मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोळा भात

मधुरा देशपांडे · · पाककृती
मिपाच्या पाककृती विभागात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील पाककृती नेहमीच सादर होत असतात. असाच एक विदर्भात केला जाणारा पदार्थ म्हणजे गोळा भात. विशेषतः वर्धा-नागपूर या बाजूला केला जाणारा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा सगळे नातलग एकत्र येतात तेव्हा गोळा भात हमखास केला जातो. आज खास मिपाकर खवय्यांसाठी ही पाकृ. साहित्य: १ वाटी हरभरा डाळ (चणा डाळ) १ वाटी तूर डाळ १ चमचा हळद २ चमचे लाल तिखट १ चमचा धणेपूड १ चमचा जिरेपूड ४-६ कढीपत्त्याची पाने १ चमचा साखर कोथिंबीर मीठ चवीनुसार २ वाट्या तांदूळ भातासाठी फोडणीसाठी: १ वाटी तेल २ चमचे मोहरी ३-४ लसूण पाकळ्या (आवडत असल्यास) ३-४ सुक्या लाल मिरच्या अर्थातच आवडीनुसार लसूण आणि मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. https://lh3.googleusercontent.com/-Z8AB3qrMtf4/UxNedRky_VI/AAAAAAAACz4/9QYWKTewiXU/w866-h577-no/DSC_0699.JPG कृती: तूर डाळ आणि हरभरा डाळ ६-८ तास भिजवून ठेवावी. नंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून दोन्ही डाळी पाणी न घालता मिक्सर मधून भरडसर वाटून घ्याव्या. या वाटलेल्या मिश्रणात हळद, तिखट, मीठ, धणेपूड, जिरेपूड, किंचित साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने सगळे एकत्र करावे. https://lh3.googleusercontent.com/-S06C_wCwORM/UxNedRFentI/AAAAAAAACz8/B1CFC6tZKzM/w866-h577-no/DSC_0700.JPG या मिश्रणाचे छोटे गोळे करावे. या साहित्यात १४-१६ गोळे होतात. https://lh6.googleusercontent.com/-yuDyYS8d6Lg/UxNecJjW6_I/AAAAAAAACzs/f6ySRKccLLY/w866-h577-no/DSC_0701.JPG हे गोळे ढोकळा वाफवतो तसे वाफवून घ्यावे. वाफवण्यासाठी इडली पात्र, स्टीमर किंवा कुकरला शिट्टी न लावता अशा कुठल्याही प्रकारे वाफवले तरी चालतात. साधारण १०-१२ मिनिटे वाफवण्यासाठी पुरेसे आहेत. मायक्रोवेव्हचे इडली पात्र असेल तर त्यातही वाफवू शकता. मायक्रोवेव्ह मध्ये ४-५ मिनिटे लागतात. बासमती शिवाय कुठल्याही तांदळाचा मोकळा भात शिजवून घ्यावा. तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि लसूण घालून फोडणी करावी. आता भात, त्यावर हे गोळे कुस्करून आणि त्यावर फोडणी घालावी. गोळा भात तयार आहे. https://lh5.googleusercontent.com/-ao7FJ-aBayM/UxNeh4QeHBI/AAAAAAAAC0E/YYD1YPdXq6c/w866-h577-no/DSC_0704.JPG सोबत ताजे लोणचे असेल तर अधिकच रंगत येते. यासोबत नेहमी ताक अथवा मठ्ठा केला जातो. आज मी सोलकढी केली होती. हे कॉम्बिनेशन पण चांगले लागत होते.

वाचन 21942 प्रतिक्रिया 0