मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोकल / मोकळी भाजणी

सानिकास्वप्निल · · पाककृती
अजून एक झटपट, पौष्टीक, खमंग पाककृती :) साहित्यः १ वाटी थालीपिठाची भाजणी १ छोटा कांदा बारीक चिरलेला १ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून हळद १/४ टीस्पून मोहरी १/४ टीस्पून हिंग चिमूट्भर ओवा सजावटीसाठी ओले खोबरे व चिरलेली कोथींबीर मीठ चवीनुसार . पाकृ: भाजणीत लाल तिखट, मीठ व थोडे पाणी घालून सरसरीत भिजवावे. . पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी, ओव्याची फोडणी करावी.(कढीपत्ता हवे असल्यास तो ही घालावा) हिंग, हळद व कांदा घालून परतून घ्यावे. त्यात भिजवलेली भाजणी ओतून एकत्र करावे. झाकून वाफ काढावी. भाजणी पूर्ण शिजली की गॅसवरुन उतरवावी. . वरुन ओले खोबरे व कोथींबीर पेरावी व आलं+मिरची वाटून लावलेल्या ताकासोबत सर्व्ह करावी. . ही भाजणी मोकळी व खमंग लागते. नाश्त्याला, मधल्या वेळचे खाणं म्हणून झटपट बनवता येतं. थालीपिठाला, वड्यांना चांगला पर्याय आहे.

वाचने 10779 वाचनखूण प्रतिक्रिया 29

भावना कल्लोळ Sat, 05/03/2014 - 16:28
सानु, दोरखंडच घेऊन येते आता … तुझे हात पायच बांधुन ठेवते, किती छळशील ग बायो, एकतर तुझ्या नावाचे धागे न पाहता राहवत नाही आणि उघडले कि जळजळ थांबत नाही ……… भगवान के लिये रहम कर मेरी मां :P पाकृ नेहमी सारखीच तोड नाही.

स्पंदना Sat, 05/03/2014 - 16:42
आई ग्ग!! भाजणीचं फक्त थालीपीठच माहीत होतं आजवर. अशी पण करता येते? मस्त!! उगा तव्यावर हात पोळत उभे नको रहायला. बाकी स्गळे फोटो, अन मांडणी अतिशय सुरेख.

पैसा Sat, 05/03/2014 - 17:14
भारतीय इन्स्टण्ट फूड! साध्या पदार्थाला पण सादर करण्याच्य तुझ्या कौशल्याने आणखी सुरेख बनवलंय!

छान.....! एक शंका:- थालिपिठ करताना..मोडलं आणि त्यातूनच या पदार्थाचा जन्म झाला असावा का?.. मोडून झाले मो कळे! असे काहिसे! :)

मुक्त विहारि Sat, 05/03/2014 - 19:48
आमची "ही" ह्या पदार्थात तळलेले दाणे घालते. मी ह्याच्या बरोबर तळलेला बटाट्याचा कीस घेतो. मोठा मुलगा ह्याच्या बरोबर केळा वेफर्स घेतो तर धाकटा दही किंवा ताक घालून खातो. एकदा बटाट्याचे वेफर्स पण घातले होते. थोडक्यात काय? तर हा पदार्थ एकदा खाल्ल्ला की, ह्याचे व्यसनच लागते. बादवे, आम्ही असे काय पाप केले, की आम्ही नेमके बाहेर असतांनाच असे पदार्थ मिपा सदस्य बनवतात.तरी बरे आजकाल प्र.पे. काका शांत बसले आहेत.त्यांनी एकदा "मटण-कलिया" टाकले, की मग झाले.

धर्मराजमुटके Sat, 05/03/2014 - 23:03
ह्या सुंदर दिसणार्‍या पाककृती प्रत्यक्षात खाताना पण तितक्याच सुंदर लागतात का ? संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा.

In reply to by धर्मराजमुटके

संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा. याऐवजी, "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" असे म्हणा... आणि यशस्वी झालात तर पंगतीत आमचीपण जागा घरून ठेवा, हा आलोच ! :)

In reply to by सानिकास्वप्निल

छे, छे ! आम्ही पाकृचे प्रयोग अजिबात करत नाही ;) "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" हे वाक्य तुमच्यासाठी होते आणि पंगतीत मुटकेसाहेबांबरोबर आम्ही येणार ! :) तुम्ही इतके सुंदर पदार्थ बनवत असताना आमच्या दिव्य पाकृचे अत्याचार स्वतःवर आणि इतरांवर करणे बरे वाटत नाही ! :)

दिपक.कुवेत Sun, 05/04/2014 - 00:14
अतीशय आवडता पदार्थ. आमच्याकडे वरुन ओलं खोबरं तर घेतातच पण सोबत सायीचं दहि असतच असतं. पण हे पीठ फार सरसरीत भीजवलयं. आय मीन आमच्याकडे कमीत कमी पाणी घालुन गोळा भीजवतात (पण कणीक नाहि) व तो गोळा नुसत्या वाफेवर शीजवुन घेत घेत मोकळा करायचा. ह्या पद्धतीने केल्यास भाजणीचे फार कमी गोळे राहतात अर्थात हे आपलं माझं मत.

Prajakta२१ Mon, 05/05/2014 - 10:33
आमच्याकडे थालीपिठाचा जो गोळा भिजवितो त्याचीच मोकळी भाजणी बनवितात ती मधून मधून हलवावी लागते पीठ सरबरीत केल्याने जास्त सोप्पी झाली आहे करायला धन्यवाद

In reply to by Prajakta२१

कोरडा गोळा परतून मोकळा केला की तो फार फडफडीत होतो असे वाटते. थोडं गार झाले की आणखीनच कोरडं होतं शिवाय खाताना घास बसल्यासारखं होतं म्हणून थोडं सरसरीत भिजवते मी. असो, थोडक्यात काय प्रत्येकाने आपल्याला आवडते तशी बनवून त्याचा आस्वाद घेणे :) धन्यवाद.

In reply to by बालगंधर्व

सुहासदवन Tue, 05/06/2014 - 20:18
तुम्ही काहीही लिहा हो, नाहीतरी ह्या लोकशाहीने प्रत्येकाला आपल्याला वाटते ते लिहायचे स्वातंत्र्य दिलेच आहे ना! पण ज्या बालगंधर्वांनी आपल्या सुरेख, स्वच्छ आणि जादुमयी स्वरांनी ह्या जगाला मंत्रमुग्ध केले, त्या बालगंधर्व नावाचा आयडी घेतल्यावर मात्र तुम्ही इतके अशुद्ध आणि तेही मुद्दामुन कसे काय लिहू शकता? ह्याची तुमच्यापेक्षा जास्त लाज मला वाटते एक मराठी भाषक म्हणून!
तुमची स्वाक्षरी तुम्हीच लिहीली आहे ना. वाचा जरा!!!

सूड Sat, 05/31/2014 - 13:52
ही आज बनवलेली मोकळी भाजणी. फक्त पीठ वर म्हटल्यासारखं सरसरीत न भिजवता कांदा शिजल्यानंतर कोरडीच भाजणी घालून वर ताकाचे हबके मारत मारत शिजवली. बर्‍यापैकी सुटसुटीत झाली.