अॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव -१
लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती.
गेले वर्षभर मला खाताना गिळण्याचा त्रास जाणवू लागला होता. सुरवातीला एखादाच घास अडकायचा आणि पुन्हा तोंडापर्यंत यायचा. पुढे पुढे हे प्रमाण वाढू लागले. डब्यात कोरडी भाजीपोळी नेली की जेवायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. मग, सरबरीत भात-आमटी, रसभाज्या यावर चालू लागले. सुरवातीला अॅसिडिटी समजून अनेक डायजिन संपवल्या.रात्री-बेरात्री अचानक जाग येऊन, छातीत दुखायचे, पण पाणी प्यायले की ढेकर येऊन ते थांबायचे. घरचे सगळे, तपासणी करण्यासाठी मागे लागले. पण कॅन्सर निघाला तर, या भीतिने मी ते टाळू लागलो. समारंभात लोकांना चुकवून कमीतकमी जेवू लागलो. माझा आकार बघून मी डाएट करतोय, असे लोकांना वाटायचे.
शेवटी एक दिवस, जेवल्यानंतर मळमळू लागले आणि एक उलटी झाल्यावर घरच्यांचा धीर खचला. मीही, आता एकदा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच, असे ठरवून स्पेशालिस्टची वेळ घेतली. त्याने वेळ न घालवता मला एन्डोस्कोपिस्टकडे पाठवले. ती अत्यंत पेनफुल झाली आणि त्यातून रोगनिदान झाले. या रोगात, जठरावरचा वॉल्व्ह(एलीएस) घट्ट होतो. परिणामी, वरची अन्ननलिका विशाल होते. याबाबतची जास्त माहिती गुगलून सहज मिळते. आता याचे पुढे काय करायचे ते ठरवण्यासाठी मॅनोमेट्री अर्थात इसोफॅगसमधले प्रेशर मोजणे, ही टेस्ट झाली. पण मधल्या काळात, माझा जठरावरचा वॉल्व्ह त्या एन्डोस्कोपीमुळे सैल झाला होता. त्यामुळे विनासायास गि़ळता येऊ लागले होते. मॅनोमेट्रीच्या रिझल्टवरुन तज्ञांमधे दोन मते पडली. एक तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी वा बलून डायलेशन! या प्रकारात एका फुग्याने तो जठरावरचा वॉल्व्ह सैल करतात. पण धोका पाच टक्के केसेसमधे परफोरेशनचा ! ते झालं की मोठ्ठा राडा! पण दोन विरुद्ध एक अशा मतांमुळे मी सोपा उपाय करण्याचे ठरवले. काम पंधरा ते वीस मिनिटांचे, आणि एक दिवस ऑब्जर्व्हेशनसाठी हॉस्पिटल मधे वास्तव्य! दिवस ठरला. सकाळी हॉस्पिटलमधे दाखल झालो. तिथून ऑपरेशन थिएटर! आधी जय्यत तयारी केली होती. मेडिक्लेम वाल्यांना कळवले होते. मला आंत घेण्यात आले. बायको बाहेर. अर्धा तासाच्या वर लागल्याने तिचे प्राण कंठाशी.मला ऑपरेशन चालू असतानाच शुद्ध आली. पोटात वेदना आणि कोणीतरी 'परफोरेशन' म्हटल्याचे ऐकू आले.
मी ज्या गोष्टीला घाबरत होतो तेच झाले होते. मी लगेच डॉक्टरांना विचारले, 'माझ्या अन्ननलिकेला भोक पडले आहे का ?' ते म्हणाले , हो पण आम्ही सर्व स्टेप्स घेतल्या आहेत. त्यासाठी त्यांनी त्या भागात एक स्टेंट घातला होता. काही नुकसान झाले नाहीये या खात्रीसाठी मला लगोलग सीटी स्कॅन करायला नेण्यात आले. वाटेत, मी बायकोला काय झाले आहे याची कल्पना दिली. नशिबाने सीटी स्कॅन चा रिपोर्ट चांगला आला. मला आता रुममधे हलवण्यात आले. हाताला सलाईन चिकटले. इंजेक्शन्सचा मारा झाला. पाठोपाठ सर्जन वर आले. त्यांनी आम्हाला सर्व समजावून सांगितले. मला तोंडावाटे आता पाणीही घ्यायचे नव्हते. गेल्या बासष्ट वर्षांत, प्रथमच मी उपास करणार होतो आणि तोही अगदी निर्जळी! पहिली रात्र ग्लानीतच गेली. डॉक्टर सकाळ,संध्याकाळ येत होते. सर्व गोष्टी मॉनिटर होत होत्या. चार दिवसांनंतर एक्स रे मधे माझा स्टेंट थोडा खाली घसरल्याचे लक्षांत आले. डॉक्टरांनी दुसरा स्टेंट बसवावा लागेल याची कल्पना दिली. तोपर्यंत आमच्या नातेवाईकांनी इतर तज्ञांशी सल्लामसलत करुन डॉक्टरांना त्यांचाशी चर्चा करायला लावली. आम्ही तर घाबरुनच गेलो होतो. पण दुसरा इलाजच नव्हता. दुसरा स्टेंट बसवताना तो पहिल्याशी इंटरलॉक करुन नीट बसवण्यात आला. आता माझ्या अन्ननलिकेत दोन डब्यांची छोटी 'मोनोरेल' झाली होती. आणखी दोन दिवस खात्री करुन नंतर मला लिक्विड डाएट वर घालणार असे ठरले. एव्हाना सगळ्यांचे फोन यायला लागले होते. मुलगी अमेरिकेतून रोज विचारपूस करत होती. मी तिला धीर देण्यासाठी मी अजिबात घाबरलो नसल्याचे सांगितले. 'स्टेंटसे स्टेंट मिला' असे गाणे तयार केल्याचे सांगून माझ्यातला 'सेन्स ऑफ ट्युमर' जागरुक असल्याची खात्री पटवून दिली.
लहान असताना आम्ही एक शन्ना नवर्यांचे एक रहस्य नाटक,अ,ब आणि क बघितले होते. त्यातील प्रत्येक अंकाच्या शेवटी अनुक्रमे, अचलाबाई अत्तरदे,बनुताई बनसोडे या ललनांचा खून होतो. तिसर्या अंकाच्या शेवटी कमलाबाई कविश्वर मरणारच असतात, पण खुनी पकडला गेल्यामुळे त्या वाचतात, असे काहीसे कथानक होते. माझी बहिणही माझ्यासारखीच विनोदी स्वभावाची आहे. त्यामुळे माझे 'बलून डायलेशन' करायचे ठरल्यावर मी तिला , अचलाबाईंना घालवायला बलूनताई बनसोडे वापरणार आहेत असे मजेने सांगितले होते. नंतर ती भेटायला आली तेंव्हा मात्र, ती गंभीर असली तरी मीच तिला माझी कमलाबाई होणार होती असे म्हणून हंसवले. असो.
तर सद्यस्थितीला मी घरी आहे पण स्टेंटस महिनाभराने काढायचे असल्यामुळे अन्ननलिकेतच आहेत. त्यांत काहीही अडकण्याचा धोका टाळण्यासाठी लिक्विड डाएट चालूच रहाणार आहे. त्यानिमित्ताने वजन घटवण्याची एक नामी संधी मला मिळाली आहे.
यापुढील भागात या रोगाविषयी विस्तृत लिहिनच. शेवटचा भाग अर्थातच माझे स्टेंटस यशस्वीरीत्या काढले गेले का नाही याबद्दल असेल. अंतिम भाग आलाच नाही तर सूज्ञास सांगणे नलगे!!!
Book traversal links for अॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव -१
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
भयानक अनुभव !
अनुभव भयानक आहे - तो
काय बोलणार ?
तुमच्या प्रकृतीला लवकर आराम
+१११११
तुमच्या प्रकॄतीला आराम पडो
तिमा काळजी लावलात हो!
+१
इतके घाबरून जाऊ नका. आता ही
बर झालं तुम्ही सांगीतलत ते
शुभेच्छा तिमा. सगळे ठीक होइल.
ईश्वर आपल्याला आरोग्यपूर्ण
लवकरात लवकर पूर्ण
तिमा
लवकरात लवकर बरे
स्टेंट्स यशस्वीरित्या काढले
तिमाकाका, आता तुम्ही बरे
शुभेच्छा
काळजी घ्या
अंतिम भाग आलाच नाही तर
अंतिम भाग आलाच नाही तर सूज्ञास सांगणे नलगे!!!क्या बात है जिओ, इन्शाल्लाह अंतिम भाग नक्कीच येईल. आजारपणात विनोदबुद्धी शाबूत ठेवणे हा नक्कीच अक्सीर इलाज असतो. मी स्वतादेखील बरेचदा हा फंडा वापरला आहे. मात्र एक कौतुकास्पद वाटले आपले की आपण आजाराच्या वा उपचाराच्या मध्यावर हे लिहित आहात अन्यथा एखाद्याने सारे काही सुरळीत पार पाडल्यावर मग हौसेने लेखणी सरसावली असती. ते वरचे जिओ खास यासाठीच होते. सारे मिपाकर आपल्यासाठी नक्कीच प्रार्थना करतील.मस्त... लेख आवडला.
लवकर बरे व्हा आणि
तुम्ही असे लेखन करताय म्हणजे
धन्यवाद