एक झुंज तणावाशी!
लेखनप्रकार (Writing Type)
काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून चालत असताना एक भिंतीवर चिटकवलेली जाहिरात नजरेस पडली. ‘स्ट्रेस मॅनेजमेंट कन्सल्टंट’ची. तसा रोजच्या संभाषणांमध्ये असंख्य वेळा आपल्या बोलण्यात हा शब्द येतो, ‘स्ट्रेस’, पण त्या संकल्पनेवर हवा तेवढा स्ट्रेस देत नसावं कुणी. म्हणूनच कदाचित अशा कन्सल्टंट्सचा जन्म होतो. पण मग हे कन्सल्टंट्स काय सांगत असावेत? असं तर नक्कीच काही नसेल जे आपल्याला ठाऊक नाही. हं, पण आपण आत्मसात केलेलं नाही असं बरंच काही असेल. असे विचार मनात चालू होते.
मुळात ताण किंवा स्ट्रेस हा एखाद्या आजारासारखा असतो. जसा एखाद्या विषाणूचा प्रतिकार करण्यास माणसाचं शरीर असमर्थ ठरतं आणि मग आजार उद्भवतो. त्याचे परिणाम जसे की, सर्दी, खोकला, डोकेदुखी इत्यादी इत्यादी. तसंच रोजच्या आयुष्यातील एखाद्या घटनेला, परिस्थितीला, स्वीकारण्यास मन किंवा मेंदू असमर्थ ठरतो आणि मग उद्भवतो तो ताण अर्थात स्ट्रेस. परिणाम म्हणजे चिडचिड, राग, मत्सर, इत्यादी. प्रथम हे परिणाम वैचारिक असतात आणि पुढे ते कृत्य स्वरूपात दिसू लागतात.
ताणाची कारणं असंख्य आहेत. ताण किंवा स्ट्रेस हा रोधता येत नाही, असं माझं मत आहे. त्याला वाट करून द्यावी लागते. आणि नेमका हाच त्याचं निरसन करण्याचा एक सुयोग्य मार्ग आहे. ही वाट करून द्यायलाच मुळात लोक विसरतात आणि ताणाचं एक अनामिक ओझं घेऊन वावरायला लागतात. ताण मार्गीकृत करण्याचे अनेक मार्ग आहेत. दुर्दैवाने टीव्ही आणि मोबाइलपलीकडे बहुतांश लोकांची मनोरंजनाची कल्पनाच पोहोचत नाही, त्यामुळे मग उरतो तो एकच मार्ग म्हणजे व्यसनाधीनता.
पण हे दुष्टचक्र टाळण्याचे काही सोपे उपाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे नियमित व्यायाम. मग तो धावण्याचा असेल, बलवर्धक असेल, योगासनं असतील किंवा मैदानी खेळ असतील. शरीराला क्रियाशील ठेवलं की मन प्रफुल्लित राहतं आणि ताणाचं निदान होतं. दुसरा सुरेल उपाय म्हणजे संगीत. आपल्याला जे आवडतं, ते संगीत रोज थोडासा वेळ जरी ऐकलं, तरीही मन एखाद्या संगणकासारखं रिस्टार्ट होतं आणि ताण नाहीसा होतो. तिसरा उपाय म्हणजे वाचन. एखादं आवडतं पुस्तक काढून किंवा नवीन पुस्तकं आणून त्यांचं वाचन केलं म्हणजे ताणाच्या कारक गोष्टींचा विसर पडायला मदत होते. उपाय अमर्याद आहेत आणि त्यांना बंधन नाही. म्हणजे अगदी साध्यात साधा छंद जोपासूनही तणावाशी यशस्वी झुंज देता येते. मुळात ताण देणाऱ्या विचारांना मनापासून वेगळं करणं हे गरजेचं आहे. स्ट्रेस वाढवणा-या गोष्टी आपण थांबवू शकत नाही. परंतु त्या स्ट्रेसला मॅनेज करण्याची कला आपण नक्कीच आत्मसात करू शकतो.
ताणाचे आपल्यावर होणारे दुष्परिणाम भयंकर व कल्पनातीत आहेत. झोप न लागण्यापासून ते हृदयविकार होण्यापर्यंत काहीही आणि कधीही ताणामुळे उद्भवू शकतं. त्यातून आजच्या काळात माणसाच्या गरजा इतक्या वाढलेल्या आहेत की, त्यामुळे ताण किंवा स्ट्रेस होण्याची कारणं मुबलक आहेत. तेव्हा असं असताना, माणसांनी तो ताण मॅनेज करण्याचे उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. शक्य तोवर शांत रहाणं, मनन करणं आवश्यक असतं. आज प्रत्येक माणूस आपल्या आवडीचं काम करत असतो असं नाही आणि प्रत्येक माणसाला किमान एक कुठली तरी गोष्ट मनापासून, प्रामाणिकपणे आवडते हे नक्की. ती गोष्ट, ती आवड जोपासायला वेळ किंवा पैसा यापैकी एक गोष्ट कमी पडत असते हेही तितकंच सत्य. परंतु तो वेळ काढायला हवा, तो कमी पडणारा पैसा हळूहळू जमवायला हवा आणि ती आवड जोपासायला हवी. कुठेतरी निष्फळ करमणुकीची जागा सुफळ करमणुकीने घ्यायला हवी. इतकासा स्वार्थ प्रत्येकाने जोपासायलाच हवा. त्यामुळे ताण नाहीसा होतो आणि ताण नाहीसा होण्यात प्रत्येकाचा स्वार्थही आहे आणि परार्थही.
लेख प्रहार वृत्तपत्रात छापून आला होता त्याचा हा दुवा
प्रतिक्रिया
अतिशय चांगला विषय !!!
अतिशय उत्तम लेख....
जो व्यक्ती रोज1 तास विपश्यना
अगदि मनाला भिडले.
उत्तम लेख
छान लेख !!!
नियमित व्यायाम (विशेषतः
एक रामबाण उपाय सांगतो,एखाद्या
सर्वांचे
उत्तम पण अपूर्ण लेख
आवश्यक