✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'तेंडल्या'

क
किसन शिंदे यांनी
गुरुवार, 04/24/2014 - 02:51  ·  लेख
लेख
1 उजवा हात डोक्यावरून डाव्या कानापर्यंत पोहचण्याला ४-५ वर्षे होऊन गेली असावीत. होय! हे यासाठीच असं लिहीलंय कारण, माझ्या लहानपणी म्हणजेच ९० दशकाच्या सुरूवातीला मुलाला शाळेत घालायचं असेल तर आत्ताच्या सारखं त्याचं वय न पाहता उजवा हात डोक्यावरून डाव्या कानापर्यंत पोहचला की मुलगा शाळेत जाण्यायोग्य झाला असेच समजायचे. शाळेच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी नावाचं भीती घालणारं पुस्तक अजून अभ्यासाला आलं नव्हतं. ९२ चा विश्वचषक पाकड्यांनी जिंकून वर्षे-दोन वर्षे उलटली होती. तेव्हाच्या भारतीय संघात ८३ चा विश्वचषक जिंकून देणारे एक दोन जण कारकिर्दीच्या आपल्या शेवटच्या टप्प्यात खेळत होते. नेमकं त्याच वेळी, न जाणो कशी काय, मला क्रिकेट या खेळाची गोडी लागायला सुरूवात झाली आणि मी क्रिकेट 'ऐकायला' सुरूवात केली होती. एखाद्या घरात मोठ्या आवाजात सुरू असलेला 'सिलोन' कंपनीचा भला मोठ्ठा रेडिओ, त्याभोवती कोंडाळ करून बसलेली, झोपलेली, उभी राहीलेली, आणि टाचणी पडल्यावरही आवाज यावा इतक्या शांत वातावरणात एकाग्रतेने क्रिकेटची कॉमेन्ट्री ऐकणारी पाच-पन्नास डोकी आणि प्रत्येक षटकारा-चौकारानिशी जोरजोरात ओरडत, हसत ऐकमेकांना दिलेल्या टाळ्या! अशा 'क्रिकेट संस्कारी' वातावरणात ते पाहण्याची, ऐकण्याची आणि खेळण्याची बीजं माझ्या मनात रोवली गेली. भारतीय दुरचित्रवाणी क्षेत्रात तोपर्यंत फारशी क्रांती झाली नसल्याने 'टिव्ही' हा प्रकार फार दुर्मिळ मानला जात होता. बहुतेक श्रीमंतांच्याच घरी ही टिव्ही नावाची गंमत आढळून यायची. किंबहूना घरी टिव्ही असणं हेच श्रीमंत असल्याचं मापदंड मानले जाई. त्यामुळे क्रिकेटचं जे काही बाळकडू मिळालं ते रेडिओच्या माध्यमातूनच! भारताचा सामना असला की, शेजार्या-पाजार्यापैंकी एकाच्या तरी घरातून रेडिओची ती खरखर ऐकू यायची. स्टेशन व्यवस्थित लागून धावतं समालोचन ऐकू येण्यासाठी आटापिटा चालायचा. यथावकाश रेडिओ सुरू होऊन समालोचन व्यवस्थित सुरू व्हायचं अन् अचानक जमलेल्या १५-२० माणसांचं त्या घरमालकालाही कोडं पडायचं. 'ओह! दॅट्स अ फोर!! अ वंडरफुल स्केअर ड्राइव्ह!!' असं म्हणत समालोचक ओरडला की जमा असलेली सगळी टाळकी 'चौका..चौका' करत आनंदाने ओरडायची. तेव्हा फलंदाजी करणार्‍या फलंदाजाने आपल्या बॅटने चेंडू ठोकत बॉन्ड्रीच्या म्हणजे रेषेच्या बाहेर मारला आहे आणि त्याला एकदम चार धावा मिळाल्या आहेत. अशा प्रकारे 'क्रिकेट' उर्फ बॅटबॉल या खेळातलं माझं ज्ञान वृद्धींगत होत होतं. अन् त्याच वेळी ते ऐकण्याबरोबर खेळण्याकडेही लक्ष लागू लागलं. ७-८ रूपयांना मिळणारा लाल रंगाचा रबरी चेंडू घेण्याची ऐपत नसायची म्हणून मग साठवलेल्या १-२ रूपयातून प्लॅस्टिकचा टणक हिरवा चेंडू अन् तो ही नसेल तर शिंप्याकडून आणलेल्या चिंध्यांपासून बनवलेला चेंडू आणि लाकडाचं 'फळकूट' बनवून वेडं-वाकडं बॅट-बॉल खेळायला सुरूवात केली होती. भारतीय संघांच्या कर्णधारपदी मो. अझरूद्दीन येईतो छतावर उभारणार्‍या अ‍ॅल्युमिनियमच्या ऐन्टिनासकट १४ इंचाची ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट रंगातली ओनिडाची भली मोठी खोकीही तुरळक सर्वसामांन्यांच्या घरात दिसू लागली होती. आत्तापर्यंत फक्त रेडिओवर ऐकलेले धुरंदर फलंदाज आता चेहर्‍यासकट आकाराला येवू लागले होते. नव्या स्थित्यंतराला सुरूवात झाली होती. रेडिओचा दर्दी प्रेक्षक क्रिकेटचा सामना दृश्य स्वरूपात दाखवणार्‍या टिव्ही नावाच्या नव्या चमत्काराकडे वळला होता. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टिव्ही आल्यानंतर त्यावर भारताचा सामना पाहणे म्हणजे एक मोठी पर्वणी ठरू लागली होती. सामना सुरू झाला रे झाला की एकदम टिव्हीसमोरची जागा पकडायची हे प्रत्येकजण मनोमन ठरवायचा, पण प्रत्येकालाच ते शक्य होत नसायचं. भारताची फलंदाजी सुरू व्हायची. सलामीचे नवज्योत सिध्दू आणि मनोज प्रभाकर गेले म्हणजे तिसर्‍या चौथ्या नंबरवर 'एस्.आर.तेंडूलकर' नावाचा कुरळ्या केसांचा, गोरा गोमटा पोरगा एमआरएफचे स्टिकर लावलेली बॅट घेऊन मैदानात उतरायचा. थोडाफार खेळायचाही, कधी कधी ५०-६० धावाही करायचा. पण त्याचं ते खेळणं अजून मनात ठसलेलं नव्हतं. दरम्यान भारत-पाकिस्तान-श्रीलंकेने संयुक्तरित्या विश्वचषक स्पर्धा भरवण्याचे ठरवल्यानंतर भारतात क्रिकेटचे वारे जोरदार वाहू लागले होते. हा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाने केलेले प्रयत्न थोडे कमी पडले. एकूण मालिकेत सचिन तेंडूलकरने केलेल्या ५२३ धावांच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत धडक मारली. यात दोन शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. दुर्दैवाने भारत उपांत्य फेरीचा सामना हरला याची परिणीती भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न धुळीला मिळाले होते. सचिनने केलेली मेहनत वाया गेली होती. विश्वचषक मालिकेत त्याने केलेल्या सर्वाधिक धावा ही एक नांदी होती...पुढे येणार्‍या सुवर्णयुगाची! सचिन तेंडूलकर नावाच्या फलंदाजाची फलंदाजी बघणं आनंदाची पर्वणी ठरू लागलं होतं. त्याच्या खेळातून मनाला एक वेगळाच आनंद मिळायचा. ९६ ते ९८ ही तीन वर्ष सचिन तेंडूलकरच्या फलंदाजीतला सुवर्ण काळ म्हणता येतील अशी होती. लागोपाठ तीनही वर्षी हजाराच्या वर धावा करत त्याने आपल्या फलंदाजीत सातत्य राखले होते. त्याची फलंदाजी सर्वार्थाने बहरली ती याच कालखंडात. ९८ च्या सुरूवातीला शारजात भरलेली तिरंगी कोका-कोला स्पर्धा.! भारताबरोबर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ कोकाकोला कप जिंकण्यासाठी आसूसलेले होते. ऑस्ट्रेलिया त्यांच्या तडफदार(?) खेळामूळे आधीच फायनलला पोचली होती. तर न्यूझीलंडही जवळजवळ पोहचण्याच्या तयारीतच होती, पण सचिनच्या त्या दोन वादळी खेळ्यांमूळे भारत फायनलला तर पोचलाच पण त्याचबरोबर फायनलला ऑस्ट्रेलियाच्या तोंडातला विजयाचा घासही त्याने अक्षरशः हिसकावून आणला. कॅस्प्रोविच, फ्लेमिंग, वॉर्न, लेमन, मुडी या सगळ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची त्याने अशी काय धुलाई केली, की सामन्यात एका क्षणी सगळे ओस्ट्रेलियन अगदी खेळाडू रडवेले झाले होते. सचिनच्या सच्च्या चाहत्याइतकेच भारतातल्या कोणत्याही क्रिकेटप्रेमी माणसाला सचिनच्या सर्वोत्तम खेळींविषयी विचारलं तर क्षणाचाही विलंब न करता तो ९८ च्या शारजा स्पर्धेचा, ऑस्ट्रेलिया संघाचा, मैदानात आलेल्या वादळाबरोबरच या दोन्ही वादळी खेळींचा, आणि वॉर्नच्या केलेल्या धुलाईचा नक्कीच उल्लेख करेल. या स्पर्धेपासूनच माझ्या मनातल्या देव्हार्‍यावर 'सच्या' नावाचा देव विराजमान झाला. या स्पर्धेच्या महिनाभर आधी भारतातल्या तिरंगी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बॉब्वे आले होते. त्या स्पर्धेदरम्यान सच्याची ऑस्ट्रेलियाविरूध्दची आणखी अविस्मरणीय खेळी या लेखाच्या निमित्ताने माझ्या मनात सहज तरळून गेली. ऑस्ट्रेलियाच्या माफक २२२ धावांना प्रत्यूतर देताना सचिनने अवघ्या ८९ चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. यात पहिल्यांदाच त्याने एका डावात सात उत्तुंग षटकार लगावले जे त्या डावातल्या त्याच्या एकुण चौकारापेक्षाही जास्त होते. जबरदस्त!! हा एकच शब्द योग्य होता सचिनच्या या शतकासाठी! कारकिर्दीच्या सुरूवातीपासूनच अनेक गोलंदाजांबरोबर त्याचा सामना रंगला होता. अनेक गोलंदाजांबरोबर बॅटच्या साहाय्याने त्याने केलेली लढाई हा नेहमीच माध्यमांच्या चर्चेचा विषय राहिला होता. गोलंदाज, मग तो शेन वॉर्न असो वा अ‍ॅलन डोनाल्ड, अब्दुल कादिर असो वा शोऐब अख्तर! त्याने सगळ्यांच्याच गोलंदाजीची पिसं काढली. झिम्बॉब्वेच्या हेन्री ओलोंगोबरोबरचं त्याचं द्वंद्व आठवतंय का? ९८ च्याच दिवाळीदरम्यान शारजात भारताच्या सुरूवातीच्या एका सामन्यात सचिनला गोलंदाजी करायला आलेल्या नवख्या ओलोंगाने बॉऊन्सर टाकून सचिनची विकेट काढली. अन् त्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा करतात तसा आनंद मैदानावर नाचून साजरा केला. सच्याला आऊट केला म्हणून त्याला लै म्हणजे लै शिव्या टाकल्या होत्या तेव्हा. झेलबाद झाल्यानंतर माकडासारख्या नाचणार्‍या ओलोंगाकडे बघत मैदान सोडणार्‍या शांत संयमी सचिनच्या चेहर्‍यावर एक निर्धार दिसत होता. एक असा निश्चय, जो त्याच्या पुढच्याच सामन्याला भारतातल्या अख्ख्या क्रिकेटप्रेमींना आणि ओलोंगालाही पाहायला मिळाला. या सामन्यात सचिनने ओलोंगाला असा काही धुतला की बास रे बास! ओलोंगाच्या गोलंदाजीची पिसं काढत ६ षटकात साडेआठच्या सरासरीने ५० धावा कुटल्या गेल्या.!! दिवाळीनंतरची आतषबाजी तिकडे शारजात मैदानावर साजरी झाली होती. कारकिर्दीच्या या सुवर्ण टप्प्यावर असताना शारीरीक व्याधींमुळे आणि ९९ च्या विश्वचषकादरम्यान वडिलांच्या स्वर्गवासामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात फार मोठी हानी झाली. पण अशा खडतर कालखंडातही आपल्या क्रिकेटच्या साधनेत त्याने खंड पडू दिला नाही. इंग्लंडमधल्या विश्वचषकादरम्यान वडिलांच्या जाण्यामुळे स्पर्धा अर्धवट टाकूनच त्याला भारतात परत यावे लागले. अंतिम कार्य उरकल्यानंतर पुन्हा स्पर्धेत जाण्याचा त्याचा निर्णय सगळ्यांना आश्चर्यचकीत करणारा होता. पण त्या ही परिस्थितीत मनावर भलीथोरली जखम घेऊन केनियाविरूध्दच्या सामन्यात तो पुन्हा मैदानावर उतरला आणि आपल्या सुरेख फलंदाजीने स्वर्गीय वडिलांना एक आगळी वेगळी श्रध्दांजली देऊन गेला. सचिन तेंडूलकरला त्याच्या सर्वोत्तम खेळींविषयी विचारले असता, २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत सेंच्युरीयनवर पाकिस्तान विरूध्दच्या उपांत्य सामन्यात केलेल्या ९८ धावांचा तो आवर्जून उल्लेख करतो. या सामन्यापर्यंत विश्वचषकात पाकिस्तान विरूध्द न हारण्याची भारताची अजेय परंपरा सचिनच्या त्या ९८ धावांमुळे इथेही कायम राहीली. पाकड्यांच्या पावणे तीनशे धावांचा पाठलाग करताना शोएब अख्तरला मारलेला अप्पर कट निव्वळ म्हणजे निव्वळ अप्रतिम! डोळ्याचं पारणं फिटावं इतका तो फटका सुंदर होता. फ्लिक, पुल, स्क्वेअर ड्राईव्ह, हुक, स्ट्रेट ड्राईव्ह या प्रमुख शस्त्रांप्रमाणेच आत्तापर्यंत न पाहीलेलं सचिनच्या भात्यातलं एक सुंदर शस्त्र होतं ते!! सचिनच्या श्रेष्ठत्वाचा दाखला देणारं त्या सामन्यातलं विरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तरच्या संभाषणाचा किस्सा वीरूच्या तोंडून अलिकडेच ऐकायला मिळाला होता, तसेच काही लेखात वाचायलाही मिळाला होता. २४ फेब्रुवारी २०१०! सख्खा मामा किडनीच्या दुखण्यामूळे इस्पितळात अगदी शेवटच्या घटका मोजत होता. डायलिसिसवर ठेवलं होतं त्याला! संध्याकाळी त्याला पाहायला गेलो तेव्हा अतिशय वेदनादायी परिस्थितीत इस्पितळातल्या खाटेवर कण्हत पडला होता. प्रचंड दु:ख होत होतं मनात, त्याला त्या स्थितीत पाहताना. तशाच रडक्या चेहर्‍याने इस्पितळाच्या बाहेर पडलो. वाटेत एका हॉटेलबाहेर भरपूर गर्दी जमली होती म्हणून उत्सूकतेपोटी पाहायला गेलो तो हॉटेलातल्या टिव्हीवर भारताचा सामना सुरू होता. १९० पार करून सचिन एका विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर उभा होता. समोर दक्षिण अफ्रिकेसारखा बलाढ्य संघ.! एक एक धाव काढत हळूहळू त्याने सईद अन्वरचा १९६ धावांचा विक्रम मागे टाकला आणि द्विशतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. अखेर लॅन्ग्वेल्टच्या बाहेर जाणार्‍या चेंडूवर पॉईन्टच्या दिशेने सचिनने चेंडू मारला आणि....ऐतिहासिक क्षण!!! एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणारा तो जगातला पहिला फलंदाज बनला. मनातल्या दु:खाला त्याच्या द्विशतकाने मिळालेला थोडासा दिलासा हा शब्दांपलिकडचा होता. सुख आणि दु:खाच्या अजब हिंदोळ्यावर झोके घेत, द्विधा मनस्थितीत मी त्या गर्दीतून बाहेर पडलो. भारतीय क्रिडा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा 'सचिन तेंडूलकर' नावाचा खेळिया त्याच्या उच्च दर्जाच्या खेळाने तो पाहणार्‍याला एक अवर्णणीय आनंद देत आणि आपलंस करत अखेर २६ नोव्हेंबर २०१३ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि एका भारतीय संघातल्या एका सुरेख पर्वाची सांगता झाली. मैदानाबरोबरच मैदानाबाहेरच्या शांत आणि संयमी वाहण्यातून त्याने अनेक खेळाडूंना वस्तूपाठ घालून दिला. एकदिवसीय सामन्याबरोबर, पाच दिवसांच्या पारंपारीक खेळात सच्च्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले. येत्या काळात काही विक्रम कदाचित मोडतीलही, तर काही अबाधित राहतील. पण त्याच्या चाहत्याच्या मनातील 'या सम हाच' ही भावना मात्र चिरंतर राहील! *आजच्या ४१ व्या वाढदिवशी माझ्यातर्फे त्याला अनेकानेक शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
समाज
जीवनमान
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
शुभेच्छा
अनुभव

प्रतिक्रिया द्या
28089 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

आवडलं लिखाण

चाणक्य
Mon, 04/28/2014 - 00:19 नवीन
छान लिहीलय
  • Log in or register to post comments

मस्त लेख

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/28/2014 - 09:10 नवीन
साऊथ अफ्रिकेविरुद्ध जेव्हा सच्याने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा २०० धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता तेव्हा रवी शास्त्री म्हणाला होता "टेक अ बो मास्टर" तेव्हा आलेले शहारे अजुनही आठवतात. या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!! टेक अ बो मास्टर __/\__!!
  • Log in or register to post comments

दुश्मन ना करे दोस्त ने जो काम किया है|

सुहासदवन
Mon, 04/28/2014 - 10:37 नवीन
या माणसाला थांबवणे हे अफ्रिकेच्या गोलंदाजांना केवळ अशक्य झाले होते!! पण त्याच वेळेला पिचच्या दुसर्‍या टोकाकडून अल्टिमेट मि. अप्पॉर्चुनिस्ट म्हणजे धोनी, हा सचिनला स्ट्राईक न देता स्वतः चौकार मारत बसला होता आणि सचिनचे दुहेरी शतक चुकते की काय असे वाटू लागले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर लेख! मी सचिनचा

श्रीगुरुजी
Mon, 04/28/2014 - 14:54 नवीन
सुंदर लेख! मी सचिनचा पहिल्यापासूनच भक्त आहे. गावसकर निवृत्त झाल्यावर रिकामा झालेला कोनाडा सचिनने भरून काढला होता. आता सचिन निवृत्त झाल्यावर अजूनतरी नवीन देव सापडलेला नाही.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलाय

एक एकटा एकटाच
गुरुवार, 01/28/2016 - 03:21 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा