Skip to main content

प्राचीन भारतः नासिक लेणी (पांडवलेणी): भाग १

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 11/10/2011 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
सालाहण कुले कन्हे राजिनि नासिककेन सातवाहन घराण्यातील तिसरा राजा कृष्ण सातवाहन (सिमुक सातवाहनाचा भाऊ) याचा हा नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख. हा आहे पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत. जवळजवळ २२०० वर्ष जुना, नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करणारा. नासिक हे माझे आजोळ असल्याने पांडवलेणी तशी असंख्य वेळा बघितली होतीच, पण तिचे महत्व मात्र माहित नव्हते. यावेळी ३ दिवस सुट्टी घेउन नासिकला जायचा उद्देशच होता की पांडवलेण्याची निवांत भेट. मामेभावाला घेऊन सकाळी ७ वाजताच पांडवलेणी पायथ्याला पोहोचलो. पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक आणि स्तूप उभारला आहे. १५ मिनिटांची उत्तम पायर्‍या असणारी झाडीभरली चढण चढून पांडवलेण्यांपाशी पोहोचलो. मधून मधून मोरांची केकावली ऐकू येत होती. १. पांडवलेणीकडे जाणारी झाडीभरली वाट वास्तविक पांडवलेणीचा आणि पांडवांचा काहिही संबंध नाही. पांडवलेणी ही सातवाहन आणि क्षत्रप कालखंडात खोदली गेली. इथल्या कोरीव मूर्तींना पांडव समजले गेले तसेच हे अद्भूत काम पांडवांशिवाय कोणीही करू शकत नाही हा पूर्वापार समज यामुळेच या बौद्ध लेणींना पांडवलेणी हे नाव पडले. २. अशा स्वरूपाच्या काही शिल्पांमुळेच या लेण्यांना पांडवलेणी असे संबोधले गेले. पांडवलेणीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच प्रथम दर्शन होते ते १० व्या क्रमांकाच्या लेण्याचे. हे लेणे नहपानाचे लेणे अथवा नहपानाचा विहार म्हणूनही प्रसिद्ध आहे. स्तंभ, ओसरी, कोरीव शिल्पेम विहार, आतल्या खोल्या अशी याची रचना. ओसरीतील सबंध भिंतीवर विदेशी क्षत्रपांचे शिलालेख आहेत. क्षत्रप हे शक, ग्रीस, इराण मधून आलेले.पण इथल्या संस्कृतीत विरघळून गेलेले. त्यांचे येथील शिलालेख हे ब्राह्मी संस्कृतात असून मुख्यत्वे त्यांनी दिलेल्या दानाचे आहेत. नहपान हा इराणी शब्द असून नह म्हणजे जनता व पन म्हणजे रक्षणकर्ता. नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकालीन. ३. नहपान विहाराचे प्रथमदर्शन ४ व ५. गज, वृषभ, सिंहशिल्पे (पाठीमागील भिंतीवर क्षत्रपांचे शिलालेख दिसत आहेत) इथे ओसरीतील स्तंभांवर पुढील बाजूस सिंह, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. पण खरी गंमत आहे ती स्तंभांच्या मागील बाजूस ओसरीतील भागात. इथे वरच्या भागाकडे नीट निरखून पाहिले असता काहिशी वेगळी शिल्पे दिसतात. शिर गरूडाचे आणि शरीर सिंहाचे अशी ही प्रतिमा. हा आहे ग्रिफिन, एक ग्रीक उपदेवता. ६ व ७. ग्रिफिन पुढच्या स्तंभावर तर अजून एक आश्चर्यचकित करणारे शिल्प सामोरे येते. हे शिल्प आहे मानवी शिर असणारे आणि शरीर मात्र सिंहाचे. तोच तो इजिप्तच्या पिरॅमिडजवळ असणारा चिरपरिचित स्फिंक्स. स्फिंक्स आणि ग्रिफिन या दोन्ही प्राचीन ग्रीक दंतकथांमधील देवता. त्यांचा पांडवलेणीतील समावेश दाखवतो तो प्राचीन काळात चालत असलेल्या पाश्चिमात्यांबरोबर चालत असणार्‍या व्यापाराचा पुरावाच. व्यापार्‍यांबरोबरच संस्कृतींमधला प्रवास, आदानप्रदानही इथे अधोरेखीत होते. ८,९, व १० स्फिंक्स हे सर्व पाहून विहारात प्रवेश केला, हा विहार प्रशस्त, बरेच कक्ष असलेला व कसलाही आधार नसलेला. सभांडपात समोरच्या भिंतीवर स्तूपाची रचना आणि त्याच्या आजूबाजूला काही मूर्ती कोरल्या आहेत. महाराष्ट्रातील, किंबहुना भारतातील हा लेण्याद्रीनंतरचा सर्वात मोठा विहार. विहारातून बाहेर आलो, ह्या नहपान विहाराच्या आजूबाजूला काही दुमजली विहार आहेत व जवळच चैत्यगृहही आहे. ११. नहपान विहाराचा अंतर्भाग. आता पाहणार होतो ते गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाची यशोगाथा असलेले ३ र्‍या क्रमाकांचे महाराष्ट्रातील कदाचित सर्वात महत्वाचे असे देवीलेणे. हे लेणे खोदवले आहे ते गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री हिने आणि तिचा पौत्र वासिष्ठिपुत्र पुळुवामी याने. गौतमी बलश्री स्वतःला महादेवी म्हणवून घेत असे म्हणूनही हे देवीलेणे. १२. देवीलेणीचे मुखदर्शन इथल्याही स्तंभांवर ग्रिफिन, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. या सर्व स्तंभांच्या दर्शनी बाजूवर चौथर्‍याच्या खाली भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर रथाचे ओढायचे आडवे खांब कोरलेले आहेत जणू हा लेणीरूपी रथच ते आपल्या खांद्यांवर वाहात आहेत. १३. लेणीचा भार वाहणारे यक्ष १४. इथेही ओसरीतल्या भिंतीवर गौतमी बलश्रीने कोरलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत ज्यांचा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांमध्ये समावेश होतो. गौतमीपुत्र सातकर्णी हा त्याकाळचा भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा. त्याच्या उदयाच्या वेळी सातवाहन साम्राज्य क्षीण झाले होते, जुन्नर, नासिक इ. बहुतांश भाग क्षत्रपांनी गिळंकृत केला होता. गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाच्या विरोधात जोरदार आघाडी उघडून नासिक जवळच्या सह्याद्री रांगांमध्ये त्याचा संपूर्ण पराभव केला त्याचे शिलालेख या लेणीमध्ये कोरले गेलेले आहेत.हे युद्ध अतिसंहारक झालेले दिसते कारण यात नहपानाचे संपूर्ण क्षहरात कूळ नष्ट झाले. म्हणूनच उएथील शिलालेखात त्याला 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे म्हटले आहे. त्याने नहपानाकडून जिंकलेल्या भूप्रदेशाचे वर्णनही प्रस्तुत शिलालेखात देण्यात आलेले आहे. तो प्रदेश म्हणजे अपरांत (उ. कोकण), अश्मक(नांदेड), मूलक(औरंगाबाद, बीड), ऋषिक (खानदेश), विदर्भ, सेटगिरी (जुन्नर), कृष्णागिरी (कान्हेरी), सह्याद्री, कुकुर (आग्नेय राजस्थान), आकारवंती (माळवा), अनूप (मध्यप्रदेश), पारियात्र(अबू पर्वत), सौराष्ट्र, विंध्य, श्रीशैल, मलय, महेंद्र (ओरीसा) इ. या शिवाय कर्नाटक, आंध्र मधील जवळजवळ सर्वच प्रदेश त्याच्या ताब्यात होता. त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस' असा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असाही उल्लेख येथे केला गेला आहे. उत्तरेकडील मोहिमेत गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव राज्यकर्त्यांचा पराभव केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असा उल्लेखही येथील शिलालेखात केला गेला आहे. सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियदपमानदमन ' असेही येथे म्हटले आहे. १५. गौतमी बलश्रीचा शिलालेख गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री येथील शिलालेखात आपल्या पुत्राचे मोठे लोभस वर्णन करते- गौतमीपुत्र हा धीर-गंभीर वृत्तीचा असून शरीराने भक्कम आहे. त्याचे मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून चाल हत्तीसारखी गंभीर आहे. त्याचे बाहू शेषाप्रमाणे पुष्ट आहेत. तो शूर तसेच नितीवानही आहे. पौरजनांच्या सुखदु:खात तो सदैव रममाण होत असून त्यांना संकटांमध्ये साहाय्य करत असे. त्याने प्रजेवर योग्य तेच कर लावले असून त्याने वर्णसंकर बंद केला आहे. स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे. वरील शिलालेख गौतमीपुत्राच्या मृत्युंनतर गौतमी बलश्रीच्या वृद्धपणी गौतमीपुत्राचा मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुवामीकडून तिने खोदवून घेतला आहे. १६. गौतमीपुत्राने पाडलेले अस्सल चांदीचे नाणे जे त्याच्या स्वरूपावर प्रकाश टाकते. (विकिपेडीयावरून साभार) याच शिलालेखांखाली गौतमीपुत्र सातकर्णीची पराक्रमगाथा शिल्पस्वरूपात कोरलेली आहे. हा एक शिल्पपटच आहे. या देखाव्यात डावीकडील पट्टीवर एक प्रेमी युगुल दाखवले असून ते गौतमीपुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. यावरील पटात एक तरूण त्या स्त्रीचा अनुनय करताना व त्यापुढील शिल्पात तो तिला बळजबरीने उचलून नेताना दाखवला आहे. म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहन राज्याचे हरण केले आहे.यापुढील शिल्पांमध्ये दुसरा तरूण त्या तरूणाकडून स्त्रीला खेचून परत आणताना दाखवला आहे. म्हणजे गौतमीपुत्राने गेलेले सातवाहन राज्य नहपानाकडून परत मिळवले. हा पट पुढे असाच दाखवला असून गौतमीपुत्राच्या निधनानंतर पुळुमावीने सातवाहन राज्यश्रीचे कसे निष्ठेने पालन केले ते दाखवले आहे. १७ व १८. १९ व २० २० व २१ . शिल्पपटाचे संपूर्ण दर्शन हे सर्व डोळ्यांत भरून पाहातच विहाराच्या आतमध्ये गेलो. हाही एक प्रशस्त विहार. याच्या आत काही कक्ष असून समोरील भिंतीवर स्तूपाची प्रतिमा कोरलेली आहे. या स्तूपाच्या बाजूस स्त्री प्रतिमा. यातील डावीकडील नमस्कार करत आहे तर उजवीकडील या स्तूपावर चवरी ढाळत आहे. वर गंधर्व विहार करताना दाखवले आहेत. २२. देवीलेणीचा अंतर्भाग विहारातील स्तूपाची रचना हे सर्व पाहातच बाहेर आलो व आजूबाजूची लेणी पाहायला लागलो. क्रमशः हा भाग प्रवासवर्णन आणि इतिहास यांची नीटशी सांगड घालता न आल्यामुळे विस्कळीत झाला आहे तरी आपण तो गोड मानून घ्यावा. पुढील भागात पांडवलेण्यातील इतर लेण्यांचे फक्त फोटो व थोडेसेच वर्णन टाकेन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 95302
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

सुंदर माहिती, छायाचित्रे. खरंतर हा माझ्या आवडीचा विषय नाही पण प्रतिसाद आणि उपप्रतिसाद अगदी मुद्देसूद आहेत. चर्चा वाचताना गुंगून गेले होते. अगदी छान! पांडवलेण्यांना भेट दिली होती पण तेंव्हा मी यत्ता चौथीत होते. आता काही आठवत नाही. फोटोंमध्ये लेण्यांची स्वच्छता राखली असल्याचे दिसते.

वल्ली, चित्राताई आणि बिरुटे सर, खूप दिवसांनी मिपावर आलो आणि आपली वरील चर्चा वाचून मधल्या एक्-दोन वर्षांत मिपावर न आल्याने काय गमावले असेल या विचाराने चटका लागून गेला. आपल्या गहन अभ्यासातून इथे चर्चारुप प्रसाद दिल्याबद्दल आभार!

In reply to by भास्कर केन्डे

वल्ली, चित्रा, आणि अन्य सदस्य यांनीच ही चर्चा लेखाच्या निमित्ताने उत्तम चालवली आहे. आम्ही आपले उगाच मधेमधे. सातवाहनकाळाचा कितीतरी संदर्भ आपल्या महाराष्ट्राचा जसा आहे तसा अधिक संदर्भ आपल्या पैठणचा आहे. सातवाहनांची राजधानी पैठण असून इतिहासाचे काही ठसे पैठण मधे फारसे सापडत नाही. पालथी नगरीत खापरं सापडतात. कधी खूप मोठ्या विटा सापडतात. सोनं सापडतं. पुरातत्त्व विभागाने काही विशिष्ट भागाला तारेचे कुंपन टाकलेले आहे. उत्खनन मात्र काहीच केले नाही. असो, बाकी, मन१ यांनी आपली आणि काही मराठवाड्यातील मित्रांची आठवण कालच काढली होती. बाकी, तुम्ही मिपावर नियमित येत चला. किती लांब दांडी मारली तुम्ही. चला अनुपस्थिती भरुन काढा. :)
पैठण येथील हा स्तंभ सातवाहन काळातील आहेत असे म्हणतात. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजच्या पैठणला सातवाहनकालीन अवशेष मिळवणे कठीणच आहे कारण मूळच्या सातवाहनकालीन पैठणच्या थरावरच आजचे पैठण वसले आहे त्यामुळे उत्खनन अशक्य आहे. त्या स्तंभाबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. परंतु तो सातवाहनकालीन वाटत नाही. बांधकामाच्या शैलीवरून तो मध्ययुगीन कालखंडातला असावा.

In reply to by प्रचेतस

पैठणच्या थरावरच आजचे पैठण वसले आहे त्यामुळे उत्खनन अशक्य आहे. उत्खनन होऊ शकतं. असो, तो वेगळा मुद्दा. बाकी,स्तंभाबद्दल माझ्याकडे काही अधिक माहिती नाही. स्तंभाला भेट देतेवेळेस माझ्यासोबत असलेले माझा मिपाकर मित्र सहजराव सोबत होते. स्तंभावर काही लिहिलेले दिसते की काय असे म्हणत होते. ते काही फोटोत टीपता आले नाही. स्तंभ सातवाहन काळातीलच आहे काय, या पुष्ट्यर्थ माझ्याकडे कोणाताही पुरावा नाही. पण डॉ. मोरवंचीकर म्हणता त्या प्रमाणे ' सातवाहनांच्या नाण्यावर बैल, हत्ती, सिंह, मानव, वृक्ष, गजलक्ष्मी,अश्व,चक्र, जहाज, आदि चिन्हे आढळतात'' [पृ.क्र.३४] यापैकी त्या स्तंभावर काही आहे, काय शोधलं पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद गवि. सदर चौर्यकर्माच्या मागोवा घेण्यात येऊन त्या व्यक्तीवर लवकरच कारवाई करणेत येईल.

वल्लीच्या नादाने दगड-मातीत सौंदर्य, कला, ते सातवाहन, ते सिमुक, ते क्षत्रप ते अमुक ते धमुक असा शोधायचा ज्यांना ज्यांना नाद लागला असेल त्यापैकी आम्ही एक. रविवारी नाश्काला गेलो. वाट्सपचा एक अ‍ॅक्टीव्ह गृप आहे. गप्पा आणि भटकंतीचा नाद असलेला. दोन चार धार्मिक, दोन चार लैच नास्तिक दोन चार धड इकडे नै अन तिकडे नै अशा सर्वांचा नाश्काला जायचा बेत ठरला. त्र्यंबकेश्वर, नवीन गजानन महाराजांचं एक सुंदर मंदिर. मग नेहमीचे काळाराम, गोराराम, तपोवन, कपालेश्वर, सिता गुंफा, असे करत एकदाचे पांडव लेणीला पोहोचलो. मस्त एका बाजूला लेणी तर एका बाजुला नुसतं चाफ्यांच्या फुलांचा सडा. मस्त पाय-यांनी चढत रमत गमत लेणीला पोहोचलो. गेल्याबरोबर आपल्याला दहा क्रमांकाची लेणीचं दर्शन होतं. अर्रर्र...लेणीत तर काहीच नाही, असं इथे पाहिल्याबरोबर वाटायला लागतं. पांडव लेणी बघायला जाण्यापूर्वी वल्लीशेठचा हा लेख मोबाईलवर उघडून मग लेणी बघायला पाहिजे. आमच्या दुर्दैवाने मिपा त्या दिवशी बंद होतं. मला वल्ली सारखं निरखून बघता आलं नाही. मला ना शिलालेख दिसले ना ते ग्रीफिन दिसले. मला गौतमबुद्धांच्या मुर्त्या, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, चैत्य, महापरिनिर्वाणाचे शिल्प असे ठळक ठळक ओळखू आले. वल्लीशेठचा लेख वाचल्यावर मग एकेक शिल्पाची ओळख व्हायला लागते. बाकी, ते अवलोकितेश्वर, उषवदत्ता, चक्र, त्रिरत्न, वेगवेगळी प्रतिके, शिलालेख हे फक्त वल्लीला दिसतं. आपण पाहिलं ते नहापान विहार वगैरे हेही वल्लीशेठच्या कृपेने कळतं. बाकी, फोटो टाकतो. माहिती वल्लीशेठच देतील. पांडव लेणी पाहुन फाळकेस्मारकालाही भेट दिली.सायंकाळी फाळके स्मारकाला प्रचंड गर्दी होते. उद्यान आणि प्रदर्शन पाहण्यासारखं. रात्रीच्या वेळी रंगेबिरंगी संगीत कारंजे. अनेक कुटुंबाच्या चाललेल्या डबापार्टी. एक हायफाय क्लासवाल्यांचं हॉटेलिंग, बाळगोपाळ खेळात रमलेले आणि आपल्याच दुनियेत मशगुल असलेले हातात हात घेऊन आणाभाका घेत असलेले, रुसलेले, तो आणि ती. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद सर. हा जो पांडवलेणीत प्रवेश करताना समोरच येतो तो नहपान विहार. ह्याच्या स्तंभांच्या मागचे बाजूस (ओसरीचे बाजूस) स्तंभशीर्षांवर स्फिन्क्स आणि ग्रिफिन आहेत. आणि ह्याचे ओसरीच्या भिंतींवर नहपानाचा जावई ऋषभदत्त याचे दानधर्माचे शिलालेख आहेत. तर ३ क्र. चा विहार हा देवीलेणी किंवा गौतमीपुत्र विहार म्हणून ओळखला जातो. याचे स्तंभशीर्षांवर स्फिन्क्स नाहीत, ग्रिफिन मात्र आहेत. याचे ओसरीतील भिंतींवर गौतमीपुत्राच्या पराक्रमाचे लेख त्याची आई गौतमी बलश्री आणि पुत्र वाशिष्ठिपुत्र पुळुवामी यांनी कोरवून घेतलेले आहेत. बुद्धाच्या मूर्ती असलेल्या लेण्या ह्या नहपान विहाराच्या डाव्या बाजूने सुरु होतात. यातच काही लेण्यांमध्ये १० व्या/ ११ व्या शतकात जैन मूर्ती सुद्धा कोरलेल्या आहेत. बौद्ध मूर्तींमध्ये मानुशी बुद्ध, ध्यानी बुद्ध, अवलोकितेश्वर इत्यादी मूर्ती आहेत. ह्या सर्व महायान कालखंडात४ थ्या शतकापासून खोदल्या गेल्या आहेत. बर्‍याचशा मूर्ती ओबडधोबड आहेत. अपवाद यज्ञ विहारातल्या प्रचंड बुद्धमूर्तीचा. फाळके स्मारकाचा पूर्वीचा डौल आता राहिला नाही. बरेच खराब झालेय. बाकी तुम्ही टाकलेला खालून तिसरा फोटो हा पांडवलेणीमधला नसून वेरूळच्या कैलास लेणीच्या डावे बाजूस असलेल्या एका लहानश्या लेण्यातील सप्तमातृकांचा आहे. ;)

In reply to by प्रचेतस

>>>> बाकी तुम्ही टाकलेला खालून तिसरा फोटो हा पांडवलेणीमधला नसून वेरूळच्या कैलास लेणीच्या डावे बाजूस असलेल्या एका लहानश्या लेण्यातील सप्तमातृकांचा आहे. :) च्यायला, खरं आहे. पांडवलेणीत हे कुठून आलं. लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्स. प्रा.डॉ. दिलीप विसरभोळे. ;)

जुना लेख वर आणल्याबद्दल सरांना धन्यवाद .फोटोही छान .पर्यटनाचे लेख साठवतो त्यामुळे ते कधीही उघडून वाचता येतात .इकडे २०१२ जानेवारीत गेलेलो .माझ्याकडे विडिओ आहेत ते पाहत बसतो .वल्लीची माहिती नेहमीप्रमाणेच छान . अंकाई टंकाई ला २००७ मध्ये गेलो होतो . कसे जावे ?उत्सुकता असल्यास पोस्ट लिहीन .

मस्त छायाचित्रे आणि चित्रा व तुमचे दोघांचेही या अभ्यासपूर्ण चर्चेसाठी मनापासून आभार.
शिलालेखांचे काही फोटो तर काढलेले आहेतच पण दुर्दैवाने मला ब्राह्मी येत नसल्याने हाच तो शिलालेख असे नक्की सांगता येत नाही.
काय सांगता? माझा तर पक्का समज झाला होता की तुम्हांला ही लिपी वाचता येते.
नाणेघाटातल्या गुहेत ही सर्व शिल्पे आहेत/होती पण दुर्दैवाने त्यांचे आज फक्त पायच शिल्लक आहेत. वर लिहिलेल्या शिलालेखांतील नावावरूनच ही शिल्पे नेमकी कोणाची हे ओळखता येते.
बादवे, जयंतरावांच्या नाणेघाटाच्या लेण्यांसंबंधीच्या का कुठल्यातरी धाग्यात मी विचारले हेच विचारले होते. आज या मूर्त्या नष्ट झाल्या आहेत की कुठल्यातरी संग्रहालयात वगैरे असाव्यात? कुणाला काही कल्पना आहे काय? मागे एकदा तिथे झालेल्या एका चर्चेत कुणा ट्रेकरने या मूर्त्या मुंबईला हलवण्यात आल्या असे ठामपणे सांगितले होते.

In reply to by एस

माझा तर पक्का समज झाला होता की तुम्हांला ही लिपी वाचता येते.
तेव्हा येत नव्हती. आता थोडी थोडी वाचता येते. :) सध्या स्वतःच घरीच चार्ट बनवून शिकतोय.

In reply to by प्रचेतस

अरेरे... *sad* एकतर आधीच भारतीयांना इतिहास वस्तुनिष्ठपणे लिहून ठेवायची आवड नाही. त्यात आहे ती पाने जीर्ण होऊन फाटून चालली तर त्याविषयीही खंत नाही. कुकडेश्वर येथे का अजून कुठे तरी चक्क एक पुष्करिणी बुजवून त्यावरून डांबरी रस्ता केला आहे. खूप वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हाची ती विस्तीर्ण पुष्करिणी आणि त्यातील कोनाड्यात असलेल्या काही मूर्त्या अजून स्मरणात आहेत. तेवढे कुकडेश्वराचे हेमाडपंथी मंदिर परत उभारले आहे पुरातत्व खात्याने. असो!

In reply to by एस

कुकडेश्वराचे देऊळ परत उभारलंय पण बरेचसे अवशेष आजूबाजूला तसेच पडून आहेत. जीर्णोद्धारात काही प्रतिमा चुकीच्या स्थानी लावल्या गेल्यात. कुकडेश्वरची पुष्करिणी आहे अजून पण ती तशी लहानशीच आहे.

In reply to by प्रचेतस

कुकडेश्वरची पुष्करिणी आहे अजून पण ती तशी लहानशीच आहे.
तुम्ही म्हणालात मग काय राहवेना. रविवारी उशीरा आम्ही कुकडेश्वराला अचानकच धडक मारून आलो. संध्याकाळी सात वाजता तिथे पोहोचल्यामुळे जास्त प्रकाश मिळाला नाही. तरी प्रतिमा मिळाल्या ही डीएसएलआरची कृपा. प्रतिमा फक्त डॉक्युमेंटरी प्रकारच्या काढल्या आहेत त्यामुळे दर्जा सांभाळून घेणे.

वल्लीचा जबराट लेख. कसा काय नजरेतून सुटला काय माहिती. त्या शिलालेखांचे क्लोज फटू टाक की बे जरा. ब्राह्मी वाचायला मदत होईल आणि नक्की कशात काय आहे ते कळेलही.

In reply to by प्रचेतस

वोक्के. फोटोमधील शिलालेख काहीसा असा: वरून पहिली ओळः "(प/ह)-ञ-(ब/भ)-(?)य-न-(बा/भा)-(ब/भ)-न".. दुसरी ओळः "ड-यि अ-()-ट-()-या-()-न" तिसरी ओळः "च-ने-()-ऐ-णी-"...बरीच अक्षरे स्पष्ट असूनही लागत नाहीयेत. ब्राह्मी जोडाक्षरांचा तक्ता मिळाल्यास अजून सोपे होईल.

In reply to by प्रचेतस

धन्यासेठ लागतोच आपल्याला त्या शिवाय ट्रिप ला मजा नै. हं आता प्रशांतला आपल्याबरोबर यायला आवडलं तर आपल्याला त्यांनाही न्यायला काही अडचण नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद सर. :) नाशिक आपल्याला लै आवडतं. खुप वेळा नाशिकला जाणं झालंय, गोदावरीत डुंबणं झालंय. मात्र पांडवलेणी पाहायचा योग काही अजून आला नाही.

सातकर्णीची आई गौतमी आणि गौतम बुद्धांना "गौतम" हे नांव जिच्यावरुन मिळाले ती त्यांना वाढवणारी त्यांची गौतमी नावाची मावशी ही एकच व्यक्ती आहे असा प्रश्न मनात आला होता. मात्र थोडेसे गुगलल्यावर उत्तर मिळाले. :)

मूळ लेख आणि त्यावरील प्रतिसाद आणि चर्चा फारच उद्बोधक आहेत. खूप नवीन माहिती मिळत आहे. आपण लिहिता “सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो…मूळ शिलालेखातील शब्द आहे 'खतियदपमानदमन' अर्थात क्षत्रियांचा गर्व हरण करणारा (निर्दालन करणारा/नष्ट करणारा अशा अर्थाने नव्हे)…” पुराण/महाभारतातील परशुरामाचे व्यक्तिचित्रण गौतमीपुत्र सातकर्णी वर आधारित असू शकते. अवांतर: परशुराम एकाच वेळी विष्णूचा सहावा अवतार आणि सात पैकी एक चिरंजीव आहे!