मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खांडवी (नागपंचमी विशेष)

अनन्न्या · · पाककृती
आमच्याकडे कोकणात नागपंचमीला चंदन उगाळून त्याने पाटावर नाग काढून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला उकडीचे मोदक किंवा खांडवी केली जाते. तसे कोकणातल्या पाककृती म्हणजे त्यात तांदुळ, गूळ आणि ओले खोबरे हे मुख्य घटक हवेतच! साहित्यः दोन वाट्या तांदळाचा रवा, दोन वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, मीठ, तूप वेलची, पाणी. कृती: पूर्वी जातिणीवर रवा काढला जाई. आता मात्र बाजारात तयार इडली रवा मिळत असल्याने काम बरेच सोपे झालेय. हा रवा थोडा कोरडा भाजून झाल्यावर साधारण पाव वाटी तूप घालून मंद आचेवर तांबूस भाजावा. रव्याच्या दुप्पट पाणी घेऊन ते उकळण्यास ठेवावे. त्यात गूळ. मीठ, थोडे ओले खोबरे आणि वेलची पावडर घालावी. उकळी आली की भाजलेला रवा मिसळावा. नीट मिक्स करून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे. थाळ्याला तूपाचा हात लावावा. रवा व्यवस्थित शिजला की मिश्रण थाळ्यात पसरावे, थापताना वर ओले खोबरे पसरून थापावे. आवडीप्रमाणे वड्या पाडाव्यात. मस्त कणीदार तूप किंवा नारळाच्या दुधाबरोबर खाव्या. khandvi

वाचने 17562 वाचनखूण प्रतिक्रिया 39

येस, आज डब्यात खांडवीच आहे. नारळाच्या दुधा बरोबर कधी खाल्ली नाही. बघायला पाहिजे रच्याकने :- जाते माहिती आहे पण ये जातिण जातिण क्या है ये जातिण जातिण

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनन्न्या Fri, 08/01/2014 - 17:30
आपल्या बोलीभाषेत काही शब्द इतके पक्के असतात डोक्यात, त्याचा प्रतिशब्द माहित असूनही अगदी नकळत लिहीला गेला. माझ्या माहेरी जात्याला जातिण म्हणतात! लहानपणापासून तोच शब्द कानावर पडल्याने चुकलेय असे वाटलेच नाही.

स्वाती दिनेश Fri, 08/01/2014 - 14:07
मस्त दिसते आहे खांडवी.. स्वगत- कित्येक महिन्यात्,वर्षात केली आणि खाल्ली नाहीये.. करायला पाहिजे आता.. स्वाती

पैसा Fri, 08/01/2014 - 14:23
रत्नागिरीला आवडता पदार्थ! सध्या कित्येक वर्षे गोव्यात पातोळ्या खायची सवय झाल्यामुळे विसरायला झालं होतं. पण अगदी सोपा आणि चविष्ट प्रकार. आज संध्याकाळी करणार!

प्रभाकर पेठकर Fri, 08/01/2014 - 14:24
खांडवी नांवाचा हा दूसरा पदार्थ पाहिला. नेहमीचा आवडीचा पदार्थ म्हणजे आपल्या पाटवड्या किंवा सुरळीच्या वड्या म्हणतो तो. त्याला गुजराथीत खांडवी म्हणतात. असो. हा खास कोकणी पदार्थ करून पाहिला पाहिजे.

In reply to by अत्रन्गि पाउस

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 01:58
खांडवी आणि खमणी दोन्ही शब्द सुरळीच्या वडीसाठी वापरले जातात. इथे प्रतिमा पाहता येतील. ह्या पाककृतीलाही नक्कीच खांडवी म्हणत असणार. पण ह्या नांवाने दूसरा पदार्थ (सुरळीच्या वड्या) सुद्धा आहे एव्हढेच मला म्हणायचे आहे. 'खमणी' नांवाचेही मी दोन वेगवेगळे पदार्थ खाल्ले आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

अत्रन्गि पाउस Sat, 08/02/2014 - 08:24
सुरुवातीला तर मी खमण, खमण ढोकळा आणि खमणी ह्यातच कन्फ्युज व्हायचो त्यात अमिरी खमण ऐकला आता आपण म्हणताय २ खमणी स्कॉलरशिप परीक्षेमधल्या प्रश्नांची आठवण झाली :)

Mrunalini Fri, 08/01/2014 - 14:58
मस्त आहे गं हि पाकृ. मी पहिल्यांदाच बघितली. खांडवी म्हणजे मी पण सुरळी वडीच समजत होते. आता हि गोड खांडवी करुन बघायला पाहिजे. ह्यात आपला नेहमीचा साधा उपम्याचा रवा चालतो का? कि ईडलीचाच रवा पाहिजे?

In reply to by Mrunalini

शिद Fri, 08/01/2014 - 15:09
मी पहिल्यांदाच बघितली.
मी सुद्धा. फोटोमध्ये खांडवी झकासच दिसताहेत. सोपी पाकृ असल्यामुळे लवकरच करुन पहायला/चाखायला लागेल. :)

रुमानी Fri, 08/01/2014 - 15:26
खांडवी ह प्रकार तिखट चविमधे महित होता ..हे गोड प्रकारातली करुन पाहवि लगेल....! :)

रेवती Fri, 08/01/2014 - 16:28
सुरेख फोटू व कॄती. आजकाल इडली तांदळाच्या रव्याची सगळेजण करतात पण पूर्वी तांदूळ धुवून सावलीत वाळवून मग रवा काढत असत ना? माझ्या साबा हा पदार्थ करतात ते आठवले. छान लागतो. ही महाराष्ट्रीय खांडवी आहे आणि सुरळीवडीला गुज्जु लोक खांडवी म्हणातात. एकदा मी फसले होते.

सगळ्यात आवडता पदार्थ खांडवी, तुपाबरोबर तर सह्हीच लागतं :) मी कधीतरी बद्ल म्हणून लापशी रव्याच्या पण बनवते.

In reply to by सूड

लापशी रवा (दलिया) म्हणजे गोडाचा सांजा बनवतात तो गव्हाचा जाड रवा. तो वापरून अशीच खांडवी बनवते मी बदल म्हणून. शिर्‍याचा रव्याची(रोजचा बारिक रवा) घेऊन रवळी बनवतात हे ऐकून माहित आहे पण मी अजून कधी नाही बनवली.

In reply to by सानिकास्वप्निल

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 01:03
लापशी रवा भाजून घेतेस का? तो भाजून चिकट होतो. मी एकदा भाजून फसलेय. नंतर गुळाचा शिरा करताना चिक्की झाली होती! :(

In reply to by कवितानागेश

शिरा/ सांजा करताना थोड्या तुपावर लापशी रवा परतून घेते मग सरळ कुकर ला ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घेते. छान होतो गं. मागे इथे दिली होती पाकृ.

अनन्न्या Fri, 08/01/2014 - 17:36
मृणालिनी, हा रवा तांदळाचा असतो. साध्या रव्याची कधी केली नाहीय, पण चव वेगळी लागेल असे वाटते. सुरळीच्या वड्यांना खांडवी म्हणतात हे मी पहिल्यांदाच ऐकले. तुपाबरोबर ही छान लागतेच पण दाट नारळाच्या दुधाबरोबर जास्त छान लागते.

In reply to by Mrunalini

रेवती Fri, 08/01/2014 - 18:04
होय गं, तोच! विकतचा इडली रवा वापरल्याने बरेच काम वाचते, नैतर तांदूळ धुवून सावलीत पंच्यावर वाळत घालून बर्‍यापैकी सुकले की मिक्सरवर (पूर्वी जात्यावर) भरड रवा काढावा लागतो. चाळून त्यातल्या रवा घेऊन हा पदार्थ केला जातो असे आठवतेय.

सखी Fri, 08/01/2014 - 18:42
मस्तच दिसतेय अनन्न्या, करुन बघायला पाहीजे. मला कोकण आणि केरळमधल्या लोकांचे फार कौतुक वाटते यासाठी की दुध, नारळ आणि गुळ वापरुन किती पदार्थ या दोन प्रांतात होतात परत चवीतही काहीतरी फरक/नाविन्य आहेच.

मस्त. मागे एका कोकणातल्या मैत्रिणीबरोबर खांडवी की सुरळीच्या वड्या यावर चर्चा झाली तेव्हा मला पण हे पहिल्यांदाच कळले होते की हे दोन वेगळे पदार्थ आहेत. आत्ता फोटो बघून नेमके कळले.

मयुरा गुप्ते Fri, 08/01/2014 - 20:28
आमच्या कडे शिळ्सप्तमी साठी सांदणी/सांजणी नावाचा प्रकार साधारण अश्याच प्रकारानी करतात. वरच्या रेवती ताईंच्या प्रतिसादात त्यांनी सांगितल्या प्रमाणेच्. सुगंधीत तांदुळ धुवुन, पंच्या वर सावलीतच वाळवावेत, त्याची मिक्सर मधुन भरड काढुन, तुपावर मंद भाजावे, नारळाच्या दुधात गुळ, वेलची पुड घालुन त्या मिश्रणाची उकड काढावी. साधारण ढोकळ्या एवढा वेळ लागतो. खांडवी सुंदरच. पटकन एक उचलुन तोंडात घालावीशी वाटते. --मयुरा.