 23:09
धन्यवाद पैसाताई आणि मार्क ट्वेन. पटेलच्या फ्रोजन भागात kantola बघितल्यासारखी वाटतेय खरी आता परत नाव वाचेन नीट, मंडळ आभारी आहे :)

अनन्न्या Tue, 08/19/2014 - 16:48
आमच्याकडे खूप मिळतात ही कर्टोली, पण भाजी कधीच खाल्ली नाहीय, करून पहायला पाहिजे.