✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....

स
समीरसूर यांनी
गुरुवार, 06/12/2014 - 11:55  ·  लेख
लेख
एका मानसिक ताणतणावासंबधित लेखाला मी दिलेला प्रतिसाद (किंचित फेरफार करून) येथे लेख म्हणून टाकत आहे. बर्‍याच लोकांना असे छोटे-छोटे मनःस्वास्थ-विषयक त्रास होत असतात. कदाचित उपयोग होऊ शकेल हा लेख टाकण्याचा हेतू. शिवाय यातून चर्चा होऊन काही उपाय, अनुभव, निरीक्षणे शेअर करता आली तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. -------------------------------------------------------------------------------- अनामिक भय हे थोड्या-फार फरकाने सगळ्यांनाच असते. ते एखाद्या झाडाच्या कुजलेल्या अजस्त्र फांदीप्रमाणे कधी कधी खळखळ वाहणार्‍या निरुंद भागात अडकते आणि आपल्या मनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरते. आणि मग सुरु होतो अनिश्चिततेचा आणि मानसिक आंदोलनांचा खेळ! सगळं तसं पाहिलं तर नियमाप्रमाणे पुढे सरकत असतं पण आपलं मन त्या भयाने जागच्या जागी थांबून राहतं. हे असं भय बहुधा सगळ्यांनाच कधीतरी ग्रासतं. याची कारणे काहीही असू शकतात. नोकरी/धंद्यातली अनिश्चितता, गरीबी, मोठे अपयश, व्यवसायातले नुकसान, घरात कलह-तंटे, व्यसनाधीनता, कुणी जीवाभावाचं एकदम जाणं, जबर नुकसान (आर्थिक, मानसिक), कुठल्यातरी कारणाने आलेली अपराधी भावना, काहीतरी हातून निसटून गेल्याची चूटपूट आणि खंत, कामाच्या ठिकाणी कलह, एखाद्या व्यक्तीच्या (ओळखीची किंवा अनोळखी) विशिष्ट वागणूकीमुळे होणारा मनःस्ताप, अतिविचार करणे, भविष्याची चिंता, एखाद्या जवळच्या व्यक्तीविषयी चिंता, इत्यादी कुठलीही कारणे अशा भयगंडाला कारणीभूत ठरू शकतात. अगदी क्षुल्लक गोष्टी देखील कधी कधी मनाला त्रास देतात. हजारो-लाखो रुपयांचे नुकसान हसत-हसत पचवणारा कधी कधी एका क्षुल्लक पेन्सिलीच्या हरवण्याने कमालीचा अस्वस्थ होतो. प्रत्येक घटनेविषयी, व्यक्तीविषयी, सवयींविषयी, आणि प्रत्येक गोष्टीविषयी आपले स्वतःचे असे खास मजबूत विचारसंच किंवा दृष्टीकोन असतात. त्याला धक्का लागला की मनाची अस्वस्थता वाढते. ती जास्त वाढली की मग भयगंड येतो; आत्मविश्वास, उत्साह उतरणीला लागतात. त्यातून अधिक चिंता वाढते. असे हे दुष्टचक्र असते. बसमध्ये कंडक्टरकडून सुट्टे तीन रुपये घेण्याची आठवण सगळ्या प्रवासात सतत उराशी ठेवणारा प्रवासी दुसर्‍या दिवशी टपरीवर चहा पितांना एखाद्या गरीब भिकार्‍याला अगदी सहजपणे दहा-वीस रुपये देऊन टाकतो किंवा त्याला दहा-पंधरा रुपयांचा वडा-पाव आणि चहा विकत घेऊन देतो. आदल्या दिवसाच्या प्रवासात मात्र तो मजेत प्रवासाचा आनंद लुटू शकत नाही कारण सुट्टे तीन रुपये एवढ्याभोवतीच त्याचे जग त्यावेळी फिरत असते. असे होत असते. आणि आयुष्यात असे टप्पे येतच असतात. त्यामुळे घाबरून किंवा गोंधळून न जाता या समस्येवर तोडगा काढणे महत्वाचे. खालील काही उपाय फायद्याचे ठरू शकतील असे वाटते: १. श्वास - श्वासाशी संबधित एक सोपा उपाय चांगला आहे. उच्छवासासोबत निराशावादी विचार झटकून टाकणे प्रयत्नांती शक्य होते. २. व्यायाम - रोज न चुकता ३०-४० मिनीटे व्यायाम, वेगात चालणे इत्यादी आपल्याला उत्साह प्रदान करते. विचार स्थिर ठेवण्यास याचा निश्चितपणे उपयोग होतो. सतत बसून राहणे, लोळत असणे, नुसताच निरुद्देश टीव्ही बघत राहणे आपल्या मनाला मंद आणि आळशी बनवते. घरात देखील छोटी-छोटी कामे करत राहणे फायदेशीर असते. ३. वाचन - वाचनासारखा छंद नाही. आपल्याला जे आवडते ते वाचावे. वाचनामुळे माहिती प्रोसेस करण्याची कला अवगत होते. प्रसंगी यथोचित व्यक्त होणे आणि विचारांमध्ये प्रगल्भता असणे हे महत्वाचे बदल चांगल्या वाचनाने साध्य होतात. भाषा आणि विचार समृद्ध होतात. सामान्यतः लोकं माहितीलाच ज्ञान समजतात. माहितीला योग्य रीतीने प्रोसेस केल्याने ज्ञान प्राप्त होते. हे कौशल्य वाचनाने टोकदार होत जाते. त्यामुळे प्रत्येकाने वाचन करायलाच हवे. ४. छंद - जीव ओवाळून टाकावा इतक्या प्राणपणाने एखादा छंद जोपासल्यास आयुष्याला नवीन झळाळी येते. आणि मग त्यातून मिळणारा उत्साह, आत्मविश्वास टिकाऊ असतो. ५. शिकणे - आपल्या कामाच्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकणे नवा आत्मविश्वास कमवण्यात उपकारक ठरते. ६. करमणूक - चित्रपट, एखादी चांगली मालिका, मित्रांसोबत अड्डा, कुटुंबातल्या सदस्यांसोबत गप्पांचा फड, सहली, एखाद्या दिवशी कामाला दांडी मारून नुसते भटकणे, पावसात भिजणे, रात्री मस्त जेवण करून तब्येतीत पान जमवून एखादा सुंदर गाण्यांचा कार्यक्रम एंजॉय करणे, भरपूर खेळणे, या गोष्टी अत्यावश्यक आहेत. एक वेगळाच उत्साह देतात या गोष्टी. ७. स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. ८. विवेकबुद्धी शाबूत ठेवणे - सगळ्यांशी चांगले वागणे आणि आपण काही चुकीचे करत नाही आहोत हा ठाम विश्वास बाळगणे आवश्यक आहे. ९. सौहार्द - सौहार्द, मृदू भाषा, मने जिंकून घेण्याची हातोटी ही कौशल्ये जबरदस्त साथ देतात. स्वत:चे मनःस्वास्थ व्यवस्थित ठेवणे या कौशल्यांमुळे सोपे होते. शिवाय यामुळे नवीन ओळखी पटकन होतात, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे इसका मतलब ये नही की प्रत्येक ठिकाणी पडते घ्यावे. गरज असेल तिथे ठामपणे 'नाही' म्हणणे आणि वेळप्रसंगी बाह्या सरसावणे आपल्या इथे आवश्यक ठरते. समोरची व्यक्ती पंगा घेतांना दहावेळा विचार करेल अशी प्रतिमा केव्हाही फायदेशीर ठरते. अरे ला कारे करता येणे जमले पाहिजे. १०. जास्त भावनाप्रधान नसणे - अतिभावनाप्रधान असण्याचे असंख्य तोटे असतात. आपण कशाततरी गुंतून पडतो आणि जमाना सुळ्ळकन पुढे निघून जातो. हे कटाक्षाने टाळता यायला हवे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. ११. ऊर्जेचा योग्य वापर - योग्य ठिकाणी ऊर्जा खर्ची घालणे जास्त फायदेशीर ठरते. जिथे गरज नाही तिथून लक्ष काढून योग्य त्या ठिकाणी फोकस करणे जमले पाहिजे. पुस्तक लिहिणे हे ध्येय असेल तर टीव्ही बघणे, टंगळमंगळ करणे कटाक्षाने टाळता आले पाहिजे. मुख्य कामाला जास्त वेळ ठेऊन दुय्यम कामे चटकन उरकणे श्रेयस्कर ठरते. मुख्य काम कोणते आणि दुय्यम कामे कुठली हे ज्याचे त्याने ठरवायचे. १२. अतिविचार टाळणे - अतिविचार केल्याने मन पोखरले जाते. कुठला विचार केव्हा आवश्यक आहे हे ओळखता आले पाहिजे. आणि एका ठराविक मर्यादेनंतर विचार सोडून देता आले पाहिजे. 'जो होगा सो देखा जायेगा' ही बेफिकीरी कधी कधी माणसाला तगवते. जिथे आपले नियंत्रण नाही त्याबाबतीत अतिविचार टाळणे आवश्यक आहे. १३. तुलना टाळणे - त्याच्याकडे होंडा सिटी आहे; माझ्याकडे ऑल्टोच आहे; त्याला माझ्यापेक्षा ५०००० पगार जास्त आहे अशी तुलना सतत करणे टाळता आले पाहिजे. प्रत्येकाचा जीवनाविषयीचा दृष्टीकोन भिन्न असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातली वळणे आणि स्पीडब्रेकर्स निराळी असतात. आपले ध्येय काय आहे आणि आपल्याला ते कसे अचिव्ह करायचे आहे ही माहिती असणे यासारखी दुसरी श्रीमंती नाही. ऑफ कोर्स, एका ठराविक मर्यादेपर्यंत तुलना असणे आवश्यकच असते. त्यामुळे तुमची तहान कायम राहते. पण ही तहान जीवघेणी ठरू न देणे महत्वाचे. १४. विश्वास ठेवणे - आयुष्याच्या या मोठ्या खेळात चार-दोन चेंडू वाईड पडतात किंवा काही कॅचेस सुटतात किंवा कधी कधी खेळाडू त्रिफळाचित होतो. आयुष्याच्या या इतक्या मोठ्या प्रवासात या घटना क्षुल्लक ठरतात. दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळणे, एखादी परीक्षा अनुत्तीर्ण होणे, नोकरी गमावणे अशा घटना काही काळानंतर विसरल्या जातात. कुठल्याच घटनेने जीवन थांबून राहत नाही हा विश्वास बाळगणे महत्वाचे. काही काही प्रश्न चुटकीसरशी सुटतात. काहीतरी उपाय निघतोच आणि समस्या सुटतात ही खात्री बाळगली की समस्या खरोखर सुटायला सुरुवात होते. या अशा कमालीच्या सकारत्मक विचारांचे परिणाम चमत्काराइतकेच दिव्य असतात. त्यामुळे हा सकारात्मक विश्वास अत्यंत महत्वाचा असतो. हे उपाय प्राथमिकता देऊन अमलात आणल्यास फायदा होईल. पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्युड मात्र आवश्यक आहे. काही काही माणसे जन्मतःच आनंदी, उत्साही, कमालीची आत्मविश्वासपूर्ण, व्यवस्थित विचार करून योजना आखून आयुष्य जगणारी असतात. मोठे मोठे निर्णय घेणे, ते अमलांत आणणे, कुठेही भावनाप्रधान न होता आपली ध्येये साध्य करणे, स्थिर चित्ताने आपल्या ध्येयाच्या दिशेने आगेकुच करत राहणे, दु:ख आणि संकटकाळातदेखील शांत राहून थंड डोक्याने विचार करणे या गोष्टी अशा माणसांना लीलया जमतात. ज्यांना हे जमत नाही त्यांना मनाची सतत मशागत करत राहणे आवश्यक ठरते. त्यासाठी वरील उपाय कामात येतील असे वाटते. मानसोपचारतज्ञाची गरज असेल तरच ती मदत घ्यावी. रोजच्या जगण्यातल्या ताणतणावांसाठी आणि छोट्या-मोठ्या कुरबुरींसाठी मानसोपचारतज्ञाची आवश्यकता नाही असे वाटते. त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता देखील असते. आपण मानसोपचारत्ज्ञाची मदत घेत आहोत म्हणजे आपल्याला खूप मोठा आजार आहे असे वाटायला लागते. बहुतेक मानसोपचारतज्ञ त्यांच्या उपचारपद्धतींमधून तेच ध्वनित करत असतात. शिवाय मानसोपचारतज्ञ आता आपल्याला पूर्ण बरे करेल; म्हणजे आपल्याला काहीच करावे लागणार नाही अशी भावना होते. स्वमदतीशिवाय जगातला कुठलाच मानसोपचारतज्ञ मदत करू शकत नाही. अगदीच स्किझोफ्रेनियासारखे आजार असतील तर औषधोपचार आणि तज्ञांची मदत अपरिहार्य ठरते; परंतु साध्या साध्या समस्यांसाठी आपण स्वत:च मशागत केली तर उपचारांची गरज भासत नाही असे वाटते. ध्यान-धारणा, प्राणायम, इत्यादी मार्गांचा मनाला निरोगी ठेवण्यासाठी उपयोग होतो का? मला नक्की माहित नाही. जाणकार अधिक माहिती पुरवू शकतील. याबाबतीत माझा अनुभव अजिबातच नाही. नाही म्हणायला विपश्यनाचा १० दिवसांचा एक कार्यक्रम मी इगतपुरीला केलेला आहे. अंतर्मुख लोकांसाठी कदाचित या कार्यक्रमाचा उपयोग होत असावा परंतु ज्यांना खूप बोलायला आणि स्वच्छंद आयुष्य जगायला आवडते त्यांच्यासाठी या कार्यक्रमाच्या उपयुक्ततेविषयी माझ्या मनात शंका आहेत. व्यक्तीश: मला या कार्यक्रमाचा शून्य उपयोग झाला. दहा दिवस अजिबात न बोलणे, श्वासावर लक्ष नियंत्रित करणे, नेहमीच अगदी साधे जेवण घेणे, रोज पहाटे ५ वाजता उठून डायरेक्ट ध्यानधारणेत घुसणे वगैरे मला काही झेपले नाही. शेवटी दिवस पर्सिस खंबाटाला बघण्यात कसे बसे घालवले (होय, त्या कार्यक्रमामध्ये त्यावेळेस पर्सिस खंबाटा आलेली होती). कित्येक लोकं या कार्यक्रमात चक्क झोपून जात असत. तिथून सुटल्यावर जीव भांड्यात पडला होता. असो. हा विचार ज्याने त्याने करायचा. शेवटी आपले सूर, मगदूर, आणि सुरूर महत्वाचे. आपली गाण्याची पट्टी कोणती, आपली झेप घेण्याची कुवत किती, आणि आपल्यामध्ये कौशल्ये, महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती, जिद्द यांचे वादळ आहे की फक्त एक छानशी झुळूक आहे हे तपासणे महत्वाचे. ते एकदा ओळखले की मग सगळे व्यवस्थित होत जाते. त्यामुळे टेंशन घेऊ न घेणे आणि सगळे नीट होईल हा विश्वास ठेवणे महत्वाचे. आणि आपल्या परीने मनाची मशागत करणे अधिक महत्वाचे. त्रास खूप वाढला तर मात्र मानसोपचारतज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे. मी वर लिहिलेले सगळे करतो असे नाही. जे जितके जमते तितके करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे फायदे मी अनुभवले आहेत. सगळे मला जमत नाही. कुवत अपुरी पडते. विचारांची प्रगल्भता कमी पडते. हे सगळे केल्याने नक्कीच फायदा होईल असे वाटते. प्रत्येकाच्या ताणतणावांना सामोरे जाण्याच्या पद्धती निराळ्या असतात. कदाचित त्याचा ऊहापोह केल्याने काही नवीन उपाय कळतील आणि सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. शेवटी 'मन चंगा तो कठौती मे गंगा'!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
26154 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

छान!

पैसा
गुरुवार, 06/12/2014 - 12:31 नवीन
लेख आवडला. यात दिलेल्या गोष्टी नॉर्मल माणसालाही आयुष्य समृद्ध करायला निश्चित मदत करतील. ध्यान-धारणेबद्दल मी सांगू शकते. मी सिद्ध समाधी योग आणि ते ज्यावर आधारित आहे ते महर्षी महेश योगी यांचे भावातीत ध्यान शिकले आहे आणि गेली सुमारे २२ वर्षे करत आहे. महत्त्वाचा फायदा म्हणजे ताबडतोब रिलॅक्स होता येतं आणि अगदी कमी झोप पुरते. मनाला आणि शरीराला एकदम बरीच विश्रांती सहजच मिळते.
  • Log in or register to post comments

ध्यानधारणा

समीरसूर
Mon, 06/16/2014 - 13:41 नवीन
आपल्यासारखा अनुभव बर्‍याच लोकांना असतो. थोडक्यात काही टेक्निक्स देता येतील का? कमी वेळ लागणारी आणि लवकर रिलॅक्स करणारी टेक्निक्स असतील तर सगळ्यांनाच फायदा होईल. याचा सगळ्यांना फायदा होऊ शकतो का? का कुणास ठाऊक मला कधी या वाटेला जावेसे वाटले नाही. ध्यानधारणेचा उपयोग होण्यासाठी स्वभाव महत्वाचा असतो का? उदा. एखादा चांगला चित्रपट पाहिला की मला खूप रिलॅक्स्ड वाटते; विचारांमध्ये सुसुत्रता येते असा ढोबळ अनुभव आहे. एखादे चांगले पुस्तक वाचण्याची क्रिया जितके दिवस सुरु असते तितके दिवस मी खुश असतो. मग मला बाकी कशाचीच चिंता नसते. अगदी खाणे-पिणे देखील जसे असेल तसे चालते. बाकी कुणाचे काही विशेष अनुभव आहेत का? आपल्या प्रतिसादाबद्दल आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सायक्लिक मेडिटेशन

विटेकर
Mon, 06/16/2014 - 14:05 नवीन
सायक्लिक मेडिटेशन नावाची एक ध्यानाची पद्धत, (प्राचीन योग शास्त्रावर आधारीतच पण जरा क्याप्सुल स्वरुपात)बन्गलोरच्या विवेकानंद योग विद्यापीठाने तयार केली आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल झाल्या आहेत. मी पण अधिक माहीती गोळा करीत आहे. तणाव व्यवस्थापन हेच त्याचे सूत्र आहे. गुगलून पाहिल्यास अधिक माहीती मिळेल. तणाव टाळता येणार नाही पण व्यवस्थापन करता येईल असा त्यांचा दावा आहे. बाकी कुणाचे काही विशेष अनुभव आहेत का? पूर्वी पु ल चे कोणतेही पुस्तक माझा ताण हलका करत असे, हल्ली दासबोध घेऊन बसतो. वास्तविक एरवी मी रोजचा पेपेर देखील कधी चवीने वाचत नाही. पण प्रत्येकाने आप-आपले आनंद निधान स्वतः शोधणे आवश्यक आहे. एकच फॉर्म्युला सर्वाना लागू होणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

करेक्ट

समीरसूर
Mon, 06/16/2014 - 14:11 नवीन
ताण व्यवस्थापन आणि आपले आनंदाचे निधान शोधणे महत्वाचे...ते जमले की मग काही कठीण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

तुस्सी एक्दम क्रेक्ट हो जी!

समीरसूर
Mon, 06/16/2014 - 14:13 नवीन
ताणाचे योग्य व्यवस्थापन आणि आपले आनंदाचे निधान आपण शोधणे महत्वाचे. ते जमले की मग काही कठीण राहत नसावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

माफ करा

पैसा
Mon, 06/16/2014 - 15:20 नवीन
पण प्रत्यक्ष तंत्र हे गुरूनेच शिकवावे. ढोबळपणे त्यांची पद्धत सांगते. ते प्रत्येकाकडून एक फॉर्म भरून घेतात आणि त्यात दिसणार्‍या स्वभावानुसार गुरू एकाक्षरी मंत्र देतात. हे मंत्र ध्यानाच्या काळात सतत म्हणायचे नसतात, तर आपल्या मनात विचार येत आहेत हे जाणवले तर एखादवेळेस त्यांचा उच्चार मनात करायचा. १५/२० मिनिटे स्वस्थ बसणे. तेव्हा मनात जे विचार येतील ते येत जात रहातात आणि पाण्यातल्या लाटा जशा कमी होतात तसे हळूहळू मन शांत होत जाते अशी काहीशी ही पद्धत आहे. थोड्या वेळात विचाररहित अवस्था येते आणि अगदी शांत, रिलॅक्स वाटते. या काही क्षणात बर्‍याच वेळेच्या झोपेची गरज भागते. या ध्यानात कोणतेही धार्मिक कर्मकांड, तत्त्वज्ञान इ. चा काही संबंध नाही. हे खरे तर ध्यान नव्हेच. ध्यान म्हणजे एक विषय मनात धरून त्याचे स्मरण करणे. त्या अर्थाने ही क्रिया समाधीच्या जवळ जाणारी असावी असा माझा अंदाज. अंदाज म्हणते कारण मी या विषयात काही बोलावे असा माझा अधिकार नाही. फक्त प्रॅक्टिकल फायदे सांगू शकते. सर्वजण करू शकतात असा याच्या जवळ जाणारा प्रकार म्हणजे शवासन. किंवा प्राणायाम करून श्वासावर नियंत्रण आणूनही बराच फायदा होतो. मात्र जे तीव्र /क्रॉनिक डिप्रेशनचे शिकार आहेत त्यांना समाधी शक्यतो शिकवत नाहीत. त्यांना विचाररहित अवस्था प्राप्त होणे कठीण जाते. इतर कोणालाही, अगदी लहान मुलांपासून म्हातार्‍यांपर्यंत आणि कोणत्याही शारीरिक आजाराच्या रुग्णाला ध्यान/समाधी यांचा फायदा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

धन्यवाद!

समीरसूर
Tue, 06/17/2014 - 10:35 नवीन
या उअपयुक्त माहितीबद्दल! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ssy.org

damn
Tue, 07/28/2015 - 10:21 नवीन
ssy.org या संस्थळावर जाउन फिरून आलो. पण भावातीत ध्यान काही सापडले नाही. तुम्ही सांगितलेली relaxation ची पद्धत नक्की कशाचा प्रकार आहे- सिद्ध समाधी योग की भावातीत योग? अगदी कमी झोप म्हणजे साधारण किती कमी याबद्दल थोडी माहिती द्याल का? म्हणजे असे की, एखाद्या माणसाला साडे सात झोप आवश्यक असेल, तर तुम्ही सुचवलेल्या relaxation च्या पद्धतीने हा काल 3 किवा 4 तासांवर येऊ शकतो? की, त्याने/तीने केलेल्या शारीरिक कष्टांवर हे जास्त अवलंबून असेल? ssy.org या वेबसाईट वर बरेच प्रोग्राम आणि ट्रेनिंग आहेत. त्यापैकी, या झोपेच्या आणि relaxation च्या प्रश्ना साठी नक्की कोणते ट्रेनिंग किंवा प्रोग्राम सुचवाल? ssy.org ला चौकशी साठी एमैल पाठवलेला आहे. पण अजून तरी उत्तर आलेले नाहीये. शक्य झाल्यास अमेरिकेत च ट्रेनिंग करता आले तर बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

विपाश्यानेमध्ये अतिशय

म्हैस
गुरुवार, 06/12/2014 - 13:12 नवीन
विपाश्यानेमध्ये अतिशय अतिशयोक्ती असते त्याचा खरच काही उपयोग होतो कि नाही ह्याबद्दल शंका आहे . पण रोज थोडी ध्यानधारणा आणि प्राणायामाचा हमखास उपयोग होतो. स्वतः चा नुभव आहे . म्हणजे तुमचा हजार रुपयाचं नुकसान झाला असेल तर ते तुम्हाला आपोआप मिळतील असा नाही तर डोकं शांत राहून विचार करण्यासाची , मार्ग काढण्याची शक्ती वाढेल
  • Log in or register to post comments

ह्म्म

vrushali n
गुरुवार, 06/12/2014 - 14:25 नवीन
मी पण विपाश्यना साधनेचे दहा दिवसांचे बरेच कोर्सेस केलेत्,पण दैनंदिन साधना नाही करत्,जर रोज एक तास जरी केली तरिही बराच फायदा होतो आणी जर मनस्थीती नीराश असेल तर गंभीर पणे विपश्यनेचा १० दीवसांचा कोर्स करतो ,तेव्हा जास्त फायदा होतो असे मला वाटत
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

विटेकर
गुरुवार, 06/12/2014 - 14:35 नवीन
लेख उत्तम आनी मांड्णी छान आहे. फकत एका मुद्द्याबद्दल थोडासा असहमत आहे ! स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना नेहमीच अधिक तणाव उत्पन्न करतात. असाध्य ध्येय घेतल्याने नैराश्य पदरी पड्ण्याचीच शक्यता अधिक असते. दिवास्वप्ने पाहणे हे देखील कमकुवत मनोवृत्तीचे निर्देशक आहे. माझ्या मते प्रत्येकाने वस्तुनिष्ठपणे अत्यंत कठोरपणे आत्मपरिक्षण करुन स्वॉट अनालिसिस करावे आणि मगच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे. स्वॉट अनालिसिस करताना आपल्या जवळच्या व्यक्तीची ( आपण कसे आहोत हे आपल्या आई- वडीलांना जास्त चांगल्या प्रकारे माहीती असते , अर्थात अपवाद असू शकतात ) मदत घ्यावी , जेणेकरुन स्वॉट अधिक वस्तुनिष्ठ होईल. थोडक्यात रेटर बायस टाळावा. एकदा ध्येय ठरविल्यावर त्याचा वारंवार आढावा घेऊन परिस्थिती बदलली असेल तर ( जसे की अचानक उद्भवणारे शारिरिक आजार , अर्थिक फट्का किंवा धंदाला मिळालेला उठाव , परद्शी जाण्याची संधी )त्याप्रमाणे त्यात योग्य ते बदल करावेत. आपल्या आयुष्याकडून असणार्‍या अपेक्षा वास्तववादी असतील तर आयुष्य अधिक सुखकर होते, सुखासीन नाही झाले तरीही, असा स्वानुभव आहे.
  • Log in or register to post comments

सहमत

समीरसूर
Mon, 06/16/2014 - 13:47 नवीन
धन्यवाद, विटेकर साहेब. आपल्या या विचाराशी सहमत आहे. आपली कुवत ओळखणे महत्वाचे आहे. पण एखाद्याला जर खरोखर आपली कुवत जास्त आहे असे कळले आणि तरीदेखील ती व्यक्ती टंगळ-मंगळ करण्यात वेळ दवडत असेल तर अशा व्यक्तीसाठी अशी ध्येये समोर ठेवणे फायद्याचे ठरत असावे असे वाटते. कित्येक प्रसिद्ध लेखक आपली कुवत व्यवस्थित ओळखल्याने यशस्वी झालेले आपण पाहतो. माझ्या मित्रांपैकी एकाला चित्रे काढण्याचा छंद होता. त्याने छोट्या छोट्या गोष्टी चित्रांभोवती गुंफून स्वत:चे लहान मुलांसाठीचे एक आकर्षक पुस्तक 'स्कॉलास्टिक' तर्फे प्रकशित केले आणी त्याला प्रतिसादही उत्तम लाभला. सध्या तो दुसर्‍या पुस्तकाच्या तयारीत आहे. कुवत आणि प्रखर इच्छाशक्ती असेल तर स्वप्ने बघायाला हवीत तरच ती पूर्ण होण्याच्या शक्यता वाढतात असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

उत्तम लेख

विटेकर
गुरुवार, 06/12/2014 - 14:35 नवीन
लेख उत्तम आनी मांड्णी छान आहे. फकत एका मुद्द्याबद्दल थोडासा असहमत आहे ! स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना नेहमीच अधिक तणाव उत्पन्न करतात. असाध्य ध्येय घेतल्याने नैराश्य पदरी पड्ण्याचीच शक्यता अधिक असते. दिवास्वप्ने पाहणे हे देखील कमकुवत मनोवृत्तीचे निर्देशक आहे. माझ्या मते प्रत्येकाने वस्तुनिष्ठपणे अत्यंत कठोरपणे आत्मपरिक्षण करुन स्वॉट अनालिसिस करावे आणि मगच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे. स्वॉट अनालिसिस करताना आपल्या जवळच्या व्यक्तीची ( आपण कसे आहोत हे आपल्या आई- वडीलांना जास्त चांगल्या प्रकारे माहीती असते , अर्थात अपवाद असू शकतात ) मदत घ्यावी , जेणेकरुन स्वॉट अधिक वस्तुनिष्ठ होईल. थोडक्यात रेटर बायस टाळावा. एकदा ध्येय ठरविल्यावर त्याचा वारंवार आढावा घेऊन परिस्थिती बदलली असेल तर ( जसे की अचानक उद्भवणारे शारिरिक आजार , अर्थिक फट्का किंवा धंदाला मिळालेला उठाव , परद्शी जाण्याची संधी )त्याप्रमाणे त्यात योग्य ते बदल करावेत. आपल्या आयुष्याकडून असणार्‍या अपेक्षा वास्तववादी असतील तर आयुष्य अधिक सुखकर होते, सुखासीन नाही झाले तरीही, असा स्वानुभव आहे.
  • Log in or register to post comments

बैलाचा डोळा !

विटेकर
गुरुवार, 06/12/2014 - 14:37 नवीन
१४. विश्वास ठेवणे - आयुष्याच्या या मोठ्या खेळात चार-दोन चेंडू वाईड पडतात किंवा काही कॅचेस सुटतात किंवा कधी कधी खेळाडू त्रिफळाचित होतो. आयुष्याच्या या इतक्या मोठ्या प्रवासात या घटना क्षुल्लक ठरतात. दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळणे, एखादी परीक्षा अनुत्तीर्ण होणे, नोकरी गमावणे अशा घटना काही काळानंतर विसरल्या जातात. कुठल्याच घटनेने जीवन थांबून राहत नाही हा विश्वास बाळगणे महत्वाचे. काही काही प्रश्न चुटकीसरशी सुटतात. काहीतरी उपाय निघतोच आणि समस्या सुटतात ही खात्री बाळगली की समस्या खरोखर सुटायला सुरुवात होते. या अशा कमालीच्या सकारत्मक विचारांचे परिणाम चमत्काराइतकेच दिव्य असतात. त्यामुळे हा सकारात्मक विश्वास अत्यंत महत्वाचा असतो.
  • Log in or register to post comments

गरुडाचा

केदार-मिसळपाव
Tue, 06/17/2014 - 15:43 नवीन
किंवा ससाण्याचा म्हणा की राव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

बैलाचा डोळा

विटेकर
Wed, 06/18/2014 - 14:11 नवीन
बैलाचा डोळा = बुल्स आय या अर्थाने ! खास मिपा भाषेत- बलिवर्द नेत्रभंजन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

मिपा

केदार-मिसळपाव
Wed, 06/18/2014 - 14:25 नवीन
भाषा आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

लेख आवडला...

मुक्त विहारि
गुरुवार, 06/12/2014 - 15:17 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

छान लेख. पण सल्ला देणे......

pramanik
गुरुवार, 06/12/2014 - 15:31 नवीन
छान लेख. पण सल्ला देणे......
  • Log in or register to post comments

सल्ला

समीरसूर
Mon, 06/16/2014 - 14:09 नवीन
तौबा तौबा! मी सल्ला देत नाहीये. माझ्या तोकड्या अनुभवांवर आधारित असलेले उपाय सांगण्याचा प्रयत्न आहे हा. मी बापुडा काय सल्ला देणार. मी यातलं सगळंच सतत फॉलो नाही करु शकत. तेवढी मॅच्युरिटी नाही माझ्यात. जमेल तेवढं करतो. आणि एक, शेवटी काय आणि किती आणि कसं फॉलो करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. वजन कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतांना ऋजुता दिवेकरची पुस्तके नुसती वाचून उपयोग नाही; ती फॉलो करावी लागतात. समोर चितळेंची आंबाबर्फी किंवा गोड-मऊ कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क आल्यावर ठामपणे नाही म्हणावे लागते आणि त्यासाठी वाईट वाटण्याची स्टेज पार पाडावी लागते. आणि असं एकदाच नाही तर सतत सलग कित्येक महिने करावे लागते. सोबत योग्य तो व्यायाम करावा लागतो. अनावश्यक आराम कटाक्षाने टाळावा लागतो. टीव्हीसमोर बसणे बंद करावे लागते. मग हळूहळू वजन हलायला सुरुवात होते. :-) ही प्रखर इच्छाशक्ती आतून यावी लागते. ती बाहेर नाही मिळत. आणि अशी इच्छाशक्ती नसेल तर मग काय करणार? :-) फिर तो भगवान भी कुछ नही कर सकता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pramanik

छान लेख

अजो
गुरुवार, 06/12/2014 - 16:50 नवीन
छान लेख
  • Log in or register to post comments

छान लेख !

मितान
गुरुवार, 06/12/2014 - 18:31 नवीन
आपण मानसोपचारत्ज्ञाची मदत घेत आहोत म्हणजे आपल्याला खूप मोठा आजार आहे असे वाटायला लागते. बहुतेक मानसोपचारतज्ञ त्यांच्या उपचारपद्धतींमधून तेच ध्वनित करत असतात. >>>> हे दुसरे वाक्य जरा गमतीशीर आहे ;)
  • Log in or register to post comments

सोपे उपाय

समीरसूर
Mon, 06/16/2014 - 14:57 नवीन
एखादी व्यक्ती अगदी साधा प्रॉब्लेम घेऊन मानसोपचारतज्ञाकडे गेली असे समजा. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला थोडे बेचैन वाटते आहे, थोडे टेंशन आलेले आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन व्यवस्थापन आल्याने काहीतरी नवीन उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असल्याने ती व्यक्ती तिच्या नोकरीबाबत साशंक झालेली आहे असे धरून चलू. अशी व्यक्ती बरेच दिवस ही अस्वस्थता सहन केल्यानंतर मानसोपचारतज्ञाकडे गेली असे समजू. अशा परिस्थितीमध्येदेखील मानसोपचारतज्ञ त्या व्यक्तीला: "अरे काही नाही झाले तुला. असे होतच असते. थोडेफार टेंशन, मानसिक अस्वस्थता सगळ्यांनाच असते. काही काळजी करू नकोस. औषधांची अजिबात गरज नाही. जरा फिरायला जा, कुटुंबासोबत मजा कर, पिक्चरला जा, जरा मित्रांसोबत बस, गप्पा मार, गप्पांच्या ओघात दोघा-चौघांना, ते तिथे नाहीयेत असं बघून, सणसणीत शिव्या हासड, अगदीच वाटलं आणि झेपलं तर स्कॉचचे दोन घोट रिचव...सगळं व्यवस्थित होईल. बाकी नोकरीचे निर्णय घ्यायला आणि त्यातली आव्हाने पेलायला तू समर्थ आहेसच की. फिर कायको डरना? जा घरी. काय? आणि एक महिन्याने मला मला सांग." असं म्हणेल याची शाश्वती नाही. या उलट तो हजार प्रश्न विचारेल, त्याचा सहायक सगळं लिहून घेईल. मग गंभीर चेहरा करून तो म्हणेल, "मिस्टर आगलावे, मला तुमचा प्रॉब्लेम कळलाय. आता आपल्याला तुमच्या मनातलं हे भय टप्प्या-टप्प्याने काढावे लागेल. मग तुमचा आत्मविश्वास कसा वाढेल हे आपण नंतर बघू. सध्या तुम्हाला डिप्रेशन आहे असे वाटतेय. आपण सगळं हळू-हळू व्यवस्थित करू. काही घाबरू नका. ही मी काही औषधी लिहून देतो ती सुरु करा. आणि कौन्सेलिंगसाठी मात्र तुम्हाला आठवड्यातून एकदा यावे लागेल. एक तासाच्या या सेशन्स मध्ये तुमच्यामनातून भय काढून टाकण्यावर आमच्या सायकोलॉजिस्टचा भर असेल. साधारण तीन महिने कौन्सेलिंग करावे लागेल. औषधी आणि कौन्सेलिंगच्या मदतीने तुम्ही साधारण तीन ते साडे तीन महिन्यात बरे व्हाल ही खात्री बाळगा. आजकाल हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर आढळतो. विशेषतः तुमच्या (क्षेत्राचे नाव)मध्ये जास्त आढळतो. पण काळजी करू नका. ठीक आहे. या आता." संपलं!! आगलावे स्वतःला आग लागल्यासारखे भंजाळलेल्या अवस्थेत बाहेर पडतात. च्यायला, मला डिप्रेशन झाले आहे? सालं, कळलंच नाही. मग बाहेर पडल्यावर आगलावे डिप्रेशनचा चष्मा घालूनच फिरायला लागतात. घरी गुमसूम होऊन पडून राहणे; बायकोला, "अगं कळत नाही का तुला? मला डिप्रेशनचा त्रास आहे. शांत रहा जरा. काय जी कामं आहेत ती तू करून टाक. मला उत्साह नाही. मला डिप्रेशन आहे." असं म्हणून टीव्ही बघत राहणे असले उद्योग सुरु होतात. सुरुवातीला बायको काळजी घेते पण नंतर वैतागते. वाद होतात. अचानक आठ-दहा दिवसांनी प्रमोशनचे पत्र मिळते, किंवा पगारवाढीचे पत्र मिळते, किंवा ऑफिसात कसलेसे मानाचे बक्षीस मिळते, किंवा एखाद्या प्रोजेक्टवर किंवा कामावर अतिमहत्वाच्या व्यक्तीकडून प्रशंसा मिळते आणि आगलावे प्रसन्न होतात. औषधी मागे पडतात, कौन्सेलिंग बंद पडते आणि गाडी पुन्हा सुसाट धावू लागते. तोपर्यंत मानसोपचारतज्ञाने दोन-अडीच हजार, औषधविक्रेत्याने हजार-पाचशे कमावून घेतलेले असतात. आगलाव्यांचे डिप्रेशन वाफ होऊन उडून जाते. इथे (क्षेत्राचे नाव) काहीही असू शकते. आयटी ताणतणावांचे हक्काचे क्षेत्र! पण आगलाव्यांनी प्राणीसंग्रहालय पर्यवेक्षक असे जरी सांगीतले तरी मानसोपचारतज्ञ काहीतरी ठोकून देतातः "आजकाल झू मॅनेजमेंटच्या क्षेत्रात काम करणार्‍यांच्या मानसिक ताणतणावासंबंधीच्या तक्रारींमध्ये खूप वाढ झालेली आहे. प्राणी नीट आहेत की नाही याची काळजी वाहणे, २४ तास त्यांच्या आरोग्याची चिंता वाहणे, एखाद्या प्राण्याला काही झाले तर रात्री-अपरात्री झूमध्ये जाणे, रात्र-रात्र जागून काढणे, वरिष्ठांचे ऐकणे, त्यांची टारगेटस पूर्ण करणे, गणना करण्यासाठी भटकणे, त्यातून मग कुटुंबाला वेळ देता येत नाही; त्यातून कौटुंबिक वाद फोफावतात आणि मग मन बेचैन रहायला लागते. परवाच हिंदू मध्ये बातमी होती. युगांडामध्ये झू कर्मचार्‍यांसाठी खास मनःशक्ती वाढवण्याचे वर्ग अटेंड करणे युगांडाच्या सरकारने बंधनकारक केले आहे. मागे देनपसारच्या झू मधून एक रानमांजर एका घरगुती बोक्यासोबत पसार झाले तर तिथल्या झू सुपरवायझरने आत्महत्या केली. अशा चुकीसाठी तिकडे नोकरीवरून काढून टाकतात म्हणे!! एनीवे, बरं झालं तुम्ही लवकर आलात. आपण सगळं व्यवस्थित करू...." अतिशयोक्ती असेल कदाचित पण साधारणपणे असे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बारीक-सारीक गोष्टींसाठी मानसोपचारतज्ञाकडे जाणे टाळावे असे वाटते. मोठ्या आजारांसाठी मानसोपचारतज्ञांची मदत अपरिहार्य ठरते हे मात्र वास्तव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

वा वा...

केदार-मिसळपाव
Tue, 06/17/2014 - 15:46 नवीन
काय सुरेख लिहिले आहे. अगदी अगदी योग्य सल्हा. ह्या प्रतिक्रीयेचा पंखा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

१२. अतिविचार टाळणे हा मुद्दा

मदनबाण
Fri, 06/20/2014 - 07:31 नवीन
१२. अतिविचार टाळणे हा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.विचारांवर नियंत्रण न-राहणे हे समस्येचे मूळ कारण ठरु शकते.भूतकाळात वारंवार रमू नये आणि भविष्याचा अती विचार करु नये,म्हणजे वर्तमान काळात जगणे सुसह्य होउ शकते. ज्या परिस्थीतीवर आपले नियंत्रण नाही अशावर विचार करुन काय फायदा ? असा प्रश्न आपणच आपल्या मनाला करावा, म्हणजे अतिविचार करण्यावर लगाम घालता येइल. आयटी ताणतणावांचे हक्काचे क्षेत्र! हे मात्र १००% खरे आहे.माझ्या ८ वर्षांच्या आयटी विश्वाच्या अनुभवातुन हे ठाम सांगु शकतो की इथे ताणाला पर्याय नाही. { आठवा एसएपी इंडिया चे सीइओ आणि एमडी रंजन दास हे वयाच्या ४२ वर्षी हार्ट अ‍ॅटॅक ने गेले. साल-२००९ } पण असे इतर कुठलेही क्षेत्र उरले आहे जिथे ताण नाही ? वर दिलेल्या १४ पर्यांय मधे अजुन एक पर्यात सुचवावा वाटतो तो म्हणजे संगीत. :) ताणात असेल तर तुम्हाला आवडणारी, आधी ऐकलेली / न-ऐकलेली गाणी ऐका. ताण कमी होण्यास नक्की मदत होइल. :) निदान मी तरी हाच उपाय माझ्या बाबतीत करतो. जाता जाता :- आपण आपल्या भ्रष्ट आणि माजलेल्या वळू सारखे वागणार्‍या राजकरणार्‍याकडुन एक गोष्ट मात्र शिकायला हवी ती म्हणजे निश्चिंत राहणे ! हजारो कोटींचे घोटाळे करुन हे सांड कसे मोकाट फिरतात बघा ! दिसतो कोणता ताण यांच्या चेहर्‍यावर ? उलट निर्लज्य हास्य मात्र नक्की दिसुन येइल. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तीर्थ विठ्ठल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

लेख आणि हा प्रतिसाद आवडला.

नगरीनिरंजन
Mon, 07/27/2015 - 12:37 नवीन
लेख आणि हा प्रतिसाद आवडला. व्यावसायिक मदत घ्यायला गेलं की सगळे नाही तरी बरेचसे लोक लुबाडायला बघतात हे सत्य आहे. मुळात मानसिक विकार हे आपल्याच मनाच्या लोभ-मोहातून जन्मतात आणि इच्छा काबूत ठेवणे; इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशनची अपेक्षा न बाळगणे हाच त्यावर उपाय आहे. परंतु कॅपिटालिस्ट मार्केट इकॉनॉमीमध्ये ग्रीड इज गुड म्हणून लोकांना पढवतात आणि रॅट रेस लावून देतात. म्हणूनच अमेरिकेसारख्या देशात अनेक लोक ॲंटीडिप्रेसंट्सवर असलेले दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

अरेरे किती अज्ञानी हा प्रतिसाद

द-बाहुबली
Mon, 07/27/2015 - 12:56 नवीन
अवो मानसशास्त्र व शास्त्रज्ञ म्हणजे जोक वाटतो काय ? मिपा(मानस)तज्ञांनी नक्किच हा प्रतिसाद वाचला नाहीये, कुठे हायेत ते ? त्यांचा प्रकाश इथे पडल्याशीवाय हे सर्व अपुर्ण आहे. मिपा(मानस)तज्ञांच्या अपेक्षित उत्तराच्या प्रतिक्षेत. त्यांचे मत म्हणजे ब्रम्हवाक्यच असते मनोविकारांबाबत. अगदी लेखकांच्या (पुस्तकाच्या) नावासहीत ते सोदाहरण देतील फेक्ट्स काय आणी तुमचे चुकीचे बोसर्वेशन काय आहे ते. असो आमचे आपले अल्पज्ञांनी लोकांचे प्रामाणीक मत आहे या जगात "असहायत्ता" ही एकमेव गोष्ट आहे जी डीप्रेशन वगैरे वगैरे स्टफची ( तेच भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....) जन्मदात्री आहे. जी व्यक्ती असहाय्य नाही ती कधीच डिप्रेस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

लेख आवडला

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 06/12/2014 - 18:56 नवीन
लेखन,व्यायाम,वाचन,छंद हे सगळे म्हणायला ठीक वाटते हो पण नेहमीच सगळ्यांना जमेल असे नाही.त्यातल्या त्यात जे जमेल ते फॉलो करावे असे नोंदवतो
  • Log in or register to post comments

वेळ काढावा लागतो

समीरसूर
Mon, 06/16/2014 - 13:56 नवीन
राजेंद्रजी, बर्‍याच गोष्टींसाठी वेळ मुद्दाम काढावा लागतो. व्यायामासाठी वेळ काढायलाच पाहिजे. सकाळी एक तास लवकर उठून व्यायाम केला तर दिवस खूप उत्साहात जातो असा (सध्याचा) अनुभव आहे. :-) हा शिरस्ता किती दिवस टिकतो ते माझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. मी कंपनीच्या बसने कंपनीमध्ये जातांना आणि परत येतांना वाचन करतो. माझी बरीच चांगली चांगली पुस्तके या दीड-पाऊणे दोन तासाच्या प्रवासात वाचून झालेली आहेत. इतकंच नव्हे तर मी सध्या करत असलेल्या एका दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाचा बहुतेक सगळा अभ्यास मी या प्रवासात केला आहे. घरी पोहोचल्यानंतर एखादा तास लेखन-वाचनाला देणे तितकेसे कठीण नसावे. अर्थात हे सगळे सगळ्यांच्याच बाबतीत शक्य होईल असे नाही. बर्‍याच लोकांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. फिरतीचे काम असणार्‍यांना किंवा खूप मोठ्या जबाबदारीचे काम असणार्‍यांना किंवा घरात काही मोठी समस्या (वैद्यकीय, आर्थिक, इत्यादी) असलेल्यांना वेळ काढणे खरोखर अवघड असते ही जाणीव मला आहे. पण वेळेचे थोडे नियोजन केले तर थोड्या फार प्रमाणात काही वेळ सत्कारणी लावता येऊ शकेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

लेख मस्तच आहे.

शुचि
गुरुवार, 06/12/2014 - 19:00 नवीन
लेख मस्तच आहे.
  • Log in or register to post comments

समीर लेख अतिशय चांगला जमून

अनन्या वर्तक
Fri, 06/13/2014 - 01:01 नवीन
समीर लेख अतिशय चांगला जमून आला आहे. बरेचसे विचार तुझ्या स्वतःच्या अनुभावर आधारलेले आहेत त्यामुळे वाचावयास चांगले वाटतात. आयुष्य खूप सुंदर आहे आणि येणारा प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे कारण तो पुन्हा अनुभवायला मिळणार नाही हि जाणीव जितक्या लवकर होईल तेवढे जगणे सोप्पे होते. माझा पंधरा मिनिटे आणि जास्तीत जास्त एक दिवस हा फॉरमुला आकाश आणि माझ्या साठी एकदम उपयुक्त आहे येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगण्यासाठी.
  • Log in or register to post comments

फॉर्म्युला

समीरसूर
Mon, 06/16/2014 - 13:59 नवीन
अनन्या, धन्यवाद. तुमचा फॉर्म्युला इथे सांगता आला तर बरे होईल. तू दिलेली फॉर्म्युलाची ओळख तशी इंटरेस्टिंग आहे म्हणजे फॉर्म्युला हमखास असणारच. जरा हमे भी तो बताईये आपकी खुशहाली का राज. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्या वर्तक

उपयुक्त लेख

Prajakta२१
Sat, 06/14/2014 - 22:56 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

उपयुक्त लेखन !!

सुहास..
Mon, 06/16/2014 - 11:26 नवीन
उपयुक्त लेखन !!
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Mon, 06/16/2014 - 12:37 नवीन
छान लेख ! अमोल केळकर
  • Log in or register to post comments

औचित्यपूर्ण लेख. आणि

सस्नेह
Mon, 06/16/2014 - 13:10 नवीन
औचित्यपूर्ण लेख. आणि वास्तववादीही. कित्येकदा समस्यांचा सामना कसा करावा हे महाखटपट करूनही समजत व जमत नाही. अशा वेळी लेखात सुचवल्याप्रमाणे वागणे श्रेयस्कर. म्हणतात, काही समस्या सोडवून सुटत नाहीत. त्या सोडून द्याव्या लागतात ..!!
  • Log in or register to post comments

चांगला लेख...

विकास
Mon, 06/16/2014 - 15:40 नवीन
चांगला लेख आणि चर्चा! विपश्यनेबद्दल बरेच दोन्हीबाजूंनी ऐकलेले आहे. पण अनुभव नाही. मात्र असे वाटते की माणसास अनेकदा कोणीतरी, ज्याच्यावर/जिच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती संवादासाठी भेटल्यास अधिक फायदा होऊ शकेल. त्यात विवाहीत असल्यास पती-पत्नी एकमेकांशी बोलू शकतात, तरूण मुले-मुली जर आपल्या पालकांशी बोलू शकले अथवा जर कोणी, ज्याला मेंटर म्हणता येईल अशी व्यक्ती आयुष्यात असेल तिच्याशी बोलू शकली, अथवा कुठल्याही वयामध्ये असताना जर "उम्र भर दोस्त लेकीन साथ चलते है" असे मित्र असले तर फायदा होऊ शकेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

खूपच छान लिहिलयत. एकदम

कवितानागेश
Tue, 06/17/2014 - 14:34 नवीन
खूपच छान लिहिलयत. एकदम बॅलन्स्ड. :)
  • Log in or register to post comments

छान.

ऋषिकेश
Wed, 06/18/2014 - 14:37 नवीन
छान. फक्त जास्त भावनाप्रधान नसणे आणि विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी विरोधाभासी आहेत. भावनाशील असल्याशिवाय पटकन विश्वास ठेवणे जमत नाही. नी माझ्यासारख्या फार भावनाप्रधान नसणार्‍याला एखाद्यावर विश्वास ठेवायला बराच विदा तरी लागतो नाहीतर काळ तरी!
  • Log in or register to post comments

तीन प्रकार...

विकास
Wed, 06/18/2014 - 19:13 नवीन
(अजून कोणी म्हणले असले तर माहीत नाही! पण) माझ्या मते भावनेच्या संदर्भात माणसांची वर्गवारी तीन प्रकारात करता येते: भावनाशून्य, भावनाप्रधान, भावनाविवश. अर्थातच पहीले आणि तिसरे ही दोन टोके आहेत तर मधले समतोल सांभाळणारे आहे. नी माझ्यासारख्या फार भावनाप्रधान नसणार्‍याला एखाद्यावर विश्वास ठेवायला बराच विदा तरी लागतो नाहीतर काळ तरी! योग्य माहिती मागणारी आणि नंतर गरज पडल्यास(च) विचार बदलण्यास तयार असलेली व्यक्ती भावनाप्रधानच असते. ज्या व्यक्तीचा विदा अथवा काळाशिवाय विश्वास बसतो ती व्यक्ती त्या विशिष्ठ विचार/कृतीसंदर्भात भावनाविवश असते. जी विदा मिळून अथवा काळानुरूप आलेल्या अनुभव येऊनही ते नाकारतते ती इतरांच्या संदर्भात भावनाशून्य आणि स्वतःच्या तत्वांच्या / विचारांच्या संदर्भात भावनाविवश असते. असे मला वाटते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तीन प्रकार आवडले.

सूड
Wed, 06/18/2014 - 20:04 नवीन
तीन प्रकार आवडले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

व्वा ..काय सुंदर लेख लिहिला

दिव्यश्री
Sun, 07/26/2015 - 15:58 नवीन
व्वा ..काय सुंदर लेख लिहिला आहे . मस्तच . प्रतिसाद देखील तितकेच मस्त . :)
  • Log in or register to post comments

दोन मुद्दे

चलत मुसाफिर
Sun, 07/26/2015 - 17:08 नवीन
1. वाचनामुळे मनःशांती आणि बुद्धीला चालना मिळते यात शंकाच नाही. पण माझा अनुभव असा आहे की इतिहास, प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे, युद्धकथा यांचे वाचन केल्यास, जी भीती आपण बाळगून आहोत, त्यातून (किंवा त्याहून वाईट परिस्थितीतून) अनेक लोक आधी गेलेले आहेत हे कळते आणि आपल्या समस्या तुलनेत क्षुल्लक आहेत याची जाणीव होते. 2. मर्यादित आणि निखळ स्वप्नरंजन हे तणावमुक्तीच्या दृष्टीने लाभदायक आसते असा माझा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments

मस्तंय!!! खूप उपयोगी माहिती.

जडभरत
Sun, 07/26/2015 - 17:12 नवीन
मस्तंय!!! खूप उपयोगी माहिती. वाखु साठवणे आवश्यक!
  • Log in or register to post comments

मुळात शब्द आहे तो ' विपश्यना

जयन्त बा शिम्पि
Sun, 07/26/2015 - 18:07 नवीन
मुळात शब्द आहे तो ' विपश्यना ' असा. ' विपाश्यना ' नव्हे. विपश्यनेसंबंधी दोन्ही बाजु असतील , नाही असे नव्हे, पण एखादे ध्यानाचे तंत्र मुळातुनच चांगले समजले , तर त्याबाबत गैरसमज होण्याची शक्यता कमीच असते. मी स्वतः १९९५ पासून इगतपुरी येथे शिबिरासाठी जात आहे. विपश्यना एकाच शिबिरात मलाही समजली नव्हती , यासाठी किमान दोन ते तीन शिबिरास हजेरी , तीही मनापासून लावली पाहिजे. म्हणजे थोडेफार आकलन होते. त्यानंतर मी ज्यांना ज्यांना शिबिरासाठी प्रेरणा देवून पाठविले, त्या त्या सर्वांना , तेथील नियम्,वेळापत्रक, नेमके काय शिकविले जाणार आहे , याची पुर्ण कल्पना देवूनच पाठविले, त्यामुळे तेथे जाणार्‍यावर , ध्यान सोडून इतर ' दुसरीकडे ' पहाण्याची वेळ आली नव्हती. ' पैसा ' यांच्या म्हणण्यानुसार . ध्यानाच्या कुठल्याही प्रकाराने कमीत कमी वेळात रिलॅक्स होता येते व झोपही छान लागते. विपश्यनेमुळे ही गोष्ट सहज साधली जाते. शेवटी ज्याच्या त्याच्या आकलनाचा व अनुभवाचा प्रश्न आहे , तो तसाच ज्याच्या त्याच्यावर सोपविलेला बरा ! लेखातील सुचना व्यवहार्य व अमंलात आणण्याजोग्या आहेत एव्हढे मात्र स्वानुभवावरुन लिहू इछितो.
  • Log in or register to post comments

+१०००

संदीप डांगे
Sun, 07/26/2015 - 18:20 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि

लेख खूप भावला.

श्रीरंग_जोशी
Sun, 07/26/2015 - 22:15 नवीन
लेख खूप भावला. लेखात मांडलेले बहुतांश विचार अनुकरणीय आहेत.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

मानस्
Mon, 07/27/2015 - 18:01 नवीन
छानच आहे लेख, तुम्ही दिलेल्या १४ मुद्द्यांपैकि अर्धे जरी आचरणात आणले तरी मानसिक ताणतणावापासून निशितच सुटका होईल.
  • Log in or register to post comments

तुम्चअ एमिअल इद द्या

अनन्य
Wed, 07/29/2015 - 09:47 नवीन
तुम्चअ एमिअल इद द्या
  • Log in or register to post comments

छान लेख !

पथिक
Wed, 07/29/2015 - 12:25 नवीन
छान लेख !
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा