Skip to main content

व्हॅलंटाईन डे - गिफ्ट कोणती घ्याल?

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 12/02/2009 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॅलंटाईन डे आता तोंडावर येऊन ठेपला आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी आपल्या प्रेयसी/ प्रियकरासाठी भेटवस्तू घेतल्या असतील (इथे नवरा/ बायको या नात्यालाही प्रेयसी/ प्रियकर या असंभव नात्याने गौरविले आहे!!!). ज्यांनी भेटवस्तू अगोदरच घेतल्या असतील त्यांच्या आत्म्याला तो आकाशातला प्रभू (विप्र नव्हे!!) क्षमा करो......... पण ज्यांनी अजून भेटवस्तू घेतल्या नसतील (यात बहुतेक पुरूषमंडळी येतात!!!!!) त्यांच्या उपयोगासाठी हे मार्गदर्शन आम्ही देत आहोत......... आपापल्या प्रेयसीसाठी या व्हॅलेंटाईन डे ला काय गिफ्ट घ्यावी? (प्रियकरासाठी काय गिफ्ट घ्यावी याचं मार्गदर्शन मिपावरल्या अनेक समर्थ भगिनी करतीलच!!! त्यामुळे तो विषय आम्ही त्यांच्यावर सोपवत आहोत!!!!!) तर मित्रांनो आपल्या प्रेयसी/ बायको/ दिलकी धडनक/ माल/ सामान/ टपोरी इत्यादी असलेल्या पोरीसाठी (इथे पोरगी हा शब्द भलत्याच व्यापक अर्थाने वापरला आहे!!!!) भेटवस्तू घेतांना खालील गोष्टी लक्षात घ्या.......... १. नुसतं ग्रीटींग कार्ड द्यायचा बावळटपणा कधीही करु नका. नाही म्हणजे तुम्हाला हवं तर ग्रीटींगकार्ड द्या पण त्या खेरीज वेगळ्या गिफ्टची अपेक्षा असते हे ध्यानात घ्या.... २. तिला कविता/ लेख/ कथा वगैरे देऊ नका. पहिल्या वर्षी ही भेट कदाचित चालेल कारण तेंव्हा सगळंच रोमँटिक असतं. पण दुसर्‍या वर्षापासुन हे द्याल तर, "मला माहिती होतं तू अस्साच कंजूष आहेस ते!!!! लेख/ कविता/ कथाच द्यायची होती तर मिपाशीच संसार करायचा होतास!!!" हे ऐकावं लागेल...... ३. व्हॅलेंटाईन डे ची भेटवस्तू म्हणून मिक्सर, कुकर, ज्युसर, टोस्टर इत्यादी एकही गृहोपयोगी वस्तू खरेदी करू नका. यात स्त्रिया आपला सर्वात मोठा अपमान समजतात. "ह्या मेल्याला मी म्हणजे काय स्वयंपाकघरात राबणारी मोलकरीण वाटले?" अशी प्रतिक्रिया येईल!!! तेंव्हा आपल्याला जरी या गोष्टी कितीही उपयुक्त वाटल्या तरी त्यांच्याजवळ फिरकूही नका.... ४. आपल्या प्रियतमेला कपडे घेऊ नका. आपल्या प्रियतमेला आवडतील असे कपडे घेणारा पुरूष अजून तरी जन्माला आलेला नाही. आपले पूर्वज फार हुशार होते कारण ते वल्कलं वापरायचे! आपण अतिशहाणे झालो आणि कपड्यांचा स्वीकार केला. आता भोगा त्याची फळं!!!! आपण कितीही काळजीपूर्वक कपडे निवडले तरी ते एकतर योग्य कापडाचे नसतात, किंवा त्यांचा साईझ/ रंग/ टेक्श्चर बरोबर नसतं किंवा आपल्याला लेटेस्ट फॅशन म्हणजे काय ते अजिबात माहिती नसते!!!! आणि तुम्ही जर सांगितलंत की "बाई गं, त्या दुकानातल्या बाईनेच हा डेस काढून दिलाय तरिही कॉमेंट येणारच, "हो! तिला काय कळतंय? तिने गोडगोड बोलून गंडवलं तुला!! आणि तू पाघळलास!!!!" तेंव्हा या विषाची परीक्षा घेउच नका!!!!! ५.अत्तरं, इसेन्शियल ऑईल्स, बाथसेंन्टस मुळीच घेऊ नका!! कारण ते जरी कितीही महाग आणि दुर्मिळ असले तरी, "मला माहितीये तुझ्या मनात काय आहे ते!!!! तुला दुसरं काही सुचतच नाही का रे?" हा प्रश्न येणार...... ६. फुलं/ गुलाबं: हंऽऽऽ!!!! आपापल्या जबाबदारीवर घेऊन बघायला हरकत नाही!!! तुमची प्रेयसी कोण आहे यावर सगळं अवलंबून आहे. जर नव्याची नवलाई असेल तर खपूनही जाईल!!!! मला मात्र २१ डॉलरचा लालभडक गुलाबाचा गुच्छ घेऊन गेल्यावर, "काय हे! जरा तरी डोकं चालव!! या २१ डॉलरमध्ये किती पापलेटं आली असती माहितीये!!!" असा एका सिकेपीकाकूकडून एकदा अहेर मिळाला होता..... ७. चॉकलेटः आपली प्रेयसी जर अगदीच पाप्याचं पितर असेल तर चॉकलेटं चालतील. पण तिला जर का आपण अंगाने भरलेलो आहोत (प्रत्यक्षात असूदे वा नसूदे, तिचं परसेप्शन महत्वाचं!!!) असा संशय असेल तर तुम्ही मेलांत!!!! पुढला महिनाभर तरी दुसर्‍या खोलीत झोपायची तयारी ठेवा..... ८. दागिने: ही त्यातल्यातात सेफ भेट!!. त्यातही सोन्याचे दागिने निवडू नका!!! त्यांचा कस, घाट, तास बगैरे भानगडी समजून घेण्याची पुरूषांची बौद्धिक पात्रताच नाहिये. त्यापेक्षा खड्याचे दागिने घ्या. सेफ बेट!! बायकांनी आपण कितीही स्मार्ट आहोत असं दाखवलं तरी खड्यांमध्ये श्रेष्ठ्-कनिष्ट ठरवण्याची अक्कल देवाने त्यांच्यात घातलेलीच नाहिये!!!! तेंव्हा दागिने जर खर्‍या खड्यांचे असतील तर तुम्ही सुटलांत!!!! त्यातही पहिल्याच वर्षी एकदम महागाईतले खडे घेऊ नका!!!! पुढल्या वर्षी मग काय बोंबा मारणार? तेंव्हा पोवळं, मोती, नील, पाचू, माणिक असं चढत्या भाजणीने हिर्‍यापर्यंत पोहोचा!!! हिरे हे शक्यतो पहिलं मूल जन्माला आल्याच्यावर्षी!!! जेंव्हा तिला असं वाटत असतं की आपल्या नवर्‍याचं आपल्यावरचं प्रेम आता एकाएकी संपलं, त्या वर्षी!!!! मग एकदा मूल मोठं होऊ लागलं की मग व्हॅलेंटाईन डे ची चिंता करू नका, ते मूल तुमच्या दोघांच्या प्रेमाचं कांडण करणारच आहे...... काय मंडळी, तुमच काय मत?

वाचने 38548
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

In reply to by चित्रादेव

माफ करा पण, मलाही तुमची प्रतिक्रिया हा विनोद आहे, उपहास आहे की निषेध आहे हे नीटसं समजलं नव्हतं.... नुसत्या स्मायली टाकल्या म्हणजे शब्दांचा परिणाम कमी होत नाही....

In reply to by पिवळा डांबिस

पिवळा डँबीस, पहीले म्हणजे इथे नुसते शब्दातून अर्थ व्यतीत(काढले जातात) होतात. ना ओळख ना देख ना आवाजाच टोन व्यतीत होत नाही. तेव्हा सगळेच कठीण असते आणि प्रत्येक जण शब्दाचा काय अर्थ लावतो किंवा लावू शकतो हे सांगणे कठीणच आहे जरी स्माईली वापरल्या तरी. पण स्माईलींचा आतापर्यन्त जसा वापर केला गेलाय त्यावरून तर हाच अर्थ लावण्यात आला की लिहिलेले वाक्य हे कसे घ्यायचे आणि बहुधा त्याच साठी हे इमोट आयकन आहेत ना की ह्याचा टोन कसा आहे. बरोबर ना? कोणाला दुखवायचा हेतू न्हवता पण पक्या ह्यांनी जुन्या/ नवीन चा मुद्दा काढून नंतर स्माईली टकल्या आहेतच ना मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा? तेव्हा मी तरी इथे ही चर्चा थांबवते. मूळ मुद्द्यावर वळलेले बरे.

In reply to by चित्रादेव

मी पक्या यांच्या प्रतिसादाविषयी काही म्हणत नाहिये... मला तुमच्या मूळ प्रतिक्रियेतील पहिला आणि शेवटचा परिच्छेद हा विनोद, उपहास आणि निषेध यापैकी काय आहे ते विचारायचं होतं.... कृपया सांगाल का?

In reply to by पिवळा डांबिस

आता इथे हे समजावून सांगावे लागतेय.. असो. माझ्या स्माईली टाकून जर तुम्हाला समजले नसेल आणि नुकत्याच दिलेल्या पोस्टचे स्पष्टीकरण कळले नसेल तर लिहिते. सर्वात पहील्या प्रतीसादातील पहीले वाक्य हे निव्वळ विनोदाने लिहिलेय. अशीच एक प्रतीक्रीया एकली होती एका व्यक्तीकडून ह्याच विषयावर म्हणून गमतीत लिहिले. शेवटचे वाक्य हे असेच जरासे उपहासाने लिहिले.. कारण कितपत खाजगी गोष्टी इथे लिहू शकतो आणि हे विचारायचे कारण तसा इथेच 'मनातील गोष्ट वगैरे' उल्लेख वाचला म्हणून. बाकी काही दर्शवायचे न्हवते. आता तुम्ही पण दोन प्रश्णांची उत्तरं द्याल का? कारण तुम्ही माझे पोस्ट हे जाणून / समजावून घेण्यामागे काय हेतू आहे? तुम्ही एवढे अट्टाहास करताहेत की माझ्या पोस्टचा अर्थ जाणून घेण्यात म्हणून मला ही हा एक प्रश्ण आहे पडला आणि दुसरा प्रश्ण हा आहे के ह्या लेखावर फक्त सीरीयसच टीपणी (कमेंटस)अपेक्षीत आहे का? मीच कंटाळले इथे उत्तर देवून.. काय एक साधेसे वाक्य लिहिले स्माईली टाकून नी त्याचा काथ्याकूट चाललाय.... :( (अरे बापरे, पुन्हा मी स्माइली टाकली. आता पुन्हा प्रश्ण येणार का कोणाकडून की ह्याचा अर्थ काय? स्माइलीने शब्दांचे परीणाम बदलले/बदलले नाहीत).

In reply to by चित्रादेव

सर्वात पहील्या प्रतीसादातील पहीले वाक्य हे निव्वळ विनोदाने लिहिलेय. अशीच एक प्रतीक्रीया एकली होती एका व्यक्तीकडून ह्याच विषयावर म्हणून गमतीत लिहिले. शेवटचे वाक्य हे असेच जरासे उपहासाने लिहिले.. कारण कितपत खाजगी गोष्टी इथे लिहू शकतो आणि हे विचारायचे कारण तसा इथेच 'मनातील गोष्ट वगैरे' उल्लेख वाचला म्हणून. बाकी काही दर्शवायचे न्हवते. ओके. स्पष्टीकरणाबद्दल आभार. आता तुम्ही पण दोन प्रश्णांची उत्तरं द्याल का? जरूर! कारण तुम्ही माझे पोस्ट हे जाणून / समजावून घेण्यामागे काय हेतू आहे? कारण माझ्याच मूळ लिखाणावर हा धागा सुरु झाला आहे. बाकीचे पोस्ट समजले. तुमचा समजला नाही. आपल्या लिखाणावर जर कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली तर ती 'काय' केली हे जाणून घ्यावेसे वाटले. म्हणजे पुढील लिखाणात मला सुधारणा करता येईल हा उद्देश! दुसरा प्रश्ण हा आहे के ह्या लेखावर फक्त सीरीयसच टीपणी (कमेंटस)अपेक्षीत आहे का? मुळीच नाही! इथे कोणत्याही प्रतिक्रियेचं, मग ती सिरियस, विनोदी, अनुकूल, प्रतिकूल कशीही असो, स्वागतच आहे... फक्त लोकांना व्यवस्थित समजली जाणं महत्वाचं, नाही का? असो. माझं शंकानिरसन तुम्ही केलंत त्याबद्दल आभार. होपफुली तुमच्या दोन प्रश्नांना मी दिलेली उत्तरंही समाधानकारक असावीत.

In reply to by पिवळा डांबिस

अच्छा! आवडला हो तुमचा हेतू नी ओवरऑल अप्रोच प्रतीक्रीया जाणून घ्यायचा. असो. आता गाडी मुद्द्याकडे (मूल लिखाणाकडे) वळायला हरकत नाही. :)

In reply to by चित्रादेव

जरूर!

नविन सभासद सदस्यत्व घेऊन १-२ दिवस किंवा काही तासच झाले नसतील तरी लगेच भांडण्याच्या मूड मध्ये का येतात 'देव' जाणे? ;) (ह्.घ्या. हं)

हो तेच ना, इथे नवीन जुन्याचा संबध कशाला लावता हो? पण काय आहे ना तुमच्यासारखी जुनी सभासद लोकं, आधी नवीन आहे का सभासद बघून उगीच असे कारण नसताना त्या सभासदाची पोस्ट नीट पणे न वाचता खवचट पणे लिहितो तेव्हा होते असे. असो. तुम्ही पण हलकेच घ्या... :) (तुम्ही पण कधी काळी नवीन होतात ना...)

दागिने: ही त्यातल्यातात सेफ भेट!!. ???? अहो पिडाकाका .. असल्या भेटीनं आमचं 'सेफ' डिपौझिट अन'सेफ' होत हो! मागच्या वेळी आम्ही डोक्यावर दगड ठेउन खिसा मोकळा करुन एक लेटेस्ट डिझाईन घेतलं होतं. आता ते जुनं झालं आहे असा कालच किचन मधुन आवाज आला. आता काय पुन्हा डोक्यावर दगड ठेवावा लागणार :S सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

मला तर वाटते की ललनांना भेटवस्तूबरोबर एकदम सुंदर ठीकाणी बीच / आयलंड वर दिवस घालवणे सगळ्यात मस्त. :)

मोठ्या कठीण प्रश्नाला क्यालिफोर्नियापीठासनाधीश श्री.श्री.श्री. पिवळा डांबिसाचार्य १००८ ह्यांनी वाचा फोडली आहे. ह्या गहन प्रश्नावरील त्यांनी सुचवलेले उपायही केवळा अप्रतिम आहेतच. :) ह्यॅ: काय तिच्याआयला, आपल्याला गंभीर वगैरे होणं जमतच नाहीय्ये :( मरुदे, आपलं माणसासारखंच बोलतो. अहो, ही गिफ्ट घेणं म्हणजे काय डोक्याला शॉट्ट असतो राव. पण गेल्या वर्षापासून आम्ही डोकं लढवलंय(!) शॉपींगच्या वेबसाईट्सवर जायचं, त्या मार्केटिंगवाल्या लोकांचं डोकं लय भारी चालतं, त्यांनी मस्त विचार करुन नव्या नव्या गिफ्ट्स शोधलेल्या असतात त्यातलंच खिशाला जे झेपेल ते उचलायचं आणि मस्त गिफ्ट पॅक करुन, एखादं झक्कास ग्रिटींग कार्ड जोडून तिच्या नावावर कुरियर करायला सांगायचं...हां, हे करताना आधी आठवडाभर "काही गिफ्ट नाही आणि काही नाही, आजिबात हे प्रकार मी करणार नाही" असली बडबड करुन गाफील ठेवायला मात्र विसरायचं नाही. :) गेल्या वर्षी मला एक मस्त गिफ्ट सापडलेलं: एक गळ्यात घालायची साखळी+उघडता येण्याजोगं पेंडंट्+एक शिंपला! गडबडलात ना वाचुन? अहो हीच त्या मार्केटिंगवाल्यांची शक्कल :) त्याशिंपल्यात एक मोती बंद करुन ठेवलेला होता. शिंपला उघडायचा, त्यातला मोती काढायचा, पेंडंटमध्ये ठेवायचा आणि ते पेंडंट साखळीत ओऊन तिच्या गळ्यात घालायचं :) बेष्ट आहे की नाही ही आयडीयाची कल्पना? **ह्या वर्षी काय देणार ते आम्ही नाही सांगणार! गम्मत आहे एक!!!!! ;) ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

In reply to by धमाल मुलगा

मस्त गिफ्ट पॅक करुन, एखादं झक्कास ग्रिटींग कार्ड जोडून तिच्या नावावर कुरियर करायला सांगायचं... वर इतक्या लोकांनी कायकाय गिफ्ट द्यायच्या ते सांगितलं... पण स्वतःच्याच बायकोला गिफ्ट "कुरियर" करणारा हा पहिलाच बहाद्दर!!!!! लेका, तू पाठवलेलं एखादं मस्त गिफ्ट बघून बायको इतकी आनंदित होईल की त्या आनंदाच्या भरात कदाचित त्या कुरियरवाल्याचाच मुका घेईल!!!! सांभाळ रे बाबा!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

=)) येकदम डांबिस प्रतिक्रिया!!!!!!!! अहो पण काका, ते कुरियर मी आणि ती ज्यावेळी घरी असु त्याच वेळी मिळेल अश्या पध्दतीने घरपोच करायच्या सुचना देतो मी. म्हणजे ती संध्याकाळपर्यंत रागारागाने फणफण करत बसते आणि आलेलं पार्सल उघडुन पाहिलं की एकदम 'सरप्राऽऽईझ्झ्झ' :) मग काय, एकदम 'आनंदी आनंद गडे...' ;) हाय का ना मी एकदम हुशार? ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

व्हलेंटाईन डे जवळ येतोय म्हणून हा लेख वर आणतोय. होऊ दे भेटवस्तूंवर खर्च :-).

या २१ डॉलरमध्ये किती पापलेटं आली असती माहितीये!!!" असा एका सिकेपीकाकूकडून एकदा अहेर मिळाला होता.....
पिडांकाका, कोणत्या सिकेपीकाकूंना व्हॅलेंटाईन गिफ्ट दिली होतीत ..?

कालच वर्सोली बीचवर जावून आलो, नवरा म्हणाला हेच व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे(14,15 फेबचे सगळीकडे बूकिंग फुल्ल होते).पण त्यादिवसाठी पण काहीतरी गिफ्ट हवेच ना? स

In reply to by त्रिवेणी

पण त्यादिवसाठी पण काहीतरी गिफ्ट हवेच ना?
मग व्हॅलेंटाईनच्या दिवशीपण वर्सोली बीचवर जावून या. ;)

१) गर्लफ्रेंडला फोन करुन विचारा तिला वॅलेंटाईन डे ला काय गिफ्ट हवय २) फ्लिपकार्ट ओपन करा , ते गिफ्ट करेदी करा , गर्लफ्रेंडचा पत्ता वगैरे डीटेल्स द्या ३) पेमेन्ट ऑप्शन्स मधे "कॅश ऑन डिल्हीवरी " सिलेक्ट करा . :D

एक whatsapp वर आलेला मेसेज इथे देत आहे.:) आम्ही( मी आणि आमचं प्यांटवालं) डेज साजरे करत नाही. On this Valentines day take resolution to save the Nature ,Plants & Trees "Avoid Roses Use Diamonds" Lets pass this to all husband... ;) :D

Gift काही पण चालेल अगदी ऐक गुलाबाच फुल सुधा चालेल . महत्वाचं आहे तुमचं त्या व्यक्ती वर स्वार्थी प्रेम आसू नये . आणि पाहिलं स्वतःच्या मनाला विचार काय अपेक्षा ठेवून आपण प्रेमाचा बाजार मांडतोय . जेवढ्या अपेक्षा आणि स्वार्थ मोठा तेवढीच मोठी गिफ्ट घेणारे आणि देणारे दोघांना हवी आस्ते ,बघा तुम्ही कशात bastay