भजन - महागाई
सिनेमाच्या, अल्बम च्या गाण्यांच्या मीटरवर बसवलेली भजनं हा संगीताचा एक विशिष्ट प्रकार म्हणावा लागेल. त्यात फूल न फुलाची पाकळी म्हणून ही माझी एक प्रामाणिक भर. महागाई कमी करण्यासाठी देवाकडे मागितलेलं हे मागणं.
भजन - महागाई
मीटर: तुझी घागर नळाला लाव
नाही वजन नाण्याला
नोट केविलवाणी
आणलं डोळ्यात सगळ्यांच्या
महागाईनं पाणी ॥धृ॥
नाही परवडत, आता दुधाचा घोट
गॅसच्या किमतीचा, बघ झालाय स्फोट
कुणी जेवी हॉटेलात, राही उपाशी कुणी ॥१॥
मेहनतवाल्यांच्या, बघ पोटात खड्डे
वडापाव पोचला, आता दहाच्या पुढे
मुलाबाळांचे हट्ट कसे पुरवावे कुणी ॥ २॥
टीव्ही मोबाईल, अन गाड्या, न घोडे
मोबाईलच्या मागे, झाले सगळेच वेडे
पैशापुढे आता नाही, कुणाचं कुणी ॥ ३॥
कोटी-कोटीचे, उभे राहती महाल
सामान्यांचे हे, बघ झालेत हाल
ग्राहकांच्या टाळूचं खाती बिल्डर लोणी ॥ ४॥
ज्याची लक्ष्मी तो, पुढे शर्यतीत
बुद्धी खाते धूळ, इथे अडगळीत
देवा जाहीर कर इथे तूच आणीबाणी ॥ ५॥
सगळे भासती, इथं झपाटलेले
पैशासाठी हे, सारे हपापलेले
ये रे धावून ताराया, ऐक माझी विनवणी ॥ ६॥
(C) काव्याचे सर्व हक्क बाधित.
चांगलं जमलंय.
:) जरूर...
अगदी खरे आहे!
आभार !