मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या

सानिकास्वप्निल · · पाककृती
मितानताईने दिलेले पाकातले चिरोटे बघून तोंडाला पाणी सुटलेय :) . त्यात पाकातल्या पुर्‍या व चिरोटे म्हणजे विकपॉईंट आहे . ताईने दिलेल्या पाककृतीला आम्ही पाकातले चिरोटे म्हणतो आणि रवा-मैद्याच्या किंवा कणकेच्या पुर्‍यांना साखरेच्या पाकात घोळवून तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे पाकातल्या पुर्‍या . मग काय पाकातल्या पुर्‍या खाऊन किती किती महिने झाले आठवतदेखील नाही, म्हट्ले आज बनवूनचं टाकू, जीभेचे चोचलेच म्हणा हवं तर ;) माझी आई आमरस घालून पुर्‍या करते व त्या पाकात घोळवते, अनायसे घरात आमरसाचा टिन होताच (हो हो आता आम्हाला कुठे मिळतोय हापूस आंबा...असो ) मग विचार केला इतर साहित्य ही घरात आहेच तर मग होऊन जाऊ दे :) . साहित्यः १ वाटी मैदा १/२ वाटी पेक्षा जरा कमी बारीक रवा अंब्याचा रस मैदा भिजवण्यापुरता लागेल तसा (ताजा आमरस ही वापरू शकता) ३/४ वाटी साखर (प्रमाण आमरसाच्या गोडीवर ठरवावे किंवा आपल्या आवडीनुसार) १/२ वाटी पाणी १/२ टीस्पून वेलचीपूड १/४ टीस्पून जायफळपूड केशराचा काड्या १/२ टीस्पून लिंबाचा रस १ टेस्पून बदाम +पिस्ता+काजू तुकडे सजावटीसाठी ३टेस्पून तेल पुर्‍या तळण्यासाठी तेल / तूप . पाकृ: एका भांड्यात मैदा,रवा एकत्र करावे. त्यात ३ टेस्पून तेलाचे कडकडीत मोहन घालावे. चांगले मिक्स करुन घ्यावे. आमरस थोडा थोडा करून मैद्यात घालावा व नीट मिक्स करावे. पीठ चांगले घट्ट मळून घ्यावे व झाकून १५-२० मिनिटे ठेवावे. १५-२० मिनिटांनंतर पीठ चांगले कुटून घ्यावे किंवा रवा-मैदा चांगला मळून घ्यावा. मोठी जाडसर पोळी लाटून हव्या त्या आकाराच्या, लहान-मोठ्या पुर्‍या कातून घ्याव्यात. . दुसरीकडे तेल / तुप गरम करत ठेवावे. वेगळ्या पातेल्यात साखर + पाणी+ लिंबाचा रस + वेलचीपूड + जायफळपूड+ केशर काड्या एकत्र करून गॅसवर ठेवावे. साखरेचा दोन तारी पाक तयार करा. तळणीत अलगद पुर्‍या सोडून मंद आचेवर तळून घ्याव्या. पुर्‍या तळल्याबरोबर कोमट पाकात घालून मुरत ठेवा. दुसर्‍या पुर्‍या तळून झाल्या की आधीच्या पाकातल्या पुर्‍या निथळून ताटात काढून ठेवा. . सर्व पुर्‍यांवर बदाम +पिस्ता+काजूचे तुकडे लावून सजवावे. सणासुदीला पक्वान्न म्हणून बनवता येतात. नेहमीच्या पुर्‍यांपेक्षा आमरस घालून केलेल्या पुर्‍या वेगळा प्रकार म्हणून छान लागतो. पुर्‍या फार जाड लाटायच्या नाही नाहीतर त्या चिवट होतात. अशाच प्रकारे कणकेच्या ही पाकातल्या पुर्‍या करता येतात. .

वाचने 21756 वाचनखूण प्रतिक्रिया 56

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 23:51
तुम्ही एक तर आम्हाला (समस्त मिपाकरांना) जेवायला तरी बोलवा, किंवा तुम्ही भारतात कधी आणि कुठे येत आहात? ते तरी कळवा....म्हणजे त्याप्रमाणे आम्ही सगळे (समस्त मिपाकर) त्या दिवशी आणि त्या ठिकाणी हजर होतो. (आयला नुसता छळवाद मांडलाय ह्यांनी)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 23:06
डोंबोलीला लावायचे सोडले आहे. कारण सध्या आम्ही यानबू (सौदी अरेबिया) इथे आहोत. उद्या जर चंद्रावर गेलो, तर चंद्र हेच मध्यवर्ती ठिकाण असेल. जावूदे, उगाच सानिका ताईंच्या धाग्यावर अवास्तव गप्पा नकोत.

स्वाती दिनेश Tue, 07/15/2014 - 00:27
मस्तच... पाकातल्या पुर्‍या आजी नेहमी करायची.. आमरसातल्या पाकातल्या पुर्‍या माहित नव्हत्या.. भन्न्नाट लागत असणार... स्वाती

रेवती Tue, 07/15/2014 - 01:14
तुझे कौतुक करायला शब्द नाहीत म्हणून नेहमीचा प्रतिसाद समजावा. फोटू सुरेख आलाय. आमरस घालून पुर्‍या करतात ही माहिती नवीन आहे. मी अजूनही तुला इकडे रहायला बोलावतीये. ये, माझी सख्खी शेजारीण बनून रहा. ;)

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 01:19
कातून केलेल्या पुर्‍या नामंजूर... झाकणीनं केलेल्या पुर्‍या, चाकूनं कापून केलेली वरणफळं/चकोल्या, मजा नाय राव! बाकी ते प्रेझेन्टेशन वगैरेला १०० पैकी १०१ मार्क आहेतच.

In reply to by प्यारे१

गणपा Tue, 07/15/2014 - 13:56
तीट लावल्या बद्दल प्यारे काकाला वाहाशु. ;) बाकी पहिला फोटो पाहुन पुढे जाताच आलं नाही. जीव तिथच घुटमळतोय अजुन.

In reply to by गणपा

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 14:23
खिक्क! वा शु म्हण अथवा काहीही म्हण. तुला, सानिका, दीपक, पेठकर काका, स्वाती दिनेश आणि तमाम मिपा बल्लवाचार्यांना सुट्टी देणार नाही. रेझिंग बार रे भौ, बाकी काही नाही. तुम्ही स्वतःच सवयी लावल्यात आम्हाला. बाकीच्यांना 'सूट' आहे. ;) (एकतरी 'मास्टरशेफ' बनायला नको का? अमूल मास्टरशेफ ऑफ इन्डिया मध्ये एकसारखा कांदा कापणं हा चाचणीचा भाग होता. सो..... करना पडता रे बाबा!)

नंदन Tue, 07/15/2014 - 05:14
पहिला फोटो पाहूनच ऊर्ध्व लागला. चित्रगुप्ताच्या पट्टेवाल्याला पाहून नुकताच धरणीतलावर परतलो आहे :)

साती Tue, 07/15/2014 - 07:33
काय सुरेख दिसतायत पुर्या. वाह! इतक्या टम्म फुगल्यात की पाणीपुरीलाही वापरू शकतो.

अजया Tue, 07/15/2014 - 08:07
हाय........ याहुन जास्त शब्द सुचत नाहीत. हे त्या फोटुमुळे झाले आहे.

इरसाल Tue, 07/15/2014 - 09:35
नहीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई!

दिपक.कुवेत Tue, 07/15/2014 - 10:34
पाकृ, प्रेझेंटेशन आणि पहिला/शेवटचा फोटो हे पाकृच्या नावाप्रमाणेच गोग्गोड आहे. आमरस घालुन पाकातल्या पुर्‍या हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला आणि तो चविष्ट असणार ह्यात शंकाच नाहि. चला आता आमरसाचा टिन आणणे आले (हो हो आता कुठे मिळतोय हापूस आंबा...असो )

जासुश Tue, 07/15/2014 - 13:01
मी सहसा प्रतिसाद देत नाही ..फक्त वाचून घेते तुझया रेसिपी ....काय भारी दिसताय पुर्‍या...असे वाटताय लॅपटॉप मधून उचलून घेऊ पुरी...तुला सलाम... मी हा पदार्थ कधी खाल्ला नाहीए..त्यामुळे एक सांग हा पुर्‍या कश्या व्हयला हव्यात मौ कडक की आपल्या नेहमीचा पुर्‍या असतात तश्या च ..कारण तू रवा वापरलय ..

In reply to by जासुश

रवा- मैद्याच्या पुर्‍या असल्यामुळे खुसखुशीत होतात. रवा तसा कमी प्रमाणात वापरलाय , पुर्‍या पाकात मुरत ठेवल्या की त्या खाताना मऊ लागतात. अगदीच कडक नाही तळायच्या (पाणी-पुरीसाठी लागणार्‍या पुर्‍यांसारख्या). कणकेच्या पुर्‍या केल्या तर त्या थोड्यावेळाने मऊ होतातच.

शिद Tue, 07/15/2014 - 16:16
जाम म्हणजे जामच भारी. तोंडाला असं पाणी सुटलं आहे ना विचारता सोय नाही. *crazy* आज घरी संकष्टीनिमित्त काहीतरी गोडधोड करुन खावं लागेल असं वाटतंय, त्याशिवाय चैन पडणार नाही. पाकॄ १ नं. *good*

सखी Tue, 07/15/2014 - 17:53
कातुन केलेल्या पु-या कातील दिसतात, पहीला फोटो फारच देखणा आलाय. छान पाकृ. नेवैद्याला करणं अवघड दिसतयं, कारण तोवर रहायला पाहीजे ना ताटात.

मदनबाण Fri, 07/18/2014 - 07:05
देवी आमच्या नेत्रकमलास अपार कष्ट देण्याचे हे व्रत आपण सातत्याने करत आहात,तरी आमच्या जिव्हेस काही तरी प्रसाद मिळावा याची कॄपा करुन सोय करावी ! ;) आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

पा.कृ. आणि फोटो "खल्लास" आहेत. बाकी ह्या तेलात किंवा तुपात विरघळत नाहीत ना? बाकी डाएटींगला सुरुंग लावल्याबद्दल नेहेमीप्रमाणे तीव्र णीषेध. :)!!

आयुर्हित Fri, 07/18/2014 - 23:34
हाये रामा ये क्या हुवा, क्यु ऐसे हमे सताने लगे, पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या हो सामने, हम काबु मे कैसे रहे? sweetest thing in life! मनापासुन धन्यवाद.