मधुबाले सारखी ? छे छे, काहीतरीच काय?
“डोळे हे जुल्मि गडे… रोखुनी मज पाहू नका ”…
च्यामारी, आज पहाटे स्वप्नात पुन्हा मधुबाला, आणि तीही चक्क डोळे हे जुल्मि गडे म्हणणारी ?
… अगदी पूर्वी स्वप्नात शिवाजी महाराज, टारझन, वज्रहनुमानमारूती वगैरे यायचे…
… आणि आता चक्क मधुबाला ?
मजा आहे बेट्या तुझी. चल चहा कर आता.
“पाणी-दूध मिसळलं? मिसळलं.
साखर टाकली ? टाकली.
उकळी आली? आली.
चहापत्ती टाकली? टाकली.
आलं किसून टाकलं? टाकलं.
झाकण ठेऊन ग्यास बंद ? बंद”.
चहा गाळून, मफलर टोपी चढवून, कपबशी घेऊन, वरांड्यात येऊन बसलो.
चहाचा पहिला घोट घेतला, तर वाफेनं चष्म्याची काच वाफकटली, म्हणून चष्मा काढून ठेवला.
तेवढ्यात समोरच्या वरांड्यात हालचाल दिसली.
आली वाटतं मधुबाला…
“सहज तुझी हालचाल, मंत्रे जणु मोहिते …
सहज चालणेही तुझे, सहज पाहणेही तुझे
मोहिनी मज घालते…”
… पुन्हा चष्मा चढवून बघतो, तो रानगवा आणि त्याचं ते कुत्रं. कुत्रं कसलं, ढाण्या वाघच तो. हा ढाण्या वाघ, त्याचा मालक रानगवा, आणि मालकीण तेवढी अनारकली.
अगदी अनारकलीच.
“मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे…”
म्हणजे आपण नंदलाल की काय?
शिव शिव .. या वयात असले विचार ?
तेवढ्यात आठवलं, फ़ुलझाडांना पाणी द्यायला विसरू नका म्हणून बजावून गेलीय ही जाताना….
आता आधी तेच करूया, म्हणून पाण्याची झारी आणायला अंगणात आलो…
“मधुर सुवासाची, सुंदर झारी भरोनी…. जा जा जा झणि, घेउनि ये … ”
अंगणात बघतो, तो कुत्र्यानं घाण करून ठेवलेली.
“च्यामारी, कुत्रं कुणाचं, आणि घाण कुठे. रानगव्या, दिसते तुझी बायको मधुबालेसारखी, म्हणून काय तुझ्या कुत्र्याची घाण रोज मी स्वच्छ करू ?”
मधुबाले सारखी ? छे छे, काहीतरीच काय ? ती कुठे आणि ही कुठे…
… पण मुळात मी अंगणात आलोच कश्यासाठी होतो? आत गेल्यावर आठवेल, म्हणून आत यायला वळणार, तर समोर परांजप्या आणि कुंटया उभे.
“ काय म्हणताय काका? वहिनी अजून आल्या नाहीत वाटतं ? आणि काय म्हणतात तुमचे ते अण्णा ? ठरलं का त्यांचं, पुढलं उपोषण कशाबद्दल करायचं ते” ?
हा परांजप्या माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षं लहान, तरी मला काका म्हणतो, आणि हिला वहिनी. गेली पंधरा वर्षं पेन्शन खाऊन खाऊन चरबी वाढलीय मस्तवालाची. तिकडे परांजपीण आणि कुंटीण दत्तमंदिरात कीर्तनाला गेल्या, की हे दोन्ही टोणगे सकाळीच शिग्रेटी फुंकत रिटोळगिरी करत हिंडत असतात.
"चला, निघतो... पेन्शन घ्यायला जायचंय" असं, मुद्दाम मला खिजवायला म्हणत परांजप्या तुरुतुरु गेला. आता पूर्वी मी चांगली पेन्शनवाली नोकरी सोडून धंदा सुरु केला, पण तो पार बसला, हे किती वेळा उगाळावं माणसानं?
मग मी आत आलो तर टेबलावर काहीतरी चमकताना दिसलं. स्पष्ट दिसेना, म्हणून कपाळ चाचपडतो, तर चष्मा नाही. कुठे बरं गेला चष्मा? आठवेना. बहुतेक बाहेर वरांड्यात काढून ठेवला असेल, म्हणून पुन्हा तिथे जाऊन चष्मा घेऊन आत येऊन बघतो, तो हिच्या कानातल्या कुड्या. फारच विसरभोळी बुवा ही. दागिने काय टेबलावर ठेवण्याची वस्तू आहे? आणि तीही तीन दिवसापासून? आत नेऊन कपाटात ठेऊया म्हणून खोलीत शिरलो. पण कपाटाची किल्ली कुठे असते बरे? काही केल्या आठवेना.
जाउ दे. आठवेल तेंव्हा ठेऊ कपाटात. तूर्तास स्वयंपाकघरात नेऊन ठेऊया म्हणून कुड्या घेऊन निघालो, तेवढ्यात आठवलं कि अरे, आपण फ़ुलझाडांना पाणी देऊ म्हणून झारी घ्यायला अंगणात गेलो, तर परांजप्या आणि कुंटया बोलले वगैरे. मग झारी घेऊन पाणी भरायला बाथरूमीत येतो, तर कालचे ओले कपडे तिथे पडलेले. धुवायला वाटतं आपण काल… ‘धुवायला वाटतं ??? … “धुवायला विसरलो वाटतं” म्हणायला हवं ... च्यामारी आता स्वत:शी बोलतानापण विसरायला होतंय...
... तर आता आधी हे कपड्याचं निस्तरूया म्हणून साबण बघतो तर तो नाही… होय होय, साबणपण आणायला ही बजावून गेलेली आहे. शिंच्या या बायकांना म्हातारपण आलं, तरी माहेरचा सोस सुटत नाही. आता काय तर म्हणे भाचीचं बाळंतपण आहे, म्हणून जायलाच हवं. पण एक बरंय. आपण इकडे मोकळे. काहीही करा, खा, प्या, बोलणारं कुणी नाही.
तेवढ्यात आठवलं, मधुबाला सकाळी त्या रानगव्याला टाटा करायला अंगणात येते, मग तिथेच बराच वेळ असते. ती दिसते का हे बघायला पुन्हा वरांड्यात आलो, तर पेपर आलेला. काय म्हणतो आजचा अग्रलेख? अरे, पण पुन्हा चष्मा कुठे ठेऊन आलो आपण ??
क्रमश:)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला ....
:)
ही एक भन्नाटच सेरीज!!!
मस्त!
मस्त....
म्हणजे आपण नंदलाल की काय?
लै भारी सुरुवात ! पुभाप्र.
एक सहज शंका, जर मधूबालेच्या
सहमत.
साडीतील मधुबाला
अतिशय मोहक...!
येउ देत...
वा...
It is impossible....
कस अगदी ओघवतं लेखन आहे.
झक्कास.
स्मृतिचा लोच्या
मधुबालेशी रंगत दार छेडछाड?
मस्त लिहिले आहे, पुढील भाग
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्
आता मलाही
कोणता बुवा हा सिनेमा?
सिनेमातील दृष्य
नक्कीच
भिक्षेच्या धाग्याच्या निमित्ताने हा धागा आठवला
सुरुवात आवड्ली पू भा प्र..
वा, मस्त !
तुम्हाला वेगळा सांगायला
का बरे ?