मिट्ट
गेल्या महीन्यापासून बघण्याचे डोक्यात असलेला एक माहितीपट बघायची संधी मिळाली... भारतीय निवडणुकांच्या हंगामात अमेरीकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एका राजकारण्याच्या व्यक्तीगत वर्तनाची एक झलक बघताना नकळत तुलना होते. अर्थात येथे कुठे कुणाला आदर्श समजत नसून आपण कुठले वर्तन मिस करत आहोत इतकेच डोक्यात येते...
त्या माहितीपटाचे नाव आहे MITT. अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार मिट्ट रॉमनी यांच्यावरील हा वेगळ्याच पद्धतीने घेतलेला माहितीपट आहे. २००६ साली सर्वप्रथम मिट्ट रॉमनी यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचे ठरवले. तेंव्हा पासून एका प्रत्रकारास त्यांनी त्यांच्या कौटूंबिक राजकीय संवादाचा पूर्ण (बर्यापैकी) अॅक्सेस दिला. २००६ ते २०११ डिसेंबरपर्यंतचा हा कालावधी आहे ज्यात या पत्रकाराने त्यांचे चित्रिकरण केले आणि त्यातून तयार केलेला हा राजकीय माहितीपट आहे.
त्याबद्दल लिहीण्याआधी एक व्यक्तीगत स्पष्टीकरणः या देशात रहात असल्याने आणि मिट्ट रॉमनीने ज्या राज्याचे गव्हर्र्नर होते त्या मॅसॅच्युसेट्सचा रहीवासी असल्याने मी रॉमनींचा अजिबात चाहता नाही. या माणसाने राजकीय पद्धतीने लोकसेवा करायच्या फंदात पडू नये - ते त्यांच्यासाठी आणि लोकांसाठी चांगले असेल असेच मला वाटते. तरी देखील एक यशस्वी उद्योजक, अतिश्रीमंत, धार्मिक (मॉर्मन ख्रिश्चन) असा हा माणूस नक्कीच बघण्यासारखा आहे. त्याच्या देशाबद्दलच्या आणि समाजाबद्दलच्या बांधिलकीबद्दल कधी देखील शंका येत नाही. तशी ती कुठल्याच अमेरीकन राजकीय व्यक्तीबद्द्ल येत नाही, अगदी या राजकारणी उडदामाजी देखील प्रत्येकात काहीतरी काळे(बेरे) दिसत असले तरी. असो.
रॉमनी अतिशय कडक आणि मनाने केवळ धंदेवाईक असलेली व्यक्ती आहे अशी त्यांची एकंदरीत प्रतिमा आहे. आणि ती प्रत्यक्षाहून फार वेगळी आहे असे वाटत नाही. तरी देखील प्रत्येक व्यक्तीच्याच प्रतिमेस अनेक कंगोरे असतात तसेच रॉमनींच्या बाबतीत आहे. विशेषकरून मनापासून धार्मिक मॉर्मन असल्याने, त्यांचे कौटूंबिक जीवन अतिशय वेगळे दिसते. पाच मुले, सुना, बायको आणि रॉमनी यांचे सात्यत्याने आणि अतिशय मनमोकळेपणाने चाललेल्या राजकीय चर्चा यात पहायला मिळतात. हे सर्वच त्यांच्या नेहमीच्या आयुष्यात विविध (बिझिनेस या अर्थाने) उद्योगात व्यस्त आहेत. ह्या मुलांचा वडीलांवरील यशस्वी राज्यकर्ता होण्यावरील विश्वास, जरी हरलो तरी देश आपला आहे आणि बॅक टू बिझनेस जाऊन सुखाने राहू हा अॅटीट्यूड दिसतो. बायकोचा पाठींबा, सुनांचे म्हणणे सगळे काही दिसते. स्वतः रॉमनींचे वडील हे मिशिगन राज्याचे गव्हर्नर होते आणि ते अध्यक्षिय निवडणूक लढू शकले नव्हते. पण वडीलांबद्दलचा आदर / आठवण रॉमनींच्या बोलण्यावागण्यातून दिसत होती. त्यांचे सपोर्टर्स, विमानातून, बस मधून फिरणे सगळे काही बघण्यासारखे आहे, कारण ते खरे चित्रिकरण आहे. अर्थात त्यांच्या धोरणात्मक बैठकांचे चित्रिकरण यात नाही, ते साहजीक देखील आहे. तरी देखील इतके स्वत:चे जाहीर करणे सोपे नाही असे पाहताना सतत वाटत राहीले.
२००८ साली रिपब्लीकन प्रायमरीतच जिंकण्याची शक्यता कमी दिसल्यावर एखाद्या न चालणार्या धंद्याविषयी जसे त्यांनी निर्णय घेऊन मोडीत काढले तसेच त्यांनी स्वतःची उमेदवारी मागे घेतली. २००१२ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणू़कासाठी मात्र ते रिपब्लीकन उमेदवार झाले. मात्र टोकाचे धंदेवाईक अशी जी काही त्यांची प्रतिमा आहे, त्याला ते जनतेच्या मनातून बदलू शकले नाही. त्याचा परीणाम म्हणून निवडणूक हरण्यात झाला.
त्या निवडणूक निकालाच्या रात्री जस जसे निकाल जाहीर होऊ लागले तस तशी अटळ गोष्ट दिसू लागली होती. बॉस्टनला त्यांच्या कँपेन हेडक्वार्टर मधे कुटूंबासमवेत बसून चर्चा करत असल्याचा टिपलेला क्षण बघण्यासारखा आहे. ओहायो आणि फ्लोरीडा राज्ये हातातून निसटू लागली तसे त्यांनी मान्य केले की आता जिंकणे शक्य नाही. मुलांना आणि कॅपेन मॅनेजरला विचारले, प्रेसिडंटचा (ओबामाचा) फोन नंबर काय आहे? इथल्या पद्धतीत हरलेला उमेदवार जिंकलेल्या उमेदवारास फोन करून हार मान्य करतो आणि जिंकलेल्याचे अभिनंदन करतो. मग स्वत:च्या सपोर्टर्ससमोर भाषण (कन्सेशन स्पीच) करायचे असते आणि मग जिंकलेला उमेदवार त्याच्या सपोर्टर्ससमोर जाऊन भाषण करतो...रॉमनींनी मग पटापट ५००+ शब्दाचे कन्सेशन स्पीच स्वतःच लिहीले, मुलांना वाचून दाखवले, किती शब्द आहेत आणि किती वेळात ते पूर्ण होईल या बद्दलचे अंदाज व्यक्त केले.
त्या रात्री जर ते जिंकले असते तर निर्वाचीत राष्ट्राध्यक्ष असते म्हणून त्यांच्या भोवती अभेद्य वाटावे असे सरकारी गुप्तहेर यंत्रणा आणि पोलीसांचे (एफबीआय, युएस मार्शल्स वगैरे) कडे होते. त्यांच्या नातवंडांपर्यंत प्रत्येकाला कोडनेम्स देऊन तयारी झालेली होती... पण कन्सेशन स्पीचला जायच्या आधी त्यांनी त्यांच्या मॅनेजरला सांगितले की सिक्रेट सर्विस एजंट्सना सांगा की माझी गाडी नसल्याने कदाचीत मला घरी जाण्यापुरती मदत लागेल नंतर ते जाऊ शकतात, आता गरज नाही...
शेवटी मला वाटते ते मुलाच्या गाडीत बसले मुलाने त्यांना ड्राईव्ह करून बॉस्टनच्या बाजूच्या बेलमाँट नावाच्या उपनगरात त्यांचे घर आहे तेथे सोडले. शेवटी कॅमेराकडे पाठमोरे बसलेल्या मिट्ट चा फक्त बायको समोर असताना उसासे सोडण्याचा आवाज ऐकायला येतो आणि तेथेच माहितीपट संपतो.
प्रतिक्रिया
छान लेख
सहमत
पिडांकाका
लंबर वन !
मिट्ट की मैट ?
मिट्ट
त्यामधे
आवडेल पहायला ही डॉक्युमेंटरी.
कुठला
खुप वर्षापुर्वी दुरदर्शनवर
छान
लेख आवडला पण....
=))
मस्त आयडिया!!
तुर्तास
+१
मस्त ओळख करुन दिली आहे.