टेंडर
टेंडर काढा....साहेब म्हणाले
त्या सरकारी कार्यालयाची भिंत
ओल पकडत होती गेले काही महीने
एक वेळ छप्पर गळकं असलं तरी चालतं
पण आधार देणा-या भिंतीच जर कमकुवत झाल्या
तर कसं चालेल...नाही का?
तर
टेंडर काढा...साहेब म्हणाले...भिंती रंगवून घेऊ
.
.
.
रंगारी आले मग
भिंत केली साफ
घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट
सगळं सगळं काढलं
आणि दिला रंग छानसा
शेड तीच पण तरी छान वाटत होतं सगळ्यांना
घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट
गेलं परत आपापल्या जागी
साहेब खुश...काहीतरी काम झालं ऑफिसात म्हणून
पण पंधरा एक दिवस
आणि परत ओल
साहेबांनी काढलं मग नवं टेंडर...वॉटरप्रूफिंगचं
आणि घेतलं काम करून
परत आले रंगारी
घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट
सगळं काढलं परत
आणि परत रंग देऊन गेले
पण लांब सोडून आलेल्या
मांजरीच्या पिल्लासारखी
परत परत येत होती
भिंतीला ओल
कोणालाच कळेना
त्या रूक्ष कार्यालयात
कुठून येतीये ही ओल
तिस-यांदा रंग देऊन झाल्यावर
जेव्हा शिपाई लावत होता वस्तू भिंतीवर
घड्याळ, कॅलेंडर, नोटीस बोर्ड लावल्यावर
गांधींची तसबीर घेतली हातात
आणि ओलं लागलं काहितरी हाताला डोळ्यापाशी
त्या तसबीरीतल्या गांधीजींच्या डोळ्यापाशी
साहेब होतेच शेजारी ऊभे
टेंडर काढा.....म्हणाले,
सगळ्या तसबीरी बदलून घेऊ
.
छान
छान जमलीय कविता.
चपखल.
सुप्पर लाईक
स्वातंत्र्या नंतरचे भारतातले
नेमकी! आवडली.
हं!
मस्त...
पर्फेक्ट!
काय छान लिहिली आहे! व्वा!!
जमलीये
चपखल !
सध्याच्या भारतीय सरकारवरील योग्य भाष्य....
आवडली आहे.