Skip to main content

पुस्तके सुचवा ना !

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 08/08/2013 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना ! पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम. मीही जराशी यादी देत आहे.
पुण्याची अपुर्वाई - अनिल अवचट
... बाबाने पुण्याचे केलेले पर्यटन, पुस्तक वाचताना आपणही बाबाबरोबर पुणे पहात हिंडत आहोत असे वाटते.
राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे
... शिवाजी महाराजांचे चरीत्र आहे.
शतदा प्रेम करावे - अरुण दाते
... अरुण दाते यांचा जीवनप्रवास. लता मंगेशकर ते सलमानखान आणि जावेद अख्तर ते जगजीतसिंग यांचे संदर्भ येतात. अतिशय संदर्भसंपन्न पुस्तक आहे.
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस)
... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.
पवनाकाठचा धोंडी - गो. नी. दांडेकर
... पवनेकाठच्या मावळ परिसरात घडलेली ही दोन भावांची गोष्ट आहे. यात धाकट्या भावाला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवणारा मोठा भाऊ आणि वहिनी आहेत. यावर आधारीत मराठी चित्रपटही आला होता. चंद्रकांत सूर्यकांत यांच्या भूमिका होत्या. गोनीदांच्या लिखाणाची मोहिनी का पडते हे समजण्यासाठी वाचकांनी त्यांची 'माचीवरला बुधा', 'शितू' ही पुस्तकेदेखील अवश्य वाचावीत.
पानिपत - विश्वास पाटील
... पानिपतच्या युद्धावरील ही कादंबरी आहे. कादंबरी असली तरी सत्यावर आधारलेली आहे. लिखाण ओघवते आहे. प्रत्ययकारी आहे. या पुस्तकाने मराठीतील ऐतिहासिक कादंबर्‍यांची पूर्वीचे चौकट मोडून नवी निर्माण केली असे मानले जाते.
अमरनाथ संघर्ष - गिरीश प्रभुणे
... पालावरचं जिणं, पारधी हे विषय सोडून प्रभुणे यांनी वेगळ्या विषयावर लिहिलेले पुस्तक आहे. अमरनाथ हे भारतामधे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. यात्राकाळात राज्याचा वनविभाग काही जमीन अमरनाथ बोर्डाला वापरायला देते. त्याचे भाडेही वसूल करते. मेहबूबा मुफ्ती, गुलाम नबी आझाद यांचे राज्यात शासन असताना ही जमीन बोर्डाकडून काढून घेतली. त्याविरुद्ध हिंदूंनी संघर्ष केला. हिंदूंचा जोर पाहून देशाबाहेर निष्ठा असलेले लोकही त्यात सामील झाले. अखेर मुफ्ती-आझाद यांना माघार घ्यावी लागली. काश्मीरमधील सद्यस्थिती समजून घेण्यास पुस्तक उपयुक्त आहे.
शांतारामा - हे हिंदी चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम यांचे आत्मचरीत्र आहे. पुस्तक अत्यंत रंजक पद्धतीने लिहिले आहे. लेखनसहाय्य शांताराम यांच्या मुलीने म्हणजे मधुरा जसराज यांनी केले आहे. मूकपट, काळेपांढरे बोलपट आणि रंगीत चित्रपट अशा तीनही कालखंडात शांताराम वावरले. भारतीय चित्रपट व्यवसायात होत गेलेले बदलही त्यांनी पाहिले. हिंदी चित्रपटाचा इतिहास म्हणून या पुस्तकाचे मोठे महत्त्व आहे.
आवरण - एस एल भैरप्पा (अनु उमा वि कुलकर्णी)
... हिंदूस्थानावर अल्लाउद्दीन खिलजी, मोह बिन कासिम अशा परक्यांची आक्रमणे झाल्यानंतर या देशाची स्थिती काय झाली? हिंदूस्थानातल्या अनेक देवळांची मोडतोड कशी झाली हे यात वाचायला मिळते. अर्थात हा इतिहास आजचे वर्तमान समजून घेण्यासही उपयुक्त आहे. या पुस्त्कावर गिरीश कर्नाड, यु. आर. अनंतमूर्ती यांनी एकांगी असल्याचा आरोप करीत खूप टीका केली होती. पण मोठा वाचकवर्ग या पुस्तकाला लाभला. एक नवी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे.
मी इडली आणि ऑर्कीड - विट्ठल कामत
... ही एका हॉटेल व्यावसायिकाची गोष्ट आहे. त्यांनी हॉटेल व्यवसाय कसा वाढवला याबाबत यामधे वाचायला मिळते. शाकाहारी भोजनासाठी प्रसिद्ध असणार्‍या कामत हॉटेलमधे नॉन-व्हेजलाही बदलत्या काळाप्रमाणे विट्ठल कामत यांनी स्थान दिले. वाचताना भारावून जायला होते. पण नीट विचार केला तर अनेक विसंगती सहज लक्षात येऊ शकतात. लेखकाच्या काळात व्यवसाय वाढला असे मानले तरी. वडीलांच्या काळातच कामत हॉटेल्सची संख्या प्रचंड होती. कामत स्वतःला इकोफ्रेंडली व्यावसायिक म्हणवून घेतात. पण हॉटेल व्यवसाय इकोफ्रेंड्ली असूच शकत नाही असे तज्ञांचे मत आहे. अनिल मुकेशपेक्षा शून्यातून उद्योगविश्व निर्मिणार्‍या धीरुभाईंचे मोठेपण अधिक आहे. तेच इथेही. बा द वे काही वर्षापूर्वी 'मी मनू आणि संघ' या नावाचे पुस्तक मराठीत आले होते. त्याच्या शीर्षकाची आठवण झाल्यावाचून राहात नाही.
मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट
... मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची ही कहाणी आहे. डॉ सुनंदा अवचट यांनी या संस्थेची सुरुवात केली. पुढील काळात अनेकांनी याचा लाभ घेतला आणि नव्या जीवनाला सुरुवात केली. पेशंटबरोबर वावरताना त्याच्या मनाचा, मानसशास्त्राचाही मोठा अभ्यास यात पहायला मिळतो.
नॉट गॉन विथ द विंड - विश्वास पाटील
... बर्‍याच गोष्टी काळाबरोबर पाचोळ्यासारख्या उडून जातात. काही गोष्टी मात्र टिकून राहतात. अशाच वर्षानुवर्षे टिकून राहिलेल्या जगभरातील कलाकृतींबद्दल यात वाचायला मिळते. रोमन पोलन्स्कीपासून स्टीवन स्पिलबर्गपर्यंत अनेकांच्या कलाकृतींचे यात रसग्रहण आहे. गॉडफादर आहे, अ‍ॅथेल्लो आहे. पानिपतातला नजीब आणि अ‍ॅथेल्लोमधला इयागो यांचा नेमका काय संबंध आहे हे समजण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तकच वाचायला हवे. विश्वास पाटील यांचा जगभरातल्या सिनेमाचा आणि साहित्याचा व्यासंग थक्क करायला लावणारा आहे. पाटील यांना एवढा वेळ कुठून मिळतो असा प्रश्न पडतो. त्यांच्या दिवसाला २४ पेक्षा अधिक तास असावेत असा अंदाज आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 69645
प्रतिक्रिया 227

प्रतिक्रिया

काही वर्षापूर्वी देशातील एका उच्चपदस्थ व्यक्तीकरता पुण्यातील संरक्षण खात्याची जमीन ताब्यात घेण्यात आली. काही जण माहिती अधिकार कायद्याचा वापर करून त्याविरुद्ध लढले. अखेर त्या उच्चपदस्थाला आपला हट्ट सोडावा लागली आणि सत्ता झुकली. सत्ता झुकली - या प्रकरणावरच हे आधारलेले आहे. याविशवियीची बातमी सर्वप्रथम जिथे प्रसिद्ध झाली त्या वेबसाइटची लिंकही देत आहे. सत्ता झुकली पुस्तक विनिता देशमुख यांनी लिहिलेले आहे.

पुस्तकाचे नाव आणि लेखकाचेही नाव ह्यात वेगळेपण आहे :) सध्या मी हे पुस्तक वाचतोय. भारतातली वेगवेगळी ठिकाणे आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणे अशा लांब-रूंद पटलावर घडत असलेली ही रहस्यमय कादंबरी आहे. लेखकाचा गिरिभ्रमणातला उदंड अनुभव पदोपदी जाणवतो. कादंबरीतल्या सगळ्या स्थळांना भेट देऊन यावं असं वाटतं :) ... अभिनेता सचिने खेडेकरने कादंबरीच्या प्रतिक्रियेत लिहिल्याप्रमाणे ह्या कादंबरीवर खरंच एक उत्त्म चित्र्पट तयार होऊ शकेल.

१) रारंग ढांग २) चक्रीवादळ ३) एका स्तुडिओचे आत्मवृत्त लेखक प्रभाकर पेंढारकर ४) तत्वमसी मूळ गुजराथी लेखक ब्रम्ह भट्ट अनुवाद अंजनी नरवणे ५) मी अल्बर्ट एलिस अनुवादकाचे नाव आठवत नाही ........... जोशी ६) तांडव लेखक महाबळेश्वर सैल (गोव्यातील पोर्तुगीज आक्रमणाचे वास्तव )

१) क्रुतुचक्र , दुर्गा भागवत मराठी महिन्या प्रमाणे बदलणाऱ्या प्रत्येक कृतुचे अत्यंत सुरेख वर्णन २) व्यासपर्व दुर्गा भागवत वाचाच मी काय लिहू? ३) निसर्गायण दिलीप कुलकर्णी "बोले तैसा चाले " अशा वृत्तीच्या एका अवलियाने लिहिलेले सुंदर पुस्तक ४) सम्यक विकास दिलीप कुलकर्णी ५) भारताच्या अध्यात्मिक रहस्याच्या शोधात पॉल ब्रन्टन अनुवाद पुरंदरे (इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया )

मेकिंग द कट लेखक महम्मद खादरा एका निष्णात शाल्याविशारदाचे जिवंत अनुभव , विशेषता Palestinian असून "मोसाद" च्या प्रमुखावर शस्त्रक्रिया करतानाचा अनुभव तर वाचण्यासारखा

साता उत्तराची कहाणी ग प्र प्रधान भारतातील वेगवेगळ्या राजकीय विचारधारांचे पाठीराखे पण एकमेकांचे मित्र अशा ७ जणांची मतमतांतरे

स्वातंत्र्यलढ्यात पुरुषांप्रमाणे स्त्रियांचाही महत्त्वाचा सहभाग होता. पण बहुतेक जणींचा उल्लेख कुणाची बहीण, कुणाची मुलगी, कुणाची आई असाच केला जातो. स्वातंत्र्यलढ्यात लढणार्‍या स्त्रियांची माहिती देणारे पुस्तक आहे नाही चिरा नाही पणती लेखक आहेत य दि फडके.

मौनराग -महेश एलकुंचवार - ललित लेखांचा संग्रह. पश्चिमप्रभा - महेश एलकुंचवार - पाश्चात्य साहित्यातील लेखकाला आवडलेल्या पुस्तकांची ओळख. एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे - मदुमलाईच्या जंगलात १ वर्ष राहून घेतलेल्या अनुभवांची मांडणी. आहे मनोहर तरी - वाचन आणि विवेचन - संपादक: विजया राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत. - आहे मनोहर तरी ह्या पुस्तकानंतरचा वाचकांनी सुनीताबाईंशी केलेला पत्रव्यवहार

A Search In Secret India अनुवाद भारताच्या अध्यात्मिक रहस्याच्या शोधात Dr . Paul Brunton ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी प्रतिभा रानडे व्यासपर्व दुर्गा भागवत कृतूचक्र दुर्गा भागवत मी अल्बर्ट एलिस

रक्तरेखा - शशी भागवत मर्मभेद - शशी भागवत चंद्रकांता - मूळ लेखक देवकीनंदन खत्री - मराठी अनुवाद - जनार्दन ओक हिरण्यदुर्ग - संजय सोनवणी (आगामी - पुढील महिन्यात प्रकाशित होईल- जबरदस्त आहे) शालिवाहन = शक - गो.ना.दातार अधःपात - गो.ना.दातार इंद्रभुवनगुहा - गो.ना.दातार कालिकामूर्ति - गो.ना.दातार बंधुद्वेष - गो.ना.दातार वीरधवल - नाथमाधव

सध्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिलेले वाचकप्रिय लेखक संजय सोनवणी यांची काही सुंदर पुस्तके थरार कथा : रक्त हिटलरचे अंतिम युद्ध वॉर टाईम मृत्युरेखा डेथ ऑफ प्राईम मिनिस्टर विश्वनाथ ब्लडी आयलंड ऐतिहासिक: ...आणि पानिपत असूरवेद कुशाण क्लिओपात्रा अश्वत्थामा सामाजिक : सव्यसाची वरील सर्व पुस्तके भरपूर वाचनानंद देतात.

मिसळीवर पुस्तकांचा विषय निघाला पण शेषराव मोरे यांचा अद्याप उल्लेख झाला नाही हे विशेष आहे.

तुकाराम दर्शन - सदानंद मोरे - तुकारामांवरचे आतापर्यंतचे सर्वात विश्वासार्ह व सुंदर पुस्तक म्हणता येईल शेषराव मोरेंच्या पुस्तकांवर @वल्ली नेमके लिहू शकेल. अलिकडेच त्याने त्यांची बरीच पुस्तके वाचली आहेत. बाकी अनुवादीत कादंबर्‍यांबद्दल सिडने शेल्डनची ब्लडलाईन, अदर साईड ऑफ मिडनाईट एकदम भारी (मराठी अनुवाद) आयर्विंग वॅलेसची सेकंड लेडी, द सेव्हन्थ सिक्रेट(मराठी अनुवाद) मारिओ पुझो ची गॉडफादर सगळ्या अफलातून कादंबर्‍या आहेत

खरे तर सर्व कांदबर्‍या वाचनीय आहेत.. मला खास आवडणारी "काजळमाया.."

साकेत प्रकाशन चे "सत्तर दिवस" नामक एक पुस्तक एकदम भारी आहे. पियर्स लॉर्ड नामक मुळ इंग्रजी लेखकाचे !! मला हे पुस्तक खूप उर्जा देतं !

मिसळपाववर हात-पाय, आणि काय काय आपटत स्वताच्या नसलेल्या अकलेचा टेंभा मिरावनार्यांसाठी (टोला कोणाला हाणलाय ते ज्याचं त्याला कळलं असेल ). Princes: JEAN SASSON - सौदी अरेबिया ची राजकुमारी किती पारतंत्र्यात असते .सगळी सुख हाथ जोडून उभी असताना सुधा कशी दुखात असते हे तिच्याच शब्दांमध्ये. श्रीमंत अरब देशांमध्ये स्त्रियांची काय अवस्था आहे ह्याची कल्पना येते. Diary of Ann frank : नाझींच्या दहशतवादावर आधारित आहे. एका किशोर्वायातल्या मुलीने चोरून लिहिलेली हि diary . हिचा मराठी अनुवाद पण आहे. पण अनुवाद करणारे लेखक कोण आहेत ते आठवत नाही. वैरयाची रात्र : नाझींच्या क्रूर पणावर आधारित असलेला हे पुतक. श्रीमान योगी : शिवाजी महाराजांचं चरित्र. पण हे वाचताना आपण कुठलाही रणजीत देसाई चरित्र वाचत आहोत असं वाटत नाही. जणू काही आपण तिथेच उपस्थित आहोत असा वाटत. मृत्युंजय : रणजीत देसाई. कर्णाच्या जीवनावरचा हे पुस्तक बहुदा सगळ्यांनी वाचलेलं असतं. wise and otherwise: sudha मूर्थी . सुंदर पुस्तक .sudha मूर्थीना भेटलेली वेगवेगळी माणसं आणि त्यांचे किस्से. काही किस्से मनाला चटका लावून जातात. गंमत गोष्टी : द मा मिरासदार . विनोदी पुस्तक. ग्रामीण भागातल्या विनोदी कथा. द मा मिरासदारांची सगळीच पुस्तके भन्नाट. थोडीशी गूढ पण खर्या विषयांवरची पुस्तके; many masters many lives : वर कोणीतरी ह्याचा उल्लेख केला आहे. दिव्यस्पर्शी - Dhananjay Deshpande : The Third Eye - Lobsang Rampa. आपल्यातल्या अध्यात्मिक शक्तीला कसं जागवला आणि त्याचा उपयोग कसं करून घेतला ह्यावरचा हे पुस्तक. Lobsang रामपा हे तिबेट चे राजपुत्र. परंतु वयाच्या ७ व्या वर्षी ज्योतिषाने वर्तवलेल्या भाविश्यावरून ह्यांना राजवाडा सोडून जावं लागतं आणि पुढे काय होतं हे वाचण्यासारख आहे.(Third Eye म्हणजे २ भुवयांच्या मध्ये असणारं आज्ञा चक्र ) योगी कथामृत - परमहंस योगानंद . हि एका योग्याची आत्मकथा आहे. जन्नाथ कुन्ठेंची खालील ५ पुस्तके वाचावी अशीच आहेत. नर्मदा परिक्रमा, त्यांची अध्यात्मिक साधना, ईश्वर कृपा , त्यांचे अद्भुत अनुभव ह्या सगळ्यांवर हि पुस्तके आहेत. कृपया हि पुस्तके खाली दिलेल्या क्रमानेच वाचावीत. नर्मदे हर हर साधनामस्त धुनी नित्य निरंजन कालिंदी

In reply to by म्हैस

मृत्युंजय : रणजीत देसाई.नि केंव्हा लिहिले माझ्या वडिलांकडे कोणीतरी शिवाजी सावंत म्हणून आहेत त्यांचे नाव असलेले पुस्तक आहे - बहुदा डुप्लिकेट असेल !

कमला सोहनी या भारताच्या पहिल्या आहार शास्त्रज्ञ होत्या . हे पुस्तक वाचून आपल्या आहाराकडे बघण्याची एक नवीन दृष्टी लाभते. उदा. कलिंगड खाल्यावर सहसा बिया टाकल्या जातात, पण या बी मध्ये बदामा इतकीच उपयुक्त जीवनसत्वे असतात आणि खायला देखील वाईट लागत नाही, अशा बर्याच टिप्स मिळतात.

डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर श्रीराम गीत यांनी या पुस्तकात कासव पासून क्रायोजेनिक इंजीन अशा सर्व प्रकारची प्राथमिक माहिती साधारण १ पान इतकी फार सुरेख दिली आहे. सारखे प्रश्न विचारणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी फारच उपयुक्त

काही दिवसांपूर्वी एक पुस्तक हाती लागले. "मुस्लिम मनाचा शोध". लेखक शेषराव मोरे. शेषरावांनी इतर अनेक पुस्तके लिहिली पण मुस्लिम मनाचा शोध हे पुस्तक त्यांची ओळख बनले. शेषराव हे मुळात इंजिनीयर. अनेक वर्षे इंजिनीयरींग कॉलेजात अध्यापन केल्यावर केवळ अभ्यासासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. या पुस्तकात कुराण, हदीस आणि इतिहासातील काही घटना यांच्या आधारे इस्लामचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मोठमोठे इस्लामिक विद्वान जेव्हा एखाद्या ठिकाणी अडतात तेव्हा हे वाद शेषरावांपर्यंत येतात. आज भारतात(कदाचित जगात) इस्लाम या विषयात शेषराव मोरे हा अंतिम शब्द मानला जातो. या पुस्तकात लेखकाने कुठेही स्वतःचे वैयक्तिक मत मांडलेले नाही. असे असूनही लेखकाने खूप काही म्हटले आहे असा अनुभव वाचकांना येतो.

नक्षलवादाचे आव्हान - देवेंद्र गावंडे देवेंद्र गावंडे हे लोकसत्तामधील पत्रकार आहेत. नक्षलग्रस्त भागातील असल्याने नक्षलवादाचा जवळून परिचय आहे. नक्षलवादालाही एक तत्त्वज्ञानाची बैठक देण्याचा प्रयत्न केला जातो परंतु कुठल्याही इझमशी तत्त्वाशी नक्षल्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही हे या पुस्तकात ध्यानात येते. शासनही याबाबतीत अपुरे पडते आहे असे दिसते. वाचल्यानंतर आपल्या मनातल्या नक्षलवादासंबंधीच्या कल्पनांना सुरुंग लागू शकतो.

अप्रतिम पुस्तक आहे. ह्यावर आत्ताच एक चित्रपत देखिल येउन गेल आहे.

धागा थोडा उसवतोय माफी असावी एक जुन्या काळातले, पहिल्या पिढीतले संघातले कार्यकर्ते होते स ह देशपांडे. रा स्व संघाच्या शाखांच्यावाढीसाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. पुढे काही काळाने ते संघापासून ते दूर झाले. हे सगळं आलं आहे स. ह. देशपांडे यांच्या संघातले दिवस या पुस्तकात.

माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे नाव बराच काळ ऐकून होतो. पुढे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावरचे अभिप्राय वाचायला मिळाले. पण त्यांचे पुस्तक वाचण्याचा योग कधी आला नव्हता. तो अलिकडे आला. अंतर्वेध - हे गडाखसाहेबांनी लिहिलेले पुस्तक वाचनीय आहे.

पुण्याच्या एका माजी खासदारांनी लिहिलेले पुस्तक वाचायला मिळाले. राजकारणातला माणूस एवढं चांगलं लिहू शकतो याचे आश्चर्य वाटते. पण या माणसाने एक नव्हे अनेक पुस्तके लिहीली आहेत. त्या पुण्याला असे खासदार आता का मिळत नाहीत पुस्तकाचे नाव आहे अनगड मोती - १९५५ च्या आसपासचे पुस्तक आहे, १९१८ पासूनच्या घटनांचे उल्लेख त्यात येतात ललित लेखन म्हणून हे पुस्तक उत्तम आहे. फार साधे सोपे सरळ लेखन आहे.

पु.ल. यांनी लिहिलेले एक हि पुस्तक नाही. मला आवडलेली काहि पुस्तके व्यक्ती आणि वल्ली : लेखक - पु ल देशपांडे बाराला दहा कमी : अणूबॉंब शोध आणि इतिहासावर मस्त पुस्तक. मला वाटते लेखक - पद्मजा फाटक रारंग ढांग : लेखक - प्रभाकर पेंढारकर बाकी यादी नंतर वेळ मिळेल तशी

पुरंदरे प्रकाशनच्या स्किम मधे घेतलेले बाबासाहेबांचे शेलार खिंड सध्या वाचतो आहे. लहानपणी लायब्ररीतून घेउन वाचले होते. परत वाचायला तितकीच मजा येत आहे. या नंतर राजाशिवछत्रपती वाचणार आहे. त्याच प्रमाणे मो. रा. गुणे यांचे "अमित आनंदाचे विश्र्व" हे सुध्दा एक सुरेख पुस्तक आहे. गुण्यांनी कोणताही तत्ववेत्याचा आव न आणता करुन दिलेली उपनिशदांची ओळख. एकदा वाचायला घेतले की झपाटल्या सारखे होते. तसेच झपाटलेपण विवेकानंदांचा ज्ञानयोग, कर्मयोग वाचताना पण आले होते.

माझीही थोडीशी भर .. फ्रीडम ट्रयाप ( लेखक आठवत नाही) इंडिया अंडर औरंगजेब ( जदुनाथ सरकार) हायवेवर हीप्पी ( जेम्स हेडली चेस) :-) @ आशुजोग तुम्ही भा. द. खेर यांचे चाणक्य हे पुस्तक वाचले का?

मोदीनामा - मधु किश्वर मराठी अनुवादही उपलब्ध आहे माहितीपूर्ण आणि अनेकांचे दुकान बंद करणारे हे पुस्तक आहे

ख्रिस्ती धर्मांतरावर आधारीत एक पुस्तक मराठीत आलेले आहे. त्याचे नाव कुणी सांगू शकेल का ! मागच्या वर्षभराच्या कालावधीत त्या पुस्तकाचा परिचय वृत्तपत्रात आला होता. गोव्याला लागून असलेल्या कोकणातील घटना इतिहास यांची पार्श्वभूमी त्यामधे होती.

In reply to by आशु जोग

तांडव - महाबळेश्वर सैल. गोव्यातील लहानशा खेडापाड्यातल्याच घटना आहेत.

धागाकर्ते साहेब, इथे सुचवल्या गेल्यांपैकी कोणती पुस्तके तुम्हाला वाचायला जमली, वाचली तर आवडली का वगैरे अपडेट्स द्या की. :)

यशोधराजी जमेल तसे अभिप्राय कळवत राहीन... अलिकडे सुधा मूर्ती यांचे अस्तित्त्व पाहण्यात आले. का कुणास ठाऊक त्यातल्या लॉस्ट अँड फाऊंड फॉर्म्युल्यामुळे टागोरांच्या नौकाडुबीची आठवण झाली. म्हणून नौकाडुबी पुन्हा वाचून काढले. नौकाडुबीची प्रत जुनी होती. पहिली पाने फाटलेली. अनुवाद कुणी केला इ. कळायला काहीच मार्ग नाही. पण अनुवाद छान आहे.

अनगड मोती - बद्दल आणखी काही त्यात एक प्रकरण गोध्रा आणि तिथला चहावाला यावर आहे. ही आठवण आहे १९१४ ची. मी वाचले २०१४ मधे.

ज्यांना चित्रपट बारकाईने पहायची आवड असते अशांसाठी एक होती प्रभातनगरी - बापू वाटवे बापू वाटवे हे स्वतः केवळ समीक्षक नव्हते तर प्रभातमधे ते सहदिग्दर्शकही होते. एखाद्या रंजक चित्रपटाइतकेच हे पुस्तकही रंजक आहे. या पुस्तकाचे ऐतिहासिक महत्त्वही मोठे आहे. लता मंगेशकरांचा जन्मही झाला नव्ह्ता तेव्हापासून शांताराम चित्रपट व्यवसायात होते. बातमीमागची बातमी असते तशी चित्रपटामगची कहाणी यात वाचायला मिळते.

पुस्तकाचे नावः The Black Hole War: My Battle with Stephen Hawking to Make the World Safe for Quantum Mechanics माहिती लिंक: http://en.wikipedia.org/wiki/The_Black_Hole_War माझे मतः फक्त कॉस्मॉलॉजीची आवड असणार्‍यांकरिताच आणि अतिशय जटिल.

विजय तेंडुलकरांची ही व्यक्तीरेखांची पुस्तके वाचण्या सारखी आहेत. १. हे सर्व कुठुन येते २. ते ३ आणि मी. राज कपूर, वसंतराव नाईक, चीमणभाई पटेल, पानवलकर, जयप्रकाश नारायण ह्यांच्या बद्दल ची निरीक्षणे मस्त आहेत आणि निरीक्षणातून आलेली तेंडुलकरांची मते सुद्धा. जयप्रकाशांच्या लेखात लालूप्रसाद चा उल्लेख आहे तो वाचण्यासारखा आहे. ( लेख १९७७ चा आहे )

ह.मो. मराठेंची कुठलेही पुस्तक वाचण्यासारखेच आहे. पण "बालकांण्ड" आणि "काळेशार पाणी" सुरेखच. त्यांच्या व्यक्तीरेखा आणि लेखांची पुस्तके पण छान आहेत जसे की "मधले पान"

बनगरवाडी : माणदेशी खेड्यामधल्या खडतर जीवनावर आधारित व्यंकटेश माडगुळकर सुंदर यांची कादंबरी. केलिडोस्कोप : अच्युत बर्वे यांची "एका बेलगाम व बेफाम लोकप्रिय लेखकाचे" व्यक्तिचित्र. बखर राजधानीची : दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या दिल्ली वास्तव्यामधील घडामोडी आवर्तन :तालयोगी सुरेश तळवलकर यांचे नुकतेच प्रकाशित झालेले चरित्रात्मक पुस्तक. आपल्या महान संगीतकारांना समजून घेताना आपल्या मर्यादा स्पष्ट होतात. तबला तथा शास्त्रीय संगीताची उच्च अभिरुची असेल तर जरूर वाचावे !

In reply to by मारवा

बाबा कदमांचं साहित्य अभिजात ?? हे तुम्ही उपहासाने तर म्हणत नाही आहात ना ? बाबा कदमांची पुस्तकं टाइमपास म्हणून वाचायला उत्तम असतात . ते माझेही आवडते लेखक आहेत . त्यांची एक वेगळीच शैली आहे . आरामशीर जीवनशैली - शेती / मळा - भरपूर दूधदुभतं , निसर्गाच्या सान्निध्यातलं घर , निरनिराळी मद्य , उत्तमोत्तम मांसाहारी पदार्थ , अनैतिक किंवा चोरटे प्रेमसंबध ( कृपया माझ्या वाचनातील आवडीबद्दल गैरसमज करून घेऊ नये ) , एक कोणीतरी अन्यायी , अत्याचारी , श्रीमंत , क्वचित सत्ताधारी माणूस , त्याच्याविरुद्ध चांगल्या माणसांची एक टीम आणि मग रंगलेली कोर्ट केस असंच त्यांच्या ८० % कादंबऱ्यांचं स्वरूप आहे . तरीही प्रत्येक कादंबरी वाचताना तोचतोचपणा जाणवून कंटाळा येत नाही , ह्यातच त्यांच्या लिखाणाचं यश आहे हेही मान्य . त्यांची किमान १५ - २० तरी पुस्तकं मी वाचली आहेत , ४ - ५ खरेदीही केली आहेत पण त्यांच्या लेखनाला अभिजात वगैरे म्हणण्याचं धारिष्ट्य काही माझ्याने होणार नाही .

'ओसरलेले वादळ' हे एक चांगले पुस्तक आहे. अनेक व्यक्तींवर लिहीलेले लेख यामधे आहेत. जगभरातील अनेक व्यक्ती यात भेटतात. ज्ञानात भर पडते. त्यातही काही व्यक्तींवरचे लेख हे तर केवळ 'दर्शन' ठरतात. याचे कारण लेखकाला स्वतःला वेगळी दृष्टी लाभलेली आहे. (लेखकाचे नाव मुद्दामच देत नाही. नाव ऐकल्यावर अनेक जण शिवीगाळ सुरु करतात)

चारही पुस्तके अनिल बर्वे यांची दिली याचे एकमेव कारण म्हणजे या धाग्यावर अजुन त्यांचा उल्लेख दिसला नाही म्हणून मला करावासा वाटला. बाकी पण खूप पुस्तके आहेत पण त्याचे बारकावे सांगितल्याशिवाय नुसती नावे देण्यात खरच काही मजा नाही म्हणून दिली नाहीत. १. डोन्गर म्हातारा झाला - अनिल बर्वे - कम्युनिस्ट विचारांनी भारलेले अनिल बर्वे जेव्हा संघर्ष रंगवतात त्याची वेगळीच खुमारी जाणवते एका हिल स्टेशनच्या जवळील आदिवासी जमातीचा आणि सत्ताधार्यांचा संघर्ष जमिनिसाठी होतो जी जमीन भांडवलदारना नवीन रिज़ॉर्ट साठी हवी असते. नन्तर तेथे आलेला एक निवृत्त लष्कर अधिकारी जेव्हा त्यात पडतो... २. थॅंक यु मिस्टर ग्लाड - अनिल बर्वे - फाशीची शिक्षा झालेला एक दहशतवादी आणि जेलर यांच्यातील तुफान संवाद. अतिशय खिळवून ठेवणारे पुस्तक. यातच ग्लाडच्या मुलीचे तत्काळ सिझेरियन ऑपरेशन करायची वेळ येते आणि... ३. अकरा कोटी गॅलन पाणी - अनिल बर्वे - कोळसा खाणीतील कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष. त्यातच जुन्या बंद केलेल्या खाण कामाचे अफरतफरीचे संदर्भ आणि त्याच्याशी निगडीत चालू खाणीतील कामगारांचे आयुष्य पणाला लागते. याचवेळी नवीन इंजिनियर येतो... ४. स्टड फार्म - अनिल बर्वे - रेसच्या घोड्याच्या आयुष्याचा बॅकड्रोप घेऊन आलेली कथा. पण परत भांडवलदार आणि मजूर संघर्ष पदोपदी जाणवून देत पुढे सरकणारी. घोड्याचे आणि त्यांच्या घोडेस्वारांचे, आणि सर्वात शेवटी मालकांचे संबंध - त्यातील बारकावे यांचे छान चित्रण आहे.

मी पाॅपिलाॅन हे अनुवादित पुस्तक वाचले. विनाकारण शिक्षा झालेला एक कैदी आणि दोघे मिळून प्लॅन करून जेल मधून पळतात व समुद्र मार्गात त्याची नाव भरकटते व एका किनार्याला लागतात व तेथील जंगली लोकांच्या तावडीत सापडतात पुढे रोमहर्षक कथेचा प्रारंभ होताे.

In reply to by हेमंत लाटकर

पॅपिलॉन - हेन्री शॅरीयर, अनु-रविंद्र गुर्जर पुस्तक रंजक आहे. पण सगळ्या गोष्टी खर्‍या असतील का अशी अनेक ठिकाणी शंका येत राहते..

मी नुकतीच गणेश मतकरींची "खिडक्या अर्ध्या उघड्या" हि कादंबरी वाचली.. एक वेगळ्या प्रकारची मांडणी आहे या पुस्तकाची.. सध्याच्या जीवनपद्धतीचे चित्रण आहे. या पुस्तकाला मराठीतून लिहिलेलं इंग्लिश पुस्तक म्हणावं का असा प्रश्न पडू शकतो.. पण overall पुस्तक आवडलेलं आहे..

In reply to by हर्मायनी

गणेश हा मूळात लेखक आहेत का... की ते नाटकाच्या इतरही प्रांतात त्यांचे नाव आहे ? कला, वेशभूषा असे काही.

In reply to by आशु जोग

आर्किटेक्ट आहेत. नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मिती शी संबंधित आहेत. त्यांची बहिण सुप्रिया विनोद नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम करते. ते स्वत: अनेक चित्रपटांचं समीक्षण करतात जे वृत्तपत्रांमध्ये छापून येतं. त्या अर्थानं कलेशी संबंधित आहेत.

रविंद्र पिंगे यांची सर्व पुस्तके . त्यांच्या पुस्तकांमधून को़कणातील निसर्ग , जीवन दर्शन , प्रवास वर्णन छान सांगितले आहे .

एका दिवाळी अंकात या लेखिकेची कथा वाचली. यानंतर या लेखिकेचे लेखन शोधून वाचले पाहीजे असे वाटल्याने स्वतःविषयी हे पुस्तक मिळवले. पुस्तकाच्या निर्मितीसकट सर्व गोष्टी उच्च दर्जाच्या आहेत. अनेक लोकांनी इथे स्वतःविषयी लिहीले आहे. लेखन - नीलिमा बोरवणकर प्रत्येकाने जडण घडण, मैत्री, सहजीवन याविषयी लिहीले आहे.

शशिकांत पित्रे कुणी वाचलेत का चीन इ विषयावर बरे लिहितात असं ऐकलंय

In reply to by आशु जोग

न सांगण्याजोगी गोष्ट' हे शशिकांत पित्रेंच भारत चिन युद्धा वरच पुस्तक आहे. विस्तीर्ण आढावा घेतलाय. तसच सद्यस्थिती आणी भविष्यातील वाटचाल यावर ही भाष्य केलय. चांगल आहे पुस्तक.

वाचाल तर वाचाल- बाजीराव वर पुस्तक आहे छान

संजीव केळकर यांनी हे पुस्तक लिहीले आहे. बूकगंगाच्या मते "संघाला गोळवलकर यांच्या मार्गाने यश मिळणार नाही, तर देवरस यांच्या सर्वसमावेशक पद्धतीनेच उज्ज्वल काळ असेल, असे मत लेखक मांडतात. गोळवलकर यांनी संघाच्या कामाची दिशा बदलली. त्यामुळे संघटनेचे बरेच नुकसान झाले" _ वास्तविक पुस्तकामधे असंख्य संदर्भ आणि जोडाजोडी केलेले उतारे येतात. त्यामुळे सगळाच विस्कळीतपणा आहे. लेखकाला नेमके काय म्हणायचे हे कळत नाही. संपूर्ण पुस्तकभर निरनिराळ्या पुस्तकातले संदर्भ लेखक फेकत राहतो. पुस्तकाच्या नावापलिकडे उत्सुकता निर्माण करणारे यात काही नाही, हेच सिद्ध होते.

माझं वाचन अजून अल्प आहे , त्यामुळे पानिपत , स्वामी , छावा यांसारखी पुस्तकं या लीस्टमध्ये नाहीत कारण ना.सं .इनामदार यांची ४-५ पुस्तकं सोडली तर खालील सर्व पुस्तकं मी वाचलेली आणि मला आवडलेली अशी आहेत . . विनोदी , हलकीफुलकी आवडत असतील तर हि घ्या - द . मा . मिरासदार यांच्या कथासंग्रहांपैकी कोणतंही पुलंचं हसवणूक , व्यक्ती आणि वल्ली , गणगोत . शंकर पाटील यांची . फक्कड गोष्टी , ताजमहालमध्ये सरपंच , इल्लम , जुगलबंदी , खुळ्याची चावडी , खुश खरेदी , वावरी शेंग , धिंड . शरद वर्दे यांची राशा , फिरंगढंग आणि झुळूक अमेरिकन तोऱ्याची ही पुस्तकंही अतिशय सुरेख आहेत . . पौराणिक आवडत असतील तर सगळ्यात आधी मृत्युंजय , मग युगंधर ( शिवाजी सावंत ) . गो . नी . दांडेकरांचं कृष्णवेध अप्रतिम आहे . राधेय - रणजीत देसाई . . ऐतिहासिक - श्रीमान योगी - रणजीत देसाई . बाबासाहेब पुरंदरेंची राजा शिवछत्रपती आणि शेलार खिंड . शिवाय ना.सं .इनामदार यांची मंत्रावेगळा , शिकस्त , राजेश्री , शहेनशहा , झुंज हि पुस्तकही सुंदर असावीत , मी त्यांचं फक्त राऊ वाचलं आहे त्यावरून सांगते . . सामाजिक वाचायची तर विश्वास पाटील यांचं झाडाझडती , कविता महाजनांचं भिन्न . . विज्ञानकथा आवडत असतील तर जयंत नारळीकरांची अंतराळातील भस्मासुर , यक्षांची देणगी , वामन परत न आला , प्रेषित , अभयारण्य , टाईम मशीनची किमया , अरुण साधू यांची स्फोट , मंत्रजागर , डॉ . बाळ फोंडके यांचं सायबर कॅफे , सुबोध जावडेकर यांची आकाशभाकिते , कुरुक्षेत्र , पुढल्या हाका , गुगली , संगणकाची सावली हि पुस्तकं खरंच खूप छान आहेत . . भयकथा - नारायण धारप ( त्यांची सगळीच पुस्तकं मला अतिशय आवडतात ) गुढकथा - रत्नाकर मतकरी . . संतांच्या आयुष्यावर आधारित साहित्य वाचायचं असेल तर रवींद्र भट यांची इंद्रायणीकाठी , घास घेई पांडुरंगा , हेचि दान देगा देवा …. आणि गो . नी . दांडेकरांचं पाच संत चरित्रे हि पुस्तकं वाचावीत . ( पाच संत चरित्रे अधिक उत्तम …. टीका करण्याएवढी माझी अजिबातच योग्यता नाही पण वाचक म्हणून वाटलं ते सांगते , रवींद्र भटांना ज्यासाठी ३००-३५० पानांची कादंबरी लिहावी लागली ते दांडेकरांनी प्रत्येकी ४०-५० पानांत कितीतरी जास्त हृदयाला भिडेल असं मांडलं आहे ) . व्यंकटेश माडगूळकर यांचे सगळे कथासंग्रह अतिशय उत्कृष्ट लिखाणाची उदाहरणं आहेत. . आणि ग्रामीण पण माडगुळकर , शंकर पाटील , मिरासदार यांच्या ग्रामीण लेखनापेक्षा भिन्न अशी काही उत्तम पुस्तकं म्हणजे - गारंबीचा बापू , गारंबीची राधा , एक होती आजी - श्री.ना.पेंडसे . शितू , जैत रे जैत , पडघवली , पवनाकाठचा धोंडी - गो . नी . दांडेकर .

तुंबाडचे खोत , रक्तरेखा , मर्मभेद , या मराठीतील व The Second Lady इंग्रजीतील मला आवडलेल्या कादंबर्‍या आहेत. दी सेकंड लेडी मध्ये, अमेरिकेन प्रेसिडेंटच्या पत्नीसारखी, दुसरी,तशीच दिसणारी,पण रशियात असलेली एक स्त्री ,रशियन गुप्तहेर शोधुन काढतात, अमेरिकन फर्स्ट लेडी ला पळवुन, रशियात आणली जाते आणि तिच्या जागी , ही डमी स्त्री पाठवुन , अमेरिकन अध्यक्षाच्या मनातील , गुप्त विचार काढण्याचा , रशियन सरकारचा प्रयत्न असतो. पण एक जागरुक पत्रकार हा कट कसा उधळुन लावतो, याची वेधक कथा सुंदर रितीने गुंफली आहे .

वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना ! पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम.