फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते
फेब्रुवारी महिना येतो, तोच मुळी मराठी भाषेच्या मुकूटातील काही महत्वपूर्ण क्षणांचे आणि हिर्यांचे स्मरण देत. ६ फेब्रुवारी (१९३३) अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपट प्रदर्शित झाला. आणि त्याच वर्षी ९ फेब्रुवारीला सानेगुरुजींनी श्यामची आईचे लेखन चालू केले.
जन्म: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख १८ फेब्रुवारी, पहिल्या मराठी शब्दकोशाचे आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज १९ फेब्रुवारी, - महात्मा फुले यांचा जन्म २० फेब्रुवारी . अर्थातच या मराठी महिन्यातला अजून एक विशेष दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी 'मराठी भाषा दिवस' कवीवर्य कुसूमाग्रजांचा जन्म दिवस. ह्याच फेब्रुवारीची २१ तारीख आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन घेऊन येते तर २६ तारीख मराठी पारिभाषेस समृद्ध करणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरण करवते.
हो पण या फेब्रुवारी महिन्याची सुरवातही विसरून चालत नाही कारण २ फेब्रुवारी म्हणजे पहिल्या मराठी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म दिवस.(फेब्रुवारी महिन्याचा एक योगायोग असा कि १ फेब्रुवारी १८८३ ला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित झाली). तर अशा या फेब्रुवारी महिन्याच्या निमीत्ताने काही संकल्पानांचा परिचय करून देण्याचा ह्या लेखाच्या निमीत्ताने हा अल्पसा प्रयास.
ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. ज्या भाषेत ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान आणि माहिती सूचनांची देवाण घेवाण होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भविष्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याचा धोका असतो. हेही लक्षात ठेवले पाहिजे की, ललित साहित्यामुळेच भाषा समृद्ध होते असे मानून चालणार नाही. जगभर ललित साहित्याला लोकाश्रय मोठा असतो, हे खरे आहे. तथापि, भाषा जेव्हा ज्ञानभाषा होते, तेव्हाच ती खर्या अर्थाने समृद्ध होते. इंग्रजी तशी होती व आहे. भारतातील हिंदीसह कोणतीही भाषा ज्ञानाची झालेली नाही. तशी होण्यासाठी अनेकविध शास्त्रांवर मान्यता मिळवणारी ग्रंथनिमिर्ती व्हायला लागते. (संदर्भ गोविंद तळवळकर) आणि आपली भाषा ज्ञानभाषा म्हणून टिकवायची असेलतर कोशसाहित्य आणि ज्ञानकोशांचे महत्व कमी लेखून चालत नाही.
कोश म्हणजे विशिष्ट प्रकारे रचून उपलब्ध करून दिलेला माहितीचा साठा. कोश ह्या शब्दाचा मूळ अर्थ धनाचा साठा, संग्रह असा आहे.अर्थातच शब्दकोश म्हणजे शब्दांचा साठा.तर ज्ञानकोश म्हणजे ज्ञानाच्या सर्व शाखा किंवा एखाद्या विशिष्ट शाखेची बहुव्यापक माहिती लिहिलेला बहुसमावेशक सारग्रंथ (compendium) होय.
सारसंग्रह म्हणजे एखाद्या ज्ञान शाखेचा संक्षीप्त, तरीही बहुसमावेशक/व्यापक संकलीत संग्रह ग्रंथ होय.सारग्रंथ एखाद्या बृहत ग्रंथाचा संक्षीप्त सारांश देऊ शकतात.बहुतांशवेळा ज्ञानशाखेच्या मानवी हितसंबंध किंवा प्रयासाच्या मर्यादित परिघाशी बांधील असतो (उदाहरणार्थ, जलभूशास्त्र,मत्स्यशास्त्र, वनस्पतिसमाजशास्त्र) एका अर्थाने वैश्विक ज्ञानकोश/विश्वकोशास सर्व मानवी ज्ञानाचा सारग्रंथ म्हटले जाऊ शकते.
आजच्या घडीला मराठी आंतरजाल चार ज्ञानकोश आपल्या माय मराठी भाषेतून उपलब्ध करत.त्यात पहिला मान अर्थातच केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचा पाठोपाठ क्रमांक लागतो तो तर्कतीर्थांचे आशिर्वाद लाभलेल्या मराठी विश्वकोशाचा असाच एक चांगला प्रयत्न म्हणून एकहाती प्रयत्नाने मराठी ज्ञानकोश उभे करणार्या निलेश छडवेलकरांच्या बलई.कॉम उल्लेख करता येईल.पण प्रत्येक माणसाकडून ज्ञान संकलीत करून सर्वांना मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देणार्या मराठी विकिपीडियाचही नाव न घेता आपण राहू शकत नाही.
अशा या मराठी ज्ञानकोशांच्या परंपरेचे जनक होते केतकर. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर (२ फेब्रुवारी, इ.स. १८८४; रायपूर, ब्रिटिश भारत - १० एप्रिल, इ.स. १९३७; पुणे, ब्रिटिश भारत) हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास-संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात.
विहंगावलोकन
शब्दकोशाची व्याप्ती भाषेतील शब्द, त्यांचे अर्थ, उच्चार आणि व्याकरण देण्यापुरतीच मर्यादित असते. शब्दकोशात अर्थ स्पष्ट करण्यासाठी प्रसंगी चित्रे आणि क्वचित नकाशेही असतात. पण कोणत्याही प्रकारची सखोल माहिती नसते. याउलट, ज्ञानकोश ज्ञानशाखेतील विविध संज्ञांची तपशीलवार माहिती देत असतो. आणखी त्यापलीकडे जाऊन, या माहितीचे विश्लेषण करणे, ज्ञानशाखांशी असलेली विस्तृत पार्श्वभूमी विशद करणे, आणि संदर्भ उपलब्ध करून देणे ही कामेही ज्ञानकोश करतो.
अनेक ज्ञानकोशांत चित्रे, नकाशे, आराखडे, आधारभूत पुस्तकांचे संदर्भ आणि सांख्यिकीय माहिती असते. सामन्यतः सुशिक्षित, माहिती-विशेषज्ञ अशा तज्ज्ञांच्या संशोधनाने आणि मार्गदर्शनाखाली ज्ञानकोशांची निर्मिती होत असते.
ज्याला एखाद्या विषयाची संक्षिप्त आणि विश्वासार्ह माहिती हवी असेल असा माणूस कधी ना कधी ज्ञानकोशाची पाने चाळतो. अशा ज्ञानकोशांत साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरुद्ध मते असल्यास, त्यांच्यासह), शक्य तिथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती मिळ्ते.
इथे वाचकांना भाषेचे सौंदर्य अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत बनवतो.
सारे विश्वकोश, विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता केवळ वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते..
तर असा हा फेब्रुवारी महिना,अशीही मराठीची लेणी, असे ज्ञानकोश आणि असेहे ज्ञानकोशकर्ते !
चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.
प्रतिक्रिया
छान माहिती अमोल केळकर
प्रोत्साहन आणि
छानच माहिती
उत्तम उपक्रम आणि माहिती.
प्रतिसादांकरिता धन्यवाद
छान माहिती आणि एक प्रश्न
मराठी विकिपीडीयावर संबंधीत
यांच्याबद्दल माहिती देणारा एक
धन्यवाद
मराठी विकिस्रोत प्रकल्पात छंदोरचना ग्रंथ उपलब्ध
छान
चांगली माहीती
माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद
उत्तम माहिती
सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव
केतकर हे कॉर्नेल विद्यापीठाचे
संभ्रम आणि द्विधा मनस्थिती