"घर गृहस्थी"
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
घर गृहस्थी
हि मी मुंबईच्या अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयात काम करत असतानाची गोष्ट आहे. मी तेथे नौसैनिकांच्या कुटुंबियांच्या वार्ड चा प्रमुख होतो. एक दिवस एक १०४ ए डी( एयर डिफेन्स) रेजिमेंट या कालिन्याला असलेल्या लष्कराच्या रेजिमेंट मधून एक शिपाई आपल्या बायकोला भरती करण्यासाठी घेऊन आला.( या रेजिमेंट मध्ये विमानविरोधी तोफा आहेत आणि मुंबई विमानतळाचे हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्या कडे असते.
त्याचे नाव राजबीर सिंह आणि बायकोचे नाव (बहुधा) राजकुंवर (वय २२-२३ असावे) होते. हे राजस्थानातील झुनझुनू गावचे होते.
राजकुंवर ला घशाचा क्षयरोग झाला होता आणि तिचे वजन फारच कमी झाले होते. ती अगोदर बाह्य रुग्ण विभागातून उपचार घेत होती तेंव्हा तिचे वजन ३० (तीस फक्त) किलो होते. गेल्या दोन आठवड्यात तिचे वजन अजून दोन किलो कमी होऊन २७ पर्यंत आले म्हणून आमच्या सरानी तिला भरती करायला पाठविले होते. राजकुंवरची भरती होण्याची मुळीच तयारी नव्हती आणि राजबीर तिला भरती होण्यासाठी समजावून सांगत होता. राजकुंवरला एक दोन वर्षांचा मुलगा होता म्हणून असेल कदाचित. पण मी इतर कामात होतो आणि नवरा बायकोच्या वादात पडायची माझी इच्छा नव्हती.
शेवटी राजकुंवर भरती झाली. तिचे कागदपत्र माझ्याकडे आले तेंव्हा मी ते वाचून पाहिले. तिची क्षयरोगाची औषधे चालू होती पण ती त्यांना हवा तसा प्रतिसाद देत नव्हती.(सरांना ती औषधे नीट घेत नसावी असा संशय हि होता म्हणून आता प्रत्यक्ष निरीक्षणा खाली औषधोपचार करण्यासाठी तिला भरती करून घेण्यात आले होते. शिवाय तिला स्वरयंत्राचा क्षयरोग झाल्याने मुलाला त्याचा संसर्ग होण्याची शक्यता होती म्हणून तिच्या मुलाला तिच्या पासून लांब ठेवणे आवश्यक होते. राजकुंवरचा आवाजही त्यामुळे गेंगाणा ( नाकातून येणारा) झाला होता.
भरती झाल्याच्या दिवसापासून त्या आवाजात ती मला सारखी मला डिस्चार्ज करा म्हंणून भुणभुण करीत होती. पुढचा आठवडा भर राजकुंवरने मला भुणभुण करून अक्षरशः वैताग आणला होता. पण तिची परिस्थिती मुळीच चांगली नव्हती.
तिला अन्न अजिबात गिळता येत नव्हते. एक पोळी खाण्यासाठी तिला एक तास लागत होता. तिला शेवटी आम्ही बोर्नव्हिटा, उकडलेल्या अंड्याचे पांढरे असा उत्तम प्रथिनयुक्त आहार चालू केला तरीही तिच्या प्रकृतीत काही सुधारणा दिसत नव्हती. मी रोज तिला सकाळी न्याहारीच्या वेळेस आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेस खूप बोलून थोडेसे अन्न तिच्या घशा खाली उतरवण्याचा प्रयत्न करत असे. तरीही तिचे वजन एक आठवड्यात अजून दोन किलोने कमी झाले आणि आता २५ किलोपर्यंत उतरले होते. तरीही ती सतत मला डिस्चार्ज करा असे सांगत असे मी तिला सांगत असे कि तुझे वजन वाढले नाही तर मी तुला डिस्चार्ज देणार नाही.
मधल्या काळात एक दोनदा राजबीर सिंह तिला भेटायला आला असताना मला भेटला मी त्याला परिस्थिती समजावून सांगितली. त्यावर तो समंजस पणे म्हणाला, सर आपको जितना दिन उसे अस्पतालमे रखना है उतने दिन रख लो. सहसा सैनिक बायकांना भरती करण्यासाठी मुळीच राजी नसतात कारण घर सांभाळणे हे त्यांना जमत नाही आणि तो बर्याचशा भारतीय पुरुषांचा पिंड नाही मी त्याला विचारले कि बच्चे कि देखभाल कौन कर रहा है ? त्यावर तो म्हणाला कि मेरी साली आयी है हमारी देखभाल करणे के लिये. राजकुंवरची १८-१९ वर्षाची धाकटी बहिण गावाकडून आली होती त्यामुळे राजबीर ला अजिबात घाई नव्हती. सहसा एवढे लहान मुल असेल तर कोणीही सैनिक बायकोला रुग्णालयात भरती करण्यास नाराज असतो कारण बहुसंख्य पुरुषांची मुले सांभाळण्याकडे प्रवृत्ती नसते. शिवाय स्वयंपाक करणे मुलांना जेवू घालणे एवढे जमणे तर अशक्य च असते. आता मला कळले कि राजकुंवर ची डिस्चार्ज घेण्याची एवढी आतुरता का होती. दुर्दैवाने तिची शारीरिक परिस्थिती फारच खालावत चालली होती. पण हि राम कहाणी ऐकून काहीतरी करावे हे मला प्रकर्षाने वाटू लागले.
हि सर्व गोष्ट मी सरांच्या कानावर घातली आणि सांगितले कि सर, तिची औषधे मी स्वतःमाझ्या डोळ्यासमोर तिला घ्यायला लावतो आहे जमेल तितके अन्न् तिच्या पोटात उतरेल हे पाहतो आहे पण तिची तब्येत सुधारत नाही उलट खालावतच चालली आहे. काही तरी करायला पाहिजे. त्यावर सरानी विभागातील इतर लोकांबरोबर चर्चा आणि बराच विचार केला आणि मला म्हणाले कि आपण तिला स्टीरोईडस चालू करूया. तिला ४० मिग्राम प्रेड्नीसोलोन चा डोस चालू केला. आणि काय आश्चर्य दोन दिवसात तिच्या घशाची सूज उतरू लागली आणि ती हळूहळू जेवू लागली. रोज मला डिस्चार्ज करा म्हणून तिची भुणभुण चालू होतीच. तिला विस्तव आणि लोणी जवळ ठेवले कि काय होते हे माहित असल्याने ती जेंव्हा जेंव्हा मला भेटत असे तेंव्हा डिस्चार्ज हा एकच विषय काढत असे.तिने काही गोष्टी स्पष्ट न करता आडून मला सांगितल्या. मलाही ते समजत होते पण तिची परिस्थिती फारच गंभीर असल्याने तिला सोडणे त्या वेळेस तरी शक्य नव्हते.मी तिला एवढेच सांगितले कि तुझी तब्येत सुधारत नाही तोवर तुला घरी पाठवणे शक्य नाही. असे साधारण चार पाच दिवस गेले आणि एक दिवस राजबीर मला म्हणू लागला कि सर अब उसको डिस्चार्ज कर दो. मी त्याला म्हटले कि अभी वो पुरी तरह से ठीक नही है. त्यावर तो कुरकुर करू लागला. राजकुंवर ची बहिण आता परत जाणार होती.(तिच्या घरच्यांना कळले होते कि काय ते माहित नाही) त्यामुळे आता राजबीरची फारच गैरसोय होणार होती. अजून दोन तीन दिवसांनी राजकुंवर चे वजन केले तेंव्हा ते ३० किलो आढळले.मग मी सरांना हि सर्व मागची कहाणी सांगितली. त्यावर ते हसले आणि म्हणाले कि ती घरी व्यवस्थित जेवेल असे तुला वाटते का? मी त्यान म्हटले कि मी तिला राजबीर समोर सांगेन कि जर तू जेवली नाहीस तर तुला परत भरती करावे लागेल.
ते परत हसले आणि म्हणाले कि ठीक आहे डिस्चार्ज कर पण दर आठवड्याला बाह्य रुग्ण विभागात तिला पाठवण्यासाठी त्यांच्या मेडिकल ऑफिसर ला फोन करून ठेव. यावर मी त्याच दिवशी तिला डिस्चार्ज करायची सर्व कागदपत्रे तयार केली. राजकुंवर ला सांगितले कि राजबीर ला बोलावून घे आणि संध्याकाळी घर जायची तयारी कर. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. संध्याकाळी राजबीर आल्यावर मी सगळी तजवीज करून दिली तो वार्ड मास्तर कडे डिस्चार्ज स्लीप घ्यायला गेला असता राज कुंवर माझ्या खोलीत आली आणि माझ्या पाया पडली. मी एकदम संकोचाने उभा रहिलो त्यावर ती एवढेच म्हणाली सर, अपने मेरी "घर गृहस्थी" बचायी आणि ती गडबडीने बाहेर राजबीर होता तेथे निघून गेली. मी तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहतच राहिलो.
प्रतिक्रिया
मस्त लेख....
फ्यान
फॅन = phEn
फॅन...
टिळकांच्या संत हा शब्द
पी एच + कॅपिटल इ एन ए = फॅन
आवडला !!!
आखिर क्यो?
कठीण असते बुवा असले काही!
नक्की काय बोलावं काही कळत
नेहेमीसारखेच दर्जेदार
छान लेखन.
किस्सा आपण लिहला आहे म्हणूनच मस्त...
म्हणजे जीवन भौ सारखी
तुमच्या न्हवे हो तुमच्या पेशंट्च्या बाबत प्रतिसाद आहे ...!
तुमचे अनुभव नेहमीच चटका देऊन
आवडलं लेखन .
...छान...
हम्म
आपलेच दात आणि आपलेच ओठ
हं..
इतिहासाची पुनरावृत्ती
मस्त डॉ साहेब
लेख आवडला .
साली आधी घरवाली