2. महागात पडले बॉससाठी पीक कॅपची धावाधाव करणे! - हरवले ते गवसले का?
हरवले ते गवसले का? व कसे?
प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो.
काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से... काही हवाईदलात असताना काही त्या नंतर... एक एक करून लिहावे आणि आपल्या जीवनात असे काही घडले असेल तर आठवून त्याची उजळणी वाचकांनी करावी. ही विनंती.
----
2. महागात पडले बॉससाठी पीक कॅपची धावाधाव करणे!
गोष्ट जुनी. मी तेंव्हा हवाईदलात नुकताच सामील झालो होतो. पगार वाटपाचे काम हे माझ्या कामाचा महत्वाचा भाग होता. त्याकाळी संपुर्ण स्टेशनभरच्या एयरमन व अन्य सिव्हिलियन्स सर्वांना पगार रोखीने वाटला जाई. आजकाल तो ज्याच्या त्याच्या बँक अकौंटमधे जमा होतो. लाखो रुपयांची उलाढाल होत असे. स्टेशनभरात चाळीस पे पॉईंट्स मधून रोख पैशाच्या थैल्या आदल्या दिवशी तयार करून ठेवाव्या लागत. असाच जुलै 1972 च्या पगाराचा दिवस 31 जुलै उगवला. तो माझा वाढदिवस असल्याने मी हस्तांदोलनासह 'हॅप्पी बर्थ डे' च्या अभिष्टचिंतनाला अभिवादन करून जरा खुशीत होतो. मला ‘बच्चा’ मानून पगाराच्या वाटपातील त्यातल्या त्यात सोपे व कमी जोखमीचे म्हणून ऑफिसर्सना पगार वाटपाला बसवले होते. प्रत्येकाची पे पॅकेट्स तयार केली गेली होती. मला पगार पत्रकावर त्या ऑफिसरची सही घेऊन त्याचे पॅकेट हवाली करायचे असा प्रघात होता. काम चालू झाले. अनेक ऑफिसर मला प्रथमच पहात होते तर काहींच्या बोलण्यातून माझा वाढदिवस असल्याचे समजल्यावर ते परतून शुभेच्छा द्यायला येत होते. त्यांच्या त्या वर्तनाची छाप माझ्यावर पडत होती. काही ऑफिसर ज्यांची पॅकेट्स तयार केली गेली नव्हती अशांसाठी काही पैसे मला दिले गेले होते त्यांना पैसे वाटपासाठी मी त्वरेने कामाला लागत होतो. त्याच दिवशी वीस रुपयांच्या शेंदरी रंगाच्या कोऱ्याकरकरीत नोटा पाहून ऑफिसरांची त्या मिळवायसाठी शंभराच्या नोटा देऊन त्याच्या बदल्यात विसाच्या नव्या नोटा मिळवायची घाई होत होती. मी ते पैसे देताना एकदा, दोनदा मोजून माझ्या सहाय्याला दिलेल्या एयरमनने ते नंतर पुन्हा मोजून देत होतो. असे सगळे सुरळीत चालले असताना आमचे वरिष्ठ लेखा अधिकारी विंग कमांडर नायर मी कसे काय काम करतोय याकडे लक्ष द्यायला माझ्याजवळ आले. तितक्यात त्यांना कमांडींग ऑफिसरांचा 'ताबडतोब भेटायला या' असा निरोप आला. त्यांच्याकडे तेंव्हा पीक कॅप जवळ नव्हती. गडबडीत जायचे ठरले म्हणून त्यांनी मला बोलावून माझी पीक कॅप मागितली. पण ती मी रूमवर ठेवली होती. ‘तुझी ऑफिसर्स मेस मधली खोली जवळच आहे म्हणून जाऊन पटकन आण’ असा हुकूम दिला. मी तरातरा रूमवर गेलो व धापा टाकत परत येत कॅप बॉसच्या हवाली केली. मला धन्यवाद देत मला म्हणाले, ‘तुझ्या करता मी उभा राहून तुझे पगार वाटपाचे काम केले आहे. मी ‘थँक्यू सर’ म्हणून खूष होत म्हटले... काम संपत आले तेंव्हा सर्व पे पॉईंट्समधून पैसे परत यायला लागले. मला ही आता आवरा असा आदेश मिळाला. मी उरलेले पैसे मोजून हिशोब करत राहिलो. उरलेल्या पैशाचा हिशोब लागेना. परत परत मोजूनही कमी पडणाऱ्या रकमेचा मेळ बसत नव्हता! तोवर माझे अन्य लेखा अधिकारी, ‘काय रे काय भानगड आहे?’ असे विचारत मदतीला आले. शेवटी असे ठरले की ‘कमी पडलेले पैसे तुला खिशातून भरायला हवेत!’ असे प्रेमळ भाषेत सांगत माझ्या पहिल्या पगारातून जड मनाने मी ते पैसे खिशातून परत भरायला लागलो. ती रक्कम म्हणजे माझ्या महिन्याच्या पगाराचा अर्धा भाग होता! शिवाय वाढदिवसाची पार्टी पण करायची होती! म्हणून विशेष वाईट वाटले. वरिष्ठ ऑफिसर्स ‘अरे असे होते अधून मधून! आपल्या कामाचा तो एक धोकादायक भाग आहे. आता यातून धडा शीक!’ वगैरे डोस पाजून घरी गेले.
‘सर, तुम्ही कॅप आणायला गेल्यावर बडे साबनी मला ‘मी बघतो. तू थांबला नाहीस तरी चालेल’ म्हणून सांगितले मग मी तुम्ही येईपर्यंत त्यांनी पैसे देताना मी मोजले नाहीत. मला मदत करणारा हळूच म्हणाला. पीक कॅप आणण्याची धावाधाव अशी मला महागात पडली होती! उरलेल्या दोनशे रुपयांकडे पहात मी हवाईदलातील माझे काम म्हणजे पैसे हरवण्याची टांगती तलवार डोक्यावर घेऊन केलेली तारेवरील कसरत आहे याचा झणझणीत हिसका बसला... पैसे मिळाले नाही पण आयुष्यभराचा धडा मात्र मिळाला!
वाचने
6849
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
प्रतिक्रिया
ह्या... :(
In reply to ह्या... :( by आत्मशून्य
हवाई दलात चिंदीचोर? की...
In reply to हवाई दलात चिंदीचोर? की... by शशिकांत ओक
मुळात गहाळ झालेली, गमावलेली
मला हि असा अनुभव आला आहे,
In reply to मला हि असा अनुभव आला आहे, by खटपट्या
काय अनुभव?
In reply to काय अनुभव? by शशिकांत ओक
लिहायचा प्रयत्न केला आहे
In reply to लिहायचा प्रयत्न केला आहे by खटपट्या
वाचला
त्याला माहित नसावे...
पीक कॅप बॉस विसरला ही त्याची
मी पण लष्करात( आर्मीत) पगार
In reply to मी पण लष्करात( आर्मीत) पगार by सुबोध खरे
जर माझी निकड निकड नाही तर
In reply to जर माझी निकड निकड नाही तर by आत्मशून्य
तिरसट नव्हे खमके
In reply to मी पण लष्करात( आर्मीत) पगार by सुबोध खरे
आपले म्हणणे खरे आहे.
मिले सुर मेरा तुम्हारा...
इकडे आड नी तिकडे विहिर .
छान लेख