फणसाच्या आठ्या आणि सोडे.

गणपा's picture
गणपा in पाककृती
27 Apr 2014 - 7:58 am

ध्यानी मनी नसताना आणि फणसाचा हंगाम नसतानाही या एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच फणस खायला मिळाला. फणसाच्या रसाळ गर्‍यांच्या जोडीने त्यांच्या आठ्या (बीया) ही आमच्या घरात सगळ्यांना प्रिय आहेत. नुसत्या उकडुन आणि वरुन थोडंसं मीठ भुरभुरुन उत्तम लागतातच पण मला त्या नुसत्या उकडुन खाण्यापेक्षा सुकट टाकुन केलेल्या कालवणात जास्त आवडतात. यावेळी येताना आईने आठवणीने सोडे दिलेत.

साहित्य :

फणसाच्या आठ्या सोललेल्या.

सोडे, गरम-कोमट पाण्यात १५-२० मिनीटे भिजवलेले.

प्रत्येकी २ मध्यम आकाराचे कांदे, बटाटे, टॉमेटो, वांगी.
आवडत असल्यास भिजवलेले वाल (सालां सकट.)

२ मोठे चमचे तेल, १ लहान चमचा हळद, ३ मोठे चमचे मसाला, मीठ चवी नुसार.
चिंचेचा कोळ. १-२ चमचे आलं-लसुण वाटण.
२-३ मोठे चमचे तांदळाची पीठी.

कृती :

आठ्या हलकेच ठेचुन, एका शिट्टिवर उकडुन घ्याव्या.

तेलावर कांदा परतुन घ्यावा. गुलाबी झाला की त्यात आलं लसुण वाटण, हळद, मसाला, किंचीत मीठ टाकून, मसाल्याचा खमंग वास दरवळे पर्यंत परतत रहावं.

मसाला तेल सोडू लागला की त्यात वाल आणि बटाटे टाकुन परतावं. थोडं पाणी टाकून भांड्यावर झाकण ठेऊन मध्यम आचेवर बटाटे आणि वाल शिजू द्यावे.

वाल शिजले की मग वांगी आणि टॉमेटो टाकावे. वांगी अर्धवट शिजली की मग भिजवलेले सोडे आणि उकडलेल्या आठ्या टाकाव्या. आच लहान करुन वांगी शिजू द्यावी. वांगी शिजली की मग चिंचेचा कोळ टाकून एक उकळी आणावी. चवी नुसार मीठ घालावं.
तांदळाची पीठी अर्ध्यावाटी पाण्यात मिसळुन टाकावी. परत एक उकळी आणावी आणि आचं बंद करावी.

याच्या जोडीला मसाला फ्राय सुके बोंबील हे हवेच.

तांदळाच्या भाकरी सोबत वा भाता बरोबर गरमागरम ओरपावे.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 Apr 2014 - 9:28 am | मुक्त विहारि

झक्कास..

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Apr 2014 - 9:56 am | डॉ सुहास म्हात्रे

लै भारी.

हे आवडते पदार्थ आहेत, पण सोड्याच्या कालवणात वाल टाकलेले पहिल्यांदाच पाहिले.

आठ्या + वाल + सोडे, मसाला फ्राय बोंबिल आणि तांदळाची भाकरी! - स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच काय? :)

छान आहे पाक्रु पण मला मसाला फ्राय सुक्या बोंबलाची पाक्रु हवी आहे .....

दिपक.कुवेत's picture

27 Apr 2014 - 11:08 am | दिपक.कुवेत

हा रस्सा तर कर आणि मग सुक्या बोंबलाची पाकॄ माग.

यशोधरा's picture

27 Apr 2014 - 10:24 am | यशोधरा

वा! मस्त!
बदडा रे ह्या गंपाला!

खटपट्या's picture

27 Apr 2014 - 10:34 am | खटपट्या

आठ्या कि आठ्ल्या ?

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 2:26 pm | तुमचा अभिषेक

आमच्याकडे, (की मीच एकटा माहीत नाही) याला गोट्या बोलतो. लहानपणी खूप खाल्लेत, आता मात्र वर्षातना एकदाच नशिबी येतात. :(

दिपक.कुवेत's picture

27 Apr 2014 - 11:07 am | दिपक.कुवेत

पाहुनच तोंडाला पाणी सुटलयं. सालां सकट वाल घालण्याएवजी मोड आलेले वाल (डाळींब्या) घातल्या तर?? कारण सालासकट वाल खाल्ले तर शेवट सालींचा चोथा तोंडात रहायची शक्यता आहे ना?

पिंगू's picture

28 Apr 2014 - 12:12 pm | पिंगू

अरे ते ओले वाल आहेत. तुझा प्रश्न सुक्या वालांच्या बाबतीत येईल. सुके वाल भिजवून, मोड आणून आणि सोलून घातल्यास तेही छानच लागतील..

आमच्याकड कदी फणस मिळेल अस वाटल नाय . पण काल बाजारात दिसल . त्याची साईज बगुन घ्यावा की नाय घ्याव विचार करतोय . बर फणस किती दिवस टिकत ? चांगल्या फणसाचे लक्षण काय ?

स्पंदना's picture

27 Apr 2014 - 2:32 pm | स्पंदना

अरे देवा!
काय ते फोटो! काय ते पदार्थ! अस कोण सुकट करणारं आहे का? मी जरा जाउन,चार दिवस राहुन, खाउन पिउन, धाटी मोती होउन यावी म्हणतेय. (आमच्या घरात कोणीच खात नाही सुकट :( )

भावना कल्लोळ's picture

28 Apr 2014 - 4:36 pm | भावना कल्लोळ

अपर्णे …. कधी येतेस? चांगली माझ्यासारखीच करून पाठवते तुला. सुकट माझा हि जीव कि प्राण आहे. गणपाभाऊ .... रेसिपी मस्तच.

स्पंदना's picture

29 Apr 2014 - 2:32 pm | स्पंदना

चला! धाटी मोटी व्हायला जाते.
सोय झालेली आहे.
आलेच बघ भावना.

प्यारे१'s picture

29 Apr 2014 - 3:56 pm | प्यारे१

सध्या आमच्याकडं 'चल रे भोपळ्या टुणुक्टुणुक' ही गोष्ट साभिनय सुरु असते.
तीच आत्ता आठवली.

'भावनाकडं जाईन, सुकट बिकट खाईन, जाडजुड होईन मग मला खा' असं म्हणणारी (म्हातारी)आप्पातै!

पदार्थ अनवट वाटला तसेच तोंपासु . खासच चव असणार नि:संशय!!!

प्रभाकर पेठकर's picture

27 Apr 2014 - 4:24 pm | प्रभाकर पेठकर

आठ्या? आम्ही आठळ्या म्हणतो.

अतिंम पदार्थ अगदी झकास दिसतोय (म्हणजे चवीलाही असणारच).

सध्या वेळ नसल्याने 'पास' पण एकदा करून पाहिला पाहिजे.

अस्मी's picture

27 Apr 2014 - 8:49 pm | अस्मी

आम्ही पण आठळ्याच म्हणतो :-)
पाकृ एकदम मस्स्त!!!आणि तो पहिला आठळ्यांचा फोटो खतरनाक. ..थेट आठळ्या समोर असल्यासारखेच वाटले

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2014 - 5:26 pm | अत्रुप्त आत्मा

आता लक्ष्य एकच!
मि.पा.खाद्य मोहोत्सव...!
मि.पा.खाद्य मोहोत्सव...!
मि.पा.खाद्य मोहोत्सव...!

हे पदार्थ चांगले दिसतायत पण शाकाहारींसाठी नुसत्या अठळ्यांचा पदार्थ असल्यास द्यावा ही शेफ गणपा यांना विनंती.

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2014 - 8:54 pm | प्रसाद गोडबोले

आम्ही फणसाचा आठ्या नुसत्या उकडुन मीठ लावुन खातो ... गणपाराव एखादी शाकाहारी(पक्षी: घासपुस वाली ) पाककृती सुचवा ना !

सानिकास्वप्निल's picture

27 Apr 2014 - 9:46 pm | सानिकास्वप्निल

काय झक्कस पाकृ आहे :)
आतापर्यंत दुधी-सोडे, वांगी-बटाटा-सोडे, सुका जवळा भरुन वांगी+बटाट्याचे कालवण आवडीने खाल्ले आहे पण आठळ्या आणी वाल घालून कधी ट्राय केले नाही...नवीनच पाकृ समजली.

फोटो बघून तोंपासु.

आता आठळ्यांसाठी आधी गरे शोधणे आले....

अगदी वेगळी आणि चविष्टं पा. कृ.
करायला हवी.. पण वांगी घातली नाही तर चालतील का ?

बाळ सप्रे's picture

28 Apr 2014 - 10:40 am | बाळ सप्रे

वा!!
सोडे आणि वांगी वगळून करुन बघणार.. शेवटी दिलेला प्रकार बोंबलाच्या जागी वांग वापरुन करता येइल..

मी फक्त सोडे वगळून बाकी मस्त भाजी बनवेन..

सुहास..'s picture

28 Apr 2014 - 12:31 pm | सुहास..

क्लास !!

सर्व श्री/सौ मुवि, एक्का काका, यशो, अभिषेक, शुचि, पेठकर काका, अस्मी, बुवा, जेपी, बाळ सप्रे, सुहास आपल्या अभिप्रायाबद्दल आभर.

@ नंदन अगदी अगदी, काल स्वर्गवासीच होतो. ;)
@ जेनी व्यनिला उत्तर दिलं आहे.
@ खटपट्या हो आठल्या ही म्हणतात. मैला गणिक भाषेत थोडाफार फरक पडत जातो, आपल्या इथे आठ्या हाच शब्द लहान पणापासुन कानावर आलाय. :)
@ दिपक, सालांसकटच्या वालामध्ये जी मजा/चव आहे ती डाळींब्यांमध्ये येणे नाही. वाल संपुर्ण शिजले की कसलाही चोथा उरत नाही. :)
@ पिंगू, मी ओले वाल नाही तर कडधान्य भिजवून ते घेतलेत. ओले वाल (कडवा वाल/ वाल पापडी) जर उपलब्ध असले तर उत्तमच.
@ अपर्णा ताय ये की माहेरपणाला. :)
@ रेवती/प्रसाद/पिंगू हाच पदार्थ सोडे वगळुन करावा. फक्त सोड्याची चव काय ती उतरणार नाही पण बाकी चव फक्कड असेलच याची गॅरंटी.
@सानिकास्वप्निल वाल आणि सुकट भन्नाट काँबो आहे तेही ट्राय करुन पहा.
@मनीषा, वांगी आवडत नसल्यास वगळली तरी चालेल.

     कडवा वाल.

वाल पापडी.

वरील चित्रे जालावरुन साभार.

प्यारे१'s picture

28 Apr 2014 - 1:54 pm | प्यारे१

कडवा वाल म्हणजेच 'पावटा' का? आम्ही त्या फोटोतल्या जिन्नसाला पावटा म्हणतो.

ते आमी वशाटाचं खायत न्हाय म्हणून गप बसलेलो. पण आता गणपाच्या बैलाला नेहमीप्रमाणेच हो....!

येस तोच. पोपटी करताना वापरतात तो.

प्रचेतस's picture

28 Apr 2014 - 2:00 pm | प्रचेतस

आइंग.
कडवे वाल म्हणजे बिरडे ना रे?
आम्ही त्यालाच कडवे वाल म्हणतो.

याच पोपटीतल्या बीया नंतर सुकवून त्याचं कडधान्यं बनवतात.
तेच ते बिरडे.

प्रचेतस's picture

28 Apr 2014 - 2:45 pm | प्रचेतस

ओह्ह. ओके.
धन्स रे.

होय वालाचं बिरडं खासच लागतं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2014 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. डावीकडच्या फोटोत दिसताहेत त्या वालाच्या शेंगा. (जाणकार असल्याशिवाय आणि सोलल्याशिवाय वालाच्या आणि पावट्याच्या शेंगा एकमेकापासून ओळखायला जरा कठीणच !)

२. तयार झालेल्या शेंगा सोलून काढलेले वाळविलेले दाणे म्हणजे वाल.

३. वालाच्या शेंगा मडक्यात भरून, मडक्याचे तोंड भांबूर्डीच्या पानाने बंद करून ते जमिनीतल्या खड्ड्यात उलटे ठेवून त्याच्यावर शेकोटी केली की शेंगा त्यांच्या अंतर्गत रसात उकडल्या जातात आणि त्यांना भांबुर्डीचा जरासा तिखटसर वास व स्वाद येतो... ही झाली पोपटी. पोपटीतल्या शेंगातले वाल ताज्या कोवळ्या नारळाच्या खोबर्‍याबरोबर फक्कड लागतात. पोपटी करताना मडक्यात बटाटे, रताळी, कधी कधी चिकन, इ ही ठेवतात. कोकणात पोपटी ही देशावरच्या हुरडा पार्टीसारखी फेमस आहे !

४. वाळलेले वाल २-३ दिवस पाण्यात भिजवून त्याची साले काढून टाकली की मिळते ते बिरडे / डाळिंब्या. ते शिजल्यावरही त्यांना बिरडे / डाळिंब्या च म्हणतात. आमच्या घरी रस्साभाजी असेल तर त्याला बिरडे म्हणतात, सुकी भाजी असेल तर डाळिंब्या म्हणतात.

५. वाळवलेले वाल तूर, चणे, इ प्रमाणे भरडून साल काढून वालाची डाळ बनवली जाते. भिजवणे, सोलणे इ ना काट मारून झटपट बिरडे (रस्साभाजी) बनवायला तिचा उपयोग होतो. पण ही पद्धत इतकी जास्त प्रचलीत नाही कारण त्यांत पूर्ण डाळिंब्या बरोबर भरपूर चुरा पदरात पडतो. सहसा टपोरे वाल वेगळे केल्यावर उरलेल्या वालांचे असे बायप्रोडक्ट बनवले जाते ;) . या दोन कारणांमुळे पट्टीचे वालखाऊ असे बिरडे जरा नाराजीनेच खातात :)

॥ अथ वालपुराणम् संपुर्णम् ॥

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2014 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

कडवा वाल म्हणजेच 'पावटा' का?
ही एकाच कुटुंबातली पण वेगळी व्दिदल कडधान्ये आहेत. कडवा वाल आकाराने किंचीत लहान असतो. वाळल्यावर वालाच्या सालाचा रंग लाल-तपकिरी होतो तर पावट्याचा पांढरा होतो. चविला साधारण तसेच असले तरी वालाला एक खास स्वाद असतो त्याची सर पावट्याला नाही.

इरसाल's picture

28 Apr 2014 - 1:37 pm | इरसाल

कोणी सोडे मला दुधात घालुन किंवा शेपुच्या भाजीत जरी घालुन दिले तरी चालतील.
आता इथे सोडे कुठे शोधु ?
पाकृ छान, आज अंबाडी सुकट करावी म्हणतो.

राही's picture

28 Apr 2014 - 2:58 pm | राही

कडवे वाल, सफेद वाल, लाल वाल असे तीन चार प्रकार असतात. कडवे वाल जरासे कडसर असतात आणि त्यांना भिजून मोड यायला अधिक वेळ लागतो. सफेद वाल पट्कन भिजतात आणि सोलायला फारसा त्रास देत नाहीत. हे चवीला कडू नसतात. मला वाटते ह्या सफेद वालांतसुद्धा दोन प्रकार असावेत. एक जाड सालीचे आणि दुसरे पातळ सालीचे. मोड न आणता भिजवलेले पातळ सालीचे सफेद वाल न सोलता सरळ भाजीत घालता येतात किंवा त्यांचीच उसळ करता येते. मोड आणून सोललेल्या कडव्या वालांना बिरडे किंवा डाळिंब्या म्हणत असावेत. पण वालांची सुकवलेली आणि साले काढलेली डाळ भिजवून केलेल्या प्रकारासही डाळिंब्यांची उसळ म्हणत असावेत. अलीकडे लग्नात आवर्जून मराठमोळे जेवण ठेवण्याची टूम्/स्टाईल्/फॅशन आहे. अशा जेवणात पुष्कळ वेळा ही उसळ असते. (टिपिकल प्रादेशिकता आणण्यासाठी अनसाफणसाची भाजी, भरली वांगी, काळ्या वाटाण्याचे सांबार, तांदुळपिठाच्या उकड काढून केलेल्या भाकरी असा जंगी म्हणजे कठिण म्हणजे खायला कठिण मेनू ठेवतात. कारण धड कशाचीच चव जमलेली नसते.) बरोबर एखादा मेक्सिकन, इटालिअन पदार्थ, चाट, वेगवेगळे इवलेइवले दोसे वगैरे अष्टरंगी कॉम्बिनेशन असते. थाई नारळकढी सुद्धा यातच घुसडलेली असते. असो.

अनन्या वर्तक's picture

28 Apr 2014 - 10:17 pm | अनन्या वर्तक

नेहमीप्रमाणेच वेगळी व छान पाककृती. वालाचे इतके सारे प्रकार पाहून बराच गोंधळ उडालेला आहे.

सुहास झेले's picture

29 Apr 2014 - 1:17 am | सुहास झेले

जीवघेणी पाककृती.... गणपा द ग्रेट _/|\_

राही's picture

29 Apr 2014 - 3:21 pm | राही

पोपटी हा शब्द 'फुफाटी' ह्या शब्दावरून आला असे शंकर सखाराम यांनी लिहिले आहे. पोपटी केली म्हणजे खरे तर फुफाटी केली. फुफाटी म्हणजे अर्थातच छोटा फुफाटा.

आरोही's picture

29 Apr 2014 - 8:01 pm | आरोही

आमच्या समोरचे मालवणी कुटुंबाकडे असतो हा पदार्थ ..माझा लेक आवडीने खातो ..

पैसा's picture

29 Apr 2014 - 8:09 pm | पैसा

मस्त पाकृ आणि फोटो कातिलाना!

शाकाहारी लोकांनी सोड्यांच्या ऐवजी काजूगर घालून ट्राय करा.

राही's picture

30 Apr 2014 - 7:53 am | राही

ह्यातला 'मसाला' म्हणजे नुसती तिखटपूड असते की त्यात आणखी काही जिन्नस मिसळलेले असतात?

आमच्याकडे वर्षाचा मसाला एकदाच दळून ठेवतात. त्याची कृती जागू यांनी मिपावर दिली आहे.
http://www.misalpav.com/node/20012
विषेशतः मासे आणि इतर सामिष पदार्थांसाठी वापरला जातो.

सर्व वाचक/प्रतिसादकर्त्यांचे आभार.

घरी सोडे आहेत. आता करुन बघते.

संदीप चित्रे's picture

30 Apr 2014 - 6:30 pm | संदीप चित्रे

असे पदार्थ इथे देऊन तूच आपण भेटल्यावर करून द्यायच्या पदार्थांची यादी वाढवतोस रे !
दुसरे म्हणजे नू जर्सीला स्थलांतर करायचे मनावर घे :)
भन्नाट रेसिपी!!!