✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रवास

प
पैसा यांनी
Fri, 03/28/2014 - 10:55  ·  लेख
लेख
बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते. आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं. तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे, जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो. स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं. मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली. रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं. एक पाणचट चहा पिऊन झाला. शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली. जनरलच्या डब्यात आधीपासूनच उभे असलेले लोक पाहिले आणि हे आपलं काम नव्हे याची खूणगाठ बांधत स्लीपरच्या डब्याकडे धाव घेतली. ४/५ डबे मागे चालत गेल्यावर एका डब्यात एक अख्खं बाक रिकामं दिसलं. टीसी येईपर्यंत बसून घेऊ म्हटलं, आणि काही मिनिटांतच टीसीसाहेब अवतीर्ण झाले. आमच्याकडे जनरलचं तिकीट आहे आणि फरकाचे पैसे भरून बर्थचं तिकीट दिलंत तर उपकार होतील असं सांगताच त्यांनी इतर काही बिनापावतीचे इ. सूचक वगैरे न बोलता पावती फाडून हातात ठेवली आणि बर्थ क्रमांक १,२ वर बसा म्हणाले. आता अधिकृतपणे आमच्या झालेल्या सीटखाली हातातली बॅग टाकली. चपला काढून पाय वर घेऊन मांडी ठोकली आणि अंग सैल सोडलं. तिकिटाचा यक्षप्रश्न सुटल्यानंतर कंपार्टमेंटमधल्या इतर मंडळींकडे आपसूकच लक्ष गेलं. समोरच्या सीटवर एक टिपिकल मंगलोरी 'पेढा' आणि त्याची नवथर बायको बसले होते. खूपच तरूण दिसत होते. दोघांची चेहरेपट्टी आणि ठेवण बरीच एकसारखी. बहुधा जवळच्या नात्यातले असावेत आणि आता नवपरिणीत. ते त्यांच्या विश्वात अगदी गुंग होते. बायको लहान मुलासारखी लहान सहान हट्ट करत होती आणि पेढ्याला त्यात फारच मजा येत असावी असं दिसत होतं. त्यांचं कन्नड बोलणं थोडफार कळत असलं तरी मी कळत नसल्याचा आव आणला. त्यांच्या बाजूला सगळ्यात वरच्या बर्थवर एक माणूस डोक्यावर पांघरूण घेऊन गाढ झोपला होता. सात साडेसात वाजता इतका गाढ कसा काय झोपला हा म्हणून विचारात पडले. पलिकडच्या सीटवर एक पोरगेला दिसणारा उंच तरूण बसला होता. थोड्याच वेळात त्या सीटवर एक कुटुंब येऊन बसलं आणि हा पोरगा आमच्या सीटवरच्या राहिलेल्या तिसर्‍या जागी सरकला. माझ्या नवर्‍याने त्याच्याशी जरा हसून बोलायला सुरुवात केली तसा तो घडाघडा बोलायला लागला. कारवारला नेव्हीत आहे, २० वर्षांचा आहे, पश्चिम बंगालमधे कलकत्त्याच्या पुढे कुठेतरी गाव आहे आणि अचानक सुटी मिळाल्याने निघालो आहे. इ. माहिती त्याने पहिल्या ३ मिनिटांत सांगून टाकली. त्याच्याकडे पाहताच हा एवढासा दिसणारा मुलगा नेव्हीत आहे या गोष्टीचं खरंतर हसूच येत होतं. पण त्याने लगेच एसीची नेव्हीसाठी काढलेली तिकिटेच काढून दाखवली. कारवार-मुंबई, मुंबई-कलकत्ता आणि तिथून आणखी पुढे कुठेतरी जायची तिकिटं. मात्र कन्फर्म्ड तिकीट नसल्याने त्याला एसीतून बाहेर काढले होते म्हणे. माझा नवरा त्याच्याशी आणखीही गप्पा मारत होता. मी खिडकीतून बाहेर नजर टाकली. झाडे घरे हळूहळू काळोखात गडप होत होती. एकदाचं खास रेल्वेच्या चवीचं जेवण जेवून झालं. म्हणेपर्यंत गाडी कणकवलीला येऊन थांबली. ते कुटुंब तिथे उतरून गेलं आणि आणखी दोघेजण येऊन झोपून गेले. आमच्या कंपार्टमेंटमधे एकजण येऊन हातातल्या तिकिटाकडे पाहू लागला. सगळ्यात वरच्या बर्थवर झोपलेल्या महाशयांना भरपूर हलवल्यानंतर ते उठले आणि आपल्या खिशातलं तिकीट काढून दाखवायला लागले. हा नवा आलेला माणूस म्हणे, "अहो माझं कन्फर्म्ड तिकिट आहे. तुमचं तिकीट कन्फर्म्ड कुठे आहे?" तो आधीचा म्हणतोय, "मला एसेमेस आलाय पण!" शेवटी त्याने आपला एसेमेस दाखवला. बघितलं तर Sl हे त्याने S1 असं वाचलं होतं आणि आणि त्यापुढचं S6 म्हणजे ६ नंबरचा बर्थ समजला होता. मग त्याची रीतसर S6 मधे ४८ नंबरच्या सीटवर रवानगी झाली आणि नवा आलेला त्याच्या जागी झोपून गेला. जरा वेळाने टीसी साहेबांनी येऊन या नव्या माणसांची त्यांना झोपेतून उठवून रीतसर चौकशी केली. नेव्हीतल्या पोराला "तेरे पास कन्फर्म्ड टिकट नही है ना, अभी अगले स्टेशन पर दूसरे लोग आएंगे तब तुम्हे उतार दूंगा" असा दम भरला आणि एक डोळा मिचकावत हसले. पुढच्या स्टेशनावर स्वत: टीसी साहेबांचीच ड्युटी संपणार होती. "क्या करें साब, हम लोगों को सोने को जगह मिली तो सोएंगे, मिलिटरी के लोगों को ऐसे जागते रहने की आदत रहती है" असं म्हणत नेव्हीवाल्याने संभाषणाचे धागे विणणे पुढे सुरू केले. समोरचा मंगलोरी आणि त्याची नवपरिणीता यांचे विभ्रम सुरूच होते. तिने खालच्या बर्थवर अनोळखी पुरुषांसमोर झोपावे हे त्याला पसंत नव्हतं, तर तिला खिडकी उघडी टाकून झोपायचं होतं. त्याने तिची रवानगी मधल्या बर्थवर केली तर १० मिनिटांतच ती तक्रार करत खाली उतरली आणि हट्ट करून खालच्या बर्थवर झोपून गेली. तिने बाजूला निष्काळजीपणे टाकलेली पर्स बघून आश्चर्यच वाटलं. थोड्या वेळाने तिच्या नवर्‍याला म्हटलं, खिडकीचं शटर बंद करा, नाहीतर कोणीतरी खिडकीतून हात घालून पर्स पळवून नेईल. त्यालाही ते पटलं आणि त्याने तत्परतेने शटर बंद केलं. कंपार्टमेंटमधल्या बहुतेकांनी आडवं होऊन नाहीतर बसल्या जागी निद्रादेवीची आराधना सुरू केली होती. मग मी त्या सगळ्यांकडेच दुर्लक्ष करून परत खिडकीबाहेर नजर वळवली. समोर आलेल्या आकाशाच्या तुकड्यात मृग नक्षत्र सहजच ओळखू आलं. त्याच्या पोटातला बाण आणि आणि तो मारणारा व्याधही दिसला. आणखी एक ओळखीचा एम सारखा आकार दिसला. शर्मिष्ठा बहुतेक. क्षितिजाजवळ बहुधा शुक्र दिसत होता. एकदम आठवण झाली. आई हे सगळे ग्रह, तारे, नक्षत्रं, राशी ओळखायला शिकवायची. मन सहजच काही शे मैल आणि साडेतीन दशकांचा प्रवास करून रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पोचलं. एका साध्यासुध्या बैठ्या घराच्या अंगणात. चोपून तयार केलेलं लख्ख अंगण. त्याच्या कडेने लावलेले चिरे, आणि त्या चिर्‍यांच्या पलिकडे ओळीत लावलेली अनेक फुलझाडं आणि शोभेची झाडं. तगर, कण्हेरी, बिट्टी, कुंद, मोगरा, नेवाळी, लिली, गावठी गुलाब, वेलगुलाब, अगस्ती नाना प्रकार. त्या लहान झाडांच्या पुढे पाण्याची दगडी पन्हळ, पाण्याने भरलेली दोण, आणि माड, आंब्याची कलमं, चिकू, रामफळ, कोकम अशी मोठी झाडं. या माडांच्या मुळात सतत पाणी शिंपल्यामुळे ओलसर मऊ माती असायची आणि बाजूला दुर्वा. पलिकडे एक लहानसं शेत आणि त्याही पलिकडे बांबूचं बेट. घराच्या मागच्या बाजूलाही प्राजक्ताची श्रीमंती उधळत असायची. अंगणाच्या छोट्या भागात पत्र्याचा मांडव घातला होता. पण आमचा वावर बराचसा मोकळ्या आकाशाखालीच असायचा. तिन्हीसांजा वडील अंगणात फेर्‍या मारत रामरक्षा म्हणायचे. कधी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून रामरक्षा, अथर्वशीर्ष म्हणायचे. आई पण काम करता करता असं काही म्हणायची. त्यांच्यामागून फिरताना आम्हालाही ती पाठ होऊन गेली होती. आजही झोप आली नाही की रामरक्षा म्हणते. लगेच निद्रादेवीच्या अंगणात पोचायला होतं. रात्री नीरव शांततेत माड झावळ्या हलवत उभे असायचे. सगळी फुलझाडं पाणी पिऊन प्रसन्न झालेली असायची. जेवणं झाली की कधी मर्फीचा रेडिओ पण आम्हाला सोबत करायला त्या अंगणात येऊन गाणी गायचा. रात्रीच्या वेळी लता, रफी, तलत, अरुण दाते सगळ्यांचेच आवाज जादुई भासायचे. आईला वेळ मिळाला की ती गीतेचे अध्याय म्हणून घ्यायची आणि आकाशातले ग्रह तारेही ओळखायला शिकवायची. आता तर कित्येक दिवसांत आकाशाकडे लक्षच जात नाही. पण कधी गेलंच तर आपसूक तार्‍यांची नावं डोक्यात यायला लागतात. त्या स्वप्नातल्या गावात पोचून मी परत एकदा लहान झाले. “आता ते गाव आणि ती माणसं राहिली नाहीत ग! सगळंच फार बदललंय” हल्लीच मैत्रीण म्हणाली होती. तिचं सासरही त्याच गावात असल्याने तिचा गावाशी संबंध राहिला आहे, आणि तोही भलेबुरे सगळेच अनुभव घेत. “असू दे ग! आता आपण तरी त्याच कुठे राहिलोय!” मी म्हटलं होतं. आणि तरीही ‘मैत्री’ या शब्दाचा अर्थही माहित नसलेल्या कोवळ्या वयातल्या मैत्रीला जागून इतक्या वर्षांनी तिने मला आंतरजालावरून शोधून काढलंच होतं! इकडे गाडी आपली अशीच अनेक विश्वं पोटात घेऊन धावतच होती, बोगदे, डोंगर, नद्या, झाडे, घरे मागे पडत होती. कुठे बोगद्यात दिवे लागलेले असायचे तर कुठे कामगार मंडळी टॉर्च घेऊन उभी असायची. ते सगळं दिसत होतं आणि नव्हतंही. जवळच्या सगळ्या गोष्टी गाडीच्या मागे पडत होत्या, मात्र सुदूर अंतरावरचा तो तार्‍यांनी भरलेला आकाशाचा तुकडा गाडीला सोबत करत गाडीबरोबर पुढेच येत होता! आणि इतर कोणाला न सांगता मी खास माझ्या अशा एका अद्भुत प्रवासात रंगून गेले होते. आणखी एक ओळखीचा अस्पष्टसा आकार दिसला. कृत्तिका. अरे, पण या एवढ्या अस्पष्ट का दिसतायत! आता डोळ्यांना लांबचा नंबरही आला की काय! तेवढ्यात लक्षात आलं, क्षितिजाजवळ डोंगरावर दिवे दिसताहेत, त्यांच्यामुळे तिथे काळोखाचा गर्दपणा कमी झालेला होता आणि मग जरा हुश्श्य वाटलं. लवकरच गाडीने लक्षात येईल असं एक वळण घेतलं आणि बाहेर दूरवर काळोखावर रांगोळी काढल्यासारखे प्रकाशाचे अनेक झगमगते ठिपके दिसायला लागले. माझ्या ओळखीच्या शहराचं पहिलं दर्शन! नेहमीच अतिशय सुखद वाटणारं. त्याने मला त्या स्वप्नातल्या गावाहून परत वर्तमानात आणलं. हळूहळू शहरातले रस्ते आणि त्यावरचे दिवे दिसायला लागले. गाडीने हलकेच ब्रेक लावल्याचा आणि रूळ बदलल्याचा आवाज जाणवला. सुक्या मासळीचा विशिष्ट वास यायला लागला. अनेकांना हा वास अजिबात आवडत नाही. पण माझ्यासाठी मात्र हा वास माझ्या ओळखीच्या शहराची खूण आहे. बरचसं बदललं तरी बरचसं अजूनही बदललं नाही हे सांगणारा. हळूहळू स्टेशनचा प्लॅटफॉर्म आणि त्यावरची लोकांची धांदल दिसायला लागली. नवर्‍याने बॅग उचलली. मी किरकोळ सामान उचललं, पायात चपला सरकवल्या आणि उठून उभी राहिले. आमचा आजचा प्रवास इथेच संपत होता, पण गाडी मात्र अशीच धावत पुढे जाणार होती. मंगलोरी जोडपं, बंगाली नेव्हीवाला आणि कणकवलीचा प्रवासी याना सोबत करायला माझ्या जागी दुसरंच कोणी येऊन बसणार होतं. उद्या पुढच्या प्रवासाला लागण्यापूर्वी या ओळखीच्या शहरात हौसेने घेतलेल्या घरकुलात चार घटका निवांत घालवायच्या आहेत हा विचार थंड वार्‍याच्या झुळकीसारखा मनात आला. आणि त्या विचाराचं अभेद्य कवच मिरवीत मी गाडीत चढू पाहणार्‍या स्टेशनवरच्या गर्दीत पाय ठेवला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
29982 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

व्वा सुरेख... अगदी आठवणींच्या

सुहास झेले
Fri, 03/28/2014 - 11:04 नवीन
व्वा सुरेख... अगदी आठवणींच्या एका-एका स्टेशनाचा पल्ला गाठत पुढे जाणारा प्रवास :)
  • Log in or register to post comments

छान लिहिलय. आवडलं!

अनुप ढेरे
Fri, 03/28/2014 - 11:43 नवीन
छान लिहिलय. आवडलं!
  • Log in or register to post comments

आवडलं!

मुक्त विहारि
Fri, 03/28/2014 - 12:08 नवीन
छान लिहिलय.
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Fri, 03/28/2014 - 12:12 नवीन
मुक्तक मस्त जमलंय, आवडलं.
  • Log in or register to post comments

मस्तच. सध्याच्या काथ्यांनी

मृत्युन्जय
Fri, 03/28/2014 - 12:14 नवीन
मस्तच. सध्याच्या काथ्यांनी जीव उठवला होता. त्या गर्दीत हा लेख खुपच छान वाटला.
  • Log in or register to post comments

खुप छान पैसातै. आवडेश.

प्रमोद देर्देकर
Fri, 03/28/2014 - 12:18 नवीन
खुप छान पैसातै. आवडेश.
  • Log in or register to post comments

खरचं फार छान लिहिलय !!! आवडलं

पिलीयन रायडर
Fri, 03/28/2014 - 12:28 नवीन
खरचं फार छान लिहिलय !!! आवडलं...
  • Log in or register to post comments

सुरेख...

विटेकर
Fri, 03/28/2014 - 12:32 नवीन
फारच छान ! खास आवडले ! रेल्वेचा प्रवास हा आम्हां भारतीयांसाठी एक सांस्कृतिक भाग आहे. तुमच्या बालपणीच्या आठ्वणी वाचताना चुलीसमोर केस मागे घेत खरकट्या हाताने फुंकणी तून हवा घालून जाळ मोठा करणारी माझी आई समोर दिसली. ती फुंकणी वापरे त्यावेळेपुरते आवर्तन थांबे अन्यथा सतत रामरक्षा अथवा व्यंक्टेश स्तोत्र चाले. चुलीतील जाळ मोठा झाला की आईचा मूळ्चा तेजस्वी चेहरा आणखी उजळे.. त्यावेळी ती जगातील सर्वात सुंदर स्त्री असे आणि आम्ही तिची पिल्ले तिच्या भोवती कोंडाले करुन बसू. दादा आईच्या सुरात सूर मिसळून म्हणे .. त्याकाळी आमच्या घरी रामरक्षा पाठ असणे हे मुंजीसाठी प्री- क्वालिफिकेशन होते. आजही झोप आली नाही की रामरक्षा म्हणते. लगेच निद्रादेवीच्या अंगणात पोचायला होतं. अगदी अगदी .. माझाही असाच अनुभव आहे. रामरक्षा सहसा पूर्ण होत नाही .. तत्पूर्वी च झोप लागून जाते.
  • Log in or register to post comments

हलकं फुलकं.. मस्त.

गणपा
Fri, 03/28/2014 - 12:45 नवीन
हलकं फुलकं.. मस्त.
  • Log in or register to post comments

+१

सखी
Fri, 03/28/2014 - 17:43 नवीन
हलकं फुलकं.. मस्त. -- असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+२

मूकवाचक
Fri, 03/28/2014 - 18:50 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

विरंगुळा खासच .निवडणुकीचा

कंजूस
Fri, 03/28/2014 - 12:53 नवीन
विरंगुळा खासच .निवडणुकीचा काथ्या आणि पाकृच्या वासातून सुटलो जरा . प्रवासात काय काय मागचे आठवत राहाते .रेडीओवरचे सहज सुचले म्हणून आणि शनिवारचे नभोनाट्य .रविंद्र पिंगे ,शंना ,जयवंत दळवींचे कल्याणी .ओरिसा कोणार्कच्या सूर्यमंदिरावर कोणी लिहिले होते ?प्रेमचंदच्या एका गोष्टीत नोकरीच्या शोधात निघालेला तरूण आर्मितील भावाचा कोट घालून रेल्वेने जातो आणि त्यालाच आर्मितला समजून बसायला जागा करून देतात .तुम्ही सिग्नल दिलात नी आमची गाडी सुटली सुसाट .
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन

शैलेन्द्र
Fri, 03/28/2014 - 12:54 नवीन
सुरेख लेखन :)
  • Log in or register to post comments

सुरेख जमलंय.

यशोधरा
Fri, 03/28/2014 - 13:21 नवीन
सुरेख जमलंय.
  • Log in or register to post comments

मस्तच! छान लिहिलंय.

भाते
Fri, 03/28/2014 - 13:44 नवीन
पैसाताई, संपादक मंडळात असल्याने धाग्यावरचे प्रतिसाद संपादित करण्याच्या कामातुन वेळ काढुन अधुनमधुन असेच छान लेख लिहित जा!
  • Log in or register to post comments

आवडलंच !

अजया
Fri, 03/28/2014 - 13:48 नवीन
थंड वार्‍याच्या झुळकीसारखाच वाटून गेला लेख सद्य निवडणूक हल्लकल्लोळामध्ये !!
  • Log in or register to post comments

+१०००, अजून काय ?

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 03/29/2014 - 12:15 नवीन
+१०००, अजून काय ? स्वतःच्या मालकांना निर्दोष देव बनवून त्यांच्या बाजूने काढलेले चिरके एकांगी सूर ऐकून लै वैताग आला होता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

छान..

यसवायजी
Fri, 03/28/2014 - 13:55 नवीन
छान.. :)
  • Log in or register to post comments

आवडला. असेच केलेले काही

सूड
Fri, 03/28/2014 - 14:22 नवीन
आवडला. असेच केलेले काही प्रवास डोळ्यासमोरुन गेले.
  • Log in or register to post comments

सुरेख मनोगत.

सस्नेह
Fri, 03/28/2014 - 14:29 नवीन
रेल्वे, निदान भारतीय रेल्वेचं एक खास वेगळं विश्व असतं. खूपदा प्रवासात असे अनुभव आलेत. शेवट अगदी खास ! आपल्या गावाची चाहूल किती सुखद असते याचा कितिदा तरी अनुभव घेतला आहे, घेते आहे !
  • Log in or register to post comments

ताई रत्नागीरीला नेलेस बघ

विशाखा राऊत
Fri, 03/28/2014 - 14:37 नवीन
ताई रत्नागीरीला नेलेस बघ :)
  • Log in or register to post comments

लवकरच गाडीने लक्षात येईल असं

पिशी अबोली
Fri, 03/28/2014 - 15:04 नवीन
लवकरच गाडीने लक्षात येईल असं एक वळण घेतलं आणि बाहेर दूरवर काळोखावर रांगोळी काढल्यासारखे प्रकाशाचे अनेक झगमगते ठिपके दिसायला लागले. माझ्या ओळखीच्या शहराचं पहिलं दर्शन! नेहमीच अतिशय सुखद वाटणारं. त्याने मला त्या स्वप्नातल्या गावाहून परत वर्तमानात आणलं. हळूहळू शहरातले रस्ते आणि त्यावरचे दिवे दिसायला लागले. गाडीने हलकेच ब्रेक लावल्याचा आणि रूळ बदलल्याचा आवाज जाणवला. सुक्या मासळीचा विशिष्ट वास यायला लागला. अनेकांना हा वास अजिबात आवडत नाही. पण माझ्यासाठी मात्र हा वास माझ्या ओळखीच्या शहराची खूण आहे.
खरंच... रत्नागिरीला पोहोचवलंत... :)
  • Log in or register to post comments

मस्तच...

ब़जरबट्टू
Fri, 03/28/2014 - 15:56 नवीन
छान लिहलेय... खरच हलके फुलके... धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहुन, वारे अंगावर घेत, युफोरियाचे "ओ माय री.. " गळा फाडून गाण्यात जी मजा अहे ना, त्याला तोड नाही दुसरी... :)
  • Log in or register to post comments

छान

संजय क्षीरसागर
Fri, 03/28/2014 - 16:00 नवीन
निरिक्षणातला वेगळेपणा भावला
  • Log in or register to post comments

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/29/2014 - 16:09 नवीन
हजार दोनहजार वर्षातून एखादा क्षण संक्षींशी सहमत होण्याचा येतो. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हजार दोनहजार वर्षातून एखादा

विजुभाऊ
Mon, 03/31/2014 - 16:10 नवीन
हजार दोनहजार वर्षातून एखादा क्षण संक्षींशी सहमत होण्याचा येतो. हे सहमत होणे मागल्या सहस्त्रकातले की या? म्हणजे आम्हालाही कळेल की ३०१४ मध्ये प्रा डॉ बिरुटे पुन्हा एकदा संक्षि शी सहमत होण्याची वळ आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थंड वार्‍याची झुळूक!!!

आयुर्हित
Fri, 03/28/2014 - 16:19 नवीन
व्वा, छान! थंड वार्‍याची झुळूक!!!
  • Log in or register to post comments

ये बात! कोकण रेल्वेचा प्रवास

आदूबाळ
Fri, 03/28/2014 - 16:35 नवीन
ये बात! कोकण रेल्वेचा प्रवास स्वप्नातल्या प्रवासासारखा वाटतो.
  • Log in or register to post comments

सुंदर..

चिगो
Fri, 03/28/2014 - 17:05 नवीन
सुंदर, हळूवार लेख.. झक्कास, ज्योतितै.. प्रवास आणि अनुभव-प्रवास, दोन्ही आवडले. बाकी रेल्वेप्रवासाचा लै अनुभव घेतलाय. त्यात दिल्ली-हैदराबाद सेकंद क्लासातला प्रवास, त्याच रुटवर अनकन्फर्म्ड टिकीटावर स्लीपरमधला प्रवास, नागपूर-दिल्ली रुटवरचा सेकंड-स्लीपर-एसी असा चढत्या भाजणीचा प्रवास, दिल्ली ते आसाम स्लीपरक्लासचा प्रवास, ज्यात सैनिकांच्या बस्त्यांमध्ये घळ करुन झोप घेतली होती. बाकी, अनकन्फर्म तिकीटावर स्लीपर किंवा एसीतून प्रवास करण्यापेक्षा सेकंडक्लासमध्ये फाईट मारलेली परवडते, हा अनुभव आहे बरेचदा.. ;-)
  • Log in or register to post comments

खुप छान

बरखा
Fri, 03/28/2014 - 17:48 नवीन
खुप छान लिहलयत. "सुक्या मासळीचा विशिष्ट वास यायला लागला. अनेकांना हा वास अजिबात आवडत नाही. पण माझ्यासाठी मात्र हा वास माझ्या ओळखीच्या शहराची खूण आहे." तसं कोकण माझ मुळ गाव नाही. पण कोकणात जायच म्हणल की मी लगेच तयार होते. मी शाकाहारी असल्याने मासळीचा विशिष्ट वासाच्या जागी मला ऊकडीच्या मोदकाची स्वप्न पडायला लागतात. कोकण्यातल्या ऊकडीच्या मोदकाची सर बाकी कुठ्ल्याही मोदकाला नाही.
  • Log in or register to post comments

आवडल .

जेपी
Fri, 03/28/2014 - 17:53 नवीन
झक्कास .
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन झालय. असा प्रवास

रेवती
Fri, 03/28/2014 - 18:24 नवीन
सुरेख लेखन झालय. असा प्रवास करून कितीक वर्षे लोटलीत असे वाटले. आता एकदा इथल्याइथं कुठेतरी ट्रेनने जाऊन येईन म्हणते!
  • Log in or register to post comments

मस्त. आवडलं.

धन्या
Fri, 03/28/2014 - 18:39 नवीन
मस्त. आवडलं. आम्ही आठवीला असताना संस्कृतच्या तासाला मास्तरीण बाई आमच्याकडून रामरक्षा घोकून घ्यायच्या. अर्थ समजावण्याच्या भानगडीत त्या कधीच पडल्या नाहीत. रामरक्षा का घोकून घ्यायच्या तेही कधी कळलं नाही. आम्ही मात्र बेंबीच्या देठापासून "आत्तसज्ज धनुष्या विशुस्पुशा वक्षया शुगनसंगीनौ" म्हणून ओरडायचो.
  • Log in or register to post comments

खूप छान

विकास
Fri, 03/28/2014 - 18:50 नवीन
एकदम आवडले आणि भावले! मला वाटते ८० च्या दशकात शाळा-कॉलेज केलेल्या पिढीपर्यंतच्या (ज्यात मी देखील येतो) व्यक्तींनी अनेक बदल झपाट्याने पाहीले आहेत. त्यामुळे जेंव्हा परत परत असे लहानपणच्या घरापाशी मनाने जाणे होते तेंव्हा अशीच कुठेतरी अस्वस्थता येते.
  • Log in or register to post comments

चित्रदर्शी वर्णन आवडले.

बॅटमॅन
Fri, 03/28/2014 - 19:03 नवीन
चित्रदर्शी वर्णन आवडले. लहानपणी हरिप्रिया एक्स्प्रेसने केलेल्या अनेक मिरज-धारवाड प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या. बहुत धन्यवाद!
  • Log in or register to post comments

एकदम मस्त ,आवडलं मुक्तक

जोशी 'ले'
Fri, 03/28/2014 - 19:11 नवीन
एकदम मस्त ,आवडलं मुक्तक नाहितर केमो थेरपिच चालुय सगळी कडेच
  • Log in or register to post comments

केमो थेरपी

गणपा
Fri, 03/28/2014 - 19:47 नवीन
केमो थेरपी
हा हा हा शब्द प्रयोग भयंकर आवडल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

हा हा हा!

विकास
Fri, 03/28/2014 - 21:56 नवीन
क्षणभर मला कळले नाही! एकदम मस्त. फक्त केमो थेरपीच्या ऐवजी मी केमो थेरं म्हणेन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१११११११११११११११११११११११.

बॅटमॅन
Sat, 03/29/2014 - 15:18 नवीन
+१११११११११११११११११११११११. भयानक कोटी आहे =)) _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हा हा हा ... फुटलो

सुहास झेले
Fri, 03/28/2014 - 23:54 नवीन
हा हा हा ... फुटलो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

हा, हा, हा...

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 03/29/2014 - 12:18 नवीन
हा, हा, हा... ही कोटी नाही दशकोटी आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

छानच झाला आहे लेख, मजा आली.

मेघनाद
Fri, 03/28/2014 - 19:38 नवीन
छानच झाला आहे लेख, मजा आली. कुठून - कुठे गेला होतात ते पण सांगा की.
  • Log in or register to post comments

बर्याच दिवसांनी हे असं

किसन शिंदे
Fri, 03/28/2014 - 19:48 नवीन
बर्याच दिवसांनी हे असं काहीतरी चांगलं वाचायला मिळालंय. मनाला रिफ्रेश करणारं लेखन!
  • Log in or register to post comments

खूप छान

मधुरा देशपांडे
Fri, 03/28/2014 - 19:58 नवीन
खूप आवडलं पैसाताई. कितीतरी आठवणी आहेत अशा प्रवासाच्या. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पैसा
Fri, 03/28/2014 - 20:27 नवीन
सुहास झेले, अनुप ढेरे, मुवि, नंदन, मृत्युंजय, प्रमोद देर्देकर, पिरा, विटेकर, गणपा, सखी, मूकवाचक, कंजूस, शैलेन्द्र, यशोधरा, भाते, अजया, यसवायजी, सूड, स्नेहांकिता, विशाखा राऊत, पिशी अबोली, बजरबट्टू, संजय क्षीरसागर सर, आयुर्हित, आदूबाळ, चिगो, पल्लवी कुलकर्णी, जेपी, रेवती, धन्या, विकास, बॆटमॆन, जोशी ले, मेघनाद, किसना, मधुरा सर्वांना मनापासून धन्यवाद! विटेकर, कंजूस, बजरबट्टू, चिगो, पल्लवी, विकास, प्रतिसाद आवडले. जोशी ले, 'केमो' चा उलगडा जरा वेळाने झाला! शब्दप्रयोग लै आवडला आहे! मेघनाद, हा छोटासा प्रवास मुंबई एक्सप्रेसने मडगावहून रत्नागिरीपर्यंतचा! सर्व वाचक आणि प्रतिसादकांना पुन्हा एकदा धन्यवाद!
  • Log in or register to post comments

धन्यवाद पै ताई

जोशी 'ले'
Fri, 03/28/2014 - 20:47 नवीन
धन्यवाद पै ताई :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लोल्झ!!!

धन्या
Sat, 03/29/2014 - 09:04 नवीन
लोल्झ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

फारच छान!

नगरीनिरंजन
Fri, 03/28/2014 - 21:11 नवीन
फारच छान!
  • Log in or register to post comments

भारतीय रेल्वे प्रवास हा

निनाद मुक्काम …
Fri, 03/28/2014 - 21:22 नवीन
भारतीय रेल्वे प्रवास हा व्यक्ती आणि वल्ली निरीक्षण करण्यासाठी उत्कृष्ट जागा आहे. पक्षी व प्राणी पाहण्यासाठी जसे अभयारण्यात जावे लागते. तसे मानवी स्वभावाचे वेगवेगळे नमुने आपल्या समाजातील विविध स्वतारातील , धर्माची जातीची , वयोगटातील माणसे निरीक्षण रेल्वेच्या डब्यात होते. तुमच्या लेखनाच्या शैलीला तुमच्या बारीक निरीक्षणाची जोड मिळाल्याने आम्ही सुद्धा तुमच्यासारखा हा प्रवास अनुभवला. फार पूर्वी यात्रा ह्या मालिकेतून आपल्या भारतचे दर्शन घडविणाऱ्या शाम बेनेगल व ओम पुरी ची ची आठवण आली.
  • Log in or register to post comments

प्रवास आवडला.

आतिवास
Fri, 03/28/2014 - 22:00 नवीन
प्रवास आवडला.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा