मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अस्तु "So Be It"!

स्वाती दिनेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
.
२६ जुलै २०१४ ,शनिवारी संध्याकाळी फ्रांकफुर्टमध्ये डॉ.मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत 'अस्तु' नावाच्या मराठी सिनेमाचा खेळ आणि त्यांच्याशी गप्पा असा कार्यक्रम आहे.. हे समजल्यावर तिथे जायचे हे लगेचच ठरवले. फ्रांकफुर्ट आणि आसपासच्या गावातून जवळपास ४० एक मराठी मंडळी एकत्र आलेली पाहण्याचा इतक्या वर्षातला हा आमचा पहिलाच प्रसंग! एवढे मराठी लोकं इथे आहेत.. हा सानंदाश्चर्याचा धक्काच होता. डॉ.आगाशे आले. चित्रपटाबद्दल चर्चा सिनेमा पाहून झाल्यावर करु पण चित्रपट म्हणजे मनोरंजन! हा चष्मा उतरुन शिक्षण, प्रबोधन ह्या दृष्टीने त्याकडे बघायला सांगायची,शिकवायची गरज निर्माण झाली आहे आणि जो सिनेमा पाहिल्यावर मनात प्रश्न निर्माण होतात तो चांगला सिनेमा! हा विचार त्यांनी दिला आणि चित्रपटाला सुरूवात झाली. ही गोष्ट आहे बाप आणि मुलीच्या अनेकपदरी नात्यातली. खरंतर माणसांमधल्या नात्यांच्या स्वीकृतीतली! अप्पा म्हणजे डॉ.चक्रपाणि शास्त्री! संस्कृतपंडित, ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे निवृत्त डायरेक्टर! त्यांच्या दोन्ही सुविद्य मुली इरा आणि राही, डॉक्टर जावई माधव,नातवंडे.. असे सगळे उच्चशिक्षित,सुसंस्कृत कुटुंब!अप्पांना विस्मरणाचा त्रास सुरू होतो आणि डॉ.शास्त्रींच्या डिमेन्शियाशी जुळवून घेण्याचा त्यांची मुलगी इरा आणि जावई डॉ. माधव करत असतात. आपल्या प्रकांडपंडित वडिलांना असा त्रास आहे हे स्वीकारण्यातला तिचा मानसिक झगडा, त्याचे अनेक पापुद्रे उलगडताना दिसतात. एके दिवशी अप्पा नाहीसे होतात.. एका भटक्या हत्तीवाल्याच्या मागे ते जातात आणि ते अडाणी कुटुंब केवळ माणुसकीच्या नात्याने त्यांची देखभाल करते. त्यांना अप्पांचं मोठेपण माहिती नसतं आणि आकळण्याची पात्रताही नसते, तरीही हा कोणी देवाघरचा अश्राप जीव आहे,त्याचं वृध्दपण संपून मूलपण सुरू झालं आहे, आपली दोन मुलं तसंच हे तिसरं ..इतकी सहज स्वीकृती ती अडाणी बाई करते. इकडे इरा अप्पांना शोधताना घायकुतीला येते,नकळत स्मृतींमध्ये डोकावते. इरा आणि राही दोघींना वाटतं रहातं अप्पांचा आपल्यापेक्षा दुसर्‍या मुलीवर जास्त जीव आहे. दोघींच्या मनात असलेली एकमेकींबद्दलची सुप्त असूया फार सूक्ष्मपणे दाखवली आहे.गुप्तेबाई आणि अप्पांचं बहुपेडी नातंही तसंचं हळूवार उलगडले आहे. गुप्तेबाईंकरता 'सर' म्हणजे जणू देवच तर अप्पांच्या घरातल्या लोकांच्या मनात ते नातं उगाचचं गढूळलं आहे. मानवी मनाचे कंगोरे कितीपदरी असतात ते येथे सहजपणे स्पष्ट जाणवून जाते. राही,धाकटी बहिण मात्र वास्तववादी विचारांची असते. एखाद्या माणसाच्या मेंदूतून स्मृती पुसल्या गेल्या म्हणजे त्याचा मेंदू जणू मृतच झाला , ती व्यक्ती मृत:प्रायच! असे तिचे लॉजिक तर इराच्या मनात मात्र आपले आईवडिल आपल्या मनात कायम अमरच असतात ही भावनिक गुंतवण! तिकडे अप्पा मात्र मेंदूने पुसून टाकलेला भूतकाळ आणि अस्तित्त्वातच नसलेला भविष्यकाळ घेऊन फक्त वर्तमानातले क्षणक्षण हत्तीवाल्या अंता,चिन्नम्मा आणि त्यांच्या मुलांबरोबर जगत असतात. आपली पत,प्रतिष्ठा,हुद्दा सारे,सारे काळाच्या पडद्याआड टाकून.. "आई भूक" असं चिन्नम्माला लहान मूल होऊन म्हणतात. जणू ते डॉ. शास्त्री राहतच नाहीत तर कोणी वेगळीच व्यक्ती बनतात, वर्तमानातच जगणारं एक निरागस लहान मूल! आणि आईच्या मायेने अडाणी चिन्नम्मा आपल्या दोन मुलांबरोबर त्यांना खेळायला सांगते, नकळत हे सत्य ती किती सहजपणे स्वीकारते. वस्तुनिष्ठ राही पोलिसतपास झाला की समजेलच ,त्याकरता लेक्चर न बुडावे म्हणून परत जायला निघते आणि इरा वडिलांचं असं नाहीसं होणं आणि संध्याकाळी असलेला मुलीचा नाटकाचा प्रयोग.. ह्या कात्रीत सापडते. शेवटी विचारांवर भावना प्रबळ होऊन राही अर्ध्यातून परत येते. अंता जेव्हा कुटुंबाला घेऊन दुसरीकडे जाण्याचे ठरवतो, तेव्हा अप्पा त्यांच्याबरोबर जातात का? ते पोलिसांना सापडतात का? त्यांचे 'अप्पा न राहणे' इरा स्वीकारते का? हे समजण्यासाठी हा चित्रपट पहायला हवा. डिमेन्शिया,अल्झायमर वर आतापर्यंत हिंदी मराठीत अनेक सिनेमे आले तरीही त्यांच्या गर्दीत हा सिनेमा वेगळा राहतो. अस्तु- "So Be It", किवा मराठीत नुसतंच 'असो'.. ह्या नावामागचं कारण डॉक्टरांना विचारलं असता ते म्हणाले.. असो किवा अस्तु.. हे स्वीकृती दर्शवतात. acceptance! ती व्यक्ती आता पूर्वीची व्यक्ती राहिलेली नसून कोणी एक नवीन व्यक्ती आहे, असं समजून घेण्याचा, स्वीकार करण्याचा दृष्टीकोन विचारात घ्यायला हवा.. हे शीर्षकातून सांगायचे आहे. बुद्धी आणि स्मृतीचे प्रतिक असलेला हत्ती , रोजच्या व्यवहारात रस्त्याने हत्ती घेऊन जाणारे आणि त्यावर गुजराण करणारे भटके लोकं.. ह्याची उत्तम सांगड येथे दिसते. म्हणजे हत्तीचे रुपक वापरतानाच, अप्पांचे हत्तीवाल्याच्या मागे जाणे कृत्रिम , ठिगळ लावलेले वाटत नाही. डॉ. मोहन आगाशे अप्पाच झाले आहेत तर नचिकेत पूर्णपात्रे आणि अमृता सुभाष ही अंता आणि चिन्नम्माच वाटतात.. इरावती हर्षेची मुलीच्या मनातली उलघाल खरीच वाटते तर देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण यांची सुयोग्य साथ लाभली आहे. सुमित्रा भावेंची कथा,पटकथा असून दिग्दर्शन सुमित्रा भावे,सुनिल सुकथनकर या जोडीचे आहे. १०फ,वास्तुपुरुष,नितळ,दोघी अशा अनेक अनवट चित्रकर्त्या भावें-सुकथनकर जोडीचा सिनेमा आहे म्हणजे तो कसदार असणारच ह्याची खात्री होतीच. हा सिनेमा आपण फक्त पाहत नाही तर अनुभवतो. सिनेमातल्या गोष्टीच्या पलिकडची गोष्ट अनुभवण्यासाठी पहायलाच हवा असा चित्रपट! सिनेमानंतर डॉ. आगाशेंनी त्यावर केलेले भाष्य,प्रेक्षकांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे यातून तो जास्त उलगडत गेला. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक पुरस्कार मिळवून आता हा चित्रपट दि. १-८-१४ रोजी भारतात प्रदर्शित होत आहे. ह्या चित्रपटाची झलक येथे पाहता येईल.
.

वाचने 7778 वाचनखूण प्रतिक्रिया 42

मनिष Fri, 08/01/2014 - 13:53
मस्त परिक्षण स्वाती ताई. पिफ मध्ये पाहिला तेंव्हाच आवडला होता. दुर्दैवाने अशा चित्रपटांना फारसे प्रेक्षक आणि सिनेमागृह, दोन्हीही मिळत नाही! :( फक्त पुण्यातल्या २ सिनेमागृहांमध्ये अध्ये रीलीज झालाय - खूप चांगला चित्रपत आहे. बघुन घ्या - पुढच्या आठवड्यात राहील की नाही माहित नाही!

ऋषिकेश Fri, 08/01/2014 - 13:56
पिफ ला लागला होता तेव्हा रिलीज होईल असे कळले म्हणून तेव्हा बघितला नाही. आता बघायलाच हवा! धागा कथावस्तु समजेल या भितीने वाचलेला नाही, चित्रपट पाहिल्यावर वाचेन

मैत्र Fri, 08/01/2014 - 14:11
वास्तुपुरुष हा माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे. तसाच दहावी फ. दोन्ही असंख्य वेळा पाहिले आणि भावले आहेत. अस्तु नक्कीच पाहिला जाईल.. खूप धन्यवाद या लेख / परीक्षणासाठी!

परिक्षण आवडले. हे वाचून उत्सुकता वाढली. पण कधी बघायला मिळेल माहित नाही. या फ्रांकफुर्टमधल्या कार्यक्रमाबद्दल माहित होते पण येणे जमले नसते.

सखी Fri, 08/01/2014 - 18:50
छान परिक्षण लिहलं आहेस स्वाती. हा सिनेमा आता जेव्हा मिळेल तेव्हा बघायलाच पाहीजेच्या लिस्टमध्ये.

In reply to by आदूबाळ

स्वाती दिनेश Fri, 08/01/2014 - 19:22
सिनेमासारख्या दृकश्राव्य माध्यमाचा फक्त मनोरंजन हा उद्देश नसून शिक्षण, प्रबोधन.. असाही उद्देश आहे आणि जो सिनेमा पाहून मनात प्रश्न येतात आणि ते रेंगाळतात त्या सिनेमात असे पोटेन्शियल असते. असा डॉ. आगाशेंच्या म्हणण्याचा उद्देश असावा. स्वाती

बहुगुणी Fri, 08/01/2014 - 19:50
कथानकात थोडीशी 'नटसम्राट'ची झाक जाणवली. पुण्यात असतो तर पाहिलाच असता, आता मिळेल तेंव्हा नक्कीच पहाणार. अगदी नवीन चित्रपट असल्याने असणार, पण IMDB वर पाहिलं तर त्रोटक माहिती आहे. स्वाती ताई: तुम्हाला तिथे synopsis टाकता आलं तर पहा. आंतर्जालावर शोधलं तर काही ट्रेलर्स आहेत, त्यांपैकी एकः

In reply to by बहुगुणी

स्वाती दिनेश Fri, 08/01/2014 - 19:53
शेवटच्या वाक्यात ह्याच ट्रेलरची लिंक दिली होती, ती बहुतेक वाचनातून निसटते आहे का? तरीही ह्या ट्रेलरकरता धन्यवाद. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बहुगुणी Fri, 08/01/2014 - 20:10
खरंय! निसटलीच ती :-( क्षमस्व! (आणखी शोधाशोध केली तर या चित्रपटाचं स्क्रीनिंग अमेरिकेतल्या बर्‍याच महाराष्ट्र मंडळांमध्ये मे पासून चालू आहे.)

प्रचेतस Fri, 08/01/2014 - 19:56
उत्तम परिक्षण. आजच्या कुलकर्णीद्वयांच्या नाटकी चित्रपटांपेक्षा भावे/सुकथनकर जोडगोळीचे चित्रपट खूप साधे सरळ आणि उत्तम वाटतात.

मदन चक्रदेव Fri, 08/01/2014 - 20:41
मस्त परीक्षण. ह्या चित्रपटामध्ये अंताचे काम केलेला "नचिकेत पूर्णपात्रे" माझा शाळेमधला मित्र आहे. त्याला आज नक्की हे परीक्षण पाठवतो.

इनिगोय Sat, 08/02/2014 - 00:17
मिलिंद सोमण का! हा सिनेमा बघायलाच पाहिजेच्या आधीच्या कारणांमध्ये अजून एक भर. स्वाती, छान झालाय लेख. आणि तारीख कळवल्याबद्दल धन्यवाद.

चित्रपट कधी पहायला मिळेल की नाही माहित नाही. अशा चित्रपटांच्या डीव्हीड्याही निघतील की नाही माहित नाही. चित्रपटाची कथावस्तू वाचून 'वाईल्ड स्ट्रॉबेरीज' आठवला. म्हातारा प्राध्यापक दोन्ही चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहे, एवढंच साम्य असूनही. (गोग्गोड दिसणारे, चकचकीत तरुण-तरुणी चित्रपटातली मध्यवर्ती पात्रं नाहीत हे एकच कारण भारतीय चित्रपट बघण्यासाठी मला पुरेसं वाटतं.)

नंदन Sat, 08/02/2014 - 15:58
परीक्षण आवडलं. चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 19:12
मोजक्याच शब्दात पण परीपूर्ण असे सुंदर परीक्षण. नेटवर कुठे सापडला तर पाहीनच. अन्यथा, भारतात आल्यावर, माझे नशिब थोर असेल तर, चित्रपटगृहात पाहण्याची संधी मिळेल, अशी आशा बाळगतो.

सेरेपी Sun, 08/03/2014 - 09:18
इथे एका प्रायव्हेट स्क्रिनिंगमधे पाहिला होता (आणि डॉ. आगाशेंबरोबर गप्पांचा कार्यक्रमही होता). चित्रपट चांगला वाटला. त्यावेळी सार्वजनिकरित्या प्रदर्शित होणार नाही असं ते म्हणाले होते, तरीही आता प्रदर्शित करणे शक्य झाले हे चांगले झाले.

किसन शिंदे Sun, 08/03/2014 - 09:46
चित्रपटाचे परिक्षण आवडले. दुर्दैवाने 'क्लास'साठी असणारे असे छान छान मराठी इकडे पुण्या-मुंबईत फारश्या थियेटरला लागत नाहीत आणि लागले तरी दोन-चार दिवसात उतरवले जातात. पुण्यात 'प्रभात' तरी आहे अशा चांगल्या मराठी चित्रपटांसाठी, इथे ते ही नाही. भावे/सुकथनकर जोडगोळीचे १० वी फ आणि वास्तुपुरूष तुनळीवर शोधून पाहीले पण मिळाले नाहीत.

सस्नेह Sun, 08/03/2014 - 15:24
चित्रपट पाहण्याची उत्सुकता जागी झालीय. स्वातीताईकडे पाककौशल्याबरोबर हापण गुण आहे हे माहिती नव्हतं.

आजच सकाळी प्रभातला बघितला. अप्रतिम अविस्मरणिय अनुभव. डॉ. आगाशेंचा सरल नैसर्गिक तर इरावती हर्षे व मिलिंद सोमण यांचा संतुलित अभिनय आवडला. धन्यवाद स्वातीताई.. नेमक्या वेळी परिक्षण टाकण्यासाठी.